"गीताई चिंतनिका" -
११ सप्टें हा विनोबांचा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांच्याच एका ग्रंथाबद्दल मला भावलेले काही लिहित आहे.
गीताई तर सर्वांना माहित आहेच. तसेच गीता-प्रवचनेही खूपच प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर गीताई - चिंतनिका या ग्रंथाबाबतही वाचकांना माहिती व्हावी म्हणून येथे ती माहिती देण्याचा माझा अल्पसा प्रयत्न.
श्रीमद्भगवद्गीतेला विनोबांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व होते. गीता प्रवचने या ग्रंथाच्या सुरुवातीला ते म्हणतात - "गीतेचा व माझा संबंध तर्कापलीकडचा आहे. माझे शरीर आईच्या दुधावर पोसले, त्यापेक्षाहि माझे ह्रदय व बुद्धि यांचे गीतेच्या दुधावर अधिक पोषण झाले आहे. जिव्हाळ्याचा जेथे संबंध असतो तेथे तर्कास वाव नसतो. तर्काला छाटून श्रद्धा व प्रयोग या दोन पंखांनीच गीतेच्या गगनात मी यथाशक्ति भरार्या मारीत असतो. मी प्रायः गीतेच्याच वातावरणात असतो. गीता म्हणजे माझे प्राण-तत्व. मी गीतेविषयी इतरांशी कधी बोलतो तेव्हा गीतेच्या समुद्रात तरंगत असतो, आणि एकटा असतो त्या वेळेस त्या अमृतसमुद्रात खोल बुडी मारुन बसतो."
गीताई - चिंतनिका या ग्रंथाबाबत विनोबांनी स्वतः असे लिहिले आहे -
"गीता-प्रवचनांनी एकूण गीतासार सोप्या भाषेत लोकांच्या आटोक्यात आणून दिले. परंतु श्लोकशः अर्थ करण्याला आणखी मदतीची गरज राहते. त्यासाठी गीताई-शब्दार्थ-कोश तयार केला. अभ्यासकांना त्याची मदत होते असे मी पाहिले. परंतु सामान्य वाचकांना कोश वापरुन अर्थशोधन करण्याची शक्ति आणि फुरसतहि नसते. त्यामुळे श्लोकांचे विवरण श्लोकांखालीच दिल्याने बरे पडेल अशी कल्पना निघाली. तशी योजना या गीताई चिंतनिकेच्या आवृत्तीत केली आहे."
"गीता-प्रवचने, स्थितप्रज्ञ-दर्शन आणि गीताई चिंतनिका मिळून गीतेचा साम्ययोगपर अर्थ जसा मी समजलो तसा पूर्णपणे वाचकांच्या पदरात पडेल अशी मला आशा आहे."
गीताई, गीता प्रवचने, गीताई चिंतनिका व स्थितप्रज्ञ लक्षणे हे विनोबांची खास गीतेला वाहिलेली शब्दकुसुमे.
विनोबा स्वतः गीतारुपी अमृतसागरात सदैव विहार करणारे असल्याने त्यातील अमूल्य विचारमोती त्यांना जसजसे मिळत गेले तसतसे ते बहुधा लिहून ठेवत असावेत. त्या चिंतनाचे सार म्हणजे गीताई चिंतनिका.
गीताई ही गीतेची समश्लोकी आहे -
उदा.
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः
मामका: पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ||
त्या पवित्र कुरु-क्षेत्रीं पांडूचे आणि आमुचे
युद्धार्थ जमले तेव्हां वर्तलें काय संजया ||
१९३२ साली धुळ्याच्या तुरुंगात असताना विनोबांनी केलेली गीतेवरील जी प्रवचने ती गीता प्रवचने. जी सिद्धहस्त लेखक सानेगुरुजींनी लिहून काढली.
गीताई चिंतनिका व स्थितप्रज्ञ लक्षणे हे विनोबांची गीतेवरील सखोल चिंतन प्रकट करणारे अद्वितीय व विशेष ग्रंथ.
त्यातील स्थितप्रज्ञ लक्षणे ही गीतेतील दुसर्या अध्यायातील स्थितप्रज्ञ यावर पूर्ण केंद्रित केलेले तर गीताई चिंतनिका हा गीतेवरील अतिशय लक्षणीय चिंतन व्यक्त करणारा ग्रंथ.
मला स्वतःला या ग्रंथाविषयी जे वाटले ते खाली देत आहे -
१) गीताईच्या प्रत्येक श्लोकाखाली एक विशेष टिप्पणी दिलेली आहे - हा एखादा साधा विचार असेल तर कधी खूप उंची गाठणारा.
२) सर्व विचार विनोबांच्या सखोल चिंतनातून प्रकट झालेले दिसतात.
३) कधी ऋग्वेद तर कधी उपनिषदातील ऋचा संदर्भासाठी दिलेली असते. तर कधी ती ऋचा देउन स्वतःचे विशेष मत प्रकट केलेले
४) एखाद्या श्लोकाखाली गीतेत आलेला त्यासंदर्भातील इतर श्लोकाचा/श्लोकांचा उल्लेख दिलेला असतो.
५) कधी स्थितप्रज्ञाची लक्षणे काय असा अर्जुनाचा प्रश्न असेल तर तो प्रश्न संगतवार मांडलेला व यावर भगवंतांनी सखोलतेने दिलेले उत्तर ज्यात पुढील सर्व श्लोकांची सुरेख संगती व त्यावर विशेष विवरण.
