अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - ४

Submitted by स्वाती२ on 22 July, 2013 - 14:08

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - १
अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - २
अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - ३
हायस्कूलची वर्षं ही मुलांसाठी अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाची असतातच पण त्याच बरोबर ही वर्षे त्यांच्या जडणघडणीच्या दृष्टीनेही महत्वाची असतात. या वयात मुलांमध्ये काहीतरी करुन दाखवायची जिद्द असते आणि ऊर्जाही असते. आपल्याला काय आवडतयं, काय जमतयं हे थोडेफार उमगायलाही लागलेले असते. या सगळ्याचा सकारात्मक वापर केला गेला तर एक समृद्ध व्यक्तिमत्व तयार होणार असते. शाळेत आणि शाळेबाहेर उपलब्ध असलेल्या एक्स्ट्रा करीक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीज,समाजसेवेच्या संधी, सुट्टीत किंवा शाळा संभाळून केलेला नोकरी-धंदा, मुलांचे मित्र-मैत्रीणी आणि सोशल लाईफ हे सगळेच घटक याबाबतीत फार महत्वाची कामगिरी बजावतात.
कॉलेज अ‍ॅडमिशन ऑफिसही अभ्यासाच्या जोडीला इतरही वेगवेगळे अनुभव आणि कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यास उत्सुक असतात. हायस्कूलच्या चार वर्षांत विद्यार्थ्याने अभ्यासाव्यतिरिक्त जे काही छंद जोपासले, समाजसेवा केली, एखाद्या गोष्टीत प्राविण्य मिळवले त्यातून त्या विद्यार्थ्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाचा अंदाज घेतला जातो. त्याने केलेल्या नोकरी-धंद्यातून जबाबदारीची जाणीव दिसून येते. तेव्हा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने आणि कॉलेज अ‍ॅडमिशनसाठी एक्स्ट्रा करीक्युलर अ‍ॅक्टिविटीज, समाजसेवा, नोकरी वगैरे अभ्यासाइतक्याच महत्वाच्या आहेत.
हायस्कूल मधील एक्स्ट्रा करिक्युलर बाबत वेबसाईटवर माहिती असतेच त्याच प्रमाणे ओरिएंटेशन्/ओपन हाउस असते तेव्हाही या बद्दल माहिती देण्यासाठी, रिक्रुट करण्यासाठी सिनियर मुलं बुथ टाकतात.
तुमच्या हायस्कूलचे बजेट, स्टुडंट बॉडी, तुम्ही कुठे रहाता यानुसार काय संधी उपलब्ध आहेत ते ठरते. तरीही सामन्यत: खाली दिलेल्या यादीपैकी काही ना काही उपक्रम शाळांमधून उपलब्ध असतातच.

स्पोर्ट्स -
हायस्कूल फॉल स्पोर्ट्ससाठी मिडलस्कूल संपता संपताच ट्राय आउट्स आणि ट्रेनिंगबाबत अ‍ॅथलेटिक डिपार्टमेंट मिडलस्कूलला माहिती पाठवते. बाकी स्पोर्ट्ससाठी अ‍ॅथलेटिक डिपार्टमेंटकडे चौकशी करावी. यात वर्सिटी अणि ज्यु. वर्सिटी अशा दोन लेवल्स असतात. खूप टॅलेंटेड असल्यास ज्यु. लेवल स्किप करुन वर्सिटी लेवलला खेळायला मिळते. अन्यथा ज्यु. लेवलला तयारी करुन त्यातून वर्सिटीला सिलेक्शन होते. हायस्कूल स्पोर्टस इथे खूप सिरीयसली घेतले जातात. भरपूर मेहनत असते. जोडीला नियमानुसार ग्रेड/GPA राखावा लागतो. काही वेळा कम्युनिटी सर्विस आवर्सही लागतात. चिअरलिडींग पासून गोल्फ पर्यंत वेगवेगळ्या टिम्स आणि तसेच ट्रॅक अ‍ॅन्ड फिल्ड ची मंडळी हा सगळा पसारा बघता स्पोर्ट्स न खेळणार्‍या मुलांसाठी देखील अ‍ॅथलेटिक डिपार्टमेंटमधे नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. वर्षभर काहीना काही इवेंट सुरु असल्याने मुले त्यांचे इतर उद्योग सांभाळून काम करतात. माझा मुलगा ट्रॅक मिटसाठी मदतनीस म्हणून नोकरी करायचा.

