माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - लेह लडाख - भाग ७

Submitted by केदार on 6 August, 2013 - 15:50

माझ्या मुळ प्लान मध्ये मी लेह एकदा सोडल्यावर परत येणार नव्हतो. तर मधील अनेक शॉर्टकटस आणि थोडे अवघड रस्ते घेऊन पुढे पँगाँग त्सो आणि मग तेथून मान, मेरेक त्सागा ला / काकासांगला ( जे की खरे हायस्ट मोटारेबल रोड इन द वल्ड आहेत) ते घेऊन पुढे त्सो मोरिरी आणि मग तेथूनच व्हाया त्सो कार, पँग ते मनाली असा होता.

मुळ प्लान.

Direct_route.JPG

आता प्रज्ञा नसल्यामुळे परत प्लान बदलला होताच आणि त्या ग्रूपला आकोमोडेट करत माझा प्लान सुरू ठेवणे भाग होते. तो ग्रूप टूरिस्टी सर्किट करणार होता. त्यामुळे त्यांच्याकडे हे सर्व परमिट तर नव्हतेच, पण अगदी त्सो मोरिरीचे परमिटही नव्हते. आम्ही लेहला वापस आलो तो दिवस शनवार होता. पण वापस येई पर्यंत DC ऑफिस बंद झाले होते आणि उद्या रविवार असल्यामुळे तसेही ते बंद असणार होते. मग त्सो मोरिरी ते करणार का नाही? ह्यावर प्रश्नच होता कारण परमिट असल्याशिवाय ते करता येणे शक्य नव्हते आणि काही ठरविणे त्यामुळे अवघड झाले. शिवाय त्यांचे मनाली पासूनचे परतीचे रिझर्वेशन पण होते त्यामुळे त्याच्या एक दिवस आधी तिथे पोचने त्यांना भाग होते.

मग मी एक सल्ला दिला की मी देखील पँगाँग एकच दिवस करेन आणि उद्या सोमवार असल्यामुळे वापस येऊ आणि सकाळी सकाळी परमिटचे पाहू. मिळाले तर ११ ला निघून ही त्सो मोरिरी पर्यंत संध्याकाळपर्यंत पोचू. जर ११ पर्यंत मिळाले नाही तर मी माझा एकटाच माझा ठरलेला पुढचा प्लान करेन. त्सो मोरिरीच्या मुळे त्यांनीही पँगाँगला राहण्याऐवजी माझ्यासोबत वापस येणे पसंत केले आणि आम्ही परत मग बाईक शोधायला बाहेर पडलो कारण आज ग्रूप मधील दोघांना थंडरबर्ड ५०० हवी होती. पण एक नवीन माहिती कळाली की जर तुम्हाला फक्त एकाच दिवसात पँगाँगला जाऊन यायचे असेल तर बाईक देणारे बाईक देत नाहीत. कारण पँगाँगला जाणारा माईटी चांग ला आणि तिथे असणार्‍या अनेक वॉटर क्रॉसिंग्स. त्यामुळे बाईक अनेकदा गरम होऊन बंद पडते. म्हणून ती लोकं एका दिवसासाठी पँगाँगला बाईक देत नाहीत. मग माझेही सामान हॉटेल मध्येच ठेवून आम्ही सर्व ७ ही जण चीत्यावर (रादर मध्ये) सवार झालो आणि निघालो.

आजचा राऊट.

Pangong_tso_map_0.JPG

लेह ते पँगाँग जाताना आपण लेह-मनाली रस्ता घेऊन कारू पर्यंत जायचे, तिथून डावीकडे वळून शक्तीच्या रस्त्यावर जायचे. रस्त्यावरच चेकपोस्ट आहे. तिथे आपले परमिट दाखवावे लागते. शक्तीवरून जाऊन (खरे नाव SARKTI) चांग ला च्या चढाईला प्रारंभ करायचा आणि टांगचेला उतरून पुढे लुकुंग कडे जायचे. लुकुंगला पँगाँग सुरू होतो. लेह नंतर कारू मध्ये एक पेट्रोल पंप आहे. जी लोकं मी वर लिहिल्यासारखे अवघड रस्त्याने जातात त्यांना नुब्रा नंतर कारू पर्यंत वापस येऊन ( मध्ये अवघड वारी ला आहे, जो मी रेड अ‍ॅरो ने दाखवला आहे.) पेट्रोल भरून पुढे जावे लागते कारण लेह ते नुब्रा ते पँगाँग ते त्सो मोरिरी ते मनाली ( टंडी पर्यंत पंप नाही) हा ८-९०० किमी पेक्षा जास्त प्रवास होतो.

