मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

मुंबई आणि कोकण दोन्ही आपलेच..
पण अर्थात मुंबईजवळची...कोकण सुट्टीतल्...एप्रिल महिन्यात ओढ लावाणार्...आणि कोकणात पोहोचल्यावर ७व्या दिवशी मुंबईची आठवण येते Happy

अजून एक मुंबईबद्दलचा ब्लॉग होता. ज्यात खास मुंबईच्या एकेका एरियाचे फोटो आणि वर्णन असायचे. आजची माहिती अर्थात.
शोधायला हवा.

बघते. यात बाबूच्या वडापावाबद्दल लिहिलेलं आहे का? असेल तर बहुतेक मी म्हणतेय तोच असेल तो.

मस्त आहे हा धागा......... मुंबैत इतकी वर्षे काढुनही खरी मुंबई अजुन पाहिलीच नाहीय Happy मी बाणगंगा अजुन पाहिले नाहीये, फक्त ऐकलेय. म

आता मुंबैला जाताना सोबत हा धागाही घेऊन जायला हवे.

सुंदर धागा मामी ! मुंबई सोडुन बरीच वर्ष झाली. आता हा धागा वाचताना खूप छान वाटतेय. माझ्याकडे जुन्या मुंबईचा एक व्हिडिओ आहे. तो इथे टाकला तर चालेल का?

गोदीच्या मागच्या बाजूला राहणारे अभियंता मोतीवाला यांनी त्याच्या बाल्कनीत जोरात आवाज येऊन काहीतरी येऊन पडल्याचे पाहिले तर ती सोन्याची वीट होती (त्यावेळी त्या सोन्याच्या विटेची किंमत ९०००० रुपये इतकी होती ती त्यानी सरकारला परत केलीच त्यबद्दल इनाम मिळालेले ९९९९ रुपये त्यांनी मदत निधीला देऊन टाकले).
>>>>>>

आकाशात उडालेल्या सोन्याच्या विटा आजूबाजूच्या झोपडपट्टीतही पडल्या. कांही जणांच्या छातीवर विट पडूनही त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी होती. अनेकांनी प्रामाणिकपणे विटा परत केल्या तर बाकीच्या विटांचा शोध मुंबई पोलिसांनी आजूबाजूला धाड सत्र घालून शोधून काढल्या. (माझी ऐकीव माहिती.).

