१.
प्रिय जीव्हज,
तुला पत्र लिहायची वेळ येईल असं तुझा तात्पुरता निरोप घेऊन न्यूयॉर्कला येताना कुठे वाटलं होतं? अगाथामावशीच्या तावडीतून सुटून इकडे य:पलायन करण्याची योजना तर तुझीच होती . मलाही विश्रांतीची गरज होती त्या वादळी प्रिमोना प्रकरणानंतर. अन तूही हक्काच्या रजेवर . पण वेळ आलीच तुला आधीच इथे बोलवायची. वेळा सांगून येत नाहीत .
बघ, आज नव्या संकटात सापडलोय मी अन तरीही या आदल्याच संकट क्रमांक.. (किती रे, तुलाच ठाऊक !) ची आठवण झाल्यावर अंगावर काटा येतोय नुसता. मी अगाथामावशीच्या आमंत्रणावरून तिच्याकडे जातो काय, तिच्या मैत्रिणीची आगाऊ पत्रकार मुलगी प्रिमोना तिथे असते काय, अगाथामावशी तिला माझ्या कागाळ्या सांगते काय अन प्रिमोना माझ्या प्रेमात पडते काय ! या सुंदर मुली माझ्याकडे भलत्याच वेगात आकृष्ट होतात जीव्हज, तुला मी हे सांगितलं की जरासं खाकरून अस्सल व्हॅलेच्या अदबीने काढता पाय घेतोस ,पण सत्यच आहे हे. मान्य करशील तूही कधीतरी. प्रिमोनाच बघ ना!
आता रात्रीच्या वेळी पाइपवरून चढून मी तिच्या बेडरूममध्ये गेलो हे खरं जीव्हज, गड्या, पण अगाथामावशीच्या त्या मूर्ख बटलर मेडोजने माझे कपडे चुकून प्रिमोनाला दिलेल्या गुलाबी गेस्ट्-रूमच्या कपाटात ठेवावेत हे माझं फुटकं नशीब! अन त्या कोटाच्या खिशात मी जेनेव्हीव्हला उद्देशून लिहिलेलं निनावी प्रेमपत्र असावं हे त्याहून मोठं दुर्दैव ! बरं प्रिमोनासारख्या चहाटळ मुलीकडे काही सरळपणे समोरून मागायची सोय नाहीच ! माझ्यासमोरच खिशातलं पाकिट काढून गावभर बोभाटा केला असता कारटीने.
तू जाणतोस जीव्हज कोणत्या परिस्थितीत मी ते प्रेमपत्र लिहिलं होतं ! ते प्रेमपत्र जीव्हज, तुझाच सल्ला घेऊन अगाथामावशीकडे येण्याआधी जेनेव्हीव्हला लॉर्ड पर्शोरच्या वतीने मी लिहिलेलं, बिच्चारा पर्शोर, माझा निर्बुद्ध बालमित्र, गैरसमज होऊन रुसलेला माझ्यावर ,त्याच्या जेनेव्हीव्हवर मी मरतोय असं वाटून.
आता ही वेळ जेनेव्हीव्ह या विषयावर लिहायची आहे का जीव्हज, ती मॅड पोरगी किती का सुंदर असेना , मला दहशतच वाटायची तिची .सतत मला सुधारायच्या मागे होती ना ती माझी बौद्धिक प्रगती व्हावी म्हणून. माझ्या बुद्धीवर कसले रे दगड पडलेत जीव्हज, ते इतकं मोठं स्क्रिप्चर्सचं बक्षिस उगीच का मिळवलं होतं मी शाळेत ? असो जीव्हज, पत्र वाचताना तू किंचित हसल्याचा का भास झाला मला? सवयीनेच वाटतं.
