''भटकंतीचे वेड लागले, की मग त्याला काळा-वेळाचे, ऋतू-हंगामाचे बंधन उरत नाही. मनाला वाटेल तेव्हा आणि शरीराला झेपेल तसे 'सॅक' घ्यायची आणि चालू पडायचे असेच अनेकांचे होते...." इति लोकसत्तामधील अभिजीत बेल्हेकर नामक लेखकाच्या भटकंतीवरील लेखातील ओळी वाचल्या.. नि मला 'ऑफबीट' ग्रुपची प्रिती अँड गँग आठवली..ही गँग जवळपास प्रत्येक विकांताला 'हा' ना 'तो' डोंगर, घाटरस्ता पालथा घालण्यात मग्नच असते... ह्यांचा कितीही हेवा वाटला तरी कमीच... इथे तर आमचा ट्रेकयोग जुळून येण्यात बर्याच अडचणी येत होत्या.. गेले दोन-अडीच महीने सह्याद्रीभेट घडली नव्हती नि आता तर 'चैत्र' महिनाच्या उकाडयात तशी शक्यता कमीच वाटत होती.. त्यामुळे मन अधिकच अस्वस्थ होते... ही अस्वस्थता नि नेहमीच्या कामाच्या गडबडीतून मिळालेली उसंत यांचा अगदी योग्यवेळी मिलाफ घडून आला नि ऑफबीटच्या प्रितीला कळवले 'येतोय ट्रेकला' !! 'गडगडा उर्फ घरगड' ट्रेक !
आता यो जातोय म्हणजे दोन- तीन मायबोलीकर आलेच.. तेव्हा 'गिरीविहार' व 'विनय भीडे' पण तयार ! गेली दोन-तीन वर्षे एकही मायबोलीकर माझ्यासोबतीला नाही असा ट्रेक कुठला झालाच नाही.. नि तसे ठरवले तरी होणार नाही ह्याची पक्की खात्री आहे !
काही गडांची नावे अशी दिलखेचक असतात की बस्स ! ऐकूनच मनात कुतूहलाचे प्रचंड काहूर माजते !! असेच कुतूहल निर्माण करणार्या एका गडाचं नाव 'गडगडा' ! यालाच 'घरगड' असेही म्हणतात.. पायथ्याशी असणार्या 'गडगड सांगवी' या गावाकडूनच या गडाला 'गडगडा' हे पद बहाल झाले असावे..
दिडेकवर्षापुर्वी ग्रुपबरोबर ट्रेकला जाणे झाले होते... नि आता पुन्हा एकदा ग्रुपला उत्सुकतेने सामिल झालेलो.. साहाजिकच बसमध्ये दंगल-मंगल गाणी सादर झाली.. दंगा संपून डोळ्याची पापणी लवते न लवते तोच आम्ही गावात पोहोचलोसुद्धा ! रात्रीचे साडेतीनची वेळ होती सो मिळालेल्या दोन तासात ताणून देउया या उद्देशाने गाडीबाहेर पडलो तोच थंडगार वारा येउन थडकला ! शाळेच्या वरांडयात मॅट टाकून झोपायच्या आधीच या वार्याने आपला इरादा स्पष्ट केला ! चैत्र महिन्यात नक्की उन्हाळा कि हिंवाळा असा विचार करण्यास भाग पाडणारा असा हा वारा ! नाईलाजाने झोपण्यापेक्षा कुडकुडणेच पसंत करावे लागले ! झोपण्याचे अथक प्रयत्न सुरु आहेत म्हणून की काय त्यात गावातलं कोंबड आरवून 'अंगाईगीत' म्हणू लागला ! नि खरच इथे गिरीचे घोरणे पण सुरु झाले ! त्या कोंबड्याची तरी चुकी काय म्हणा.. चार वाजले की कोंबडा आरवतोच नि झोपायचे झाले की गिरी घोरतोच !
