ते दुसरे काहीही नव्हते....

Submitted by वैवकु on 30 June, 2013 - 07:36

सरत्या आयुष्यातुन गाठी उरलेला संचय होते
हा क्षण तू भलेपणाने जग ह्याचीच पुढे सय होते

तू मला दिलेल्या मिठ्या तुला निर्जीव वाटल्या असतिल
पण 'तशी' स्पंदने जपण्याचे कोठे माझे वय होते

मी ओळखले इथल्या देवांची सुटका झाली आहे
...त्या गावाच्या वेशीपाशी पडके देवालय होते

मी कवेमधे आकाश घ्यायला कधीच गेलो नाही
माहित होते असणे माझे अट्टल मातीमय होते

कार्यारंभीचा ऊर्जाभारित उरक विलक्षण असतो
थोड्यावेळानंतर हातुन सवयीने हयगय होते

विठ्ठल माझ्या गझलेमध्ये अन् ती त्याच्यात दिसावी
हे माझ्या आयुष्याचे निव्वळ दोनच आशय होते

मेल्यानंतर कळले जी हुरहुर श्वासांमधली सुटली
ते दुसरे काहीही नव्हते साधे जीवनभय होते

____________________________

मतला पूर्ण करण्यासाठी बेफीजींनी मदत केली दुसरी ओळ त्यांनी सांगितली त्यावरून मग मी मतला तयार केला आहे
...त्यांचे मनःपूर्वक आभार

~वैवकु Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कार्यारंभीचा ऊर्जाभारित उरक विलक्षण असतो
थोड्यावेळानंतर हातुन सवयीने हयगय होते<<हे बर्याचदा अनुभवलेय...अतिशय बोलका शेर.!

तू मला दिलेल्या मिठ्या तुला निर्जीव
वाटल्या असतिल
पण 'तशी' स्पंदने जपण्याचे ....कोठे माझे वय होते<<टाळ्या! ( मी माझ्या वयाच्या हिशोबाने वाचला Wink चु.भू.द्या घ्या.)

मी ओळखले इथल्या देवांची सुटका झाली आहे
...त्या गावाच्या वेशीपाशी.... पडके देवालय होते<< वा!

एकंदर सुंदर गझल.....

धन्यवाद!!

जरा विस्तृत प्रतिसाद देतो वैभव.

सरत्या आयुष्यातुन गाठी उरलेला संचय होते
हा क्षण तू भलेपणाने जग ह्याचीच पुढे सय होते>>> दुसरी ओळच आवडली!

तू मला दिलेल्या मिठ्या तुला निर्जीव वाटल्या असतिल
पण 'तशी' स्पंदने जपण्याचे ....कोठे माझे वय होते>>> इथेही पहिली ओळ कमजोर वाटली. शेरात शक्यतो पहिली ओळ लिहीणे अधिक अवघड आणि जबाबदारीचे असते हा अनुभव पुन्हा आला. आशय चांगला आहे शेराचा.

मी ओळखले इथल्या देवांची सुटका झाली आहे
...त्या गावाच्या वेशीपाशी.... पडके देवालय होते>>> दिसायला भारी आहे हा शेर.

मी कवेमधे आकाश घ्यायला कधीच गेलो नाही
माहित होते असणे माझे अट्टल मातीमय होते>>> मस्त तरीही अनेक वेळा आलेला खयाल.

कार्यारंभीचा ऊर्जाभारित उरक विलक्षण असतो
थोड्यावेळानंतर हातुन सवयीने हयगय होते>>> प्रवाहात सुचल्यासारखा.

विठ्ठल माझ्या गझलेमध्ये अन् ती त्याच्यात दिसावी
हे माझ्या आयुष्याचे निव्वळ दोनच आशय होते>> व्वा व्वा!

मेल्यानंतर कळले जी हुरहुर श्वासांमधली सुटली
ते दुसरे काहीही नव्हते साधे जीवनभय होते>>> चांगला शेर

गझल चांगली झाली आहे.

अनेक डॉट डॉट डॉट देऊन दिसायला विद्रुप केलीये असे एक मत.

अनेक शुभेच्छा!

एकंदरीत चांगली गझल.

