कुठलाही धंदा सुरु केला आणि एक वर्ष झालं की रिव्ह्यु करण्याची पद्धत आहे. माझं लेखनाचं दुकान, दुकान पेक्षा टपरीच म्हणा हवं तर सुरु करुन बघता बघता एक वर्ष झालं. कवठीचाफाचा एक मस्त विनोदी लेख थोपुवर कोणीतरी पेस्ट केला होता; तो वाचण्यात आला(आता त्याच्या लेखामुळे मी इथे आलो म्हणुन कचाला शिव्या देउ नका), नंतर कळले की तो लेख मायबोलीवर लिहिण्यात आला आहे. आता मुळ मार्केटचाच पत्ता सापडल्याने इथे आलो आणि छोटीशी टपरी टाकली. इथल्या भाउगर्दीत, मोठ्या मोठ्या व्यापार्यांच्या गर्दीत हरवता हरवता सापडत राहिली ही टपरी. तसं मायबोलीवर इतर बरेच दुकानं आहेत लेखनाची. काही काही तर ठोक सामान/लेख/गझलांची दुकाने आहेत. शेवटी डिमांड सप्लाय हे ही गणित आहेच त्यामागे. तर मुद्दा असा की माझी लेखनाची टपरी अशीच उन वारा प्रतिसाद स्मायलीज विपु टिका खात आणि देत टिकुन राहिली. आमचे परम मित्र श्री रा रा अॅडमिन यांचेही लक्ष गेले नाही, अर्थात चिखल्यानेही फार दंगा केला नाहीच म्हणा.
आता या टपरीला एक वर्ष झालं आणि असं वाटलं होउन जाउद्या एखादा रिव्यु. चिखल्याच्या टपरीत फारसा जिन्नस कधीच नव्हता. टपरीत मावेल इतकेच लेख आणले. कधी पब्लिकला आवडले आणि कधी नाही आवडले. बर्याचदा साधारण क्वालिटीचा माल असावा. रस्ते का माल सस्तेमे, त्यामुळे नेहमीच नो गॅरंटी. ३० आकडा म्हण्जे छप्पर फाडके वाटला नेहमीच. कधी कधी दाद चा प्रतिसाद यायचा आणि भारी वाटायचं. एकदा अजय चा प्रतिसाद आला. मार्केट ज्यांनी वसवले त्यांचाच प्रतिसाद आलाय म्हटल्यावर सोनेपे सुहागा. (रच्याकने सोनेपे सुहागा म्हण्जे सोन्यावर सु आणि हागा, आईगं) एका भाषेतल्या चांगल्या शब्दाचाही कसा अर्थ निघु शकतो दुसर्या भाषेत. असो. इथले शब्द रच्याकने, हेमोशेपो इ इ शिकता शिकता अडखळलो, धडपडलो पण रुळलोही. पण जम कधी बसलाच नाही अर्थात तो हेतुही कधीच नव्हता. अर्थात चिखल्या नाव असलेल्या व्यक्तीकडुन फारशा अपेक्षा करणही चुकच आहे म्हणा. एकदा यशस्विनी यांनी 'माझे आवडते आयडी' की अशाच कुठल्यातरी धाग्यावर चिखल्याचा उल्लेख केला त्यादिवशी मी टपरीवर लाईटिंग केली आणि चा पाजला सगळ्यांना. पण असे प्रसंग कमीच आले चिखल्याच्या वाट्याला.
बाबांच्या वाढदिवसाला जे पत्र लिहिले त्यापेक्षा त्यावरचे प्रतिसाद वाचुन त्यांना जो आनंद झाला तेव्हा मलाही अतिशय भारी वाटलं. भारतरत्न पुनम पांडे, दाग, चित्तरकल्ला, माबो गटग(१२/१२) इ इ लेख. ठराविक स्मायलीज आणि ठराविक प्रतिसादक. एकदम अनोळखी प्रतिसाद यायचे, मग आवर्जुन त्यांच्या प्रोफाईलला भेट देणे व्हायचेच. एकदा हळदीकुंकु उरकुन घेतो. सर्व स्मायली, प्रतिसाद इ इ तसेच प्रतिसादक यांचे आभार.
अमानवीयच्या निमित्ताने पुन्हा एकदा शेवटचा म्हणुन काही माल आणला. आता पुनर्जन्म नको. हवी आहे ती मुक्ती, कुठेही गुंतायच्या आत बाहेर पडलेले केव्हाही चांगले. आणि सरकारी धोरणेही आजकाल एफडीआयला साथ देणारी. आता इथे मोठे मोठे प्रतिभावंत येणार, मोठे मॉल येणार, आणि चिखल्याची टपरी अतिक्रमण म्ह्णुन काढली जाणार. सुटबुट, जीन्स मधली जनता हायफाय बोलणार आणि एसीमध्ये शॉपिंग करणार. चिखल्याच्या टपरीत मात्र एसी नाही. एक छोटासा पंखा तोही कुरकुर करत हवा फेकणार. पब्लिकला आज टपरी डाउनमार्केट वाटते, काळाचा महिमा. असो.
एक वाचक, एक ग्राहक म्ह्णुन असेलच इथे, पण टपरी मात्र बंद आता. सुरुवात केली तर कुठेतरी थांबायलाही पाहिजेच, आणि म्हणुनच इथेच थांबतो. लोभ असावा.
गुडबाय चिखल्या...
आपला
-शैलेश जोशी
मस्त... . . थांबू नये....
मस्त...
