मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो,

साहिल शहांच्या या दुव्यात जी बेस्ट बस दिसते तिच्यावर वक्राकार पिवळा पट्टा दिसतो. पूर्वी तो एसटीवर देखील असे. त्याबद्दल कोणाला काही माहिती आहे का? तो रंगबचतीसाठी रंगवायचा थांबवला का? ते रस्त्याचं रूपक आहे का?

चित्र इथे आहे :

old_best_bus.JPG

आ.न.,
-गा.पै.

पाटील: सुरेख चित्रं; वॉटर कलर्स आहेत का?

बाणगंगेच्या आख्यायिकेवर संशोधन झालंय का? वाळकेश्वरचं घनदाट जंगल म्हणजेच दंडकारण्य इ. इ. आतेभाऊ फेकायचा, जोडीला बाणगंगा म्हणजे विश्वास ठेवायला जागा... Happy

पुर्वी मी माझ्या आजोबांच्याकडुन अनेकदा ऐकलेला किस्सा - १९४२-४५, दुसर्‍या महायुद्धाच्यावेळी मुंबई बंदरात उभ्या असलेल्या जहाजामध्ये प्रचंड स्फोट झाला व त्या जहाजातील असणार्‍या (???) सोन्याच्या विटा गिरगाव वगैरे भागात उडाल्या होत्या. दिनेशदा / भाउ नमसकर / इतर जाणकारांनी यावर जास्ती प्रकाश टाकावा, ही विनंती.

>>>>> माझे आजोबा त्यावेळी कस्टम्समध्ये कामाला होते. गोदीत उभ्या असलेल्या जहाजात महाप्रचंड स्फोट झाला त्यात ते जखमी झाले होते. आई त्यावेळी ४-५ वर्षांची असेल. तिला इतकंच आठवतं की आजोबांना कोणीतरी आणून घरी सोडलं. मग त्यांना चटईवर झोपवलं गेलं आणि काहीजणं त्यांच्या अंगात घुसलेल्या काचा खेचून काढत होते.

सोन्याच्या विटांबद्दल काही ऐकलं नाहीये बुवा.

बाणगंगेचा तलाव आणि वाळकेश्वराचे देऊळ तेराव्या शतकात शिलाहारांच्या अंमलाखाली बांधले गेले. त्या काळी बाणगंगेला जिवंत झरा होता. १७१५ मध्ये त्याचे नूतनीकरण अथवा पुनर्बांधणी झाली आणि ती रामा कामती (कामत-Kamathi) या नावाच्या त्या काळच्या एक अत्यंत प्रसिद्ध पण दुर्दैवी व्यक्तीने केली. एकोणिसाव्या शतकात जसे जगन्नाथ शंकरशेठ, तसे अठराव्या शतकात हे रामा कामती (kamathi) होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या दफ्तरात या रामा कामतांविषयी पुष्कळ कागदपत्रे आहेत आणि गंगाधर गाडगिळांनी त्यांच्यावर एक अत्यंत वाचनीय लेख त्यांच्या मुंबईविषयक पुस्तकात लिहिलेला आहे. कर्नल माळगावकर लिखित आणि पु.ल. देशपांडे अनुवादित 'कान्होजी आंग्रे' या पुस्तकातही रामा कामती/कामत यांच्याविषयी काही तपशील आहेत. कामत चे स्पेलिंग kamath असे केलेले आहे. मला वाटते कोंकणीमध्ये 'कामत' ऐवजी 'कामती' म्हणण्याची पद्धत होती. ह्या kamathi चे कामाठी असे मराठीकरण झालेले दिसते. मुंबईचा प्रसिद्ध कामाठीपुरा ह्यांच्याच मालकीच्या जमिनीत वसवला गेला होता. अर्थात त्यावेळी तो आजच्यासारखा कुप्रसिद्ध नव्हता. असो हे सर्व प्रकरण मुळातूनच वाचण्यासारखे आहे, त्यावर पुन्हा कधीतरी.
बाणगंगेच्यासंदर्भात सांगायचे झाले तर आख्यायिका एकदोन आहेत, त्या विकीवर देखील आहेत. मुळात तलावाला जिवंत झरा जरी असला तरी एकोणिसाव्या शतकापर्यंत तो बुजला होता आणि तळे अस्वच्छ झाले होते. सार्वजनिक आरोग्याला धोका पोचू नये म्हणून तळे साफ करण्यात आले आणि शेजारच्या जलाशयातून एक नलिका तळाशी सोडण्यात आली. हवे तेव्हा त्यातला पाण्याचा प्रवाह नियंत्रित करता येत असे. ही माहिती मी मुंबई गॅझेटीअर मध्ये वाचलेली आहे. सात आठ वर्षांपूर्वीपर्यंत भाऊ दाजी लाड संग्रहालयात हे संच वाचावयास मिळत असत. आता काय परिस्थिती आहे ठाऊक नाही.

