एक सिगारेट पिणारी मुलगी

Submitted by तुमचा अभिषेक on 28 April, 2013 - 09:31

आज ती दिसली.. जवळपास तीन-साडेतीन वर्षांनी..

ट्रेनमध्ये, जरा दूरच्याच सीटवर बसलेली.. मला ती दिसत होती, म्हणजे ती देखील मला बघू शकत असणार.. बस्स, अजून तिचे लक्ष गेले नव्हते माझ्याकडे.. पण गेले तरी ओळखेल का..? का, नाही ओळखणार..? मी नाही का ओळखले तिला..? तसा फारसा बदल ही झाला नव्हता तिच्यात.. माझ्यात तरी कुठे फारसा झाला होता.. बस्स, बर्‍याच काही घडामोडी घडल्या होत्या आयुष्यात.. या गेल्या तीन-साडेतीन वर्षांत..

वाशीवरून वी.टी.ला जाणारी ट्रेन पकडली. बायकोबरोबर तिच्या माहेरहून परतत होतो. रविवारची संध्याकाळ अन फर्स्टक्लासचा डब्बा. गर्दी नेहमीपेक्षा तशी कमीच. दिवसभराच्या दगदगीने आलेला शीणवटा म्हणा, खाडीवरून येणारा खार्‍या चवीचा थंडगार वारा अंगाखांद्यावरून खेळू लागताच, बायको खिडकीला डोके टेकवून लवंडली. मी मात्र जागाच होतो.. नेहमीप्रमाणेच.. बोटांची नखे खात.. हातात नावाला म्हणून पेपर, मात्र इथे तिथे भिरभिरणारी नजर.. सवयीप्रमाणेच.. अन ती दिसली. एका नजरेतच ओळखले. आजही तशीच तर दिसत होती.. जशी तीन-साडेतीन वर्षांपूर्वी..

रिलायन्समधील नेहमीसारखीच एक सकाळ. नाश्त्याच्या ऑर्डरची वाट बघत कॅटीन काउंटरला रेलून उभा होतो. हातात नावालाच म्हणून मेनूकार्ड धरलेले, मात्र इथे तिथे भिरभिरणारी नजर.. सवयीप्रमाणेच.. अन ती दिसली. माझ्याच दिशेने येताना. खरे तर काऊंटरच्या दिशेने येताना. अगदी बाजूलाच येऊन उभी राहिली. तिच्या एका कटाक्षाच्या अपेक्षेत तिला न्याहाळत असलेलो मी. पहिल्या नजरेत भरावेत ते तिचे कुरळे कुरळे आखूड केस.. कानांमागे ओढलेले.. मानेवर रुळणारे.. थोडासा टॉमबॉईश लूक देणारे. अन साजेसाच पेहराव. निळ्याशार जीन्सवर पांढरी आखूड कुर्ती. डाव्या हाताच्या मुठीत घट्ट धरलेली पर्स अन तिलाच जणू मॅचिंग असे मनगटी घड्याळ. दुसर्‍या मनगटात मात्र जाडसर काळे कडे.. हो कडेच.. बांगडी तरी कशी म्हणावे त्याला. इतक्यात अचानक तिने माझ्या दिशेने पाहिले. अन मी अनुभवले ते आतापर्यंतच्या सार्‍या वर्णनाला छेद देऊन जाणारे, समोरच्याचा मनाचा भेद घेऊन जाणारे, तिचे काळेभोर डोळे.. आखीव रेखीव भुवयांच्या कोंदणात. त्या नजरेच्या कैचीत अडकणार नाही ते मन कसले.. कितीही चंचल का असेना, काही काळ रेंगाळणारच. त्या नजरेला कोणाची नजर लागू नये म्हणून काजळाने मढवलेले.. ते तिचे डोळे.

हसली तशी माझे आणखीनच भान हरपले. हाताला काहीसा झटका बसून भानावर आलो तेव्हा लक्षात आले की हातातले मेनूकार्ड खेचले जात होते. किंचित ओशाळल्यासारखे सॉरी पुटपुटलो खरे, पण तीचे लक्ष कुठे होते त्याकडे. कसलीशी ऑर्डर देऊन निघून गेली ती. अन तिला पाठमोरा न्याहाळणारा मी. केस अगदीही काही आखूड नव्हते. जीन्स-कुर्तीचा पेहराव तिला किती शोभत होता हे पाठीमागूनच समजावे.

