फोडणीचा भात -किती किती/कसे कसे प्रकार

Submitted by वर्षू. on 20 April, 2013 - 21:33

आदल्या रात्री पाहुणे येऊन गेले की दुसर्‍या दिवशी भात हमखास उरलेला असतो. जागरणाने आलेला थकवा अजून कायम असतो,अश्यावेळी वन मील डिश म्हणून ,' फोडणीचा भात' हा एकच पर्याय मला सुचतो Wink
काल ही असंच झालं.. पण नेहमी ची रेसिपी करण्याचा कंटाळा आला म्हणून काहीतरी वेरिएशन करावसं वाटलं
म्हणून भाता मधे मीठ,धन्याची पावडर्,तिखट नीट मिक्स करून घेतलं. जिरे,मोहरी,हिंग्,हळदी ची फोडणी करून शेंगदाणे घातले ते कुरकुरीत झाल्यावर,कढीपत्ता,कांदा अ‍ॅड केला. मग भात अ‍ॅड करून सर्व मसाला नीट मिक्स केला. गॅस बंद करून थोडा लिंबाचा रस आणी कोथिंबीर घातली..
खायला देताना वरून कुरकुरीत तळलेले पोहे स्प्रिंकल केले.. दह्यातल्या कोशिंबीरी बरोबर सर्व केले..
(पोहे तळल्यावर ते अगदी कोरडे व्हावे म्हणून लहान गाळणीत थोडे थोडे घेऊन तळले)

तुमच्याही जवळ फोडणी च्या भाताच्या रेसिपीज इथे जरूर शेअर करा.. मग मिक्स अ‍ॅण्ड मॅच करून त्यांमधून अजून ही कितीतरी हटके रेसिपीज तयार होतील..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१.चायनीज फ्राईड राईस सारखा करावा! कांदेपात, लसून-आले लांब चिरलेले, बडीशेप, जिरे, धने एवढे फोडणीत पुरते.
२. दही-बुट्टी भात करावा. दही भाताला कढीपत्ता-उडीदडाळीची फोडणी.
३. चिंच घालून पुलीओग्रे सारखा करावा (कढीपत्ता, मेथी फोडणी).
४. नेहमीच्या फोडणीत एक चमचा सांबर मसाला/रसम मसाला घालून करावा.
५. सुका मेवा विशेषत बेदाणे आणि काजू घालून करावा.
६. नेहमीच्या फोडणीच्या भातात वाळवणमधील वड्या घालाव्या.

अवांतर: उरलेल्या भाताचा प्रश्न असेल तर तो मिक्सर मधून काढून त्यात पीठे कोथिंबीर घालून थालीपीठ केले होते. प्रमाण आठवत नाही. पुन्हा केल की लक्षात ठेवेन.

tyat rahileli chapati pan add kara mast lagate....>>>>> हो पोळी भात एकत्र केला तर आमच्याकडे या प्रकाराला 'माणिकमोती' म्हणतात Wink

* भातावर लसणीची चरचरीत फोडणी द्यायची, लिंबु पिळायचे.
* तेलात सांडगी मिरच्या तळायच्या, त्याच तेलात फोडणी करायची, म्हणजे फोडणीस मस्त स्वाद येतो. सांडगी मिरच्या मोडुन फोभात घालायच्या.

नेहमीसारखाच फो.भा. करून त्यात सिमला मिर्चीचे बारीक तुकडे घालायचे. अगदी शेवटी अ‍ॅड करायचे हे तुकडे. मिरची थोडी क्रंची रहायला हवी आणि स्वादही यायला हवा. आवडत असल्यास या भातात अगदी चिमूटभर एव्हरेस्ट गरम मसाला घालावा.

अर्रे व्वा.. खूप खूप चचमीत प्रकार कळताहेत नवे नवे.. सिमन्तिनी, अंजली-१२, आरेम्डी,अजय, भुल. धन्स धन्स!!!
सुन्या.. चपात्या घालून कधीच पाहिले नाही.. माणिकमोती .. नांव पण मस्त आहे अंजली..

कैरीचे चित्रान्न : नेहमीसारखा भात मोकळा करून घेऊन त्यावर हिरवी मिरची, कढीलिंब, हरभरा डाळ, उडीद डाळ, हळद घालून फोडणी करतात. त्यात शेंगदाणेही घालतात. ही फोडणी भातावर घालून त्यावर कैरीचा कीस पसरवतात. मीठ, साखर घालून कालवून सव्‍‌र्ह करतात. शोभेसाठी खोबरं, कोथिंबीरही घालतात.

