मोबाईल कोणता घ्यावा या धाग्यावर एक प्रतिसाद टाईप करताना डोक्यात अचानक एक किडा वळवळला. म्हणून हा धागा. किड्याची समरी वर टायटल मधे आहेच. इतके बोलून, नमन झाल्यानंतर उरलेले घडाभर तेल पुढे ओततो -
फार फार वर्षांपूर्वी, म्हणजे सुमारे ४थी-५वी मधे असताना आमच्या अख्ख्या कॉलनीत एक फोन होता. तो देखिल लँडलाईन. फोन कसा करतात याची ओ की ठो जाणकारी आम्हाला नव्हती. फोनवाले घर शेजारीच होते. वडीलांच्या ऑफिसात फोन ऑफकोर्स होताच. एकदा आईने मला शेजारी जा अन तुझ्या वडिलांना अमुक निरोप फोन करून सांग असे काम सांगितले.
मी नेहेमी खेळायला शेजारी जात असलो, तरीही फोन या प्रकरणाशी त्या काळी शून्य संबंध असल्याने, फोन कसा 'करतात' याचे शून्य ज्ञान होते. शेजारी गेलो. रिसिव्हर उचलून कानाला लावून बोलतात हे पाहून ठाऊक होते. तसा तो कानाला लावला, अन मी फोन उचलला आहे म्हणजे पलिकडून वडीलच ऐकणार हे नक्की असे गृहित धरून घाईघाईत निरोप सांगून फोन ठेवला अन घरी परत आलो. माझ्या नशीबाने हा सगळा प्रकार कुणीही पाहिला नव्हता. अन वडिलांना तो निरोप न मिळाल्याने काही फार फरकही पडलेला नव्हता.
त्या काळी फोनला 'ऑपरेटर' सिस्टिम होती. म्हणजे फोन उचलून कानाला धरून ठेवायचा. यथावकाश तिकडून ऑपरेटर काका/काकू फोनवर 'नंबर प्लीज' असे आपापल्या स्वभावानुसार विचारत. कुणी वस्सकन नंबर? इतकंच, तर कुणी नाजुकपणे प्लीऽज. नंबर माहीती नसला तरी सगळे मिळून ४ आकड्यांत नंबर असल्याने कॉमन नंबरवाल्याचं नांव सांगितलं तरी चालत असे, फोन जोडला जाई. नंबर माहीत नसेल, तर ते ऑपरेटरच स्वतः डीरेक्टरी एन्क्वायरीचे काम करून फोन जोडून देत असत.
यासोबतच्या 'एसटीडी' कॉलच्या कथा वेगळ्या अन सर्वांना ठाऊक आहेत. ऑर्डीनरी, अर्जंट, पीपी, लाईटनिंग इ. कॉलचे प्रकार असत. पण तो वेगळा विषय.
काही वर्षे गेली. फोनच्या डब्ब्यावर डायल आली. फोन नंबर ४ आकडी वरून ६ आकडी झाले. आजकाल एसटीडी कोड धरून १० आकडी झाले आहेत. फोनचे डब्बे कॉर्डलेस झाले आहेत. मधे मोडेम लागले आहेत.
दरम्यान आम्ही शिक्षणासाठी पुण्याला गेलो. परत आलो. तर वर्षा दोन वर्षांत या टेलिकम्युनिकेशन लाईनमधला एक 'पेजर' नामक प्रकार आला. अन फक्त वर्ष दोन वर्षे टिकला. एक छोटी डब्बी २-३ हजारांना विकत घेऊन कंबर-पट्ट्याला बांधून फिरणे, अन त्या डब्बीवर टेक्स्ट मेसेज मिळणे असे याचे स्वरूप होते. मेसेज पाठवणारा पेजर कंपनीला 'टेलीफोन' करून अमुक नंबरला तमुक मेसेज पाठवा असे सांगत असे. हे लै मॉडर्न वगैरे होते, पण लवकरच एक 'मोबाईल' नामक प्रकार आला, अन पेजर मेला. जात्या काळात तर २ शर्ट विकत घेतले तर १ पेजर फ्री असल्या देखिल स्कीम्स होत्या, पण ती टेक्नॉलॉजी मेलीच हे खरे.