गीतेवर चिंतन करीत असताना या महापुरुषाच्या मनात ज्या विचार लहरी उमटत असतील त्या त्यांनी इतक्या सुसंगत व अभ्यासपूर्ण (जराशा गणितीपद्धतीने) कशा काय लिहिल्या आहेत हे मला कायम वाटणारे कुतुहल आहे. दुसरे असे की विनोबा जे म्हणतात की मी प्रायः गीतेच्याच विचारात असतो त्याची सार्थता अक्षरशः पटतेच पटते व यात त्यांचा अभिमान दिसून न येता एखाद्या विषयाचा शास्त्रशुद्ध विचार कसा करावा हेच लक्षात येते.
इथे दुसरेही एक जाणवते की हे नुसते पांडित्य वा विद्वत्ता नसून एका प्रयोगशील योग्याचे (कर्मयोगी, ध्यानयोगी, ज्ञानयोगी, जीवनयोगी, शिक्षणयोगी, अनुभवयोगी) हे प्रकट चिंतन आहे. ते जीवनाचे तुकडे न पाडता सर्वंकष विचार सतत करत असतात हेही जाणवत रहाते.
विनोबांनी आयुष्यभर जणु गीतातत्वाचाच ध्यास घेतला होता की काय असे वाटत रहाते. जे तत्व त्यांना उमगले ते स्वतः नक्कीच जगत होते अशी खात्री वाचकाला पटावी असा हा अद्वितीय ग्रंथ आहे.
याठिकाणी एका पारमार्थिक महापुरुषाच्या बाबत घडलेला एक सत्यप्रसंग द्यावासा वाटतो. एका थोर इतिहासकाराने आपल्या अमोघ वक्तृत्वाने व अफाट विद्वत्तेने सर्वजनांवर एक मोहिनीच घातली होती तो काळ. या इतिहासकारांचे एक मित्र होते ज्ञानेश्वरीवर अतिशय रसाळ प्रवचने करणारे एक पारमार्थिक महापुरुष. पण हे नुसते प्रवचनकार नव्हते तर ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारीही होते.
इतिहासकार आपल्या या प्रवचनकार मित्राला म्हणाले - अहो चला, मी दिवसा इतिहासावर व्याख्याने देत जाईन व सायंकाळी तुम्ही ज्ञानेश्वरीवर प्रवचने करा - आपण सगळा महाराष्ट्र पार हलवून सोडू.
प्रवचनकार मिश्किलपणे म्हणाले - अहो तुमचे बरे आहे - ती राणाप्रतापाने अशी लढाई जिंकली असे वर्णन करताना ना तुम्हाला तलवार फिरवायची असते ना श्रोत्यांनाही - त्यामुळे तुमचे व्याख्यान ऐकताना जी काय थोडी फार वीरश्री, देशाभिमान अंगात संचारतो त्यामुळे श्रोते खूष, पर्यायाने तुम्हीही मैदान मारलेलेच असते - पण इथे ज्ञानेश्वरीत जी काय भक्त लक्षणे सांगितली आहेत ( उदा. अद्वेष्टा, सतत संतुष्ट, अमानित्वं अदंभित्वं) ती वाचतानाही मला अजून घाम फुटतो - की ही लक्षणे माझ्या अंगात उतरली आहेत का ? तर श्रोत्यांकडून कसली अपेक्षा ठेवणार ? मला फक्त तुकोबाच समोर येतात - जे म्हणतात की "काम क्रोध आड ठाकले पर्वत | राहिला अनंत पैलिकडे || ....
या प्रवचनकाराच्या म्हणण्यामागे जे तथ्य होते ते विनोबा पूर्ण जाणून होते - ते हे की परमार्थ ही वाचायची-सांगायची गोष्ट नसून केवळ अनुभवण्याची गोष्ट आहे - जी अतिशय कठीण- सगळ्यात कठीण गोष्ट होय.
त्यांच्या विविध ग्रंथ संपदे मधून जी गोष्ट आपल्या अगदी सहज लक्षात येते ती हीच की यात सांगितलेल्या गोष्टी या महापुरुषाच्या अनुभवाच्या आहेत. ज्या विश्वात्मक भावात जाऊन माऊलींनी पसायदान मागितले तीच गोष्ट विनोबांच्या बाबतीतही आढळते - त्यांनी ज्या पारमार्थिक गोष्टी यात विशद केल्यात त्या आपल्याही ह्रदयात ठसूनच रहातात याचे कारणही हेच.
या ग्रंथाच्या शेवटी या तीन अतिशय महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यादेखील खूप अभ्यासपूर्ण असून अतिशय वाचनीय आहेत.
१] गीताईची अधिकरण-माला
२] गीताध्याय-संगति (पूज्य गांधीजींना लिहिलेले पत्र)
३] साम्यसूत्र-वृत्ति:
शब्दांचा मोजून मापून पण नेमका वापर, विचार मांडणीतील सखोलता पण सुगमता, प्रकांड पंडित असताना बुद्धिच्या मर्यादा लक्षात घेऊन सहज निर्माण झालेली ईश्वर -शरणता असे अनेक पैलू त्यांच्या या चिंतनातून प्रकट होताना दिसतात.
सगळ्यात महत्वाची गोष्ट - गीतेतील तत्वज्ञान हे केवळ त्या विचारात, त्याच्या शाब्दिक अभ्यासात नसून आचरण्यासाठीच आहे या करता विनोबांनी केलेला आटापिटा हे सर्व पाहिले की हा महापुरुष केवळ ज्ञानोबा-तुकोबा-समर्थ यांच्या मांदियाळीत शोभावा इतक्या उंचीचा आहे हेच जाणवू लागते.