दक्षिण कर्नाटकी खाद्यन्ती : चित्रान्नाचे विविध प्रकार

ऐकिवातला रावण भात

असाच उरलेला अदल्या दिवशी चा भात ..त्यात तिखट, मिठ, तेल , भिजवलेली ह डाळ, सगळे सममाणात घालुन कालवणे.... :-@ =O

हा पदार्थ वर्हाडात होतो असे ऐकले आहे....खरे कोणी केले आणी खाल्ले असेल तर त्याना माझा सा.न......:-7

अकु.. बहुत हटके प्रकार सांगितलास.. मस्त लागेल.. हरबर्‍याची डाळ भिजवलेली घ्यायची ना???

@ सुहास्य.. मी खाल्लाय रावणभात. खूप छान ,चटपटा लागतो.. ज्यांना तिखट आवडतं त्यांना चालेल..

तुला प्रॉपर रेसिपी माहीत असल्यास प्लीज शेअर कर इथे .:)

हरबर्‍याची डाळ भिजवलेली घ्यायची ना >> हो, बरोबर! चैत्रात असं चित्रान्न खायला मजा येते खूप! आंब्याची (कैरीची) डाळ, भिजवलेल्या चण्यांची उसळ, कैरीचं पन्हं आणि चित्रान्न हे या ऋतूमधले हिट्ट पदार्थ! Happy

)उरलेल्या भातचे सांडगे करावेत कांदा -लसूण .....मसाले आवडतील ते... घालून !!
....किमान ३ ते ४ दिवस कडकडीत उन्हात हे सांडगे वाळवावेत
....व तळावेत
....नुसते खावेत
.....किंवा आमटीही करावीत!!

२) उरलेल्या भातास (मोकळा फटफटीत असेल तर) नुसतेच एक दोन दिवस सावलीत मोकळ्ल्या हवेशी वाळवून मग पोहे तळलेत तसे तळावेत
.... तिखट्मीठ लावून खावेत
.....किंवा चिवडा करावा !!

चित्रान्न हा भाताचा मला सर्वाधिक आवडणरा प्रकार
तोंपासु !!!!!
धन्यवाद अरुंधतीजी उल्लेखासाठी

माझी एक उत्तर प्रदेशातील मैत्रीण उरलेल्या भातात दही घालून तो तासभर जरासा आंबवायची, मग त्यात तिखट / हिरवी मिरची, मीठ इ. मालमसाला घालून त्याचे पकौडे तळून डब्यात आणायची.

आंबट दही घालून भात मळून घ्यायचा. तासभर ठेवायचा. मग त्यात चवीप्रमाणे बारीक चिरलेली हिरवी मिरची / ठेचा / तिखट, किसलेलं आलं, मीठ, बेसन घालून भज्याच्या पीठाप्रमाणे सरसरीत करून घ्यायचा. हवी असल्यास कोथिंबीर सुद्धा घालू शकता. मिश्रणाचे छोटे छोटे गोळे गरम तेलात तळून पकौडे करायचे. टोमॅटो सॉस, कोथिंबीर-पुदिना चटणी, खजूर चटणी यांबरोबर किंवा नुसते खायलाही छान लागतात.

उरलेल्या भातात दही,ज्वारिच पिठ घालुन रात्रभर आंबवायच मग त्यात जरुरीपुरते डा.पिठ,तिखट्,ओवा मिठ घालन वडे करतात.
ही रेसिपी कुणीतरी माय्बोलिवर दिलीये आणी त्यावर एक लेखही आला होता लोकसत्तात.(इथे चर्चाही झालेली आठवतेय)
वड्या.न्च नाव काही केल्या आठव्त नाहिये.

तेल तापवून त्यावर दोन लसूण पाकळ्या सालासकट जरा ठेचून टाकायच्या. जरा रंग बदलला की मोहरी आणि हिंग. मोहरी तडतडली की अर्धा कांदा बारीक चिरुन टाकायचा. कांदा गुलबट रंगावर परतला की स्वच्छ धुतलेला पाव वाटी जवळा किंवा सुकट घालून एक वाफ काढायची. उरलेला भात घालायचा. हळद, तिखट, मीठ घालून परतायचे. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर. जोडीला भाजलेला उडदाचा पापड. यम्मी!