अ‍ॅकेडेमिक -
अ‍ॅकेडेमिक टिम्स, क्वीझ लीग, मॅथ बोल, स्पेल बोल इत्यादीचे ट्राय आउट्स बद्दल त्या त्या कोचना विचारावे. बर्‍याचशा स्टेट्स मधे हायस्कूल टिम्सचा टिव्ही/रेडीओ क्वीझ शो/कॉपिटीशन देखील असते. यात टिम्सना आपल्या शाळेसाठी कॅश प्राईझेस मिळवायची संधी मिळते. याशिवाय वेगवेगळी सायन्स फेअर्स वगैरे उपक्रमातही मुले भाग घेऊ शकतात. याशिवाय वेगवेगळे फॉरीन लॅंग्वेज क्लब्ज, रोबोटिक्स क्लब वगैरे उपक्रम असतात. आमच्या मुलाने सोशल स्टडीज अ‍ॅकेडेमिक टिम, क्वीझ लीग आणि ब्रेन गेम हा टिव्ही क्वीझ शो आणि फ्रेंच क्लब हे उपक्रम चार वर्ष केले.

म्युझिक -
मार्चिंग बँड पासून शो कॉयर पर्यंत अनेक उपक्रमातून संगीत क्षेत्रात काम करायची संधी असते.

मेडीआ - शाळेत इयर बुक स्टाफ, न्युजपेपर, रेडीओ, टिव्ही या उपक्रमातून मेडीआ मधे काम करायची आवड असेल तर काम करत शिकता येते. नवीन तंत्र अवगत करायला मिळते. विविध उपकरणे तसेच सॉफ्टवेअर वापरायला मिळतात. टिव्ही स्टुडीयो सारखे अभ्यासक्रम बर्‍याचदा को करीक्युलर असतात. रेडीओ या माध्यमात काम करत असाल तर PRX Youth Editorial Board वर कामाची संधी मिळू शकते. माझ्या मुलाने त्यांच्यासाठी ७ वीत असताना काम केले होते.

हॉबीज -
चेस पासून ड्रामापर्यंत वेगवेगळ्या छंदांसाठी शाळेत क्लब्ज असतात.

गवर्नमेंट -
स्टुडंट कौसिल, प्रॉम कमिटी, क्लब ऑफिसर्स

मिलीटरी - Junior ROTC

इतर ऑर्गनाझेशन्स चे चॅप्टर्स - SADD, FFA, BPA, NHS या सारख्या ऑर्गनाझेशन्सचे चॅप्टर्स शाळेत कार्यरत असतात.

समाजसेवा -
शाळेत रजिस्ट्रेशन/ ओरीएंटेशन साठी मदत करणे, स्पोर्टिंग इवेंट्सना कन्सेशन स्टॅन्ड चालवणे, शो कॉयर कॉम्पिटिशन सारख्या मोठ्या इवेंट्सना कॅफेटेरीया ड्युटी, मेंटरींग प्रोग्रॅम, एलिमेंटरी स्कुलच्या अ‍ॅकेडेमिक टीम्ससाठी असिस्टंट कोच वगैरे समाजसेवेच्या संधी उपलब्ध असतात. माझ्या मुलाने ओरीएंटेशन वॉलेंटियर , कॅफेटेरीयात डीश वॉशर आणि मॅथ बोल असिस्टंट कोच असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे काम केले. प्रत्येक कामातून तो काहीतरी नविन शिकला. स्वतःची बलस्थाने कळली तसेच आपण कुठे कमी पडतो, काय सुधारायला हवे हे देखील लक्षात आले.