तर ते प्रेमपत्र पूर्ण झाल्यावर मी जेनेव्हीव्हला पोस्ट करणार होतो 'लॉर्ड पर्शोर' अशीच सही करून म्हणजे मला सुधारायचे विचार मागे पडले असते जेनेव्हीव्हच्या मठ्ठ डोक्यातून. तुझीच ना ही सुंदर कल्पना जीव्हज. पण हाय रे नशिबा ! मी प्रिमोनाच्या बेडरूममध्ये पाइपवरून चढून गेलो तेव्हा तर आधीच प्रिमोना ते वाचत बसली होती , कपाटातल्या माझ्या सूट्च्या खिशातून काढून. बरं दिसतं का हे असं वागणं मुलीच्या जातीला जीव्हज ? अन टवळी वर मला म्हणते की ‘’एव्हढा माझ्या प्रेमात पडला आहेस तर किती का बुद्दू असेनास, मी लग्न करायला तयार आहे तुझ्याशी पण अशी निनावी प्रेमपत्रं मूर्खासारखी लिहू नकोस , काय तर म्हणे माझ्या डोळ्यात चांदण्या चमकताहेत अन केसात चंद्रकिरण ! मी तिरळी आहे की म्हातारी असं लिहायला ? अन रात्रीअपरात्री पाइपवरून चढून यायचं रिस्क नको घेऊस स्वीटहार्ट ! तुझा पाय मोडला तर कसं व्हायचं आपलं? आधीच मेंदू बराच अधू आहे तुझा असं अगाथाआँटी म्हणतच असते. उद्याच सांगून टाकते तिला आमचं ठरतंय म्हणून ! यू मे किस मी लव्ह !! ‘’
जीव्हज, पाणी झालं रे माझं त्या संकटात. अशा कित्येक कमनीय संकटांमधून आजवर सोडवलंस मला , पण तिथे अगदी एकटा होतो मी अगाथामावशीच्या घरी, तू जवळपास नाहीस ,अब्रूवर ही नवी बला आलेली. बरं स्त्रीदाक्षिण्यामुळे आम्हा वूस्टरांना अशा वेळी सरळ नाही म्हणणं किती जड जातं माहितीय तुला. पण मागच्या एका प्रकरणात तू दिलेला सल्ला आठवला अन गुडघ्यावर बसून तिच्या हाताचा किस घेऊन वेळ साजरी केली.
सकाळ उगवताच तुला पुन: फोन लावला तेव्हा तूच ना ती योजना बनवलीस प्रिमोनाच्या दिशेने अगाथामावशीचा पुतण्या फ्रेडेरिकला उचकवायची अन अलगद माघार घेतल्यासारखं दाखवून थेट न्यूयॉर्कला पळ काढायची ! सुटलो गड्या, पण हाडं खिळखिळी झाली रे. कसली ही गुंतागुंत ब्रह्मचार्याच्या जीवनाची.
विषयांतर झालं जीव्हज, पण तुझ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटली अघळपघळ शब्दात . पत्रातच शक्य होतं हे !
आणि आता इथे तरी न्यूयॉर्कच्या माझ्या काकांच्या रिकाम्या फ्लॅटवर निवांत सुट्टी साजरी करेन म्हटलं ,तर ही मेबल कुठून रे कडमडली याच फ्लॅटवर याच वेळी. काकांच्या वारलेल्या बायकोच्या भावाची मुलगी . तिने आधीच बुक केला होता म्हणे फ्लॅट काकांच्या सेक्रेटरीला सांगून , मीच मध्येच उपटलो असं म्हणून बया इथेच ठाण देऊन राहिलीय.
आता हे का इंग्लिश कंट्रीसाइड मॅनोर आहे एकाच वेळी दोन पाहुणे अन तेही एक तरुण स्त्री अन पुरुष रहायला ? पण ही निर्लज्ज कारटी हटतच नाही ! ‘’त्यात काय आहे , हल्ली बरंच काय काय चालतं अमेरिकेत , आपण तर नुसतं एकत्र रहाणारोत’’ म्हणते.
माझी प्रायव्हसी अन मनःशांतीही नष्ट झालीय जीव्हज या संकटपरंपरेमुळे, आता तूच ये रे इकडे पुढच्या फ्लाइटने रजा आवरती घेऊन, माझं काही खरं नाही बघ या वेळी. काय मासे खायचे असतील ते इथेही मिळतील खायला, मी बघून ठेवलीत ठिकाणं तुझ्यासाठी.
तुझा मालक,
बर्ट्राम वूस्टर
२.
अभिवादन प्रिय मालक ,
तुमचं पत्र मिळालं तेव्हा इकडे माझ्या रजेच्या काळात आमच्या ज्यूनियर गेनीमेड बट्लर्स क्लबच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या धामधुमीत होतो. फोनच लावायचा होता मालक ! जीव घाबरा झाला की तुमचा फोन ठरलेला पण यावेळी पत्रावर भागवलंत तेव्हाच मला शंका आली की मेबल बाईसाहेबांबरोबर काकांच्या फ्लॅटवर रहाणं आतून हवंहवंसं वाटतंय तुम्हाला बहुधा. लवकर सुटका नकोच आहे.