तांबडे फुटायची वेळ झाली पण थंडगार वारा काही स्तब्ध नव्हता.. क्षितीजकक्षा ओलांडून येणारा उगवतीचा सुर्य गावातूनच बघायला मिळणे ही खरीच लाजवाब गोष्ट ! आकाशातील कृष्णमेघांमुळे तर इथे सुर्योदयाच्या सौंदर्यात आणखीन भर पडत होती..
- -.
डावीकडे गावापलीकडे पाहीले तर एक उत्तुंग डोंगररांग ढगांच्या धुक्यात निजलेली होती.. याच डोंगररांगेला अंबोली पर्वतरांग म्हटले जाते.. या रांगेच्या अगदी डावीकडचे शिखर म्हणजे 'अघोरी' नि उजवीकडचे शिखर म्हणजे 'अंबोली'.. नि या दोन शिखरांमध्ये पसरलेला डोंगर म्हणजे गडगडा !
(आम्ही मायबोलीकर - गिरिविहार व विनय भीडे)
उंची सुमारे ३१५० मीटरच्या आसपास.. जिल्हा: नाशिक.. ट्रेकक्षितीज संकेतस्थळावर दिल्याप्रमाणे मुंबईहून नाशिकला जाताना १८ किमी अंतराच्या अलिकडे वैतरणा फाटा लागतो तिथेच पुढे वाडिव्हरे गाव लागते.. नाशिकहून दर तासाला वाडीव्हीरे गावात जाण्यासाठी एसटी सुटतात.. पण 'गडगडा'साठी पुढे अंदाजे ४ किमीचे अंतर पायपीट करुनच 'गडगड सांगवी' हे पायथ्याचे गाव गाठावे लागते.!! थोडक्यात 'गडगडा सांगवी' गावापर्यंत अजून एसटीचे हात पोहचलेले नाहीत..अहो आश्चर्यम !
गडगडा सांगवी हे तसे छोटेच गाव.. अंदाजे २०-३० घरांची वस्ती असावी.. बहुतांशी गावात असते त्याप्रमाणे एक छोटी शाळा व देउळ आहे.. बकर्या, कोंबडया, गुरं यांचा कल्लोळ कानावर पडतोच... या गावातूनच गडाकडे रस्ता जातो.. आम्ही नाश्ता-पाणी, ओळखपरेड रितसर आटपून सव्वासातच्या सुमारास चालायला घेतले.. पहाट तरी विलक्षण गारवा देणारी होती.. आता उर्वरीत दिवस गरमागरम जाणार हे मनात ठेवूनच होतो.. गाव सोडले की वाटेतच काही 'वीरगळी' दिसतात.. वाट एकदम ठळक नि सोप्पी.. वाटेत डावीकडे नजिक असणारा 'अघोरी' डोंगर फारच लक्ष वेधून घेत होता !
दुतर्फा असणारी करवंदीची जाळी आपल्याजवळील टपोरी करवंदाचा नजारा पेश करत होती.. अजुन पिकलेली नसली तरी नकळत हात जात होताच.. वाटेत गुराख्याची गुरं आडवी येत होतीच! एकूण अश्या ह्या प्रसन्न प्रभातसमयी एकच खटकणारी गोष्ट म्हणजे गडाच्या अगदी पायथ्याला असणार्या हनुमान मंदीरातून कर्कश आवाजात ओरडणारे कर्ण !! कुठल्यातरी भसाडया आवाजातील बेसुरी गाणी सकाळची शांतता भंग करीत होती.. आम्ही त्या मंदीराच्या जवळपास पोहोचेस्तोवर त्या गाण्यांमधील काही गंमतीदार ओळी विन्याच्या पाठपण झाल्या !!
जेमतेस अर्ध्यातासाच्या वाटचालीनंतर महादेवाचे छप्परवजा छोटे मंदीर लागते..बाजुलाच पायर्या असलेली छोटी विहीरदेखील आहे.. पाणी बर्यापैंकी पिण्यायोग्य वाटले.. पण हवय कुणाला ? आतापर्यंतची वाटचाल शीतल वातावरणामुळे अगदी सुखद झाली होती. सो घशातील व्याकुळता अजून प्रकटली नव्हती !