पँगाँग त्सो हा १४२७२ फुट वा ४३५० मिटर्स वर आहे. एकुण लांबी १३४+ किमी आणि त्याचा अर्धा भाग हा चीन मध्ये आहे तर अर्धा आपल्याकडे. इतर तलावांसारखाच हा देखील खार्‍या पाण्याचा तलाव आहे. लेह पासून १५६ किमीवर असल्यमुळे इथे जायला साधारण ५ तास लागू शकतात. जर आपण लवकर निघालो तर एकाच दिवशी जाणे येणे करता येते. ९० टक्के लोकं एकाच दिवशी जाणे येणे करतात. राहण्यासाठी तिथे काही ' इको हटस" आहेत तर काही महागडे टेन्टस पण आहेत. बरेच लोक टांगचे ( स्पेलिंग Tangaste) इथेही राहने पसंत करतात पण हे ठिकाण ३५ किमी आहे. जर राहणार असला तर इको हटस मध्ये राहा कारण एकदम लेक समोरच दिसेल.

सकाळी मी थोडे लवकर उठून स्टोक कांगरीचे अर्लि मॉर्निग फोटोग्राफी करण्याचा प्रयत्न केला. पण समहाऊ तो तेवढा गोल्डन झाला नव्हता कारण आता बर्फ वितळत आहे. तरी मला पहिली फ्रेम आवडली. जास्त बिझी नाही.

चांग ला ची चढण लागण्या आधी शक्ती आहे. शक्ती मध्ये देखील हिरवाई आहे. आणि एक सुंदर मोनेस्टरी आहे.

चढताना दिसणारे शक्ती!

दिसत असलेल्या वॉटर बॉडीज ( पाण्याचा कलर अगदी निळा आहे)

आजचा रस्ता.

चांग ला पास हा १७६५० फुटांवर आहे. हा तुम्हाला शक्ती ते टांगचे मध्ये लागेल.

पण चांग ला ला मायटी चांगला का म्हणले जाते? तर ही चढण खूपच स्टिप आहे. चांग ला गाडी साठी अजिबातच चांगला नाही ये Happy येणारा प्रत्येक Z हा जास्त अवघड होत जातो ७० टक्के वेळा फर्स्ट मध्ये अन थोडावेळ २ न्ड मध्ये गाडी चालत ठेवावी लागते. मध्येच येणार्‍या गाड्यांमुळे एखादा ड्रायव्हर आपली गाडी अगदी दरीत घालू शकेल असा रस्ता!

इथे देखील लोकं उताविळ असतात. निवांत निसर्ग तेवढाच निवांतपणे बघत जाण्यापेक्षा प्यां प्यां करत जोरात जाणे काही लोकांना जास्त आवडते. माझ्या समोर एक ट्रक होता. मी त्याला एकच हॉर्न देऊन मला जागा दे असे सांगीतले आणि त्या पाठीमागे निवांत जात होतो तर माझ्या पाठीमागे एक टॅक्सी आली. तिचा ड्रायव्हर अन मधील लोकांना घाईची लागली असावी. त्यांनी मग त्या ट्रकला निदान १० हॉर्न दिले. तो ट्रक मध्ये थांबू शकत नव्हता कारण पूर्ण रस्ताच्या विथ्ड मधून केवळ एकच गाडी जाऊ शकत होती. मग आणखी १० हॉर्न दिले. मी वैतागून एका बाजूला घेऊन त्याला पूढे जाऊ दिले. मग मी मागे होऊन पुढची गंमत पाहू लागलो. ट्रक ड्रायव्हरला आणखी १० हॉर्न नंतर त्याला जागा दिली. कारण ती एक जागा साईड देण्यासाठी योग्य होती. तो ड्रायव्हर माझ्याकडेही हातवारे करून गेला होता ! पुढे चांगला टॉप वर आम्ही भेटलो. गाडीतून पाच सहा व्यक्ती उतरत होत्याच तितक्यात मी पण तिथे पोचलो आणि पार्क केली. तर ते सर्व माझ्याकडे आले. मी त्यांना विचारले की काय घाई होती? तर तो उतरला की मी आणि तो ट्रकवाला साईड न देऊन चुक करत होतो, साईड कशी चटकण थांबून द्यावी वगैरे वगैरे आणि असाच निरर्थक वाद घालत होता. माझी अशी सटकली की बास, मी त्याला म्हणालो, " ही माझ्या गाडीची चावी घ्या आणि गाडी चालवा, तिथे बाजूला बसून बॅक सीट ड्राईव्हिंग नका करू मग बघू कशी फाटेल ते!" तो नरमला आणि निघून गेला.

