सिनेमा आणि संस्कृती- भाग १ "लग्न":३

Submitted by शर्मिला फडके on 18 June, 2011 - 12:04

हिंदी सिनेमांमधलं, अनेक पिढ्या बिदाई, घुंगट आणि पतीपरमेश्वर याच्या आसपासच घोटाळत राहिलेलं लग्न नव्या, तरुण दिग्दर्शकांच्या सिनेमांमधून बर्‍यापैकी ताजा आणि मोकळा श्वास घ्यायला लागलं. पती-पत्नी नात्यांमधल्या ताण तणावांना न बिचकता, थेट हाताळण्याचं धाडस करण्याचा प्रयत्न यांपैकी अनेकांनी केला. झाडांभोवती फिरत रोमान्स करणारे हिंदी सिनेमांमधले नायक नायिका अशा प्रयत्नांमुळे जरा वैचारिक दृष्ट्या मॅच्युअर्ड वाटायला लागले आणि नशिबाने असे प्रयत्न समजुन घेणार्‍या मॅच्युअर्ड प्रेक्षकांची साथही त्यांना मिळाली.

क्वार्टर लाईफ क्रायसिसमधून जाणार्‍या तरुण पिढीला पडद्यावरची लग्न जमवताना, झाल्यावर, नवे नाते टिकवताना होणार्‍या दमछाकीवर बेतलेली पटकथा कधी नव्हे ते स्वतःच्या आयुष्याशी मिळती जुळतीही वाटू लागली.

इम्तियाझ अलीने 'ज्याच्याशी लग्न करायचे आहे त्याच्याशी ते न होणे, प्रेम करत असतानाही पालकांच्या दबावामुळे अॅरेन्ज्ड मॅरेजला सामोरे जायला लागणे' ह्या भारतातल्या ९०% मुलामुलींची कथा, त्यांच्या मनात अशावेळी उडालेला गोंधळ याचे चित्रण आजच्या पार्श्वभुमीवर 'सोचा न था' मधून फार सुंदर दाखवला. आजचीच नव्हे तर गेल्या अनेक पिढ्यांमधली मुले मुली या मानसिक द्वंद्वाला सामोरी गेली. आजची तरुण मुले मुली यातून त्यांच्या पद्धतीने कसा मार्ग काढते, बंडखोरी करतानाही कशी गोंधळते, परस्परांवरच्या प्रेमाबाबतही त्यांच्या मनात कधी ठामपणा, कधी साशंकता असे भाव कसे येत रहातात हे इम्तियाझने इतके खरेपणे दाखवले की तरुणच काय त्याआधीच्या पिढीतल्याही अनेकांना ते जवळचे वाटले.

'सोचा न था' मधली नायिका लग्नासाठी 'दाखवून घ्यायला' तयार होते खरी पण मग तेच तेच प्रश्न, एकतर्फी चौकशा यामुळे वैतागून, हताश होते, चिडते. ' जी करता हैं चाय का कप फेकू उसके चेहरेपे' अशा शब्दात आपला संताप व्यक्तही करते. आयेशा टाकियाचा या दृश्यातला अभिनय इतका उत्स्फुर्त होता की असंख्य तरुणी एका क्षणात तिच्या जागी स्वतःलाच बघायला निश्चित लागल्या असणार.

