अतीश्रीमंतीने सजलेली घरे, मढलेल्या बायका, घरातही लग्नासाठी जमावे तसे सजलेले स्त्री-पुरुष, जनरेशन गॅप, कौटुंबिक नाट्य, रटाळ चित्रण, प्रत्येकाच्या चेहर्यावर कॅमेरा रेंगाळवून प्रत्येकाची रिअॅक्शन दाखवण्याची अविकसित बुद्धीमत्ता, टिपीकल कंटाळवाणी संवादफेक, चांगले असणारे फारच चांगले आणि वाईट ते फारच वाईट, रिअल लाईफमध्ये कधीही होणार नाहीत असे संवाद व त्यांचा वेग, ही सर्व गुण(?)वैशिष्ट्ये घेऊन मालिका अवतरतात.
मध्यमवयीन, ज्येष्ठ नागरीक व वेळ मिळेल तेव्हा काही स्त्री पुरुष या मालिकांवर जीव उधळतात. डोक्यात कुठेतरी सीमारेषा असते की ही एक काल्पनिक मालिका आहे आणि आपण वास्तवात जगत आहोत. काहींच्या बाबतीत ही सीमारेषा हळूहळू पुसट होऊ लागते. आपल्याही घरात असेच काहीसे आहे हे उगीचच पटायला लागते. नसलेल्या प्रश्नांची उत्तरे मालिकेमार्फत सुटतात का हे बघितले जाऊ लागते. मनोरंजन किंवा वेळ घालवणे या पलीकडे या ,मालिका जाऊन बसतात.
चीड आणणार्या ह्या मालिका काहींसाठी संध्याकाळचे ध्येय ठरते
त्यात पुन्हा जाहिराती वगैरे तर फारच महान!
या अश्या मालिकांमध्ये घडणारे नाट्य अद्भुत असू शकते. अपघात, अफरातफर, घरभेदीपणा, कौटुंबिक राजकारण, वाटण्या अन् काय काय! त्यात पुन्हा अगदीच 'घरेलू' स्वरुपाच्या मालिकांमध्ये तर जुने झालेले व त्यामुळे किंवा कश्यामुळे तरी ऑब्सोलेट झालेले संस्कार योग्य होते हे सिद्ध करणे यासाठी अहमअहमिकाच लागते. कोणीतरी वडीलधारी व्यक्ती म्हणजे जणू एकखांबी तंबू वगैरे असतो. त्याचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ!
नुकतेच काही कारणाने अक्षरशः 'होणार सून मी' या मालिकेचे सलग तीन भाग थोडेथोडे बघितले गेले. मोठी आई, बेबी वन्सं, जान्हवी वगैरे पात्र होती. ह्यात जान्हवीची आई अचानक जावयाकडून पैसे आणते व एक नाट्य घडते. नवरा बायकोला फोन करण्याआधी अनेकदा विचार वगैरे करतो. आत्ता हिचा मूड असा आहे, आत्ता हिला फोन करावा का? हिचा फोन का आला नाही? बरेच बरे नसेल का? मग ती कोणीतरी एक बेबी की कोण आहे तिने लावलेल्या शिस्तीमुसार त्या जान्हवीने वेळच्यावेळी 'उशीर होईल' असा निरोप न दिल्याने जणू घरातले सगळे चक्रच बिघडते. त्यावर विश्व रसातळाला जाणार असल्यासारखे चेहरे करून जो तो वाक्ये फेकू लागतो. मग माफीनामे, तेही अश्या टोनमध्ये की अगदी त्या बेबीपुढे लोटांगण घातल्यासारखे! फार तर काय, दोन पोळ्या अन् थोडीशी भाजी जास्त केली गेली असती किंवा करावीच लागली नसती. आठ दहा जण असलेल्या घरात, तेही इतक्या श्रीमंत घरात, त्याने असा काय फरक पडला असता? घरातली माणसे एकमेकांशी अजिबात ज्या पद्धतीने बोलत नाहीत त्या पद्धतीने ही पात्रे बोलत असतात.