तर प्रतिक म्हणाला अरे हे टॅक्सीवाल्याचे वकील आहेत. पुढे तो दिसे पर्यंत आमच्या ग्रूप मधील सर्व (खास करून प्रतिक) त्याला काय वकिल भाऊ असेच बोलत होता!

लाँग स्टोरी शॉर्ट - आपल्याला घाईची लागली असली तरी माउंटेन्स मध्ये दुसर्‍याने रस्ता देण्याची वाट बघावी. आपल्या जोरदार हॉर्नबाजीने समोरचा पॅनिक होऊन देखील चूक करू शकतो.

अ‍ॅट युवर सर्व्हिस !

चांग ला उतरल्यावर तुम्ही अगदी वेगळ्याच भागात प्रवेश करता. इथे तुम्हाला सगळं वाळवटंमय आणि मीठमय दिसेल. अनेक वॉटर बॉडीज मध्ये जे बर्फासारखं पांढर दिसतेय ते आहे मीठ !

सॉल्ट डिपॉझिट्स

आणि त्यातील हिरवळीत चरणार्‍या मेंढ्या.

बायदवे ह्या मेंढ्यांची शी फार उपयोगी आहे. कारण तिने घर सारवले की घरातील उष्णता घरातच राहते. त्यामूळे गो मया सारखेच मेंढी मय इथे फारच महत्वाचे आहे.

उतरल्यावर लागणारा एक छोटा लेक.

आणि हे पहिले दर्शन !

आणखी १५ एक किमी नंतर आपण जिथे '३ इडियट' आणि 'रॅन्चो' रेस्टराँ आहे तिथे पोचतो. तिथेच सगळे टूरिस्ट थांबतात. इथे सगळ्याच रेस्तराँ मध्ये तुम्हाला अत्यंत टुकार जेवण मिळेल पण ते जस्ट पोटाची खळगी भरायची म्हणून खावे लागते. पण पर्याय नाही. चहा त्यातल्या त्यात बरा आहे.

पँगाँग लेक!

ह्या लेक मधूनच चायना आणि आपण अशी विभागणी होत असल्यामूळे (LAC) तिथेही मिल्ट्री प्रेझंस आहे आणि पेट्रोलिंग चालू असते.

ह्या पहिल्या जागेवरून काढलेले काही फोटो.

कितीही फोटो काढले तरी कमीच वाटतात. . त्यातले काही इथे दिले आहेत. बहुतांश लोक इथून वापस निघतात पण मी आमच्या ग्रूपला आणखी एक सरप्राईज देण्याचे ठरविले. इथून साधारण २ किमीवर पुढे जिथे थ्री इडियटचे शूटिंग झाले तो पॉंईट आहे. तिथे खूप कमी गर्दी असते.

हाच तो पाँईट ! आणि मला खूप आवडणारा हा फोटो !

तिथे बरेचसे सि गल पाण्यात मस्त खेळत होते.

द सायलेंट वन.

आणि तिथे उभा असणारा चीता !

