रव्याचा केक- पारंपारिक पद्धतीने

Submitted by प्रज्ञा९ on 4 July, 2013 - 08:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

दीड वाटी रवा. बारीक किंवा उपम्याचा- कोणताही.
एक वाटी दूध
एक वाटी गोड दही
एक ते दीड वाटी साखर
अर्धी वाटी तूप किंवा लोणी.
अर्धा टीस्पून खायचा सोडा
रंग, इसेन्स आवडीनुसार
सुकामेवा

क्रमवार पाककृती: 

-रवा हलका भाजून घ्या. उपम्याला लागतो तितका जास्त नाही, नीट गरम झाला, शेकला गेला की गॅस बंद करा.
-दह्यात साखर घालून फेटून घ्या. आधी एक वाटी साखर घालून थोडं चाखून मग हवी तर अजून साखर घाला. दही गोड असेल आणि केकचा गोडवा बेताचाच हवा असेल तर एक वाटी साखर पुरेल.
-दही नीट एकजीव झाल्यावर त्यात शेकलेला रवा, दूध, तूप, खायचा सोडा घालून नीट मिसळून अर्धा तास मिश्रण मुरवत ठेवा.
-अर्ध्या तासाने रंग आणि इसेन्स घालणार असाल तर घाला. सुकामेवा केकमधे हवा तर मिश्रणात घाला.
-नॉन स्टिक पॅनला तुपाचा हात लावून मिश्रण त्यात ओता आणि मंद आंचेवर पॅन ठेवा. झाकण ठेवा. मधे मधे झाकण काढून जमा झालेली वाफ जाऊ द्या.
-खरपूस छान वास आला की केकमधे सुरी घालून बघा. सुरी कोरडी आली की केक तयार!

IMG_4472.JPG

वाढणी/प्रमाण: 
खाल तसा! :)
अधिक टिपा: 

-मी हार्ड अ‍ॅनोडईझ्ड पॅनमधे केला. तो पॅन एकदा तापला की सगळीकडूनच छान भाजला जातो केक आणि लवकरही होतो असा माझा अनुभव. त्यामुळे केकसाठी लागणारा वेळ पॅनवरही अवलंबून आहे (तरी २०-२५ मिनिटं अंदाजे). मी दिलेला वेळ तयारीसकट मला लागलेला वेळ आहे.
-सुकामेवा मला पॅनच्या तळाशी नीट सजवून वर मिश्रण घालायचं होतं, पण आयत्या वेळी विसरले. आणि सजावट नीट झाली तरी मिश्रण ओतल्यावर ती फिसकटली तर दुरुस्तीचा(!!!) व्याप होईल अशी भीती, म्हणून पुन्हा केला तेव्हा अस्साच केला! वरून काजू लावले फक्त. त्यामुळे इथे तुम्ही तुमची कल्पकता वगैरे वापरालच! Proud त्याचे फोटो तुम्हीच टाका.
-ही अगदी बेसिक आणि तरीही खूप मस्त पाकृ आहे!

माहितीचा स्रोत: 
आई, रुचिरा हे पुस्तक, दिनेशदांची अधिक माहिती आणि मी केलेले थोडेफार बदल.
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त केक आहे, करावासा वाटतोय.
हा वरील केक केकच्या (वाळू असलेल्या ) भांड्यात केला आहे का?
अ‍ॅनोडईझ्ड पॅनमधे म्हणजे वाळू शिवाय का?

मी अनिश्का | 5 July, 2013 - 00:41
प्राजक्ता | >>>>>>>>. हा हार्ट शेप चा पॅन मधे केला की अवन मधे????>>> अव्हन मधे
३५० फॅ ला केला होता हा जुना फोटो आहे.

प्राजक्ता | >>>>>>>>. हा हार्ट शेप चा पॅन मधे केला की अवन मधे????>>> अव्हन मधे
३५० फॅ ला केला होता हा जुना फोटो आहे.>>>>>>>>>>> तरीच मला वाटलचं ..मस्त आहे.. Happy

मंद आच म्हणजे अगदीच मिनिमम ठेवायचीय का? मी नॉनस्टिकमध्ये करते पण माझा १० मिनिटांत होतो आणि खालून काळपट दिसतो. चवीला उत्तम असला तरी खालच्या बाजूला खमंग लागतो. जरा जाड बुडाचं भांडं किंवा अ‍ॅनोडाईझ्डच वापरु का?

दोघींचे केक मस्त आहेत.

एकदम मस्त केक... Happy
अ‍ॅनोडाएझ्ड पॅन म्हणजे हार्ड पॅन ना?
साध्या नॉन स्टिक पॅन मध्ये केला तर होइल काय?
रव्याच exact प्रमाण कळाले नाहि ..

खालून काळपट दिसतो. >>> तवा चांगला तापवून गॅस बारीक करून त्यावर केकचं भांडं ठेवायचं आणि भांड्यावर झाकण ठेवायचं. म्हणजे केक खालून करपत नाही. उत्साह ओसंडून वाहत असेल तर झाकणावर चांगले तापवलेले निखारे ठेवायचे, म्हणजे केकची वरची बाजूही खमंग होते.

तवा चांगला तापवून गॅस बारीक करून त्यावर केकचं भांडं ठेवायचं >> आपलं नेहमीचं अ‍ॅल्युमिनीयमचं भांड चालेल का? ते चालत असेल तर कुकरचा अ‍ॅल्युमिनीयमचा डबाही चालेल ना Uhoh

उत्साह ओसंडून वाहत असेल तर झाकणावर चांगले तापवलेले निखारे ठेवायचे, म्हणजे केकची वरची बाजूही खमंग होते.>>>>>>>>>>>:)

माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या कुणीतरी...अ‍ॅनोडईझ्ड पॅनमधे मधे वाळू शिवाय का? म्हणजे डायरेक्ट गॅस वर पॅन ठेवायचा?

*

खुपच साधा, सोपा तरिही टेम्प्टिन्ग केक आहे. Happy
करुन बघेन. प्रिन्ट काढुन घेउन जाइन घरी.

माझ्या घरी हार्ड अ‍ॅनोडाइज्ड पॅन आहे पण खोलगट शेपची आहे.
ते कसं मॅनेज करावं कळेना.

वाळूशिवाय का? म्हणजे काय ते समजलं नाही.>> त्याना त्या पॅन मध्ये वाळु घालायची का खाली असा प्रश्न पडलाय बहुतेक.


सुकामेवा मला पॅनच्या तळाशी नीट सजवून वर मिश्रण घालायचं होतं, पण आयत्या वेळी विसरले
.>>> वाळु वापरली आहे असं ह्या वाक्यावरुन्तरी वाटत नाही.

झक्या!!!! पॅनमध्ये वाळू कशी टाकून चालेल? वाळूची सजावट करणारेस का? ती वाळू तापत टाकलेल्या तव्यावर घालायची आणि त्यावर पॅन ठेवायचा.

सुरमयी, तव्यावर ठेवणार असशील तर कूकरचा हिंडालियमचा डबा चालावा.

Pages