तेंव्हाचा मोबाईल जहाल महाग. आऊटगोइंग ९ रुपये प्रति मिनिट, अन इनकमिंग ३ रुपये प्रति मिनिट. असे लोकल कॉलचे भाव होते. सगळ्यात पॉप्युलर मॉडेल नोकिया २११०. ते पण १२-१४ हजारांना होते त्या काळी. (अवांतर : तेंव्हा सोने ३-४ हजार रुपये तोळा होते. प्लीज नोटच. या फोनची पहिली गिर्हाईक लोक्स पेजर सारखीच अॅनास्थेटिस्ट्स. यांचे अक्खे दुकान फोनवर चालते. एक 'डबा बाटली'* अन एक फोन. असे भांडवल आमच्या कॉलेजकाळी असे. ओटीचा फोन एंगेज = अॅनास्थेटिस्ट इन ओ.टी. )
मग हळू हळू मॉडेल्स बदलू लागली. मी पहिला घेतला तो सीमेन्सचा हा फोन होता :
तो जुना झाल्यावर बंधूराजांनी ढापला, दरम्यानच्या काळात एक सॅमसंगचे सेक्सी मॉडेल होते.
हे पण बंधूराजांनी कुठेतरी गायब केले. (-फोटो सापडल्याने अपडेट केले)
नंतर सोनी एरिकसन घेतला. नंतर तो मातोश्रींना दिला, अन मी माझ्यासाठी एक टचस्क्रीनवाला चायना घेतला. तो चायना फोन कन्यारत्नाने वापरून सध्या घरी एका ड्रॉवरमधे पडून आहे. सोनी पण कुठेतरी पडलेला असेल. मधेच कधीतरी एक नोकिया घेतला होता. फोनवर क्यामेरे अन रंग आले तेव्हा. तो काही केल्या माझ्या काँप्युटरशी 'बोलेना' मग एका ज्युनियरला गिफ्ट देऊन टाकला. असे ५-६ तरी हँडसेट बदलून झालेत.
सध्या इतर ३ फोन 'माझे' आहेत. एक गॅलॅक्सी टॅब-२, एक मायक्रोमॅक्स कॅनव्हास एचडी, एक गॅलॅक्सी ३ नामक भरपूर जुना ( सुमारे २-४ वर्षे) स्मार्ट फोन.
तर याच गॅलॅक्सी ३ ला मी पुन्हा वापरात आणला तो सीसी टिव्ही म्हणून. शिवाय त्याला मी रेडिओ म्हणूनही वापरतो. एक जुनाट हेडफोनची पिन खुपसली की रेडिओ चालू होतो.
तर,
हे नमनाचे घडाभर तेल ओतून झाल्यावर मित्रहो, नॉस्टाल्जिया अपार्ट,
आपण सगळेच लोक फोन बदलतो. कधी हौस म्हणून, कधी गरज म्हणून, तर कधी नाईलाज म्हणून. जुन्या झालेल्या / स्पेअर फोनचे तुम्ही नक्की काय करता? आहे त्या फोनचे 'फोन' सोडून इतर काय उपयोग करता? अन हो, हरवला, तर त्या फोनमधल्या कार्ड्/डेटा च्या सुरक्षितते साठी काय करता? हे देखिल ऐकायला आवडेल.
स्पेसिफिकली अँड्रॉईड फोनबद्दल सांगितलेत तर मला जास्त उपयोगी होईल.
जसे,
माझा टॅब मी बीएसएनएलचा डेटा प्लॅन (३०० रुपये = ८ जीबी ३ महिन्यासाठी २जी) असे कार्ड वापरून कारमधे नॅव्हिगेशन सिस्टिम, लॅपटॉपला टीथरींग हॉटस्पॉट, माझ्या गॅलॅक्सीच्या कॅमला रिमोट व्ह्यूअर, प्रेझेंटेशन्स साठी लॅपटॉपचा पॉवरपॉइंट रिमोट इ. कामांसाठी वापरतो.
सगळ्या फोन्स वर पुस्तके वाचतो. पेशंटचे, आजारांचे फोटो काढतो. एक्सरे, एम आर आय, सी.टी. इ. इमेजेस मित्रांसोबत शेअर करून सेकंड ओपिनिअन मागतो. प्रेझेंटेशन्स/अभ्यासा साठी डेटा कलेक्ट करतो. बारकोड्स स्कॅन करतो. व्हॉट्सॅप वापरतो. फेसबुक, मायबोली वापरतो. अनेक..
तुम्ही काय-काय करता?
इ-ब्लिस्..
(*डबा बाटली = ईथर वापरून भूल देण्यासाठी लागणारी यंत्रणा. हिला गमतीत डबा बाटली म्हणत.)
डॉक्टर असुनही लईच टेकसॅव्ही
डॉक्टर असुनही लईच टेकसॅव्ही आहात की इब्ल्लिस काका
आमच्या घरच्या डाकटरांना बोलण्याशिवाय काही झेपत नाही. त्यातही ते बोलतात कमी अन ऐकतात जास्त
प्रतिसाद टाईप करताना डोक्यात
प्रतिसाद टाईप करताना डोक्यात अचानक एक किडा वळवळला >>>>> ब्वार्रर्रर्र !!!!