अन मग हे रोजचेच झाले. तीच वेळ तीच जागा. तिचे बदलणारे कपडे पण तेच तसेच रुपडे. अन नजर, कातिल की काय म्हणतात अगदी तश्शीच. ज्यूस अन सॅंडवीचशिवाय वेगळे काही घेताना तिला कधी पाहिले नाही. ती मला बघते की नाही हे कधी कळले नाही. पण एकदा मी सुद्धा चीज सॅंडवीच घेऊन तिच्या जवळच्याच टेबलवर बसलो. मी मागायच्या आधीच हसून तिने सॉसची बाटली माझ्यापुढे सरकवली. पुन्हा ती आपल्या खाण्यात मग्न. मी हलकेच अंदाज घेत होतो, पण पुन्हा काही तिने माझ्याकडे पाहिले नाही. तिचे उरकले अन पर्स उचलून ती निघून गेली. कॅंटीनबाहेर पडून दिसेनाशी होईपर्यंत तिला नजरेनेच सोबत देत, सावकाशपणे मग मी देखील उठलो. ती उजवीकडे "ए" "बी" "सी" ब्लॉकच्या दिशेने आणि माझी पावले वळली डावीकडच्या "डी" ब्लॉककडे.

ठरवले तर कंपनीच्या पोर्टलवर तिची माहिती मिळवणे सोपे होते. तिचे नाव, तिची बसायची जागा, तिची कामाची पोस्ट, तिचे वयच नव्हे तर तिचा रक्तगट कोणता या सारखी वैयक्तिक माहिती सुद्धा सहज उपलब्ध होती. गरज होती ती फक्त पंधरा-वीस मिनिटांचा वेळ काढून पोर्टलवर फीड असलेला डेटा चाळायची. पण तशी गरज आहे हे मन कबूल करत नव्हते. कदाचित त्याला गुंतायची भिती वाटत असावी.

दिवस सरत होते. फारसे काही वेगळे घडत नव्हते. तरीही या नात्यातील वीण घट्ट होतेय असे जाणवत होते. येणार्‍या सकाळची वाट आदल्या रात्री डोळे मिटण्यापासून बघू लागलो होतो. सकाळचे तिचे दर्शन पुढच्या दिवसभराला पुरत होते. मध्ये एकदा तिला सुट्टे पैसे कमी पडत होते, तेव्हा मी माझ्याकडचे दोन रुपयांचे कूपन पुढे सरकवल्याचे आठवतेय. हात किंचित थरथरतच होता माझा त्यावेळी. तिने त्याकडे दुर्लक्ष करतच ते स्विकारले. त्या कूपनाची परतफेड म्हणून तिचे ते हसणे.. नंतरही कित्येकदा आम्ही एकमेकांना सामोरे गेलो. नजरेतील ते ओळखीचे भाव, ना लपवायचे प्रयत्न ना दाखवायची ओढ.. कधी कधी व्यक्त होण्यासाठी शब्दांचीही गरज भासत नाही, किनार्‍यावर उभे राहूनही लाटांशी खेळायचा आनंद लुटू शकते तेच खरे मन.. एकेक घर करत आमच्यातील नाते पुढे सरकत होते एवढे मात्र खरे..

या दिवसांत एखादा दिवस असाही यायचा जेव्हा ती दिसायची नाही. मन खट्टू तर व्हायचेच पण आयुष्यातील एक दिवस फुकट ही गेल्यासारखे वाटायचे. दुसरा दिवस येणार हेच काय ते समाधान. एखादा दिवस आपणही तिच्या नजरेस न पडून तिलाही तसेच वाटते का बघावे, असा विचार मनात यायचा. पण तिला काय वाटेल हे समजण्याचा मार्ग नसल्याने त्या विचाराला बगल दिली जायची.

अन अश्यातच एक दिवस मी तिचे वेगळे रूप पाहिले...