.
.
थांबू नये.... मनुष्य "रोबोट" नाही...जो चालू झाला आणि बॅटरी संपली म्हणून थांबला....
.
जे स्वत: कडे आहे ते नेहमी वाटत रहावे... कमी नाही जास्तच होते...
.
.
शेवटी निर्णय तुझा....
.
.
.(आभार मान रे... इतक्या संयमीत लिहीले मी.. . )
आता इथे मोठे मोठे प्रतिभावंत
आता इथे मोठे मोठे प्रतिभावंत येणार, मोठे मॉल येणार, आणि चिखल्याची टपरी अतिक्रमण म्ह्णुन काढली जाणार. सुटबुट, जीन्स मधली जनता हायफाय बोलणार आणि एसीमध्ये शॉपिंग करणार.
तुम्ही कशाला घाबरता? तसल्या लोकांना कुठला माल चांगला नि कुठला नाही ते कळत नाही. उगीच आपले दाखवायला कि आम्ही हायफाय लोक आहोत. पण अस्सल माल असला कि टपरी सुद्धा जोरात चालेल!! तेंव्हा चालू द्या. .
टपरीला शटर नसत त्यामूळे तूला
टपरीला शटर नसत त्यामूळे तूला शटर डाऊन नाही करता येणार. लिहीत रहा, चित्र काढत रहा आणी पोस्ट करत रहा.
अस्सल माल असला कि टपरी सुद्धा
अस्सल माल असला कि टपरी सुद्धा जोरात चालेल!! तेंव्हा चालू द्या. << ++१
जमेल तेव्हा लिहित रहावं ... आपल्यासाठी... आपल्या आनंदासाठी
चिखल्या हे काय
चिखल्या हे काय नवीनच???????????????
एन सी टी...
वो झकासराव ह्ये एन सि टी काय
वो झकासराव ह्ये एन सि टी काय असतं म्हंते मी?:अओ:
चिखल्या काय हे? आँ? टपरी फकस्त रात्रीच बंद ठिवायची आरामाकरता. बंद करु नगं.
हितं तू, चिमण, मुंगेरीलाल( कुट्ट दिसनां त्ये बी आता ) बाबुराव अशी काई मोजकी मंडली लय करमणुक करत्यात आमची. ( तेवडाच ताजा गारवा मिळतो कदी कदी )
मंग कावुन जायला बगतो रे.:राग::फिदी: पड गुमान हितच्.:खोखो:
आता इथे मोठे मोठे प्रतिभावंत
आता इथे मोठे मोठे प्रतिभावंत येणार, मोठे मॉल येणार, आणि चिखल्याची टपरी अतिक्रमण म्ह्णुन काढली जाणार. सुटबुट, जीन्स मधली जनता हायफाय बोलणार आणि एसीमध्ये शॉपिंग करणार. >> अगदी साहीर लुधियानवी मराठीत बोलल्यासारख वाटल - "कल और आयेंगे नग्मोन्की खिलती कालियान चुननेवाले, मुझसे बेहतर कहनेवाले, तुमसे बेहतर सुननेवाले."
ओय, हे शटर डाउन वगैरे काय
ओय, हे शटर डाउन वगैरे काय रे???? चालायचं नाही बर का असलं काही..
लिहित जा रे..
झकासराव ह्ये एन सि टी काय
झकासराव ह्ये एन सि टी काय असतं म्हंते मी?>>> ते शिकण्यासाठी चिखल्याला इकडे लिहित रहावे लागेल.
हे मराठी मित्रा , शटर बंद
हे मराठी मित्रा , शटर बंद वगैरे करू नकोस. टपरी वरच्या चहा ची सर मॉल मधल्या हाय-फाय CCD च्या coffee ला नाही येणार. अस्सल माल असला कि टपरी सुद्धा जोरात चालेल!! तेंव्हा चालू द्या.
कंटाळा करू नका … लोक येथे वर्षानुवर्षे पडीक आहेत. आणि अजून ही लिहित आहेत . (आम्ही वाचत आहोत. )
आँ? काय झाले एकदम? तो 'बाबा'
आँ? काय झाले एकदम? तो 'बाबा' वाला लेख आवडला होता. बाकी फारसे वाचल्याचे आठवत नाही.
अरे टेक्सन ना तू?
एक शेर आठवला... कुणी टाकला
एक शेर आठवला...
कुणी टाकला डाका तर कोणी लुटलेले आहे
या शहराचे शटर सारखे उचकटलेले आहे
--चित्तरंजन भट
चिखल्या,इतक्यात शटर डाउन नको करुस.... मायबोलीला अजून बरंच लुटायचं आहे.
रिनोव्हेशनसाठी असेल तर
रिनोव्हेशनसाठी असेल तर ठीकय... पण टपरीला रिनोव्हेशन नको रे. मस्तं हवं तेव्हा जाऊन बसावं असं ठिकाण.
उगीच काय... थांबायचं कधी अन कुठे ते कळणं हे चाकांवरच्यांना हवं. आपल्या टपरीला चाकं नाहीत अन टपरी तशी पाय लावून पळणार्यातली नव्हे.
झक्कास मुळं धरून पानापानानं पालवणार्या अन एकेका मोहोरकळीनं धुमारणार्या वेलाला कसलं आलय थांबणं?
दुसरा आयडी घेऊन येणर असशील (रिनोव्हेशन, रे) तर चालेल. नाहीतर चालूदे की... टप्परीवेअर. झकास अस्तय.