>>>>>

मुंबईचीं सिनेमागृहं हा आणखी एक सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय ! दक्षिण मुंबईत तर थियेटर्स सर्वत्र पेरलेलीं असत/ आहेत. इंग्लीश सिनेमा बघायचाय ? मेट्रो, रिगल, एक्सेलसियर, एरॉस, कॅपिटॉल......
मराठी हवाय ? सेंट्रल, मॅजेस्टिक... हिंदी ? ग्रांट रोड व लॅमिंग्टन रोड फक्त एवढ्या परिसरातच अगणित थियेटर्स स्वागताला सज्ज - रॉक्सी, ऑपेरा हाऊस, इंपिरीअल, नाझ,......... !!!
आमच्या शाळा-कॉलेजच्या दिवसांत हीं सर्वच आमचीं 'होम ग्राऊंडस' असल्यासारखींच. त्यांची खासियत, तिथं पाहिलेले अविस्मरणीय चित्रपट याबद्दल इतर लिहीतीलच व मींही आठवेल,जमेल तसं लिहीनही. पण लोकानी क्वचितच पाहिलीं, ऐकलीं असतील अशींही कांही थियेटर्स दक्षिण मुंबईच्या खास कौतुक करतां येणार नाही अशा वस्त्यांत होतीं व आहेतही. त्याबद्दल थोडसं.
आमच्या एका छोट्याशा कंपूला हॉलीवूड सिनेमांचं शाळेपासूनच आकर्षण, अगदीं त्यांतलं इंग्लीश फारसं समजत नसूनही [ आजही इंग्लीशच्याबाबतींत यांत कांहीं फार फरक नाही पडलाय !]. आमच्या आवडीचे हीरो, हिरॉईन्सही ठरत गेलेल्या - रॉक हडसन, मेल फरार, बर्ट लँकेस्टर, फ्रँक सिनात्रा, चार्ल्सस हेस्टन, एव्हा गार्डनर, एलिझाबेथ टेलर, इंन्ग्रीड बर्मन....... ! पण त्यांचे जुने सिनेमा मात्र रविवारचे 'मॉर्नींग शो' म्हणून कुठेही लागत. अगदीं छोट्या जाहिरातीही असत वर्तमान पत्रात. मग आठवडाभर कशीबशी पैशांची जमवाजमव करून रविवारी आम्ही तिथं मोर्चा वळवायचों, थियेटर कुठल्या वस्तीत आहे याचं भान न राखतां. नळबाजार- कामाठीपुर भागातलं असंच एक थियेटर होतं, अजूनही असावं, -'ताज' !
बांकड्याच्या सीट असलेलं हें थियेटर अर्थातच 'ताज' नांवाला लावलेली तीटच ! पावसांत गेलं तर पाय बांकावर दुमडून घेऊनच बसायला लावणारं. तिकीटांच्या खिडकीबाहेर एखादं पोरगं बेंबीच्या देंठापासून बोंबलत असायचं ,' मारामारीनुं भरेला, घोडसवारीकी कमाल दिखानेवाला, अफलातून हिरॉईनवाला शिनेमा ! सस्तेमे देखो .... '. "अ‍ॅन अफेअर टु रिमेंबर" सिनेमा असला तरीही तिथल्या पोराची हीच रेकॉर्ड असे ! त्याला एवढा घसा सुकवल्याबद्दल फक्त एखादा चाय व सिनेमा मोफत बघायला मिळत असावा !! प्रेक्षकवर्गही जिंदादील व छोट्याही कारणावरून जीवावर उठणारा. आम्ही खरेखुरे शाळकरी दिसत असूं म्हणून आम्हाला आदब दाखवत नसले तरी प्रेक्षक आमच्या वाटेला मात्र येत नसत.
इंग्लीश सिनेमा पहाण्याचं तिथल्या प्रेक्षकांचं तंत्र पण साधं सोपं; पहिल्या पांच-दहा मिनीटांत दिसण्या-वागण्यावरून हीरो, हिरॉईन व व्हीलन कोण याचा अंदाज घ्यायचा. मग हीरोला प्रोत्साहन व व्हीलनला शिव्या द्यायची - मनातल्या मनात नव्हे - एकही संधी सोडायची नाही. समजा, व्हीलनने हीरॉईनला पळवून आपल्या अड्ड्यावर आणलीय व तो तिच्याशीं लगट करूं पहातोय; दुसर्‍या सीनमधे हीरो तिला सोडवायला घोडा/ मोटर/ विमान याने निघालेला. थियेटरमधून हीरोला -'' अरे जल्दी कर नहीतो तेरी वो गयी कामसे !'' व व्हीलनला - " अबे साले, जरा पिछे देख, वो आ रहा है तेरा खिमा करने !' अशा सूचना तन्मयतेने पडद्याकडे सर्रास फेंकल्या जात. [ 'इंटरअ‍ॅक्टीव्ह मिडीया 'चा उगम बहुधा अशा थियेटर मधूनच झाला असावा ! ]. हें असं असूनही, खूप नंतर आमच्या लक्षांत आलं कीं तिथं आम्ही पाहिलेले कांही सिनेमा हे हॉलीवूडचीं दुर्मिळ 'क्लासिक्स' होतीं. आजच्या व्हिडियो व यू ट्युबच्या जमान्यात ' ताज'सारख्या थियेटरच्या ' मॉर्नींग शो'अभावीं आम्ही कशा-कशाला मुकलों असतो, हें आताच्या पिढीला कळणं जरा कठीणच.
ताडदेव नाक्यावरचं ' डायना' हें देखील अशा सिनेमांसाठी आमचं आवडतं. तिथं सिनेमा पहाणं हें एक ' अ‍ॅडव्हेंचर' पण असायचं. तिकीट विक्री पूर्ण होईपर्यंत तिथं कुणालाही प्रेक्षागृहात सोडलं जात नसे. मग सर्वजण प्रेक्षागृहाच्या 'फोल्डींग'च्या लोखंडी दरवाजांकडे गर्दी करून आंत धडकायला सज्ज होवून उभे रहात. मग थियेटरचे कर्मचारी आंतल्या बाजूने दरवाजे उघडून पटकन भिंतीच्या आडोश्याला जात. बाहेरच्या गर्दीने आंत मुसंडी मारल्यावर सीटसच्या रांगांमधे आडवे-तिडवे फेकलेल्यांचे काय हाल होत असतील याची कल्पना करा ! पण ही आसुरी पद्धत वर्षानुंवर्षं चाललेली. आजही त्यांत बदल झालाय का, हें मात्र माहित नाही.