आणखी कोणत्यातरी एका मालिकेत एक कोणीतरी घरातून निघून गेलेला असतो. त्याने त्याच्या मैत्रिणीला 'माझे बरेच नातेवाईक आहेत' असे काहीतरी सांगितलेले असते जे खोटे असते. ती तो घरी नसताना अचानक घरी प्रकट होते. मग तिला त्याचे म्हणणे खरे आहे हे पटावे म्हणून त्या तरुणाची आई, लहान बहिण, आत्या, वडील (बहुधा मोहन जोशी), मोठा भाऊ, वहिनी ही पात्रे एकामागोमाग एक उभी केली जातात. प्रत्येक पात्रासाठी हे नवीनच असल्याने त्या त्या पात्राच्या चेहर्यावर उमटलेले नवलाचे व धक्याचे भाव बघूनही त्या मुलीला एकदाही शंका येत नाही की लोक खोटे बोलत आहेत. मग ते इतके ताणलेले दाखवले की असे वाटले की टीव्हीच्या आत जाऊन त्या मुलीला गदागदा हालवून दोन थोबाडात लगावून विचारावे की अक्कलशून्य बये, तुला कळत नाहीयेका की ह्यांच्यातला कोणीही त्याचा खरा कोणीही नाही आहे वगैरे!
त्या होणार सून मध्ये परवा एकदा त्या नवर्याला जान्हवी विचारते की 'ए, मला तू ते (काहीतरी) सांगशील का?' हे विचारताना तिचा चेहरा असा झालेला असतो जणू दोघे नुकतेच प्रेमात पडलेले प्रेमवीर बागेत बसले आहेत आणि प्रेयसी विचारत आहे की तू मला कधी विसरणार नाहीस ना रे? त्यावर तो नवरा म्हणतो की नक्की सांगेन पण आधी डोके चेपून दे! मग तो पलंगावरून उतरून खाली बसतो आणि ती पाळलेल्या कुत्र्याच्या केसांतून हात फिरवावा तसे हात फिरवत स्वप्नील डोळे करून आढ्याकडे बघत राहते.
मध्यंतरी एका मालिकेत एका युवकाने आपल्या साहेबाला 'लिफ्टपाशी थांबलेल्या लोकांसाठी आरसे लावा म्हणजे ते कंटाळणार नाहीत' असा सल्ला दिला. तो सल्ला देण्यापूर्वी 'मी तुम्हा महान लोकांमध्ये बोलायला किती नालायक आहे' हे सांगण्यासाठी दहा वाक्ये खर्ची घात्रली. त्यात आगाऊ माफी वगैरे मागून घेतली. तेव्हाच पूर्ण खात्री झालेली होती की ह्याचे सजेशन साहेबाला पटणार. पण किती तो वेळेचा अपव्यय! त्या साहेबाला कोणी मंजिरी आवडत असते आणि तिचे उत्तर काय अशी पाटी असलेल्या जाहिराती गेले दोन दिवस झळकत आहेत. एव्हाना मंजिरीचे उत्तर काय ह्याची वाट न पाहता आजचा एखादा तरुण भलतीच्या प्रेमातही पडला असता च्यायला!
असेच एका मालिकेत कोणा एका तरुणाला मुलगी बघायला म्हणून तिच्या घरी घेऊन जातात. त्याचा कंप्लीट विरोध असतानाही! आणि अचानक त्याला ती मुलगी पाहून आवडते वगैरे! पण तिच्या मनात तसे काही नसते हे तर स्क्रीन बघणार्या प्रेक्षकांनाही समजते पण त्या बैलाला समजत नसते.
ह्या असल्या मालिका प्रेक्षकांना 'आपण काय बघावे' हे सुचवू तर शकतच नाहीत, पण तसा प्रयत्नही करताना दिसत नाहीत. अशी घरे नसतात, अशी नाटकी माणसे नसतात, अशी तत्ववादी, शिस्तप्रिय, जुनाट संस्कारांनी माखलेली धेंडे हल्ली नसतात, असे कोणी कोणाशी बोलत नाही हे लक्षात तरी घेतले जाते की नाही कोणास ठाऊक!
संभाव्य परिणामः
१. वेळ फुकट जाणे
२. अनावश्यक कथानकात गुंतल्यामुळे त्या कथानकानुसार बाकीची दिनचर्या किंवा तिचा काही भाग आखला जाणे
३. आपल्याकडे काही फार वेगळे चाललेले नाही असे काही जणांना वाटू लागणे व त्यातून बहकणे
४. अनुसरण केले जाण्याची शक्यता निर्माण होणे (मर्यादीत प्रमाणात)
शक्य असलेले उपायः
१. मालिका वास्तववादी असाव्यात
२. वास्तववादी मालिका बघाव्यात
३. मालिकांऐवजी बातम्या, चित्रपट, कॉमेडी शो, गाणी, स्पोर्ट्स चॅनेल्स बघावेत.
ह्या अश्या मालिका हिंदीतही अमापच आहेत.
