एखाद्या व्यक्तिचे विचार, त्याचे महात्म्य जगाला कळतच नाही. सॊक्रेटीसला त्याच्याच समाजातील विद्वान ओळखू शकले नाहीत, ज्ञानेश्वर आदी भावंडांचे मोठेपण तर त्यांच्या जन्मगावातील लोकांनाच कळले नाही. गांधींच्या लाखोंच्या संख्येने असणार्या भक्तांनासुद्धा गांधीजी कळलेच नाहीत (गांधींच्या शरीराचा खून नथूराम ने केला हे खरे असले तरी गांधींचा वैचारिक खून त्यांचे अनुयायी म्हणवणार्यांनीच केला, अन्यथा गांधींच्या तत्वाला हे तथाकथित अनुयायी जागले असते तर त्यांनी प्रतिक्रियेदाखल पुण्यात शेकडो ब्राह्मणांची घरे जाळलीच नसती).
असो, कित्येकदा व्यक्तिचे मोठेपण जगाला, समाजाला, दूरच्या मंडळींना कळले नाही तर ते आपण समजू शकतो पण त्या व्यक्तिच्या अगदी जवळच्या मंडळींना, त्यांच्या कुटुंबीयांना समजले नाही तर आपणांस आश्चर्य वाटते.
पण माझ्या आश्चर्याचा कडेलोट झाला जेव्हा माझ्या निदर्शनास आले की एक अतिशय महान कलाकृती बनविली गेली आणि काही काळाने तिचे मोठेपण तिचे रचनाकारच विसरून गेले. इतकेच नव्हे तर या कलाकृतीवर पुन्हा आपल्या क्षुद्रपणाचे कलम करून तिला सामान्यांहूनही खालच्या पातळीवर आणून बसविले. ही खरंच धक्कादायक गोष्ट आहे कारण कलाकृती ही निर्जीव तर तिचे निर्माते सजीव असल्याने ते नि:संशय त्या कलाकृतीहून उच्च पातळीवरच असले पाहिजे पण हे उदाहरण या संकल्पनेला अपवाद ठरते.
१९८४ साली केरळच्या नवोदय स्टुडिओने निर्माता अप्पचन यांचा जिजो दिग्दर्शित माय डिअर कुट्टी चेतन हा मल्याळम भाषेतील चित्रपट हिंदीत छोटा चेतन या नावाने प्रदर्शित केला तेव्हा हा चित्रपट पाहण्याची मला अतिशय उत्सुकता निर्माण झाली कारण एकतर हा या दोन्ही भाषांमधीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील पहिलावाहिला थ्री-डी (थ्री डायमेन्शनल अर्थात त्रिमितीय) चित्रपट होता. दुसरे कारण माझ्यासाठी अतिशय व्यक्तिगत स्वरूपाचे होते ते म्हणजे इतके हिंदी चित्रपट आतापर्यंत पाहण्यात आले असले तरी त्यापैकी कुठल्याच चित्रपटात नायकाचे नाव चेतन नव्हते. (खरे म्हणजे विनोदवीर असरानीने राजेश खन्नाच्या अजनबी चित्रपटात रंगविलेल्या गंभीर पात्राखेरीज त्यापूर्वीच्या इतर कुठल्याही चित्रपटात कुठल्याही पात्राचे नाव चेतन नव्हते). तेव्हा हा चित्रपट पाहणे हे माझ्या दृष्टीने अगदी ’मस्ट’ होते. बरे चित्रपट खास लहान मुलांसाठीचा असल्याने बघायला ’सेफ’ असणारच या विचाराने घरच्यांचीही काहीच आडकाठी नव्हती.
