अतीश्रीमंतीने सजलेली घरे, मढलेल्या बायका, घरातही लग्नासाठी जमावे तसे सजलेले स्त्री-पुरुष, जनरेशन गॅप, कौटुंबिक नाट्य, रटाळ चित्रण, प्रत्येकाच्या चेहर्यावर कॅमेरा रेंगाळवून प्रत्येकाची रिअॅक्शन दाखवण्याची अविकसित बुद्धीमत्ता, टिपीकल कंटाळवाणी संवादफेक, चांगले असणारे फारच चांगले आणि वाईट ते फारच वाईट, रिअल लाईफमध्ये कधीही होणार नाहीत असे संवाद व त्यांचा वेग, ही सर्व गुण(?)वैशिष्ट्ये घेऊन मालिका अवतरतात.
मध्यमवयीन, ज्येष्ठ नागरीक व वेळ मिळेल तेव्हा काही स्त्री पुरुष या मालिकांवर जीव उधळतात. डोक्यात कुठेतरी सीमारेषा असते की ही एक काल्पनिक मालिका आहे आणि आपण वास्तवात जगत आहोत. काहींच्या बाबतीत ही सीमारेषा हळूहळू पुसट होऊ लागते. आपल्याही घरात असेच काहीसे आहे हे उगीचच पटायला लागते. नसलेल्या प्रश्नांची उत्तरे मालिकेमार्फत सुटतात का हे बघितले जाऊ लागते. मनोरंजन किंवा वेळ घालवणे या पलीकडे या ,मालिका जाऊन बसतात.
चीड आणणार्या ह्या मालिका काहींसाठी संध्याकाळचे ध्येय ठरते
त्यात पुन्हा जाहिराती वगैरे तर फारच महान!
या अश्या मालिकांमध्ये घडणारे नाट्य अद्भुत असू शकते. अपघात, अफरातफर, घरभेदीपणा, कौटुंबिक राजकारण, वाटण्या अन् काय काय! त्यात पुन्हा अगदीच 'घरेलू' स्वरुपाच्या मालिकांमध्ये तर जुने झालेले व त्यामुळे किंवा कश्यामुळे तरी ऑब्सोलेट झालेले संस्कार योग्य होते हे सिद्ध करणे यासाठी अहमअहमिकाच लागते. कोणीतरी वडीलधारी व्यक्ती म्हणजे जणू एकखांबी तंबू वगैरे असतो. त्याचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ!
नुकतेच काही कारणाने अक्षरशः 'होणार सून मी' या मालिकेचे सलग तीन भाग थोडेथोडे बघितले गेले. मोठी आई, बेबी वन्सं, जान्हवी वगैरे पात्र होती. ह्यात जान्हवीची आई अचानक जावयाकडून पैसे आणते व एक नाट्य घडते. नवरा बायकोला फोन करण्याआधी अनेकदा विचार वगैरे करतो. आत्ता हिचा मूड असा आहे, आत्ता हिला फोन करावा का? हिचा फोन का आला नाही? बरेच बरे नसेल का? मग ती कोणीतरी एक बेबी की कोण आहे तिने लावलेल्या शिस्तीमुसार त्या जान्हवीने वेळच्यावेळी 'उशीर होईल' असा निरोप न दिल्याने जणू घरातले सगळे चक्रच बिघडते. त्यावर विश्व रसातळाला जाणार असल्यासारखे चेहरे करून जो तो वाक्ये फेकू लागतो. मग माफीनामे, तेही अश्या टोनमध्ये की अगदी त्या बेबीपुढे लोटांगण घातल्यासारखे! फार तर काय, दोन पोळ्या अन् थोडीशी भाजी जास्त केली गेली असती किंवा करावीच लागली नसती. आठ दहा जण असलेल्या घरात, तेही इतक्या श्रीमंत घरात, त्याने असा काय फरक पडला असता? घरातली माणसे एकमेकांशी अजिबात ज्या पद्धतीने बोलत नाहीत त्या पद्धतीने ही पात्रे बोलत असतात.
