जखम

Submitted by समीर चव्हाण on 23 April, 2013 - 10:19

ती यायची नेमाने, सकाळी-सकाळी
कोण कुठली, कुठून यायची
किती पायपीट करून
थांगपत्ता नाही
यायची वाडा झाडायला
बदल्यात शिळंपाकंवरचा हक्क बजावयाला

लहान मुलांनाही सौंदर्यबोध असतो
गोरंपान रुपडं वर ठसठशीत कुंकू
सुरकतलेला देह नव्वारीत बांधून
मोठं अप्रूप वाटायचं
नशीब थट्टेखोर म्हणतात ते काही खोटं नाही

जिन्याखाली असायचा तिचा ऐवज
एक खराटा, थाळी, आणि पेला
कुणी तिला शिवायचं नाही
अन्न-पाणी वरून घालायचं
का ते कुणाच्याही बापाला ठाऊक नाही

कधी-कधी चार-आठाण्यांसाठी करायची घिसघिस
वाटायचं उरलंसुरलं का होईना
रोज खाऊन तर जायची इथून
मग कुणासाठी हा आतड्याचा पीळ
पोरं असती तर केली असती का इतकी मरमर

एकदा पाहिलं तिला भाजीच्या दुकानात
विकत घेत होती सुकलेल्या मिरच्या
अजून दोन अजून दोन ची रट लावीत
लगेच कळलं नाही का ते
मात्र अखेर कळलंच

आपण कुठलीशी जखम घेऊन जगतोय
ही जाणीव तरी आहे का कुणाला

समीर चव्हाण

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त कविता.

कुणी तिला शिवायचं नाही
अन्न-पाणी वरून घालायचं
का ते कुणाच्याही बापाला ठाऊक नाही>>>

विदारक!

'जखम' .......जखम करणारी खूप चांगली
( येथे एक गोष्ट सांगाविशी वाटते--साधारण३० वर्षांपूर्वीची --१२ - १३ वर्षे वयाच्या अशा प्रकारचे काम करणार्‍या मुलीस मी शिकविणे सुरू केले--अंगणाच्या फरशीवर लिहित असे--चारी बाजूंनी नजरा रोखलेल्या असत -- तरी काम चालू --तिचे माझे--लग्ना नंतर तिची खुशाली कळवे...)

लगेच कळलं नाही का ते
मात्र अखेर कळलंच<<<< या ओळींच्या आधीपर्यंत मी बरोबर अर्थ लावत येतोय असे वाटले पण इथून पुढे जरा अडखळावे लागते आहे अस्वस्थ व्यायला होते आहे................
कविता समजावून सांगाल का समीरजी