हे मंदीर वाटेला लागूनच डावीकडे आहे.. तर उजवीकडची वाट हनुमान मंदीराकडे घेउन जाते.. इथवर आलो म्हणजे अर्धी चढाई झाल्यात जमा ! त्या हनुमान मंदीराच्या मागूनच गडाकडे जाण्याचा मार्ग आहे जो आपल्याला कोरलेल्या पायर्यांपर्यंत घेउन जातो.. त्या पायर्या अगदी गडावरील देवीच्या मंदीरापर्यंत आहेत.. त्यांना पांढर्या चुन्याने विचित्रपणे मढवले असल्याने अगदी दुरुनही हा मार्ग समजून जातो.. पावसात तर कदाचित त्या पांढर्या रंगामुळे धबधबा कुठला नि कोरलेल्या पायर्या कुठल्या हा प्रश्नच पडावा !
आम्ही मात्र ही कोरलेल्या पायर्यांची वाट उतरताना घेणार होतो.. तेव्हा ती उजवीकडची वाट सोडून आम्ही सरळच चढाई करत गेलो जिथे 'अघोरी' व 'गडगडा' हे डोंगर हातमिळवणी करतात.. इथेही एक उंबराच्या झाडाला लागून छप्परवजा पाषाणीमुर्तीचे छोटे देउळ आहे... नि मग इथूनच 'गडगडा'वर स्वागत करण्यासाठी सज्ज असलेल्या पायर्या दिसतात.. या पायर्यांजवळ आलो की पलिकडचे दृश्य पहायला मिळते जिथे 'डांग्या सुळका' मोठया तटस्थपणे उभा दिसतो.. !
- -
हाच 'डांग्या सुळका' जो अनेक गिर्यारोहकांना तांत्रिक चढाईसाठी आव्हान देत असतो.. इथेच चार- पाच महिन्यांपुर्वी चढाई करताना मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे दुर्घटना घडली होती जिथे 'संदीप पाताडे' या ठाण्यातील गिर्यारोहकाचा पडून मृत्यू झाला होता..
'गडगडा' उर्फ घरगडचा विस्तार तसा मोठाच आहे.. डावीकडून एक छोटया कातळापासून सुरवात होते.. त्या पायर्यांनी याच कातळाच्या खाली येतो नि वरती जाण्यासाठी कातळाला वळसा घालून जाणारी वाट दिसते..
इथून दिसणारा डांग्या सुळका व भवताल..
हा छोटा कातळ नि गडगडाचा डोंगर यांच्यामधील छोटया भेगसदृश घळीमध्येच गावकर्यांनी नव्याने दगडी पायर्यांचे बांधकाम केले आहे.. जेमतेम पाच-सहा असणार्या ह्या पायर्यांमुळे भेग बुजवलेली दिसते.. आम्ही इथे येइस्तोवर आमच्याआधीच एक चार-पाच जणांचा ग्रुप पुढे गेला होता..त्यांच्या त्या छोटया कातळावर घुटमळणार्या मानवी आकृत्या खालून येतानाच टिपल्या होत्या..
या छोटया कातळावर आलो की मग एव्हाना डावीकडे असणारा 'अघोरी' मागील बाजूस उभा दिसतो.. ह्या डोंगराला 'अघोरी' म्हणण्याइतपत काय अघोरी कृत्य केले होते कुणास ठाउक ! तेव्हाची दिलेली नावेसुद्धा डोंगराप्रमाणे किती आकर्षक ! त्या छोटया कातळमाथ्यावर जात्यासाठी कोरलेल्या खुणा आढळतात.. बाकी ही जागा मला उडीसाठी चांगलीच वाटली सो उडीबाबा प्रकटम !
त्या छोट्या कातळमाथ्याला मागे सोडून आता आम्ही 'गडगडा'च्या कातळमाथ्यावर चढाई सुरु केली.. इथेही अधुनमधून पायर्या आहेत.. चकाकते उन व सोनसळी गवत ह्या दोन गोष्टींमुळे हा कातळमाथा जणू वाघाचे कातडे पांघरुन घेतल्यागत भासत होता..