वेडं वय असतं हे मालक ! माझ्या आधीच्या मालकांनाही मी हे समजून सांगितलं होतं, तुमच्याइतके समजूतदार नव्हते ते म्हणून तर त्यांना सोडून तुमच्याकडे आलो.एका आदर्श व्हॅलेचं कामच आहे मालकाच्या हिताची सर्वांगीण चिंता वहाणं. असो. तुमच्या हिताची चिंता वहाण्याचे सारांश मी इथे क्लब डायरीत लिहित असतो, टॉप कॉन्फिडेशियल मॅटर असतं सर, कुलुप किल्लीत ठेवलेलं अन फक्त क्लब मेंबर्सनाच वाचायला उपलब्ध असलेलं, काळजी नको, पण पानंच्या पानं भरली आहेत तुमच्या सेवेतील अनुभवांनी. क्लब मेंबर्स अगदी संमोहित होऊन वाचत असतात, चांगलं स्टडी मटेरियल आहे म्हणतात हे नवशिक्या व्हॅलेजसाठी, पण तुमच्यासारखे मालक अन माझ्यासारखा नोकर.. क्वचितच येतात असे योग .
तसा मी भारावतो क्वचितच सर, पण तुमच्या पत्रातल्या स्तुतीने जरा हललोच. तुमची सेवा हाच माझा आनंद सर. मी नेहमीच सेवेसी हजर आहे.
तर आता मेबल मॅडम ! मी मिळेल त्या फ्लाइटने येतोच आहे मालक, पण तीन-चार दिवस तरी लागतीलच इथल्या स्नेहसंमेलनातून बाहेर पडायला. मेबल बाईसाहेब कशा दिसतात, त्यांच्या आवडीनिवडी काय ते कमी लिहिलंत सर, फारच डिस्टर्ब्ड आहात की काही वेगळंच ? कळेलच.
मध्यंतरी,एक अगदी साधासा सल्ला, बाईसाहेब अत्याधुनिक मतांच्या आहेत हे कळलंच, तरीपण आतून रोमँटिक असतात बायका, काही खरं नसतं त्यांचं.दाखवतात तशा नसतात. तर बाईसाहेब रोमँटिक मूडमध्ये असतील तर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून न्यूयॉर्कच्या नाइट लाइफमध्ये बुडून जा मी येईपर्यंत ,म्हणजे त्या तुमचा तिटकारा करू लागतील, अन जर त्या खरंच मुक्त वादळी व्यक्तिमत्वाच्या असल्या तर तुम्ही शांत कंट्री लाइफचा पुरस्कार करा चहा पिता पिता अन घराबाहेर फारसे पडू नका म्हणजे सुरक्षित रहाल.
मी तिथे नाहीच आहे तर वाटेल त्या शर्टवर वाट्टेल तो टाय लावा - नक्की चुका कराल अन बाईसाहेबांचे मार्क्स आणि गुड बुक्स दोन्ही गमावाल , खात्री आहे मला.
अन तेवढं संधीप्रकाशात बाईंबरोबर लाँग ड्राइव्हवर किंवा लाँग वॉकवर जाणं टाळाच. किती प्रकरणात फसता फसता वाचवलं मी तुम्हाला असले बेसुमार धोके घेतलेत तेव्हा.
शुभेच्छा सर, नक्की काळजी घ्याल, नाहीतर मी आहेच ना तुमची काळजी घ्यायला.येतो लवकरच. स्वातंत्र्यासारखं काहीच नाही माणसाच्या जीवनात.कवी आणि तत्त्वज्ञ तरी दुसरं काय सांगतात !
तुमचा नम्र,
जीव्हज.
अय्या! हे कोण आहेत
अय्या!
हे कोण आहेत दोघे?