तेव्हा आम्ही सहकुटुंब २४ किमी चा प्रवास करून पुण्यातील तेव्हाच्या अतिशय प्रसिद्ध अशा मंगला चित्रपटगृहापाशी आलो. दारावरच हाउसफुल्ल चा बोर्ड झळकत होता. काळ्याबाजारात चढ्या भावाने तिकीटे मिळत होती पण ती घ्यायला वडिलांचा सक्त विरोध होता. उलट त्या जास्तीच्या पैशात आपण छानपैकी हॊटेलात नाष्टा करू असे अमिष आम्हाला वडिलांनी दाखविले. मग तीनच्या ऐवजी सहाच्या खेळाची तिकीटे विकत घेण्यात आली आणि पुढच्या तीन तासांसाठी वडिलांनी आम्हाला पुणे फिरवून आणले. त्याकाळी आम्ही निगडीहून पुणे मनपापर्यंत पीएमटी बसने येत असू. तेथून पुढे पुणे शहरात फिरण्यासाठी बसची चैन आम्हाला परवडण्यासारखी नसल्याने शहरांतील पेठांमध्ये सहा - आठ किमी ची आमची भटकंती पायीच ठरलेली असे. आजच्या काळात सामान्य समजला जाणारा तीन आसनी रिक्षा किंवा वातानुकूलित खासगी चारचाकी वाहनांतून प्रवास या बाबी तर आमच्या मेंदुच्या विचारकक्षेच्या पलीकडच्या होत्या.
तेव्हा अशी भरपूर पायपीट केल्यावर एका बर्यापैकी हॊटेलात इडली, डोसा, वडा सांबार इत्यादी हादडून आम्ही पुन्हा सायंकाळी सहाच्या खेळाला चित्रपटगृहात हजर झालो तर तिथे पडद्यावर आमच्या स्वागताला अमिताभ बच्चन, जितेंद्र अशी मोठी कलावंत मंडळी दिसू लागली. हे माननीय चित्रपटात काम करणारे नसून चित्रपट बघण्यासाठी मिळणारा चष्मा वापरण्याच्या सूचना देण्याकरिता आले होते. त्यांच्या सांगण्याचा मुख्य सूर असा होता की चित्रपट ह्या चष्म्यामुळे थ्रीडी (अंगावर आल्यासारखा) दिसणार असला तरी ती केवळ चष्म्याची एकट्याची करामत नसून चित्रपटाच्या निर्मितीत देखील काही खास तंत्र वापरले गेले आहे. तेव्हा हा चष्मा लावून इतर कुठलाही चित्रपट किंवा टीवीवरील कार्यक्रम ३डी दिसू शकणार नाहीत. सबब प्रेक्षकांनी हे चष्मे चित्रपट संपल्यावर चित्रपटगृहात परत करावेत, ढापून (तरी अनेकांनी ते ढापलेच. बाय द वे, चष्म्याला ढापण हा शब्द तेव्हाच प्रचलित झाला की काय? हे बाय द वे नसून बाय द अवे म्हणजे विषयांतर झाले म्हणायचे. असो.) घरी नेऊ नये त्याचा त्यांना काहीच फायदा होणार नाही. साधारण दहा पंधरा मिनीटे हे व्याख्यान ऐकल्यावर एकदाचा चित्रपट सुरू झाला.
एकतर आम्ही जो खेळ पाहायला आलो होतो, त्यानंतरचा खेळ पाहात होतो, शिवाय मधल्या तीन तासात बरीच दमणूक आणि खाणे झाले होते त्यामुळे माझा धाकटा भाऊ दमुन झोपी गेला, तर आईचे डोके प्रचंड दुखू लागल्याने तिचे चित्रपटात मन रमू शकले नाही. मी आणि वडिलांनीच चित्रपट लक्षपुर्वक बघितला (आमच्या दोघांचा ह्या बाबतीतला स्टॆमिना प्रचंडच आहे कारण चित्रपट संपल्यानंतर उशिरा घरी परतल्यावरही आम्ही दोघांनी रात्री ११:३० पर्यंत जागून पुन्हा टीवी देखील बघितल्याचे मला स्पष्ट आठवते). चित्रपटात ३डी दृश्ये केव्हा आहेत ते माझ्या वडिलांना कसे काय कोण जाणे पण अगोदरच समजत होते वाटते कारण ते मला तसे आधी सांगत आणि नंतर मला ती वस्तू (उदा. ज्वाला, खेळण्यातील हेलिकॊप्टर, तरंगणारी दारूची बाटली इत्यादी) अंगावर येताना दिसे. त्यावेळी माझ्या चिकित्सक बुद्धीने मी त्याचे कारण शोधून काढले