डॉ. शिरीष प्रयाग - तेंडुलकरांचे अखेरचे दिवस

Submitted by चिनूक्स on 26 May, 2009 - 14:11

"'तें' दिवस" या श्री. विजय तेंडुलकरांच्या अखेरच्या पुस्तकाचं प्रकाशन १९ मे रोजी डॉ. शिरीष प्रयाग यांच्या हस्ते पुण्यात झालं. 'मायस्थेनिया ग्रेव्हीस' या आजारानं जर्जर झालेले तेंडुलकर त्यांच्या अखेरच्या दिवसांत डॉ. प्रयाग यांच्या रुग्णालयात होते. जीवघेण्या आजाराची ती काही वर्षं तेंडुलकरांच्या जोडीनं डॉ. प्रयागांनीही अनुभवली. तेंडुलकरांचे अखेरचे दिवस सुखकर करण्याचे अथक प्रयत्न डॉ. प्रयाग यांनी केले. हे अखेरचे दिवस व त्या दिवसांतील तेंडुलकर कसे होते, याविषयी डॉ. प्रयाग तेंडुलकरांच्या प्रथम स्मृतिदिनी बोलले.

पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी डॉ. प्रयाग यांनी केलेलं हे भाषण..

------------------------------------------------------------------------------------

नमस्कार.

आज या सभागृहात साहित्य, नाट्य, चित्रपट, पत्रकारिता या क्षेत्रांतील इतकी दिग्गज मंडळी उपस्थित आहेत, आणि या सर्वांसमोर तेंडुलकरांबद्दल मला बोलायला सांगणं हा माझा सन्मानच आहे, असं मी समजतो आणि त्याबद्दल मी श्री. दिलीप माजगावकर, श्री. अशोक कुलकर्णी व इतर आयोजकांचे प्रथम आभार मानतो.

सोनाली मघाशी म्हणाली तसं तेंडुलकर आज असते आणि त्यांना जर सांगितलं असतं की भारतीय साहित्याच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या, लीजंड असलेल्या लेखकाच्या शेवटच्या पुस्तकाचं प्रकाशन त्याच्या शेवटच्या आजारात त्याच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरच्या हातून होत आहे, तर तेंडुलकर काय म्हणाले असते, कसे हसले असते, त्यांची प्रतिक्रिया काय असती, असा विचार माझ्या मनात जरूर आला. पण मी पाहिलेले तेंडुलकर फार वेगळे होते. वेगळे म्हणजे इतरांनी पाहिले तसेच होते, पण एका वेगळ्या अवस्थेत मी त्यांना पाहिलं होतं.

आता निश्चित तारीख आठवत नाही पण दोन-तीन वर्षांपूर्वी तेंडुलकर उपचारांसाठी माझ्याकडे आले. त्यापूर्वी खूप आधी, म्हणजे वीसेक वर्षांपूर्वी ते माझ्याकडे एकदा आले होते. काही अगदी मामुली medical problems होते, आणि मी त्यांवर उपचारही केले होते. पण आताचा हा जो प्रवास आहे, तो दोन-तीन वर्षांपूर्वी सुरू झाला. तेंडुलकर पुण्यात आले होते आणि अशोक कुलकर्णी त्यांना माझ्याकडे घेऊन आले. अशोक कुलकर्णींकडेच ते उतरले होते. Diabetes, High Blood Pressure वगैरे आजकालच्या काळातले सार्वजनिक साथीदार होतेच त्यांच्याबरोबर, पण इतरही काही त्रास चालू झाले होते. दम लागणे, थकवा जाणवणे, सकाळी लिहायला बसल्यावर झोप लागणे, गिळायला त्रास होणे अशी विचित्र लक्षणं होती आणि त्यांचं निदान होत नव्हतं म्हणून त्यांना माझ्याकडे आणलं होतं. बराच काळ त्यांच्याशी चर्चा करून, अनेक तपासण्या करून मी निदान केलं की हा 'मायस्थेनिया ग्रेव्हीस'चा प्रकार आहे. खात्री करून घेण्यासाठी बाँबे हॉस्पिटलला डॉ. सिंघल म्हणून प्रसिद्ध न्युरॉलॉजिस्ट आहेत, त्यांच्याकडे पाठवलं. त्यांनी काही चाचण्या केल्या आणि त्या चाचण्यांवरून नक्की झालं की, हा 'मायस्थेनिया ग्रेव्हीस'चाच प्रकार आहे. यामुळे ते अगोदरच घेत असलेल्या औषधांमध्ये अजूनच भर पडली. पण असं असूनसुद्धा मुंबईला त्यांचं लेखन सुरूच होतं. "'तें' दिवस" या पुस्तकातील सारं लेखन त्यांच्या या 'मायस्थेनिया ग्रेव्हीस'च्या काळात घडलेलं आहे.