- - -
चढताना पाठीमागे दिसणारा अघोरी आणि खालच्या बाजूस छोटा कातळमाथा
पुढील वाट ही डोंगराच्या खाचेतून देवीच्या मंदीराकडेजाते.. अगदी साल्हेर, अलंग-मदन ला आहे तशी वाट.. इथेच कोरलेल्या पायर्यांची वाट येउन मिळते.. या मंदीराची नव्याने रंगोटी झालेली दिसते.. दोन वाघांच्या नि दोन देवींच्या अश्या मुर्त्या आहेत.. दशभुजा देवीची लहान मुर्ती खूपच सुंदर ! पुरेसे पाणी जवळ बाळगल्यास या मंदीरातही मुक्काम होउ शकतो ! दहा- पंधराजण सहज झोपू शकतात..
- - -
खरे तर या मंदीराच्या वरच्या बाजूनेच गडमाथ्यावरील प्रवेशद्वारापर्यंत जाण्यासाठी पायर्या होत्या.. पण इतरगडांप्रमाणे इथेही ब्रिटीशांची अवकृपा दिसून आली.. ! साहाजिकच हा गड त्यामुळे कठीण श्रेणीत गणला जातो ! पायर्या उडवल्या म्हणून काय झाले.. गडमाथ्यावर जाण्यासाठी अजुन एक वाट आहे जी मंदीराच्या पुढे जाते व डोंगराला वळसा घालून खिंडीत येते जिथे अंबोली पर्वताशी हातमिळवणी झालेली दिसते.. एव्हाना अकरा वाजत आले होते नि उनाच्या झळा आता कुठे डोके वर काढत होत्या.. पण अधुनमधून येणार्या थंडगार वार्यामुळे त्यांना पुरेसा वाव मिळत नव्हता !
ऑफबीटचे प्रमुखलोक्स एव्हाना कामाला लागले होते.. तांत्रिकचढाईसाठी लागणारे साहित्य त्यांच्या अवजड पाठपिशवीतून बाहेर पडले.. एका माणसाएवढ्या अवजड पाठपिशव्या घेउन हे दोस्तलोक्स इतक्या सहजतेने वावरतात हेच मुळी कौतुकास्पद ! शिवाय पुढे लगेच चढाईसाठी रोप सेट-अप लावण्याच्या तयारीत गुंतायचे !
- -
- -
आम्ही त्यांची ही तयारी होइपर्यंत भोवतालचा परिसर न्याहाळत बसलो.. खिंडीतून पलिकडे वालदेवी धरणाच्या जलाशयाचा परिसर छानच दिसत होता..! आमच्याआधी चार-पाच जणांचा एक ग्रुप पुढे गेल्याने त्यांचे प्रस्तरारोहण होइस्तोवर थांबावे लागणारच होते.. तेव्हा आम्ही तिघे- चौघेजण खिंडीतूनच आंबोली डोंगराला वळसा घालून जाणार्या वाटेने पुढे गेलो.. पुढेच कुठेतरी गुहा असल्याचे ऐकून होतो.. थोडीशी निमुळती असणार्या ह्या वाटेने जपुनच जावे लागते.. काही अंतरावरच मानवनिर्मित ३-४ फूट उंच अशी चौकोनी गुहा नजरेस पडली.. म्हटले कितपत आता जाता येते ते बघूया म्हणून टॉर्च घेउन रांगतच आत शिरलो.. जशे आत शिरलो तसे गारवा जाणवू लागला.. ही गुहा आत सरळ रेषेत खोदलेली आहे.. वाटले होते वटवाघुळ वा त्यांची घाण असेल पण तसे काही नाही.. फक्त मातीच काय ती.. जवळपास पंधरा फूट आत शिरलो होतो नि पुढे पाहीले तर हीच गुहा इंग्रजी अक्षर 'T' च्या आकारात डावीकडे नि उजवीकडे वळत होती.. टॉर्चच्या प्रकाशात दिसले की डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूला भुयारसदृश खड्डा होता नि पुढे अजुन एक गुहाच दिसत होती..उत्सुकता वाढल्याने अगदी सावधगिरीने त्या भुयारात उतरलो.. इथे उतरलो नि चक्क उभा राहू शकलो ! तिथेच मग वाकून पुढल्या गुहेत पाहीले तर अगदी छोटीशी खोलीसदृश गुहा वाटली.. हे सगळे बांधकाम थक्क करणारे होते पण नक्की वापर कशासाठी हे गुलदस्त्त्याच राहीले ! मातीत लोळण घातल्यागत अवतार करुन आम्ही बाहेर आलो नि आमचा अवतार बघून इतरांनी बाहेरूनच गुहेला सलाम ठोकला..
