मुलाखत - श्रीमती मोनिका कुलकर्णी - संस्थापिका "आजोळ"

Submitted by संयोजक_संयुक्ता on 12 May, 2013 - 01:49

आधुनिक जमान्यात आपापल्या नोकरी-व्यवसायांत व दिनचर्येत व्यस्त असणार्‍या पालकांसाठी वरदान ठरतात ती सुसज्ज व सुविधापूर्ण पाळणाघरे! आपले मूल आपल्या अनुपस्थितीत तेवढ्याच काळजीने व मायेने वाढविले जाणे, त्याला घरात वाटणारी सुरक्षितता व आश्वासन पाळणाघरातही वाटणे आणि तेथील वातावरण हे त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक व भावनिक विकासासाठी पूरक असणे ही आजच्या काळातील पालकांची गरज आहे. जन्मदात्या मात्या-पित्यांच्या गैरहजेरीत मुलांचे मायेने संगोपन करणार्‍या संस्थांमध्ये व्यावसायिक सफाई व दर्जात्मकता आणून कालानुरूप नवा कल आणणार्‍या पुणे शहरातील पाळणाघरांमधील एक अग्रगण्य नाव म्हणजे ''आजोळ''.

पुण्याच्या मध्यवर्ती भागात, नव्या पेठेत एका टुमदार बंगल्यात सुरु झालेली ही संस्था बघता बघता आधुनिक नोकरदार पालकांच्या व सांभाळायला येणार्‍या मुलांच्या गरजा जाणून उत्तम सुविधा व वातावरण देणारी संस्था म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. आजोळ पाळणाघरासोबत संस्थेची बालक मंदिरेही आहेत व किड्स क्लब सेंटर्स देखील आहेत. आजमितीला नवी पेठ व कोथरुड येथे असणारी पाळणाघरे, विद्या मंदिर बालक शाळा व सिंहगड रोड - कोथरुड व नवी पेठ येथे चालणारे किड्स क्लब असा या संस्थेचा पसारा आहे. संस्थेच्या संस्थापिका व संचालिका श्रीमती मोनिका कुलकर्णी यांच्याशी मातृदिनाच्या निमित्ताने त्यांच्या या प्रवासाविषयी केलेला वार्तालाप :

new_aaj1.jpg

श्रीमती मोनिका कुलकर्णी, संस्थापिका, आजोळ.

'आजोळ'ची संकल्पना कशी सुचली? त्या अगोदर तुम्ही काय करत होतात?

मी Kids' Organisation ह्या संस्थेची स्थापना १९९१ मधे केली. तेव्हा Kids' Club ही ग्राऊंड अ‍ॅक्टिविटी सुरू केली. त्यानंतर १९९३ मधे विद्या मंदीर शाळा सुरू केली. तेव्हा working parents ची संख्या त्यामानाने कमी होती. पण तरीही जे काही असे पालक होते त्यांच्या मुलांसाठी पाळणाघराची अशी खास सोय नव्हती. म्हणून प्रायोगिक तत्वावर छोट्या प्रमाणावर पाळणाघर सुरू करायचं ठरवलं. तेव्हा असा विचार केला की नुसतं खाणं, पिणं, झोपणं नको - अजून काहीतरी मुलांसाठी करायला हवं. बाहेरच्या देशातल्या पाळणाघरांविषयीही आम्ही ऐकून होतो. आता सारखी तेव्हा माहिती काढणं सोपं नव्हतं. पण मुलांना व्यस्त कसं ठेवायचं ह्याचा अभ्यास करून हे 'आजोळ' पाळणाघर सुरू केलं. पहिल्या २-३ महिन्यांत ३० मुलं यायला लागली. मग राहत्या जागेच्या खालचा फ्लॅट त्यासाठी खास सज्ज करून घेतला. हळूहळू तान्ह्या मुलांसाठी वेगळा विभाग सुरू केला. अशा प्रकारे पायरी पायरीने वाढवत नेले.

पाळणाघर म्हणून सुरुवात करताना काही खास उद्दिष्ट नजरेसमोर होतं का? याच व्यवसायाची का निवड केलीत? त्यातील काही शिक्षण, अनुभव, विशेष ज्ञान संपादन केलेत का?

मी आधीपासून शाळा चालवतच होते. ग्राऊंड अ‍ॅक्टिविटी लग्नानंतर १०-१२ वर्षे चालवली. त्यानंतर ह्याच क्षेत्रात औपचारिक शिक्षणही घेतलं - टीचर्स ट्रेनिंग कोर्स केला. मग शाळा सुरू केली. त्यातूनच आजोळ ही संकल्पना पुढे आली.


आजोळ च्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगाल का? हा व्यवसाय कसा वाढवलात? कशा प्रकारे सुधारणा करत गेलात?

सुरूवातीच्या दिवसात प्रॉब्लेम्स होते. विद्या मंदीरच्या मुलांसाठी म्हणून आजोळ सुरू केलं पण ती मुलं इथे फिरकलीच नाहीत. आम्ही कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती, सर्व यंत्रणा तयार होती आणि मुलंच नव्हती. मुलं जमवणं ही सुरूवातीला अडचण होती पण नंतर कधी हा प्रश्न आला नाही. ह्या मुलांना engage कसं ठेवायचं ह्याचा आम्ही विचार केला. शाळेच्या धर्तीवर सुरूवातीला फ्री प्ले, मग वरणभात, गाणी-गोष्टी, मग दुपारची झोप, मग उठून पुन्हा काहीतरी अ‍ॅक्टिविटी असं वेळापत्रक होतं. संध्याकाळी आमचं ग्राऊंड चालूच होतं.

