श्रावणघेवड्याची सुकी भाजी (उपीटाच्या फोडणीसहित)

Submitted by ललिता-प्रीति on 29 April, 2013 - 00:12
shrava-ghvada-suki-bhaji
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- श्रावणघेवडा (फरसबी) पाव किलो
- १ मोठा कांदा (बारीक चिरून)
- हिरव्या मिरच्या (चवीनुसार)
- कढीपत्त्याची पानं ५-६
- किसलेलं आलं १ छोटा चमचा भरून
- उडीद डाळ १ मोठा चमचा भरून
- खोवलेलं खोबरं पाव वाटी
- चिरलेली कोथिंबीर २ मोठे चमचे भरून
- मीठ (चवीनुसार)
- साखर (चिमटीभर)
- तेल, मोहरी, हिंग

क्रमवार पाककृती: 

- श्रावणघेवड्याच्या शेंगा धुवून, निवडून, चिरून घ्याव्यात.
- कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी. ती तडतडली, की हिंग टाकावा. उडीद डाळ टाकावी.
- डाळ जरा तांबूस, खरपूस झाली, की कढीपत्याची पानं आणि मिरच्यांचे तुकडे टाकावेत. त्यावर चिरलेला कांदा टाकून चांगला परतावा.
- कांदा तांबूस झाला, की किसलेलं आलं टाकावं.
- जरासं हलवून त्यात चिरलेला श्रावणघेवडा टाकावा.
- कांदा आणि श्रावणघेवडा चांगला हलवून एकत्र करून घ्यावा. मीठ, साखर घालून पुन्हा हलवावा.
- झाकण टाकून भाजी शिजू द्यावी. अधूनमधून हलवावी. आवश्यकता भासल्यास थोडा पाण्याचा हबका मारावा.
- भाजी शिजल्यावर त्यात खोबरं-कोथिंबीर घालून पोळी / भाकरीबरोबर वाढावी.

Copy of DSC03806.JPG

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांसाठी
अधिक टिपा: 

- ३० मिनिटांचा वेळ हा सगळी कच्ची तयारी करण्यापासून ते भाजी शिजण्यापर्यंतचा धरलेला आहे.
- भाजी शक्यतो वाफेवरच शिजवावी. (गरजेनुसार १-२ चमचे पाणी घालावे.) शिजल्यावर रस राहता कामा नये.
- फोडणीत हळद घालायची नाही. (हळद घातल्यावर भाजीची सगळी मजाच जाते.)
- कांदा, खोवलेलं खोबरं, आलं - यांचं प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकता. पण यातला कुठलाही जिन्नस वगळायचा नाही. (खोबरं जितकं जास्त घालाल, तितकी भाजीची लज्जत वाढते.)
- ही भाजी नुसती (पचडीसारखी) खायलाही अप्रतिम लागते. पांढर्‍या भाताबरोबरही चविष्ट लागते.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

हिरवी मिरची घालत नाहीस का अकु त्यात? >> नाही गं. हिरवी मिरची घालायला हरकत नाही, पण ती दाताखाली आली चुकून की ज्येनांना ठसका लागतो!

घेवडा, श्रावणघेवडा, पावटा, वाल या सगळ्या साधारण सारख्या दिसणार्‍या पण वेगवेगळ्या भाज्या आहेत. (बहुतेक. कॉन्फिडन्स नाही.)

कै तरीच काय? गराचा काय संबंध ? तुम्हाला शेवग्याच्या शेंगा आठवतायत्का ?

श्रावण्घेवडा वेगळा असतो साधा वेगळा !!!!!

सगळे घेवडेच Biggrin

अवांतर : उटीच्या आमच्या हॉलिडे होम मध्ये गेलो असताना तिथल्या केअरटेकरने आम्हाला विचारले आज कौनसी सब्जी बनाऊ? मी आणि नवरा म्हणालो कुठलीही करा. पण मग दिरांच्या भाज्यांच्या जास्तच आवडी निवडी असल्याने त्यांना विचारायला सांगितले. के.टे. ने विचारले कॅबेज करु? त्यावर दिरांनी हो म्हटले. त्या के.टे.चं नशिब चांगलं म्हणून त्याला 'कॅबेज' दिरांना आणून दाखवायची बुद्धी झाली. ते 'कॅबेज' दिरांना दाखवून तो म्हणाला 'इस कॅबेजकी सब्जी बनाउ?". ते कॅबेज पाहून दिर तीन ताड उडाले. उटीला सगळ्या भाज्यांना कॅबेज म्हणतात की काय कुणास ठाउक! के.टेंने भरीताचं वांग दिरांना कॅबेज म्हणून दाखवलं होतं.