अतिशय विद्वान असे विनोबा किती रसिक असावेत याचाही प्रत्यय आपल्याला या पुस्तकातून येत रहातो
या पुस्तकातील अनेक ठिकाणी आपण त्यातील सुंदर विचाराने मोहित होऊन जातो व आश्चर्याने थक्क होत पुन्हा पुन्हा त्याकडे पहात रहातो. त्यातील मला भावलेले जे आहेत ते वानगीदाखल देत आहे.
उदा. १ -
तस्मात प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यम्
पितेव पुत्रस्य सखेव सख्यु: प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम् || भगवद्गीता अ. ११ श्लो. ४४||
म्हणूनि लोटांगण घालितो मी प्रसन्न होई स्तवनीय मूर्ते
क्षमा करी बा मज लेकराते सखा सख्याते प्रिय तू प्रियाते || गीताई
यावर विनोबांची टिप्पणी - वात्सल्य, सख्य व प्रेम ही तीन नेहेमीची क्षमा मंदीरे आहेत.
वात्सल्य दोष पोटात घालते, सख्य दोष सहन करते, प्रेमाला दोष दिसतच नाहीत; - तिन्ही प्रकारांनी दोष दुरुस्त होऊ शकतात.
उदा. २ -
म्हणूनि तूं ऊठ मिळीव कीर्ति जिंकूनि निष्कंटक राज्य भोगी
मीं मारिले हे सगळे चि आधीं निमित्त हो केवळ सव्य-साची ||अ. ११, ३३||
यावर विनोबांची टिप्पणी -
(१) विकारांशी झगडण्याची प्रेरणा ज्याला ईश्वरकृपेने लाभली त्याने हे समजून चालावे की ते सारे विकार ईश्वर आधीच समूळ नष्ट करुन चुकला आहे. आपल्याला केवळ निमित्तमात्र लढायचे आहे, आणि निष्कंटक सत्ता आपलीच होती ती अनुभवायची आहे. भक्ताची कीर्ति करण्यासाठी ईश्वराने हे नाटक रचले आहे असे समजून त्याने द्विगुणित उत्साहाने (सव्यसाची) लढत रहावे.
(२) ईश्वराच्या हातातील हत्यार होणे म्हणजे एका बाजूने निरहंकारता -शून्यता-असून, दुसर्या बाजूने पुरुषार्थाची पराकाष्ठा - प्रयत्नाची परिपूर्णता - आहे. 'सव्यसाची' म्हणजे उजव्या हातानेच नव्हे पण डाव्या हातानेहि काम करण्यास सज्ज असलेला, या शब्दाचे हे स्वारस्य आहे.
उदा. ३ -
अर्जुन उवाच |
अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः |
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ||अ. ३, ३६||
मनुष्य करितो पाप कोणाच्या प्रेरणेमुळे
आपुली नसता इच्छा वेठीस धरिला जसा || अ. ३, ३६ ||
यावर विनोबांची टिप्पणी -
'इच्छा नसून पाप का घडते' हा एक मानवी मनाचा मूलभूत प्रश्न आहे. परिस्थिति, संगति, पूर्वजन्म्-संस्कार इत्यादि कारणे काढली तरी ती त्याचे उत्तर देण्यास समर्थ नाहीत. उत्तर हेच होऊ शकते की इच्छा नसून पाप घडते हा एक भास आहे. स्थूल इच्छा नसली तरी सूक्ष्म रुपाने ती असते. ती ओळखावयास हवी, ती ओळखून तिचा निरास केल्यानेच पाप्-मुक्ति लाभू शकते. भगवंतांनी दिलेल्या उत्तराचे हेच तात्पर्य आहे. सूक्ष्म इच्छा म्हणजेच 'काम'.
उदा. ४ -
द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् |
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ||अ. १०, ३६||
द्यूत मी छळणारांचे तेजस्व्यांतील तेज मी
सत्त्व मी सात्त्विकांतील जय मी आणि निश्चय ||
यावर विनोबांची टिप्पणी -
जुगारी वृत्तीने जगाला लुबाडू पाहणारांची शेवटी त्याच्याच नाशास कारण होणारी जुगारी वृत्ति ही देखील ईश्वरी प्रेरणा होय. शुभ आणि अशुभ सार्याच प्रेरणा मूलतः ईश्वरी असतात, हे भक्तिमार्गाचे प्रमेय श्लोक ४, ५ मधे सांगितले होते. त्यावर प्रकाश पाडणारे हे एक उदाहरण आहे. ईश्वराकडून होणारी शुभ प्रेरणा आणि अशुभ प्रेरणा त्या त्या व्यक्तिंच्या कल्याणासाठी आणि नाशासाठी ईश्वराकडून होत असते, हे जाणून मनुष्याने निरहंकार व्हावे आणि अशुभ प्रेरणेतून बचावण्याविषयी ईश्वराची निरंतर प्रार्थना करीत असावे असे याचे फलित आहे.
"अक्षैर्मा दीव्यः कृषिमित्कृषस्व' या वेद-वाक्यात कृषिविरुद्ध द्यूत अशी कल्पना आहे. कृषि हे प्रामाणिक परिश्रमाचे उपलक्षण असून त्या उलट द्यूत म्हणाजे परिश्रम टाळून पैसे मिळवण्याची जुगारी वृत्ति असा याचा अर्थ आहे.