ते असे की - चित्रपटगृहात लहानांना काळ्या फ्रेमचा तर मोठ्यांना हिरव्या फ्रेमचा असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे देण्यात आले होते. मोठ्यांच्या चष्म्यात बहुधा ३डी दृश्य अगोदर दिसत असावे. पण आता मला कळून चुकलेय की त्यांची चित्रपट बघण्याची कारकीर्द प्रदीर्घ असल्यानेच त्यांना पुढच्या दृश्यांचा अंदाज येत होता. असो, तर चित्रपट मला एकुणच प्रचंड आवडला. चेतन हा त्यातला नायक, त्यातील वाईट पात्रांची जबर फजिती करतो आणि त्यासोबत ३ डी दृश्यांच्या साहाय्याने प्रेक्षकांची पुरेपुर करमणूकही. पण त्यातील काही बाबी खटकल्या देखील. त्यातील पहिली म्हणजे चेतन पुर्ण चित्रपटात धोतर नेसून वावरतो (म्हणजे नुसतेच धोतर, वरती काहीच नाही - पुर्ण उघडाबंब). दुसरे म्हणजे तो एका जादुगाराला घाबरत असतो. चेतनने असे कपडे घालावे आणि मुख्य म्हणजे कुणाला सतत घाबरावे हे काही मला आवडले नाही आणि शिवाय माझ्या त्यावेळच्या आकलनशक्तीच्या मर्यादांमुळे मला हा चित्रपट पुर्णत: समजलाच नाही.
पुढे काही वर्षांतच हा चित्रपट एका दुपारी टीवीवर झळकला तेव्हा शाळेतील माझ्या सहाध्यायींनी वर्गातले तास बुडवून चित्रपटाकरिता शाळेतून घरी पळ काढला. मला मात्र आता पुन्हा चित्रपट पाहण्यात रस नव्हता. कारण हा चित्रपट आमच्या टीवीवर ३डी स्वरूपात दिसणार नव्हता. त्यावेळच्या माझ्या माहितीनुसार असा चित्रपट फक्त निकी-ताशा ह्या राज कपूर यांच्या कन्येने बनविलेल्या टीवीवरच ३डी स्वरूपात दिसू शकणार होता. आम्ही तेव्हा नुकताच वीडीओकॊनचा रंगीत टीवी आठ हजार रूपयांना विकत घेतला होता तर निकी-ताशा ची त्यावेळची किंमत वीस हजार रूपये होती. त्याचप्रमाणे चित्रपट बनल्यावर जर तो काही वर्षांतच टीवीवर दाखवला गेला तर तो एक अयशस्वी चित्रपट समजला जात असे (पण छोटा चेतन बाबत खरी हकीगत [जी मला नंतर कळली] अशी होती की तो सीएफएसआय - चिल्ड्रेन फिल्म सोसायटी ऒफ ईंडियाने विकत घेऊन खास बालदिनाच्या निमित्ताने दूरदर्शनवरून प्रसारित केला होता).
पुढे माझे शिक्षण संपवून मी नोकरीला लागलो. त्यानंतर १९९८ साली पुन्हा एकदा छोटा चेतन चित्रपटगृहात झळकला, पण तेव्हाही हा चित्रपट पुन्हा पाहावा असे मला वाटले नाही. २००७ साली आमच्या घरी बंधूंच्या कृपेने टाटा स्कायची स्थापना झाली आणि विविध वाहिन्यांवर अनेक चित्रपटांचा रतीबच सुरू झाला. अर्थात चित्रपटांसोबत जाहिरातीही आल्याच त्यामुळे एक चित्रपट बघत असताना जाहिराती चालु झाल्या की जरा वेळ आम्ही दुसरा चित्रपट बघु लागलो मग भले तो आधी बघितला असला तरीही (कारण जाहिराती बघायच्या नाहीत असे ठरविले होते). असे करता अचानक एके दिवशी सहजच छोटा चेतनचा काही भाग बघण्यात आला आणि आश्चर्याचा धक्काच बसला. हा चित्रपट ३डी स्वरूपात दिसत नसला म्हणजे चित्र समोर येत नसले तरी देखील ह्या चित्रपटाला अजुनही एक तिसरी मिती आहे ह्याचा मला साक्षात्कार झाला (ती कोणती ते पुढे कळेलच). आता काही केल्या हा चित्रपट पुन्हा पुर्णपणे बघायचाच असे ठरविले आणि नेमका आता तो कुठल्याही वाहिनीवर प्रदर्शित होईनासा झाला.
