औरंगजेब - परीक्षण

Submitted by फारएण्ड on 26 August, 2013 - 01:14

"औरंगजेब" हा मध्यंतरी येउन गेलेला चित्रपट नुकताच पाहिला. त्याचे थोडक्यात परीक्षण. काही काही गोष्टी स्वतः थेट बघितल्यास जास्त परीणामकारक होतील म्हणून जास्त येथे लिहीत नाही.

पहिल्या पाच मिनीटांत या चित्रपटाने जे खिळवून ठेवले ते शेवटपर्यंत सोडले नाही. दोन मिनीटे उठताना सुद्धा "पॉज" करून उठावे लागणे हे हिन्दी चित्रपटांच्या बाबतीत फार कॉमन नाही. मात्र यात, त्यातही सुरूवातीला, तुम्ही नीट लक्ष दिले नाहीत तर महत्त्वाचे क्लूज निसटतील. अत्यंत लक्ष देऊन पाहण्याचा चित्रपट आहे हा.

इण्ट्रोला असलेल्यांपैकी दोन जण सुरूवातीला सारखेच दिसल्याने फार गोंधळ झाला. मग पुन्हा मागे जाऊन सर्व कलाकारांची ओळख करून घेतली. तसे इतरांचे होऊ नये म्हणून ही थोडक्यात माहिती:
ऋषी कपूर: डीसीपी रविकांत फोगात
पृथ्वीराज सुकुमारनः एसीपी आर्य फोगात. ऋषी कपूरचा पुतण्या.
सिकंदर बेरी (खेर): देव. ऋषी कपूरचा मुलगा.
अनुपम खेरः विजयकांत फोगात. आर्य त्याचा मुलगा.
सुमीत व्यासः विष्णू. ऋषी कपूरचा जावई
जॅकी श्रॉफः यशवर्धन. गँगस्टर्/माफिया
अर्जुन कपूरः अजय आणि विशाल. जॅकीची जुळी मुले.
अमृता सिंगः नीना. डीलमेकर, जॅकी बरोबर काम करणारी
तन्वी आजमी: जॅकी ची त्याला सोडलेली बायको. यापेक्षा आणखी माहिती न देणे योग्य.

रविकांत, देव व आर्य हे पोलिसखात्याच्या भ्रष्ट पैशाच्या चेन मधले लोक. विष्णू हा इमानदार असल्याने यापासून त्याला लांब ठेवलेला. अनुपम खेरही मूळचा पोलिस ऑफिसर पण जॅकीचे एनकाउंटर करण्याच्या वेळेस गडबड झाल्याने नोकरी गेलेला. मरायच्या आधी तो आर्यला सांगतो की त्याच्या जीवनात आणखी एक स्त्री व मुलगा आहे. त्याच्या पश्चात त्यांची जबाबदारी आर्यवर आहे. त्यानंतर तो मेल्यावर आर्य त्यांना भेटायला जातो व तेथून जे नाट्य सुरू होते ते शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवते.

सर्वांची कामे जबरदस्त झाली आहेत. अगदी अमृता सिंगचे सुद्धा. ऋषी कपूरतर आजकाल पूर्ण कात टाकूनच आलेला आहे. सर्वात जबरी वाटतो तो यात. त्याचा "Menace" दाखवण्याकरिता की काय पण मान थोडी समोर झुकवून बोलण्याची पद्धत फार परिणामकारकरीत्या वापरली आहे यात त्याने.

खरा हीरो अर्जुन कपूर आहे आणि त्याने काम चांगले केले आहे. थोडा डोक्यात जातो तो, पण एकूण ठीक. अशा रोलच्या मानाने आवाज नाजूक वाटतो त्याचा. जॅकीचा ही रोल मस्त आहे. पृथ्वीराज सुकुमारन हा मल्याळम चित्रपटांत बरीच वर्षे आहे अशी वेब वर माहिती मिळाली. त्याचा रोल मध्यवर्ती आहे यात, त्यानेही चांगले काम केलेले आहे.

