क्विक रवा डोसा/दोसा(फोटो सहित)

Submitted by सीमा on 16 December, 2013 - 14:33
rava dosa
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप तांदळाचे पीठ
१ कप रवा
१/२ कप मैदा
कोथिंबीर
मीठ
तेल
हिरवी मिरची बारीक चिरून
जीरे
आल (बारीक चिरुन. optional)

क्रमवार पाककृती: 

रवा+मैदा+तांदळाचे पीठ एकत्र करुन त्यात पाणि घालून घ्यावे. कन्सिस्टन्सी अगदी मठ्ठ्या प्रमाणे पातळ असायला पाहिजे. त्यात आता हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, जीरे आणि इतर जे हवे असतील ते घटक घालून घ्यावेत.
नॉनस्टीक तव्यावर थोड जास्त तेल घालून , नेहमी घालतो त्यापेक्षा थोड उंचावरून डोसे घालावेत. वरून तेल घालावे.
मोठा गॅस करून क्रिस्पी होईपर्यंत ठेवावे. उलटु नये. डोसा बाजूने सुटु लागला कि लाक्डी उलथण्याने काढून गरम गरम सर्व्ह (चटणी किंवा मेतकुट सोबत )करावा.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

जस जसे डोसे घालू तस तस मिश्रन घट्ट होत जाते. पाणी घालून मिश्रणाची कन्सिस्टन्सी पातळच असण गरजेच आहे.
ओनिअन रवा डोसा करताना कांदा बारीक कापून डोसा घालून झाल्यावर पसरायचा. अगदी रेस्टॉरंट प्रमाणे डोसा तयार होतो. रवा डोसा क्रिस्पीच पाहिजे. त्यामूळ गॅस मोठाच असावा.
ही रेसीपी खूप versatile आहे. तुम्ही तुम्हाला हव्या त्या चविप्रमाणे बदल करु शकता.

बरेचजणींनी लिहिलय वेडावेकडा डोसा होतो, त्यांच्यासाठी . डोसा पुर्ण तवा भरून घालायचा. वरती मी पुर्ण चौकोनी तवा भरून घातलाय तसा.

माहितीचा स्रोत: 
असंख्य साउथ इंडिअन मैत्रिणी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजूडे, कसला तोंपासू फोटो आहे डोश्याचा. लली प्रमाणे मलाही हुरूप आलाय फोटो बघून. (माझ्या डोश्यांना कधीच अशी जाळी पडत नाही Sad )

सीमा, मस्तच रेसिपी. Happy
मंजूडीने टाकलेला फोटो बघून मलाही हुरूप आलेला आहे. या शनिवार-रविवार करण्यात येतील. जमले की इथे सांगायला येईनच. तां.पी. आणायला लागेल, नाहीतर आजच करता आले असते

मंजे, तू किती वरून डोसे केलेस? तुझ्या डोश्यांना पडलेय तशी जाळी पडलेले डोसे करता यावेत हे माझं एक अजून न पुर्ण झालेलं स्वप्न आहे

कविन, तु घावणे केलेस का कधी? ते कसे आपण घालतो तसे तेवढ्या अंतरावरुन घालायचे. फार अंतर नसावे बहुतेक, अर्धाएक इंच तव्यापासुन. निदान मी तरी असेच घालते.

वरची रेसिपी आज संध्याकाळीच करुन पाहण्यात येईल. सर्व साहित्य आहे घरी. Happy

अर्धाएक इंच तव्यापासुन>> नाही, मी जवळपास अर्धा फूट उंचीवर धरला होता डाव. पीठ पण तेवढं पातळ असावं लागतं पसरण्यासाठी. आणि कडेने डोसा सुटेपर्यंत धीर धरावा लागतो.