आणि गायी Happy

होता होता ४ वाजत आले होते. परतिच्या प्रवासाची वेळ झाली होती. निघायचे म्हणून निघालो. येताना पुढे येण्याच्या नादात मी जिकडून इथे गाडी आणली त्या रस्त्यांकडे नीट लक्ष देऊन पाहिले नव्हते. तो रस्ता एनीवे नव्हतात. केवळ ट्रॅक्स होते. गाडी त्या ट्रॅकवर आणली आणि पाहिले तर काय? माय गॉड! सगळे ट्रॅक्स पाण्याने भरून गेले. तो दिवस अत्यंत उन्हाचा आणि क्लिअर होता आणि तसेही दुपार नंतर वॉटर क्रॉसिंग्स म्ध्ये पाणी भरायला लागते. पण लेक बघन्याच्या नादात गाडीचे विसरून गेलो ! जिकडे बघावे तिकडे वरच्या डोंगंर रांगामधून पाणी लेक कडे प्रचंड वेगाने धावत येत होते आणि आम्ही सात जण आता गाडी कशी
काढायची ह्याचा विचार करत होतो.

वॉटर क्रॉसिंग कशी करायची?

मग मी गाडी लावून बराच वेळ पाण्याच्या उतराचा शोध घेतला. तो घेणे क्रमप्राप्त आणि महत्वाचे असते कारण वॉटर क्रॉसिंग कशी करायची ह्याचे काही रुल्स आहेत. आधी ड्रायव्हरने उतरून रस्ता नीट बघावा, नेहमी पाण्यामधील दगडं हे गोल असल्यामुळे त्यावर ट्रॅक्शन अजिबात मिळत नाही. तर कुठे खड्डे आहेत आणि कुठून गाडी काढता येईल वरून पायी चालून बघावे. (मोठी क्रॉसिंग असेल तर) आणि रस्त्यातिल मोठे दगडं बाजूला करावेत (होत असतील तर) अन्यथा अण्डर बेली हिट होऊ शकते. आणि सर्वात महत्वाचे गाडी एकदा कुठून काढायची ते ठरले की गाडी पाण्यात घेतल्यावर अजिबात थांबवू नये. थांबले की संपलेच समजा. गाडीला वेग साधारण असावा आणि गाडी लोअर गिअर्स मध्ये शक्यतो पहिलाच किंवा दुसरा असावा. मध्येच गिअर चेंज करू नयेत.

कुठेही उतार दिसत नव्हता व वेगाने येणार्‍या पाण्यात गाडी घालून अडकवून घ्यायची नव्हती. मग मी उलट्या दिशेने प्रयत्न करण्यास सुरूवात केली. वर एक किमी चालत जाऊन कुठे पाणी आहे का? ते बघीतले, सुदैवाने वरच्या स्टिप चढावर पाण्यातून वाट मिळाली आणि गाडी मग मी स्टिप चढाच्या मार्गावरून आणन्यास प्रारंभ केला.

अडकलेली XUV

आणि ह्या फोटोतून नीट कळत नाही, पण रस्ता पाहा. तशी एक किमीची चढण मी चढलो आणि गाडी मुख्य रस्त्यावर आणली. हुश्श ! झाले एकदाचे.

नाही ! गाडी पुढे आणली तर मुख्य रस्त्यावर दोन फुट खोलीची आणि पाणी प्रचंड वेगात येणारी, २० एक फूट लांबीचा रस्ता पाण्याखाली घालणारी क्रॉसिंग ! आगीतून फुफाट्यात !

परत एकदा गाडीतून उतरलो, एकच पॉझिटिव्ह होते की ह्या क्रॉसिंग खाली अजिबात दगडं नव्हती तर सिमेंटनी बांधलेली क्रॉसिंग होती. हा व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगितला आणि नीट अंदाज घेऊन गाडी पाण्यत घातली. पाण्याच्या वेगामुळे ६-७ फुट पुढे गेल्यावर गाडी देखील दरीकडे (म्हणजे उजवीकडे) सरकली. पण " आल इज वेल" म्हणज गाडी पुढे काढली आणि क्रॉस झालो!

