गोळा भात आणि चिंचेचं सार

Submitted by प्रीति on 9 January, 2014 - 12:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गोळ्यासाठी-
लाडु बेसन/भरडा ३ वाटी, नसल्यास साधं बेसन पण चालेल.
धने, जीरे पुड, तिखट, मीठ, हळद चवीनुसार
लसुण जिरं कुटुन १ चमचा
तेल पाव वाटी
बारीक चिरलेला १ मध्यम कांदा

दिड वाटी तांदुळ

सारासाठी-
चिंच भिजवुन
गुळ, मीठ, हळद, बारीक सुकं खोबरं
साराच्या फोडणीला - जिरे, मोहरी, मेथ्या, कडिपत्ता, लसुण जिरं कुटुन, लाल मिरच्या

दाण्याचं तेल - तेल, मोहरी, उडद दाळ (एच्छिक), लाल मिरच्या, हिंग, भरपुर लसुण बारीक चिरुन

क्रमवार पाककृती: 

तांदुळ धुऊन पाणी घालुन घ्यावे. भात मोकळा होईल एवढेच पाणी घालावे.
गोळ्याचं साहित्य, तेल सोडुन एकत्र करुन चांगलं मिसळुन घ्यावं. त्यात तेल घालुन चांगलं मिसळावं. आता जरासा पाण्याचा हात लाऊन लाडुसारखे गोळे करावे. हे गोळे भात करणार त्या भांड्यात सोडुन, भात आणि गोळे एकत्र कुकरला २ शिट्या करुन, शिजवावे. राईस कुकरमधे पण करु शकता.

भात शिजेस्तोर, सार करुन घ्यावा. तेलात जिरे, मोहरी, मेथ्या, कडिपत्ता, लसुण जिरं कुटुन, लाल मिरच्या, हळ्द घालुन चिंचेचा कोळ आणि पाणी घालावे. चवीनुसार मीठ आणि गुळ घालावा. एक उकळी आल्यावर सुकं खोबरं घालावं.५-१० मि. उकळ्ल्यावर गॅस बंद करावा.

दाण्याचं तेल/फोडणीचं तेल
तेल कढल्यात गरम झाल्यावर प्रथम मोहोरी, मग उडद दाळ (कडक आवडत असेल तरच) ब्राऊन होऊ द्यावी, मग बारीक चिरलेला लसुण, तो लाईट ब्राऊन झाल्यावर मिरच्या आणि हिंग आणि लगेच गॅस बंद. तेल गार झाल्यावरच खायला घ्यावे, लसुण मस्त खुसखुशीत होतो.

हे तेल पण गोळा भाताचा महत्वाचा भाग आहे.

आता सगळं तयार झाल्यावर, गरम भात आणि गोळा घ्यावा. गोळा फोडुन भातात छान मिसळावा. वरतुन खमंग फोडणी घेऊन सारासोबत खावा (तोंडाला पाणी सुटलं) सोबत पाहिजे असल्यास पापड घ्यावे

वाढणी/प्रमाण: 
२ माणसे
अधिक टिपा: 

गोळ्यात पाणी जास्त झालं तर गोळे दडस होतात. अगदीच कोरडं मिश्रण वाटलं तर अजुन तेल घालावे पण पाणी अगदी जस्ट गोळे करायला. कांदा टाकल्याने तेल बरचं कमी लागतं.
लाडु बेसनाने गोळे चिकट होत नाहीत, साध्या बेसनात जरा तेल जास्त लागतं.

माहितीचा स्रोत: 
बेसिक कृती आजेसासुबाई, नंतर मी बरेच प्रयोग करुन हा यशस्वी पदार्थ!
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोन्डाला पाणी सुटले राव. प्रीती तुझ्या आजच्या दोन्ही पाकृ एकदम मस्त. भात मस्त एकदम. मी भातखाऊ नाही पण वेगळी चव नक्कीच आवडते.

मस्त. आम्ही चण्याच्या डाळीचे भिजवून, भरड वाटून केलेले गोळे घालतो भातात. आता हे बेसन वापरून करून बघेन. वरून चुरचुरीत फोडणी घालून मस्त खमंग लागतो हा भात. आम्ही सोलकढी करतो ह्याच्या बरोबर. चिंचेचं सार पण ट्राय करीन पुढच्य वेळी.

मी लोकसत्तात आलेल्या रेसिपीप्रमाणे करतो, हिंगमोहरीच्या फोडणीत भाजलेले बेसन गार करून त्यात तिखट, मीठ, सुक्या खोबर्‍याचा कीस, दाण्याचा कूट घालून पाण्याने मळून सुपारीएवढे गोळे करायचे. भात अर्धवट शिजत आला की त्यात गोळे सोडून वरून पाण्याचा हबका द्यायचा.

मी कधी खाल्ला नाही असा भात. पण बघून करावासा वाटतो आहे. पण गोळे केव्हडे असावेत. लाडू सारखे म्हणाली आहेस पण ते शिजतील का? परवा त्या गवारीच्या भाजीतील गोळे मी अगदी लहान म्हणजे शेंगदाण्या एव्हडे केले होते. तसे करायचे का??

आज हाच मेनू केला होता. झणझणीत्त पदार्थ आहे. बेसनाचे गोळे मी थोडे लहान केले होते. पण गरमगरम खायला भारी वाटले.

धन्यवाद सगळ्यांना!
प्रॅडी कधी कधी सोबत ताक पण करतो, सोलकढी पण छानच लागेल.
सायो, दुसर्‍या फोटोत जरा दिसतायत, पण प्रॅडी म्हणतेय तसं पहिल्या फोटोत, गोळा फोडुन मिसळलाय.
नंदिनी गोळे फुटले का? Happy नाही फुटत अजिबात.
मृणाल १, व्यवस्थित शिजतात.

नंदिनी गोळे फुटले का? स्मित नाही फुटत अजिबात<<<नाहेी, काही धाड भरली नाही.

मी राईस कूकरमध्ये केले होते. मेनू घरामध्ये लोकप्रिय झालेला आहे आनि दोन तीन दा करून झालेला आहे.

अरे वाह! आम्ही गोळाभात करताना थोडी तुर डाळीची भरड पण घेतो, आणि गोळ्याचं पीठ भिजवताना दही वापरतो. इलेक्ट्रीक राइस कुकर मधेही चांगला होतो गोळाभात, फोडणीची लसूण मिरची मस्ट, फक्त पथ्य म्हणून चिंचेऐवजी आमसुलाचे सार करतो. Happy

Back to top