तरंगायचे दिवस!
कल्याणच्या खाडीवर पोहताना मी आणि माझ्या निरनिराळ्या वयाच्या सोबत्यांनी खूप मजा केली. आमच्या सर्वांच्या मनातल्या त्या सोनेरी आठवणी आहेत. ह्यात होती सगळी साधी सरळ माणसं. आपापल्या नोकऱ्या-व्यवसाय-संसार-कर्तव्य सांभाळणारी. ह्या उपक्रमात कुठल्या स्पर्धा जिंकल्या गेल्या नाहीत, की विश्वविक्रम मोडले आणि रचले गेले नाहीत. ही आहे एक साधारण पंचवीस वर्षांपूर्वी अत्यंत आनंदात घालवलेल्या दिवसांची एक साधी-सरळ आठवण.............
प्रस्तावना
माझं सगळ लहानपण आणि तरुणपण कल्याणला गेल. कल्याण मुंबईपासून अगदी जवळ. माझ्या बाबांसकट शेजारपाजारचे, ओळखीतले सगळेजण लोकलने ये-जा करून मुंबईत नोकऱ्या करत असत. कल्याणच्या जुन्या भागातल्या एका वाड्यात आई-बाबा, माझा मोठा भाऊ आणि मी राहत असू.
कल्याणला बाकी काही फार अडचणी नव्हत्या. आसपास सुशिक्षित समाज होता, शाळा चांगली होती, मुली-बाळी सुरक्षितपणे एकट्या आनंदाने फिरू शकत होत्या. थोडक्यात एखाद्या लहान गावाची ऊब शाबूत होती.
पण खेळाच्या किंवा करमणुकीच्या साधनांची मात्र वानवा होती. जिल्ह्याचे ठिकाण ठाणे. त्यामुळे नाटक बघायचे, तर ठाण्याला गडकरी रंगायतन गाठावे लागायचे. गडकरीला जाताना शेजारचा तरणतलाव दिसायचा. तिथून जाताना क्लोरिनचा तो टिपीकल वास यायचा. माझ्या बाबांची आम्ही दोघांनी पोहायला शिकावं, अशी फार इच्छा होती. दरवेळेला ठाण्याच्या स्वीमिंग पूलजवळून जाताना ‘ह्या उन्हाळ्यात दोघांची इथे नाव घालूया. आई आणि तुम्ही रोज येत जा. की पुण्याला जाल?’ असा संवाद व्हायचा. मला लगेच मी ऐटीत पाण्यात सूर मारते आहे, सपासप हातपाय मारत वेगाने पोहते आहे, अशी दृश्य डोळ्यासमोर यायला लागायची.
प्रत्यक्षात मात्र ते तितकस सोप नव्हत. घर, स्टेशन, तिकीट काढणे, ट्रेनचा प्रवास मग स्वीमिंग पूल. पोहण्याचा एक तास झाला की हीच सगळी तपश्चर्या उलट दिशेने. सगळ मिळून चार तास सहज लागले असते.
कल्याणला एक छान खाडी होती. पण तिथे पोहायला जाणे फार लोकमान्य नव्हते. खाडी बळी घेते, तिथे भोवरे-दलदल-खडक इ.इ. गोष्टी आहेत, अश्या बातम्या सगळीकडे चघळल्या जायच्या. कल्याणच्या खाडीचे पात्र चांगलेच म्हणजे जवळपास एक किलोमीटर रुंद आहे. डावीकडे बघितल की कल्याणच्या लोकांचा अभिमानाचा विषय असलेला दुर्गाडी किल्ला दिसायचा. समोर वीटभट्टी, तिथली उंचच उंच चिमणी होती. उजवीकडे बाकदार वळण घेऊन खाडी दिसेनाशी व्हायची.
माझ्या शाळकरी वयात आम्ही अधून-मधून खाडीवर फिरायला जायचो. वाळूचा व्यवसाय तेव्हाही तिथे चालू होता. त्या वाळूचे ढीग काठावर लागलेले असायचे. शहरात दुर्मिळ असलेला मोकळा वारा सुटलेला असायचा. एकूण काय नयनरम्य दृश्य होत! पाणी पाहून मला पोहायला शिकायची हुक्की यायची. अस वाटायचं, त्यात काय कठीण आहे? हात-पाय मारले की सरासर पुढे जायचं. काही लोक पोहत असायचे. एकदा बाबांना कोणीतरी ओळखीच भेटल. त्यांच्याबरोबर बाबाही पाण्यात उतरले. ते सगळे जण छान ऐटीत सफाईदारपणे पोहत होते. ते बघून मी बाबांवर इतकी खूष झाले, की विचारता सोय नाही! त्यांच्या काळजीने मनात बाक-बूक होत होत, तरी काठावर उभी राहून टाळ्या वाजवत होते.