हायस्कूल मधे उपलब्ध असलेल्या उपक्रमांव्यतिरिक्त गावातही अनेक संधी मिळू शकतात. शाळेबाहेरील उपक्रमांसाठी गावातील नॉन प्रॉफिट्स, पार्क अ‍ॅन्ड रिक्रिएशन या ठिकाणी चौकशी केल्यास उपलब्ध संधींबाबत अधिक माहिती मिळेल. इंडिया असोशिएशन युथ ग्रुप असेल तर त्या मार्फतही उपक्रम आयोजित केले जातात. लोकल चर्च किंवा देवळातर्फेही काम करायची संधी असते. आवड असेल त्याप्रमाणे गावातील वेगवेगळ्या आर्ट, म्युझिक, ड्रामा ग्रुप्सशी संपर्क साधावा. मुलांचे सिनियर मित्रमैत्रीणीही याबाबत चांगले मार्गदर्शन करतात.
अमेरीकन लोकशाहीत सहभाग घेण्यासाठी तुमच्या स्टेटच्या पेज प्रोग्रॅमसाठी अप्लाय करावे. तसेच आवड असल्यास पोल बुथ वॉलेंटियर म्हणून काम करता येते. गावातील अडवायजरी बोर्डांवर, स्टिअरींग कमिटीवर देखील युथ मेंबर असतात.
स्काऊटमधे निरनिराळे प्रोजेक्ट पूर्ण करत इगल स्काऊट होता येते. याशिवाय लोकल रेड क्रॉस साठी ब्लड ड्राइव, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी, फूड पॅन्ट्री, अ‍ॅनिमल शेल्टर, साल्वेशन आर्मीचे उपक्रम, स्पेशल ऑलिंपिक वगैरे वेगवेगळ्या समाजसेवेच्या संधी उपलब्ध असतात. माझा मुलगा फूड पॅन्ट्री वॉलेंटियर होता. मिडलस्कूलमधे काही संधी अजमावून पाहिल्या असल्यास आधीच्या अनुभवावरुनही पुढे वाटचाल करता येइल.
शाळेची नॅशनल ऑनर सोसायटीसाठी अ‍ॅप्लीकेशनची प्रोसेस काय आहे ते माहित करुन घ्यावे. माझ्या मुलाच्या मैत्रीणी ला पुरेसे कम्युनिटी सर्विस आवर्स नाही या कारणास्तव ऑनर सोसायटीत स्थान मिळाले नव्हते. नॅशनल ऑनर सोसायटीतही ऑफिसर्स म्हणून काम करायची संधी मिळते. माझा मुलगा पब्लीक रिलेशनचे काम पहायचा.
११वीच्या सुट्टीत शाळेतर्फे अमेरीकन लिजन बॉइज अ‍ॅन्ड गर्ल्स स्टेट साठी डेलिगेट्स पाठवतात. प्रत्येक शाळेची स्वतःची सिलेक्शन प्रोसेस असते. त्या बाबत चौकशी करावी. आम्हाला काहीच माहिती नव्हती. लेकाची शाळेने निवड केल्याचे पत्र पाठवले तेव्हा याबाबत कळले. मुलाला विचारल्यावर तो ' रुटीन स्ट्फ' म्हणून खांदे उडवून मोकळा झाला. Uhoh हा उपक्रम अमेरिकन लिजनचे लोकल चॅप्टर्स स्पॉन्सर करतात. गवर्नमेंट बद्दल हॅन्ड्स ऑन शिकायला मिळते. स्टेट मधून पुढे नेशन साठी जायची संधी असते, स्कॉलरशिप्स असतात. तसेच काही युनिवर्सिटीज देखील डेलिगेट्सना स्कॉलरशिप्स ऑफर करतात. माझ्या मुलाला अशा ऑफर्स आल्या होत्या,