उरलेल्या भाताचा गोपालकालाही छान होतो. त्या भातात थोड दही, लोणच [आंबा, लिंबु, मिरची यापैकी कोणतही किंवा तीनही] साखर, भिजलेली चना दाळ, मिरचीचे तुकडे, आवडत असल्यास दाळीबांचे दाने, द्राक्ष , आणि कोथिंबीर, खोबर्याचे तुकडे, भिजलेले शेंगदाणे. यापैकी ज्या ज्या वस्तु असतील त्या अगदी आपल्याला आवडेल त्या प्रमाणात घेउ शकतो. चांगल मिक्स कराव. खायला तयार. ज्यास्त झाल्यास फ्रीझ मधे ठेउन केव्हाही खाता येतो . थंडही छान लागतो.
दुसरा प्रकार- उरलेल्या भातात मिठ, साखर, थोडे दाणे[ आवडत असल्यास] घालुन एक चमचा दही घालुन भात भिजेल एव्हडे दूध घालून विरजण लावाव. सकाळी सर्व्ह करतांना जिरे, कढीपत्ता मिरचीचे तुकडे घालून फोडणी करावी. व त्या भातावर घालावी. कोथिंबीर घालावी छान घट्ट भात तयार. फ्रीझ मधे ठेवुन थंडही खाता येतो.
गोड आवडत असल्यास नारळी भाता प्रमाणे करता येइल

उरलेल्या भातात दही,ज्वारिच पिठ घालुन रात्रभर आंबवायच मग त्यात जरुरीपुरते डा.पिठ,तिखट्,ओवा मिठ घालन वडे करतात.
ही रेसिपी कुणीतरी माय्बोलिवर दिलीये आणी त्यावर एक लेखही आला होता लोकसत्तात.(इथे चर्चाही झालेली आठवतेय) >>>>> आंबुसघार्‍या Happy

उरलेल्या भाताला मीठ, भरपुर लाल ति़खट चोळुन ठेवायचे. भरपुर लसणाच्या फोडणीवर भात शिजवायचा. असा भात तळलेल्या ओल्या बोंबलाबरोबर पण मस्त लागतो....हळद टाकायची असेल तर अगदी थोडीशी टाकावी.
फोडणीचे पोहे करतो तशी फोडणी करुन...तेलावर जीरे,राई,हि.मि.,कढीपत्ता,कांदा टाकुन त्यावर भात टाकुन शिजवावा.
भाताला मीठ, लाल तिखट ,हळद चोळुन तो लसुण, कांद्याच्या फोडणीवर टाकुन शिजवायचा.
फोडणीत जीरे,राई,उडीद डाळ, च.डाळ,हि.मि.,कढीपत्ता,शेंगदाणे टाकुन त्यावर मीठ लावलेला भात आणि भरपुर नारळ टाकुन तिखट नारळी भात करायचा.

गोड आवडत असेल तर दही साखर भात
तुपावर हिंग जिरे टाकून ( हे तव्यावर केल्यास भात खरपुस भाजला जातो) जिरेभात
फोडणीला चणाडाळ, उडीद डाळ कढिलिंब लसूण टाकायचा. मग टोमॅटोच्या फोडी त्यात परतायच्या. ही फोडणी भातावर पसरायची. वरून कोथिंबिर नि ओले खोबरे ! मस्त टोंमॅटो भात तयार..
भात आणि मिश्र पिठे थोडे दही घालून मिक्सरला एकत्र वाटून त्यात मिरची कांदा घालून धिरडी करायची.

परवा एक प्रयोग केला. लेकीला ऑरेंज फ्लेवरचा गोड भात हवा होता. तयार भातात थोडे तूप आणि थोडे मॅप्रोचे ऑरेंज क्रश घातले. मावेत थोडा वेळ गरम केले. मस्त लागला हा भात Happy

माझी पण रेसीपी

लोणचे भात

भात, कोणतेही आवडीचे लोणचे (तिखट लोणचे हवे, गोडाचे नको) बारीक चिरलेला कांदा, लसूण, तेल, जिरे, मोहरी हिंग, कढीपत्ता.
कृती:

कढईत तेल टाकून खमंग फोडणी करुन घ्यावी, त्यात कांदा लसूण परतून घ्यावे, कांदा गुलाबी झाला की भात टाकून परतावे त्यानंतर लगेच लोणचे टाकून परतावे.
एक वाफ काढून गॅस बंद करावा. हवी असल्यास कोथींबीर टाकून खावे
लोणच्यात तिखट मीठ असल्याने वरुन टाकायची गरज नाही.

स्वाती२, आज जेवायला केला होता सुकट घालून भात तुमच्या रेस्पीने. शिळ्या भाताला एकदम शान आली Happy
रेसिपी छाप के रख लो अशी सूचना आलीय .

Pages