तसंच इथे सगळ्या शेंगा म्हणजे घेवडाच Light 1

मंजूडे, नको हताश होऊस Lol

आता इतक्या भरपूर नविन पोस्ट्स पाहून लली जाम खुश होईल नै? Wink

(बहुतेक. कॉन्फिडन्स नाही.)>>> आता अगदीच हताश झाले बै!
>> जरा पॉसिटिव साईडकडे बघ की मंजूडी. इतकी नावं माहितायत मला. Proud

के.टेंने भरीताचं वांग दिरांना कॅबेज म्हणून दाखवलं होतं.
>>> देवा! मंजूडी, ऐकतेयस ना? उटीला गेल्यावर भाज्या फक्त नावं ऐकून मागवू नकोस. Biggrin

लोला, आपल्याकडे तर त्याला अडीचमासा म्हणतात. तेवढ्या काळात तयार होतो म्हणून. तो शब्द लिहिला असता तर जागू म्हणाली असती, हा कुठला मासा ? ( आणि मला माहित नाही, म्हणजे काय ? असे पण जागूच म्हणाली असती ! )

Biggrin

किती कीस पाडाल शेंगेचा! Proud शेंगेसदृश कुठलीही भाजी या पध्दतीनं चांगली लागेल.

कानडी लोक ही भाजी धड शिजू देत नाहीत. आठवड्यातून कमीतकमी एकदातरी, अर्धीकच्ची भाजी, दोन तिंड्यांच्या मधल्या वेळातल्या उटात खाऊन कंटाळा कसा येत नाही माहिती नाही.

अशी भाजी फोडणी घालून ७ मिनिटे मायक्रोवेव मध्ये ठेवली की मस्त कुरकुरीत होते. ज्यांना क्रिस्प आवड्ते त्यांच्यासाठी. बीन्स गाजर मिक्स पण छान लागते.

आई आणि मावशी दोघीही सांगलीत वाढल्या. पण आई (रहाणार पुणे) श्रावणघेवडा म्हणते आणि मावशी(रहाणार गिरगाव) फरसबी. त्या ते सेम भाजीला म्हणतात कारण दोघींच्या पानात सेम भाजी असते.

घेवड्यालाच पापडीची भाजी असेही नाव आहे का? मिनोतीच्या ब्लॉग लिंकवरची जी भाजी आहे तिला आम्ही पापडी म्हणतो व ज्या ज्या भाजीवाल्यांकडून ती भाजी घेतली आहे ते सर्व या भाजीला पापडी म्हणून संबोधिताना ऐकले आहे / दरफलकावर वाचले आहे.

हो, बहुदा. आणि सगळ्यात आडव्या बांध्याच्या शेंगा पावट्याच्या असतात ना? घेवडाचर्चा वाचून माझाही कॉन्फिडन्स ढळलाय आता Proud

ह्या घेवड्यालाच आम्ही उसावरच्या शेंगा म्हणतो. आणि मुळ कृतीत दिसतो आहे त्याला श्रावणघेवडा..

अजून एक शेंग असते थोडीफार श्रावणघेवड्यासारखी दिसते पण त्याला बजुने थोडीशी लव/ फर असते. इचलकरंजी साईडला वर्षातुन २ महीने मिळते त्याला चवदारीच्या शेंगा म्हणतात.

@ शूम्पी
पण आई (रहाणार पुणे) श्रावणघेवडा म्हणते आणि मावशी(रहाणार गिरगाव) फरसबी. त्या ते सेम भाजीला म्हणतात कारण दोघींच्या पानात सेम भाजी असते. >>> छान! आणि हिंदीत घेवड्याला 'सेम' (किंवा 'सेम की फली') म्हणतात. Proud

Pages