मग मोठ्या प्रयत्नांनी त्याची डीवीडी मिळविली आणि एकदाचा २००९ साली तो पुन्हा (म्हणजे २५ वर्षानंतर) संपुर्ण बघण्याचा योग आला. यावेळेस थ्रीडी करामती नसतानाही चित्रपटाने पहिल्यापेक्षाही अनेक पटींनी अधिक आनंद दिला. मुख्य म्हणजे माझे वय पंचवीस वर्षांनी वाढले होते त्यामुळे साहजिकच आकलनशक्तीचाही विकास झाला होता. दुसरे असे की, चित्रपटगृहात एखादा संवाद नीट ऐकू आला नाही तर कथा समजायला थोडेसे अवघड होते पण डीवीडी आपल्या नियंत्रणात असल्यामुळे पॊझ / रिवर्सचा योग्य तो वापर करून चित्रपट १०० टक्के बघितला / ऐकला जातो. तर आता या चित्रपटाची तिसरी मिती जी मला जाणवली ती म्हणजे तिची खोली. चित्रपटाच्या ३ डी परिणामांकडेच लक्ष केंद्रित झाल्यामुळे या चित्रपटाच्या उत्कृष्ट कथेची म्हणावी तशी चर्चा कधीच झाली नव्हती. बहुधा या चित्रपटाचा टारगेटेड ऒडियन्स जो आहे त्यांच्या वयाला कळायला अवघड असल्यामुळे आणि इतरांनी त्यात रस न घेतल्यामुळे असे झाले असावे.
चित्रपटाच्या सुरूवातीलाच आपल्याला कळते की एक इमारत चेतनच्या प्रभावाखाली आहे आणि चेतन विषयी आजुबाजूला चांगले बोलले जात नाही. लोकांच्या मते तो एक दुष्टात्मा आहे. परंतू या चित्रपटातील प्रमुख पात्रे असणारी तीन मुले ज्यापैकी एका मुलीचे वडील (दलीप ताहील) पत्नीविरहामुळे एकाकी होऊन व्यसनाधीन झाले आहेत, तेच फक्त या चेतन विषयी चांगले बोलतात. जेव्हा ती मुलगी चेतन कसा असेल असे वडिलांना विचारते तेव्हा ते म्हणतात की तो नक्कीच चांगला असेल मग ते धोतर नेसलेल्या एका लहान मुलाचे चित्र काढून तिला देतात आणि सांगतात की तो असा दिसत असणार.
वर्गातल्या इतर मुलांचा, गुरूजींचा होणारा त्रास, वडिलांचे व्यसन अशा विविध समस्यांनी त्रस्त झालेली ही तीन मुले चेतन चांगल्या स्वभावाचा आणि चित्रातील लहान मुलाप्रमाणे गोड दिसत असेल या कल्पनेवर विश्वास ठेऊन त्याच्या इमारतीत जातात. तिथे त्यांना चेतन दिसत नाहीच तर फक्त त्याचा आवाज (अनंत महादेवन) ऐकू येतो. ती मुले त्याला विचारतात की बाबारे तू कसा दिसतोस? तर तो (चेतन) उत्तरतो की मला कुठलेही ठराविक रूप नाही, माझे काही ठराविक असे वय नाही. आता मुलांना त्याचे बोलणे कळतच नाही. त्यांचे एकच मागणे असते की चेतनने त्यांना मदत करायला हवी आणि मदत करण्यासाठी चेतनला त्यांच्या समोर येणे भाग असते. आता त्याला रूपच नाही तर तो समोर तरी कसा येणार? (इथे मला निर्गूण / निराकार परमेश्वर कल्पनेचा भास झाला आणि चित्रपटाला एक वेगळीच उंची प्राप्त झाल्यासारखे वाटले) मग चेतन जी रुपे (साप इत्यादी) घेऊन मुलांच्या समोर येण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे मुले अधिकच घाबरतात. मग शेवटी चेतन त्यांना विचारतो की मी असे कोणते रूप घेऊ ज्याने तुम्हाला माझी भीती वाटणार नाही? तेव्हा ती छोटी मुलगी वडिलांनी काढलेले चित्र पुढे करते. त्यानंतर एका मोठ्या अंड्यासदृश वस्तूला भेदुन, हवेत कागदाचे कपटे उडवित चित्रपटाचा नायक हा छोटा मुलगा - चेतन अवतीर्ण होतो.
