तिचे हात एक एक टाका सफाईदारपणे घालत होते. झरझर. एकसारखा. टपोरा. लवकरात लवकर तिला ही दुलई पुरी करून द्यायची होती. शक्य झाले तर आजच. त्या बदल्यात मिळणार्या शंभर रुपयात तिच्या जागोजागी फाटलेल्या संसारात निदान मीठ-मिरची-तेलाचे ठिगळ लागले असते. दोन्ही पोरींच्या तोंडात चार दिवस दोन घास पडले असते.
दिवसभर मान मोडून पाठीचा काटा पुरा ढिल्ला करून एकदाची दुलई पुरी झाली. जोरदार झटकून तिवर अजूनही लोचटासारखे चिकटलेले धागेदोरे तिने काढले. वरच्या तारेवर दुलई टाकून निरखून पाहू लागली. दुलई सुंदरच झालेली. मऊमऊ. निगुतीने टाचलेली. एकही ओळ वाकडी नाही का एकाही तुकड्याचा तोल ढळलेला. यावेळी रंगीबेरंगी तुकड्यातुकड्यातून तिने फुले-पाने, पक्षी, सूर्य, गुंफलेले. दुकानदार म्हणाला होता, थोडी कल्पकता दाखवा. खरंय रे बाबा तुझं, माल खपायला रोज नवीन काहीतरी हवेच. पण, उपाशीपोटी कल्पकता कशी सुचावी? डोळ्यापुढे फक्त डाळभात दिसत राहतो, त्याचं काय करावं..... पाणी पिऊन पिऊन पोट फुगतंय निसतं. अन्नाशिवाय काय बी सुचना झालंय. तरी कल्पकता दाखवायलाच हवी. नाहीतर हे कामही हातातून जाईल.
तिने मान झटकली, चटदिशी दुलईची घडी घालून पिशवीत अलगद ठेवली. पदर सावरला अन पायात टाचेपाशी झिजलेली चप्पल अडकवली. " शरे, येते गं मी लगेच माघारी. तोवर अभ्यास करा बरका. उगाच रिकाम्या पोटी एकमेकींशी झोंबू नका. पोटात आग फारच भडकली तर मोठा पेला भरून पाणी प्या गं." शरीचे, हो नाही उत्तर ऐकायच्या आतच ती वाटेलाही लागली. दुकान बंद व्हायची वेळ झालेली. आज पैसे मिळाले नाहीत तर उपाशीच झोपवावे लागेल लेकरांना.
धापा टाकत दुकानात शिरली. " किती उशीर केलास? आता मी बंदच करणार होतो. पाहू दे. हां.... बढिया! ती मेहता, दोन वेळा विचारून गेली आज. आता घरी जाता जाता देतो पोचवून. तिची लेक खूश होईल. हे घे शंभर रुपये. काय झाले? बरं, हे अजून दहा घे वरती. आणि जातांना दोन दुलयांचे कापड, दोरे, लागतील ते तुकडे घेऊन जा. चटचट हात चालव जरा. पोरींना घे की मदतीला. नीघ आता. " असे म्हणून दुकानदाराने नोटा अंगावर फेकल्या आणि दिलीपला दुलयांची कापडे काढायला सांगत तो गायबही झाला.
शंभरावर दहाची अजून एक नोट. तिला खरेच वाटेना. चार दिवसांची सोय तर झाली. लेकी भुकेल्या आहेत. बाजार उठायची वेळ झालीच आहे. संपता संपता गेलं की जरा भाव पाडून मिळतोय. बरेचदा रस्त्याच्या कडेला गिऱ्हाईकांच्या हातून पडलेले चांगले कांदे-बटाटे, वांगी अन थोडेसे दबलेले-मार लागलेले तमाटेही मिळून जातात. पण उशीर झाला पोचायला तर तिच्यासारखे कोणीतरी हात मारते. आज तसे होऊन चालणार नाही, मिळायला हवेच म्हणत तिने दिलिपकडून न बघता माल उचलला. बाकीचे उद्या येऊन पाहीन रे असे म्हणत ती रस्त्यालाही लागली. जड पिशवी काखोटीला मारून ती झरझर पाय उचलत होती. आज थोडा रवा, साखर आणि अर्धा लीटर दूध घेईन. शरीला, रव्याची खीर खूप आवडते. पोरीचे डोळे लकाकतात नुसते खिरीचे नाव काढले तरी. दहा रुपये जादा मिळालेत नं. आज खीर करायचीच. इतकुश्या माझ्या पोरी पण किती समज आहे त्यांना. कधी हट्ट करत नाहीत. जितकी जमेल तितकी मदत करतात बिचाऱ्या.
