मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, जुन्या चर्चगेटचा फोटो मी टाकलाय Proud

या पुस्तकात अनेक फोटो आहेत. जमेल तेव्हा मी टाकेन. स्कॅन करताना पुस्तक बाइंडिंगमधे फाटेल असे वाटतेय त्यामुळे फोटो काढुन टाकतेय.

हो, सावली. चर्चगेटचा फोटो तू टाकलायस. पोस्ट सुधारली. Happy

कान कोरून देणारे ( मला या लोकांबद्दल गूढ वाटते ) >>>> माझ्या मामानं आम्हाला सांगितलं होतं की या लोकांच्या हातात एक खजूर असतो आणि त्याचा छोटासा तुकडा ते कानकोरण्याला लावून दाखवतात की बघा तुमचा कान किती घाण होता आणि मी तो साफ केला. ऐकून अगदी यक्क! झालं होतं. नंतर अनेक दिवस खजूर खाल्ला नसणार आम्ही. Biggrin

यामधे डॉकयार्ड रोडवरून दिसणारी मुंबईची स्काय-लाईन दिसतेय.... (हलली आहे स्कायलाईन कारण फोटो बोटीतून काढलाय)

गा.पै.

पंजाब मेल फार फेमस होती बहुतेक..
मला लागली कुणाची उचकी गाण्यात... अशी कुटं चाल्ली ही पंजाब मेल गचकं खात ?.. अशी ओळ येते.

ज्या चित्रपटात मुंबईचे यथार्थ चित्रण झाले असे मला आठवतात ते...

देख कबीरा रोया, तेजाब, वास्तव, छोटीसी बात, गृहप्रवेश, अनुभव, शुट आऊट अ‍ॅट लोखंडवाला, सलाम बाँबे, बाँबे डायरी, चोरनी ( नितू सिंग), २७ डाऊन ( राखी ), बातो बातो मे, फेरारी कि सवारी, बेनाम ( अमिताभ / मौशुमी ), पेस्तनजी, वेनस्डे, कथा, घरौंदा, शहर और सपना ( विजया चौधरी ) , बंबई रात कि बाहोंमें, चलती का गाडी, आत्मविश्वास ( मराठी. नीलकांती पाटेकर ), पांडू हवालदार... ही पण यादी वाढवा.

नाटकांपैकी.. अधांतर, बाँबे मेरी जान, गुरु .....

अजून भर- धोबीघाट, लाईफ इन अ मेट्रो

चित्रपटांमधे नेहमी दिसणारं अजून एक कॉलेज म्हणजे सेंट झेवियर्स, विशेषतः मधला चौक.

मुंबईतील डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम म्हणजे प्रत्येक मुंबईकराने किंवा इतरांनीही आवर्जून पहावे असे स्थळ. १८व्या शतकापासूनच्या आणि त्यानंतरच्या समकालीन मुंबईतील घडामोडी, राहणीमान, मुंबईचा तत्कालिन नकाशा, त्यावेळच्या नागरिकांचे पोषाख, व्यवसाय, भाषा, उद्योगधंदे, कला, तंत्रज्ञान यांचे सुरेख डॉक्युमेन्टेशन यात आहे. मुंबईची जन्मकथा, सुरुवातीपासूनचे नकाशे, मुंबईच्या जडणघडणीला हातभार लावणारे प्रत्येकजण इथे मौजुद आहे. विनंती केल्यास म्युझियमचे क्युरेटर्स, सहकारी स्वतः आपल्यासोबत म्युझियम फिरुन माहिती पुरवतात.

म्युझियमच्या इस्टर्न गार्डनमधे मुंबईतील ब्रिटिशांच्या काळातले वेगवेगळे संगमरवरी पुतळे, जे नंतरच्या काळात म्हणजे स्वातंत्र्य चळवळीच्या काळात स्थानिक नागरिकांच्या रोषास पात्र ठरले ते सर्व एकत्र करुन ठेवलेले आहेत. बरेचसे भग्नावस्थेत आहेत. तिथेच पूर्वी भायखळा स्टेशनसमोर असलेला एक भव्य, कोरीव नक्षीकाम असलेला पोलादी लॅम्पपोस्ट, जो अजून पेटवताही येतो, तो ठेवलेला आहे. म्युझियमच्या आवारात असलेले भव्य, प्राचीन वृक्ष जे आता सुंदर फुलांच्या बहराने सजलेले आहेत, त्यांच्या पार्श्वभूमीवर हे म्युझियम आतून बाहेरुन काळजीपूर्वक पहाणे हा सुंदर अनुभव ठरतो.