उदा. ५-
त्या पवित्र कुरु-क्षेत्रीं पांडूचे आणि आमुचे
युद्धार्थ जमले तेव्हां वर्तलें काय संजया ||
यावर विनोबांची टिप्पणी -
(१) शरीराला क्षेत्र ही संज्ञा गीतेने तेराव्या अध्यायात दिली आहे. पण त्याला पवित्र कुरुक्षेत्राची उपमा देण्याची कल्पना गीतेच्या पूर्वीची आहे. त्याला देव्-यजन आणि ब्रह्म-सदन म्हणून गौरविले आहे. पण तसेच अनेक युद्धांची भूमि म्हणूनहि ते गाजलेले आहे. शरीरात एक सनातन- देवासुर्-संग्राम चालल्याचे उपनिषदात वर्णन असून तदनुसार गीतेच्या सोळाव्या अध्यायात दैवी आणि आसुरी संपत्तीची मांडणी केली आहे. कौरव कर्मासक्त आणि मूढ राजस्-तामस वृत्ति. पांडव प्रज्ञावान (पंडा=प्रज्ञा) ज्ञान्-दृष्टी, सात्त्विक वृत्ति. आसुरी विरुद्ध दैवी अथवा राजस्-तामस विरुद्ध सात्त्विक असे ह्या युद्धाचे गीतेत दुहेरी स्वरुप आहे.
(२) धृतराष्ट्र - (अ) कौरवांचा पिता. राष्ट्रधारणाचा अभिमान बाळगणारा, आंधळा स्थितिस्थापक. (आ) मोह (आध्यात्मिक परिभाषा)
(३) संजय - (अ) धृतराष्ट्राला युद्धाची माहिती देणारा, गीतेचा दुसरा प्रवक्ता, व्यासकृपेने दिव्य्-दृष्टिसंपन्न. (आ) विवेक (आध्यात्मिक परिभाषा)
तत्वज्ञानाचा रोजच्या जीवनात वापर होऊ शकत नसेल तर ते तत्वज्ञान संपूर्णतः कुचकामाचे अशी विनोबांची रोखठोक धारणा. कुठलाही गूढवाद, चमत्कार वा अंधःश्रद्धा यांचा पुरस्कार ते कुठेही करीत नाहीत. दररोजचे जीवन किती उंच पातळीवर नेता येते हे प्रत्यक्ष आचरण करुन त्यांनी दाखवून दिले. शारीरिक श्रमावरची त्यांची निष्ठा पाहिली की आपल्या लक्षात येते की हा केवळ आश्रमवासी, प्रवचने देणारा संत नसून कृतिशील, प्रयोगशील संत आहे.
जुन्या विचारांना सरसकट टाकावू म्हणून ते फेकून देत नाहीत तर त्यातील आजही उपयुक्त ठरतील असे जे विचारधन आहे त्याला आधुनिक दृष्टीने कसे पहाता येईल हे ते फार सुरेख पद्धतीने सांगतात.
विनोबांनीच म्हटल्याप्रमाणे हे त्यांच्या अभ्यासातून त्यांना स्फुरलेले विचारधन. जे कोणी गीतेचा अभ्यास खूप सखोलपणे करु इच्छितात त्यांना हे पुस्तक नक्कीच उपयोगी ठरेल. याव्यतिरिक्त जे खरे साधक असून परमार्थ मार्गावर वाटचाल करु इच्छितात त्यांच्यासाठी तर उत्कृष्ट मार्गदर्शन करणारा हा एक दीपस्तंभच ठरेल. प्रपंच किंवा संसार हे परमार्थमय कसे करता येतात हे सांगणारा हा ग्रंथ संसारी साधकांना अतिशय मोलाचा वाटेल यात शंकाच नाही.
अनेक आचार्यांनी, मोठ-मोठ्या विद्वानांनी, पंडितांनी, साधु-संतांनी, तत्वचिंतकांनी आपापल्या पद्धतीने गीतेवर चिंतन करुन ते शब्दरुपात मांडले आहेत.
यामधे विनोबांचे हे चिंतन मला तरी सर्वात जास्त प्रॅक्टिकल म्हणून अतिशय भावले. कुठेही या विचारांना कालबाह्य पद्धतीने न मांडता ते आचरणात कसे आणता येतील हे त्यांनी फारच सुरेख पद्धतीने सांगितल्यामुळे ते पुन्हा पुन्हा वाचून त्यातील प्रत्ययास येणारा नवनवीन अर्थ शोधणे ही माझ्या दृष्टीने तरी केवळ अवर्णनीय अशी गोष्ट आहे.
इति||
.
.
शशांक जी.... सुंदरतेची
शशांक जी....
सुंदरतेची परमावधी झालेल्या या लेखाबद्दल तुम्हाला शतशः धन्यवाद. एकदा नव्हे तर दोनवेळा हा लेख मी वाचला आणि विनोबाजींवर सरस्वती कशारितीने प्रसन्न होती त्याचे प्रत्यंतर जसे प्रकर्षाने जाणवले तितकीच तुमची स्वत:ची या विषयातील गती आणि विनोबाजींबद्दलची भक्तीही वाक्यावाक्यातून जाणवत आहे, इतके हे सारे थोर झाले आहे. [मला वाटते यापूर्वीहे एक दीर्घ लेख तुम्ही इथे दिला होता एकूणच विनोबाजींच्या साहित्यकृतीविषयी.....]
अमरावतीच्या एका भेटीत तिथल्या नगरपालिका सभागृहात अक्षरधाराचे पुस्तक प्रदर्शन पाहायला मिळाले होते. तिथे परधाम प्रकाशन [हेच असेल बहुतेक....खात्री नाही] तर्फे प्रकाशित झालेले विनोबाजींचे 'गीताई-चिंतनिका' दिसले होते; पण ते हिंदीत असल्यामुळे आम्ही ते घेतले नाही [आत्ता त्याची हळहळ वाटते] पण एका मित्राने 'मधुकर' घेतले. त्या पुस्तकातील एक उतारा तुमच्या या लेखामुळे स्मरणात आला. विनोबानी एका लहान मुलाला विचारले, 'तुझे नाव काय ? तू कोण ?" त्यावर त्या मुलाने उत्तर दिले, "मी कोण ! मी माणूस !". विनोबाजी म्हणाले की लहान मुले ओळखतात की आपण माणूस आहोत. आज दुनियेत जर आम्हाला काही शिकायचे असेल तर हेच की आपण 'माणूस' आहोत.