आणखी कोणत्यातरी एका मालिकेत एक कोणीतरी घरातून निघून गेलेला असतो. त्याने त्याच्या मैत्रिणीला 'माझे बरेच नातेवाईक आहेत' असे काहीतरी सांगितलेले असते जे खोटे असते. ती तो घरी नसताना अचानक घरी प्रकट होते. मग तिला त्याचे म्हणणे खरे आहे हे पटावे म्हणून त्या तरुणाची आई, लहान बहिण, आत्या, वडील (बहुधा मोहन जोशी), मोठा भाऊ, वहिनी ही पात्रे एकामागोमाग एक उभी केली जातात. प्रत्येक पात्रासाठी हे नवीनच असल्याने त्या त्या पात्राच्या चेहर्यावर उमटलेले नवलाचे व धक्याचे भाव बघूनही त्या मुलीला एकदाही शंका येत नाही की लोक खोटे बोलत आहेत. मग ते इतके ताणलेले दाखवले की असे वाटले की टीव्हीच्या आत जाऊन त्या मुलीला गदागदा हालवून दोन थोबाडात लगावून विचारावे की अक्कलशून्य बये, तुला कळत नाहीयेका की ह्यांच्यातला कोणीही त्याचा खरा कोणीही नाही आहे वगैरे!
त्या होणार सून मध्ये परवा एकदा त्या नवर्याला जान्हवी विचारते की 'ए, मला तू ते (काहीतरी) सांगशील का?' हे विचारताना तिचा चेहरा असा झालेला असतो जणू दोघे नुकतेच प्रेमात पडलेले प्रेमवीर बागेत बसले आहेत आणि प्रेयसी विचारत आहे की तू मला कधी विसरणार नाहीस ना रे? त्यावर तो नवरा म्हणतो की नक्की सांगेन पण आधी डोके चेपून दे! मग तो पलंगावरून उतरून खाली बसतो आणि ती पाळलेल्या कुत्र्याच्या केसांतून हात फिरवावा तसे हात फिरवत स्वप्नील डोळे करून आढ्याकडे बघत राहते.
मध्यंतरी एका मालिकेत एका युवकाने आपल्या साहेबाला 'लिफ्टपाशी थांबलेल्या लोकांसाठी आरसे लावा म्हणजे ते कंटाळणार नाहीत' असा सल्ला दिला. तो सल्ला देण्यापूर्वी 'मी तुम्हा महान लोकांमध्ये बोलायला किती नालायक आहे' हे सांगण्यासाठी दहा वाक्ये खर्ची घात्रली. त्यात आगाऊ माफी वगैरे मागून घेतली. तेव्हाच पूर्ण खात्री झालेली होती की ह्याचे सजेशन साहेबाला पटणार. पण किती तो वेळेचा अपव्यय! त्या साहेबाला कोणी मंजिरी आवडत असते आणि तिचे उत्तर काय अशी पाटी असलेल्या जाहिराती गेले दोन दिवस झळकत आहेत. एव्हाना मंजिरीचे उत्तर काय ह्याची वाट न पाहता आजचा एखादा तरुण भलतीच्या प्रेमातही पडला असता च्यायला!
असेच एका मालिकेत कोणा एका तरुणाला मुलगी बघायला म्हणून तिच्या घरी घेऊन जातात. त्याचा कंप्लीट विरोध असतानाही! आणि अचानक त्याला ती मुलगी पाहून आवडते वगैरे! पण तिच्या मनात तसे काही नसते हे तर स्क्रीन बघणार्या प्रेक्षकांनाही समजते पण त्या बैलाला समजत नसते.
