दिवाळीचा फराळ

Submitted by गंधा on 12 November, 2013 - 22:37

दिवाळीचा फराळ
सहामाईचा शेवटचा पेपर झाला कि घरी येताना आम्ही भावंड जरा जोरातच उड्या मारत येयचो. चला आज पासून अभ्यासाला बुट्टी. दिवसभर किल्ला करायला लागायचं...आमचे शिवाजी, मावळे, प्लास्टिकचे हत्ती, घोडे.. हे अडचणीच्या खोलीतल्या कुठल्यातरी कपाटातून उचका-बुचक करून तिथल्या चार वस्तू इकडे-तिकडे पडून-आपटून आमच्यातला एखादा बंड्या किंवा बाळ्या ते अंगणापर्यंत आणण्यात यशस्वी व्हायचा....मग दिवसरात्र किल्लामय....केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत मातीने माखलेले आम्ही संध्याकाळी आई नळाखाली घेऊन धुवायची आम्हाला. बाबा रात्री आल्यावर आकाश कंदील करायचे त्यातही आमची लुडबुड चालूच असायचीच....

तशी दिवाळिची चाहुल दसरा संपल्या-संपल्या लागायची. घरातले सगळे डबे धुतले जायचे घराला नविन रंग दिला जायचा. साफसफाई व्हयाची. आणि मग काही दिवसांनी घरात फराळाचा खमंग सुवास पसरायला लागायचा अन् आम्ही स्वैपाकघरात डोकवायचो. बोक्याला जसा दुधाचा वास कुठूनही येतो ना अगदी तशागत
“ए पोरांनो, खा-खा खाल आता करंज्या, लाडू आणि उद्या दिवसभर धावत रहाल पोट बिघडलंय म्हणून.”
लहानपणी हि आजीची वाक्य ठरलेली.. त्या दिवाळीची मज्जाच काही और असे. फराळ करायला आजूबाजूच्या साळकाया-म्हाळकाया त्याही येत. त्यात एक भाजी काकू येत असे... ती कधीही, कुठेही भेटली तरी तिचा एक प्रश्न ठरलेला असे. “मग आज भाजी कुठची होती” म्हणून ती भाजी काकू...
फराळ सुरु झाला कि आई सांगे “जा रे हि वाटी ठेव बघू देवाला”...
कि बास... हेच तर हवं असायचं आम्हाला... चराचरात भरलेल्या त्या देवाला इथुंनच दाखवला तर ग हां फराळ... मिळेल तसा त्याला....

यावर आई उंच स्वरात ...”बघ डामरट कुठचा, जा देवा समोर ठेव ती वाटी....सांग सगळ छान होऊ दे”
आम्ही देवाजवळ अगदी दोन सेंकंद थांबून...... “आई, झालं ग” अशी आरोळी ठोकायचो....
मग आतून आवाज... “साष्टांग नमस्कार घातलात का?”
तो घालता-घालताच “हो... आता खाऊ आम्ही?....”

येता-जाता वशिला लावून फराळ खायचा हेच फक्त माहित होत... त्या दिवसांत भांडणं हि चिक्कार चालायची आमची फटाक्यांसाठी, रांगोळीसाठी कोणी कुठच्या जागी काढायची यासाठी.... प्रत्येकाची एक याप्रमाणे अंगणात ते रंग सजायचे ...मग कोणाची रांगोळी जास्त छान याची स्पर्धा... किल्ला मात्र एक व्ह्यायचा नशिबाने... तोहि मोठ्यांच्या हस्तक्षेपाने.
हि दिवाळीची मौज करत लहानपण गेल आणि “मनु, बंड्या, बाळ्या आता तुम्ही कारंज्याच पीठ कुटून द्यायचं बर का?” असं आईने नमूद केल, आणि आम्ही मुलं हि मदतीस लागलो. करंज्या, चकल्या, पापड करण्यासाठी आजू-बाजूच्या घरी मदतीला जायचो आम्ही हौसेने. तेव्हा प्रत्येक घरात हे कुटाकुटीच काम..आम्ही बच्चे कंपनी करायचो. ते करता करता पदार्थांची चव आळीपाळीने घ्यायचो. मग त्यात...
“ती बघ ताई मघापासून तिच्या चार चकल्या खाऊन झाल्या.. आता मी पण खाणार...”
अशी काहीतरी युक्ती लढवून आपल्या तोंडात अधिक चकल्या जाण्यासाठी एकमेकांवर लक्ष ठेवून असायचो. भाजी काकुकडे सगळ्यात जास्त काम असे ती तर पाच-पाच किलोचं पीठ भिजवत असे... अगदी नाकी नौ येत तिच्याकडे...