डबा बाटली = ईथर वापरून भूल
डबा बाटली = ईथर वापरून भूल देण्यासाठी लागणारी यंत्रणा. हिला गमतीत डबा बाटली म्हणत.
>> असं का? म्हणजे काय कारण आहे? काय संबंध आहे?
पियु परी, माझ्या धाग्याशी
पियु परी,
माझ्या धाग्याशी अवांतर आहे, पण हे बघा, अन तुम्हीच सांगा काय संबंध आहे ते :
(ether anaesthesia असे गूगलावे)
भारी लिहिलंय, इब्लिस. तीन
भारी लिहिलंय, इब्लिस.
तीन तीन फोन बाळगता आणि त्यांचा योग्य प्रकारे उपयोगही करता याबद्दल खरंच अभिनंदन. मोबाईलांचा इतका ऑप्टिमम उपयोग मी पहिल्यांदा पाहिला (वाचला).
माझा जुना नोकियाचा फोन होता.
माझा जुना नोकियाचा फोन होता. ६०२० का कायतरी नम्बर होता.
त्यात कॅमेरा नाही, रेडिओ नाही, एक्स्ट्रा मेमरी नाही.
फक्त कलर फोन आणि बाय डिफॉल्ट एक दोन गेम. कार रेसची गेम मस्त होती.
ब्लुथुथ आणि इन्फ्रारेड (हे बंदच झालं सध्या) दोन्ही होते.
तरी मी तेव्हा त्याकाळी तो ७००० ला घेतला होता.
दिसायला नाजुक असला तरी फोन मजबुत होता.
माझ्या दिड वर्षाच्या बाळाला तो फोन फरशीवर आपटुन येणारा आवाज फार प्यारा होता.
तो एका मिनिटात २० वेळा आपटुन ठकठक आवाज काढत असे.
तरी नो प्रोब्लेमो.
त्याचं वय झाल्यावर (सुमारे ६ वर्षे !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!) मात्र हळुहळु बॅटरी वै सगळं प्रोब्लेम येत गेले.
मग बायकोला सॅमसन्ग एल ७०० घेउन दिला.
आणी मी तोच जुना फोन वापरला एक दोन चार महिने.
फोन आला की बंद पडने हा गुण त्याने दाखवला तेव्हा मात्र जाउन स्वस्तातला मायक्रोमॅक्स टच स्क्रीन घेवुन आलो. जय हो देसी कंपनी आणि चायनीज मॅन्युफॅक्चरर.
नंतर कधीतरी रागाच्या भरात मीच तो फोन फेकुन दिला आणि त्याचे तुकडे तुकडेच.
मग दोन महिने स्वतःला शिक्षा म्हणून (फिदी) परत जुना नोकिया कायम चार्जिन्गला लावुन तसाच सुरु ठेवला.
शिक्षा पुर्ण झाल्यावर एचटिसी एक्सप्लोररर हा ब्सेसिक अमर्ट फोन.
पण हा लै भारीच.
आता नेहमी घेइन तर स्मार्ट फोनच.
एकदा ह्याने पावसाळ्यात एका ट्रेकला धबधब्याच पाणी पिलय.
पण घरच्या घरीच बल्बची उष्णता दिल्यावर ओक्केच.
नेट आता बंद ठेवलय पण एकुणातच खुपस सोप्प झालय ऑनलाइन राहण.
पोराला खेळायला त्यावर कार रेसिन्ग गेम आहे, शिवाय गिटार, पियानो वाजवायला आहेत.
चित्र काढायला अॅप्स आहे, कॅलोडिस्कोप आहे.
टॉकिन्ग टॉम आहे.
मजाय...
नोकरीवाला माणुस असल्याने इब्लिस म्हणतात तसा वापर करण्याचा काही संबंध नाही.
पण इब्लिस यांची आयड्या भारी आहे.
कॅनव्हास घ्यावा का ह्या विचारात आहे.
मस्त नॉस्टॅल्जिक
मस्त नॉस्टॅल्जिक लेख...
माझाही पहिला मोबाईल दण्दणीत मोठा होता म्हणजे त्यापुढे कॉर्डलेसही लहान वाटतील.
मस्त लेख इब्लिस... माझा पहिला
मस्त लेख इब्लिस...
माझा पहिला मोटोरोला मोबाईल ८५-८६ मधे थायलँड मधे राहात असताना घेतला होता.. इतका जड आणी मोठा होता कि पर्स खांद्यावर घेतली कि खांदा दुखायला लागे.. हातात घेतली हात भरून येई..