मी घावन/ धिरडी करते त्यावेळी जाळीची इन्टेन्सिटी एवढी नसते. (वाक्यरचनेसाठी Uhoh Proud म्हणजे घावनांना जाळी पडते, पण ती भोकं तशी लहान असतात. कळ्ळं का? जौद्या! )

कवे, अशी जाळी पडण्यासाठी पीठ पातळ हवं हे पहिलं... आणि गरम तव्यावर जरा उंचीवरून घातलं की पडतेच अशी जाळी... धिरड्यांना मी सक्सेसफुली पाडते. Wink

पीठ पण तेवढं पातळ असावं लागतं पसरण्यासाठी. आणि कडेने डोसा सुटेपर्यंत धीर धरावा लागतो.>> या अतिशय महत्वाच्या टिपसाठी धन्यवाद Happy

सीमा धन्यवाद. चांगले झाले दोसे. करताना फक्त वरच्या व्हिडीओसारखे ग्रिडलवर केले इतकेच. फेकुन पण केले व पळीने पण. दोन्ही जमले. छान खरपुस झाले व जळायची पण भिती नाही राहिली.
ह्यायवरुन आठवले, की आधी असे दोसे ताक घालुन केले होते. त्याला इतका काळ लोटलाय की कसे झाले होते तेच आठवत नाही. पण ह्या कृतीत थोडास्सा आंबटपणा यावा म्हणुन काय घालावे? ताक घातले तर कुरकुरीत होतील का अशी शंका आहे.

सिंडे, मंजुडी आणि शुम्पी सारखे गव्हाचे पीठ वापरून बघ मैदा नको असेल तर.
सुनिधी, कुरकुरीत होतातच ना या मेथड ने. ताकाची गरज नाही गं.
प्राजक्ता , मस्त दिसतोय. Happy मुग्धा बारीक्,मोठा कोणताही रवा चालेल.
याच्याबरोबर मी कांद्याची चटणी करते त्याची रेसीपी इथे देते.

तेलात जीरे, मोठा मोठा चिरलेला कांदा (मऊ होईपर्यंत) आणि जरा जास्त कडिपत्ता परतून घ्या. लाल तिखट , मीठ टाकून गॅस बंद करा. मिक्सर मधून काढल कि चटणी तयार. अल्टीमेट लागते. Happy

सीमा, अगं, कुरकुरीत मस्तच झाले तुझ्या कृतीने फक्त जरासा आंबटपणा पण वरुन घालता आला तर कसे लागतील असा विचार आला मनात. ताकाने कुरकुरीत होणार नाहीत असे वाटते.
आता चटणी पण करेन.. मस्त वाट्टीये.

मला हे डोसे आंबट व ताक घातलेलेच आवडतात. वर्षू नील ची रेसिपी वर कुणीतरी दिलीय त्याने पण मस्त होतात डोसे.
आता या बाफवर कळलंय तर त्या कृतीत तांदळाऐवजी गव्हाचे पीठ घालून बघेन. कुठल्याही रवा डोश्याला पीठ पातळ केले की जाळी पडतेच सुंदर.

झकास झाले एकदम. जाळी पण मस्त. इतक पातळ पिठ बरोबर आहे का नाही असा विचार करतच 'उंचावरून ' घातले डोसे.
आणि पहिल्या डोस्यापासून जमले . मी नेहेमीच गव्हाच पिठ घातल होत. Happy
धन्यवाद सीमा. Happy

चटणी पण विनर आहे एकदम. खोबर्‍याची चटणी किंवा बटर या दोन्ही पर्यायांपेक्षा चांगली. गडबडीत करायला सोपी.

जमले जमले दोसे जमले Happy गेल्या वेळी मैदा नव्हता आणि बहुतेक पाणी पण कमीच पडलं. यंदा खास या दोशांसाठी म्हणून मैदा आणला. फक्त ते पाणी तव्यावर फारच सैरावैरा धावतं त्यामुळे कधी जगाचा नकाशा तर कधी एक्स्टिंक्ट प्राण्यांचा आकार येत होता. युट्युब लिंकमध्ये दाखवल्याप्रमाणे आधी कांदा घातला तव्यावर आणि मग पीठ.

मीही गेल्या आठवड्यात हे दोसे करून पाहिले. मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरले होते. एकदम भन्नाट आणि पटकन होतात. मुलांनाही खूप आवडले. नंतर थोडा पालकही चिरून घातला.
सीमाच्याच रेसिपीने कांद्याची चटणी केली पण चव काही जमून आली नाही. काय गडबड झाली कळले नाही.