(गुहेतून बाहेर पडताना विन्या व उजवीकडच्या फोटोत भुयार आणि गुहा)
आम्ही पुन्हा खिंडीत आलो तर आमच्यातल्या दोघा-तिघांनी पहिला कातळटप्पा चढायला सुरवात केली होती..
- -
फारशी जागाही नव्हती उभे रहायला.. एका झाडाला पकडून वरती निमुळत्या जागेत उभे रहायचे.. तिथेच मग दोरीच्या सहाय्याने चढाई करायचे.. अंदाजे पंधरा फूटी कातळटप्पा असावा.. अगदीच सरळ रेषेत नसल्यामुळे फारसे अवघड नव्हते.. तरीसुद्धा दोन-तीन ठिकाणी पकड मिळवणे थोडे कठीणच होते शिवाय सगळ्यांनाच चढणे शक्य नव्हते... इथे ऑफबीटच्या तांत्रिकमंडळाने सुरक्षिततेबद्दल जराही कसूर बाकी ठेवली नव्हती व त्यामुळे सगळ्यांसाठी हा टप्पा सुकर झाला !
या टप्प्यातून वरती आलो की थोडी घसार्याची छोटी वाट वरती येते.. नि पुन्हा समोर अजुन एक अंदाजे वीस फुट उंचीचा कातळटप्पा लागतो..खालचे सगळेजण येइपर्यंत इथेच भर उनात क्षणभर विश्रांती झाली ! दुपारच्या बाराची वेळ.. उनाने आपले अस्तित्व दाखवण्यास सुरवात केली होती..पण वेळीच ढग धावून आले नि उनसावलीचा खेळ सुरु झाला.. त्याचे पडसाद भूतलावर उमटू लागले.. मग काय तेच पाहत बसण्याचा विरंगुळा सुरु झाला.. अजुन एक गोष्ट अशी की अधुनमधून आकाशातून 'धुडडूम' असा मोठा आवाज कानावर पडत होता.. मग कळले की जवळच 'ओझर'ला मिग या लढाउ विमानांचा कारखाना आहे.. त्यांची चाचणी इथे होत असते..
अंबोली पर्वताची डोंगररांग
मार्गातील दुसरा कातळटप्पा झाला की गडमाथ्यावर पोहोचणार होतो.. पुन्हा एकदा एकेकजण ताकदीने दोरीच्या सहाय्याने चढू लागले.. इथे पकडीसाठी खोबणी आहेतच.. जवळपास पहिल्या टप्प्यासारखाच हा टप्पा ! हासुद्धा आरामात सर झाला.. !
- - -
- - --
हुर्रे !
आतापर्यंत विनम्रपणे वागणारे सुर्यनारायन कठोर बनले होते.. माथ्यावर आलो तर सगळीकडे रखरखाट होता.. माजलेले सुके रान... गडमाथ्यावर बाकीचे येईपर्यंत कुठे सावली दिसतेय का बघून झोकुन देण्याचा विचार होता.. सावली मिळणे तसे कठीणच वाटत होते.. इथून छोट्या पाउलवाटेने पुढे गेलो तर डावीकडे उद्ध्वस्त प्रवेशदार दिसले..