अजून एक होता पावडर कॉम्प्कॅक्ट च्या रंगाचाआंणी आकाराचा.. सीमेन्स होता बहुतेक.. अतिशय टुकार फंक्शन्स होते त्याला..
इब्लिसकाका मस्तच हो टेक
इब्लिसकाका मस्तच हो
टेक सँव्ही डाँक्टर दिसताय
माझ्याकडे पहिला मोबाईल आला तो बारावीला
नोकियाचा
काहीच प्राँब्लेम नव्हता
आता जो वापरतेय तो पण नोकियाचाच
एक्सप्रेस म्युझिक
सगळ्या मराठी साईटस दिसतात
मराठी पण छान टाईप होते
हा प्रतिसाद पण त्यावरुनच लिहीतेय
झकासराव मस्त पोस्ट.. माझाही
झकासराव मस्त पोस्ट..
माझाही नोकीया २३०० (बटरफ्लाय पीस म्हणायचे तेव्हा त्याला) पहीला फोन. अजुनही जपून ठेवलाय मी तो..
मस्त लेख. मी फोनवर फक्त फोनच
मस्त लेख. मी फोनवर फक्त फोनच करतो / घेतो ( गेली ४ वर्षे एकच वापरतोय. ) बाकी प्रत्येक कामासाठी वेगवेगळे गॅजेट आहे
इब्लिसशेठची पोस्ट भारीच आहे.
इब्लिसशेठची पोस्ट भारीच आहे. मी पण सॅमसंग गॅलॅक्सी पॉप वापरतोय. पण आता तो जुना झालाय आणि नवा मायक्रोमॅक्स कॅनव्हास घ्यायचा मूड आहे.
बाकी इब्लिसनी लिहल्यानुसार ऑप्टिमल वापर करणे आलेच.
- पिंगू
जेम्तेम १४-१५ वर्षापूर्वी
जेम्तेम १४-१५ वर्षापूर्वी कंपनीनी दिलेला मोबाईल म्हणजे माझ्या स्वातंत्र्यावर गदा,भयंकर शिक्षा वगैरे वाटलं होतं
आता हे आठवून ही गम्मत वाटते इतकी आहारी गेलीये मी .
ह्म्म्म, खुप मोठा रिप्लाय
ह्म्म्म, खुप मोठा रिप्लाय टाईप केला होता, गेला
प्राचीन आयफोन ३जीएस वापरते.
प्राचीन आयफोन ३जीएस वापरते. त्यावर आठवड्याचे भाजी, किराणा मागवते, रेडियो ऐकते, रस्ते शोधते, डॉक्टरांचा सल्ला घेते (एनेचेस अॅप), पाककृती बघते, मायबोली वाचते ... एकूण सगळे काम होते यावरच.
जुने फोन तेव्हा तेव्हा वाटून टाकले. गेल्या तीन चार वर्षात नवा फोन घेतला नाहीये. ऑफिसकडून मिळालेला आयफोन ५ आहे त्याचा फोटो काढायला वगैरे वापर होतो.
इब्लिसकाका, माझा पण एक मोठ्ठा
इब्लिसकाका,
माझा पण एक मोठ्ठा प्रतिसाद मेला, सो परत अथं पासून...
खरंच छान वापर करता फोनचा. माझ्या ओळखीत अजूनही ' लाल बटण नी हिरवं बटण' एवढंच करणारे बरेच लोक आहेत.
तुमच्यासाठी अजून थोडं -
- गेमस् नाही खेळत का? वेळ मिळाला तर ते ही करा .. यात लिहीलं नाहीय म्हणून म्हटलं. सध्या ' फोर पिकस् वन वर्ड ' फाॅर्मात आहे. आपल्या एका मभादि कार्यक्रमासारखा आहे.
- अनोळखी लोक फोन करून त्रास देत असतील तर ते कोण हे शोधायला ' ट्रू काॅलर ' हे अॅप वापरा. फोन नंबर दिल्यावर मालकाचे नाव व टेलेफोन सर्कल कळतं.
- नोटस् मधे देवनागरी फाॅंट वापरून भराभरा लिहिता येतं ब्राऊजरवर घोटमॅट होऊ नये म्हणून मागेपुढे करत बसण्यापेक्षा. नोटस् ते डिफाॅल्ट अकाउंट तुमचे इमेल अकांउंट असेल तर याच नोटस् मेल ड्राफ्टस् म्हणून सेव्ह राहतात नी सगळीकडून वापरता येतात.
- महत्वाचे नंबरस् जसे बँक अकाउंट, पॅन, पासपोर्ट, इ. फोटोसकट जवळ ठेवता येतात. या सगळ्याला कुलूपात बंदिस्तंही करता येतं.