ह्या असल्या मालिका प्रेक्षकांना 'आपण काय बघावे' हे सुचवू तर शकतच नाहीत, पण तसा प्रयत्नही करताना दिसत नाहीत. अशी घरे नसतात, अशी नाटकी माणसे नसतात, अशी तत्ववादी, शिस्तप्रिय, जुनाट संस्कारांनी माखलेली धेंडे हल्ली नसतात, असे कोणी कोणाशी बोलत नाही हे लक्षात तरी घेतले जाते की नाही कोणास ठाऊक!
संभाव्य परिणामः
१. वेळ फुकट जाणे
२. अनावश्यक कथानकात गुंतल्यामुळे त्या कथानकानुसार बाकीची दिनचर्या किंवा तिचा काही भाग आखला जाणे
३. आपल्याकडे काही फार वेगळे चाललेले नाही असे काही जणांना वाटू लागणे व त्यातून बहकणे
४. अनुसरण केले जाण्याची शक्यता निर्माण होणे (मर्यादीत प्रमाणात)
शक्य असलेले उपायः
१. मालिका वास्तववादी असाव्यात
२. वास्तववादी मालिका बघाव्यात
३. मालिकांऐवजी बातम्या, चित्रपट, कॉमेडी शो, गाणी, स्पोर्ट्स चॅनेल्स बघावेत.
ह्या अश्या मालिका हिंदीतही अमापच आहेत.
तुम्हाला काय वाटते?
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
बेफीजी मग पुढे काय होतं?
बेफीजी मग पुढे काय होतं?
अमित, काल एक मालिका
अमित, काल एक मालिका सासूबाईंनी लावलेली होती. मला शीर्षक माहीत नाही, बहुतेक होणार सूनच! पण हा धागा काढल्यापासून ह्या धाग्यावर काहीतरी रसभरीत लिहिता येईल ह्या इच्छेपायी त्यातील एक सीन पाहिला खरा. तो असा होता की नवरा जान्हवीला विचारतो तू रागावली आहेस? त्यावर ती म्हणते रागावलेले नाहीये, दुखावलेले आहे. स्वतःच्या मनस्थितीला त्याच मनस्थितीत असताना अतिशय चपखल व समर्पक शब्द शोधून तो योजणे ही किती डेंजर कला आहे राव! आमच्या घरी मी विचारलं असतं की तू रागावली आहेस का तर त्यावर उत्तर आलं असतं मग काय आनंदाने हुरळून नाचू? मुळात मी तसं विचारू धजलोच नसतो कारण रागावणे ह्या व्यतिरिक्त फारसे काही होतच नसल्याने त्या प्रश्नात आमच्या घरापुरता तरी दम राहिलेला नाहीये.
बेफी
बेफी
काल एका मालिकेत एक मध्यमवयीन
काल एका मालिकेत एक मध्यमवयीन महिला मॉलमध्ये की कुठेतरी तिच्यामागे फाडफाड इंग्लिश बोलणार्या काही मुली होत्या हे सांगून आक्रोशत होती. का तर तिला काँप्लेक्स आला ते इंग्लिश ऐकून! हे आठवण्याचे कारण म्हणजे आत्ता नेमके तेच रीपीट होत आहे बाहेरच्या खोलीत, मला आत बसून बाहेरच्या टीव्हीवरचा तो कालच पाहिलेला महान प्रसंग पुन्हा ऐकू येत आहे. (मा. प्रशासक, राग पेक्षा जास्त राग यासाठी एखादी स्मायली निघू शकेल का?)
त्या महिलेला इतर महिला सांत्वनपर शब्द ऐकवत आहेत.
बेफी रॉक्स. अनुमोद्न. अगदी
बेफी रॉक्स. अनुमोद्न. अगदी पिट्स आहे हे.
बेफी
बेफी
बेफी..
बेफी..
बायकांनो...............
बायकांनो............... आपापल्या नवर्यांना सांगा की एक टिव्ही किचन मधे सुध्दा लावुन द्यावा....