हे लेखन वगैरे चालू असलं तरी आता शरीर पूर्वीप्रमाणे साथ देत नाही, याची त्यांना जाणीव होती. आणि म्हणून मधूनमधून त्यांना नैराश्य यायचं. ते जेव्हा मुंबईहून पुण्याला त्यांची तब्येत दाखवायला माझ्याकडे येत असत, तो माझा दिवस खूप छान जायचा. तपासणी झाली की खूप गप्पा होत. त्यांना अशी अपॉइंटमेंट दिलेली असे की जेणेकरून पुढचे दोन तास मोकळे राहतील. सकाळी खूप लवकर किंवा रात्री उशीरा, अशी वेळ मी त्यांना द्यायचो. त्यामुळे खूप गप्पा व्हायच्या. तेंडुलकरांच्या स्वभावातील अनेक पैलूंशी या काळात माझी ओळख झाली. दवाखान्यात जर गप्पा झाल्या नाहीत, आणि तेंडुलकर राहणार असतील तर रात्री मी आणि माझी पत्नी, आरती, अशोकच्या घरी जायचो. तिथेही भरपूर गप्पा होत. विषय अनेक असायचे. राजकारण, सिनेमा, क्रिकेट हे नेहमीचे यशस्वी कलाकार तर होतेच, पण 'वाढतं commercialism', 'ढासळती नैतिकमूल्ये' असे विषय त्यांच्या बोलण्यात यायचे आणि त्यांचा सूर हा नकारात्मकतेकडे झुकणारा असायचा. या विषयांवर बोलताना ते निराश झाल्यासारखे वाटत.

हळूहळू त्यांचा 'मायस्थेनिया'चा त्रास वाढू लागला आणि त्यामुळे त्यांची औषधंही वाढली. त्यातच ते अमेरिकेला गेले. त्यांना एक पाठ्यवृत्ती मिळाली होती आणि ती commitment पूर्ण करण्यासाठी ते न्यू जर्सीला गेले. तिथे त्यांना खोकल्याचा त्रास सुरू झाला. दम लागू लागला. ते अमेरिकेला जाण्यापूर्वी सर्व जय्यत तयारी केली होती. औषधं बरोबर दिली होती. माझा एक जवळचा मित्र, डॉ. श्याम मुळगावकर तिथे न्यू जर्सीला असतो. त्याला कळवून ठेवलं होतं. त्रास व्हायला लागल्यावर तेंडुलकरांनी श्यामशी संपर्क साधला. श्यामने त्यांना काही औषधं पाठवली. मात्र त्यांचा काही उपयोग होत नाही असं लक्षात आल्यावर त्यांना तिथल्या एका रुग्णालयातील ICUमध्ये दाखल व्हावं लागलं. तिथे त्यांची प्रकृती सुधारली आणि काही दिवसांत ते मुंबईला परतले. आता त्यांच्याच लक्षात आलं होतं की, 'मायस्थेनिया'चा त्रास वाढतोच आहे, आणि शरीर पूर्वीसारखं साथ देत नाही. आणि त्यामुळे त्यांचं depression वाढीस लागलं होतं.