पहिल्यांदा सगळ्या मुलांना एकत्र बसवूनच आम्ही मुलांच्या अ‍ॅक्टिविटी चालवायचो. मग हळूहळू व्यावसायिक स्वरूप देत गेलो. लोकांच्या अपेक्षा ६ महिने-वर्षभरातच वाढल्या होत्या. मग मूलभूत रचना बदलली. प्रशिक्षित कर्मचार्‍यांची नियुक्ती केली. मावश्यांसाठी ट्रेनिंग सेशन्स घेतले. स्वतःमधे व्यावसायिक दृष्टीकोन, सफाई आणली. आम्ही दरवर्षी छोटी छोटी ध्येये ठरवित गेलो - जसं मुलांसाठी नवीन नवीन अ‍ॅक्टिविटिज शोधणे, कर्मचार्‍यांना पूर्णपणे तयार करणे, मुलांसाठी योग्य अशा पायाभूत सुविधा बनविणे. मग हळूहळू काँप्युटर आला, आजोळचं software आलं. व्यवसायात प्रोफेशनॅलिझम - व्यावसायिकता आणली. ५-६ वर्षांनी असं झालं की आणखी काय? एक ब्लॉकच आला डोक्याला. मग आम्ही एक तज्ज्ञगटच बनवला, पालकांकडून सूचना मागवल्या. तेव्हा आयटी बूम आलं होतं, त्या पालकांच्या खूप मागण्या असतात. मग आम्ही एक सल्लागार समिती समिती नेमली. आर्थिक व्यवहारांसाठी चार्टर्ड अकाऊंटंट नेमला. तज्ज्ञगटात एका मानसशास्त्रज्ञांची नियुक्ती केली. आजारपणं वगैरे साठी डॉक्टर नेमला. एस.एन.डी.टी. च्या टीचर्सच्या मार्गदर्शनानुसार मुलांसाठी अ‍ॅक्टिविटीज सुरू केल्या. आधी आम्ही करत होतो ते ढोबळमानाने होतं, आता आम्हाला एक शास्त्रीय दृष्टीकोन आला.

गेली किती वर्षं तुम्ही या व्यवसायात आहात? तुम्ही सुरुवात केलीत त्या काळात कसे चित्र होते व आता या व्यवसायाचे कसे चित्र आहे? काय बदलले - काय तसेच राहिले?

१९९१ पासून ह्या व्यवसायात आहे, आधी शाळा, ग्राऊंड मग पाळणाघर सुरू केलं.
पाळणाघर सुरू केलं तेव्हा स्पर्धा होती. पण तेव्हा घरगुती पाळणाघरांची संख्या जास्त होती. प्रोफेशनल पाळणाघरं तर अजिबातच नव्हती. 'आजोळ' हे व्यावसायिक सफाईने चालविल्या जाणार्‍या पाळणाघरांमधील आद्यप्रवर्तक असे पाळणाघर आहे. १९९६-९७ पासून जशी पाळणाघरांची गरज वाढू लागली तसा पाळणाघर चालवण्यार्‍यांचा अप्रोच बदलला. आधी ज्या आजी, मावशी मुलं सांभाळायच्या त्यात बदल होऊ लागले, काही टीचर्सनी पाळणाघरं सुरू केली. आता तर खूपच स्पर्धा आहे. गळेकापू स्पर्धा आहे असे म्हणालात तरी चालेल.

इतर पाळणाघरांच्या तुलनेत तुमच्या पाळणाघराची खासियत / वैशिष्ट्य काय सांगू शकाल?

'आजोळ'ची वैशिष्ट्ये - आजोळचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही नेहमीच नाविन्याचा ध्यास घेत आलो. आणि हा नाविन्याचा ध्यास मुलांसाठी! मूल हे केंद्रस्थानी ठेवूनच आम्ही सगळं करत आलो. इतर ठिकाणी पालकांना आकृष्ट करायला फॅन्सी फॅन्सी गोष्टी असतात. वरवरचं आवरण छान असतं पण आशय नसतो. २ कॉम्प्युटर्स ठेवले, इंग्रजी बोलणार्‍या बायका बसवल्या, चार भिंती छान रंगवल्या म्हणजे तुम्ही मुलांची चांगली काळजी घेता का? तर नाही. आजोळचं बाह्यरूप तर चांगलं आहेच पण आम्ही आतल्या रूपाची - आशयाचीही काळजी घेतो. आमचा उद्देश आहे मुलांचे आदर्श पालकत्व. आमच्याकडे मुलं ३ महिन्यांपासून ते अगदी १०-१२ वर्षांपर्यंत येतात. पालक पूर्णवेळ त्यांच्याबरोबर नसतात. त्यामुळे आम्हीचं त्यांचे पालक असतो. एक आदर्श पालक आपल्या मुलासाठी जे जे करेल ते ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही मुलांचं खर्‍या अर्थाने संगोपन करतो. नुसतं सांभाळणं आणि संगोपन ह्यात जो फरक आहे तोच इतर पाळणाघरं आणि 'आजोळ'मध्ये आहे असं मला वाटतं.