डिश टिव्ही असेल तर दुसर्या कनेक्शन साठी अवघे १६० रुपये महिना लागतात..
इतकी शुल्लक किंमत ते आनंदाने खर्च करतील
अत्याचारांचा रिपीट
अत्याचारांचा रिपीट टेलिकास्ट...... रात्री एका नायिकेचा अमूक एक सीन बघायचा राहिला म्हणून संपूर्ण एपिसोड परत दुपारी बघायचा......
अशोक जी "मालिका बघणे वा न
अशोक जी
"मालिका बघणे वा न बघणे....ह्या बाबी ना शहाणपणाच्या ना मूर्खपणा ठरविण्याच्या बाबी मानल्या जाऊ नयेत"
हा मुद्दा एक्दम् पटला. "मी असल्या मालिका पहात नाही" असं एकीकडे म्हणायचं आणि त्या "रद्द्ड्, अवास्तव आहेत" असंही म्हणायचं यातला विरोधाभास लक्षात घ्यावा ! न पहाताच हे कसं काय् कळतं बुवा?
"मी असल्या मालिका पहात नाही"
"मी असल्या मालिका पहात नाही" असं एकीकडे म्हणायचं आणि त्या "रद्द्ड्, अवास्तव आहेत" असंही म्हणायचं यातला विरोधाभास लक्षात घ्यावा ! न पहाताच हे कसं काय् कळतं बुवा?<<<
वर सामींना ह्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर दिलेले आहे, दोन प्रतिसाद आहेत. वेळ मिळेल तेव्हा वाचावेत व नंतर टिपण्णी करावीत ही नम्र विनंती!
त्याच त्याच शंकांची उत्तरे देत बसायला वेळ नाही. लोक एन्जॉय करत आहेत त्यांना करू देत एन्जॉय!
लोक एन्जॉय करत आहेत त्यांना
लोक एन्जॉय करत आहेत त्यांना करू देत एन्जॉय!......:हाहा:

असल्या रद्दड मालीका का पहातो?
असल्या रद्दड मालीका का पहातो? उत्तर वरती आहेत डॉ. अशोक.
अहो तुम्हीच विचार करा पूर्वी निखळ मनोरन्जनाच्या दाने अनारके( नीना गुप्ता, अजीत वाच्छानी), इधर उधर, नुक्कद, बुनियाद, रामायण, महाभारत, व्यमकेशबक्षी,,चुनौती अशा सरस सिरीयल होत्या, तसे कथानक का येऊ नये? असन्भव सारखी दर्जेदार सिरीयल का बनु नये?
आजकाल भुताच्या नावाखाली काय पण दाखवतात. काय तर म्हणे एक तास भूताचा.:अओ: ते भुतड एका तासात कसे सन्पेल? भूतच ते, २४ तास मानगुटीवर नको का बसायला?:खोखो: इथे माबोवर ती गानु आज्जी किती तरी दिवस पच्छाडते ?
प्रश्न पहाण्याचा नाही तर दर्जेदार सिरीयल का नाहीत याचा आहे.:अरेरे:
पिंपळपान नामक मालिका होती.
पिंपळपान नामक मालिका होती. अशा साहित्यावर आधारीत मालिका का येऊ नयेत?
पिंपळपान- उत्कृष्ट मालिका.
पिंपळपान- उत्कृष्ट मालिका. वेगवेगळ्या कथांचं सादरीकरण होत त्यात.