१९८१ सालापासून मी ICUमध्ये काम करतोय. रुग्णाची मानसिक स्थिती आणि आजार यांच्या संबंधाखेरीज अजून असे काही अनुभव येतात, की ज्यांच्याबद्दल शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण देता येत नाही. असे अनुभव आले की, वैद्यकीय शास्त्राने इतकी प्रगती करूनही अजून बराच पल्ला गाठायचा आहे, याची जाणीव होते. या अनुभवांपैकी एक म्हणजे रुग्णाला होणारे intuition. रुग्णाला अनेकदा काही गोष्टी 'जाणवतात', आणि त्याचं आम्हांला स्पष्टीकरण देता येत नाही. अनेकदा आम्हांला असा अनुभव येतो की रुग्ण बरा होत असतो. आमचं जे prognosis असतं, त्यानुसार हा रुग्ण खडखडीत बरा होणार याची आम्हांला खात्रीच असते. पण त्या रुग्णाच्या मनात मात्र असतं की, 'या दुखण्यातून मी बरा होणार नाही. या औषधांचा काही उपयोग नाही.' आम्ही त्या रुग्णाला समजावतोही. मात्र अचानक अशी काही घटना घडते की, त्या रुग्णाच्या जे मनात असतं ते खरं होतं. त्यामुळे रुग्णाने असे काही intuition बोलून दाखवल्यास मी सावध होतो. औषधोपचार, शस्त्रक्रिया करताना अधिक काही सावधगिरीचे उपाय योजता येतील का, याचा विचार करतो. अगदीच अनपेक्षित काही घडलं तर काय करता येईल, याची चाचपणी करतो.

तेंडुलकरांचंही काहीसं असंच झालं की काय, अशी मला कधीतरी भीती वाटते. मला असं का वाटतं, ते सांगतो. एकदा ते नेहमीसारखे मुंबईहून आले. अशोक त्यांना घेऊन आला होता. मी त्यांना तपासलं. तपासणी झाल्यावर मला म्हणाले, "मी आज तुझ्यासाठी एक गाणं म्हणणार आहे." मी दचकलो. तेंडुलकर गाणं म्हणणार? मी सभेत तेंडुलकरांबद्दल बोलण्याइतकीच गंभीर गोष्ट ही. तर तेंडुलकरांनी भा. रा. तांब्यांची 'मधुमागसी माझ्या सख्यापरी' ही कविता गायली. हा अनुभव जितका रोमांचकारी होता तितकाच मला काळजीत टाकणारा होता. काळजी अशाची होती की, या संध्याछाया त्यांना खरोखरच जाणवू लागल्या होत्या का? आणि तसं असेल तर, 'मायस्थेनिया'साठी जे औषधोपचार सुरू आहेत, prognosisनुसार ते या आजारातून बाहेर येतील असं वाटतं आहे, ते खरोखरीच शक्य आहे का? आणि जरी आपण म्हटलं की ऐंशीव्या वर्षी एखाद्याला या संध्याछाया जाणवू शकतात, एवढी दुखणी आहेत तर नैराश्य येऊ शकतं, तरी तेंडुलकरांच्या बाबतीत असं होऊ शकेल, हे मानायला माझं मन त्यावेळी तयार नव्हतं.