त्या ब्रिटीशांनी सुरुंग लावून पायर्या उडवल्या नसत्या तर देवीच्या मंदीराकडून थेट या प्रवेशद्वारापर्यंत येता आले असते.. असो.. आम्ही उतरताना इथूनच अंदाजे १०० फूट खोल रॅपलिंग करुन उतरणार होतो.. आम्ही त्या पाउलवाटेने पुढे गेलो नि पाण्याच्या टाक्या नजरेस पडल्या.. काही वेगळीच रचना.. कातळात कोरलेल्या आहेत.. उतरण्यासाठी अगदी पायर्या आहेत.. शिवाय टाकीत दोन चौकोनी दालनंसुद्धा कोरलेली दिसतात.. पण येथील पाणी आता पिण्यायोग्य वाटले नाही...
गडावर पुढे अजुन एक टाक्यांचा समूह आढळतो.. तर काहीठिकाणी रानामध्ये लुप्त झालेले दोन तीन अवशेष नजरेस पडले.. आता मात्र सावलीचा शोध घेणे गरजेचे होते.. अगदीच नाही मग बोराच्या एका छोटया झाडाखालचे सुकलेले रान जबरदस्तीने आडवे करुन त्यावरच मॅट अंथरुन बसलो! मागाहून आलेले सगळेजण मग इथेच दाटीवाटीने बसले नि सामुहीक भोजनाचा कार्यक्रम उरकला.. गप्पागोष्टी आटपून काहीजण मग गडफेरीसाठी गेले.. तांत्रिकमंडळ रॅपलिंगच्या तयारीला गेले.. काहीजण फोटुग्राफीसाठी हिंडायला गेले.. तर काहीजण त्याच झाडाखाली आडवे झाले.. चॉईस अपनी अपनी !
आता रॅपलिंगसाठी पुन्हा आमचे क्रम लागले.. तांत्रिक-मंडळाने चोख बंदोबस्त ठेवला होता.. प्रवेशद्वराजवळ तीन-चार पायर्या उतरल्या की थेट रॅपलिंगला सुरवात होत होती.. तिथूनच थेट मंदीराजवळ उतरता येत होते..
- - -
''मायबोलीकर विन्याला ढकलून देतेय ओवर !!'' इति वॉकीटॉकीवरून कॅप्टन प्रिती
विन्या : मम्मीsss
- - -
रॅपलिंग सारांश
- -
देवीचे पुन्हा एकदा दर्शन घेतले नि पायर्या उतरायला घेतल्या.. ही पायर्यांची वाट वाटते तितकी सोप्पी मुळीच नव्हती.. थोडा पाय चुकला वा तोल गेला की घरंगळत दहा पायर्या खाली अश्या धोकादायक पायर्या आहेत.. इथून चढणे म्हणजे गडाला छातीवर घेण्यासारखे !
(माथ्यावर भगव्याच्या डावीकडे असणार्या भेगेत जे झाड दिसतेय तिथून खाली मंदीरापर्यंत उतरलो नि मग त्या कोरलेल्या पायर्यांच्या मार्गाने खाली उतरलो.. किती मस्त )
या पायर्या संपताच वाटेलाच एका बाजुला लंबोदरांची सुबक मुर्ती दिसते.. पुढे लागणारी पाउलवाट हनुमान मंदीराजवळ नेउन सोडते.. इथेही दर्शन घेतले.. एकदा गडाकडे मागे वळून पाहिले नि गावाच्या दिशेने चालू पडलो..
- - -
पुन्हा सकाळसारखाच भणभणता वारा आमचा निरोप घ्यायला हजर झाला होता..काही अवधीतच गाव गाठले....
ट्रेकमध्ये सारे काही अनकुल घडले होते.. चैत्र महिना असुनही हवेत गारवा अनुभवता आला.. एक छोटे पण सुंदर गाव पहायला मिळाले होते.. अजुन एक आडवाटेवरची अपरिचित अशी डोंगररांग पहायला मिळाली.. दोन शिखरांच्या जोडीने असलेला हा गडगडा उर्फ घरगड कसलीही गडगड न होता सर झाला होता.. नि ह्याच आनंदाच्या भरात एक 'ऑफबीट' ट्रेक संपुर्णम केल्याचा जल्लोष झाला
धन्यवाद नि समाप्त
यो, झक्कास!!!