पिंपळपान, कथाकथी, अग्निहोत्र,
पिंपळपान, कथाकथी, अग्निहोत्र, रेशीमगाठी
रेशीमगाठी रेशीमगाठी निश्ब्द
रेशीमगाठी रेशीमगाठी
निश्ब्द भावना ही
अर्थास जन्म देती
जेव्हा जुळुन येती
नाजुक रेशीमगाठी
लोकांना असल्या मालिकात रमायला
लोकांना असल्या मालिकात रमायला आवडत कारण त्यांच्या मेंदूची ती गरज असते. सुबोध जावडेकर यांच्या मेंदुच्या मनात या पुस्तकात माणुस अशा साहित्यात किंवा मालिकात एकदम तादाम्य कसा पावतो याचे स्पष्टीकरण दिले आहे. पुलंच्या रावसाहेब मधे चित्रपट कथा लेखनात जसे अरुंधती पात्राभोवती कथा गुंफताना रावसाहेब करतात तसं!
"लोक एन्जॉय करत आहेत त्यांना
"लोक एन्जॉय करत आहेत त्यांना करू देत एन्जॉय!"
चला, म्हणजे या धाग्याचा उद्देश् फक्त् एन्जॉय करणे आहे हे स्पष्ट् झाले. माझा आपला गैर्समज् झाला की इथं काही विचारमंथन वगैरे चालू आहे !! बेफी जी चुकलोच् मी !
डॉ अशोक, ह्या सिरीयल्स आपण
डॉ अशोक, ह्या सिरीयल्स आपण घरी असलो की अधूनमधून समोर चालू असतात. बाजूच्या रूम मधे बसून दुसरे काही करत असलो तरी ऐकू येतात (आणि मजेदार वाटल्याने कान झाकून घेणे, दार बंद करणे हे केले जात नाही
). तेवढ्या एक्स्पोजर मधून जे वाटते ते लिहीले जाते. हे माझे उदाहरण.
या सिरीयल्स पाहणारे मूर्ख आहेत ई. कॉमेण्ट्स मी तरी कधीच केलेल्या नाहीत, करणार नाही.
गंमत आहे.... गिळून सागराला, जाळीन् मी सूर्याला... अशा किंवा तत्सम कविता चालतात्, गझला टाळ्या मिळवतात. वास्तववादी असायची अपेक्षा फक्त नाटक, चित्रपट आणि मालिका यांच्या कडून !!>>> अजिबात नाही. काय दाखवायचेय ते दाखवा. ते किमान पहिल्यांदा पाहताना प्रेक्षक खिळून राहील, किमान उत्सुकतेने पाहील असे तरी दाखवा. पहिल्यांदाच पाहताना मुख्य सीन्स मधल्या अनाकलनीय गोष्टी दिसू लागल्या तर कलाकृतीतच गडबड आहे ना?
गंमत आहे.... गिळून सागराला,
गंमत आहे.... गिळून सागराला, जाळीन् मी सूर्याला... अशा किंवा तत्सम कविता चालतात्, गझला टाळ्या मिळवतात. वास्तववादी असायची अपेक्षा फक्त नाटक, चित्रपट आणि मालिका यांच्या कडून !!>
त्या गझला आणि कविता तुमच्यासमोर बसून कुणि जबरदस्तीने वाचतं का?
सिरिअलच्या बाबतीत ते होतं. नाईलाजाने पहाव्या/ऐकाव्या लागतात. हा फरक तुम्हाला समजत नसेल तर कठीण आहे,
बेफी, हे माबोवरचे डॉक्टर असे का हो?
गप्पिष्ट.... "त्या गझला आणि
गप्पिष्ट....
"त्या गझला आणि कविता तुमच्यासमोर बसून कुणि जबरदस्तीने वाचतं का?
सिरिअलच्या बाबतीत ते होतं. नाईलाजाने पहाव्या/ऐकाव्या लागतात. हा फरक तुम्हाला समजत नसेल तर कठीण आहे "
टीव्हीला बटन् असतं आणि बघायचं नसेल् तर् तो बंद् करता येतो ! ऐकायचं नसेल् तर् दूर् जाऊन् बसता येत् ! आता हे ही समजत् नसेल् तर... अवघड आहे ! नावच् गप्पिष्ट असेल् तर् असल्या बालीश कमेण्ट्स् अपेक्षितच आहेत !