मुंबईचं अजून एक वैभव म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि त्याचा नितांतरमणीय परिसर.
मुंबईतील आर्ट गॅलरीज (विशेषतः जहांगिर आणि त्याजवळचा कैखुश्रू मार्ग तो तर अद्भूत आहे) वर तर एक खास लेख होऊ शकतो. तिथून जवळच मॅक्सम्यूलर भवन, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, डेव्हिड ससून लायब्ररी, पुढे मरिन ड्राइव्हवरची एनसिपीए अशा वास्तू या मुंबईचं वैभव आहेत.

आता उन्हाळ्यात एमटिडिसीतर्फे निलांबरी (म्हणजे उघड्या टपाची बेस्टची बस) मधून संध्याकाळी मुंबईच्या फोर्ट, कुलाबा परिसरात एक सैर आयोजित करतात. खूप मस्त वाटतं. या परिसरातल्या हेरिटेज वास्तू निलांबरीतून न्याहाळण्याचा अनुभव एकदा तरी घ्यावाच.

कुल्फीवाले:
डोक्यावर गांधी टोपी, वर मोठी टोपली, त्यात माठ घेउन चाळीचाळीत जाऊन कुल्फीये.. असे ओरडायचा. तो आला की सगळी मुले गराडा घालायची.
माठात बर्फात अ‍ॅल्युमिनियमच्या शंक्वाकार नळ्या असायच्या. त्यातील एक नळी घेऊन हातावर चोळून, त्याचे झाकण काढायचा. मग त्यात काडी रोवली की मग नळीतुन कुल्फी काढुन खायला तयार!

लहानपणी आजोळी शिवडीला गेलो की आम्ही सगळी मुले मस्त कुल्फी खात असु. ती कुल्फी भांड्यातुन काढताना बघायला मजा यायची.

कुल्फीवाल्याचे दोन राउंड व्हायचे. एक संध्याकाळी ५-६ ला ज्यावेळी मुख्यतः मुलेच कुल्फी घ्यायची, दुसरी फेरी रात्री ९ च्या आसपास, जेव्हा जेवून झालेले असायचे.

आता हे कुल्फीवाले गायबच झाले आहेत.

मीठवाले:
मीठाची पोती घेऊन हे लोक घरोघरी फिरायचे. एका मापाने खडे मीठ विकायचे. आजीकडे आताही मीठवाला येतो. खुप म्हातारा झालाय पण लोक अजुनही खडे मीठ विकत घेतात.

कोल्हापूर परिसरातून हे कुल्फीवाले मामा मुंबईत यायचे उन्हाळ्याच्या दिवसांमधे. काय अप्रतिम लागायची त्यांच्याकडची कुल्फी.

पार्ल्यात तरी निदान अजूनही मे महिन्यात रात्रीच्या वेळी एखादी हाळी ऐकू येतेच या कुल्फीवाल्यांची.

शिवाजीपार्कला जिप्सीच्या कॉर्नरला पेट्रोलपंपासमोर बसतो त्या कुल्फीवाल्याकडची कुल्फी सुद्धा अहाहा... एक खाऊन थांबलो असं कधीच होत नाही. तिथेच असलेल्या चहावाल्याकडचा उकाळा, केसरी चहाही ग्रेट.

मुंबईतील अजून एक मस्ट ईट खासियत म्हणजे स्टेडियम हाऊसमधल्या के.रुस्तुमचे आइस्क्रिम वेफर्स सॅन्डविच. मॅन्गो, स्ट्रॉबेरी, किवी आइस्क्रिम सॅन्डविच खाल्याशिवाय मुंबई अनुभवली असे होऊचह शकत नाही.

मुंबईतल्या शिल्लक इराण्यांचीही एक लिस्टच करायला हवीय. मेट्रोजवळचे कयानी, कुलाब्याचे ब्रिटानिया अजूनही जोरात आहे.

आहेत. पार्ल्यात नेहरू रोडला दिसतात हे कुल्फिवाले कधी कधी. सासवड, भोर वगैरेहून येतात. रात्री २-३ तास विकतात कुल्फ्या आणि पहाटे गावी परत. दिवसभरात नवीन कुल्फी तयार. ती घेऊन संध्याकाळच्या गाडीने परत पार्ल्यात दाखल.

नवर्‍याला अश्या सगळ्यांशी गप्पा मारायची भारी हौस असल्याने मिळालेले ज्ञानकण आहेत हे. Happy

विशेषतः जहांगिर आणि त्याजवळचा कैखुश्रू मार्ग तो तर अद्भूत आहे>> +१/ त्या मार्गावरती जो बोर्ड आहे तो वाचून मी कितीतरी दिवस ही स्पेलिंग मिस्टेक असावी असं समजत होते. नंतर एकदा बॉसने बोलता बोलता याबद्दल माहिती दिली होती. (मायबोलीवर लेख पण आला होता ना कैखुश्रु दुबाशवरती?)