देवळाला वळसा घालून जाता जाता शंकराकडे न पाहताच तिने हात जोडले. प्रदक्षिणा घातली. एक क्षण टेकावे म्हणून खांबापाशी पाठीचा कणा खेटला. डोळे मिटले. " देवा, माझं मेलीचं राहू दे रे पण पोरींवर तरी दया कर. जास्त काही नाही निदान दिसाच दोन घास तरी पानात पडू देत म्हणजे भरून पावलं. कष्टाला मी डरत नाही रे. कामं मिळू देत म्हणजे रात्रीचा दीस करून निभावीन बघ. इतक्या मोठ्या जगाच्या खटल्यात आमच्यावर लक्ष ठेव रे बाबा." असे म्हणत पुन्हा पुन्हा नमस्कार करून ती बाजाराकडे निघाली.
बाजार जवळपास गुंडाळलाच होता. सराइतासारखी तिची नजर खाली पडलेल्या कांद्या-बटाट्यावर पडत होती. पिशवी फुगत होती. लसणाचे थोडेसे कुजलेले दोन गड्डे व लिंबेही मिळून गेली. आलं- मिरच्या, तमाटेही मिळाले. ती खूश झाली. बाजारातल्या देवीपाशी प्रसादाची नारळाची कवड होती. इकडे तिकडे पाहत देवीला नमस्कार करून अंगारा लावायचे निमित्त करून तिने ती कवड पटदिशी पिशवीत सारली. वाट्यावर लावलेली वांगी व तोंडली घासाघीस करून दोनाच्या भावात तीन वाटे तिने मिळवले.
मनोमन ती आनंदली. आज सकाळी सकाळी कोणाचं तोंड बघितल्यालं..... अजून जवळपास सगळे पैसे जशेच्या तशे कनवटीला होते आणि तरीही पिशवी भरलेली. देवा, लय उपकार झाले बघ तुझे. असे म्हणत वाण्याकडे जाऊन तिने रवा, साखर घेतले. डेअरीतून अर्धा लीटर दूध घेऊन ती घराकडे निघाली. डोळ्यासमोर स्टोवर मोठ्या पातेल्यात शिजत असलेली खीर व पातेल्याकडे आशाळभूतासारखे डोळे लावून बसलेली शरी अन भुकेने कळवळलेली कुसुम दिसत होती. झोपडी दिसायला लागली तशी चालण्याचा वेग अजूनच वाढला. तोच, हाकारा ऐकू आला.
" पोरी, वाईच जरा थांब गं. दोन थेंब पाणी तरी घाल तोंडात." कण्हत कण्हत कोणी बोलत होते. तिने निरखून पाहिले तर कचऱ्याच्या कुंडीपाशी एक मुटकुळं पडलेलं. त्यातूनच कण्हण्याचा आवाज येत होता. ती जवळ गेली. म्हातारी पाय पोटाशी घेऊन कलंडली होती. गेल्या आठवड्यातच हिला कुठेतरी पाहिल्याचे तिला स्मरत होते. कुठे बरं? हां, त्या मोर का कायसे नाव असलेल्या मोठ्याश्या दुकानापाशी ही भीक मागत होती.
" म्हातारे, अशी इथे का गं लवंडलीस? असे म्हणत तिने म्हातारीला हालवले. अगागा, किती तापली आहेस गं. मरशील नव्ह का अशी तू. माझ्याशिवाय कोणी तुला दिसलं न्हाई व्हय हाकारायला. आधीच चुलीत खडखडाट तशात तुझी भर. काय करावं आता? तुला हितच टाकून गेले तर उद्या सरकारी गाडीतूनच जाशील हे नक्की. शिवाय ते पाप माझ्यामाथीच पडायचं. देवा, तुझ्या मनात तरी काय हाय बाबा? चल म्हातारे, ऊठ बरं. माझ्या आधाराने हळूहळू उभी राहा म्हणजे तुला माझ्या घरला घेऊन जाते. " म्हातारी हो नको म्हणण्याच्या पलीकडे गेलेली. तिला आधार देत, लळतलोंबत कशीबशी घरी आणली.