तुमच्या जागेत तुम्ही मुलांच्या दृष्टीने असे नेमके कोणकोणत्या प्रकारचे बदल करून घेतलेत?

आम्ही पाळणाघराच्या वरती राहतो. त्यामुळे चोवीस तास ही जागा तशी निगराणीखाली असते. इथे पाळणाघर सुरु केले तेव्हा बांधतानाच बालविभागातील मुलांसाठी सुरक्षित, योग्य अशा सुविधा करून घेतल्या. मोठ्या मुलांच्या विभागासाठी मात्र त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही योग्य बदल आहे त्या जागेत करून घेतले. त्यात जागेला घरपण राहील याची विशेष काळजी जाणीवपूर्वक घेतली.

पाळणाघराच्या अंतर्भागातील काही छायाचित्रे :

१]

new_aaj10.jpg

२]

new_aaj2.jpg

३]

new_aaj3.jpg

४]

new_aaj0.jpg

५]

new_aaj4.jpg

६]

new_aaj5.jpg

७]

new_aaj6.jpgयेथील कर्मचार्‍यांची - मदतनिसांची निवड तुम्ही कशी करता? काय निकष ठेवता?

कर्मचार्‍यांची निवड -

आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कर्मचारी आहेत.

टीचर्स - ह्या क्षेत्रातला कोर्स पूर्ण केलेल्या आणि थोडा-फार अनुभव असलेल्या हव्यात. मुलांची नुसती आवड नाही तर मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा हवी. मूल हा समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे ही भावना हवी.

मावशी - किमान दहावी पास हवी. आम्ही शक्यतो ओळखीतलीच मावशी घेतो. त्यांची मेडिकल बॅकग्राऊंड तपासतो. घरची माहिती करून घेतो. नवरा दारूडा तर नाही ना, तिला लहान बाळ आहे का, घरी म्हातारे सासू सासरे आहेत का, असं काही असेल तर ती तणावमुक्त नाही राहू शकणार! आधीच मुलांमध्ये काम करणं हे खूप पेशन्सचं काम आहे, त्यात तिला घरून ताण असता कामा नये.

आपल्याकडे पाळणाघरांसाठी काही सर्वसामान्य नियम - कायदे-कानून आहेत का? असल्यास कोणते आहेत?

दुर्दैवाने भारतात असे काही कायदे कानून नाही आहेत, कोणीही पाळणाघरं चालू करू शकतं. नोव्हेंबर २०१२ मध्ये झालेला बाल संरक्षण कायदा आणि लैंगिक शोषण कायदा ह्यानुसार संस्थांना काही नियम आहेत.

मुलांचा आहार, व्यायाम, आरोग्य, रंजन, विकास यांसाठी कोणकोणत्या तर्‍हेचे उपक्रम तुम्ही राबविता? कोणते कटाक्ष पाळता?

मी आधी म्हणाले तसं 'आजोळ'चं वैशिष्ट्य आहे संगोपन. संगोपनात जे जे बेस्ट आहे ते आम्ही मुलांना देतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपला जो तान्ह्या मुलांसाठीचा विभाग आहे तिथे अगदी तान्ही बाळं असतात. त्यांच्या विकासासाठी पोषक वातावरण आम्ही तयार केलंय. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक जे जे करतील ते ते आम्ही करतो. त्यांच्या उत्तम खाण्याची, पिण्याची, झोपण्याची, खेळण्याची सोय करतो. लहान मुलांना हाताळण्याचं ट्रेंनिंग आम्ही मावश्यांना देतो. ही ट्रेंनिंग सेशन्स आम्ही तज्ज्ञ लोकांकडून कंडक्ट करून घेतो. आमच्याकडे उमा बापट या मानसशास्त्रज्ञ येतात, बर्वे मॅडम येतात. ह्या वयात तान्ह्या बाळाची मोटर स्किल्स, सोशल स्किल्स विकसित होणे व मानसिक विकास होणे हे फार महत्त्वाचे असते. जेव्हा त्या मुलाचे आई वडील जवळ नसतात तेव्हा त्याला सुरक्षित वाटायला हवं. त्याला स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटायला हवा आणि त्याला एखादी गोष्ट - जसं मणी ओवणे इत्यादी - कधी येईल जेव्हा तुम्ही त्याला करू द्याल! 'तुला येत नाही, आण, मीच देते करून!' असं नको. त्याला मोकळेपणा, एक्स्पोजर मिळालं पाहिजे. ह्या सगळ्यासाठी आम्ही अतिशय प्रामाणिक प्रयत्न करतो. त्यामुळे स्पर्धेची भीती नाही.

पाळणाघरात मुलांचा दिनक्रम कसा असतो?

मुलांचे वयोगटाप्रमणे ग्रूप्स आहेत, त्याप्रमाणे त्यांचा दिनक्रम असतो. साधारण पाळणाघरात आलं की थोडा वेळ फ्री प्ले, आऊटडोअर गेम्स - घसरगुंडी, झोका, लहान मुलांसाठी गच्चीत बॉल खेळणे वगैरे. मग सकाळचा नाश्ता. प्रत्येक ग्रूपचं आठवड्याचं वेळापत्रक असतं त्याप्रमाणे आपण त्यांच्या ११.३० ते १२.३० ह्या वेळात अ‍ॅक्टिव्हिटीज घेतो. मग १२.३० ते १.१५ वरणभात. तो झाला की गप्पा गोष्टी, गाणी म्हणून वगैरे मुलं २ तास झोपतात. ३.३० ला उठले की शू करून नाश्ता करतात. मग कपडे बदलून, आवरून पुन्हा ४.४५ ते ५.३० प्रॉपर सेशन असतं. त्यात ड्रामा, चित्रकला, नृत्य, आर्ट , क्राफ्ट, आजोळचे खेळ ह्याचा समावेश असतो.