पुढे ह्या चेतन कडे असलेल्या जादुई शक्तींचा वापर करून तो या तीन मुलांना त्रास देणार्या व्यक्तिंचा बंदोबस्त करतो, ज्यात एक श्रीमंत विद्यार्थी, शाळेतले गुरूजी यांचा समावेश आहे. चेतन कॆब्रे, दारू सारख्या लोकांना बिघडविणार्या गोष्टींचेही उच्चाटन करतो. अर्थात, त्याला स्वत:लाच दारू पिण्याचे प्रचंड व्यसन असते पण आपल्या छोट्या मैत्रिणीला ते आवडत नाही हे पाहून तो दारूचा ’त्याग’ करतो.
मुलांच्या जीवनात आनंद निर्माण करणार्या या चेतन ची एक वेगळीच समस्या असते. एका दुष्ट जादुगाराला चेतनच्या कडे असणारे शक्तीच्या मदतीने दुष्कृत्ये करायची असतात. त्यामुळे चेतन या जादुगारापासून लांब पळत असतो. खरे तर चेतन या जादुगाराला सहज ठार करू शकत असतो पण तो तसे करीत नाही कारण जादुगाराने एक असे वरदान मिळविलेले असते की ज्यायोगे चेतनने जर जादुगाराला ठार मारले तर स्वत: चेतन देखील त्यानंतर संपून जाईल. त्यामुळे जादुगार चेतनला स्वत:ला मारण्याचे खुले आव्हान देत असतो आणि चेतन त्याच्यापुढे हतबल ठरत असतो.
जादुगाराला चेतनची या तीन मुलांसोबत असलेली जवळीक समजते. तिचा फायदा करून घेण्याच्या उद्देशाने जादुगार त्यातील लहान मुलीला ओलीस ठेवतो आणि त्या बदल्यात चेतनला स्वत:च्या स्वाधीन होण्यास सांगतो. आता चेतनपुढे स्वत:चा जीव वाचविण्याकरिता दोनच पर्याय असतात - एकतर जादुगाराचे ऐकून स्वत:ला त्याच्या स्वाधीन करणे, किंवा मग त्या छोट्या मुलीला जादुगाराच्या ताब्यात तसेच सोडून स्वत: सुखरूप निघून जाणे; परंतू आपल्या छोट्या मैत्रिणीचा जीव वाचविण्याकरिता तो जादुगाराला ठार मारण्याचा तिसरा पर्याय स्वीकारतो, ज्याची किंमत त्याला स्वत:चा अवतार संपवून चुकती करावी लागते.