लिहिलं मस्त आहेस पण मला लिंकच नाही लागली
वूस्टरचे पत्र जितके मजेशीर
वूस्टरचे पत्र जितके मजेशीर आपुलकीने भरलेले भारलेले तितकेच त्यांच्याशी सदैव नम्रतेने वागणार्या जीव्हजचे उत्तरही तितकेच वाचनीय. कंट्री लाईफचा उपयोग करा असा सल्ला देणारा जीव्हज म्हणजे मालकाची हरेक प्रकारे काळजी घेणारे पात्र. वूडहाऊसने चितारलेली ही दोन्ही पात्रे 'पत्र सांगते...." गटासाठी निवडून आपल्या कल्पकतेची चुणूक दाखविणार्या जिगिषा यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
तुमचे टंकलेखनही अगदी अचूक असेच आहे....त्यामुळे सारी इंग्रजी नावे व स्थळे वाचताना अजिबात अडखळले नाही.
@ रिया : इंग्रजीतील एक दमदार लेखक पी.जी.वूडहाऊस {ज्यांच्या लिखाणावर आपले पु.ल.देशपांडे...आणि अनेक साहित्यिक...अगदी जीव ओवाळून टाकत} यांच्या कथांतील बर्टी वूस्टर आणि जीव्हज ही दोन पात्रे होत. ही जोडी गेले शतक सार्या जगात लोकप्रिय आहेत.
अशोक पाटील
जिगिषा, पात्रनिवड आवडलीच पण
जिगिषा, पात्रनिवड आवडलीच
पण ऑनरियाचा उल्लेख आला असता तर आणखी आवडलं असतं, जेनेवीव्हपेक्षाही आणखी 'भीतीदायक' प्रकरण आहे ते (आणि तिचे वडील)
अर्र्र्र्र्र मी वाचलंच
अर्र्र्र्र्र
मी वाचलंच नाहीये
कित्ती मठ्ठ आहे मी
रिया, आता वाचून बघ ना!
रिया, आता वाचून बघ ना!
वाचलं नाहिस म्हणजे मठ्ठं
वाचलं नाहिस म्हणजे मठ्ठं नाहीस, एवढं कळल्यावर अजून वाचायला घेतलं नाहीस तर म्हणेन एकवेळ!
जिगिषा, मस्तं पत्रं आहेत दोन्ही.
जीव्हजचं उत्तर तर अगदी खुसखुशीत.
जियो.
मस्त.
मस्त.
"....कित्ती मठ्ठ आहे
"....कित्ती मठ्ठ आहे मी....|"
~ एक आठवण आली या वाक्यावरून. ज्या वुडहाऊसच्या लिखाणाबद्दल 'वाचले नाही...' असे तुम्ही लिहिले आहे तोच वुडहाऊस ज्यावेळी नाझी जर्मनांच्या बंदीखान्यात हाल भोगत होता आणि त्याच्या मायदेशात इंग्लंडमध्ये त्याच्याविरूध्द त्याच्या जर्मनधार्जिणेपणाबद्दल बीबीसीवरून गरळ ओकले जात होते...त्याचा काहीही दोष नसताना. म्हणून बीबीसीच्या मठ्ठपणाबद्दल अगदी रूडयार्ड किप्लिंग, आगाथा ख्रिस्ती, जॉर्ज ऑरवेल, माल्कम मगरिज आदी दिग्गजांनी लेखण्या सरसावल्या होत्या. पण वुडहाऊसला अगदी जर्मनीच्या कुप्रसिद्ध अशा कॉन्सेट्रेशन कॅम्पमध्येही बंदिस्त करण्यात आले होते.
असो...काहीसे विषयांतर झाले....पण जिगिषा यांच्या लेखाने ह्या आठवणीही जागृत झाल्या.
आता वाचेन मग हे पत्रही
आता वाचेन
मग हे पत्रही पुन्हा वाचेन आणि मग मला जास्त मज्जा घेता येईल
साती
व्वा जिगिषा, अगदी आवडत्या
व्वा जिगिषा, अगदी आवडत्या जोडीवर बेतलीस पत्रं. मजा आली.प्रतिसादही मस्त आहेत वूडहाऊस भगतांचे.खरा निर्मळ विनोद वाचायला मिळणं खूप गरजेचं आहे या क्रूर जगात अन तो दुर्मिळच असतो म्हणून तर पी.जी.वुडहाऊस अनिर्बंध सत्ता गाजवत रहातात इतक्या वर्षांनंतरही. शिवाय अशोकजींनी म्हटल्याप्रमाणे नाझी छळछावणीत हाल भोगूनही आपल्या विनोदबुद्धीवर एक चुणीही पडू न देणारे
वुडहाऊस एखाद्या संतासारखेच श्रेष्ठ वाटतात.