इम्तियाझचा पुढचा 'जब वी मेट' मधली नायिका वास्तवापासून, जे तिच्या मुक्त विचारसरणीच्या आड येतं त्यापासून सतत पळत रहाते. यातली गीत लग्न या प्रकाराकडे, ते सहज मोडता येते असे मानून, कॅज्युअली पहाते खरी पण नात्यांमधल्या जबाबदारीचे तिला कुठेतरी कायम भान आहे. तिच्या व्यक्तिरेखेच्या परिपक्व होत जाण्याला समांतर तिची या जबाबदारीची उमज वाढत जाते. तिला आपल्या मर्जीनेच लग्न करायचे आहे. आपल्या वागण्यामुळे ओढवलेल्या परिस्थितीला ती धैर्याने सामोरी जाते. एकटीने निभावून नेते आणि नंतर आपली चूक मान्य करण्याचं धाडस, मोकळेपणाही दाखवते. अगदी प्रत्यक्ष नायकालाही तिच्या विलक्षण सकारात्मक, मुक्त विचारसरणीतून आपल्याला आयुष्यात काय हवय, ते कसं मिळवायचं याबद्दलची एक नवी दृष्टी मिळते हे इम्तियाझने दाखवणे हा प्रकार हिंदी सिनेमाच्या पडद्यावर एक ताजी झुळूक आणणारा होता. नव्या सहस्त्रकातल्या बंडखोर, मुक्त मुलीचे चित्रण आजच्या तरुण पिढीला जवळचे, ते आपलेच आहे असे वाटल्यास नवल नाहीच.

'मैं, मेरी पत्नी और वो' मधे पत्नीच्या सुंदर रुपामुळे न्यूनगंड आलेल्या पतीच्या मनातली असुरक्षितता त्यांच्यातल्या वैवाहिक जीवनात काय काय प्रकार घडवून आणते हे पहाणं हा टिपिकल हिंदी सिनेमापेक्षा एक वेगळा अनुभव होता.

भारतीय लग्नसंस्कृतीमधे प्रेमाला कायमच दुय्यम स्थान दिले गेले आणि कुटुंबाची प्रतिष्ठा, व्यावसायिक, राजकीय हितसंबंध यांना महत्वाचे स्थान. या मानसिकतेला बळकटी आणणारी असंख्य लग्नं हिंदी सिनेमाच्या पडद्यावर आजपर्यंत आली. अशा लग्नांमधून निर्माण होणारे पती पत्नीचे नाते नक्की कोणत्या पायावर उभारले जाते, त्या नात्याची जडण घडण कशी होतं जाते याचे अलिकडच्या काळातील सुंदर चित्रण आशुतोष गोवारीकरच्या 'जोधा-अकबर' मधे दिसले.
लग्नाचा सौदा कसा केला जातो याचे चित्रण मुझफ्फर अलींच्या 'बाझार' मधे अशाच मुस्लिम पार्श्वभुमीवरच्या चित्रपटामधून फार विदारकपणे दिसले होते. ऐंशीच्या दशकात हैद्राबाद, लखनौमधल्या कोवळ्या वयातल्या मुस्लिम तरुणींचे खोटे निकाह करुन त्यांना दुबई, सौदीमधल्या श्रीमंत अरबांना विकण्याचे प्रमाण भयावह होते. त्याचे प्रतिबिंब बाझारमधे उमटले. या आणि अशाच वाईट सामाजिक चालिरितींचे चित्रण 'निकाह' (एकतर्फी तलाकची पद्धत) सारख्या सिनेमांमधूनही झाले. कोठ्यावर नाचगाणी करणार्‍या नायिकेला लग्न करुन सामाजिक प्रतिष्ठा मिळणे किती अवघड असते याचे चित्रणही मुस्लिम पार्श्वभुमीवरच्या 'पाकिझा' या नितांतसुंदर गाण्यांनी नटलेल्या सिनेमामधून या आधी झाले होते. पाकिझामधला आधीच्या पिढीच्या लग्नात परावर्तित न होऊ शकलेल्या विफल प्रेमाची दास्तां सांगत असलेला अशोककुमारचा जनाजा साहेबजानच्या गुलाबी कोठीच्या दरवाजात विसावतो आणि त्याला साक्षी ठेवून तिचा निकाह आणि बिदाई होते. पाकिझाचा हा रोमॅन्टिक, गुलाबी क्लायमॅक्स पुढे जाऊन अशा बदनाम वस्त्यांमधल्या स्त्रियांच्या पुनरुद्धाराचा मार्ग खुला करणारा वगैरे काही नक्कीच ठरला नाही. तसा तो ठरणारही नव्हताच. सिनेमांमधून अशी गोड, सुंदर स्वप्नं बघताना लोकांना छान वाटतं इतकंच. एक तर निकाह केल्याने स्त्रियांच्या मानहानीला खरंच तिलांजली मिळून तिला काही दर्जा किंवा प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते यावर कोणाचा विश्वास असेल अशी त्या समाजात परिस्थितीच निर्माण होऊ दिलेली नाही आजतागायत. निकाह केल्यावर त्या बिचार्‍या स्त्रीची अवस्था आगीतून फुफाट्यात अशीच होते.