ऑक्टोबर २००७मध्ये European Society of Intensive Care Medicineचं बर्लिन इथे अधिवेशन होतं. त्यांनी मला ICUमध्ये आलेल्या मलेरियाच्या रुग्णांचे प्रश्न काय असतात, यासंबंधी बोलण्यासाठी बर्लिनला निमंत्रित केलं होतं. मी तेंडुलकरांना सांगितलं की, मला अधिवेशनासाठी बर्लिनला जायचं आहे, आणि आपण अमुक अमुक औषध सुरू ठेवू. त्यांना त्याचं फार कौतुक वाटलं. त्यांनी मला त्याबाबत अनेक messages पाठवले. सोनालीने मघाशी जसं सांगितलं की, तेंडुलकरांनी तिला पाठवलेले सर्व messages तिच्या फोनमध्ये साठवून ठेवले आहेत, तसंच या माझ्या फोनमध्ये तेंडुलकरांचे सर्व messages अजून आहेत. तर त्यात त्यांनी मला लिहिलं होतं की, 'मला तुझं फार कौतुक वाटतंय. तू बर्लिनला जाऊन पेपर वाचून ये, आणि आल्यावर मला सगळं समजावून सांग. युरोपियनांना मलेरियाबद्दल काय वाटलं, हेही मला समजावून सांग.' मी बर्लिनला गेल्यावरही त्यांचे दोन-तीन messages आले, आणि एक दिवस अचानक अशोकचा फोन आला की, तेंडुलकर मुंबईला जरा जास्तच आजारी झाले आहेत. त्यांना पूर्वीचाच त्रास होत होता. दम लागणे, खोकला येणे इत्यादी. मी अशोकला म्हटलं की, "त्यांना ताबडतोब हॉस्पिटलात हलवायला हवं. तू त्यांच्याशी बोल आणि ठरव. मुंबईत त्यांना हव्या त्या रुग्णालयात नेलं तरी चालेल, पण this is the time when he should be in the hospital." हा निरोप गेल्यानंतर अशोक तेंडुलकरांशी बोलला आणि त्यांना पुण्याला आणायचं ठरलं. अ‍ॅम्ब्युलन्समधून त्यांना पुण्यात आणलं आणि माझ्या अनुपस्थितीत माझ्या रुग्णालयात, ICUमध्ये दाखल केलं गेलं.

तर तेंडुलकरांच्या शेवटच्या आजाराचा प्रवास हा असा त्या २००७ सालच्या ऑक्टोबरात सुरू झाला, आणि २००८च्या मे महिन्यात संपला. खूप त्रास झाला त्यांना या काळात. ऑक्टोबर ते डिसेंबर २००७ या तीन महिन्यांच्या काळात निम्मेअधिक दिवस ते कृत्रिम श्वसनयंत्रणेवर होते. त्यातून बरे होऊन, स्वतः जिना उतरून ते घरी गेले तेव्हा आम्हांला वाटलं की, 'व्वा..फारच छान.. अजून अशीच प्रगती राहिली तर पूर्ण बरे होतील.' पण त्यांच्या आजाराने पुन्हा डोकं वर काढलं.

'मायस्थेनिया ग्रेव्हीस'च्या आजारात आपले सर्व स्नायू शिथील होत जातात. त्यांची शक्ती हळूहळू कमी होत जाते. म्हणजे काय? तर आपल्याला हाताच्या पंजात एखादी वस्तू दाबून धरायला सांगितली तर आपण ती बराच काळ तशी धरून ठेवून शकतो. 'मायस्थेनिया' या आजारात वस्तू अशी धरून ठेवता येत नाही कारण स्नायू थकायला लागलेले असतात. तेंडुलकरांच्या बाबतीत असं झालं की, गिळण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी जे स्नायू आवश्यक असतात, तेच थकले होते. त्यामुळे त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवायला लागलं होतं. गिळण्यासाठीचे स्नायू शिथील झाल्याने गिळण्याचा प्रयत्न केल्यास अन्नकण श्वासनलिकेत जायचे. त्यामुळे अधिकच दम लागायचा, खोकला यायचा. असा सगळा अतिशय वेदनादायी प्रकार होता तो. त्यामुळे श्वासनलिकेचं संरक्षण करण्यासाठी आम्ही त्यांच्या स्वरयंत्राच्या खाली tracheostomyची नळी घातली होती. आणि ती स्वरयंत्राच्या खाली असल्यामुळे स्वरयंत्राला बायपास केलं गेलेलं होतं आणि त्यामुळे तेंडुलकर बोलू शकत नव्हते. बोलू न शकण्याचा हा काळ त्यांच्या दृष्टीने सर्वांत कठीण काळ होता.