हा धागा खरोखरच सुंदर चालला आहे. भारती बिर्जे यांची प्र.चि., पाटिल यांची पेंटिंग्ज, सलिल शाह्,स्वरुप यांच्या लिंक्स, भाऊ नमसकर, दिनेशदा यांच्या माहितीपूर्ण पोस्ट्स, इतरही अनेकांच्या हृद्य आठवणी, स्मरणरंजन यामुळे हा धागा केवळ वाचनीयच नव्हे तर संस्मरणीय झाला आहे. अशी सुंदर वाचनमेजवानी दिल्याबद्दल धागाकर्त्यांचे आणि सर्व प्रतिसादकांचे आभार.

गा. पै., खरे आहे. पण पुढच्या लेखात आधीच्या लेखाची लिंक नक्कीच असते, मात्र आधीच्या लेखात पुढच्या लेखांची लिंक असेलच असे नाही असे गृहीत धरून (आणि आळसानेही) एकच लिंक दिली होती. दुसरीही दिल्याबद्दल आभार.

लक्षांत कुणाच्या आलाय का हा अतर्क्य योगायोग ? अतुलनीय यानी सहज आजच १९४४मधल्या गोदीतल्या त्या स्फोटाची आठवण काढावी व हीरा यांनी तात्काळ त्यासंदर्भातल्या विश्वसनीय माहितीची लींक द्यावी व त्यातल्या इथ्यंभूत माहितीत स्फोटाची नेमकी तारिख १४ एप्रिलच निघावी !! मुंबईचा भूतकाळच तर हा अफलातून धागा वाचून 'मोकळ्या जागा आपणच भरुंया' असं म्हणत हा खेळ खेळत नसेल ना !! Wink

पाटील आरे कॉलनीचा फोटो मी नाव न वाचताच ओळखला म्हणजे तुमच पेंटींग किती जातीवंत आहे. खुप छान.

साई बाबांच्या पोथीमध्ये दादर ते मनमाड मेल असा शब्द आहे. मेल म्हणजे ट्रेन का?