तुम्हाला काय वाटते?
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
अनुमोदन.
अनुमोदन.
यथार्थ वर्णन! घरातल्या
यथार्थ वर्णन!
घरातल्या ज्येनांच्या कृपेने अगदी लहान मुलांनाही या बघाव्या लागतात.
माझ्या दोन्ही बाळंतपणच्या वेळी घरी आलेल्या सासूबाई किंवा आई यांच्यामुळे मला काही वेळा अक्षरशः झेलायला लागल्या.
त्यात दोघींनाही अगदी मोठ्ठा आवाज ठेऊन ऐकायची सवय.
वैताग आला होता.
सध्या घरात कामवाल्या बायांना मालिका लावू दिल्या नाहीत तर ती काम सोडून जातील ही परिस्थिती.
पण त्यांना निदान हळु आवाजात आणि मुलांना झोपवूनच मालिका बघत जा अशी तंबी देता येते.
एव्हाना मंजिरीचे उत्तर काय
एव्हाना मंजिरीचे उत्तर काय ह्याची वाट न पाहता आजचा एखादा तरुण भलतीच्या प्रेमातही पडला असता च्यायला! >>> एकदम सॉलिड.
हं बरोबर आहे. मलाही हेच
हं बरोबर आहे. मलाही हेच म्हणायचे होते. कधीतरी एखादे सर्वसाधारण कुटूंब दाखवुन त्यावर आधारीत मालिका पाहण्यात आली नाही, सिनेमाचेही तेच. पोश बंगले.कपड्याचे ओंगवांणे दर्शन देणार्या नट्या, तो डांस बस पुरे झाल्या सारखे वाटते.
बेफिजी आणि गप्पिष्ठ ला
बेफिजी आणि गप्पिष्ठ ला अनुमोदन

लेख मात्र मस्तच!!!
बेफी अगदी योग्य शब्दात
बेफी अगदी योग्य शब्दात तुमच्या भावना पोचल्या. खरंतर ९९% प्रेक्षकांच्या याच भावना असतील मालिका पाहणार्या. मी आधी कधी आयुष्यात मराठी शिरेली पाहिल्या नाहित पण इथे येऊन त्यातली फारच मजा घेता येते म्हणून मी पाहते
अन्यथा तुम्ही म्हणता ते योग्यच आहे. पण तुम्ही जे शक्य असलेले उपाय सुचवले आहेत ते मात्र अशक्यच वाटतायत मला. मालिका वास्तववादी असाव्यात हे म्हणजे तुम्ही फारच अपेक्षा करताय हो.
कळस म्हणजे त्या
कळस म्हणजे त्या मालिकांच्यावेळी जर आपण कुणाकडे गेलो किंवा कुणी आपल्याकडे आले तरी येणा-या-जाणा-या दोघांची चाललेली चुळबुळ सहज लक्षात येते.
या मालिकांची नशाच इतकी और असते की प्रसंग कोणता आपण काय करतोय याचे भानही उरत नाही थोरा-मोठ्यांना. माझ्या जावेचा छोटा मुलगा कार्टून बघण्यासाठी हटून बसला, त्याला ते चॅनेल लावून दिले हळूहळू रिमोटचा कंट्रोल वयस्कर मंडळींच्या ताब्यात गेला नि झाल्या सुरू सिरीयल्स. बाहेर मंडळी भेटण्यासाठी येत आहेत याचेही भान नव्हते त्यांना....:-(
असो !
बेफी अगदी प्रत्येक गोष्ट
बेफी अगदी प्रत्येक गोष्ट खरी.
बाकी तुमच्या कडे पण झी मराठीच का?
यु स्पोक माय माइंड...
यु स्पोक माय माइंड...
मी सुद्धा आधी असाच विचार
मी सुद्धा आधी असाच विचार करायचो. पण जेंव्हा स्वतच्या कानाने जवळपास रोजच ऐकण्याची सवय झाल्यामुळे माझा पण विश्वास बसत चाललाय कि अशी माणसे प्रत्यक्षात पण असतात.
माझ्याच मागे बसणारी एक सहकारी आपल्या आईला तिच्या सुनेला कसे वागवायच याच्यावर उपदेश करताना मला रोजच ऐकावं लागतंय. अक्षरशः अत्याचार होत आहेत माझ्यावर.
मग तो पलंगावरून उतरून खाली
मग तो पलंगावरून उतरून खाली बसतो आणि ती पाळलेल्या कुत्र्याच्या केसांतून हात फिरवावा तसे हात फिरवत स्वप्नील डोळे करून आढ्याकडे बघत राहते.