वयाचा शेर फारच सुंदर झाला आहे.
(पण हे "असले" शेर आवडले म्हणायचे माझे वय नसल्याने आवडला म्हणू शकत नाही. Wink )

विठ्ठल माझ्या गझलेमध्ये अन् ती त्याच्यात दिसावी
हे माझ्या आयुष्याचे निव्वळ दोनच आशय होते

या शेरात ती म्हणजे गझल आहे, म्हणून हाही शेर चांगला म्हणतोय.

कार्यारंभीचा ऊर्जाभारित उरक विलक्षण असतो
थोड्यावेळानंतर हातुन सवयीने हयगय होते

वा !!! खुप आवडला हा शेर.

<<विठ्ठल माझ्या गझलेमध्ये अन् ती त्याच्यात दिसावी
हे माझ्या आयुष्याचे निव्वळ दोनच आशय होते>>
फार आवडला,
सुंदर रचना

अमेयशी सहमत.
मी कवेमधे आकाश घ्यायला कधीच गेलो नाही
माहित होते असणे माझे अट्टल मातीमय होते

कार्यारंभीचा ऊर्जाभारित उरक विलक्षण असतो
थोड्यावेळानंतर हातुन सवयीने हयगय होते

विठ्ठल माझ्या गझलेमध्ये अन् ती त्याच्यात दिसावी
हे माझ्या आयुष्याचे निव्वळ दोनच आशय होते

हे शेर खूप अपील झाले.. पु.ले.शु.

मी कवेमधे आकाश घ्यायला कधीच गेलो नाही
माहित होते असणे माझे अट्टल मातीमय होते

कार्यारंभीचा ऊर्जाभारित उरक विलक्षण असतो
थोड्यावेळानंतर हातुन सवयीने हयगय होते

विठ्ठल माझ्या गझलेमध्ये अन् ती त्याच्यात दिसावी
हे माझ्या आयुष्याचे निव्वळ दोनच आशय होते

मेल्यानंतर कळले जी हुरहुर श्वासांमधली सुटली
ते दुसरे काहीही नव्हते साधे जीवनभय होते <<<

शेर आवडले. विदिपांचा प्रतिसाद अजून पूर्ण वाचू शकलेलो नाही. तो वाचून पुन्हा विचार करून काही वाटल्यास लिहीन. शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

सुंदर..

लिहीत रहा!!

मी ओळखले इथल्या देवांची सुटका झाली आहे
...त्या गावाच्या वेशीपाशी पडके देवालय होते ... घोळ लक्षात यावा

सर्वांचे मन:पूर्वक आभार
सर्व निरिक्षणे + सूचना मनात नोंदवून घेतल्या आहेत ...माझ्यापरीने सुधारणा घडवण्याचा जास्तित्जास्त प्रयत्न करीन
पुनश्च धन्यवाद !!!

वैभव ,एकाहून एक सुंदर रचना येत आहेत.खर तर मी गझल वर प्रतिसाद टाळतो .कारण मी गझल फारशी अभ्यासली ,लिहली नाही.(सुरवातीला मला ती नाटकी वाटायची ,अर्थात ते माझे मत मी बदलले आहे,)
मला असे वाटते भक्तीची आर्तता तुमच्यात असल्याने तुमच्या गझल उत्कृष्ट होत आहेत .ले .शु.

गझल आवडली... पुढील शेर खास-

तू मला दिलेल्या मिठ्या तुला निर्जीव वाटल्या असतिल
पण 'तशी' स्पंदने जपण्याचे कोठे माझे वय होते

मेल्यानंतर कळले जी हुरहुर श्वासांमधली सुटली
ते दुसरे काहीही नव्हते साधे जीवनभय होते

मेल्यानंतर कळले जी हुरहुर श्वासांमधली सुटली
ते दुसरे काहीही नव्हते साधे जीवनभय होते

छान. विशेषतः दुसरी ओळ.
शुभेच्छा.

मस्त वैवकु.
३, ५, आणि शेवटचे दोन खुप आवडले. तशी सगळी गझल मस्तच.
पण शब्द थोडे सहज आल्यासारखे नाहि वाटले. म्हणजे अवघड शब्द आणि त्यांचा फ्लो पण झिग्झॅग. त्यामुळं मीटर आहे हे कळायला परत परत वाचावं लागतं.
हे प्लीज सामान्य वाचकाचे मत समजावे. गझलेतलं काही कळत नसून बोलते आहे (असं मागे कुणीतरी म्हणालं होतं. ( त्यावरून आठवलं, सर दिसले नाहीत पहिल्या पानावर.) )