" शरे, अगं कांबंळ हंतर बिगीबिगी. आज्जी लय तापलीये. कुसे, ग्लासात पाणी भर आणि आज्जेला पाज. तोवर मी स्टोला काकडा लावते. पयला ’ चा ’ करते. लयी दिसांनी साखर आणि दूध घालून केलेला ’ चा ’ पिऊ सगळे. " असे म्हणत ती कामाला लागली. थोड्याच वेळात ’ चा ’ झाला. एकीकडे डाळतांदूळाची खिचडी व दुसरीकडे खिरीचे पातेले स्टोवर रटरटू लागले. झोपडीभर अन्नाचा दरवळ पसरला. शरी, कुसुम आणि आजीचे प्राण कंठाशी आलेले. आता लवकरच तोंडात घास पडणार हे सत्य अजूनही त्यांच्या गळी उतरत नव्हते. तोच, जरासा गोडमिट्ट दुधाळ गरम चा चार पेल्यांमध्ये तिने भरला अन लेकींच्या पुढे ठेवत आजीला बसते करून ती पाजू लागली. फुर्रर्रर्र..... फुर्रर्रर्र.... आवाज करत चौघीही मन लावून चा फुरकू लागल्या. पेले रिकामे झाले तशी खंगलेले चेहरे जरासे उजळले. आजीशी दोघी लेकी बडबडू लागल्या.
पेले धुऊन तिने पानं घेतली. पानात खिचडी, तिवर थोडासा खोबऱ्याचा चव आन वाडग्यात खीर वाढताना नवीन दुलईचे डिझाइन डोक्यात घुमू लागले. आज चौथा कोना भरला व्हता. हे ठिगळ वाईच भारी व्हतं खरं. खाणारं एक तोंड वाढवणारं. पण, जीवात अजून धुगधुगी आहे म्हटल्यावर कचऱ्यात कसं मरू द्यावं म्हातारीला. तिच्या लेकरांनी टाकली तिला म्हणून मीबी डोळे झाकायचे? नाय नाय. माझी माय असती तर राहिलीच असती नं माझ्यापाशी. पोरींनाही माया मिळल. व्हईल काहीतरी सोय. त्यो देव बसलाय नग का वरती, त्यानेच तर आज्जेला माझ्याकडे पाठवलीय. आता तोंड वाढवलंय तर जिम्मेवारी त्याचीच नव्हं का. उद्याचं उद्याला पाहू.
"चला गं पोरींनो, हे ताट आजीला द्या आधी आणि बसा आपापल्या ताटावर. " तिघींचे पटापट घास घेत चवीचवीने मिटक्या मारत हालणारे तोंड, आनंदाने लकाकणारे डोळे पाहून रिकाम्या पोटीच ती भरून पावली. जगातलं सारं सुख या दोन घासातच सामावलेलं. काही करून यांच्या तोंडात हे दोन घास मी घालेनच. असा स्वत:शीच करार करत डोळ्यात आलेले पाणी निपटून काढत ती म्हणू लागली, " शरे, अगं खीर घे की अजून..... उद्याला नग ठेवायला. आजची येळ प्वाट भरून जेवा गं सगळी. कायमच अर्धपोटी राहायच नसतं. कधीतरी तडस लागू दे की. मन आणि प्वाट तुडुंब भरू द्या. " असे म्हणत पोरी व आजीकडे पाहत आनंदाने तिने खिरीचा भुरका मारला.
अ प्र ति म ....!!
अ प्र ति म ....!!
आवडलं लिखाण.
आवडलं लिखाण.
अगदी आवडली कथा
अगदी आवडली कथा
काय क्यूट कथा आहे. मनाला
काय क्यूट कथा आहे. मनाला स्पर्श आणि डोळ्याच्या कडा ओल्या करून गेली! अजून येउ देत.