>>
माझ्याच मागे बसणारी एक सहकारी
माझ्याच मागे बसणारी एक सहकारी आपल्या आईला तिच्या सुनेला कसे वागवायच याच्यावर उपदेश करताना मला रोजच ऐकावं लागतंय. अक्षरशः अत्याचार होत आहेत माझ्यावर.<<<
कामाच्या ठिकाणी होत असलेल्या या शोषणाविरुद्ध आवाज उठवा सुनटुन्या, बरेच कायदे आहेत त्यासाठी! मागे एक धागाही निघाला होता त्यावर!
मालिकांऐवजी बातम्या >> हा
मालिकांऐवजी बातम्या >>
हा फारच अघोरी उपाय आहे. मालिका बर्यापैकी निरूपद्रवी तरी असतात. तुमचे मत आणि विचारधारा रेडिमेड आणि घाऊक पद्धतीने 'बनवण्याचा' मक्ता घेतलेल्या वृत्तवाहिन्या आणी वर्तमानपत्रे- यांचं तुमच्या आयुष्यावर होऊ शकणारं आक्रमण - हे जास्त डेंजरस आहे. जगातलं कुठचंही फिक्शन- हे यांच्या तुलनेत फार सुसंस्कृत, सरळमार्गी, अजेंडारहित आणि निरूपद्रवी असेल.
लेख पटला.. माबोवर येवुन टिपी
लेख पटला..
माबोवर येवुन टिपी होतो म्हणुन अधुनमधुन बघते मी मालिका.. नाहितर वैतागच आहेत ..
आजकाल त्या पाट्या बघुनही कळतं कुठे पोचली सिरीअल ..
हा फारच अघोरी उपाय
हा फारच अघोरी उपाय आहे<<<
तुम्ही मते बनवण्याचे पोटेन्शिअल असलेल्या बातम्यांबाबत म्हणत आहात असे दिसते. मात्र अनेक प्रकारच्या बातम्या असतात. कॅटरिना कैफ कुठेतरी गेली, कोहलीचे शतक, सुनेला जाळले, साप सापडला, वाघ हारवला, मंगळावर पाणी वगैरे!
>>>जगातलं कुठचंही फिक्शन- हे यांच्या तुलनेत फार सुसंस्कृत, सरळमार्गी, अजेंडारहित आणि निरूपद्रवी असेल.<<<
हे एक अॅझंप्शन आहे. यातील फक्त निरुपद्रवी या एकाच विशेषणावरही पाने लिहिता येतील अश्या मालिका अस्तित्वात आहेत अनेक वर्षे!
असो, सासर्यांना दवाखान्यात घेऊन जात आहे, आल्यावर भेटूच.
बेफिकीरजी ले़ख मस्तच
बेफिकीरजी
ले़ख मस्तच
वरच्या मताशी सहमत.. बातम्या
वरच्या मताशी सहमत..
बातम्या तर कहरच .. कधी कधी नवर्याने न्युझ चॅनेल लावलेच तर 'बाप रे, बदल ते' अस होत..
तिथे तर सगळच टोकाच दाखवतात... एखादी अक्सिडेंट, मृत्युची बातमी तर अंगावर येते...
असो लेखाशी सहमत..
एकदा सीआयडीचा एक भाग चुकून
एकदा सीआयडीचा एक भाग चुकून पाहीला. त्यात प्रद्युम्नला ती बाई सांगत असते की रात्री अडीच वाजता ती पाणी प्यायला उठली असताना तिने काही आवाज ऐकले वगैरे वगैरे. त्यात तो रात्री अडीचचा फ्लॅशबॅक दाखवला त्यात तिने इतकी झकास साडी नेसली होती की अशी साडी लोक लग्नाला जातानाच नेसत असावेत. रात्री अडीच वाजता इतकी छान साडी कोण नेसतं
रात्री अडीच वाजता इतकी छान
रात्री अडीच वाजता इतकी छान साडी कोण नेसतं >. अरे तीला सिरीयल प्रोड्युसरनी नेसवली , त्याला आपण काय करणार. गाऊन घालायचा जमाना चालला लोक काहीही घालतात, कुठेही जाताना !
कामाच्या ठिकाणी होत असलेल्या
कामाच्या ठिकाणी होत असलेल्या या शोषणाविरुद्ध आवाज उठवा सुनटुन्या, <<<<
म्हणजे कानावर अत्याचार होत आहेत अस म्हणायचं होत हो मला. यासाठी कुठे दाद मागणार.
