उगाचच मी तुझे रोजे पकडले

Submitted by वैवकु on 6 November, 2013 - 15:05

अशी आहे तशी आहे म्हणाली
तिला ती फारशी नाही कळाली

गझल माझी तुला कळवीत आहे
कळव तूही तुझी ख्यालीखुशाली

न झालो हंस मी बगळाच झालो
जरी ही मान वरती ध्यान खाली

कुठे एखाद कुठली सवय सुटते
कितीदा लायकी सोडून झाली

रडत आहेत आनंदात भोई
कुणाची पालखी आहे निघाली

उगाचच मी तुझे रोजे पकडले
किती थोडी मला ईदी मिळाली

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठे एखाद कुठली सवय सुटते
कितीदा लायकी सोडून झाली

रडत आहेत आनंदात भोई
कुणाची पालखी आहे निघाली

व्वा, दोन्ही शेर फार आवडले.
शुभेच्छा.

अशी आहे तशी आहे म्हणाली
तिला ती फारशी नाही कळाली.........वाह वा !

गझल माझी तुला कळवीत आहे
कळव तूही तुझी ख्यालीखुशाली......सहीय !

उगाचच मी तुझे रोजे पकडले
किती थोडी मला ईदी मिळाली........अफलातून खयाल

मला गझल ह्या विषयातले काही फारसे कळत नाही पण
काही मायबोलीकरांच्या गझला वाचून त्यातील इंटरेस्ट वाढतो आहे. आपण पण खूप छान लिहिता .

सर्वांचे मनःपूर्वक आभार
ही रचना कोणास फारशी आवडेल की नाही या बाबत साशंक होतो मी
पुनश्च धन्स

समीरजी विशेष धन्स आपणास ही रचना नक्कीच आश्वासक तरी वाटेलच ह्या बाबत खत्री होती पहिलाच प्रतिसाद आपला आला हे पाहून खूप समाधानी वाटले