- २जी मधेच व्हायबर, स्काईप, याहू मेसेंजर इत्यादि आॅडिओ-व्हिडिओ काॅलस् करता येतात. स्लो होतं पण नाईलाज असेल तर तेवढंही पुरेसं वाटतं.
- मला बरेचदा औषध घेण्याचा रिमाइंडर लावावा लागतो
- ग्रुपमधे फिरणं होतं त्यामुळे कोणी कधी कशासाठी खर्चं केला व कोण कोणाला किती देणं लागतो हा हिशोब करणं सोपं पडतं..
बाकी आम्हीपण आमच्या नातेवाईक डाॅक्टर्सना असेच फोटो पाठवून त्रास देत असतो, हातावर पूळी आलीय, पायाला खरचटलंय असं काहितरी. गेलोच कधी लोकल डाॅक्टरकडे तर त्यांची प्रिस्क्रीप्शनस्, रिपोर्टस्, औषधांमधे असलेले पदार्थं वगैरे. आणि दररोजचा स्टेटस अपडेट देताना फोटोसहित ' इथे गेलो, हे खाल्लं ' वगैरे लांब असल्यासारखं वाटतच नाही.
जुने फोन गावात लोकांना देण्याच्याच कामी येतात. काँप्यूटरवर बॅकप घेण्याइतका समजुतदार फोन नसेल तर नंबर काॅपी करणे मोठं काम असतं. तेव्हा सिमवरच नावे ठेवणे उत्तम. सिम भरल्यावर फोनवर. त्यामुळे कुठली काॅपी झालीत व कुठली राहिलीत ते समजतं. नायतर खूप वेळ जातो.
माझ्याकडे पहिला मोबाईल होत तो
माझ्याकडे पहिला मोबाईल होत तो नोकिया ५१६५. खुप मस्त चालला. तो वापरला चांगला २-३ वर्ष आणि मग अमेरिकेत आले. त्यामुळे तो तसाच घरि पडुन होता. भारतात गेल्यावर बर्याचदा त्यात सिम टाकुन वापरायचे. १ वर्ष भाचीने सुद्धा वापरला. अमेरिकेत आल्यावर इथी सुद्धा नोकियाचा फोन होता पहिला नंबर आठवत नाहि, कॉन्ट्रअॅक्ट संपल्यावर परत नोकियाच घेतला तो ६२३६आय, मग एलजी चॉकलेट सिरिज मधले २ फोन झाले. इथे फोन रिसायकल करता येतात म्हणुन सगळे स्टो॑अर मधे परत गेले. सध्या कंपनिचा आयफोन आणि स्वतःचा सॅमसंग गॅलेक्सि आहे. दोन्हिचा वापर भरपुर होतो अगदि.
फोन टेक्स्ट, पटकन पिक्चर पाठवायला नातेवाईकांना, फेसबुक्,चॅटींग, अलार्म, रिमाईंडर लावायला , गेम खेळायला. बाहेर गेल्यावर मुलाला युट्युब वर व्हिडिओ दाखवायला, फोटो,व्हिडिओ काढायला, स्टोअर कुपन सेव्ह करायला, GPS , जिथे जाउ तिथले लोकेशन सेव्ह करुन ठेवायला, रेस्टॉरंट्चे किंवा इतर लोकेशन्चे अॅड्रेस सेव्ह करायला, फेसटाईम करायला बरेच उपयोगी पडतात फोन.
<<बेटे, फोन तो सिर्फ बात करने
<<बेटे, फोन तो सिर्फ बात करने के लिए होता है..?(!) >>
मामुजान, सिर्फ बात कराने वाला फोन तो बाबा आदम के जमानेमे मिलता था. आजकल के "कौए" के तो पर निकल आए है...
लेकिन आप, तीन-तीन फोन इस्तेमाल करते हो - ये बात कुछ हजम नहि हुइ. माना के लँड लाइन फोन हरएक कमरे मे होता है, पर सेलफोन एकसे जादा रखना (कमसे कम हमारे) उसुलोंके खिलाफ है. क्या आपका अॅंड्रॉइड बेस्ड फोन सभी सुविधाए देनेमे नाकामयाब है?
कम टु अॅपल वर्ल्ड!
भारतात डिजीटल सेलफोन सेवा कधी
भारतात डिजीटल सेलफोन सेवा कधी सुरु झाली? अमेरिकेत तरी मास अॅडॉप्शन मिड टु लेट नाय्न्टीज ला सुरु झालं.