दुपारच्या वेळेला जेवण आटोपून काही कामानिमित्त "ए" ब्लॉकला जाणे झाले. उन्हाची झळ लागू नये म्हणून थोडेसे लांब पडत असले तरी पायवाटेवर केलेल्या शेडखालूनच मी सहसा जातो. पण आज आभाळ भरून आल्याने शॉर्टकट घ्यायची संधी साधली. थोड्याश्या अडनाड्या रस्त्याने जिथे चिटपाखरांचा अड्डा वसावा, खुरटी झुडपे तुडवत चालता चालता हातातल्या मोबाईलशी चाळा.. नेहमीप्रमाणेच.. मात्र इथे तिथे भिरभिरणारी नजर.. सवयीप्रमाणेच.. अन ती दिसली. आपल्याच धुंदीत, बरोबर तीनचार मित्र. ऑफिसचेच असावेत. हातात सिगारेट अन तोंडातून निघणारा धूर.. सर्वांच्याच.. अन हो, तिच्याही. धूराच्या वलयात धूरकट धूरकट होत जाणारा तिचा चेहरा, अन नकळत मंद झालेली माझी पावले. परत परत मान वळवून तिला पाहताना, अखेरच्या वळणावर तिची माझ्याकडे नजर गेलीच.. झटक्यात मान वळवली.. पण नजरानजर झालीच.

बस्स, तीच शेवटची नजरानजर.. पुढेही काही सकाळ आल्या, पुढेही नजरेच्या भेटी झाल्या. पण नजरेतील अर्थ आता बदलले होते. जाणूनबुझून मी तिच्यापासून नजर चोरू लागलो होतो. अन ती काही फरक पडत नाही असे दाखवत असली तरी तिची नजर खरं काय ते बोलत होती.

कधी कधी शब्दांना पर्याय नसतो.. नजरेची भाषा नातं जुळवण्यास कितीही समर्थ असली तरी जेव्हा तुटायची वेळ येते, तिथे शब्दच हवे असतात.. पण तो संवाद आमच्यात कधी झालाच नाही. इतक्यात तिची नजर माझ्याकडे गेली. आणखी एक नजरानजर, जवळपास तीन साडेतीन वर्षांनी.. पण नजरेत तेच तेव्हाचे ओळखीचे भाव. यावेळी मात्र लपवायचे प्रयत्न.. दोघांकडूनही.. शेजारी माझी बायको आहे याचे भान होते मला.. माझ्या शेजारी बसलेली मुलगी माझी बायकोच असणार याची जाण होती तिला.. तरीही नजर अडकली होती.. अन सोबतीला निर्विकार चेहरा.

पुढचे स्टेशन आली तशी ती उठली. नजरेची साखळी नाही म्हटले तरी तुटलीच. मुद्दामच ती उतरायला माझ्या विरुद्ध दिशेच्या दरवाज्याला गेली असावी. आजही ती पाठमोरीच छान दिसत होती. आजही सिगारेट पित असावी का.. तिला उतरताना पाहून माझ्या मनात आलेला शेवटचा विचार, मन पुन्हा एकदा चलबिचल करून गेला. खिडकीच्या बाहेर नजर टाकून ती दिसते का याचा शोध घेतला. मात्र ट्रेनने वेग पकडला तसे त्या गर्दीत हरवलेल्या तिला शोधणे अशक्यच.. कदाचित तिचे ते शेवटचे अपेक्षित दिसणे समाधान देऊन गेले असते. पण नशीबात नव्हतेच.. होती ती एक हलकीशी चुटपूट.. नकळत हात खिश्यात गेला.. सवयीप्रमाणेच.. पाकीटातून सिगारेट काढून तोंडात सरकवली.. नेहमीप्रमाणेच.. ट्रेनमध्ये आहे याचा विसर पडून ती शिलगावणार इतक्यातच..........

.
.
.

चुरगाळलेली ती सिगारेट खिडकीबाहेर जाताना पाहून........... किती बरे झाले असते ना, जर मनातल्या आठवणीही अश्याच काढून फेकणे सोपे असते तर..

- तुमचा अभिषेक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर. तुम्ही स्वतः सिगरेट ओढणार्या व्यक्ती असताना दुसर्या व्यक्तीने सिगरेट ओढली हे पाहिल्यावरमात्र तिच्याकडे पहाणे बंद केलात. अतिसुंदर.
की तेव्हा तुम्ही फुकत नव्हता म्हणून अशी प्रतिक्रिया दिलीत व जेव्हा स्वतः सुरू केलात तेव्हा त्या वागण्याचा पश्चाताप झाला?

सोनू. +१
म्हणजे पहा, त्या मुलीच्या तेवढ्या एका गोष्टीने तिचा आत्तापर्यंतचा सगळा प्रभाव पुसला! असं का असावं?

