मीर तकी़ मीर - भाग १

Submitted by समीर चव्हाण on 11 May, 2013 - 15:34

मीर तकी़ मीर आपल्याला थोडाफार तरी समजला आहे का ह्या दुर्दैवी मनःस्थितीत सुचेलतसे लिहीत आहे. वा म्हणा ह्या अठराव्या शतकातल्या कवीला जे काही समजले त्यातले थोडेसे तरी समजून घेता येईल का ह्या संभ्रमात लिहीत आहे. सुरुवात मला कालच सापडलेल्या एका शेराने करतोय. जगाविषयी बरेच काही समजूनही काही न समजलेल्या मनःस्थितीत मीर म्हणतो:

ये तवह्ह्युम का कारखाना है
यां वही है जो ऐतबार किया

हे जग म्हणजे मोहिनी आहे, भ्रमाचा मोठा कारखाना की ज्यावर विश्वास ठेवाल ते ते (तेच) आहे.
दुस-या एका अंगाने शेर फार आशावादी वाटला.
इथे काहीही साध्य आहे, विश्वास ठेवला तर.
विचार केल्यावर वाटले की मीर, कबीर वा तुकाराम असो त्यांच्या कथनाविषयी अश्याच निर्ष्कषबिंदुपाशी येऊन मन ठेपते.
असो हा कल्पनाविलास झाला. अशी मनःस्थिती का होते हा विचार करताना लक्षात यावे की भ्रमाचे मूळ अज्ञान आहे. मीर म्हणतो वेळ आली आहे की स्वतःला मोकळे सोडा, जगाशी भेटू द्या, स्वतःशी भेटू द्या:

अब दर-ए-बाज़-ए-बयाबां में कदम रखिए मीर
कब तलक तंग रहे, शहरों की दीवारों में

शेराचा लौकिक अर्थ आत्ताच्या शहरीकरणाच्या विद्रुपीकरणात अधिक अर्थ राखतो.

मीरच्या कल्पना चकित करणा-या आहेत. ज्ञानेश्वर, तुकाराम वा कबीर ह्यांनी हे साधलेय मात्र तरी मीर ह्यात उस्ताद वाटतो.
हे उदाहरणासहित स्पष्ट करता येईल. मुळातच मराठी संतसाहित्यात क्राफ्टमनशिपला फार स्थान नसल्याने हे साध्य दिसत नाही. तरीही काही उदाहरणे आहेतः तृष्णेपायी धाव-धाव करणा-या लोभी माणसाचे वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतातः

काइ चंचलु मासा
कामिनीकटाक्षु काइसा
वलला होये तैसा
वीजु नाहि

मासा पाण्यात, कामिनीची नजर धरेवर, आणि वीज आकाशात जशी वळवळ करते तसेच त्याचे मनही. म.वा. धोंड म्हणतात ``वामनाला तीन लोक संक्रात करायला एक चरण लागले मात्र ज्ञानेश्वरांनी एकही चरण न लांबवता दहा शब्दात ते साधले."
पर्शियन-उर्दू शायरीतील कलाकुसरीचे संस्कार मीर-गालिब मध्ये कळसाला पोहोचल्याचे जाणवते.

कहा मै ने कितना है गुल का सबात
कली ने यह सुनकर, तबस्सुम किया

सबात म्हणते स्थिरता तर तबस्सुम म्हणजे मुस्कुराहट.
मी कळीला म्हटले, किती ते तुझे आयुष्य. ती बस हसली. बहिणाबाईच्या कथेतील ज्ञानी माणसाला ज्ञान शिकवणारी अडाणी बाई आठवावी तसे कळी म्हणते काय फरक पडतो जर जगण्याची कला साधली तर. सबात आणि तबस्सुम ह्यांची डुयअलिटी मजेशीर आहे. अजून एक सुंदर शेर पाहूया. समीक्षक रामनाथ सुमन ह्यांचे शेरावरील भाष्य अधिक रोचक आहे:

सिरहाने मीरके आहिस्ता बोलो
अभी टुक रोते-रोते सो गया है

अतिशय बोलीचालीची भाषा, आणि त्यातली नर्मी उल्लेखनीय आहे.
विशेषतः येणा-या शब्दांचे उच्चार धीम्या स्वरांत शक्य आहेत.
झोपलेल्याच्या उशाशी बोलताना बोलावे तसेच शेरातून प्रकट होते.
शेराला एक दु:खाची किनार आहे, जर ती शेवटची झोप म्हणून घेतली तर.