घरी येता-येता बाबांनी ‘चला, ह्या सुट्टीत तुम्हाला इथेच पोहायला शिकवतो. इथे कोपऱ्यावर खाडी असताना काही नको ठाण्याला जायला..’ आईने ‘अहो, अजून एक-दोन वर्षे जाऊ देत, दोघही लहान आहेत अजून.’ असा विरोध करून बघितला. पण बाबा ऐकणार? शक्यच नाही. एकदा त्यांच्या डोक्यात आल, की संपल.
तेव्हा पोहायला शिकवण्यासाठी ‘फ्लोट’ इत्यादि वस्तूंचा उदय व्हायचा होता. दोन पत्र्याच्या डब्यांची झाकण झाळून बंद करून आणली, त्याला दोन्ही बाजूंना कड्या जोडल्या. माझ्या आणि भावाच्या पाठीला ते दोरीने गच्च बांधले, आणि आमच्या साध्या-सरळ, कृष्णधवल रंगातील मध्यमवर्गीय आयुष्यातल्या एका सोनेरी पर्वाला सुरवात झाली.
पोहण्याचे धडे
पहिल्या दिवशी मी आणि भाऊ दोघेही अमाप उत्तेजित झालो होतो. सकाळ होतेय कधी आणि आपण पाण्यात उडी घेतोय कधी, अशी घाई झाली होती. पण पाण्यात गेल्यावर मात्र हे प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही, ह्याची चांगलीच कल्पना आली. खाडीचे खारट पाणी नाकातोंडात गेल्यावर चांगली चविष्ट कल्पना आली, अस म्हटल तरी चुकीच होणार नाही...! पाठीला डबा बांधलेला असायचा. बाबा धरून हात-पाय मारायला शिकवायचे. आमचा जोरात आरडाओरडा आणि वेळप्रसंगी रडारडसुद्धा. आमच्या ह्या रडण्या-ओरडण्याचा बाबांवर काहीही परिणाम नाही. आई बिचारी होऊन काठावर बसून आमचा दंगा बघते आहे, असा साधारण सीन असायचा. वाड्यातल्या बायका आईला ‘कशाला खाडीवर पाठवताय, चांगली नाही हो खाडी लहान मुलांना.’ असे सल्ले देऊन तिला अजूनच हैराण करायच्या.
असे काही दिवस गेल्यावर हळूहळू आम्हाला तरंगायला यायला लागल. एव्हाना आमच्या पोहण्याची बातमी आसपास फुटली होती. माझी शाळेतली एक मैत्रीण, सुजाता, तिचा धाकटा भाऊ विजय, हेही आमच्याबरोबर यायला लागले. मग तर काय आनंदच आनंद! मुख्य रस्त्यापासून खाडीचा काठ दहा मिनिटांवर होता. आम्हाला पाण्यात उतरायची इतकी घाई व्हायची, की ते अंतर बहुतेक वेळा आम्ही पळतच जायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीभर हाच कार्यक्रम. रोज सकाळी दोन-दोन तास पाण्यात. इथे काही टॅंकसारख्या ठराविक वेळांच्या बॅचेस नसायच्या. शाळेच्या वेळेला सकाळी उठायला आईला छळणारे आम्ही, पोहायला जायला मात्र वेळेच्या आधी दहा मिनिटे हजर!
अस करता करता इतरही बरीच मंडळी आमच्या पोहण्यात सामील झाली. सगळ्यात मोठ्या सत्तरीतल्या आठवलेकाकांपासून तेरा-चौदा वर्षांच्या विजय वाडपर्यंत सगळ्यांची सकाळ खाडीवर साजरी होऊ लागली. ह्या सगळ्या गटात आम्ही तिघी मुली होतो. तिघीही एकाच वयाच्या. शाळकरी. तिघींचेही भाऊ, वडील सगळे बरोबर असल्याने एक छान कौटुंबिक स्वरूप होत.