अभिषेकला सिगरेट पिण्याचा प्रॉब्लेम नाहिये पण मुलींनी पिण्याचा आहे. सिगरेटला मात्र मुलगा मुलगी असा भेद कळत नाही. ती दोघाम्च्याही लंग्जचा बँड वाजवते. सो आय लाइक सिगरेट मोअर दॅन पिपल लाइक अभिषेक.

मुलींनो, मला तर कथेचा वेगळाच अर्थ लागला.
'तिच्यासाठी ' म्हणून त्याने सिगारेट प्यायला सुरूवात केली असेल आणि त्याने आपल्याला सिगारेत पिताना पाहिले म्हणून कदाचित ती थोडिशी हबकली असेल. कदाचित म्हणून नंतर ओळख दाखविली नसेल.
याहून अधिक म्हणजे समाजातली हायपोक्रसी अभिषेकने स्वतःच्या उदाहरणातुन मांडली असेल. (असे समजून उमजून लिहायला धाडस लागते बाबा!)
अभिषेक, कथा आवडली.

साती - तिच्यासाठी फुकणं सुरू केलं तर तिच्याकडे बघणं बंद कसं होईल? उलट फुकताना तिने पहावं म्हणून प्रयत्न करणे, स्मोकिंग पार्टनर बनणे वगैरे पायर्या येतील ना ! त्यामुळे तुम्हाला लागलेला अर्थ बाद.

नताशा - रिलायंस मधे काम करणारा, शिकलेला, आपल्या आॅफीसमधे मुलीही काम करतात यात काही गैर नाही हे मानणारा म्हणजेच मुलगा-मुलगी समान काम करू शकतात हे मानणारा, मुलीकडे नुसतेच पाहणारा व कुठेही फालतूपणा न करता तिच्या सौंदर्या़चे वर्णन करणारा ' तो ', ' ती मुलगी आहे तर तिने फुकणे हा अक्षम्य गुन्हा आहे व यापुढे अशा मुलीला मी माझ्या नजरेतून वाळीत टाकतो, मी मात्रं मुलगा असल्याने फुकू शकतो ' असा काही तालिबानी विचार करेल का? आणि असेल कोणी अजूनही असे बुरसटलेले विचार असलेला तर हे गलिच्छ विचार प्रकाशित करणे जरा अति धाडसाचे होईल ना ! अभिषेक यांचं लिखाण मला आवडतं. आवडते लेखक इतका घाणेडा विचार करत असतील हे पटायला थोडं जड आहे.

अभिषेक - तुम्हीच सांगा गोष्टीतलं रहस्य. आम्ही काही वाचक कमी पडतोय रहस्यभेद करायला.

अभिषेक.. खर्रच कळ्ळं नाही तुला नेमकं काय म्हणायचंय ते???
चुटपुट कशाबद्दल वाटली शेवटी?? फक्त सिग्रेट पिते या कारणावरून आवडायची बंद झाली म्हणून कि ..मी कन्फ्यूज्ड!!!!!!!
प्लीज एक्स्प्लेन.. Happy

पहिल्या नजरेत भरावेत ते तिचे कुरळे कुरळे आखूड केस.. कानांमागे ओढलेले.. मानेवर रुळणारे.. थोडासा टॉमबॉईश लूक देणारे. अन साजेसाच पेहराव. निळ्याशार जीन्सवर पांढरी आखूड कुर्ती. डाव्या हाताच्या मुठीत घट्ट धरलेली पर्स अन तिलाच जणू मॅचिंग असे मनगटी घड्याळ. दुसर्‍या मनगटात मात्र जाडसर काळे कडे..>>>

मस्त वर्णन. डोळ्यांपुढेच उभी राहिली ती.

हाये! पुरानी यादें ताजा कर दीं!
हे असचं माझ्याही बाबतीत झालं होतं. फक्त मी एकदा तिला propose करायचा प्रयत्न केला होता आणि तिला बोलायला गेल्यावर माझी फाटली होती. आणि

नंतर ती सिगारेट ओढताना दिसलयावर मी तिचा नाद सोडला होता.