फोनची किंमत पुरेपूर कशी वसूल
फोनची किंमत पुरेपूर कशी वसूल करायची तर मला विचारा
माझा पहिला फोन नोकिया ६०३० होता, माझ्या आगोदर ताईकडे, माझ्या नंतर लहान भावाकडे आणि आता पप्पांकडे आहे. २००६ चे मॉडेल असुन आज देखिल भन्नाट चालतो. पाच-सहा दिवस चार्जींग उतरत नाही.
ऑगस्ट-२००८ ला स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर मी नोकीयाचा ६२३३ घेतला. दिवसाची सुरवातच त्यामधे सेट केलेल्या अलार्मने होते. या फोनने फोटोग्राफी, व्हिडीओ शुटींग, रेडीओ, म्युझिक, नेट सर्फींग, गेम्स, बुक रिडींग सर्व काही करून झालेय. .jar फाईल फॉर्मॅट मधे हॅरी पॉटरची पाच व ईतर बरीच पुस्तके वाचुन झालीत. आज देखील त्या मधे लोड केलेली ईंजीनीअरींगची काही अॅप्लिकेशन्स मला डेली जॉब्समधे उपयोगी पडतात. हा फोन असताना नविन फोन का घ्यावा, हा प्रश्न नेहमी सतावतो.
आता Samsung P3100 किंवा Grand Duos घेण्याच्या विचारात ( म्हणजे फक्त विचारात ) आहे
छान लिहिलय >>>तुम्ही काय-काय
छान लिहिलय
>>>तुम्ही काय-काय करता? <<< गाणी ऐकणे, रेकॉर्ड करणे, फोटो काढणे,...
गेल्या ३ महिन्यात प्रचंड उपयोग झाला मोबाईलचा. विणकामाच्या ब्लॉग साठी अनेक व्हिडिओज काढणे गरजेचे होते. घरात हॅडिकॅम होता. पण त्याने केलेले शूटिंग काहीसे नीट होईना. मुळात विणताना कोणता टाका कसा विणतेय हे दिसणे आवश्यक होते, शिवाय रेकॉर्डिंग माझे मलाच करायचे होते. ते नीट होते आहे ना हेही मला बघात विणकाम करायचे होते. या सा-यासाठी कॅमेरा माझ्या गळ्यात हवा होता. माझ्याकडे छोटा कॅमेराच नव्हता जो गळ्यात अडकवू शकेन.
मग मी माझ्या मोबाईलचा वापर केला. छोट्या स्टॅडला मोबाईल बांधला, त्याला दोरी अडकवली अन घातला गळ्यात. ट्रायल एरर ने सगळे व्हिडिओ तयार होत गेले.
आता पर्यंत या ब्लॉग वर टाकलेले अन अजून टाकायचे असे जवळ जवळ १०० व्हीडिओज काढले या मोबाईलवर. या व्हिडिओज शिवाय माझा हा ब्लॉग झालाच नसता.
काल दुपारपासून पहायला वेळच
काल दुपारपासून पहायला वेळच झाला नाही. आता उत्तरे लिहितो.
>>
माधवी. | 8 April, 2013 - 16:16
ह्म्म्म, खुप मोठा रिप्लाय टाईप केला होता, गेला
< परत लिहा की प्लीज.. मोठा रिप्लाय म्हणजे वाचणेबल अनुभव असणार नक्कीच.
*
मामी, नताशा, अंजली, वर्षू-नील,पियू-परी, पिंगू, इन्ना, मृदुला, प्रिया धन्यवाद.
*
झकासराव,
घेऊन टाका कॅनव्हास. चांगला आहे. फक्त साध्या कॅनव्हासवर मराठी/देवनागरी नीट चालतेय का पाहून घ्या पीस. नाहीतर अपग्रेड करून घ्या ओ.एस.
*
जाई,
त्या नोकियाच्या पहिल्या मॉडेलला 'हातोडा'च म्हणायचे. आक्रोड फोडायला वापरता येईल इतपत दणकट फोन होता तो. झकासरावांच्या चिरंजीवांनी योग्य वापर केलाय त्याचा.
*
दिनेशदा,
फोनवर स्वयंपाक करता येत नाही अजून पण रेस्प्यांची भरपूर अॅप्स आहेत. बेकिंग साठी टायमर्स आहेत. अगदी दूध तापवण्याचा अलार्म देखिल लावता येतो. तेव्हा तुमच्या पाककला व इतरही विंटरेस्टस् च्या दिशेने काय वापर करता येईल याचा इच्चार तर करून बघा की.
नवा वापर सापडला तर लिहा इथे.
*
प्रसिक,
P3100 म्हणजे ७ इंची टॅब. याचा फोन म्हणून वापर जरा त्रासदायक आहे. हातात धरून हात दुखतो २ मिन्टानंतर. तो फोन खांद्यावर ठेवून बोलावं लागतं, असं पूर्वी ते कानाला ट्रान्झिस्टर लावून फिरणारे बेलबॉटम हीरो असायचे पहा, तसं. किंवा मग कानात ते ब्लूटूथ.