आहार व्यायाम - आम्ही तिन्ही वेळा इथेच बनविलेलं खाणं देतो. खाण्यात भरपूर वैविध्य असते. आजोळचा नाश्ता स्वच्छ , चविष्ट , सकस असतो. सर्व चवींची आम्ही मुलांना ओळख होईल असं बघतो. आठवड्यात सगळे अन्नघटक गेले पाहिजेत असं बघतो.

छोट्या बाळांचा खाऊ पालक पाठवतात, आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शानुसार आम्ही पालकांना त्या बाबतीत गाईड करतो. थोड्या मोठ्या मुलांना आजोळचा खाऊ सुरू करतो.

खेळ, गप्पा, अभ्यास, दंगा यांत मग्न असणारी पाळणाघरातील मुले :

८]

new_aaj7.jpg

९]

new_aaj8.jpg

१०]

new_aaj9.jpg

११]

new_aaj11.jpg

१२]

new_aaj12.jpg

१३]

new_aaj13.jpg

१४]

new_aaj14.jpg

१५]

new_aaj15.jpg

१६]

new_aaj16.jpg

१७]

new_aaj17.jpg

१८]

new_aaj181.jpgतुम्ही पालकांमध्ये सजगता वाढावी यासाठी काही करता का?

इथं पाळणाघरात रजिस्ट्रेशन च्या वेळी आम्ही पालकांना एक पुस्तक देतो - गंमत मोठं होण्यातली - लेखिका - उमा बापट. पालक ह्या मुलांच्या संगोपनात अनुपस्थित आहेत. त्याचा परिणाम मुलांच्या पूर्ण विकासावर होत असतो. तर जो काही थोडा वेळ पालक देऊ शकतात तो त्यांनी कसा घालवावा ह्यासंबंधी हे पुस्तक आहे. मी स्वतः प्रत्येक मुलाच्या पालकांबरोबर एक मीटींग घेते ज्यात त्यांना 'आजोळ'ची माहिती सांगितली जाते.

परदेशांतील पाळणाघरे व आपल्याकडील पाळणाघरांमध्ये तुम्हाला कोणता फरक जाणवतो? आपल्याकडील पाळणाघरांमध्ये काय बदल आवश्यक आहेत असे तुम्हाला वाटते?

परदेशातली पाळणाघरं आणि भारतातली पाळणाघरं ह्यात तुलना होऊच शकत नाही. साम्य एवढंच आहे की मुलं पालकांपासून दूर असतात. तेथील शिक्षक, तेथील वातावरण, मुलांचं संगोपन हे सगळंच वेगळं आहे. मी एकदा युरोपमध्ये एका पाळणघरात गेले होते - मी एका मुलाला पटकन उचलणार होते, तेवढ्यात मला चूक लक्षात आली. आपल्या इथे काहीही सरकारी नियम नाहीत. त्यामुळे कोणीही पाळणाघर चालू करतं. पालक थोडे पैसे वाचवायला मुलांना पाठवतात. ह्या वयात आपल्या मुलाला किती गोष्टींची गरज आहे, त्याची माहीती त्या बाईंना आहे किंवा नाही हे काही बघत नाहीत. आपल्याकडे बाहेरच्या देशासारखे कायदे आले तरी ते पाळणं महाकठीण! तपासायला जो इन्स्पेक्टर येईल त्याला ह्या सगळ्याचं महत्त्वही नाही कळणार.

या व्यवसायात तुम्हाला कशा प्रकारचे अनुभव येतात? काही लक्षात राहिलेले अनुभव...??

अनुभव सांगायचा तर मी तुम्हाला वाईट अनुभवच सांगेन. एक मुलगी आमच्याकडे ५ महिने ते १२ वर्षे नियमितपणे येत होती. ती १२ वर्षाची झाली तेव्हा ती खर्‍या अर्थाने मोठी झाली, तिच्यातले बदल आम्हाला जाणवत होते. तिचे विचार वेगळे होत गेले, तिने केसांच्या बटा कापल्या. हे छोटे छोटे बदल आमच्या लक्षात येत गेले. म्हणून आम्ही तिच्या आई वडीलांना भेटायला बोलावलं. ते तिच्या बाबतीत पूर्णपणे दुर्लक्ष करणारे होते. तिने आम्हाला सांगितलं होतं की आई-बाबांनी आजी आजोबांना वृद्धाश्रमात ठेवलं होतं. घरी गेलं की तिचा जो आधार होता तोच नव्हता. आणि आई-वडील पूर्णपणे दुर्लक्ष करत होते. आम्ही भेटायला बोलावलं तेव्हा ते दिलेल्या वेळेच्या दीड तास उशिरा आले. वडील पान खात होते आणि आईने येताना बाहेर सिगरेट विझवली. आम्ही त्यांना सगळं सांगितलं तर त्यांनी ते चुकीच्या पद्धतीने घेतलं. तुम्ही आमच्या मुलीच्या मनात काय काय भरवता अशी भाषा त्यांनी सुरू केली. ह्या सगळ्याचा आम्हाला खूप त्रास झाला. आम्हाला तिची अ‍ॅडमिशन रद्द करावी लागली. आम्हां सगळ्याच टीचर्सना ह्या सगळ्याचा खूप त्रास झाला. करायला गेलो एक आणि झालं भलतंच असं झालं. वाईट अनुभव खूप येतात, चांगले फार कमी येतात.