गाणी बरीचशी पळवल्याने कळाली नाहीत. पटकथा एकदम सुरेख लिहीलेली वाटते. कथेतील प्रसंग व कलाकार त्यांच्या भूमिकेतून तेथे कसे वागतील याबद्दल खूप विचार करून लिहीलेली असावी. गुन्हेगारीवरचे असे चित्रपट पाहताना नकळत आपण गॉडफादरशी किंवा गाय रिचीच्या चित्रपटांशी(***) काही लिन्क लागते का असे शोधतो, पण हा चित्रपट तेथेही आपल्याला 'पकडू' देत नाही. शेवटी एका मीटिंग मधल्या रेडच्या वेळचा सीन हा फक्त अपवाद (तो गाय रिचीच्या चित्रपटात सहज खपेल). औरंगजेब नावाचा संदर्भ नंतर येतो, तो ही चपखल आहे.

एकूण माझ्याकडून १००% रेकमेण्डेशन. नक्की पाहा. पाहताना पूर्ण लक्ष देऊन पाहा. जबरदस्त थ्रिलर आहे.

(***) गाय रिची म्हणजे Lock Stock and Two Smoking Barrels सारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक. या चित्रपटावरून आपल्याकडे हेरा फेरी-२ काढला होता. आपला कमीने सुद्धा याच दिग्दर्शकाच्या धाटणीचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सुद्धा एकदा बघायला घेतला होता पण काही समजेचना मग बंद करून टाकला. पेपरमधेही मी चांगला सिनेमा आहे असे परिक्षण वाचले होते. बघेन आता Happy

<<आईना मधे बहुधा तिने चांगले काम केल्याचे ऐकले होते. पण जास्त माहिती नाही.>>

अमृता सिंगचा सर्वात चांगला रोल 'प्य्रार का साया' मधील मांत्रिककीणीचा म्हणता येईल. धमाल केली होती तिने. मूळ 'घोस्ट' मधल्या 'व्हूपी गोल्डबर्ग' इतकीच!

औरंगजेब बघितला .. आवडला ..

ती त्यातली "गर्लफ्रेण्ड" होती ती सलमा आगा ची मुलगी का? ती फारेण्डच्या डोक्यात का गेली? म्हणजे डोक्यात जाण्याएव्हढं ही काम नव्हतं तिला ..

सगळे फार म्हातारे दिसतात त्यात (जॅकी, अनुपम खेर, तन्वी आझमी, अमृता सिंग) .. पण कोणाचंच काम एक्सेप्शनल वगैरे नाही वाटलं ..

अमृता सिंग चा अभिनय ' नाम' ,चमेली कि शादी, साहेब , प्यार का साया , (बॉबी देओलच्या )भगतसिंग च्या आईचा रोल आणि 'दस कहानिया 'मधल्या मेघना गुलझार नी डिरेक्ट केलेल्या 'पूरणमासी' गोष्टीत खूप आव्डला !
ती पूरणमासी गोष्ट पण छान आहे , जुन्या टी व्ही शो ' कथासागर' मधे शोभली असती ( अमृता प्रीतम ची आहे का ओरिजनल ??)

बघणार वीकेन्ड ला. ऋषी कपूर हल्ली मस्त रोल्स मधे दिसतो. त्या अग्निपथ मधे रौफ लाला ला पाहिले तर विश्वासही बसणार नाही हा मनुष्य आयुष्यभर गोड गोड हीरोचे रोल्स करत होता म्हणून!

ऋषी कपूरला जरा उशीरानेच तो स्वतः गवसला आहे >> हे पुन्हा एकदा पटले जेव्हा काल डी- डे बघितला. अ प्र ती म अभिनय. लोक हो नक्की बघा. ऋषी कपूर, इरफान खान, अर्जुन रामपाल आणि हुमा कुरेशी आणि अजुन एक कलाकार (नाव माहीत नाही) यांची अ‍ॅक्टींग मस्तच.

प्रचंड अनुमोदन, एक नंबर सिनेमा आहे.
मला पृथ्वीराजचे काम लई मंजे लईच आवडले. ऋषी कपूर सॉलीड फॉर्मात आहेच.
आणि हो च की शा पहाच!

मलाही आवडला होता हा सिनेमा. नावावरून विशेष अपेक्षा नव्हत्या, पण सरप्राइजिंगली चांगला निघाला.