मोठे होत गेलो तशी दिवाळीच्या फराळाची जबाबदारी वाढत गेली. लहानपणीच्या मौजेच्या आठवणी मात्रं तशाच राहिल्या. आता लग्न झाल. फराळ खाण्याऐवजी तो कसा होईल याचीच चिंता आता जास्त लागली... त्यात नातेवाईक मंडळी जेव्हा फोन वर बोलण्याचा चान्स मिळे तेव्हा विचारत “काय मग यावर्षी फराळ करून घालणार कि नाही नवऱ्याला.....तुझ्या हातचा”.....
आता यावर उपाय सुचेना. मी आईला जरी कधीतरी मदत केली असली तरी त्या प्रत्येक पदार्थाची कृती फक्त पीठ मळून देणे, तळणे किंवा लाटणे. इतपतच मर्यादित होती. आमचं पीठ मळण म्हणजे तरी काय हो? आईच पिठात तिखट, मीठ, अमूक-ढमुक.... सारं घालून माझ्यासमोर परात देई आणि त्यात पाणी इतकं-इतकं घाल हे सुद्धा तीच सांगायची. मग मी फक्त ते पीठ मळून साच्यात भरून द्यायचे. एवढच काम मला येई....तिने त्यात घातलेल्या चिमटीभर मिठाचे, तिखटाचे....अंदाजपंचे तेलाचे, पाण्याचे माप मला कसे माहिती असणार? ह्या सगळ्या गोष्टींचे कॉपीराईटस तिच्याकडेच होते नव्हे का?
आता तर दिवाळीचा फराळ मला ऑस्ट्रेलियात म्हणजे साता समुद्रापलीकडे येऊन एकटीने करायचा या नुसत्या संकल्पनेनेच पदार्थ नक्की कसे दिसतील हां प्रश्न पडला .
“कधी घरी दिवे लावले नाहीत फराळ करायचे, ते इथे लावणार होते लग्नानंतर...” हि आजीची म्हण जरूर लागू झाली मला.
इथे मदतीला कोणी नाही, यापेक्षा एक वस्तू असल्याचाच जास्त त्रास होतो मला आणि तो म्हणजे आमच्या घरातील फायर अलार्म. जगात कुणाला प्राण्यांची, तर कुणाला चक्क भुताची भीती वाटते, तशी मी लहानपणापासून जरा धीट. पण मला ऑस्ट्रेलियातल्या घरात फायर अलार्मची भीती वाटते. तो एकदा वाजायाला लागला कि माझी पाचावर धारण बसते. जरा काही छोटी-मोठी पाककृती करून नवऱ्याची वाहवा मिळवायची म्हंटली तर हां उभा राहतो पौराणिक सिरियल्स मधील राक्षसासारखा. त्याचा अवतार पाहून चुकून आली फायरची गाडी-बिडी तर बसेल चार-पाचशे डॉलरचा भूर्दंड आणि माझ प्रयोजन लांब राहून अधिक खवळेल माझा नवरा. नको ते उदयोग कशाला करायचे...? म्हणून.
फायर अलार्मबद्दल मी नातेवायकांना अनेकवेळा सांगितले. पण त्यांना प्रत्यक्ष उग्रतेचा परिचय नसल्यामुळे माझ कारण हि एक निव्वळ फराळ न करण्याची सबब वाटते. माझा एक काका यावर म्हणाला सुद्धा
“आम्ही तुला ओळखतो चांगलाच ह्म्म्म, आम्हाला नको शेंडी लावू.”

आता हे खरर्र आहे... कि मी फराळ-बिराळ करायला तशी थोडी आळशीच. पण ऐवढ म्हणतायत ना म्हणून पतीदेवांसाठी करू प्रयत्न... असा विचार चालू होता.
हा फायर अलार्म म्हणजे कडक ऋषीमुनीच. दिवसभरात टिकटिक करून तो स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो अधूनमधून. याला धूर जरा सुद्धा पचनी पडत नाही. सणासुदीसाठी पुऱ्यांच तळपच काय, त्याच तर रोजच्या भाजी आमटीच्या फोडणीने सुद्धा ध्यानभंग होतो आणि “शिष्या कमंडलू” ह्या शब्दांचा उच्चार करून तो शापरुपी फायर ब्रिगेडला साद घालतो लगेचच... त्यामुळे दिवाळीच्या तळपाने घरात फटक्यांन ऐवजी कधीतरी बंब येऊन पाणी सोडेल कि काय याचीच भीती. या विचाराने कधीकधी वाटे कि ह्या भारतात बसलेल्या मंडळीना काय हो जातंय म्हणायला फराळ कर यावर्षी म्हणे.....