गेल्या २-३ वर्षांत पाळणाघराच्या संचालिका म्हणून लोक आदराने बघतात. आधी सांभाळणार्‍या मावश्या आणि आम्ही टीचर्स ह्यात लोक फरकच करत नसत. ही एक शोकांतिका आहे. मला वाटतं 'आजोळ'ची मुलं मोठी झाली की त्यांना कळेल की टीचर्स आणि मावश्यांत फरक आहे.

आधुनिक पालकांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे आखणी करताना तुम्हालाही आपल्या कार्यपद्धतीत, चेहर्‍या-मोहर्‍यात बदल करावे लागले का? कशा प्रकारे बदल केलेत?

आधुनिक पालकांची गरज ओळखून - मी मगाशी म्हणाले तसं पालकांकडून फीडबॅक घेतला, ट्रेनिंग वाढवले.

एखाद्या मुलाला शारीरिक, मानसिक किंवा अन्य कोणत्या प्रकारची समस्या असेल तर तुम्ही ती कशी हाताळता? मुलांच्या वागण्यात जर काही वाईट सवयी आढळल्या तर त्यांचे निराकरण तुम्ही कशा प्रकारे करता? त्याबद्दल काही विशेष असे ट्रेनिंग तुमच्या स्टाफला देता का?

शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम मुलांनाच आजोळमध्ये प्रवेश देणे शक्य होते. परंतु आजोळमध्ये प्रवेश घेतल्यानंतर कधी पालकांच्याही लक्षात न आलेले शारीरिक वा मानसिक प्रश्न आमच्या नजरेत आल्यास अशा मुलांच्या प्रश्नाचे योग्य ते मूल्यमापन निरीक्षणावरून करण्यात येते. त्यानंतर आजोळच्या सल्लागार समिती सदस्यांशी चर्चा करून, शक्य असल्यास त्यांच्या उपस्थितीत त्या मुलास येणार्‍या अडचणी वा प्रश्न पालकांपर्यंत पोहोचविले जातात. प्रश्न अती गंभीर नसल्यास मूल आजोळमध्ये ठेवून घेण्यात येते व उपचारांमध्ये आजोळ पालकांना सहकार्य देते. प्रश्न जर गंभीर असेल तर मात्र पालकांना योग्य मार्गदर्शन देऊन अन्य पर्याय सुचविण्यात येतात. अनुभवी व क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या शिक्षिकेचीच नियुक्ती आजोळमध्ये केली जाते.

तुम्हाला हा व्यवसाय करताना घरच्यांची मदत, पाठिंबा मिळाला का? कशा प्रकारे मिळाला?

माझ्या सासर्‍यांचा मला नेहमीच पाठिंबा होता. माझा नवरा थोडा विरोधात होता कारण त्याचं म्हणणं होतं की तुला कोणाचंही काम पटत नाही, तुझा विश्वास नाही. मग तूच प्रत्येक गोष्ट करायला लागशील. ह्यावर सासर्‍यांनी सांगितलं की तू तुझा वेळ ठरवून घे, की इतका वेळ मी पाळणाघराला देईन, इतका मुलाला, स्वतःला, घराला, कुटुंबाला - म्हणजे मग त्रास नाही होणार. सासर्‍यांनी खूप मदत केली, खेळणी स्पॉन्सर केली, पाळणाघराचं इंटिरियर करून दिलं. माझ्या सासूबाईही खाली येऊन बसायच्या. आता नवर्‍याचा खूप सपोर्ट आहे.

तुम्ही व्यवसायाचे आर्थिक गणित कसे सांभाळलेत? सुरुवातीची गुंतवणूक, भांडवल कसे उभारलेत?

सुरूवातीला नफा हा उद्देश नव्हता. पण आपल्याच खिशाला खार पडू नये असंही होतं. सुरूवातीला आमचा कमर्शियल अप्रोच नव्हता. नुसता जमाखर्च मांडून जे काय मिळेल त्या पगारात आम्ही खुश होतो. लोकांच्या गरजा वाढल्या, त्यांना सोयी-सुविधा हव्या होत्या - पण पैसे देण्याची तयारी नव्हती. सुरुवातीला त्याचा थोडा त्रास झाला. आम्ही जागेचं सुशोभीकरण करून घेतलं ती गुंतवणूक कितीतरी दिवस तशीच होती. त्यातून उत्पन्न येतच नव्हतं. मग जसजशी मुलं वाढू लागली तसं ७-८ वर्षांनंतर जमाखर्च, नफा, गुंतवणूक आणि उत्पन्न ह्याचं गणित जमायला लागलं.

या पुढे तुमच्या काही विस्तार-योजना आहेत का? पुढच्या योजना काय आहेत?