आवडली कथा
आवडली कथा
माणुसकी आणि प्रेम छान दाखवलय.
माणुसकी आणि प्रेम छान दाखवलय. आवडली.
छान आहे कथा.आवडली.
छान आहे कथा.आवडली.
खरय्....अगदी वास्तववादी चित्र
खरय्....अगदी वास्तववादी चित्र ....
मस्त कथा. फार आवडली.
मस्त कथा. फार आवडली.
कथा आवडल्याचे आवर्जून
कथा आवडल्याचे आवर्जून कळवलेत.... आनंद झाला. सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. प्रोत्साहनामुळे उत्साह वाढतो. लोभ असावा.
च्च..... साधं, सहज,
च्च.....
साधं, सहज, भेटणारं!
सुंदर
मस्तच............
मस्तच............
खुप दिवसांनी कथा वाचली आणि
खुप दिवसांनी कथा वाचली आणि आवडली.
छान आहे कथा. खूप भावली.
छान आहे कथा. खूप भावली.
आवर्जून प्रतिसाद देऊन कथा
आवर्जून प्रतिसाद देऊन कथा आवडल्याचे कळवलेत खूप आनंद वाटला. सगळ्यांचेच अनेक आभार.
भानस... 'राधाक्का' तूमचीच कथा
भानस...
'राधाक्का' तूमचीच कथा होती का?
कथा आवडली.
कथा आवडली.
भाग्यश्री, तुझ्या लेखणीला
भाग्यश्री,
तुझ्या लेखणीला सलाम....
व्वा.. किती सुंदर लिहिलयस..
व्वा.. किती सुंदर लिहिलयस.. स्पर्शून गेलं आतपर्यन्त!!
आवडली कथा... शेवटी माणसातला
आवडली कथा...
शेवटी माणसातला माणुस जिवंत आहे तोवर माणुसकीला मरण नाही !
सुरेख जमली आहे कथा. खूप
सुरेख जमली आहे कथा. खूप आवडली.
श्री ताई... पुन्हा एकदा
श्री ताई... पुन्हा एकदा वाचली... प्रत्येकवेळी तुझे लिखाण तितकेच भावते..
मस्त कथा.. पूर्वप्रकाशित आहे
मस्त कथा.. पूर्वप्रकाशित आहे का आंतरजालावर?
>>भूक लयी वंगाळ असतीय भानसा ! ज्यानं भूकेचे जाळ सोसलेत त्यालाच ठावं.
३०० रू चा पिझ्झा आणिक १०० ची कॅफे कॉफी डे ला काय माहीत>><< त्यांची भूक वेगळी.. प्रत्येकाची तडफड वेगळी! पण तडफड आहेच.. भूक आहेच..! कोणी सुटलं नाहीये ह्यातुन!
चांगली लिहीली आहे.
चांगली लिहीली आहे.
मस्त !
मस्त !
बागेश्री, आशूडी, शशांक,
बागेश्री, आशूडी, शशांक, वर्षू, विशाल, शैलजा, रोहना, जाईजुई, मिलिंद, रावी, सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.
बागेश्री, हो गं. 'राधाक्का ' ही माझीच आहे.
जाईजुई, अगं माझ्या ब्लॉगवर आहे ना ही कथा.
रोहना, धन्यू रे.
विशाल, अगदी अगदी. माणुसकी कशाचीच मौताज नाही.
किती छान लिहीलंय? सुंदरच!
किती छान लिहीलंय? सुंदरच!
धारा, बरं झालं ही कथा वर
धारा, बरं झालं ही कथा वर काढलीस, आधी वाचलीच नव्हती.
किती साधी सुंदर आणि कसलाही अभिनिवेष नसलेली कथा आहे ही. कसला संदेश नाही, का कसला थाट नाही. वर्णन तर अगदी डोळ्यासमोर उभं राहील असं.
आज पुन्हा वाचली...
आज पुन्हा वाचली...
खुपच सुंदर लिहिले आहेस.....
खुपच सुंदर लिहिले आहेस..... आवडली.......
Pages