अलेक्झान्ड्राला लागला होता किक बॉक्सर त्याचं हिन्दी पोस्टर वाचूनच हसलो होतो. 'लातोंके भूत बातोंसे नही मानते'

आमचा सिनेमा पहायचा पल्ला वरळी ते माहिम. त्यातुन दोन सिनेमा काँप्लेक्स जास्त फेवरीट सत्यम, शिवम , सुंदरम (वरळी) आणि बादल , बिजली , बरखा माटूंगा रोड्/माहिम , तेव्हा सिनेमा टिकाटाचे ब्लॅक हा येक प्रकार असायचा, बादल बीजलीच्या जवळ्च्या येक दोन घरातही ब्लॅकची तिकीटं मिळायची
बाकी शारदा, चित्रा, कोहिनूर, गिता ही सिंगल स्क्रिनही जोरात चालायची

<<'लातोंके भूत बातोंसे नही मानते' >> Wink
'अलेक्झान्ड्रा'ला तर चांगलेच इंग्लीश सिनेमा लागायचे, बहुधा जवळच्या भायखळ्याच्या ख्रिश्चन वस्तीमुळे. तिथलाही किस्सा पुढे कधीतरी.

कुलाबा कॉजवेच्या फोटोतले ते चर्च कुठले. आता दिसत नाही !
पाटील, चित्रे नेहमीप्रमाणेच मस्त.

सुजा, मी चंदन थिएटरचे ऑडीट करत असे. त्यांचे अकाऊंटस गुजराथी पद्धतीने लिहिलेले असत. प्रत्येक खात्याच्या मागे श्री लिहिलेले असे. त्यांनी त्यावेळी एक बोअरवेल देखील खणली होती, आणि त्या खात्याचे नाव श्री. बोअरींग खाते होते !

अतुलनीय तो स्फोट झाला होता, पण सोन्याच्या विटा म्हणजे गाव गप्पा. त्याकाळी उडून आलेला एक भला मोठा वक्राकार रॉड बरीच वर्षे सँडहर्स्ट रोड स्टेशनच्या ब्रिजखाली होता.

गंगा जमुना, ताडदेव ला होती. गेल्या भेटीत बघितल्यासारखी वाटताहेत. अगदी झेड ग्रेडचे इंग्लिश पिक्चर लागत असत तिथे.

चेंबूर कॉलनीला एक आशिष नावाचे थिएटर होते. त्यात मिरर स्क्रीन हि अभिनव कल्पना होती. अजून आहे ते बहुतेक.

डायना...
काय आठ्वण काढली...तिच्या मागच्या १४ चाळीत रहायचो आम्ही...बरेच बरे पिक्चर पण पाहिले आहेत..
त्या तेवढ्याश्या एरिआत किती थिएटर होती..
डायना, गंगा जमुना, मराठा मंदिर, मिनर्व्हा, ड्रिमलॅण्ड,नॉव्हेल्टी,..अजुन बरिच आता आठवत नाही..बरेच पिक्चर पाहिलेत तिथे..