हिंदी सिनेमांमधे पंजाबी आणि मुस्लिम कलाकारांचे, निर्माते दिग्दर्शकांचे वर्चस्व आजपर्यंत सर्वात जास्त असल्याने पडद्यावर प्रत्यक्ष दिसणारी बहुसंख्य लग्नं ही बहुसंख्य लग्नही त्याच पद्धतीची चित्रित होत राहिली. फिल्मी लग्नसोहळा म्हणजे सेहरा, लाल जोडा, सात फेरे, मांग में सिंदूर असा समज रुढ झाला तो यातूनच. अगदी क्वचित सई परांजपेंच्या 'कथा' किंवा विशाल भारद्वाजच्या अलिकडच्या 'कमिने' मधून मराठी लग्नसोहळा दिसला. 'कमिने'मधे मराठी नववधूच्या वेशातली नाचणारी प्रियान्का गोड आणि त्या टिपिकल लेहेंगा चुनरी वेषातल्या दुल्हनच्या रुपापेक्षा वेगळी उठून दिसली. पण अशी चित्रणं अगदीच क्वचित. बंगाली लग्न काही बंगाली दिग्दर्शकांच्या 'स्वामी, परिणिता' वगैरे सिनेमांमधून दिसली. परिणितामधले मानसिक पातळीवरचे लग्न हा एक वेगळाच लग्नाचा प्रकार. गांधर्व विवाहांपेक्षाही जास्त सुटसुटीत. भन्सालीच्या देवदासमधे एक झगमगते बंगाली लग्न दिसले. त्याच्याच 'हम दिल दे चुके सनम' मधला गुजराथी लग्नसोहळा सलमान ऐश्वर्याच्या गाण्यांमुळे जास्त लक्षात राहीला. लग्नसोहळ्यांबाबतच अजून बोलायचं तर एखादं पारशी, ख्रिश्चन लग्नं (खट्टा-मिठा, कभी हां कभी ना), एखादे तमिळ लग्न (हम है राही प्यार कें) मधूनच दिसलं हिंदी सिनेमाच्या पडद्यावर.

अगदी क्वचितच एखाद्या ' एक चादर मैली सी' सारख्या हटके सिनेमामधून पती निधनानंतर धाकट्या दिराशी लग्न करण्याच्या पंजाबमधल्या जुन्या सामाजिक चालिरीतीचे दर्शन घडते. राजिंदरसिंग बेदींच्या सशक्त कथानकामुळे सिनेमा आतपर्यंत भिडतो. गुलझारच्या 'खुशबू' मधे बालपणात लग्न ठरलेल्या दोघांचे पुढच्या आयुष्यात बदलत गेलेले नाते, समजुती-गैरसमजुतींचा खेळ, अहंकार आणि स्वाभिमानाचे ताणबाणे गुलझारने आपल्या पटकथेतल्या बारीकसारीक कंगोर्‍यांसह पडद्यावर खूप सुरेख फुलवले. खुशबूतले न बांधले जाणारे विवाहबंधन लक्षात राहीले. मानसिक आंदोलनांचे असे वैवाहिक जीवनातले हेलकावे पडद्यावर साकारावे तर ते गुलझारनेच. आंधी, इजाजत, घर, लेकीन ही काही सशक्त उदाहरणं. असे सिनेमे अधून मधून दिसत रहातात ही गोष्ट नक्कीच सुखावह. एरवी बाकी सारे नुसतेच लग्नसोहळे. तेही पंजाबी.