यो, झक्कास!!!
सह्हीच!!
सह्हीच!!
यो… झक्कास अनुभव… आणि एका
यो… झक्कास अनुभव… आणि एका "ऑफबीट" किल्ल्याचे मस्त वर्णन !!!!
मजा आली वाचताना !!!
विन्या आणि गिरीच्या पहिल्या फोटोच्या वरच्या ओळीत अंबोलीची "अबोली" झाली आहे …
रच्याकने तू ज्याला अघोरी म्हणून लिहिलं आहेस त्याचं मूळ नाव अघेरा आहे. अघेरा - घरगड - आंबली अशी ती रांग आहे. अर्थात अपभ्रंश होऊन त्याचं अघोरी आणि अंबोली झालं असावं. कदाचित किल्ल्याच्या घे-यात असल्याने त्याला नुसतं "घेरा" असंही नाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण माझ्या मते बहुदा मूळ घरगड नावाचं गडगडा हे नाव पायथ्याच्या गडगड सांगवी गावामुळे नंतर झालं असावं. हेम या माहितीत भर घालू शकेल.
आणि तुझा हा पहिला ब्लॉग असावा जिथे यो श्टाईल उड्या बघायला मिळाल्या नाहीत…. अर्थात त्या मारल्या गेल्या असतील याची खात्री आहेच… लेख पूर्ण झाला नाहीये अजून !!! त्या फोटोंची वाट बघतोय !!
मस्त!
मस्त!
मामी, चनस, rmd.. धन्यवाद
मामी, चनस, rmd.. धन्यवाद
ओंकार.. हो रे तसेच असावे याची खात्री आहे.. बरी माहिती दिलीस.. बदलतो नंतर .. नि
यो श्टाईल उड्या बघायला मिळाल्या नाहीत…. अर्थात त्या मारल्या गेल्या असतील याची खात्री आहेच… >> उडीबाबा तर असतोच.. उडालोय बघ !
यो!! सुप्पर्ब ट्रेक आणी फोटो
यो!! सुप्पर्ब ट्रेक आणी फोटो आणी वर्णन..
आणी ती उडी
नेहेमी प्रमाणेच मस्त वर्णन
नेहेमी प्रमाणेच मस्त वर्णन आणि उडीबाबाच्या फोटोमुळे लेखाला कसं पूर्णत्व आलं, तो प्रतिसादांमधून काढून वर लेखातच टाक बाबा....
मस्तच रे. पायर्यांची पांढरी
मस्तच रे.
पायर्यांची पांढरी वाट बघुन आधी वाटल जल्ला धबधबाच
उतरतानाचा मार्ग मस्तच.
चढतानाचा मार देखील कठीण
यो वर्णन आणि प्रचि
यो वर्णन आणि प्रचि मस्तच...
जो फोटो पहायला मिळाला नव्हता तो मिळाला रे...
उडिबाबा...
<<गेले दोन-अडीच महीने सह्याद्रीभेट घडली नव्हती ...
साह्याद्री ला इतकि वाट बघायला लावणे योग्य नव्हे...
छान
छान
टॉर्चच्या प्रकाशात दिसले की
टॉर्चच्या प्रकाशात दिसले की डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूला भुयारसदृश खड्डा होता नि पुढे अजुन एक गुहाच दिसत होती..उत्सुकता वाढल्याने अगदी सावधगिरीने त्या भुयारात उतरलो.. इथे उतरलो नि चक्क उभा राहू शकलो ! तिथेच मग वाकून पुढल्या गुहेत पाहीले तर अगदी छोटीशी खोलीसदृश गुहा वाटली.. हे सगळे बांधकाम थक्क करणारे होते पण नक्की वापर कशासाठी हे गुलदस्त्त्याच राहीले ! >>>
यो अश्या गुहाचा वापर अतिरीक्त पाणीसाठा करण्यासाठी, किंवा ( धान्य,दारु) कोठार म्हणुन होत असे.