ह्या गडबडीत (म्हणजे क्रॉस झाल्याच्या आनंदात) प्रतिकने रेकॉर्ड झालेल्या व्हिडिओला थांबविन्यासाठी ऑफ बटन चुकून दाबले आणि तो सर्व व्हिडिओ डिलिट झाला. परत वॉटर करून ते रेकॉर्ड करावे का? असा विचार आला. पण तो लगेच सोडून दिला. रिस्पेक्ट द नेचर !

अजून ५ एक किमी पुढे आल्यावर अजून दुसरी क्रॉसिंग

आणि अजून एक .. आणि अजून एक

अश्या अनेक वॉटर क्रॉसिंग पार केल्या. Now you know, why it is called "mighty" Chang La!

दुपार नंतर हे बहुतेक ला क्रॉस करायला खूप अवघड पडतात कारण ह्या सर्वांमधून पाणी वाहत असते.

वापस यायला ८ एक वाजले होते आणि आम्ही आज निघून आलो ते किती चांगले हे उद्या सकाळी आम्हाला कळणार होते.

भाग एक
भाग दोन
भाग तीन
भाग चार
भाग पाच
भाग सहा
भाग सात
भाग आठ

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेह-लडाख वारी करावी तर तुझ्यासोबत असे वाटून राहीले आहे.. मस्तच.. खासकरुन पँगाँग लेक व पुढचा इतरांना फारसा माहीत नसलेला परिसर.. अगदी तळ ठोकून बसण्यासारखी जागा भासतेय..

वॉव! काय मस्त आलेत या भागातले फोटो. एकदम डोळ्यांना थंडगार वाटण्यासारखे. तुझा आवडता फोटो तर क्लासच आहे. नुस्ती निळाई!!

गेले चार दिवस घरात पाहुण्यांची गर्दी असल्याने इथे फिरकायला वेळ झाला नव्हता पण मनात सारखा 'ड्रायव्हिंग वॅकेशनचा' विचार येत होता. आत्ता ४-७ असे भाग एका दमात वाचले!

अ प्र ति म!
फोटो तर झकासच!

तुमच्या फॅमिलीला परत जावे लागल्याचे वाचुन जरा वाईटच वाटले! पण देअर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाईम!

पुढील भागांच्या प्रतिक्षेत!

तिथे लोकल लोक काय खातात, तुम्हाला हॉतेलमध्ये मिळाले का ते खायला. >>

तिथे थुपका ही डिश खूपच प्रसिद्ध आहे. ( जे नुडल्स,भाज्या वगैरे पासून एक घट्ट सूप बनविले जाते.) थुपका नंतर सगळी कडे मॅगी मिळते आणि लडाखी बटर चहा देखील प्रसिद्ध आहे. हे बटर याक बटर असल्यामुळे पिताना खूप जनांना कसेतरीच वाटू शकते.

आम्ही उतरलेल्या स्पिक अ‍ॅन्ड स्पन मध्ये दुसर्‍या दिवशी थुपका होते. प्रज्ञा व यामिनीला जाम आवडले. Happy

क्रॉसिंग असलेले नाले कायम वाहात असतात की उन्ह वाढल्यावरच वाहायला सुरु होतात >>> उन्ह वाढल्यावरच. दुपरी ३ नंतर जास्त वेग होऊ शकतो. सकाळी आणि रात्री ऑलमोस्ट फ्रोजन अवस्थेत असतात.

प श्मिना शाल घेतली का? >>> हो घेतल्यात चार पाच. पुरे घरके बदल डालेंगे. Happy

मी तो डेस्कटॉपवर टाकला >> Happy

लेह-लडाख वारी करावी तर तुझ्यासोबत असे वाटून राहीले आहे.. >> Happy माझी पुढची ट्रीप झंस्कार व्हॅली आणि परत त्सो मोरिरी असणार आहे. जाऊ या आपण.

वॉटर क्रॉसिंग्स ह्या त्या त्या दिवसाच्या उन्हावरच अवलंबून असतात. इतके घाबरून जाण्यासारखे काही नाही. मोस्टली सगळ्या क्रॉसिंग ह्या नॉर्मल कॅटॅगिरीमधील असतात पण त्या दिवशी सगळेच वेगळे होते हे मात्र खरे. त्यामुळे मला ज्या क्रॉसिंग लागतील त्या तुम्हाला लागतील असे नाही. आणि इट इज फन Happy

लेकची निळाई भारी आहे एकदम !
हे वॉटर क्रॉसिंग माहित नव्हते.. पहिल्यांदाच कळलं..
>> पराग + १

मस्त चाललाय प्रवास. तो 'आजचा रस्ता' बघून एकदम क्षूद्र क्षूद्र वाटतंय. तू प्रसंगावधान दाखवून योग्य निर्णय घेतलेला आवडलाच.