बर आता इथे आई सुद्धा जवळ नव्हती ती एकदा म्हणाली हि “तू इकडे असतीस ना तर मी आले असते तुझा फराळ करायला अगदी अनारश्यापासून चिवड्यापर्यंत सगळ केलं असतं. पण तू जावून बसलीस तिकडे ऑस्ट्रेलियात.... आता पुढच्या वर्षी दिवाळीत या इकडेच.... काही सणवार नसतात तिकडे.... आपला देश तो आपलाच हो शेवटी....”
तिची गाडी नेहमीप्रमाणे मला तुझी आठवण येते या सुरांकडेवळण्या आधी मीच म्हंटल, “आई, तूच ये कि या दिवाळीला आमच्याकडे... जरा नवा देश बघशील.... नवी माणसं भेटतील, मज्जा कि नाही तुझीही”
मग एका दुपारी जरा मनावर घेऊन मी घरी फोन केला. भाजी काकूने उचलला तो...
“हैलों....हां मी मनू.....”
“हां... काय कशी आहेस? मग... आज कुठली भाजी होती दुपारी?....”
मी ह्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हते...
”काकू, आई आहे का तिकडे?”
“हो...काय मग कोणती होती भाजी...”

आता मी इतक्या लांबून हिला दुपारची भाजी सांगण्यासाठी केला होता का फोन? पण तिला उत्तर दिल्याशिवाय ती काही आईकडे फोन देणार नाही. म्हणून मी ठोकलच...
“बटाट्याची...”
“बर...बर. देते हां ...”
असं म्हणत तिने आईकडे फोन दिला. बहुतेक आईला आजचा फोन अपेक्षित होता. तिने पहिला प्रश्न विचारला,
“काय मग झाली का भाजणी?”
मी म्हटलं, “अग कसलं काय? सांग आता काय काय आणायचं ते....”
आई हसली. म्हणाली, “आठच दिवस उरलेत फक्त. महिनाभर आधी दाताच्या कण्या झाल्या सांगून तुला...नंतर बघू नंतर बघू म्हणालीस....आता होईल धावपळ....”
मग आईने सगळ्या वस्तुंच वाट्यांच्या प्रमाणात माप सांगितलं......
.
ह्या मापावरन आठवलं. मी लग्नानंतर पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात शिरा केला होता. तेव्हा नेहमीप्रमाणे भारतात फोन केला. घरी मावशी आली होती. मावशीने सांगितलं होत हे प्रमाण.....
“बघ, आता तुमच्याकडे संध्याकाळ झाली असेल, हो ना?
“हो”
“मग जावई आले का ऑफिसातून.....?”
“हो आताच आले....”
“बर, मग चहा ठेवणार असशीलच. तर मग एका बाजूला चहा ठेव आणि दुसऱ्या गैसवर तुपावर रवा भाजत ठेव.... चहाला उकळी येईपर्यंत रवा भाजेल. मग एकीकडे चहा गाळ तेव्हाच लगेच रव्यात दुध घालुन गैस मंद कर. तुमचा चहा घेऊन होईपर्यंत, रवा फुलेल. नंतर रव्यात साखर घाल आणि ढवळून झाकण ठेव .... चहाचे कप धुवेपर्यंत शिऱ्याच्या झाकणाखालून वाफ येईल मग गैस बंद कर...कि झाला शिरा.”