अभि,
लिहीत रहा. प्रत्येक वेळी लिखाण चांगलंच व्हायला पाहीजे असं काहीच नाही. समजा कथा फसलीच तर नव्या हुरुपाने पुढची कथा अधिक चांगली लिहायला घ्यायची. घे बघू नवी कथा लिहायला.\

माझी एक साधारण अशीच कथा यावरून आठवली. (रिक्षा नाही ;))
http://www.maayboli.com/node/39684

इंडीअन एक्स्प्रेस मधे काम करत असताना financialexpress मधल्या जवळपास सगळ्याच मुली सिगरेट ओढत होत्या..
सुरुवातीला वेगळे वाटले .. पण नंतर सवय झाली बघायची (मी स्वतः सिगरेट ओढत नाही Wink )

सिगारेट पिणार्‍या मुलीबद्दल काय वाटतं हा प्रत्येकाच्या मानसिकतेचा भाग आहे. मलाही ऑफीस बिल्डींग खाली उभ्या राहुन सिगारेटी फुकणार्‍या मुली पाहील्या की डो़क्यात तिडीक जाते.

<<<<<<<<<तालिबानी विचार करेल का? आणि असेल कोणी अजूनही असे बुरसटलेले विचार असलेला तर हे गलिच्छ विचार प्रकाशित करणे जरा अति धाडसाचे होईल ना ! >>>>>>>अतिशय टोकाचा प्रतिसाद

माझ्या मते . अभिषेक सुरुवातीला सिगरेट ओढत नसेल.. जेव्हा ती मुलगी आवडत होती. साहजिकच त्यावेळी तिला सिगरेट पिताना बघितल्यावर बहुतेक त्याच्या मनात तिच्या विषयी वेगळे अर्थ निष्कर्ष लागले. मुली सुध्दा प्रथम दर्शी मुलांना सिगरेट पिताना बघितल्यावर नाक मुरडतातच.. त्यामुळे अभिषेक मनात वेगळे विचार आल्याने दुर जाउ लागला..कालांतराने काही कारणास्तव त्याला सुध्दा सिगरेट ची सवय लागली.. त्या मुली बद्दल्चे आलेले विचार विसरला ... ज्या गोष्टी मुळे त्याच्या मनात घृणा निर्माण झालेली तो ती विसरलेला... जेव्हा त्या मुलीला परत बघितले आणि स्वतःला सिगरेट ची तलफ लागली त्या वेळी त्याला मागचे सगळे आठवले त्याला त्याचे विचार त्याची घृणा त्याची चुक समजुन आली....
.
माणसाची सवय वाईट असते माणुस नव्हे ....

अभिषेक ही गोष्टं ठीकच जमलीये.
आता मी मोठ्ठ्याने विचार करणारय तेव्हा संभाळून... स्लिप ऑफ मेंदू (माझा) होऊ शकतो.

ती पीत होती तेव्हा तो पीत होता का?
हो? मग फुंकण्याचे दोन्दोन दुष्परिणाम एकाच घरात नकोत म्हणून नाद सोडला असेल.
नाही? मग आधी "नको रे बाबा" म्हणून मागे सरला असेल... अन मग त्या दु:खात (??) नंतर स्वतः फुंकायला लागला असेल.
बायको फुंकणारी नाही असं त्याला वाटतय (काही नीटपणे लिहिलं नाहीये... पण अनेक शक्यतांमधली एक शक्यता).
समजा असली, तरी वाचकाला फरक नाही पडत... तेव्हा ते राहु द्या.
नसली तर? महान आहे. फुंकणारा नवरा चालवून घेण्याइतपत नक्कीच(म्हणजे नायकापेक्षा) महानच आहे.
आता ती फुंकणारी रेल्वेत दिसली तर दोन पर्याय आहेत. बायकोला सोडून तिच्याकडे जाणे किंवा तिला ...भिरभिरणारी नजर.. सवयीप्रमाणेच... वगैरे मागून न्याहाळणे.
ती फुंकणारी असली तरी बायको इतकी महान नस्ली तर? पुन्हा नको रे बाबा...

असेही नायक असतात... असा निष्कर्ष काढला मी आणि जरा बरं वाटलं.
फक्तं असे म्हणजे नक्की कसे? ते एक कळलं असतं तर जरा अधिक बरं झालं असतं.
मला असं वाटतं की... <<भिरभिरणारी नजर.. सवयीप्रमाणेच..>> हाच प्रॉब्लेम आहे नायकाचा.