लग्न जुळण्याची पद्धत कोणतीही असो, लग्न होण्याची पद्धत कोणतीही असो, सुहाग रात कशीही साजरी केलेली असो.. पती पत्नींचे जीवन खर्‍या अर्थाने सुरु होते ते हे सारं पार पाडल्यानंतरच. एकमेकांना समजून घेताना, परस्परांच्या स्वभावाशी, सवयींशी जुळवून घेताना, एकमेकांसोबत आयुष्य घालवून पुढे जात रहाताना पती पत्नीचे नाते कसे बदलत जाते, मुरत जाते, कधी विखरत जाते हे जाणून घेण्यात सुजाण प्रेक्षकांना कायमच रस राहिला पण पडद्यावर मात्र त्याचं चित्रण अभावानच घडत राहीलं. विशेषतः हॉलिवुडमधले दिग्दर्शक ज्या ताकदीने या नात्यांचा वेध घेतात त्यापुढे अजूनही आपल्या हिंदी सिनेमाचे दिग्दर्शक फार कमी पडतात. १९६७ सालच्या 'बेअरफुट इन द पार्क' मधे नुकत्याच हनिमूनवरुन परतलेल्या दोघांना आपले आयुष्याकडे बघण्याचे दृष्टिकोनच किती भिन्न आहेत हे उमगते आणि तरीही आपले प्रेम एकमेकांवर आहे ते कसं काय हे जाणून घ्यायचा ते ज्या प्रकारे प्रयत्न करत रहातात ते पहाणे, ' शॅल वी डान्स' मधल्या पतीपत्नी नात्यामधल्या एकसुरीपणाला कंटाळलेल्या पण पत्नीवर मनापासून प्रेम करणार्‍या पतीने नृत्य शिकायला जावून आयुष्याकडे बघण्याच्या एक नवा दृष्टीकोन मिळवायचा प्रयत्न करणे आणि पत्नीने ते नंतर समजुदारपणे लक्षात घेणे.. किंवा अलिकडच्या ऑस्कर मिळालेल्या 'द रिव्होल्यूशनरी रोड' मधे वरवर दोघे आदर्श पती पत्नी आहेत पण जरा कातडीच्या आत डोकावून पाहिले तर तिच्या गृहकृत्यदक्ष असण्यामागे, सतत मुलांकडे आणि स्वयंपाकघरामधे लक्ष घालत रहाण्याच्या ऑब्सेशनमागे आणि त्याच्या कंटाळवाणे झालेल्या कौटुंबिक दिनक्रमाकडे उसन्या उत्साहाने रस भरत रहाण्याच्या प्रयत्नांमागे जी मानसिक आंदोलने चालेली असतात ती पडद्यावर पहाणे असो.. असे प्रत्येक अनुभव आपल्यामधली नात्यांची जाणीव समृद्ध करणारा ठरत जातात हे नक्की.

हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शकांना अशी सखोलता दाखवणं नाही जमलं. भारतीय पारंपारिक लग्नव्यवहारांनाच अशी मानसिक आत, आत घेऊन जाणारी दृष्टी अस्वस्थ करते कदाचित. ढोबळपणा त्यापेक्षा जास्त सोयीचा मग तो प्रत्यक्ष व्यवहारांमधे असो किंवा रजतपटावर.

समाज कोणताही असो, संस्कृती कोणतीही असो, लग्नसोहळे कोणत्याही पद्धतीने साजरे केलेले असोत, मानवी नातेसंबंध, पती-पत्नी नात्यांआडचे नाजूक पदर, कंगोरे सगळीकडे सारखेच असतात, नात्यांमधल्या ताण-तणावांना, आंदोलनांना सामोरे जाण्याची वेळ फक्त आपल्यावरच येत नसते.. जगभरातल्या कोणत्याही चार घरांमधल्या भिंतींआड लग्नानंतर पती पत्नींमधले नाते अशाच गतीने प्रवास करते, त्यात कधी फुलण्याचे ऋतू येतात कधी कोमेजण्याचे.. पती-पत्नी नात्यांमधली ही एक अपहार्यता आहे ही जाणीव या सार्‍या फिल्मी लग्नांनी करुन दिली, लग्नबंधनाचा अर्थ नव्याने समजावून द्यायला ही फिल्मी लग्नं कळत नकळत मदतीला आली.