अशा प्रकारची तिची झटपट कृती मला फारच सोपी वाटली. मी चहा होईपर्यंतचे टप्पे सहज पार केले. पण हातात चहाचा कप आल्यावर किती वेळ चहा घेण्यात घालवायचा ह्याच माप नसल्यामुळे व्हायचा तो गोंधळ झाला. झालेल्या पदार्थाची वास्तविक ओळख पटवून त्याला शिरा म्हणून संबोधण कठीण होऊन बसलं. माझ्या यजमानांनी लग्नानंतरच्या आणि ऑस्ट्रेलियातील मी केलेल्या पहिल्या-वहिल्या प्रेमयुक्त पदार्थाची चव घेतेली, त्यावर दोन प्रोत्साहनपर शब्द उच्चारले –
“तसा पदार्थ छान झालाय, पुढच्यावेळी पदार्थाचं माप जरा व्यवस्थित घेतलं तर पदार्थ ओळखता येईल....”
अशी कोकणस्थी टिपणी करून तो पदार्थ गंगार्प्रन्मास्तु झाला.

हा किस्सा आईला इतमभुत माहित असल्यामुळे ती मला वाटीच माप अगदी न चुकता सांगते. ती माप सांगत होती आणि मी वहीवर उतरवीत होते. माप लिहून घेण्याचा कार्यक्रम यथासांग पार पडला. आता खरेदी, या शास्त्रातील माझ ज्ञान जरा बर असल्यामुळे ते हि उरकलं. पण या पुढील गड सर करण्याची जबाबदारी पार पडण्यासाठी माझा एकमेव खात्रीचा सहाय्यक म्हणून माझ्या डोळ्यासमोर माझा “विघ्नहर्ता” पतिपरमेश्वर उभा राहिला. त्यांना साकड घालायचं मी ठरवलं. ते हि फार सोपं कार्य होत असे नव्हे पण अशक्य मात्र नक्की नव्हत. असा आत्मविश्वास वाटत होता.

एका संध्याकाळी जरा लाडिकपणाने चहाचा कप आणि बिस्किट त्यांच्या हाती देत म्हंटल.
“अहो, किती दमता ना तुम्ही हल्ली ऑफिसात, काम जरा जास्तच आहे का?”
या माझ्या प्रश्नामुळे त्यांनी हि जरा माझ्याकडे नवलानेच पाहिलं. आज काहीतरी अजब घडतंय... म्हणजे नेहेमीसारख नाही हे त्यांच्या लक्षात आलं हि असेल.. पण मी उसंत न घेता माझं घोड दामटवल......
“जाम थकता नाही का हो रोज?”
मला हे सूत्र नक्की माहित होत. आणि अनेक महान व्यक्तीही म्हणून गेल्या आहेत, ‘नवरा बायकोने प्रत्येकाच्या कामाबद्दल एकमेकांना काहीही माहित नाही असं दाखून नवऱ्याने बायकोला आणि बायकोने नवऱ्याला एकमेकांच्या कामाबद्दल स्तुतिसुमन वाहात रहायची.’
“तुला कामाचा ताण पडतो ना?, किती कठीण असत ना काम?” वैगरे वैगरे....
मी हळूच माझी कामांची यादी पेश केली हेडऑफिसात...
“बघा ना दिवाळी किती लवकर आली.... जणू काही आमचच कैलेन्डर पुढे धावतय... अशागत.... आता घरची साफसफाई आली, आकाशकंदील बनवणं, खरेदी करणं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फराळ हि करायला हवा यावर्षी... बघा ना किती काम ती? बाकीच्या गोष्टी मी सहज मैनेंज करू हि शकते. पण फराळात मात्र मला मदत लागेल हो तुमची.... इथे आई किंवा सासूबाई हि नाहीत ना??? मी काय म्हणते..... आपण.... तुम्ही ऑफिसातून आलात कि थोडा-थोडा मिळून रोज करायचा का हो फराळ सगळा. तुम्ही मदत केलीत ना म्हणजे इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवता येईल आपल्याला...”
यावर चहाचा एक घोट घेत पतीदेव म्हणाले
“हम्म्म...असं म्हणतेस....चालेल खर.... पण काय ग, हल्ली विकत मिळतो कि सारा फराळ... त्यातलाच आणू कि थोडा....”
मी लगेचच, “नको नको. आपली पहिलीच दिवाळी आहे ना करू कि आपणच घरी थोडस....”
मग त्यांने होकारआर्थी मन डोलावली........ या त्यांच्या होकारार्थी उत्तराने आणि प्रतिक्रियेने सुद्धा मी उत्साही झाले खरी... पण अतिउत्साह चेहऱ्यावर न दर्शवता मी कंट्रोल केलं स्वतःला.
मी म्हटलं, “तसा केला असता दिवसा फराळ, पण हां फायर अलार्म वाजतो ना म्हणून भीती वाटते.....”
तो हि मिशिक हसत म्हणाला, “ठीक आहे....करू उद्यापासून.....”
या उत्तराने मला हेड ऑफिसच्या मदतीची हमी पक्की झाली.