(मी भयंकर पकलेय ... गोष्टीवर नाही... असच. त्यामुळे इतकं सगळं लिहिलय... खरतर पहिल्या वाक्यानंतर थांबायला हरकत नव्हती)

अभिषेक,लिखाण खूप सुंदर पण त्यातून येणारा मेसेज तितका छान नाही .तो असावा अशी अपेक्षा दर वेळी ठेवायची नसली तर ठीकच.
मेघना पेठेंची एक सुंदर कविता आठवतेय अन मेघनावर लिहायचा मोह होतोय या क्षणी.

दा>>द!!!!!! ___/\___ Rofl Biggrin क्या क्या सोचती हो तुम भी Lol

अभिषेक... अरे कुठेस तू?????? वाच्तोयेस ना हे सर्व???

तुझ्या गोष्टी नेहमीच आवडतात रे, छानपैकी मांडतोस.. हे पण तुझ्या मनात त्या क्षणी आलेले विचार जसे च्या तसेच तू उतरवले असणार कागदावर.. ओह.. स्क्रीनवर...

कधी कधी वाटतं सगळ्याच कथांतुन काही ठराविक असा अर्थ निघायलाच हवा का?
मला ही कथा समजली नाही पण आवडली जरुर...
कथा नायकाच्या मनाच्या कोतेपणाची एखादी झलक दाखवायची असावी कदाचित!
( पण जितकं "मी" अभिषेकदादाला ओळखते त्यावरुन तरी वाटत नाही की अस काही असावं )

मुलगी आहे तर तिने फुकणे हा अक्षम्य गुन्हा आहे व यापुढे अशा मुलीला मी माझ्या नजरेतून वाळीत टाकतो, मी मात्रं मुलगा असल्याने फुकू शकतो ' असा काही तालिबानी विचार करेल का? आणि असेल कोणी अजूनही असे बुरसटलेले विचार असलेला तर हे गलिच्छ विचार प्रकाशित करणे जरा अति धाडसाचे होईल ना !ं<< बाप रे!!!

कथेमधे कुठेही अभिषेकने (म्हणजेच नायकाने) "वाळीत टाकणे" वगैरे प्रकार केलेले नाहीत. एखादी मुलगी आवडत होती, क्रश होता, नंतर काहीही कारणाने (इथे सिगरेट ओढणे एवढेच) ती मुलगी आवडेनाशी झाली. त्यानंतर आयुष्यामधे दुसरीच कोणीतरी आली, ही आधीची मुलगी आठवण बनून राहिली. नंतर कधीतरी ती मुलगी पुन्हा दिसली आणी ज्या कारणाने ती आवडेनाशी झाली होती, तीच गोष्ट नायकाची सवय बनून गेली आहे. इतकाच सिम्पल विरोधाभास दिसतोय या कथेमधे. सिगरेट ओढणे याऐवजी भडक लाल रंगाचा ड्रेस घालून येणे, चष्मा वापरणे, नॉनव्हेज खाणे या आणि असल्या अजूनही कित्येक गोष्टींनी क्रशचा खातमा होऊ शकतोच की. रीअल लाईफमधे आपल्यासोबत असं झालेलंच असेल की.

मी स्वत: एकेकाळी स्मोकिंग करायचे, त्यामुळे स्मोकिंग करणारी मुलगी दिसली की समोरच्याची नजर कशी बदलते याचा पुरेपूर अनुभव घेतला आहे. आणि त्यामधे मला समोरचा तालिबानी, गलिच्छ वगैरे कधी वाटला नाही. पसंद अपनी अपनी... Happy

अवांतर: प्रत्येक कथा ही पॉलिटीकली करेक्ट असावीच असा अट्टाहास हल्ली का मायबोलीवर दिसतो हे न कळे!!

कथा काल्पनिक असेल तर जमलीच आहे.

जर सत्य असेल तर अभिनंदन. आपले दोश मांडायची हिंमत तुझ्यात आहे हे पाहून आनंद वाटला. मुळातच नैतिकता, अनैतिकता, संस्कार या शब्दांचे अर्थ, व्याख्या बदलत्या काळानुसार बदलायला हवेत हे जोपर्यंत आपण कबुल करत नाही तोपर्यंत हे असेच होत राहणार. Happy

नंदिनी, १००% सहमत !

अरे , एवढी चर्चा .. पण मला तर वाटतं मुद्दाम च असा शेवट केलाय :), समाजाचं डबल स्टँडर्ड्स दखवण्यासाठी , I think just sarcasm meant:).
बाकी अभिषेक सांगेलच !

Pages