अशा प्रकारे हा चित्रपट मानव व अमानवी शक्तीच्या एका अनोख्या मैत्रीची आणि मैत्रीखातर केलेल्या परमोच्च बलिदानाची कथा प्रेक्षकांपुढे सादर करतो. १९८४ साली ज्यांनी ही शोकांतिका बनविली त्यांनीच पुढे १४ वर्षांनी या चित्रपटाचीच शोकांतिका करून टाकली. खरे तर आपल्या चित्रपटात वापरलेल्या ३डी तंत्रापेक्षाही त्याची दर्जेदार कथा हेच त्याचे मोठे बलस्थान आहे हे त्यांना कळायला हवे होते. पण ते त्यांना कळले नाही की प्रेक्षकांच्या अभिरूची विषयी त्यांना तितकासा विश्वास वाटला नाही कोण जाणे? कारण १९८४ मध्ये जो चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला तो १९९८ मध्ये प्रेक्षकांसमोर आणताना त्यावर उर्मिला मातोंडकरचे कलम केले. उर्मिला त्याकाळी रंगीला आदी चित्रपटांमुळे मोठ्या प्रमाणावर चर्चेत होती. तिच्या प्रतिमेचा चित्रपटाच्या यशाकरिता वापर करण्याकरिता मूळ चित्रपटात नसलेली एक भूमिका कोंबून त्यात बळेच उर्मिलाला सादर करण्यात आले. तिच्याकरिता इतके फूटेज खर्चण्यात आले की त्यामुळे चेतनचे चित्रपटातील स्थान दुय्यम झाले. १९९८ सालच्या पोस्टर्सवर देखील उर्मिलाची छबी मोठ्या आकारात तर चेतन आणि त्याचे मित्र कोपर्यात कुठेतरी लहानशा जागेत दाखविण्यात आले.
अनेकदा जुनी चांगली गाणी रिमिक्स स्वरूपात विडंबन होऊन आपल्या समोर येतात तर कधी डॊनचे शाहरूखने केलेले विडंबन, वर्मांची आग किंवा हिमेशने कर्जचे केलेले विडंबन पाहण्याचे दुर्दैव प्रेक्षकांच्या वाट्याला येते. पण निर्मात्यांनी स्वत:च्याच निर्मितीचे असे वाटोळे केलेली शोकांतिका निदान मला तरी फार दुखवून गेली.
मस्त लिहिलंय.. मूळ चित्रपटात
मस्त लिहिलंय..
मूळ चित्रपटात नसलेली एक भूमिका कोंबून त्यात बळेच उर्मिलाला सादर करण्यात आले..+१
मस्त लिहिलाय लेख. १९८४ सालचा
मस्त लिहिलाय लेख. १९८४ सालचा आठवतोय, परत आलेला आठवत नाही.
(कृपया, चित्रपटविषयक लेखात त्या चित्रपटाचे नाव निदान कंसात तरी लिहावे.)
मी तर उर्मिलावालाच पाहिलाय.
मी तर उर्मिलावालाच पाहिलाय. आणि त्यालाच वरिजनल समजत होते.
नविन "छोटा चेतन" बघितला नाही
नविन "छोटा चेतन" बघितला नाही हे भाग्य म्हणायचे.
छान लिहिले आहे.
चेतन मस्त लिहिलय, अर्थात मी
चेतन मस्त लिहिलय,
अर्थात मी कोणताच पाहिला नाहीये पण लेखावरून कल्पना आली.
छान लेख नविन "छोटा चेतन"
छान लेख
नविन "छोटा चेतन" बघितला नाही हे भाग्य म्हणायचे.>> +१००
मी मूळ सिनेमा पाहिलेला नाही.
मी मूळ सिनेमा पाहिलेला नाही. पण इथे जे काही कथानक दिले आहे, त्यात असे काही नाविन्य / वेगळेपणा जाणवला नाही, बच्चे कंपनीच्या चित्रपटांची स्टोरी साधारण अशीच तर असते !
कदाचित सादरीकरण आणि अभिनय चांगला असेल.
असो.
लेख चांगला आहे.
कृपया, चित्रपटविषयक लेखात
कृपया, चित्रपटविषयक लेखात त्या चित्रपटाचे नाव निदान कंसात तरी लिहावे.)...+१
मी हा चित्रपट अजूनही पाहिलेला
मी हा चित्रपट अजूनही पाहिलेला नाहीये, हे ह्या लेखामुळे लक्षात आले !!
धन्यवाद !
मी आजच युट्युबवर हा पिच्चर
मी आजच युट्युबवर हा पिच्चर पाहीला. अगदी बालिश स्टोरी, यथातथा अभिनय अन शेंडाबुडखा नसलेली उर्मिला मातोंडतकरची व्यक्तिरेखा. वेळ फुकट गेला.