इतिहासकार आणि प्रवचनकार यांच्यातील संवादाचा प्रसंग तुम्ही छान रंगविला आहे. त्यातूनही शिकण्यासारखे बरेच काही आहे. या आणि आजच्या ११ सप्टेम्बरच्या निमित्ताने विनोबाजींच्या लिखाणावरील आपले भाष्य येथील सदस्यमित्रांना वैचारिक मेजवानी देऊ शकेल यात संदेह नाही.
पुनश्चः एकदा आपले अभिनंदन या निमित्ताने.
अशोक पाटील
धन्यवाद शशांक
धन्यवाद शशांक
पुस्तक कधी वाचेन ते सांगता
पुस्तक कधी वाचेन ते सांगता येत नाही, पण या लेखाने मात्र मला एक सुंदर अनुभव दिला.
शशांक, सुंदर लेख. उदा.४
शशांक, सुंदर लेख.
उदा.४ मध्ये 'जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि' याचा अर्थ 'जय मी आणि निश्चय' असा दिलाय. व्यवसाय या शब्दाचा अर्थ निश्चय असा पण होतो का?
शशांक..... एक योगायोग म्हणून
शशांक.....
एक योगायोग म्हणून लिहित आहे. काल ११ सप्टेंबर....आचार्य विनोबा भावे यांचे जन्मतिथी, त्यानिमित्ताने डीडी भारती या चॅनेलवर सकाळी ११ वाजता विनोबाजीं जीवनकार्यावर एक सुरेख कार्यक्रम दाखविला गेला अन् तो मला अगदी सहजगत्या पाहता आला. अन्य अनेक ज्येष्ठांच्यासमवेत म.गांधी यांच्या सूनबाई निर्मला गांधी यानी विनोबाजींच्या ज्या आठवणी सांगितल्या त्या विशेषच होत्या.
अशोक पाटील
श्री. अशोकराव, हा लेख
श्री. अशोकराव,
हा लेख तुम्हाला आवडला याचे कारण आ. विनोबाच आहेत. मी फक्त हमालाचे काम केले आहे (विनोबांचेच शब्द / विचार इथे देण्याचे). विनोबांचे सर्वच विचार हे मला का भावतात तर ते -
१] अतिशय प्रॅक्टिकल आहेत म्हणून
२] एवढी विद्वान व्यक्ति बुद्धिच्या मर्यादा लक्षात घेऊन संपूर्ण ईश्वर-शरण होते म्हणून
३] अतिशय साध्या -सोप्या, पटणार्या भाषेत त्यांनी हे विचार मांडलेत म्हणून
४] परमार्थ हा केवळ प्रवचनाचा विषय नसून आचरण्याचाच भाग आहे - हे त्यांनी स्वतः जगून / करुन दाखवले म्हणून....
त्यामुळेच इतर कुठल्याही पढिक विद्वान्/पंडितापेक्षा मला ते फार आवडतात.
तुमची जी टिप्पणी असते ती कुठल्याही विषयावरची असो - ती अतिशय अभ्यासपूर्ण, मार्मिक व सखोल असते. - मीदेखील ती मन लावून वाचतो. त्यामुळे तुमच्यासारख्या व्यक्तिला या लेखावर लिहावेसे वाटले हे माझे भाग्यच समजतो - कधीही तुम्हाला काही त्रुटी वाटल्यास हक्काने कान धरा - मला आनंदच वाटेल.
तुम्ही "मधुकर"चा उल्लेख केलेला आहे - त्यात विनोबांचा इतिहासाचार्य राजवाडे यांच्यावर एक सुंदर लेख आहे. राजवाडे यांनी किती कष्ट घेऊन हे इतिहास लेखनाचे काम केले याबद्दल प्रशंसोद्गार आहेत. "या संताळ्यांनी देश बुडवला" - असे जे राजवाड्यांचे प्रसिद्ध उदगार आहेत त्यावर त्याकाळी अतिशय खळबळ माजली होती. विनोबांनी मात्र त्यावर "आमचे राजवाडे" का एवढे चिडले असावेत म्हणून जे लिहिले आहे ते फार सुरेख आहे. त्यात कुठेही त्यांनी राजवाड्यांवर आरोप-प्रत्यारोप केलेले नाहीत तर त्यांचे म्हणणे एका बाजूने कसे बरोबरच आहे हे सांगून अतिशय संयतपणे संतांची बाजूदेखील मांडली आहे ते मुळातच वाचण्यासारखे आहे. एखादा संतच अशा शांतपणे उत्तर देऊ शकतो. विनोबा इज सिंपली ग्रेट. (कधीतरी 'मधुकर' बद्दलही लिहिण्याचा माझा मानस आहे)
स्वाती - मनापासून धन्यवाद.
दिनेशदा - विनोबांची सर्वच पुस्तके अतिशय वाचनीय आहेत. वाचक त्यांच्या विचारांच्या प्रेमातच पडतो - इतके ते सरळ, साधे, सोपे व भावणारे लिहितात.
श्री. माधव - तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे इथे व्यवसाय याचा अर्थ निश्चय असाच आहे. गीतेच्या दुसर्या अध्यायात तशाच अर्थाचा एक श्लोक आहे -
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन
बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् || २- ४१||
ह्यात निश्चय लाभूनि बुद्धि एकाग्र राहते
निश्चयाविण बुद्धिचे फाटे ते संपतीचि ना ||
सर्वांचे मनापासून आभार - असेच प्रेम असूद्यात.