मुंबईतल्या शिल्लक इराण्यांचीही एक लिस्टच करायला हवीय. मेट्रोजवळचे कयानी, कुलाब्याचे ब्रिटानिया अजूनही जोरात आहे.
<< चर्चगेट स्टेशनजवळचा इराणी? त्याचे नाव विसरले.

कोणे एके काळी रात्रीच्या वेळी माहिम कडून वांद्र्याला जाताना बिकेसीच्या तोंडावरील ओफन थिएटर मधिल दिसणारे चित्र-पट म्हणजे लहान थोरांच्या कुतुहलाचा विषय... ट्रेनच्या प्रवासा दरम्यानही त्या दिशेला थोडासा प्रकाश दिसला तरी लोक स्वतःला धन्य समजत.

>>> केवळ ह्याच्यासाठी आम्ही उजवीकडची खिडकी पकडायचो:-)

चर्चगेट स्टेशनजवळचा म्हणजे स्टेडियम रेस्टॉरन्टवाला इराणी ना?>> हो. तोच. Happy

चर्चगेटला काम करत असताना आम्ही लंचला बर्‍ञाचदा तिथे जायचो. नाहीतर संध्याकाळी चहासाठी. Happy

पण तो आता इराण्यासारखा कमी आणि उडप्यासारखा जास्त वागतो, एक डोळा तुम्ही कधी उठताय यावर ठेवतो बहुतेक असा त्या दिवशी तरी संशय आला. किंवा आम्ही जरा जास्तच मुक्काम केला चहा-बन मस्क्यावर म्हणूनही असेल Proud

१९९३ सालच्या मुंबईबाँबस्फोटानंतर आणि त्यानंतर झालेल्या धार्मिक दंगलींनंतर प्रत्येक इराणी रेस्टॉरंटबाहेर 'या हॉटेलचा मालक इराणी वंशाचा आहे.' अशा पाट्या लागल्या आहेत. बर्‍याच ठिकाणी त्या अजूनही पाहता येतात.

दादर (पूर्व) स्टेशनबाहेरील मारुतीच्या देवळाजवळ एक इराण्याच हॉटेल होतं. फार पूर्वी मला आयसिंग लावलेले केक्स (त्यावेळी पेस्ट्री हा शब्द माहित नव्हता.) खाण्याची इच्छा झाली असता बाबांनी तिथे नेऊन ३-४ विविध प्रकारच्या पेस्ट्रीज खाऊ घातल्या होत्या. काचेच्या आड असलेल्या रंगिबेरंगी चेरी वगैरेनी सजलेल्या त्या पेस्ट्री बघून इराण्याचा भारी हेवा वाटला होता.

सिनेमांच्या यादीत 'सत्या' राहिला.

दिनेशदा, वर कुठेतरी तुम्ही बी.सी.सी.आय..रेल्वे म्हटलं आहेत. ते बी.बी.सी.आय. आहे. बाँबे बरोडा अँड सेन्ट्रल इंडिया रेल्वे (आठवा - बीबीसीआयला जीआयपीचा डबा Wink )

ओपन थिएटर म्हणजेच ड्राईव्ह-इन थिएटर ना? 'घर' हा रेखा-विनोद मेहराचा सिनेमा ड्राईव्ह-इनशी निगडित एका भीषण घटनेवर आधारित आहे. तेव्हा त्या घटनेच्या बातम्या पेपरमधे वाचल्याच्या अंधुक आठवतायत.

बरोबर. बीबीसीआय च...

मुंबईत असूनही मुंबईतल्या न वाटणार्‍या काही जागा आहेत.. कुलाब्याचे टि. आय. एफ. आर च्या गेटच्या बाजूचे शंकराचे देऊळ, भायखळ्याल्या रेल्वेलाईन लगत असलेले शंकराचे देऊळ, ट्राँबेला चिताकँपच्या आधी लागणारे एक देऊळ, माझगावच्या गल्ल्या, बांद्रा वेस्टच्या गल्ल्या, चेंबूरला फाईन आर्ट्सच्या समोरच्या भागात असणारे एक देऊळ, शितलादेवी देवळाच्या आतला परीसर, बाबूलनाथ ते कमला नेहरू पार्क पायवाट, मनोरी, आगर बाजार ( आता बदललाय तो ) रुईयाच्या मागच्या गल्ल्या, पारसी कॉलनी, हिंदु कॉलनी ( राजा शिवाजीला सुट्टी असेल तरच ) माहीम कोळीवाडा, कुर्ला बैलबाजार,...

Pages