चिताच्या आजूबाजूलाच गायी आरामात चरताना बघून मजा वाटली. Proud

चित्ता आणि गायी Happy

मस्त आणि थरारक... शांत डोक्याचे लोकं नेहमीच आवडतात Wink

तिथे आपले जवान बघुन आनंद झाला. ती लोकं किती शांतचित्ताने आपले काम करत असतील ना ? त्या धैर्याला सलाम.

काही प्रश्नांना दिलेली उत्तरे मुख्य लेखात अ‍ॅड करु शकता का? पुढे पुस्तक बनवताना फायद्याचे ठरेल.

हा भाग देखिल आवडला Happy

लेकचे फोटो जबरदस्त!!! काय सुंदर निळा रंग आहे Happy

शेवटचा फोटो एकदम कुठल्यातली कार रॅलीतला वाटतोय Happy

तुझे तुझ्या चित्त्यावर किती प्रेम आहे ते दिस्तय Wink

तुझे तुझ्या चित्त्यावर किती प्रेम आहे ते दिस्तय >>. हो. दर रोज त्याला बालाजी नाहू माखू घालतो. पण दरविकेंडला मात्र मी त्याला प्रेमाने शाम्पू, व्हॅक्स, छोटे छोटे ओरखडे परत भरून काढणे इत्यादी प्रकार करत असतो.

शेवटचा फोटो एकदम कुठल्यातली कार रॅलीतला वाटतोय >> माझ्याकडे वॉटर क्रॉसिंगचे अजून दोन/ तीन भारी फोटो आहेत. ते अजून अपलोड केले नाहीत म्हणून टाकले नाहीत.

काय नशिब त्या चित्त्याच... रोज बालाजी आणि विकांताला केदारनाथजी Lol

ते वॉटर क्रॉसिंगचे भारी फोटो पण दाखव आम्हाला Happy

>>रोज बालाजी आणि विकांताला केदारनाथजी Happy मज्जेशीर!
हाही भाग अफाट झालाय आणि उत्सुकता तर एखादी चित्तथरारक मालिका बघावी अशी ताणली जातेय. मला तुमचं ते वॉटरक्रॉसिंग बघून मुलं सोबत नव्हती ते बरं झालं असं वाटून गेलं. थोडक्यात तुम्ही झाला नाहीत तरी मी इथे बसून जराशी पॅनिक झालेच Sad
बाकी फोटो सगळेच एक से एक आलेत. नेत्रसुखद, डोळ्याचं पारणं फेडणारे वगैरे.

चांग ला गाडी साठी अजिबातच चांगला नाही ये > अनुमोदन

कितीही फोटो काढले तरी कमीच वाटतात. .> अगदी

माझी पुढची ट्रीप झंस्कार व्हॅली आणि परत त्सो मोरिरी असणार आहे. जाऊ या आपण. >> जुन २०१४ असेल तर सांग. जल्ला हॅंगओवर उतरतच नाही.

मला लेह लदाख ला जायची इच्छा होती पण शरीर साथ देऊ शकत नसल्याने निराश झाले होते.तुमचा सविस्तर वर्णनात्मक आणि फोटो सहित लेख वाचायला घेतला आणि सगळे भाग वाचून मगच थांबले . सर्व काही केवळ अप्रतीम ! दुसरा शब्दच सुचत नाही . फोटो तर काय बोलावे ? प्रत्यक्ष स्वतः जाउन आल्याचा प्रत्यय देणारे आहेत . धन्यवाद ! घर बसल्या लेह ची सफर करवून आणल्या बद्दल आणि मनाची निराशा घालवल्याबद्दल !

I found just the right Hindi poem to go with the amazing lake photos. Will write here over the weekend.

Pages