शशांकजी, विनोबाजींवरील
शशांकजी, विनोबाजींवरील नि:स्सीम प्रेमातून सिद्ध झालेल्या या लेखात गीतेतल्या अनेक मार्मिक श्लोकांचा, त्यावरील विनोबाजींच्या भाष्याचा तुम्ही सुरेख उल्लेख केला आहे. जसे की
>>विनोबांची टिप्पणी - वात्सल्य, सख्य व प्रेम ही तीन नेहेमीची क्षमा मंदीरे आहेत.
वात्सल्य दोष पोटात घालते, सख्य दोष सहन करते, प्रेमाला दोष दिसतच नाहीत; - तिन्ही प्रकारांनी दोष दुरुस्त होऊ शकतात.>>
या टिप्पणी खरोखर व्हॅल्यू अॅडिशन्स आहेत , एक संतच त्या करू शकतो.
''अथ केन प्रयुक्तोहं '' हा श्लोक जितका मूलगामी, तितकेच त्यावरचे विनोबाजींचे तुम्ही दिलेले भाष्यही च मुळापर्यंत जाणारे.
>> मी प्रायः गीतेच्याच वातावरणात असतो. गीता म्हणजे माझे प्राण-तत्व. >>
_/\_ त्या वातावरणाला, त्यात श्वसणार्यांना.
अतिशय सुरेख लेख! गीताईतील
अतिशय सुरेख लेख!
गीताईतील श्लोक सगळे काही वाचनात नाहियेत पण जे वाचलेत ते समजायला अगदी सहज सोपे होते. प्रवाही अर्थ आणि सोपे शब्द यांमुळे पाठांतरही सहज व्हायचे.
तुमच्या लेखामुळे पुन्हा एकदा गीताई वाचावीशी वाटते आहे.
पंधराव्या अध्यायाची सुरुवात आठवतेय फक्त..
उर्ध्व मूलं अधःशाखम
अश्वस्थम प्राहुरव्ययम..
छंदासी यस्य पर्णानी
यस्तं वेद स वेदवी..
खाली शाखा वरी मूळ
..........................
.........................
जाणे तो वेद जाणतो
अतिशय सुरेख लिहिलंत! धन्यवाद!
अतिशय सुरेख लिहिलंत! धन्यवाद!
शशांक जी.... तुमचा प्रतिसाद
शशांक जी....
तुमचा प्रतिसाद आज पाहिला....वाचला....माझ्याविषयी तुम्ही अगत्याने केलेले भाष्यही मनःपूर्वक नोंदविले आहे. "मधुकर" संदर्भात तुम्ही इतिहासाचार्य राजवाडे यांची जी आठवण वर दिली आहे, त्या अनुषंगाने नक्कीच खळबळ माजविली होती. संतांना ते उघडउघड 'टाळकुटे' म्हणत. अर्थात राजवाडे यांचा सांप्रत महाराष्ट्रदेशी दबदबा इतका थोर की त्याना लिखित स्वरूपात कुणी विरोध दर्शविणे मुश्किलच होते. अर्थात पुण्यात त्यातल्या त्यात भारत इतिहास संशोधन मंडळातील पदाधिका-यांनी त्यांच्यासमवेत बरेच वाद घातले होते. शेवटी मतभेद झाल्यानंतर इतिहासाचार्य यांनी पुणे सोडून धुळे गाठले....व तिथेच आपल्या संशोधनाचे कार्य अव्याहतपणे चालू ठेवले.
असो.... गीताई चिंतनिका निमित्ताने आणखीन् एका अभ्यासक व्यक्तीसंदर्भात इथे लिहिण्याची संधी मिळाली. आशा आहे की हे विषयांतर होणार नाही.
[वर भारती यानी प्रतिसाद दिला आहे. त्यात त्या म्हणतात "....वंदन, त्या वातावरणाला, त्यात श्वसणार्यांना." यातील 'श्वसणार्यांना' या शब्दप्रयोगाबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, इतके ते सुंदर आहे.]
अशोक पाटील
के अंजली व ज्योती कामत -
के अंजली व ज्योती कामत - मनापासून धन्यवाद.
भारतीताई - तुम्ही नेहेमीप्रमाणे अतिशय मार्मिक टिप्पणी केली आहेत - विनोबांची भगवद्गीतेवरील सर्व चिंतने वाचली तर तुम्ही जो शब्द वापरलाय - "त्यात श्वसणार्यांना" हा अक्षरशः जाणवतोच. या महात्म्याने गीता सोडून बाकी कशावर चिंतन केलेच नाही असेच वाटू लागते - हे इतके जाणवते ते त्यांच्या अतिशय सोप्या - ओघवत्या वाणी/ भाषेमुळे. (सहज सोपे लिहिणे हे किती अवघड असते ते आपण जाणतोच)
जसे तुकोबांचे अभंग हे त्यांच्या विचारलहरीतून सहज प्रकट झालेत (कुठल्याही इतर अभिनिवेशाशिवाय) तसेच विनोबांचे विचार वाटतात - थेट वाचकाच्या ह्रदयाचा ठाव घेणारे होतात ...
दुसरी महत्वाची गोष्ट - विनोबांची जीवनव्यापक दृष्टी - ते कुठेही नेहेमीचे जीवन, आचरण यांना सोडून बोलत नाहीत - त्यामुळे ते कधीही लांब जंगलात/ आश्रमात/ गुहेत बसलेले संत न वाटता समर्थांसारखा आपला हात धरुन चालतात असे वाटते.