चश्म हो, तो आइनः खानः है दहर
मुंह नज़र आता है दीवारों के बीच

दहर म्हणजे दुनिया तर आइनः खान: म्हणजे आरसीगृह.

फोडा़-सा सारी रात जो पकता रहेगा दिल
तो सुबह तक तो हाथ लगाया न जायगा

हृदयाला फोडाची दिलेली उपमा वरकरणी अचंबित करणारी वाटते. विचारात पाडणारी निश्चितच आहे.

अजून एक थक्क करणारा प्रसिद्ध शेर पाहूया:

बंन्दे के दर्द-ए-दिल को, कोई नही पहुंचता
हर एक बेहकी़क़त या है खु़दा रसीदा:

वेदनेला समजणारे कुणीच नाही. मग ते तुच्छ असो वा देवत्वाला पोहचलेले.
दोन ओळी किती प्रश्न पोझ करतात हे पाहण्याजोगे आहे.
हीच कल्पना किती वेगळ्या पध्दतीने मांडता येईल हेही पाहण्यासारखे आहे. मीर म्हणतो आम्ही देव असतो जर आमचे हृदय निष्काम (दिले-बे-मुद्दआ) असते:

सरापा आरजू़ होने ने बंदा कर दिया हमको
वर्गना हम खुदा थे गर दिले-बे-मुद्दआ होते

ही कल्पना तशी नवीन नाही. कबीरा आधी हा विचार कुठे आला असावा, हे पाहणे उत्कंठावर्धक ठरावे. कबीर म्हणतो:

सुखसिंध की सैर का स्वाद तब पाइ है
चाह का चौतरा भूल जावै
बीज के मांहि ज्यों बीज-बिस्तार यों
चाह के मांहि सब रोग आवै

कबीर म्हणतो की सुखसमुद्राच्या सफरीची लज्जत घ्यायची असल्यास अगोदर इच्छेचा चबूतरा त्यागायला हवा. बी मध्ये जसा फळाचा विस्तार दडलेला असतो त्याप्रमाणे इच्छेच्या पोटी सगळे व्याधी जन्मतात.
अतिशय गुंतागुंतीची कविता आहे.

वरील समस्येचे रिझोलिशन देताना मीर म्हणतो:

हासिल बजु़ज कुदूरत, इस खाकदां से क्या है
खुश वह कि उठ गये है, दामन झटक-झटक कर

हासिल म्हणजे प्राप्ती, बजु़ज म्हणजे शिवाय, आणि कुदूरत म्हणजे (मनाचा) मळ.
दुनियेत आलो खरे, मात्र मलीनतेखेरीज काही नाही (मिळाले).
तेच खरे नशीबवान की जे कुठलाही मोहपाश न ठेवता निघाले.
खात्री नाही, मात्र असाच काही तरी अर्थ असावा.
तुकारामात आस सांडून मोकळे व्हावे असा भाव अनेक ठिकाणी सापडतो.

तुकारामाचा परखडपणा मीरमध्ये काहीशी नरमी घेऊन अवतरतो:

खुला नशे में, जो पगडी का पेच उसकी मीर
समन्द-ए-नाज़ को इक और ताजि़याना हुआ

समन्द-ए-नाज़ म्हणजे गर्वाचा घोडा तर ताजि़याना म्हणजे कोडा.
हे काहीच नाही. वेळप्रसंगी बादशाहालाही ऐकवणारा मीर असा आहे:

हम फ़कीरों से बे अदाई क्या
आन बैठे जो तुमने प्यार किया

इथे भाषेतील कटुता आणि कडवेपण टोकाचे आहे. मात्र कुठलाही थयथयाट नाही.
कमालीची स्थैर्यता फार मोठ्या उंचीला पोहोचल्याशिवाय येणे शक्य नाही.

परस्परविरोधी भाव कवितेचे आणि खरेतर जिवंत कवीचे लक्षण आहे.
मीरचा साधेपणाही तितकाच मोहक आहे. अनेक शेर आहेत की जे आजकाल लिहिल्यासारखे वाटतातः

मीर साहब जमान: नाजुक है
दोनो हाथों से थामिए दस्तार

जमानः म्हणजे जमाना तर दस्तार म्हणजे पगडी वा अब्रू.

मेरे रोने की हकी़क़त जिसमें थी
एक मुद्दत तक वह कागज़ नम था

साधा मात्र अतिशय निरागस शेर आहे.