जागुताई, मेल म्हणजे डाक(मेल) घेऊन जाणारी खास गाडी. या गाड्यांमध्ये पत्रे, कागदपत्रे, पार्सले इ. महत्त्वाचा ऐवज असे. एक खास डबाच असे. जी.पी.ओ.(जनरल पोस्ट ऑफिस्)मधून जमा झालेल्या पत्रे/कागदपत्रे आणि इतर वस्तूंच्या पेट्या/गोणी या डब्यात चढवल्या जात. पोस्ट कर्मचारी डब्यातच त्यांचे सॉर्टिंग करीत. हे ऐवज शक्य तितक्या लवकर गंतव्यस्थानी पोचावे म्हणून ही गाडी जलदगती असे. काही मोजक्या स्टेशन्सवरच थांबे. त्या त्या विभागातल्या वस्तूंचा गट्ठा तिथे उतरवला जाऊन पुढे त्याची गावोगावी वाटणी होई. पंजाब मेल, फ्रन्टिअर मेल, हावडा मेल अशा काही गाड्या होत्या.
जुन्या पोथ्यापुस्तकातून त्या काळची मनोरंजक माहिती मिळते. साईसच्चरितात पारल्याचे साईभक्त दीक्षितमहाराज यांचे अनेक उल्लेख आहेत. पारलेपरिसराचे ओझरते उल्लेखही अनुषंगाने आले आहेत. शिरडीहून परतलेल्या दीक्षितांना पारले स्टेशनवरून घरी आणण्यासाठी त्यांचा नोकर कंदिल घेऊन बैलगाडीतून स्टेशनवर कसा जाई याचाही उल्लेख आहे. .मला वाटते चरित्रात एका ठिकाणी सापविंचवांचा धोका कसा टळला त्याचेही वर्णन आहे.यावरून त्या वेळेचे पारले कसे असेल याची कल्पना करता येते.
गजाननमहाराज(शेगाव) चरित्रात बाबासाहेब खापर्ड्यांनी लोकमान्य टिळकांसाठी गजानन महाराजांची भेट कशी घेतली, महाराजांनी त्यांना आशीर्वाद म्हणून शिळ्या भाकरीचा तुकडा कसा दिला,त्यावरून टिळकांना पुढे कदान्न खावे लागणार आहे हे कसे सूचित झाले ह्याचा उल्लेख आहे. स्वामीसमर्थचरित्रातही वासुदेव बळवंत फडक्यांच्या भेटीचे वर्णन आहे. बंड करण्यासाठी समय उचित नाही असे महाराजांनी त्यांना सूचित केले होते.

महाराष्ट्र चेंबरमध्ये काम करून घरी जाताना ७ ची ठाणे लोकल पकडली तर व्हिटीतून निघताना पंजाब मेल बरोबरीने निघत असे. आणि बराच वेळ आगेमागे करत वेग पकडून पुढे जात असे. फार एक्सायटिन्ग वाटायचे ते.

हिरा आत्ता कळले मेल म्हणजे काय. धन्यवाद. हो गजानन महाराजांच्या पोथी मध्ये पण आहेत काही उल्लेख ट्रेनचाही आहे.

मामी खरच खुप छान धागा काढला आहेस वाचताना मजा येतेय.

रेल्वेच्या 'मेल'सारखंच प्रत्येक मार्गावर 'एसटी'च्या पण ठराविक स्थानिक गाड्या 'पोस्टाच्या गाड्या' म्हणून ओळखल्या जातात. त्यातल्या शेवटच्या दोन 'सीटा' पोस्टाच्या बॅगा ठेवायला राखीव असत/ असतात. गांवागांवातल्या टपालाच्या पिशव्या देणं/घेणं या ठराविक बसेसमधून चालतं.

परळ, मुंबई सेंट्र्ल असे एसटी स्पेशल भाग.

मे महिन्यात तिथे ज्यादा गाड्यांसाठी होणारी गर्दी, मुंबई हुन न्यायचे सामान, सोडायला आलेले लोक, टपावर जागा(सामानाल) नीट मिळावी म्हणुन होणारी भांड्ण..

अहाहाहा

कोकणातल्या प्रत्येकाने एकदा तरी हा सोहळा अनुभवला असेल Happy

<< कोकणातल्या प्रत्येकाने एकदा तरी हा सोहळा अनुभवला असेल >> अगदीं खरंय ! थोडं विषयांतर पण मुंबईतलं खुराडं आणि कोकणातलं घर याना जोडणारा एसटी हा एक जिव्हाळ्याचा दुवाच !

थांबा थांबा थांबा...
कोकणात जाऊ नका.
मुंबईतच थांबा.
कोकणातला माणूस कोकणकौतुकात शिरला की थांबतच नाही. अचाट आणि अतर्क्य पातळीला कोकणकौतुक पोचले तरी थांबत नाही. Wink Proud
कोकणी माणसांना Light 1
सध्या आपण मुंबईचीच माहिती घेऊया..

<< अतर्क्य पातळीला कोकणकौतुक पोचले तरी थांबत नाही. >> नका इतक्या 'पॅनिक' होऊं !' थोडं विषयांतर ', असं स्पष्ट म्हणून इथल्या विषयाचं भान असल्याचा दिलासा दिलाय ना वर !! Wink

Pages