एक्स्ट्रा करीक्युलरच्या बाबत उगाच प्रत्येक ठिकाणी हजेरी लावणे किंवा दर वर्षी काहीतरी ट्राय करुन मध्येच सोडून देणे असे करु नये. आपल्याला ज्या गोष्टीची खूप आवड आहे अशा शक्यतो २-३ अ‍ॅक्टिव्हिटीज निवडाव्यात आणि हायस्कूलची चारही वर्षे त्यासाठी वेळ द्यावा. शाळेने आयोजित केलेल्या अ‍ॅक्टिव्हिटीच्या जोडीला शाळेबाहेरचीही काहीतरी अ‍ॅक्टिव्हिटी करावी. मन लावून काम करावे. हळू हळू वाढीव जबाबदारी घेत नविन कौशल्ये आत्मसात करावीत. नेतृत्व दाखवायची संधी उपलब्ध झाल्यास जरूर स्विकारावी. हे सगळे करताना यासाठी किती वेळ द्यावा लागेल ते माहित करून घ्यावे. तुम्ही ज्या उपक्रमांमधे सहभागी होऊ इच्छिता त्यात काही स्केड्युल कन्फ्लिक्ट होत नाही ना याची आधीच खात्री करावी. बर्‍याचदा शाळेच्या अ‍ॅथलेटिक आणि अ‍ॅकेडेमिक टिम्स, बँड वगैरे बाबत हे घडते. याबाबत कोच, डायरेक्टर्सशी बोलून काही सोल्युशन मिळते का ते पहावे. खेळणार असाल तर स्पोर्ट्सचे स्केड्युल फॉल का स्प्रिंग यावर बाकी अ‍ॅक्टिव्हिटीज काय आणि कधी करायच्या ते ठरवावे. समाजसेवेसाठी काय कार्यक्षेत्र निवडायचे ते ठरवतानाही आवड आणि द्यावा लागणारा वेळ विचारात घ्यावा. एखाद्या गोष्टीची आवड नसेल तर निव्वळ मित्रमंडळी करणार आहेत म्हणून उपक्रमात सहभागी होण्यात काहीच अर्थ नाही. आपल्या सर्व एक्स्ट्रा करीक्युलर्सची, समाजसेवेची एक फाईल करावी. केलेल्या उपक्रमांची, कर्तबगारीची, शिकलेल्या कौशल्यांची नोंद करावी. समाजसेवेचे टाईमकार्ड ठेवावे. पार्टटाईम किंवा सुट्टीतला जॉब शोधण्यासाठी अर्ज करताना प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसला तरी सॉफ्ट स्किल्स म्हणून याबाबत लिहावे.
.
ड्रायविंग आणि सोशल लाइफ
प्रत्येक स्टेटचे टीन ड्रायविंगचे लॉज असतात. आजकाल बजेट कट्स मुळे बर्‍याच शाळांतून ड्रायवर एड नसते. अशावेळी चांगल्या टीन ड्रायविंग प्रोग्रॅमला पाल्याचे नाव घालावे. कार ओनरशिप बाबतच्या खर्चाची जबाबदारी कशी घेतली जाईल त्या बद्दल आधीच चर्चा करावी. टीन ड्रायवर्सच्या सुरक्षिततेसाठी इंश्युरन्स कंपन्यांतर्फे बरेच रिसोर्सेस उपलब्ध आहेत. त्यांचे सेफ्टी प्रोग्रॅम पूर्ण केल्यास इंश्युरन्समधे थोडी सवलत मिळते. शाळेत चांगल्या ग्रेड्स असतील तर गुड स्टुडंट डिस्काउंट मिळतो. मुलं आपले वर्तन पहात मोठी होतात. पालक स्वतः सेफ ड्रायवर असतील तर मुले देखील सेफ ड्रायवर होतात.
हायस्कूलमधे मुलांना मिळणारे स्वातंत्र्य वाढते त्याच प्रमाणे गैरवर्तनाचे परीणामही गंभीर होतात. लॉसुट्स, लायबिलीटीचा विचार करत शाळेचे शिस्तीबाबतचे नियम कठोर होतात. शाळेची डिसिप्लीन पॉलिसी समजून घ्यावी. प्रसंगी जुवेनाइल कोर्ट/ अ‍ॅडल्ट कोर्ट पर्यंत प्रकरण वाढते हे लक्षात घेऊन याबाबत पालकांनी मुलांशी याबाबत शांतपणे बोलावे. संभाव्य धोक्यांबद्दल चर्चा करावी. तुमच्या स्टेटचे तसेच सिटीचे टीन कर्फ्यु लॉज माहित करुन घ्यावेत. इथल्या इतरही कायद्यांची माहिती करुन घ्यावी आणि मुलांनाही द्यावी. मुलांच्या नव्या मित्र-मैत्रीणींबद्दल तसेच त्यांच्या कुटुंबीयांबद्दल माहिती करुन घ्यावी. मुलांच्या पार्ट्यांना संबंधीत पालक उपस्थित असणार आहेत ना याची फोनकरुन खात्री करावी. तसेच मुले ज्यांच्याकडे जाणार त्यांची गन्स, अल्कोहोल वगैरे बाबतच्या भूमिकेबाबत आधीच योग्य ते प्रश्न विचारावेत. हेल्दी रिलेशनशशिप्स, अ‍ॅबस्टिनन्स/ सेफ सेक्स, कंसेंटचे वय, इनअ‍ॅप्रोप्रिएट रिलेशन्स याबाबत बोलणे सुरु ठेवावे. वास्तव आणि आभासी जगात स्वतः सजग रहावे आणि मुलांनाही सजग रहायला शिकवावे.
मुलांनी अभ्यास, एक्स्ट्रा करीक्युलर्स, सोशल आणि फॅमिली लाइफचा मेळ साधत हायस्कुल एंजॉय करावे. त्याचवेळी हायस्कूल नंतर पुढे काय करायचे याचाही विचार करावा. १२ वीच्या वर्षाच्या सुरुवातीला कॉलेज अ‍ॅडमिशन प्रोसेस सुरु होते. त्यासंबंधीची माहिती तसेच हायस्कूल टाईमलाइन, कॉलेज अ‍ॅप्लीकेशन फ्लोचार्ट्स पुढील भागात. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खेळांत प्राविण्य किंवा रुची नसणार्‍यांना पण अनेक पर्याय उपलब्ध आहेत हे वाचून बरं वाटलं.
छान आटोपशीर झाला आहे लेख.