उपनिषदे, गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध, संतांचे अभंग, इ. वाचताना जसे आपण अनामिक आनंदात न्हाऊन निघतो तसेच विनोबांचे विचार वाचताना, त्यांचे मनन करताना वाटत रहाते.
अशोकराव व भारतीताईंसारख्या दिग्गजांनी ज्या सुंदर प्रकारे या विनोबा- विचारांवर टिप्पणी केलीये त्यामुळे मी अगदी भरुन पावलो आहे.
शशांक, काहीही बोलू नये, चालू
शशांक, काहीही बोलू नये, चालू नये असं केलय ह्या लेखानं. शतशः धन्यवाद ह्या लेखासाठी!
शशांक विनोबांच्या सहज सुलभ
शशांक विनोबांच्या सहज सुलभ विवेचनाचा तितकाच सहज सुंदर परीचय.अशोकजी,भारती यांच्या प्रतिक्रिया,त्यावरील तुमची प्रतिक्रिया. अगदी श्रिमंत झाल्यासारख वाटल.तुमची पुढिल टिप्पणी अगदी पटली.
"इथे दुसरेही एक जाणवते की हे नुसते पांडित्य वा विद्वत्ता नसून एका प्रयोगशील योग्याचे (कर्मयोगी, ध्यानयोगी, ज्ञानयोगी, जीवनयोगी, शिक्षणयोगी, अनुभवयोगी) हे प्रकट चिंतन आहे. ते जीवनाचे तुकडे न पाडता सर्वंकष विचार सतत करत असतात हेही जाणवत रहाते.
विनोबांनी आयुष्यभर जणु गीतातत्वाचाच ध्यास घेतला होता की काय असे वाटत रहाते. जे तत्व त्यांना उमगले ते स्वतः नक्कीच जगत होते अशी खात्री वाचकाला पटावी असा हा अद्वितीय ग्रंथ आहे."
आम्हाला विनोबाजींचे मधुकर
आम्हाला विनोबाजींचे मधुकर मधले वेंचे असत पाठ्यपुस्तकात . खूप सुन्दर . साधे. हल्ली गांधीवाद हाच कुचेष्टेचा विषय झाला असल्याने पाठ्यपुस्तकात घेत नसावेत....
रॉबिनहूड.... "....हल्ली
रॉबिनहूड....
"....हल्ली गांधीवाद हाच कुचेष्टेचा विषय झाला असल्याने पाठ्यपुस्तकात घेत नसावेत....."
~ तुम्ही वरील वाक्यात एक कटु विदारक सत्य प्रकट केले आहे. आजच्या गतीमान जगात "एज्युकेशनल सिलॅबस" तयार करणे म्हणजे आता नव्या पिढीने सरळ चंद्र मंगळ गाठणे अशीच काहीशी कल्पना चितारली जात असल्याने ज्यांचे नाव मुखी येताच नम्रतेने मान झुकावी अशा वंदनीय व्यक्तींच्या विचारवाङमयाकडे कुचेष्टेने [जरी मुद्दाम नसले तरी....] पाहणे एकप्रकारे नैसर्गिक प्रतिक्रिया झाली आहे.
जिथे गांधी टिळक सावरकर मागे पडत चालले आहेत तिथे विनोबा, साने गुरुजी, खांडेकर याना तरी कुठून स्थान मिळेल. त्यामुळे "अभ्यासेतर वाचन...." नावाचा जो एक प्रकार सर्व सुशिक्षित कुटुंबात शक्य आहे, तिथे ह्या वाचनाचा उपयोग करता येईल असे म्हणणे हेच आपल्या हाती आहे.
अर्थात परत "सुशिक्षित" म्हणजे काय ? याचीही व्याख्या करण्याची वेळ आली आहे.
अशोक पाटील
ऊत्कृष्ट...! गीताई बरोबरच,
ऊत्कृष्ट...!
गीताई बरोबरच, विनोबांवर केलेले भाष्य अतीशय सम्यक व समर्पक.
>>.. हा महापुरुष केवळ ज्ञानोबा-तुकोबा-समर्थ यांच्या मांदियाळीत शोभावा इतक्या उंचीचा आहे हेच जाणवू लागते.
+१००.
दाद , शोभनाताई, रॉबीनहूड, योग
दाद , शोभनाताई, रॉबीनहूड, योग ....
सर्वांचे मनापासून आभार... तुम्हा सर्वांचे विनोबांवर जे प्रेम आहे ते जाणवतेच...
गीता प्रवचने व गीताई - चिंतनिका ही पुस्तके आपल्या संग्रहातच असावी इतकी सुंदर व प्रेरणादायी आहेत - अशा पुस्तकांचे आपल्या मनावर व पर्यायाने वर्तनावर जितके संस्कार होतील तितके आपले मन निर्मळ होत राहील - अशी ही विलक्षण पुस्तके आहेत. याचे जितके वाचन होईल तितका नवनवीन अर्थ आपल्याला प्रतीत होत राहील व आपण नित्य नव्या ओढीने ती पुस्तके वाचत राहू.
विनोबांचा कुठलाही विशिष्ट संप्रदाय नाही त्यामुळे त्यांचे कोणाला काहीही आग्रही प्रतिपादन नाही. त्यांचे जे विचार आपल्या ह्रदयात ठसतात ते आपल्या नित्य स्मरणात राहिले की आपले काम झाले. एखादी वाईट गोष्ट/ विचार टाकून देण्याचा खटाटोप करण्यापेक्षा एखादा सुंदर विचार आपल्या मनात घोळत राहिला तर जीवनातील तो क्षण सुंदर होऊन जाईल - असे क्षण क्षण गोळा करताना आपले जीवन सुंदर - समृद्ध होऊन जाईल यात मला तरी शंकाच नाही - इतकी साधी व सरळ गोष्ट आहे ही ...