आवडलं
आवडलं
छान !
छान !
मस्त.
मस्त.
आभार सर्वांचे !
आभार सर्वांचे ! गणेशोत्सवाच्या निमित्ताने माझ्या अन आपल्या सर्वांच्याच आवडत्या महान लेखकाला ही एक लहानशी सलामी द्यावीशी वाटली .
यातली मूळ नावं सोडता प्रसंग तसे काल्पनिक असले तरी वुडहाऊसने निर्माण केलेल्या नेव्हरलँड्मध्ये असले अगणित वैचित्र्यपूर्ण प्रसंग उद्भवत असतातच.त्यांचं हे रँडम मिश्रण.ते अद्भुत भाषा-संस्कृतीवैचित्र्य मात्र मुळातच अनुभवावं लागतं.
वरदा , तुमच्या सूचनेनुसार बदल केला आहे ( तो जास्त प्रचलित असला तरी विकीपीडियावर व्हॅलेट हाही उच्चार आहेच ).ऑनरिया ग्लॉसप अन अशा किती सुंदरींनी बर्टी वूस्टरवर आणलेल्या गोड भीतीदायक आफतींमुळे भारतींनी वर म्हटल्याप्रमाणे आपल्या क्रूर जगातले खरेखुरे भय , जे संपतच नाही, आपल्याला सुसह्य झाले आहे.
अशोक, तुम्ही दिलेली माहिती नवीन लोकांसाठी खूप उपयुक्त. जगाचे 'वुडहाऊस वाचणारे आणि 'न वाचणारे' असे दोन भाग करणार्या चाह्त्याची आठवण या वेळी येते आहे. रिया सारखं कुणी नव्याने वुडहाऊस वाचायला उद्युक्त झालं या पत्रांनी तर अजून काय हवं !
आवडले
आवडले
सुंदर! खूप
सुंदर! खूप आवडलं!
>>स्वातंत्र्यासारखं काहीच नाही माणसाच्या जीवनात
स्वत:शी पुटपुटल्यासारखं लिहिताना, जीव्हजला हे मालकांपर्यंत पोचवायची संधी एरवी कधी मिळाली नसती.
कल्पक. आवडलं.
कल्पक. आवडलं.
मस्तच. अगदी वेगळी जोडी
मस्तच. अगदी वेगळी जोडी निवडली.
आवडले, मी पण अजून नाही वाचलं
आवडले, मी पण अजून नाही वाचलं वुडहाऊस. उत्सुकता वाटतेय :). धन्यवाद!
रिया मी पण आहे तुझ्या लायनीत.
रिया मी पण आहे तुझ्या लायनीत. आता वाचायला घ्यावं.
मी काही धड वाचू नाही शकले
मी काही धड वाचू नाही शकले बुवा पीजी वुडहाउस.. कुठल्या ठराविक पुस्तकाने सुरवात करावी की कुठलेही उचलून वाचले तरी चालेल? परत एकदा ट्राय करीन.
जिगिषा पत्र छानच असणारे. पण मला नीट लिंक्स लागल्या नाहीत.
आभार सर्व प्रतिसादकांचे
आभार सर्व प्रतिसादकांचे
माधवी, शुम्पी, बस्के, कुठूनही सुरुवात करू शकता, पण जीव्हज प्रथम बर्ट्रामकडे नोकरीसाठी आला तो प्रसंग Carry on Jeeves मध्ये प्रथम आलाय ( हा कथासंग्रह आहे, इतर बर्याच छोट्या कादंबर्या आहेत या जोडीवरच्या ), जरी त्याहून अधिक हिलेरियस असे अनेक संग्रह आहेत.
वुडहाउसची जीव्हज -बर्ट्राम सोडून इतरही पात्रं, त्यांची जगं , त्यावरची पुस्तकं आहेत. तो बहुप्रसव लेखक होता अन दीर्घायुषीही.
एखाद्या जुन्या मुरलेल्या इरसाल ग्रूपमध्ये जसं आपल्याला सुरुवातीला बिचकल्यासारखं वाटतं तसं वाटू शकतं नव्याने वाचताना, त्यावर मात करून पुढे गेल्यास एक आनंदनिधान गवसतं वुडहाऊसच्या निर्विष जगाचं.