आम्ही आमच्या पाळणाघराची अजून एक शाखा कोथरूडला उघडली आहे. कॉर्पोरेट-टाय-अप चं डोक्यात आहे. एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये जाऊन पाळणाघर सुरू करायचं डोक्यात आहे. ज्या कोणाला खरोखर कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी काही चांगलं करायचं आहे तिथे आम्हाला इंटरेस्ट आहे. franchise चा विचार आहे. त्यात अर्थात बर्‍याच अटी - पोटनियम असतील - जसं त्या बाईंचं शिक्षण. नागपूर आणि नाशिकमध्ये आमचे प्रयत्न चालू आहेत, पुण्यातही आम्हाला चालणार आहे.

पाळणाघरात येणार्‍या मुलांशी तुमचे व तुमच्या स्टाफचे जे काही नाते तयार होते त्याविषयी सांगाल का? मुलांनी पाळणाघर सोडले तरी पुढे त्यांच्याशी किंवा त्यांच्या पालकांशी संबंध टिकून राहतात का?

आजोळमध्ये येणार्‍या मुलांना आम्ही सर्वजणी आमची मुलं मानतो. त्यामुळे त्यांच्याबरोबरील संबंध किंवा नाते हे अतिशय जिव्हाळ्याचे असते. खूप वर्षे मुलं आजोळमध्ये येतात आणि इथेच लहानाची मोठी होतात. त्यामुळे मुलांना आमच्याबद्दल व त्यांच्या येथील मित्रमैत्रिणींबद्दल कमालीचे प्रेम आणि जिव्हाळा असतो. एखादं मूल पाळणाघर सोडतं तेव्हा अगदी मनापासून दु:ख होतं आणि खूप दिवस त्याची आठवण आजोळमध्ये निघते. आमच्या मनात ते मूल कायमचं घर करतं. पण पालकांना आणि मुलांना मुद्दाम वेळ देऊन भेटणं नंतर शक्य होतंच असं नाही. पण पालक इमेल द्वारे किंवा फोन वरून किंवा एस.एम.एस. द्वारे आमच्या संपर्कात राहतात.

col50 copy.jpgमुलांविषयीचा आनंद देणारा अनुभव / आठवण सांगाल का?

पालक आमच्याप्रती त्यांची कृतज्ञता अनेक प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे व्यक्त करत असतातच! पण मुलं मोठी झाल्यावर एखाद्या क्षेत्रात प्रगती करताना ''त्यांच्या संगोपनात आजोळचा खूप मोठा सहभाग आहे,'' हे वाक्य सर्वाधिक समाधान व आनंद देऊन जातं.

या व्यवसायात येऊ इच्छिणार्‍या व्यक्तींना तुम्ही काय सांगाल?

ह्या व्यवसायात पैसा आहे, पण जबाबदारी खूप जास्त आहे. मुलांचीच नाही तर पालकांची, समाजाचीही जबाबदारी आहे. अविरत कष्ट आहेत. मुलं, पालक, स्टाफ, जमाखर्च ही तारेवरची कसरत आहे. तुम्हाला मुलांसाठी काही करायचं असेल तरच ह्या व्यवसायात या. नुसते पैसे हा अप्रोच असेल तर ते कोणासाठीच चांगलं नाहीये.

======================================================================

मुलाखतकार - प्राजक्ता_शिरीन
छायाचित्रे : मोनिका कुलकर्णी यांच्या व आजोळ पाळणाघराच्या सौजन्याने.

आजोळ चा पत्ता :

''आजोळ''
यशकमल बंगला, ए - १/ १७, रामबाग कॉलनी,
ज्ञानल मंगल कार्यालयाजवळ, नवी पेठ, पुणे - ४११०३०.
फोन : ०२० ४३२९७१६, ०२० ४३३६८८७.
इमेल : aajol123@gmail.com
संकेतस्थळ : http://www.aajol.com/

आजोळ पाळणाघरात आपल्या मुलीला ती अगदी ८ महिन्यांची होती तेव्हापासून ठेवणार्‍या व ही मुलाखत घेणार्‍या मायबोलीकरीण प्राजक्ता_शिरीन पाळणाघराचा आपला अनुभव सांगतात :

मी जेव्हा माझ्या मुलीला सकाळी आजोळ मध्ये सोडते तेव्हा पाळणाघरातली मुलं बाहेरच्या अंगणातील घसरगुंडी, झोका यांवर खेळत असतात. माझी लेकही लगेच त्यांच्यामध्ये जाऊन खेळायला लागते.
ती अगदी लहान वयापासून आजोळमध्ये जायला लागली. सुरुवातीला ती दीड वर्षांची होईपर्यंत दुसर्‍या मजल्यावरच्या इन्फन्ट सेक्शन मध्ये होती. तेव्हा तिचा अगदी दैनंदिन अहवाल आमच्याकडे यायचा. त्यात किती वाजता काय खाल्लं, दूध/पाणी कधी किती प्यायलं, शी-शू कधी झाली, काय खेळली हे सगळं लिहून यायचं. त्यामुळे तिला घरी नेताना काही विचारायचं राहिलं वगैरे प्रश्न आला नाही.