पण अदरवाईज मस्त आहे हा टॅब. पण फक्त टॅब्+सिम साठी घेणार असाल तर इन्टेक्स वगैरे स्वस्त अन मस्त ऑप्शन्स आहेत. सॅमसंगने या टॅबला २ लोचे केलेत. १ युनिव्हर्सल मायक्रो यूएसबी नाहीये. अन कॉम्प्युटरला जोडला तर फोन चार्ज होत नाही. म्हणजे लॅपीला वायर्ड हॉटस्पॉट केलात, तर फोनची ब्याटरी मेली, की फोन बंद.
ग्रँड ड्युओस इज झक्कास चॉइस. किमतीत फारसा फरक नाही. पण स्क्रीन लहान आहे टॅब पेक्षा.
*
अवल,
इन्नोव्हेटिव्ह आयडिया.
*
राज अन सोनू.
शेप्रेट प्रतिसाद लिहितो थोड्या वेळात..
सोनू. गेम्स : आजकाल वेळ नाही
सोनू.
गेम्स : आजकाल वेळ नाही मिळत हो. तेवढा वेळ असला तर तो पुस्तक वाचणे, माबो वर इब्लिसपणा करणे, झोप काढणे, व अशा इतर छोट्यामोठ्या गोष्टींसाठी क्रमाने वापरला जातो. तरीही. खेळलोच तर बबल शूटर, अनब्लॉक मी, सुडोकू, अल्केमी, व कस्टम्मेड जिगसॉ पझल्स.
ते ट्रूकॉलर वापरून पाहिलं मी. पण त्यात फक्त तो फोन जिथे रजिस्टर्ड आहे तिथल्या गावाचं नांव येत होतं. म्हणजे मीच मुंबैत असताना हैद्राबादला दिसत होतो.
AVG अँटीव्हायरस मधे नकोसे कॉल्स व फोन ब्लॉक करण्याची सोय आहे. एक Optinno असं सर्च केलं तर एक smsBlocker मिळते. उत्तम आहे.
औषधांच्या रिमाइंडर्सची काही उत्तम फ्री अॅप्स आहेत. मीही वापरतो. दीर्घकाळ औषधे घेणार्या वयस्कर आई बाबांसाठी त्यांनी गोळ्या घेतल्यात का याची आठवण ऑफिसातून करून देता येईल असेही अॅप्स आहेत.
**
राज.
मामुजान, सिर्फ बात कराने वाला फोन तो बाबा आदम के जमानेमे मिलता था. आजकल के "कौए" के तो पर निकल आए है...<<
वोहीच्च तो धाग है ना भांजे, के तुम्हारे कौव्वे के पर मेरे कौव्वेसे सफेद हैक्या नै? और एक बात, बना दिया ना मामा मेरेकू! आता अशोकमामा मारणार बघ तुला. (आता भाचा म्हणून एकेरीवर बोल्तोय, रागावू नका)
"फोन" एकच आहे हो. तो ड्यूअल सिम वाला कॅनव्हास. ५ इन्ची स्क्रीन.
दुसरा आहे तो टॅबलेट आहे. रोज वापरायचा फोन नाही. टॅबचा वापर लॅपी अन फोन यांच्या मधल्या प्रकारचा असतो थोडा.
तिसरा जुना गॅलॅक्सी ३ च्या डिस्प्लेच्या ३ पिक्सेल लाईन्स उडाल्यात. म्हणजे अशा ३ काळ्या लाइन्स येतात डिस्प्लेवर. त्याला फोन म्हणून वापरतच नाही मी. तो क्लोज सर्किट टीव्ही प्लस मेडीया स्टेशन असा वापरात आहे, किचनमधे पर्मनंट चार्जर लावून टांगून ठेवला त्याला.
<<
सेलफोन एकसे जादा रखना (कमसे कम हमारे) उसुलोंके खिलाफ है
<<
दोन नंबर लागतातच. डब्बे दोन असोत, की ड्यूअल सिम. म्याटर नॉट.
एक पर्सनल नंबर २४ तास रीचेबल. अन एक पब्लिक फोन. पेशंटांना देण्यासाठी. तो फक्त ऑफिशियल टाईमला चालू असतो. इतर वेळी हा नंबर हॉस्पिटलला कॉल फॉर्वर्ड होतो. पेशंटचे जेन्युइन व मी लक्ष घालण्याचे प्रॉब्लेम्स असलेत तर ड्यूटी स्टाफ मला पर्सनल नंबरवर बोलावतात.