विनोबांच्या भाषेत हाच सातत्य योग - सतत चांगला, निर्मळ विचार करा - त्याची मनाला सवय होत राहील व शेवटी (अंतकाळी) तोच तुमच्या उपयोगी येईल (वर्षभर अभ्यास केलात तरच वार्षिक परीक्षेत काहीही टेन्शन शिवाय उत्तीर्ण व्हाल; आदल्या दिवशी, आधी आठ दिवस- महिनाभर अभ्यास करुन हे होण्यासारखे नाही - या जीवनाच्या परीक्षेची तारीख कोणालाच माहित नसते - आजचा दिवसही शेवटचा असू शकेल - तेव्हा सावधान ...)
हरि ॐ तत सत ||
शशांक खूप छान लिहिलंयस! हे
शशांक खूप छान लिहिलंयस! हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करीन.
शाळेत असतानाच १५, १२ व १८ हे अध्याय पाठ होते. आता थोडं पहायला लागतं. पण ते परत मुखोद्गत व्हावेत म्हणून एवढ्यातच कधी तरी गुगलले तर सर्व अध्यायांच्या कॉपीज काढून जवळ ठेवल्यात. त्याच बरोबर त्याचं मराठेतलं विवेचनही आहे. तेही आता नीट वाचीन.
शशांक्, अतिशय उत्कृष्ट
शशांक्, अतिशय उत्कृष्ट लेख्, त्याच बरोबर अशोक,, भारती,यांच्या प्रतिक्रियाही फार आवडल्या..
अतिशय सहज सुंदर कळेल असं
अतिशय सहज सुंदर कळेल असं विवेचन! आवडलं!
खूप सुंदर लेख!
खूप सुंदर लेख!
सगळा लेखच सुर्रेख आहे, पण
सगळा लेखच सुर्रेख आहे, पण शिकण्यासारखे खूप काही असल्याने विशेष भावलेला परिच्छेद
तत्वज्ञानाचा रोजच्या जीवनात वापर होऊ शकत नसेल तर ते तत्वज्ञान संपूर्णतः कुचकामाचे अशी विनोबांची रोखठोक धारणा. कुठलाही गूढवाद, चमत्कार वा अंधःश्रद्धा यांचा पुरस्कार ते कुठेही करीत नाहीत. दररोजचे जीवन किती उंच पातळीवर नेता येते हे प्रत्यक्ष आचरण करुन त्यांनी दाखवून दिले. शारीरक श्रमावरची त्यांची निष्ठा पाहिली की आपल्या लक्षात येते की हा केवळ आश्रमवासी, प्रवचने देणारा संत नसून कृतिशील, प्रयोगशील संत आहे. जुन्या विचारांना सरसकट टाकावू म्हणून ते फेकून देत नाहीत तर त्यातील आजही उपयुक्त ठरतील असे जे विचारधन आहे त्याला आधुनिक दृष्टीने कसे पहाता येईल हे ते फार सुरेख पद्धतीने सांगतात
यापैकी थोडेतरी कधी जमणार? कधी जमणार?
आणि हो नितांतसुंदर लेखाखालच्या प्रतिक्रियाही तोलामोलाच्या आहेत
मानुषी, वर्षु नील,
मानुषी, वर्षु नील, आनंदयात्री, भानस, हर्पेन - सर्वांना मनापासून धन्यवाद.
विनोबांच्या संपूर्ण वाङ्मयातूनच शिकण्यासारखे खूप असल्याने मला ते फार आवडते.
कै. बाबा आमटे यांच्या सगळ्यात पहिल्या कुष्ठरोगी आश्रमाला आशीर्वाद देण्यासाठी विनोबा आलेले होते व ते काम पाहून अतिशय संतुष्ट होवून - इथे सेवेचे रामायण घडेल म्हणून आशीर्वादही दिला होता. सेवाभाव त्यांना अतिप्रिय होता.
अतिशय उत्कृष्ट लेख्... उशिरा
अतिशय उत्कृष्ट लेख्... उशिरा बद्धल क्षमस्व
... वेळे अभावी जास्त लिहीत नाही...
अतिशय सुंदर लेख!
अतिशय सुंदर लेख!
गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ
गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता,
रडता पडता घेई उचलोनी कडेवरी
असे खुद्द विनोबांनीच गीताईबद्दल म्हणून ठेवले आहे.
काही वर्षांपुर्वी प्रा. राम शेवाळकर यांची काही व्याख्याने आंतरजालावर ध्वनी स्वरूपात मिळाली.
त्यामधे विनोबांवर दोन भाग आहेत. ते जेव्हा पहिल्यांदा ऐकले तेव्हा विनोबांची विस्तृत माहिती आणि महती पहिल्यांदाच कळाली. हे भाग अनेक वेळा ऐकले. प्रत्येक वेळी ऐकून डोळे पाणावतात.
या माणसाच्या ज्ञानाचा आवाका काय अफाट होता. आधुनिक युगातले अगदी खर्या अर्थाने संत, ऋषीच होते ते.
नंतर एकदा यवतमाळ ते नागपूर प्रवास करत असताना पवनार आश्रमात डोकावलो होतो.
तेथे वातावरण फारच उदास होते. असे वाटले की ही त्या स्थळाला नसून एकंदरीतच समाजमनाला आलेली विचारांची अवकळा आहे.
धुळ्याच्या तुरूंगात विनोबांच्या वाक्गंगेचा प्रवाह चालू आहे आणि खुद्द साने गुरूजी लिहून घेत आहेत. अशा वेळी तिथे उपस्थित असण्याचे भाग्य लाभायला हवे होते असे अनेकदा वाटले.