आता तर ती जो असेल तो नाश्ता खाते. आजोळमध्ये मुलांना सर्व पदार्थ खायची सवय लागते. त्यामुळे कुठे फिरायला गेलं तर आम्हाला तिच्यासाठी वेगळं घेऊन जा वगैरे करावं लागत नाही. वेगवेगळे पराठे, पोळीभाजी, आजोळ स्पेशल भात, पावभाजी , पोहे, उपमा, खांडवी, पावभाजी, मिसळ, पुरी श्रीखंड सगळं सगळं मुलं खायला शिकतात. आजोळमध्ये ३ वेळा गरम, ताजं खाणं देत असल्याने मुलांना त्यांच्या शाळेच्या डब्याव्यतिरिक्त काही सोबत द्यावं लागत नाही.

सध्या सुट्टीतल्या शिबीरात तर मुलांची खूप मजा चालू आहे. पिक्चर, ट्रिप, भातुकली, क्राफ्ट अ‍ॅक्टिविटिज , मॅजिक शो, पपेट शो आणि बरेच काही!

आम्ही आमच्या मुलीसाठी पाळणाघर बघत होतो तेव्हा शक्यतो आम्हाला घरगुती पाळणाघर नको होतं कारण मुलं दुसर्‍या घरी एवढी comfortably नाही राहू शकत. मी लहान असताना शेजारी एक आजी मुलं सांभाळायच्या. त्यांची सख्खी नातवंड कोणी आलं तरी, 'आम्ही सांभाळायला आहोत,' असंच सांगायची. त्यामुळे कोणाच्या घरी तिला ठेवणं आम्हाला प्रशस्त वाटत नव्हतं. सुदैवाने आम्हाला आजोळबद्दल कळलं. सुरूवातीला तिला एक तास, मग दोन तास अशी वेळ वाढवत गेलो. मूल जोपर्यंत मावशी / टीचरकडून व्यवस्थित खाऊन घेत नाही तोपर्यंत रूळलं असं समजायचं नाही असा आजोळचा रुल होता. माझी मुलगी महिन्याभरात छान राहायला, खायला-प्यायला लागली. इतकी की तिच्या आवडत्या टीचरकडे ती माझ्याकडून झेप घेऊन जायची.

आजोळमध्ये मुलांसाठी चार प्रशस्त खोल्या आहेत. हॉल, खेळण्यांची खोली व दोन बेडरूम्स. याखेरीज पुढच्या अंगणातही मुलं ऊन-पाऊस नसेल तेव्हा, सकाळ - संध्याकाळ खेळतात. तिथे त्यांच्यासाठी झोका, घसरगुंडी वगैरे आहे. गॅरेजच्या मोकळ्या जागेतही मुलं खेळतात. सुरक्षेसाठी एक आजोबा गेटवर बसलेले असतात. मुलं शाळेतून आली की त्यांना उतरवून घ्यायचं, संध्याकाळी कोणाची रिक्षा आली ग्राऊंडला वगैरे जायला की त्या मुलाला हाक मारायची वगैरे कामं ते करतात.

आम्हाला आजोळचा अनुभव खूप चांगला आला आहे. ती आजोळमध्ये आहे त्यामुळे आम्ही ऑफीसमध्ये निर्धास्त असतो. तिला कधी सर्दी असेल, थोडा जरी ताप वाटला तरी लगेच टीचर फोन करतात, आम्ही पोहोचेपर्यंत काही औषध देणं शक्य असेल तर देतात. इतरही वेळी एखादं औषध द्यायचं असेल तर तसं लिहून दिलं आणि बॅगेत औषध दिलं की त्या त्या वेळी औषध दिलं जातं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

अरे वा..छान मुलाखत!!
मोनिका स्वतःच इतक्या व्यवस्थित्,नीटनेटक्या आणी प्रेमळ दिसतायेत.त्यांच्या या प्रसन्न व्यक्तीमत्वाची छाप मुलांवर,इतर टीचर्सवर्,कर्मचारी वर्गावर स्पष्ट्पणे दिसून येतेय.
प्राजक्ता_शिरीन धन्स!!! Happy

धन्यवाद प्राजक्ता! तू इथे असताना नेहमीच 'आजोळ' विषयी सांगायची. तुझी लेकही 'आजोळ' मिस करायची. का ते आज 'आजोळ' ची जवळुन ओळख झाल्यावर समजलं! खरच छान आहे शिरीनचं 'आजोळ'!
आजोळला शुभेच्छा!

मुलाखत अतिशय छान आहे. एखादं पाळणाघर इतक्या व्यावसायिक पातळीवर चालवलं जात असेल हे वाचूनच खूप छान वाटलं. इतकी सुरेख सोय असेल तर आईबाबांच्यामागचं कितीतरी टेन्शन खल्लास!

प्राजक्ता_शिरीन, मुलाखत फारच छान, मुद्देसुद घेतली आहे. आवडली. धन्यवाद. Happy

मोनिका स्वतःच इतक्या व्यवस्थित्,नीटनेटक्या आणी प्रेमळ दिसतायेत.त्यांच्या या प्रसन्न व्यक्तीमत्वाची छाप मुलांवर,इतर टीचर्सवर्,कर्मचारी वर्गावर स्पष्ट्पणे दिसून येतेय.
>>> वर्षुताई + १

छान मुलाखत ! भारतात - म्हणजे मी पाहिलीयत तेवढी तरी - जास्त करून घरगुती पद्धतीची पाळणाघरं दिसतात पण असं इतकं दर्जेदार अन प्रोफेशनल पद्धतीनं चालवलेलं पाळणाघर फारसं ऐकलं नव्हतं. मोनिकाताईंचं अभिनंदन!