'शॅल वी डान्स' मधे पत्नीच्या भुमिकेतली सुझान लग्नाचा अर्थ फार विलक्षणरित्या समजावून जाते. 'आपण नक्की लग्न कां करतो?' या प्रश्नाच उत्तर देताना ती म्हणते," आपल्या आयुष्याला एक साक्षिदार प्रत्येकाला हवा असतो. जगात कोट्यावधी माणसे रहातात.. कुणा एकाचे आयुष्य असे कितीसे महत्वाचे असणार कुणाला? पण लग्नात तुम्ही एकमेकांना परस्परांची काळजी घेण्याचे, एकमेकांवर प्रेम... दिवसेंदिवस, रोज करण्याचे वचन देता! एकमेकांच्या चांगल्या, वाईट, अगदी सामान्य गोष्टींचीही काळजी करण्याचं, त्यांकडे लक्ष देण्याचं तुम्ही कबूल करता. तुम्हाला एक खात्री मिळते. आपलं आयुष्य अगदीच दुर्लक्षित, बिनमहत्वाचं नाही जाणार.. असं कोणीतरी आहे आपल्या आयुष्यात ज्याच्या दृष्टीने या गोष्टी महत्वाच्या आहेत.. कोणीतरी एक आपल्या आयुष्याचा साक्षिदार आहे!"

अशी ही फिल्मी लग्न. काही इथली, काही तिथली. पती पत्नींच्या संपूर्ण सहजीवनातील नातेसंबंधाचा पट एका वाक्यात उलगडवून दाखवण्याची ताकद असणारी.. कायम बदलत्या समाजसंस्कृतीचे पदर पुढच्या काळातही अशाच तरलतेने, अधिक सखोलतेने आपल्यापुढे पडद्यावरुन येत रहातील.

=================================================

सिनेमा आणि संस्कृती- पुढचा खेळ.. लवकरच येत आहे Proud

भाग २ "हम सब एक है?" अर्थात 'मुस्लिम सोशल्स'..

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शर्मिला, एकेका चित्रपटावर लिहावे असा हा विषय आहे.
मी गुझारिश मधल्या लग्नाचा पण अवश्य उल्लेख करेन. काहिही अर्थ नसलेले असे ते लग्न, पण दोघांसाठी अत्यंत महत्वाचे. तिचा प्रस्ताव, त्याचे प्रपोजल आणि त्याची पार्टी.. मी परत परत ते प्रसंग सिडीवर बघतो.

मुस्लीम सोशल्स, आता दिसत नाहीत ते ! आताच्या चित्रपटातील मुस्लीम पात्रे जरा वेगळीच असतात.

"...कोणीतरी एक आपल्या आयुष्याचा साक्षिदार आहे!"..."

~ तीन भागानंतर आता या विषयावर प्रतिक्रिया देताना एक विलक्षण अशा आनंदाची अनुभूती येत आहे...ती अशासाठी की आतापर्यंत चित्रपट म्हटला की, कथा, अभिनय, चित्रण, वेग, निर्मितीमूल्ये आणि सर्वात शेवटी दिग्दर्शन या रिंगणातच वैचारिक पालखी नाचायची. पण आता 'लग्न' हा विषय घेऊन लेखिकेने ज्या समर्थपणे आपले या संदर्भातील विचार प्रकटले आहेत ते त्या त्या चित्रपटाकडे नव्याने पाहाण्याची दृष्टी वाचकाच्या मनी निर्माण करतात.