दुसऱ्या दिवशीपासून मी आईला अनेक वेळा फोन करून आई हे कस करू, यानंतर काय, मग हे असं झाला. याचं पुढे काय? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करत असे. तोपर्यंत पतीदेव ऑफिसातून आले.
चहाचा घोट घेत, “चला आज काय करायचं...”
“आज करंज्या करूया... झालीय माझी तयारी तशी.. चहा झाला कि मी लाटते आणि तुम्ही तळप करा...”
करंज्या करून फराळाची मुहूर्तमेढ रोवायाची आम्ही पक्क केलं.

स्वारींच हि स्वयपाकाच ज्ञान यथातथाच होतं.... त्यामुळे मी करंजी लाटून तिच्यात सारण भरून होईपर्यंत सूचनांचा भडीमार सुरु. तोपर्यंत गैसवरील कढईतल तेल जास्त तापल. तयार झालेली करंजी कढईत जाईपर्यंत मोडेल... सांडेल, फुटेल त्यातलं पुरण जरा नीट भर, तिचे काठ घट्ट चेप या कोकणस्थी सूचना चालू होत्याच. बर ती करंजी कढईत जायच्या आधी तेल आपल्या अंगावर उडेल या भीतीने जवळ-जवळ एक किलोमीटर दूरवरून साहेबांनी तिला कढईत लोटली. आम्ही दोघही करंजी वरचे फोड बघण्यासाठी आसुसलेले होतो. मी लगेच गैसजवळ जावून उभी राहिले पण बघतेय तर काय? तोपर्यंत ते तेलं जास्त तापल्यामुळे त्या करंजीला चटके जरा जोरातच बसू लागले आणि ती आपलं आवरण कढईटच काढून टाकू लागली. त्यामुळे सारणने तेलात उड्या मारून लगेचच धुराची साद दिली. धुरामुळे फायर अलार्म ओ देता झाला. मग त्या तेलाच्या फेसामुळे, आणि वासामुळे आमच्या दोघांच्याहि तोंडाला दरदरून फेस (घाम) फुटला. फायर अलार्म तर जोराने साद द्यायाला सुरु करणार तो पर्यंत झाऱ्याचे नेतृत्व मी माझ्या हाती घेतले. पतीदेव
“अग, गैस बंद कर, इकझोसस्ट फास्ट कर, ती कारंजी बाहेर काठ.”

या सुचना करत-करत दरवाजे उघडायला धावले. तिला बाहेर काढे-काढे पर्यंत ती कारंजी मात्र आपले त्राण त्या कढईतल्या तेलात सोडत होती.” त्यामुळे तेलाला जास्त खाद्य मिळत होतं आणि जास्त धुर पसरत होता. प्रसंगावधान राखून मी चटकन कढईतली कारंजी कशीबशी काढली गैस बंद केला. आणि तेलाची कढई हाती घेत चक्क गैलेरीत धावले. बहुतेक फायर ब्रिगेड येणार! म्हणून गैलेरीत जावून ओरडा-आरड करू लागले.
“बंद करा ना तो आवाज त्याचा, पहा तरी त्याच्याकडे...”

याला म्युट बटण असत तर कि बर झाल असतं ना? रिसेट बटण हि त्यावेळी साथ देईनास झालं. मी कढई सकट बाहेर गेले आणि लगेच इकडे फायर अलार्म हि बंद झाला. या माझ्या कर्तुत्वाने मला एकदम अटकेपार झेंडे लावल्यासारखं वाटलं. आमचे अहो मात्र माझ्याकडे पाहून “वा काय डोक चालवलंस बाकी” असं म्हणून पोट धरून हसू लागेल. आणि मलाही माझ्यावरच हसू आलं. अशाप्रकारे फायर अलार्मच्या सलामीने सुरु झालेल्या करंज्या रात्री दहा वाजता झाल्या एकदाच्या....करंज्यांचा डबा भरलेला पाहून आमचा दोघांचाही जीव हि भांड्यात पडला.