अतिशयोक्ती नाही, निराश मनस्थितीवर उतारा नाही वुडहाऊसच्या पुस्तकात रमण्यासारखा.
जिगिषा+१ थोडा पेशन्स ठेवायचा.
जिगिषा+१
थोडा पेशन्स ठेवायचा. पहिल्यांदाच सगळी पात्रं, त्यांचे सगळी आपसातले संबंध, पूर्वीच्या घटनांचे रेफरन्सेस लक्षात येतातच असं नाही. दोनतीन पुस्तकं वाचल्यावर मात्र त्या (इरसाल) जगातलेच आपण एक होऊन जातो.
त्याच्या विनोदाची जातकुळी अस्सल ब्रिटिश आहे, अंडरस्टेटमेन्ट्समधून हसवायची - त्याचा सराव व्हायलाही किंचित वेळ लागतो. पण एकदा वुडहाऊसप्रेमी झालात की मग त्याच्यासारखा लेखक नाही - अगदी खरंखुरं आनंदनिधान...
अगाथा ख्रिस्तीने एक मर्डरमिस्टरी वुडहाऊस च्या शैलीची, पात्ररचनेची 'नक्कल' करून लिहिली आहे (आत्ता नाव आठवत नाहीये) - ते दोघे एकमेकांचे फार मोठे चाहते होते - तीपण जरूर वाचा.
आवड्लं.. मी पण नाही वाचलं
आवड्लं.. मी पण नाही वाचलं वुडहाऊस अजुन.. करेन सुरुवात
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.
पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383
वरदा , >>अगाथा ख्रिस्तीने एक
वरदा ,
>>अगाथा ख्रिस्तीने एक मर्डरमिस्टरी वुडहाऊस च्या शैलीची, पात्ररचनेची 'नक्कल' करून लिहिली आहे (आत्ता नाव आठवत नाहीये) - ते दोघे एकमेकांचे फार मोठे चाहते होते - तीपण जरूर वाचा.>>
कोणती ती ? शोधूनही मिळाली नाही. आठवलं तर अवश्य सांगा.
आभार संयोजक , या स्पर्धेच्या निमित्ताने पत्र या माध्यमाकडे लक्ष वेधल्याबद्दल.मला नेहमीच असं वाटत आलं होतं की या माध्यमाचा वापर विनोद अन रोमान्स या दोन्ही परिणामांसाठी खूप छान करता येईल.अजून एखादी पत्र जोडी लिहायचीही तयारी होती.
मतं अगदीच कमी पडलेली दिसताहेत मला :), मी नवीन असल्यानेही असेल, पण ही स्पर्धा अन हे प्रतिसाद चोखंदळ वाटले मला,त्यासाठी सर्वांचे आभार. विजेत्यांचे आधीच अभिनंदन.जे आघाडीवर आहेत त्यांनी खूप छान लिहिलेय.
खुसखुशीत. जीव्हजचं उत्तर
खुसखुशीत.
जीव्हजचं उत्तर जास्त आवडलं !
कसं काय मिस केलं हे लिखाण? एक
कसं काय मिस केलं हे लिखाण? एक मत चुकलं याची चुटपुट लागली आहे.
अत्यंत जिव्हाळ्याची पात्रं आहेत ही माझ्या. वीस वर्षांपासून वुडहाउसची पुस्तकं भाव विश्वाचा अविभाज्य भाग झाली आहेत. मुंबई, दिल्ली, कोल्हापूरचा जुना बाजार, नंतर देशाविदेशातील उत्तम पुस्तक दुकाने आणि हल्ली फ्लिपकार्ट यांच्या माध्यमातून जवळजवळ पूर्ण वुडहाऊस कपाटात नांदतोय.
बर्टी आणि जीव्ह्ज यांचा टोन मस्त सांभाळलाय तुम्ही. 'गॅनीमीड', टाय यांचे संदर्भ एकदम चपखल.