बापरे! किती चांगल्या अ‍ॅक्टिव्हीटीज ! तुमची लेखमाला सुंदर आहे.. अगदी वेगळं जग

वॉव. किती काय काय गोष्टी मुलं स्वतः करु शकतात आणि करतात हे वाचुन नवल वाटले. इतक्या विविध प्रकारच्या संधी उपलब्ध असणे आणि विविध गोष्टी करुन पहाता येणे हे फारच ग्रेट आहे.
(नकळत भारतीय शिक्षणाशी तुलना होतेच. मध्यमवर्गातली बहुतांश मुलं शिक्षण संपेपर्यंत खरच इतर काही करत नाहीत. शिक्षण संपले की लगेच पैसा मिळवुन देणारी नोकरी हवी हेच ध्येय असते. )

धन्यवाद.

इथे अमेरीकेत १०वी, १२वी ला बोर्डाची परीक्षा, अ‍ॅडमिशन साठी धडपड वगैरे भानगडी नसतात. सगळा अभ्यास शाळेच्या शिक्षकांनी करुन घेणे अपेक्षित असते. ट्युशन वगैरे प्रकार नाही. प्रत्येक धड्यावर परीक्षा, होमवर्क ग्रेड वगैरे गोष्टींमुळे वर्षाच्या शेवटी एक परीक्षा आणि त्यावर सगळे भवितव्य हा प्रकारही नाही. मुलांना बारावी नंतर काय करायचे हे पक्के ठरवायला वेळ हवा असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी undregraduate studies program असतात. या सगळ्यामुळे मुलांना स्वतःसाठी वेळ मिळतो. तसेच १८ वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती नुसतीच कागदोपत्री सज्ञान नसते तर तिला तसेच वागवलेही जाते. त्या दृष्टीने विचार केल्यास हायस्कूलच्या मुलांसाठी विविध प्रकारच्या संधी उपलब्ध असणे अपेक्षितच आहे. कम्युनिटीत सहभागी होणारी भावी पिढी या दृष्टीनेच हायस्कूल मधील मुलांकडे बघितले जाते. त्यांच्या सहभागाकडे लुडबुड म्हणून बघितले जात नाही. याबद्दलचा एक अनुभव-
माझ्या मुलाची टीम या वर्षी टिव्हीच्या क्विझ शो मधे पहिल्या आठात पोहोचली. त्याबद्दल शाळेला $२००० रक्कम बक्षिस म्हणून मिळाली. मुलांनी जिंकलेल्या रकमेचा विनियोग कसा करावा याबद्दल टीमच्या काही सुचना असतील तर किंवा शेवट काय निर्णय घेतला जाईल तो मुलांना कळावा म्हणून मिटिंगला या असे स्कूल बोर्डाने आवर्जून सांगितले. Happy