थैमान

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 21 June, 2013 - 07:24

बाहेर पावसाने, थैमान घातलेले
हृदयात आठवांचे काहूर पेटलेले

झड लागली कधीची, थांबेचना कशाने
आक्रोश हा घनांचा, आभाळ फाटलेले

अश्रूस पूर येता, दु:खास कोंब आले
बहरेल दु:ख माझे, अश्रूत पोसलेले

वैराण भावनांच्या, होळीत खाक झाले
डोळ्यात आटलेल्या, नवस्वप्न पोळलेले

दु:खात वेढलेल्या, या झोपडीत माझ्या
परतेल का पुन्हा सुख, दारात थांबलेले

जयश्री अंबासकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली !!!
बहुधा अशा गझल ना गायनानुकूल गझल म्हण्तात ...नक्की माहीत नाही पण बहुतेक म्हणतात

वैराण भावनांच्या, होळीत खाक झाले
डोळ्यात आटलेल्या, नवस्वप्न पोळलेले
(<<<<शब्दक्रम जरा गडबड्लाय किंवा >>डोळ्यात आटलेले<< असे काहीसे हवे )

दु:खात वेढलेल्या, या झोपडीत माझ्या
परतेल का पुन्हा सुख, दारात थांबलेले

हा मला जास्त आवडला. Happy

----------------------------
डोळ्यात आटलेल्या, नवस्वप्न पोळलेले
डोळ्यात आटलेले, नवस्वप्न पोळलेले

माझ्या अंदाजाप्रमाणे वरील दोन्ही मिसर्‍यांचे अर्थ वेगवेगळे निघतील.

आटलेल्या डोळ्यात
आणि
नवस्वप्न आटलेले

अशा वेगवेगळ्या अंगाने अर्थ जातात.

वैभव, अमित, अरविंद, गंगाधर........ मनापासून धन्यवाद Happy

डोळ्यात आटलेल्या आणि डोळ्यात आटलेले......हे दोन वेगळे अर्थ आहेत.

गझल मूड सांभाळणारी व गझलेच्या प्रकृतीस पोषक अशीच, तसेच वैवकु म्हणतात तशी गायनानुकूल आहे.

बाकी खयालांमध्ये थोडे हटकेपण हवे होते असा लहान तोंडी मोठा घास घेऊन थांबतो.

चु भु द्या घ्या

बाहेर पावसाने, थैमान घातलेले
हृदयात आठवांचे काहूर पेटलेले>> घातलेले व पेटलेले नाही आवडले --- त्या ऐवजी घातलेले , दाटलेले बरे वाटेल, वै. म.

मग माझा शब्दक्रम हा मुद्दा योग्यच म्हणावा असा!
सुट -सुटीत -पणा -साठी असे करता येईल ... (:))

डोळ्यात आटलेल्या वैराण भावनांच्या ;
होळीत खाक झाले... नवस्वप्न पोळलेले

चूक भूल द्यावी घ्यावी !!

बेफिकीर..... सुचवत जा हो...... मोकळेपणाने सांगितलं तर अधिक आवडेल Happy

बंडोपंत,,,,, ह्म्म्म !! बाहेर पाऊस असून सुद्धा आत पेटलंय असं म्हणायहं होतं Happy

वैभव...... तू सुचवलेला बदल आवडेश Happy

धन्यवाद मंडळी Happy