नायर हॉस्पिटल मध्ये ३ दा टाके घालुन घेतलेत मी..

हो खरच दिनेशदा माझे वडील पण नेहमी गप्पा मारताना म्हणजे त्यांच्या जुन्या आठवणी सांगताना मुंबई बद्दल बोलायचे. आता घरी गेले की त्यांना हा धागाच दाखवेन. ते नोकरीला लागण्यापुर्वी वरळीच्या एका डेअरी मध्ये काम करायचे. तिथल्या खुप आठवणीसांगतात. तिथे म्हणे शुटींग पण झाली होती कुठल्यातरी पिक्चरची.

<< नायर हॉस्पिटल मध्ये ३ दा टाके घालुन घेतलेत मी.. >> प्रेक्षागृहात सोडण्याची तीच राक्षसी पद्धत जर अजूनही चालू असेल, तर त्या थियेटरचं नांव 'डायना' बदलून 'डायन'च करायला हवं !! Sad
<< .. वरळीच्या एका डेअरी मध्ये काम करायचे. >> जागूजी, ती खूप जुनी व फेमस 'वरळी डेअरी'च असणार, वरळी सी फेसवरची ! अनेक गाणी तिथं चित्रीत झालीं असावीं. 'सीआयडी'मधलं 'लेके पहेला पहेला प्यार 'चं शूटींग, मला वाटतं, तिथलंच आहे. आतांच्या वरळी-वांद्रे सी-लिंकच्या जवळच खूप उठून दिसते या डेअरीची इमारत.

<< नायर हॉस्पिटल मध्ये ३ दा टाके घालुन घेतलेत मी.. >>

ह्याचा आणि डायनाचा काहीही संबध नाही...

माझं बाल्पण, डायना, आणि नायर हॉस्पिटल अस जुळलेले आहे.. पडुन लागुन जितके टाके पडले आहेत ते सगळे नायर मध्ये..म्हणुन लिहिल Happy

डायना च्या बाहेर आमच्या शेजार्‍यांची वडापावची गाडि होती..आता नसावी...

<< ह्याचा आणि डायनाचा काहीही संबध नाही...>> सॉरी; पण तुम्ही डायना व थियेटर्सच्याच संदर्भात लिहीताना असं म्हटलत म्हणून गैरसमज झाला ! Sad

अजून एक संस्मरण -
शनिवार १६ एप्रिल १८५३ रोजी भारतातली पहिली रेल्वे विक्टोरिया टर्मिनस ते ठाणे अशी २१ मैल धावली.

'त्या' स्फोटाबद्दल माझी ऐकीव माहिती -
"फोर्ट स्टिकाईन" नावाच्या बोटीचा संशयास्पद परिस्थितीत स्फोट झाला. त्यात इंग्रजी सरकारने त्यावेळच्या भारताच्या रुपयाला वधारण्या साठी पाठवलेले सोने होते. २ स्फोट झाले. बरेच लोक मरण पावले. पहिल्या स्फोटानंतर मदतीला गेलेले बरेच लोक आणि fire fighters दुसर्या स्फोटात मरण पावले ( थोडेसे ९/११ वर्ल्ड ट्रेड सेंटर सारखेच) आणि स्फोटानंतर बर्याच लोकानी चक्क मिळालेले सोने परत केले. जीव गमावलेल्यांच्या स्मरणार्थ Bombay Docks मध्ये Monument बांधले आहे. ( शहानीशा जरुरी!)
अगदी १९७० पर्यंत सोन्याच्या १-२ विटा सापडत होत्या causeway cleaning मध्ये आणि चक्क भारतीय शासन इंग्लंड ला ते सोने परत देखील करत होते.

Pages