अहो अशोक, असं नाही करता
अहो अशोक, असं नाही करता येत.
घरातली ज्येष्ठ मंडळी बघतातच.
त्यांच्याबरोबर बसून मालिका पाहिल्या नाहीत तर त्यांना रागही येतो.
(सगळे मस्तं सिरीयल बघतायत तर ही बसलिय मोबाईलमध्ये डोळे घालून अश्या कॉमेंटही येतात.)
परत ज्येनाना कमी ऐकू येतं म्हणुन मोठ्याने लावावा लागतो टिवी.
या सिरियल्स चालू असताना
या सिरियल्स चालू असताना घरातल्या माणसांचे विविध गट पडलेले असतात.
गट १: पूर्ण आहारी गेलेले. ही मंडळी मुहूर्त साधून बरोब्बर त्या वेळी, ते चानेल लावणार आणि HMV च्या रेकॉर्डवरील 'हिज मास्टर्स व्होईस' मुद्रा धारण करून टीव्ही कडे डोळे लावून बसणार.
गट २: सिरीयल समोर बसून सहन करत (आणि हे गट १ ला सतत दाखवून देत) मध्ये ब्रेक व्हायची वाट पाहणार आणि त्यात रिमोट घेऊन news चानेल लावणार. गट १ भिंतीवरच्या घड्याळात तेल घालून लक्ष देत २०-३० सेकंद आधीच 'लाव ना तिकडं', 'नेमकं ती जिन्यावरून पडते ते जाईल माझं' वगैरे चा धोशा लावणार. गट २ 'चुकून' दुसरीच २-३ चानेल बदलत मग नाईलाजानं मूळ चानेल वर येणार.
गट ३: उगीच येता जाता 'लागलं का तिचं लग्न?', 'सापडला का तिचा हार?' विचारून गट १ ची एकाग्रता भंग करणार. काही-काही वेळा गट १ आणि टीव्ही यात खग्रास स्थितीत उभं राहून त्यांना चिरडीला आणणार.
गट ४: सिरीयल पाहणाऱ्यांना निमूट खाद्यपदार्थ पुरवणार. मध्ये मध्ये गट १ चे निरोप परस्पर दाराबाहेर आलेल्या लोकांना देणार, फोन उचलून परस्पर डोळ्यांच्या खाणाखुणा समजून पलीकडच्या मंडळींना 'नंतर करा', 'उद्या करा' वगैरे सांगणार.
गट ५: घरातल्या अंघोळीला गेलेल्या मेंबर कडे आलेले आणि खोळंबलेले पाहुणे. हे बिचारे कसाबसा सिरीयल मध्ये रस आहे असं दाखवत एकतर पुन्हा पुन्हा मोबाईलशी चाळा करत समोरच्या ग्लासातलं पाणी घोट-घोट पीत असतात.
मुंगेरीलाल परफेक्ट! आम्ही
मुंगेरीलाल
परफेक्ट! आम्ही गट-६ वाले म्हणजे. दुसर्या रूम मधे किंवा तेथेच बसून जे चालले आहे त्याची तेथे व येथे थट्टा करणार 
मुंगेरीलाल भारतात गेलेलं
मुंगेरीलाल

भारतात गेलेलं असताना गट ३ची मेंबर झाले होते.
मी गट ७ मध्ये :टीव्ही पाहायला
मी गट ७ मध्ये :टीव्ही पाहायला टीव्हीच नसल्याने केवळ माबोवरचे धागे आणि प्रतिसाद वाचातो मी
...दुधाची तहान ताकावर !!!
नावच् गप्पिष्ट असेल् तर्
नावच् गप्पिष्ट असेल् तर् असल्या बालीश कमेण्ट्स् अपेक्षितच आहेत !
<<
अशोक सर,
अगदी योग्य विश्लेषण. यांचे पूर्वीचे नांव तुम्हाला ठोउक आहे की नाही कुणास ठो उक..