ये जो मुहलत जिसे कहे है उम्र
देखो तो इन्तिजा़र-सा कुछ है

मीरच्या गझलेतील एक मोठा गुणवैशिष्ट्य म्हणजे त्यातला उदासीचा स्वर, त्यातली व्यथातुरता.
मला एक प्रचंड आवडणारा शेर देत आहे.

कोई नाउमीदाना करते निगाह
सो तुम हमसे मुंह भी छुपाकर चले

तुझी घडीभरचा दृष्टीक्षेप देखील सुखदायक होता.
किमान एखाद्यावेळेस निराशापूर्ण का होईना नजर टाकली असती तरी चालले असते.
आता मी काय पाहतोय की तू नजर सुध्दा चोरून चालली आहेस.

येणा-या मृत्यूची ही चाहूल नाही तर अजून काय आहे:

शायद कि काम सुब्ह तक अपना, खिंचे न मीर
अहवाल आज शाम से, दरहम बहुत है यां

अहवाल म्हणजे स्थिती तर दरहम म्हणजे अस्त-व्यस्त.

एक्युझ नाही मात्र व्याप मागे लागूनच आहे.
मीरविषयी लिहिण्यासारखे प्रचंड आहे.
सवडीप्रमाणे आपल्याबरोबर शेअर करीनच.
धन्यवाद.

समीर चव्हाण

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चश्म हो, तो आइनः खानः है दहर
मुंह नज़र आता है दीवारों के बीच

व्वा ! दृष्टी असेल तर जगच शृंगारपेटी आहे,चेहरा मग भिंतीतही दिसेल.

--- सुंदर धागा

अप्रतिम लेख.

मीर जेवढा वाचावा तेवढा कमी वाटतो ह्याचा पुनःप्रत्यय आला.

बेखुदी ले गई कहां हमको
देर से इंतजार है अपना

असे सहजतेने म्हणणारा मीर खरा फकीरच!

*

अश्क आंखों में कब नहीं आता
लहू आता है जब नहीं आता।

होश जाता नहीं रहा लेकिन
जब वो आता है तब नहीं आता।

दिल से रुखसत हुई कोई ख्वाहिश
गिरिया कुछ बे-सबब नहीं आता।

इश्क का हौसला है शर्त वरना
बात का किस को ढब नहीं आता।

जी में क्या-क्या है अपने ऐ हमदम
हर सुखन ता बा-लब नहीं आता।

---- मीर तक़ी 'मीर'

मस्तच

सगळेच शायर लोक भारी असतात (लोकोत्तर व अलौकीक के काय म्हणता येवू शकेल ) असे माझे तरी मत झाले आहे

समीर जी,

सुंदर धागा आहे. अभ्यासपूर्ण मीहितीसाठी आभार.
बर्याच शब्दांचे अर्थ तुम्ही दिलेले आहेत पण तरी सुद्धा काही शब्द समजले नाहीत ( माझे अज्ञान )

असे कुठले पुस्तक आहे का जिथे नावाजलेल्या उर्दु भाषिक भाषिक गझलकारांचे शेर, अवघड शब्दाचा अर्थ आणि शेराचा आशय असे दोन्ही समजावून सांगितले आहेत? म्हणजे तुम्ही लिहिले आहे तसेच, पण पुस्तकी स्वरूपात. असल्यास कृपया सांगाल का ?
पुनश्च धन्यवाद.
आकाश

धन्यवाद.
विजयः सूचना पटली. ह्यापुढे लक्षात ठेवीन.

आकाशः
काही संदर्भ देत आहे:
अली सरदार जाफरी ह्यांचे मीर (मीरच्या गझलांचे अर्थासहित संकलन), कबीरवानी (कबीरच्या मोजक्या कवितांचे रसग्रहण तसेच त्यातील आणि काही प्रसिध्द कवितांतील साधर्म्य स्पष्ट करून सांगणारे अपेन्डिक्स)
रामनाथ सुमन ह्यांचा मीर हा समीक्षाग्रंथ, त्यांचा गालिबवरही असाच ग्रंथ आहे मात्र मला तो मिळू शकला नाही.
प्रकाश पंडित ह्यांनी परिचयात्मक पुस्तकांची एक मालिका सुरू केली होती, जी बिगिनर्ससाठी उपयुक्त ठरू शकेल.
ह्या मालिकेत जवळपास सगळ्याच मोठ्या शायरांवर पुस्तके आहेत.

धन्यवाद.