१ च नंबर असेल, तर रात्री दीड वाजता फोन करून "डॉक्टर, उद्या सकाळी १० वाजेची अपॉइंटमेंट मिळेल का?" अस्ले फोन करणारे नमूनेही या जगात असतात.. (या बेरात्री अवेळी फोन चा झक्कास धागा होईल एक )
>>कम टु अॅपल वर्ल्ड!<<
अॅन अॅपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे नो थँक्स.
इब्लिस प्रसिककडे जो मोबाईल
इब्लिस
प्रसिककडे जो मोबाईल होता पहिल्यादा तोच माझ्याकडे होता
त्याला हातोडा म्हणतात हे माहित नव्हते
आता टचस्क्रीनचा विचार चालूय
मातोश्रीनी टिपणी न करण्याचे मान्य केलेय एकदाचे
पण मराठी त्यावर लिहीता वाचता येईल का याची धाकधुक वाटते
ग्रँड ड्युओसचा तुमचा काय अनुभव आहे इब्लिस
जाई. ग्रँड ड्यूओस सुंदर फोन
जाई.
ग्रँड ड्यूओस सुंदर फोन आहे. माझ्या २ मित्रांकडे आहे. दोघे खुष आहेत. पण या प्रश्नाची चर्चा मोबाईल कोणता घ्याव या धाग्यावर योग्य होईल.
हा आहे वोरिजिनल हातोडा: २११०.
इब्लिस , फार काही 'अनुभव'
इब्लिस , फार काही 'अनुभव' टाईप नव्हतं लिहिलं हो .
अॅनास्थेटिस्ट आणि पेजर वाचून आठवले की आमच्या शेजारी एक दादा राहायचा, तो अॅनास्थेटिस्ट होता. त्याला घरी फोन यायचे, डॉ आहेत का म्हणून. मग त्याची आई त्याला 'पेज' करायची.
'पेज मी' अशी जाहिरात फार फेमस होती तेव्हा.
तुम्ही तो दुसरा सॅमसंग च्या मॉडेलचा फोटो टाकलाय ना, तो माझा पहिला फोन होता. कॉलेज मधे लास्ट ईयरला असताना घेतला होता. त्यामधे मेसेज आला की फक्त तो डावीकडचा लाईट लागायचा. हे फार सोईचं वाटायचं
मधे एकदा ब्लिंग घेतला होता. फार वाईट अनुभव. आवाज तर इतका बारिक यायचा की घरातून बोलतानाही त्रास व्हायचा. दोनदा दुरुस्त केला. ५०० रु देवून, मग नाद सोडला. पण त्यात खुप छान गाणी आहेत, ती कॉपी करण्यासाठी पुन्हा एकदा दुरुस्त करायचा विचार आहे.
आता तर जो स्मार्ट फोन आहे त्यामुळे लॅपटॉप ही गोष्ट बादच झाली आहे माझ्या आयुष्यातून.
मी पण रेसिपींचे फोटो काढण्यासाठी खुपदा वापरते. का तर फोटो बघितले की एकदम आठवतं, अरे हे येतं आपल्याला मग पुन्हा करता येतं!!
मधे एकदा मायबोलीवर वाचले होते की डास पळवून लावणारे पण एक अॅप आहे. बघायला पाहिजे!
The smartphone in your pocket has more computing power than all of NASA did when it put a man on the moon in 1969.
And yet all you do is play angry birds!!
ओक्केज नाही हा हातोडा नव्हता
ओक्केज
नाही हा हातोडा नव्हता ब्वाँ माझ्याकडे
पण बाबांच्या मित्राकडे पाहिला होता
ह्याची ती वरची दांडी पाहून मला कायम पोलिसांच्या वायरलेसची आठवण यायची
योगायोगाने ते काका पण पोलिसच होते
त्यामुळे हे फोन वापरणारे पोलिसच असतात ही लहानपणी पक्की समजूत होती
वा ! पण तुम्ही पक्के ई-ब्लिस
वा ! पण तुम्ही पक्के ई-ब्लिस आहात
वरचे ओल्डीज हतोडे तर माझा काय
वरचे ओल्डीज हतोडे तर माझा काय म्हणाल? हो, इनकमिंग ३ रु च्या जमान्यात घेतलेला फोन तो!
पण अजून चालतोय, म्हणजे बाबा 'चालवून' घेत आहेत
बाकी तुम्ही ई-'ब्लिस' आहात याला दुजोरा
पहिला आउट गोईंग कॉल १६ रुपये
पहिला आउट गोईंग कॉल १६ रुपये होता मला आठवते आणि ह्याण्डसेट रु. ३५-४०००० इसवी सन १९९५ मध्ये.
Pages