*
साती,
ज्येना व घरात टीव्हीबद्दलचे तुमचे बरोबर आहे, तरीही सर वेगळे काही सांगत आहेत. पण ते गझलांसंबंधात आहे. सरांच्या स्वतःच्या अने कसदार गझला/कविता आहेत, तरीही गझलांसंबंधी असल्याने ते स्वयंघोषित सम्राटांना मान्य नसावे.
*
आता, माझ्या घरी स्वकमाईतून विकत आणलेला टीव्ही असल्याने, 'तुम्हाला टीव्हीमधले काय कळते?' असा प्रश्न विचारणार्यांना अॅडव्हान्स फाट्यावर मारूनः
आमच्या घरात आपल्या खोलीचे दार बंद करून टीव्ही पहाण्याची सोय आहे. इतरांना त्रास होऊ नये म्हणून.
मुलांच्या अभ्यासाच्या वेळी टीव्ही बंद ठेवण्याचे पथ्य सर्व लोक पाळतात.
मुलांना कधीच टीव्ही पहाण्याची बंदी घालण्यात आली नव्हती, पण टीव्ही हे रिकामा वेळ असेल तरच पहाण्याची वस्तू आहे हे सर्व अॅडल्ट्सनी प्रत्यक्ष उदाहरणातून दाखवऊन दिले.
धन्यवाद.
गट क्रं ८ : स्थितप्रज्ञ -
गट क्रं ८ : स्थितप्रज्ञ - मालिका कुठेही चालू असली तरी आणि त्या बद्दल विविध बाफ वर जोरदार चर्चा चालू असली तरी पाहून / चर्चा करून काय फरक पडणार? त्या पेक्षा त्या वेळाचा इतर वापर करणारे.
----------
मला त्या मराठी / हिंदी मालिका झेपत नाहीत. आणि घरी आई वडिल आले की मी त्यांच्यावरच दादागिरी करून त्यांना पाहू देत नाही. पण रिटायर माणसांचा तो एक टाईमपास असतो त्यामुळे ते पाहत असतील तर काही प्रॉब्लेम नाही.
पण
जेंव्हा पानं च्या पानं भरून इथे एखाद्या मालिकेची चर्चा केली जाते (रोजच्या एपिसोडवर) ते पाहून गंमत वाटते. करमणूक म्हणून पाहणे आणि त्यातच वाहून जाहून त्याचीच चर्चाही करणे हे दोन्ही वेगळे. बाकी मलाही काही मालिका खूप आवडतात जसे फ्रेन्डस, बिग बँग, साईनफिल्ड वगैरे पण त्यावर जर प्रत्येक एपिसोडवर चर्चा झाली तर मात्र बहुदा माझ्याच्याने चर्चा केली जाणार नाही.
केदार .. प्रत्येक भागावर
केदार
.. प्रत्येक भागावर चर्चा ह्याबद्दल पटले.
काही वर्षापुर्वी जरा जास्त सवय लागली होती. २-३ मालिका संध्याकाळी पाहिल्या जायच्या. फक्त इंग्लिशचा (परदेश असल्याने साहजिकच) मारा होत असल्याने कुठेतरी ते हिंदी पहाणे बरे पण वाटायचे. नंतर ध्यानात आले की घरी कोणी आले असताना पण तसे होत होते, तेव्हा बंद केले. रेकॉर्ड करुन नंतर वेळ मिळाला की पळवत पहाणे सोपे पडते असे लक्षात आल्यावर १-२ मालिका तशा पहाणे चालु आहे. दम कशातच नाही हे अगदी मान्य. तरी संयम नाही केला तर addit व्हायला वेळ लागत नाही. पण स्वयंपाक करताना टीव्ही लागतो म्हणजे कंटाळा न येता पटापटा पोळ्या बडवल्या जातात.
Pages