यासाठी कुठे दाद मागणार. >>
यासाठी कुठे दाद मागणार.
>> म्हणजे कानाच्या ठिकाणी होणारे अत्याचार..
बेफी ---१००% अनुमोदन .
बेफी ---१००% अनुमोदन .
ह्यातिल अजुन एक कळस म्हणजे ----- माझ्या मैत्रिणीचा नवरा परदेशी गेलेला आहे तिकडुन तो बायकोला --"-ए त्या सीरीयल मधे आता पुढे काय झाल?" असे विचारतो .... एक तर ओफिस च्या कामाला परदेशी गेलेला, त्यातुन भरमसाठ पैसे खर्च करुन केलेला फोन ..खुशाली चे सोडा पण सीरियल मधे काय झाल ह्यात कित्ती तो इन्टरेस्ट?????? कमाल आहे ......
ज्यांच्याकडे वेळ असतो ते
ज्यांच्याकडे वेळ असतो ते बघतात ज्यांच्याकडे नसतो ते नाही बघत. मालिकांमधे जे दखवले जाते ते बेकायदेशीर असेल तर टीका मी समजु शकते पण मालिका बघायच्याच नाहीत हे कोण ठरविणार? मला तर मायबोलिवरचे कविता/गझल कलत नाहीत ,पण ते लिहिणारे लिहितात वाचणारे वाचतात, तिथे नाही वाटते वेळ फुकट जात.आपली ती अभिव्यक्ती दुसर्याचा तो मुर्खपणा!
बघा बघा, अवश्य बघा! मी फक्त
बघा बघा, अवश्य बघा! मी फक्त माझ्याबद्दल म्हणालो, की होणार मूर्ख मी हे बघुनी! मी काय होणार हे ठरवायचा अधिकर तरी आहेच की मला?
बेफी
बेफी
मीही अॅडीक्ट झाले होते.. बडे
मीही अॅडीक्ट झाले होते.. बडे अच्छे लगते हैची.. पण प्रयत्न करुन सोटले.. आताही कधी लावली सिरीयल तरी बंड करवत नाही. नवरा मदत करतो बंद करायला... अर्थात थोडे भांडण होतेच
मी पाहीलेली ही एकमेव सिरीयल.. सगळ्यात हाईट म्हणजे स्वतःच्या लग्नात आणि मुलीच्या लग्नातही त्या नायीका तशाच दिसतात.. एकही केस पांढरा नाही कि चेहर्यावर सुरकुती नाही
आणि ह्या सगळ्या सिरिअल मधे एक
आणि ह्या सगळ्या सिरिअल मधे एक बा नामक थेरडी असते जी मरता मरत नाही.
सगळ्यात हाईट म्हणजे स्वतःच्या
सगळ्यात हाईट म्हणजे स्वतःच्या लग्नात आणि मुलीच्या लग्नातही त्या नायीका तशाच दिसतात.. एकही केस पांढरा नाही कि चेहर्यावर सुरकुती नाही<<<
आणि इकडे वास्तव जीवनात तर स्वतःच्याच लग्नात मुली कलप लावून उभ्या राहतात. नवरे टक्कल झाकतात.
लग्न लावून देणारे गुरुजीच हल्ली जास्त चिकणे झालेले आहेत.
आणि ह्या सगळ्या सिरिअल मधे एक
आणि ह्या सगळ्या सिरिअल मधे एक बा नामक थेरडी असते जी मरता मरत नाही.<<<
ती अनेक दशके म्हातारीच राहते.
संभाव्य परिणामः १. वेळ फुकट
संभाव्य परिणामः
१. वेळ फुकट जाणे
२. अनावश्यक कथानकात गुंतल्यामुळे त्या कथानकानुसार बाकीची दिनचर्या किंवा तिचा काही भाग आखला जाणे
३. आपल्याकडे काही फार वेगळे चाललेले नाही असे काही जणांना वाटू लागणे व त्यातून बहकणे
४. अनुसरण केले जाण्याची शक्यता निर्माण होणे (मर्यादीत प्रमाणात)
शक्य असलेले उपायः
१. मालिका वास्तववादी असाव्यात
२. वास्तववादी मालिका बघाव्यात
३. मालिकांऐवजी बातम्या, चित्रपट, कॉमेडी शो, गाणी, स्पोर्ट्स चॅनेल्स बघावेत.>>>>>> अनुमोदन.
Pages