वुडहाऊसचा मला वाटणारा सर्वात लोभस पैलू म्हणजे त्याचं अफाट वाचन. तत्त्वज्ञान, पश्चिमी धर्मशास्त्र, इतिहास, शेक्सपीअर, प्राचीन व आधुनिक कवी - लेखक या सर्व विषयांत त्याला प्रभुत्त्व होते. त्यांचे अनेक संदर्भ लिखाणातून अगदी अनपेक्षित जागी येतात. या सर्वांचा - खासकरून शेक्सपीअरच्या अनेक अवतरणांचा - त्याने विनोदी संदर्भात (कुचेष्टेने नव्हे!) सढळ उपयोग केला. हे सर्व वाचून मूळ लिखाण वाचायचीही इच्छा होते आणि वाचल्यावर वुडहाऊसची वाक्ये अधिक चांगली समजतात. केवळ वुडहाऊसमुळे बर्न्स, हेरीक, लाँगफेलो, टेनीसन इत्यादी कवी आणि समग्र शेक्सपीअर वाचला गेला, आणि वुडहाऊसवरील प्रेम अधिक दृढ होत गेले.
अशोकजींनी पुलंचा उल्लेख केलाच आहे. पुलंच्या लिखाणाची जातकुळीही बरीच वुडहाउससारखी आहे, फक्त त्यांनी कादंबर्या न लिहिता विनोदी लेख, व्यक्तिचित्रणाला पसंती दिली. पुलंच्या लिखाणातही ज्ञानेश्वर, संगीत नाटकांतील पदे, कवितांच्या ओळी यांचे विपुल संदर्भ येतात.
पुलंनी वुडहाऊसला श्रद्धांजली म्हणून लिहिलेला एक सुरेख हृदयस्पर्शी लेख 'स्थानबद्ध वुडहाऊस' मैत्र मध्ये आहे. वुडहाऊस वाचायला सुरुवात करण्यासाठी त्याहून चांगला पर्याय नसावा.
लेडी शेलॉट आणि आता वुडहाऊस...जिगिषा हॅट्स ऑफ टू यू.
अमेय.... जिगिषा यांची
अमेय....
जिगिषा यांची कल्पनाशक्ती जितकी आवडली तितकाच तुमचा वरील प्रतिसाद. एक मत चुकलं याची चुटपूट तुम्हाला का आणि किती लागली असेल याचा मी अंदाज बांधू शकतो. तसे असले तरी घसघशीत प्रतिसाद तुम्ही दिला आहे, त्यात सर्व काही आले
....इंग्रजीत जसे म्हटले जाते.... बेटर लेट दॅन नेव्हर.
अमेय, >>वुडहाऊसचा मला वाटणारा
अमेय,
>>वुडहाऊसचा मला वाटणारा सर्वात लोभस पैलू म्हणजे त्याचं अफाट वाचन. तत्त्वज्ञान, पश्चिमी धर्मशास्त्र, इतिहास, शेक्सपीअर, प्राचीन व आधुनिक कवी - लेखक या सर्व विषयांत त्याला प्रभुत्व होते. त्यांचे अनेक संदर्भ लिखाणातून अगदी अनपेक्षित जागी येतात. या सर्वांचा - खासकरून शेक्सपीअरच्या अनेक अवतरणांचा - त्याने विनोदी संदर्भात (कुचेष्टेने नव्हे!) सढळ उपयोग केला. हे सर्व वाचून मूळ लिखाण वाचायचीही इच्छा होते आणि वाचल्यावर वुडहाऊसची वाक्ये अधिक चांगली समजतात. केवळ वुडहाऊसमुळे बर्न्स, हेरीक, लाँगफेलो, टेनीसन इत्यादी कवी आणि समग्र शेक्सपीअर वाचला गेला, आणि वुडहाऊसवरील प्रेम अधिक दृढ होत गेले >>
अगदी अगदी. जीव्हजने सढळपणे केलेली तत्वज्ञान अन कवितेतील अवतरणांची पेरणी अन त्याची बर्टी वूस्टरकृत भ्रष्ट नक्कल ही कसली भन्नाट विनोदनिर्मिती आहे ! पु.ल. हा वेगळाच विषय , साम्य-भेदस्थळेही पुष्कळ. त्यांच्यामुळेच वुडहाऊसचे व्यसन जडले..
तुमच्यासारख्या अस्सल वुडहाऊसप्रेमींची ही अशी येथे व्यक्त झालेली मते स्पर्धेतल्या मतांपेक्षा मोलाची आहेत , धन्यवाद.