करंज्यांचा एक गड तर फते झाला होता. त्याने आमचा तळपा बद्दलचा आत्मविश्वास बऱ्यापैकी वाढवला होता. म्हणून आम्हा दोघांमध्ये “मग... उद्याच करू चकलीचा बेत”, असं ठरलं.... इथे चकलीची भाजणी अगदी रेडीमेड मिळते ते एक बर आहे बाबा! असं आई म्हणाली.... नाहीतर ते सतारा प्रकारच धान्य आणा, निवडा, भाजा, दळा........याचा काही डोक्याला ताप नव्हता.....त्यामुळे कणकेसारख नुसत पीठ घ्यायचं आणि ते माळायच कि झाली सुरुवात ....

तसच एका गोष्टीचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला तो म्हणजे सध्या दिवाळी फराळ करण्याचे जसे वारे वाहू लागले तसेच फेसबुक वर माझ्या काही मैत्रिणी आप-आपल्या नवरोबांचे चकली पाडताना जणू काही शक्ती प्रदर्शन करावे अशागत त्यांचे फोटो टाकत होत्या. आणि हद्द म्हणजे त्या फोटोला शंभरापेक्षा जास्त लाईक आणि कमेंट होत्या.....मी हि कामाची सुरुवात करण्या आधी माझ्या याजमानाना हे फोटो न विसरता दाखवले म्हणजे तेही काहीही न बोलता चकलीचा साचा हाती धरतील. हे काम इतपत प्रसिद्धीच असल्यामुळे पुरुष मंडळी ते सहर्ष स्वीकारतात. लहानपणापासून पाहिलेलं म्हणजे बाबा, काका त्यानंतर दादा हि मंडळी नेहमी चकली पडायचे, आणि आया तळपात व्यस्त असतं त्यामुळे हि जणू काही ब्रम्हदेवाने वाटून दिलेली कामे आहेत असं वाटे..
या सगळ्यामुळे हे काम पुरुष मंडळींचच हे मनावर पक्क बिंबल होत. त्यामुळे मी पिठाची परात अहोंकडे सुपूर्द करून गैस जवळ उभी राहिले....जणू काय मी त्या गावाची नाहीच अशा अविर्भावात.

हे म्हणाले अग हे मळून दे ना पीठ ....मी नाही हात भरणार यात...... त्यावर मी तर चाट...मी जरा रागानेच त्यांच्याकडे एक चमचा टाकला आणि म्हंटल ह्म्म्म....मळा ते याने. मग काय दिलेला चमचा घेऊन थोडसं ढवळली इकडे-तिकडे आणि हे नाही होत ग माझ्याने .... त्याक्षणी मला वाटलं आमचे बाबा, काका आणि त्या मैत्रिणीचे नवरे यांना कस काय जमत हे सार!. ह्म्म्म बरोबर हे आयटीतलेना म्हणून नसेल जमत ह्यांना. असा विचार करून थपकल मारून तिथेच खाली बसले. झाल पर्यायाने हे काम माझ्यावरच आलं. मग माझी कसरत सुरु झाली. एकदा पीठ मळून द्यायचं, पुन्हा उठून हात धुवायचे आणि तळप करायचं.... पण आज फार छान चालाल होतं सार....कालचा करंज्यांचा दांडगा अनुभव होता ना गाठीशी. मग नवरोबांनी पाडून दिलेल्या आखीव-रेखीव चकल्या जणू काही आम्ही वर्षानुवर्ष हे काम करत आहोत...असं वाटाव......इतक्या सुरेख दिसत होत्या त्या ..आणि माझा तळप अनुभव हि झकास चालला होता. अशा प्रकारे...... निर्विघ्नपणे चकल्या पार पडल्या. मी गैस बंद करून सोफ्यावर टेकेले. मी कामाचा जास्त भाग केला ना म्हणून....नंतर आमचे अहो बाकी सार आवरू लागले. चकल्या झाकून ठेवणे, मदतीला घेतेलेले साहित्य आवरणे, बेसिन भांड्यांनी भरून ते हि आले सोफ्यावर. माझे डोळे तो भांड्यांचा ढीग पाहून विस्फारले....माझ्याकडे पाहत हे म्हणाले ....अग काळजी कसली...आपण उद्या डिश-वौशर लावू कि........असं म्हणत त्यांनी laptop सुरु केला....