पतीपत्नीमधील ताणतणाव हे काही फक्त 'सासर'च्या मंडळीचे वर्तन इतक्याच ठेक्यावर अडकून पडत नाहीत, हे लेखिकेने दिलेल्या काही उदाहरणावरून स्पष्ट होते. "कोरा कागज' मधील मुलीच्या संसारात नको तितकी लुडबूड करणारी तिची आई, आपण आपल्या वर्तणुकीमुळे आपल्याच मुलीच्या लग्नाची वाट लावतोय याचे भान ठेवीत नाही आणि तिला "जावयाने पगार कमी असताना इतक्या महागाची वस्तू का आणली?" या प्रश्नावर त्या दोघांनी चिडण्यासारखे काय आहे हेच मुळी तिला कळत नाही. दोघांच्या संसारात तिसरा (वा मेव्हणीच्या स्वरुपातील तिसरी) बिलकुल खपत नाही, हे वारंवार चित्रपटातून दाखविले आहेच. (वि.स.खांडेकर यांच्या अमृतवेल कादंबरीचाही, मला वाटते, हाच विषय आहे...मैत्रीण म्हणून सोबतीला आलेली सवत बनू पाहत असताना पत्नीची होणारी घालमेल, असा काहीसा विषय).

Revolutionary Road चा शर्मिला फडके यानी केलेला उल्लेख फार उचित आहे. हाय वे च्या बाजूला कार घेऊन तिथेच लीओनार्डो कॅप्रिओ आणि केट विन्स्लेट हे जोडपे ज्या कारणावरून हमरीतुमरीवरून येऊन भांडते, ते पाहता तिथेच त्याना ऑस्कर द्यावे असे वाटते. "माझी एक कलाकार म्हणून होणारी घुसमट जर नवर्‍याला कळत नसेल तर मग या लग्नाचा हेतूच काय?" असे हताशपणे स्वतःशीच म्हणत राहिलेली केट विन्स्लेट आणि पत्नी "लई टिवटिव करत्ये, तर तिला गरोदर कर, म्हणजे बसत्ये गप्प.." असा सल्ला देणारा नवर्‍याचा मित्र....मग परत तिसर्‍यांदा गर्भारपण आल्यावर गावठी पद्धतीने गर्भपात करून घेणारी ती पत्नी....मग तिचा मृत्यु....."लग्न, लग्न म्हणतात ते हेच का?" असाच विचार करीत थिएटरबाहेर पडणारा प्रेक्षक....फार सुन्न करणारा आहे,..'रीव्होल्युशनरी रोड"....

"स्वामी' चा उल्लेख मला फार भावला. शबाना आणि गिरिश कर्नाड...एक विजोड जोडपे, शबानाच्या मनाविरूद्धचे ते लग्न....पण असे असले तरी, एरव्ही नवर्‍याला जवळ न येऊ देणारी, एक भारतीय स्त्री या नात्याने आपल्या नवर्‍याचा त्या भरल्या घरात होणारा अपमान सहन न करणारी नारी. तर पतीही किती सोशीक असू शकतो हे दाखविणारा कर्नाड यांचा संयत अभिनय.

संयत अभिनयाचे असेच एक उदाहरण म्हणजे "मॅट्रिक्स फेम' कीऑनू रीव्हजचा A Walk in the Clouds. ज्या परिस्थितीत त्याला व्हिक्टोरियाशी लग्न करणे भाग पडते, किंवा अवघडलेल्या स्थितीत ती खुद्द त्यालाच पती म्हणून निवडते, आणि अगदी पारंपारिक भारतीय पद्धतीनुसार 'आपल्या कुळाला बट्टा लावणारी पोरगी' म्हणून त्या जमिनदार फॅमिलीने रीव्हजला सुरूवातीला न स्वीकारणे आणि मग त्याने आपल्या कृत्याने त्यांचे मन जिंकणे...सारेच मोहक.

फार सुंदर आहे हा विषय....आणि जितके लिहिले जाईल तितके कमीच.

वाचनाचा एक आनंददायी अनुभव दिल्याबद्दल शर्मिला फडके यांचे अभिनंदन.