इथे ना वयाच बंधन होत, ना बाकी आयुष्यातल्या कर्तबगारीच. एखादा उत्तम इंजिनिअर आमच्या सारख्या शाळकरी मुलांकडून पोहण्याचे प्राथमिक धडे गिरवायचा. कल्याणमधला नावाजलेला सी.ए. चपला हरवल्यामुळे अनवाणीच घरी जायचा. पण एकूण मजा इतकी यायची की आदल्या दिवशी काही मस्करी-फजिती झाली, तरी सगळे दुसऱ्या दिवशी पुन्हा हजर व्हायचे!!
क्रमशः
भाग २ : http://www.maayboli.com/node/42599
.
.
मस्तच ग..... छान लिहिले
मस्तच ग..... छान लिहिले आहेस.....
मला माझ्या तलावातील पोहण्याचे शिकण्याचे दिवस आठवले... मुलीला पोहायला घातले होते... ते बघुन बघुन आपण पण शिकायला पाहिजे असे वाटून मी पण पुढच्या वर्शी शिकले होते...
अनया, आयला मस्तच की! मी त्या
अनया,
आयला मस्तच की! मी त्या ठाण्याच्या तरणतलावात पोहायला शिकलो. पण उघड्या पाण्यात पोहोण्याची एक वेगळीच मजा असते.
मी ऐकलेलं की कल्याणला पावसाळ्यात पूर आला की लोक खाडीवर खासकरून पुरात पोहायला जात.
अवांतर : ती चिमणी ठाकुरली वीजकेंद्राची आहे का?
आ.न.,
-गा.पै.
मस्त लिहिलं आहे!
मस्त लिहिलं आहे!
मस्त लिहिलं आहे!
मस्त लिहिलं आहे!
छान ! आवडलं!
छान ! आवडलं!
अनया, मस्तं लिहिते आहेस. एक
अनया, मस्तं लिहिते आहेस. एक सुंदर सहजपणा आहे तुझ्या "वक्तव्याला". वाचायला मजा येतेय. (लवकर टाक पुढला भाग).
"हिला छान बुड्ता येतं" अशी माझी ख्याती असल्याने अगदी माशांच्याही पोहण्याच्या कथा-बिथा मला चित्तथरारक वगैरे वाटतात. तू तर काय मस्तं वडील, भाऊ ह्यांच्या सोबतीनं केलेला पोहोणी-प्रवास कथते आहेस. पर्वणी आहे माझ्यासाठी.
मस्त मला माझा जलप्रवेश आठवला.
मस्त
मला माझा जलप्रवेश आठवला. बाबांनी पाण्यात उतरवायचा प्रयत्न केला आणि मी मांजराच्या निर्धाराने लांब राहिलेलो.
मस्त लिहीलय !
मस्त लिहीलय !
मस्त. लौकर लिहा पुढचे.
मस्त. लौकर लिहा पुढचे.
मस्तच!
मस्तच!
क्या बात है. सुरेख लिहीता
क्या बात है. सुरेख लिहीता तुम्ही.
ओघवते.
छान लिहिताय
छान लिहिताय
सुरेख सहज आणि ओघवते लिखाण...
सुरेख सहज आणि ओघवते लिखाण... धन्यवाद..
अनया, शीर्षक आणि लेखन दोन्ही
अनया,
शीर्षक आणि लेखन दोन्ही मस्त ! कोणत्या दिवसांबद्दल लिहिलयस या उत्सुकतेनी धागा उघडला आणि मग जे वाचलं ते आवडलंच !
खूपच सुरेख लेखनशैली - सरळ,
खूपच सुरेख लेखनशैली - सरळ, साधी, ओघवती - मनाचा ठाव घेणारी ....
आवडलं..
आवडलं..
छान लिहिले आहे...
छान लिहिले आहे...
सर्वांचे मनःपूर्वक आभार!
सर्वांचे मनःपूर्वक आभार!
खूप खूप आवडले.
खूप खूप आवडले.
दोन्ही भाग आवडले
दोन्ही भाग आवडले
मजा आली वाचायला. दोन्ही भाग
मजा आली वाचायला. दोन्ही भाग छान आहेत. मस्त लिहिता तुम्ही.
मस्स्त ....
मस्स्त ....
आणि आमच्या साध्या-सरळ,
आणि आमच्या साध्या-सरळ, कृष्णधवल रंगातील मध्यमवर्गीय आयुष्यातल्या एका सोनेरी पर्वाला सुरवात झाली.>>>>>>>> अगदी खरंय! अशा पर्वांना सोनेरीच म्हणायला हवे.
किती सुरेख लिहिलय तुम्ही.
किती सुरेख लिहिलय तुम्ही. पुढ्चे भाग वाचायची उत्कंठा लागली आहे. वर लिंक आहेच.