शस्त्र घ्यायला हवे

Submitted by अभय आर्वीकर on 4 June, 2013 - 00:00

शस्त्र घ्यायला हवे

श्वापदे पिसाळलीत शस्त्र घ्यायला हवे
झोपले असेल शेत जागवायला हवे

ठाकली टपून चोच टोचण्यास पाखरे
टोचल्या फळास ठीक सावरायला हवे

शीग येइना कधीच पायलीस का इथे?
कोण लाटतोय रास आकळायला हवे

भेद शासका कशास नागरी व गावठी?
वाटणे निधी समान हे शिकायला हवे

लोकराज्य कल्पनेत शासकास चाकरी
सेवकासमान त्यांस वागवायला हवे

कालचे तुफानग्रस्त सज्ज होतसे पुन्हा
झेप घेत उंच-उंच बागडायला हवे

तेच तेच रोग आणि त्याच त्याच औषधी
एकदा तरी निदान नीट व्हायला हवे

वाटते मनास फक्त एवढेच जीवना
की तुझ्यात एकमुस्त चिंब न्हायला हवे

पेरले 'अभय' अनेक बीज जाणतोस तू
हे प्रभो! निदान एक अंकुरायला हवे

                           - गंगाधर मुटे 'अभय'
----------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवांतर शेर :

बेफिकीरि त्यागुनी कणखर व्हायला हवे
झोपले असेल डॉक जागवायला हवे

ठाकले टपून चोच टोचण्यास तज्ज्ञ हे
टोचल्या उल्यास ठीक सावरायला हवे

शेर होइना कधीच वाटतेय का तुला?
कोण पाडतोय गझल आकळायला हवे
-----------------------------------------------

अवांतर शेर<< Lol

सर्व शेर आवडले अनेक शेर फारच जबरदस्त वाटले सर

झोपले असेल शेत जागवायला हवे<<<ही ओळ
आणि
लोकराज्य कल्पनेत शासकास चाकरी
सेवकासमान त्यांस वागवायला हवे<<<<<हा शेर ......

यावरून ही कविता आठवली...........झोपलेला देश आता जागवाया पाहिजे

मुटेशैलीतली आणखी एक आवडलेली गझल

सामाजिक आशय प्रभावीपणे उतरला आहे.

"लोकराज्य कल्पनेत शासकास चाकरी
सेवकासमान त्यांस वागवायला हवे" >>> हा शेर सर्वात खासच.

छान आशयपूर्ण (फक्त शेवटची दोन कडवी नसती तरी चालले असते, ती विषयापासून फटकून वाटताहेत)
[ता.क. मला गझलेतले वा कोणत्याच काव्यप्रकारातले काही समजत नाही, केवळ अर्थाच्या आशयानुरुप समजते/भावते]

भेद शासका कशास नागरी व गावठी?
वाटणे निधी समान हे शिकायला हवे

लोकराज्य कल्पनेत शासकास चाकरी
सेवकासमान त्यांस वागवायला हवे>>>
आवडले..

अवांतर शेरही भन्नाट!

ेशीग आणि पायली म्हणजे काय?
शब्द परिचयाचे नसल्याने विचारत आहे.कृ.गै.न.:)

ढोबळमानाने शब्दांचा भावार्थ.

पायली = धान्य मोजायचे एक प्रकारचे भांडे
शीग = धान्य पुरेपूर भरल्यानंतर पायलीच्या वर निर्माण होते त्या धान्याच्या निमुळत्या टोकाचा टोकदार भाग.

ओ ..हो ..
समजले मुटेसाहेब!
आता तो शेर नीट समजला.
धन्यवाद!

मुटेसाहेब!<<<< ते साहेब नाहीत सर आहेत सर ! मु-टे-स-र !!!

आपले देवसर होते किनै तसे !!!!!!
बरका खुरसाले लक्षात असूद्या Happy

अरविंदराव, विदिपा, वैवकु, उल्हासजी, लिम्बुटिम्बूजी, सुशांतराव

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

* * *
लिम्बुटिम्बूजी,

माझ्या आजवरच्या कवितेवर मिळालेला तुमचा हा बहुतेक चवथा प्रतिसाद आहे. तुम्ही सहसा कवितेला प्रतिसाद देत नाहीत. पण मला तुमच्याकडून जे प्रतिसाद मिळालेत ते सुदैवाने वेगवेगळ्या महत्वाच्या टप्प्यांवर मिळालेले आहेत. त्यामुळे त्याचा मला काव्यलेखनाची दिशा ठरविण्यासाठी फार उपयोग झाला.

आज सुद्धा मी काव्यलेखनाच्या एका नव्या टप्प्याच्या दिशेने निघालेलो आहे आणि तुमचा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या प्रतिसादाचे मोल माझ्यासाठी विशेष आहे.

परत एकदा धन्यवाद. Happy