मस्त झालाय हा ही भाग.. Happy

सोचा ना था आणि जब वी मेट हे दोन्ही चित्रपट खूप आवडले होते.. शेवटचा 'शॅल वी डान्स' मधला पॅरापण सही आहे !

तिसरा भागही वाचून झाला.

सिनेमातल्या लग्नांचा आढावा अतिशय छान गेलाय. किंबहुना सिनेमातली लग्नसंस्कृतीचा हा आढावा किंवा डॉक्युमेंट म्हणता येईल. एक लेख म्हणून त्याला निश्चितच मर्यादा आहेत. पण या विषयात एखाद्या पुस्तकाची बीजं दडलेली आहेत हे जाणवलं.

भारतिय संस्कृतीत लग्नाला जास्त महत्व होतं, प्रेमाला नाही या निरीक्षणाला अनुमोदन. सिनेमानेच या मानसिकतेत बदल घडवून आणला असं वाटतं. नायिकेची घुसमट दाखवणारे काही सिनेमे प्रेक्षकांचं लोकशिक्षण करून गेलेत. गुलजार सारख्या संवेदनशील दिग्दर्शकाने स्त्री-पुरूष संबंध आणि अहं या विषयांवर आपल्या सिनेमातून सुंदर भाष्य केलंय.

सिनेमाचा संस्कृतीवर परिणाम ( लग्नाच्या संदर्भात ) या भागावर आणखी लिखाण अपेक्षित आहे.

शर्मिला, 'अभिमान' राहिला. Happy
तसाच मधे एक पार्टनर स्वॉपिंगवर आलेला - नाव आठवत नाही मला, पण रजत कपूर, कोंकना वगैरे होते.
'मिस्टर अँड मिसेस अय्यर'चाही उल्लेख हवाच हवा. Happy
आणि 'हनिमून ट्रॅव्हल्स'? 'मेट्रो'?

शर्मिला, मस्त वाटतायत हे तिन्ही भाग Happy (पण तीनच का आहेत?) अजून खूप चित्रपट आहेत की गं - जसं की
27.Dresses, मातीच्या चुली

कल्पना नाही पण स्वाती तू कदाचित Mixed Doubles बद्दल बोलताहेस... http://www.telegraphindia.com/1050728/asp/calcutta/story_4974194.asp

@ सायो....थॅन्क्स फॉर अप्रेसिएशन.
हा विषयच असा आहे की, कितीही लिहिले/बोलले/वाचले तरीही याचे आकर्षण कमी होत नाही.
तसेच "जब वुई मेट..." बद्दलही मत व्यक्त करता येईल. करीना कपूरच्या चित्रपट करीअरबाबत कितीही आणि कुणीही काहीही मत व्यक्त केले तरी या एकमेव चित्रपटामुळे ती सदैव लक्षात राहिल. "भटिंडा की सिखनी..." धमालच.

यातील "मनजीत" हा नवरा नको म्हणून या नवरीने लढविलेली शक्कल भन्नाटच.

शर्मिला हा भाग पण खूप आवडला.
स्वाती तू म्हणतेस तो सिनेमा Mixed Doubles.
अभय देओल आणि आयेशा ताकीया यांचा सोचा न था मला खूप आवडला होता तसच जब वी मेट सुद्धा.

मस्तच

किंवा अलिकडच्या ऑस्कर मिळालेल्या 'द रिव्होल्यूशनरी रोड' मधे वरवर दोघे आदर्श पती पत्नी आहेत

ya movie la kontahi oscar milalela nahi...

'शॅल वी डान्स' याचा हाच सन्देश मला आठवड्यात आवडला आणि आज तुमचा लेख वाचला. किती चपखल वर्णन आहे खर्या परिस्थितिचे!

'शॅल वी डान्स' मधे पत्नीच्या भुमिकेतली सुझान लग्नाचा अर्थ फार विलक्षणरित्या समजावून जाते.>>> अगदी अगदी.