मी धिरडी/रवा दोसा करते ते माझं प्रमाण असं आहे.
रवा, तांदूळ पिठी आणि ताक सम प्रमाणात(प्रत्येकी ३ डाव).१ चमचा बेसन. त्यात १ चमचा तेल, थोडं हिंग, हळद, आलं, लसूण, मिरची ठेचून, कोथिंबीर, मीठ, भरपूर पाणी घालून खूप पातळ पीठ भिजवून ५ मिनिटे ठेवायचे. (ताकामुळे रवा छान फुलतो आणि ताकाची चव पण सुंदर येते.) तवा चांगला तापला की धिरडी घालायची आणि गॅस मध्यम ठेऊन भाजायची. आमच्याकडे एकदम हिट आहेत ही धिरडी!
कुरकुरीत होण्यासाठी यात रव्याचं प्रमाण वाढवायचं आणि मध्यम आचेवर जास्त वेळ ठेवायची.

या पद्धतीनेही करून बघेन.

साक्षी.

मस्त झाले होते डोसे. मी मैदा घातला नाही कारण तो संपला होता. आणि "पिठाची कंसिस्टन्सी मठ्ठ्यासारखी हवी" हे माझ्याकरता फार्फार महत्त्वाचं ठरलं कारण मस्त कुर्रुमकुर्रुम झाले डोसे. मी आंच माझ्या तव्याच्या नखर्‍यांप्रमाणे बदलली.

मस्त रेस्पीसाठी धन्यवाद सीमा.

आणि त्यान केलेल्या पेक्षा या पद्धतीने खूप देखणा आणि लेसी होतो डोसा.

>> बरं झालं सांगितलं.. मीपण आज प्राचीने लींक दिलेला व्हिडिओ बघितल्यावर उंचावरुन (म्हणजे नक्की किती उंचावरून? :अओ:) टाकण्यापेक्षा हे शिंपडणे जास्त सोपे असेल असं वाटलं होतं.

मी कणीक घातली तांदूळ पीठीऐवजी. त्यामुळे जरासे मऊसर झाले. कडेने कुरकुरीत आणि मध्ये मऊ. उलटायला पेशन्स लागतो हे मात्र खरे.
कांद्याची चटणी मात्र हिट झाली Happy थँक्स सीमा

मी करून पाहिले हे. जाळी मस्त पडते. मात्र त्यासाठी पातळ पिठाबरोबरच तवाही एकदम स पा ट हवा. (नाहीतर पीठ मधे गोळा होतं.) तसंच, पिठात आंबट काहीतरी पाहिजेच असं खाताना वाटलं. (साहित्य वाचतानाच वाटलं होतं. पण तेव्हा प्रयोग न करता जसंच्या तसं दिल्याप्रमाणे करून पहायचे ठरवले होते.)

घरात भाकर्‍यांसाठी समप्रमाणात मिसळलेले ज्वारी + तांदूळपीठ होते, ते संपवायचे होते. अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी हे पीठ असे घेऊन वरच्या कृतीने डोसे केले. आंबटपणा यावा म्हणून दोन चमचे दही घातले. मिश्रण उंचावरुन ओतता येईल असे पातळ हवे ही टिप तंतोतंत पाळली. छान जाळीदार आणि कुरकुरीत झाले. फक्त बारीक आचेवर थोडा पेशन्स ठेवून करावे लागले. मोठा गॅस ठेवल्यास खालून जळले तरी उलटताच येणार नाहीत अशी भिती वाटली आणि सकाळच्या घाईत ट्रायल अँड एररला वाव नव्हता.
पुढच्यावेळी मोठ्या आचेवर ठेवून करण्याचा प्रयोग करण्यात येईल कारण तसे जमले तर पटपट होतील.

Maayboli Rava dosa.jpg

हा मी बनवलेला .. छान कुरकुरीत आणि झटपट होतात . धन्यवाद सीमाताई

गव्हाच्या पीठाच्या टीपेसाठी प्राची आणि मंजुड़ी यांना धन्यवाद

Pages