झालं करंजी, चकली असे एक-एक पाडाव पार करत उरलेल्या फराळाच्या पदार्थांकडे मी मोर्च्या वळवला. आता पुढील लहान- मोठ्या पदार्थंची लढाई मला एकटीनेच लढाईची होती....त्यामुळे नेहमी प्रमाणे दुसऱ्या दिवशी मी आईला फोन करून त्रास देण सुरु केलं.......तिने हि मावशी सारखी रेसिपी सांगायला सुरु केली. बेसन घे दोन वाट्या आणि तुपावर भाज खमंग, रंग बदलला कि गैस बंद कर नाहीतर दुसऱ्या खोलीत वास येऊ लागला कि.......पण मला तर तिथे उभं राहिल्या क्षणापासूनच त्याचा वास आणि रंग बदललेला वाटू लागला....बर व्हिडीओ चाटचा ओफ्शन नसल्यामुळे मला आईला ते भाजक बेसन दाखवता हि येईना आणि स्वतःला हि कळेना...असली पंचाईत...मग आईला विचारलं मंद गैस वर किती वेळ भाजू ग साधारण....म्हणाली अमुक एक वेळ भाज. मग त्याप्रमाणे केल मी... जे काही तयार झाल त्याचे गोळे केले आणि झाले कि लाडू तयार. तसंच चिवडा, शंकरपाळे हे प्रकार हि हातावेगळे केले.........आणि मी सुटकेचा निश्वास सोडून सज्ज झाले....
ताठ मानेने....
नातेवाईकांना सांगायला तयार! केला हो दिवाळीचा सारा फराळ निगुतीने...आणि हो माझ्या हातचा नवऱ्यासाठी खास.....
आता कधीही येऊ दे ती दिवाळी, पाडवा ......किंवा येवू देत कुणीहि पाहुणे मंडळी ...फराळ रेड्डी.

माझा फराळ हे घरच्यांना भूषणास्पद वाटत होत, पण तो माझ्या नवर्यावर मात्र एक्ष्पेरिमेंट होता असं हि होतं त्याचं म्हणण होत.

आता दिवाळी पार पडली आणि आम्ही मनापासून केलेला फराळ सगळ्या मित्र मंडळींनादेखील चिक्कार आवडला.
आणखी हो “महत्वाच म्हणजे माझ्या नवर्याची तब्बेत अजूनही ठणठणीत आहे.” यावरून हे स्पष्ट झालं कि मी केलेला पहिला फराळ पचाण्याजोगा होता हे खचित.
असो, या फराळाचं कार्य सिद्धीस नेण्यास मला अनेकांच परोक्ष- अपरोक्ष योगदान लाभलं त्यामध्ये मुख्यतः कढई, झारे, चमचे, गैस इकझोस्ट, डिश-वाशिंग मशीन, इकझोस्ट या सगळ्यांचेच ..... .....तसं नाही म्हणालाय माझ्या आईने आणि पतीदेवानी थोडा हातभार लावला हि. त्याबद्दल मंडळ त्यांचे आभारी राहील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए झक्कासच जमलाय लेख! काही काही वाक्य सॉलिड आहेत.
शाबासकी दोघांनी सगळा फराळ केल्याबद्दल!! Happy

आयटी वाल्यांनी चकलीचे सॉफ्टवेअर बनवावे का ? Biggrin
मस्त लेख. आमच्याकडेही थोड्याफार फरकाने असच काही झालं.

चांगल लिहिलय. दिवाळीच्या आठवणी सेम एकदम.
चकली पाडायचे काम घरातील पुरुष मंडळीच करतात हे बिंबलेच आहे. Happy

फोटो टाकायचा ना, इतका फराळ केला तर... आम्हाला हि खात्री झाली असती.

आम्ही सुद्धा पहिल्या दिवाळीला मिळून चकली करायचा प्रयत्न केला होता. पण चकलीने साथ दिली नाही . ती आम्हाला (दोघांना बघून बहुधा) बघून इतकी हसली ना.... तेलात पडली की खिदळायची. Wink
सर्वांना सरप्राईज द्यायचे होते पण फेल झाल्याने गपचूप मग धपाटे करून खाल्ले. Proud

धन्स झंपी, कवीन, शशांक ,....

झंपी,- खूप सारे काढले फोटो ....:-) अगदी सगळ्या पदार्थांचे.....आणि आईला दाखवले ते, तेव्हा खूप सारी शाब्बासकी पण मिळाली.

लेख छान आहे.
<कारंजी कशीबशी काढली गैस बंद केला. आणि तेलाची कढई हाती घेत चक्क गैलेरीत धावले. > पण असं काही करत असाल तर करू नका.