अशीच एक गुहा रतनगडावर नेढ्याकडे जाताना आहे त्यात जवळजवळ वर्षभर थंड पाणी असत.
अजुन एका जबरदस्त ट्रेकसाठी अभिनंदन, सुंदर वर्णन आणि सुरेख प्रचि
लै भारी रे, दोस्ता ....
लै भारी रे, दोस्ता ....
धन्यवाद.. उडीफोटो अॅडून लेख
धन्यवाद..
उडीफोटो अॅडून लेख कंप्लिटम !
जियो... मजा आली असेल सॉलीड
जियो...
मजा आली असेल सॉलीड
धन्य रे बाबा. छान.
धन्य रे बाबा. छान.
बापरे! थरारक वाटले वाचतानाच.
बापरे! थरारक वाटले वाचतानाच. कसला तो चढ! तुम्ही 'आरामात सर' केलात आणि! सगळीच प्रचि एक नंबर आली आहेत. रॅपलिंगचे तर अव्वल!
शेवटच्या फोटोत तुमची लीडर तुम्हा सर्वांकडे बघून 'काय वेडे आहेत' असा लूक देतेय का?
असेच सुंदर ट्रेक करत रहा आणि
असेच सुंदर ट्रेक करत रहा आणि आम्हाला एसीत बसल्या सचित्रवृत्तांत वाचायचला देत रहा...
जुन्या दोस्तांना फोटोत बघून
जुन्या दोस्तांना फोटोत बघून खूप छान वाटलं..
मस्त फोटो..
सुंदर ट्रेक मस्त फोटो.
सुंदर ट्रेक मस्त फोटो.
लै भारी..
लै भारी..
शेवटच्या फोटोत तुमची लीडर
शेवटच्या फोटोत तुमची लीडर तुम्हा सर्वांकडे बघून 'काय वेडे आहेत' असा लूक देतेय का? >> दहात एक वेडा वेगळा असतोच..
धन्यवाद मित्रांनो !
सुंदर फोटो आणि वर्णन.
सुंदर फोटो आणि वर्णन.
मस्तच रे यो पुढचा ट्रेक कधी
मस्तच रे यो
पुढचा ट्रेक कधी
नेहमीप्रमाणेच मस्त असेच
नेहमीप्रमाणेच मस्त
असेच सुंदर ट्रेक करत रहा आणि आम्हाला एसीत बसल्या सचित्रवृत्तांत वाचायचला देत रहा...>>>इंद्रा +१
खूप छान रे....परत भेटूया
खूप छान रे....परत भेटूया लवकरच!!!
यो सुंदर व्रुत्तांत... असेच
यो सुंदर व्रुत्तांत...:-)
असेच सुंदर ट्रेक करत रहा आणि आम्हाला एसीत बसल्या सचित्रवृत्तांत वाचायचला देत रहा.>>> ईंद्रा एसीत बसुन व्रुत्तांत वाचण्या पेक्षा ट्रेकला येत जा....:-)
मस्तच आहेत...
मस्तच आहेत...
मला पण ट्रेकिंग शिकायच आहे
मला पण ट्रेकिंग शिकायच आहे मला संपर्क नंबर मिळेल का ?? मला फार आवड आहे पण भीती वाटते
मस्तच ट्रेक चालू आहेत तुमचे
मस्तच ट्रेक चालू आहेत तुमचे
गिरी.. जाउ दे रे.. इंद्राला
गिरी.. जाउ दे रे.. इंद्राला सध्या लग्नाला कुठे आमरस ठेवलाय हे बघण्यात रस आहे..
स्_सा.. तू कधी सामिल होतोयस..
मानसी.. आवड आणि भिती एकत्र बाळगू नकोस.. ! डर के आगे जीत है !
पुनश्च धन्यवाद !
Pages