मुलाखतीचे प्रश्न मला अरुंधतीने दिले होते, मी फक्त मुलाखत घेण्याचं काम केलं, सगळं श्रेय अरुंधतीचं Happy

मुलाखत आणि फोटो आवडले.

>>असं इतकं दर्जेदार अन प्रोफेशनल पद्धतीनं चालवलेलं पाळणाघर फारसं ऐकलं नव्हतं.
मै, खरंच.

मस्तं मुलाखत , प्राजक्ता!
मोनिका कुलकर्णीची उत्तरं आणि आजोळ चे स्वच्छ नीट नेटके फोटोज खूप् इंप्रेसिव्ह !!
फक्त डे केअर च नाही , बच्चे कंपनी पण किती स्वच्छ , आजोळच्या स्टाफ ॓ला क्रेडीट :).

मुलाखतीमुळे खूपच महत्वाची माहिती मिळाली. धन्यवाद प्राजक्ता_शिरीन.
इतकी छान संस्था चालवल्याबद्दल मोनिका कुलकर्णी यांचं अभिनंदन आणि ’आजोळ’ ला शुभेच्छा.

व्यावसायिक पातळीवर अशा संस्था चालविताना मुलांबद्दल आत्मीयता आणि जिव्हाळा असला तरच मुलांना पाळणाघराबद्दल आपलेपणा वाटू शकतो आणि पालकांच्या मनात विश्वास निर्माण होतो. ’आजोळ’च्या यशाचं हेच गमक असावं. पुन्हा एकदा शुभेच्छा.

हे वाचून एक खूप जुनी आठवण ताजी झाली :
मुंबई-दादर इथे ’माझी आई’ नांवाचे पाळणाघर होते. लोक ’माझी आई’ शाळा असाच उल्लेख करीत असत. ६ महिने ते १०/११ वर्षे वयाची सुमारे ३०/३५ मुले तिथे असायची. बापू फडणीस हे ’माझी आई’ चे संचालक होते. आई-वडिल दोघेही नोकरी करत असल्याने माझ्या धाकट्या बहिणीला तिथे ठेवण्यात यायचे. (अंदाजे १९६३ ते १९६८ चा काळ असावा.) तिथे अगदी जिव्हाळ्याने, प्रेमाने मुलांना सांभाळले जायचे इतकेच नव्हे तर त्यांच्यावर चांगले संस्कार करणे, अभ्यास घेणे, शाळेप्रमाणे विविध कार्यक्रम इ. मुळे पालक अगदी निर्धास्तपणे मुलांना सोपवून जात असत आणि मुलांनाही ’माझी आई’, बापू आणि बर्वेबाई यांचा खूप लळा होता. माझी बहीण अजूनही ’माझी आई’ चा विषय निघाला की नॉस्टेल्जिक होते.

’आजोळ’ च्या ओघात तसंच मातृदिनानिमित्ताने ’माझी आई’ची आठवण आली म्हणून थोडं विषयांतर झालं...... क्षमस्व.

’आजोळ’ ला पुन्हा एकदा शुभेच्छा.

मस्त मुलाखत. मोनिका कुलकर्णींचं इतकी छान संस्था सुरु करुन वाढवल्याबद्दल खूप कौतूक आणि त्यांना पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा. Happy

मस्त मुलाखत. धन्यवाद अकु आणि प्राजक्ता+शिरिन. स्वतःचं वेगळेपण जपण्याचा मंत्र 'आजोळ'ने व्यवस्थित बाणलेला दिसतो. नाव सुद्धा खूप आवडले. मनापासून शुभेच्छा मोनिकाताई!

वा मस्तच आहे मुलाखत्.......आणि छान संस्था Happy
पिंपरी चिंचवडला असायला हवी होती..... Wink

<<पण असं इतकं दर्जेदार अन प्रोफेशनल पद्धतीनं चालवलेलं पाळणाघर फारसं ऐकलं नव्हतं<< +१
इतकं निटनेटकं, ऐसपैस पाळणाघर पहिल्यांदाच पाहिलं.

सुंदरच!! छान मुलाखत. Happy

छान झाली आहे मुलाखत. किती हौशीने आणि निगुतीने मांड मांडला आहे ते फोटोंवरून दिसून येतं आहे. मुलांची मज्जा दिसते आणि पालकांना समाधान. Happy
मोनिकाताईंचं अभिनंदन आणि शुभेच्छा.

वा... फार छान. पाळणाघर असच हवं की जिथे छोटुकल्यांना ८-१० तास सोडुन जायला पालकांना निर्धास्त वाटेल. हे अगदी तसच दिसतय. मस्त मुलाखत व फोटो.

छान मुलाखत. इतक्या नीटनेटक्या, व्यावसायिक पाळणाघराची जवळून ओळख करून दिल्याबद्दल प्राजक्ता शिरीनचे आभार! मोनिका कुलकर्णींचे खरच कौतुक....खुप प्रोत्साहनपर माहिती आहे, या व्यवसायात येणार्‍या व्यक्तींसाठी उपयुक्त आणि प्रेरणादायी मुलाखत! सगळेच मुद्दे वरील प्रश्नोत्तरातून स्वच्छ आणि स्पष्ट होतायेत.

''आजोळ'' हे नाव अगदी समर्पक वाटते, प्रचि पाहून. मोनिका यांना खुप खुप शुभेच्छा!

Pages