हे वाचलं होतं, त्यामुळे परवा आठवणीने पाहिला 'औरंगजेब' ... आवडला.
एकही संवाद मिस होऊ देता कामा नये हा सिनेमा पाहताना. (असे लक्षपूर्वक पहावे लागणारे सिनेमे, इन जनरल, आवडतात मला.)
एसीपी आर्यची भूमिका करणारा अभिनेता दाक्षिणात्य आहे हे माहिती नव्हतं. (इथे वाचलेलं होतं, पण सिनेमा पाहताना लक्षात नव्हतं. त्याचा आवाज भारी आहे! की कुणी डबिंग केलं आहे त्याच्यासाठी? कारण हिंदी उच्चार व्यवस्थित वाटले.)

ऋषी कपूर तर काय, माझा अत्यंत आवडता अभिनेता आहेच.

ती गर्लफ्रेण्ड मला नाही आवडली. अभिनयाच्या नावानं आनंद होता. अर्थात, सिनेमात तिनं जे काही, जसं काही केलंय, त्यासाठीच तिला घेतलं गेलं हे उघड आहे. अभिनय गेला तेल लावत!

ती सलमा आगा ची मुलगी आहे...... आणि तुम्हाला तिच्या बद्दल वाटतय ते मलाही वाटलेलं... Wink

फा आणि मै दोघांनी चांगले रिव्ह्युज लिहिले म्हणून बघितला. मस्त चित्रपट आहे.

परीक्षण आवडले.

मी या वीकेन्डाला बघितला. आवडलाच. एकदम इन्टरेस्टिंग सिनेमा. ऋषी कपूर फार सही!
ती सलमा आगाची मुलगी होती होय, कळलेच नाही. तिचा रोल तसा महत्त्वाचा नव्हता.

फारेन्ड चमेली कि शादी नाही पहिला!!! हे तर "ये पीएसपीओ" नही जानता सारख झाल. मी जवळपास ८-१० वेळा पाहिला आहे मग मोजणे थांबवल.
बाकी औरंगझेब सिनेमा पाहून माझा टेक-होम
अ. "बादशाहत" असा शब्द असतो हे कळले.
ब. अमृतासिंग आता सैफला जास्त शोभते. ह्यात तिच्या रूपाबद्दल आणि त्याच्या अभिनयाबद्दल सगळ आल.
क. साशा आगा वरून ह्या सिनेमात स्त्रियांना ३०% आरक्षण दिले ह्याची खात्री पटली. स्वरा भास्कर व दीप्ती नवल ह्या खुल्या (अनारक्षित) जागांमधून सिनेमात प्रविष्ट झाल्या.
द. अजय आणि विशाल हि अजय देवगणने वापरलेली नावे! राहुल - प्रेम- विजय म्हणल्यावर कोण कोण डोळ्यासमोर येत? सबब अजय देवगणची "रील नेम" वापरून समोर अर्जुन कपूर दाखवणे हा प्रोड्युसरने केलेला विश्वासघात आहे.
इ. रिशी कपूर - वक्त ने किया क्या हसी सितम!!

मस्ट मस्ट मस्ट वॉच. नेटफिल्क्स स्ट्रिमिंगवर पाहिला. गाणी पळवली.
बरेच दिवसांनी एका जागी खिळून आणि हातातली फोन इ. गॅजेट्स बाजुला ठेऊन हिंदी सिनेमा पाहिला.

फारएण्ड यांच्या संपुर्ण पोस्टला ++++++++++ Happy

चित्रपट आवडला. बरेच दिवस झाले पाहुन. अर्जुनकपूर ऐवजी कोणीतरी ताकदीचा (अभिनयात) अभिनेता हवा होता (तरुण) म्हणजे ती भुमिका फार छान झाली असती.

नावाने निराशा झाली होती प्रथम पण फारेण्डाचे (चपखल) परीक्षण वाचून आवर्जून पाहीला हा चित्रपट... वाक्य आणि वाक्याला दुजोरा... प्रचंड आणि प्रचंडच आवडला....
MUST WATCH MOVIE Happy
प्रत्येक संवाद कान देऊन ऐकण्यासारखा...
ऋषी कपूर - वक्त ने किया क्या हसी सितम!! >> +११११
अर्जुनकपूर ऐवजी कोणीतरी ताकदीचा (अभिनयात) अभिनेता हवा होता >> मला अर्जून (आतापर्यंतच्या पैकी) या एकमेव चित्रपटात फार्र आवडला..टू स्टेट्स पाहील्यावर तो हाच का असा प्रश्न पडलेला बराच वेळ म्हणजे चित्रपट संपल्यावरही Happy

Pages