बांधावरचा हिरवा चारा,
गवत दुधाळी टवटवलेले,
पाजळलेल्या जुन्या विळ्याने,
कापून भार्यामध्ये मोठ्या,
आणायाची जेव्हा आई,
खुंट्याभोवती पिंगा घालत
धावायाच्या सार्या गायी....
परसामध्ये सदाफ़ुलीला,
प्राजक्ताला कोरफ़डीला,
विहिरीवरच्या थारोळ्यातुन,
वरती येता दिसता आई....
ढळती सांज असूनही त्यांची,
आंघोळीला सदाच घाई...
मावळतीचा सुर्य तांबडा ,
गोंदण झाकून विसावलेला,
तसेच कुंकू रुंद कपाळी,
घामासोबत वाहत येई...
कष्ट करुन थकल्यावरही
सुंदर वाटायाची आई...
कोपर्यातली फ़ुरफ़ुरणारी,
विस्तवातली चूल हासरी,
सुखदुःखे गार्हाणी मांडत,
आईजवळी व्याकुळ काही...
भाकर भाजून गहिवरलेली ,
अजून थोडी खरपूस होई....
दिवसा सगळे मळ्यात असता
चार खणांचे घर बिचारे,
एकलकोंडी उघडी दारे,
अगदी हळवे असते तेही...
त्यालाही मग घरपण येते,
घरात फ़िरते जेव्हा आई....
गाणे नव्हते ओठावरती
सारवलेल्या ओट्यावरती
"लिंबोणीच्या झाडामागे,
चंद्र झोपला माझा बाई"....
तरी आईच्या कुशीत मजला,
झोप क्षणातंच निवांत येई....
--- संतोष वाटपाडे (नाशिक)
कष्ट करुन थकल्यावरही सुंदर
कष्ट करुन थकल्यावरही
सुंदर वाटायाची आई...>>>>
सुंदर !!! अतिसुंदर कविता.
खुप छान आहे कविता.
खुप छान आहे कविता.
नितांतसुंदर कविता ! लय हललीय
नितांतसुंदर कविता ! लय हललीय काही ठिकाणी.
आईबद्दलचं प्रेम कवितेतून छान
आईबद्दलचं प्रेम कवितेतून छान व्यक्त झालंय.
अतिशय सुंदर ..welcome
अतिशय सुंदर ..welcome
धन्यवाद मृण्मयी ।
धन्यवाद मृण्मयी ।
सुरेख काव्य .
सुरेख काव्य .
सुरेखच
सुरेखच
आवडली..
आवडली..
सुंदर कविता, अतिशय सुंदर
सुंदर कविता, अतिशय सुंदर
अगदी अगदी.
अगदी अगदी.
वाह!! सुंदर!! खुप भावली
वाह!! सुंदर!!
खुप भावली कविता!
आवडली..
आवडली..
खूपच सुंदर. आवडली.
खूपच सुंदर. आवडली.