अशा आजारांमध्ये औषधोपचार लागू होऊन स्नायूंची कार्यक्षमता वाढायला बर्‍यापैकी वेळ लागतो. त्यासाठी जी अतिशय strong अशी injections असतात, ती त्यांना दोनदा देऊन झाली होती. पण त्यांचा काही विशेष उपयोग झाला नव्हता. Tracheostomyची नळी काढून त्यांचे गिळण्याचे स्नायू पूर्ववत झाले आहेत का, हे बघण्याचा आम्ही दोनदा प्रयत्न केला होता. पण ते स्नायू अजूनही अशक्तच होते. त्यामुळे इतर रुग्णांना बरं व्हायला लागतो त्यापेक्षा फार अधिक वेळ तेंडुलकरांना लागेल, असं आमच्या लक्षात आलं होतं. त्यांचं वयही जास्त होतं. आणि तेव्हापासून तेंडुलकरांची मौनाशी लढाई सुरू झाली.

ही लढाई लढण्यासाठी त्यांनी आपल्या मनाची तयारी केली होती. ही नळी का घातली आहे, ती किती दिवस ठेवावी लागेल वगैरे त्यांनी अतिशय rationally समजावून घेतलं होतं. हा सर्व त्रास सहन करण्याचं त्यांनी कबूल केलं. तसं लिहून दिलं. परंतु त्यांच्यातले 'तेंडुलकर' अधूनमधून जागे होत. आणि उपचारांविरुद्ध बंड पुकारत. हे सारं त्यांच्या communicationsमधून बाहेर यायचं. अजिबातच बोलता येत नसल्याने हावभाव करणे, किंवा लिहून काढणे एवढेच दोन मार्ग communicationचे होते. आणि म्हणून त्यांनी त्या काळात काही अतिशय संस्मरणीय असं लेखन केलं आहे. हे नेहमीचं, conventional असं लेखन नाही. तिथे त्यावेळी हजर असलेल्या व्यक्तींशी साधलेला तो संवाद आहे. अतिशय phenomenal असं ते लेखन आहे, आणि त्यातून तेंडुलकरांच्या स्वभावातील अनेक पैलू बाहेर येतात.

या संवादात्मक लेखनात त्यांच्या त्या वेळच्या moodच्या छटा दिसायच्या. आणि बर्‍याच वेळा असं दिसायचं की या आजाराशी लढताना ते निराश झाले आहेत. त्या निराशेने भरलेली अनेक वाक्यं मग ते लिहीत. 'जायचं तर वरच, नाहीतर इथेच. पण आता हे बास्स झालं', हे वाक्य वारंवार यायचं. पण हाच विचार अत्यंत साहित्यिक पद्धतीनेही मांडला जायचा. ते म्हणायचे, 'ऐंशीव्या वर्षी एका घारीच्या चोचीतून निसटायचं ते दुसर्‍या घारीच्या चोचीत जाण्यासाठी. वेगळं काय होणार?' मध्येच rationality डोकं वर काढायची. मग म्हणायचे, 'crisis शारीरिक नाही. Have I not lived long enough? मग आता बास्स.' पण या सार्‍या निराशेच्या मागे सतत दिसून येई ती त्यांची प्रखर बुद्धिमत्ता, पूर्णपणे जागृत असलेली objectivity आणि rational thinking. कृत्रिम श्वसनयंत्रणेवर असूनही तेंडुलकरांच्या लेखनात या गोष्टी सतत दिसून येत. एकदा त्यांनी लिहिलं, 'After eighty years, why should I be so immature, so anxious and so impatient? Why should I lose my maturity so fast? Isn't this a tussle between two 'I's?' मग त्यांना या विचारांतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. आज माजगावकरांच्या प्रयत्नांमुळे जे पुस्तक प्रकाशित होतं आहे, त्यावर अखेरचा हात फिरवण्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रोतिमा बेदींवर त्यांनी एक लेख लिहिला. दुर्दैवानं संगणकावर तो लेख लिहिताना शेवटची पाच पानं गुप्त झाली आणि त्यामुळे ते खूप चिडले होते.

नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अनेक तरुण, प्रतिभावान कलाकार, दिग्दर्शक त्यांचे मित्र होते. अतिशय बुद्धिमान अशी ही तरुण मंडळी त्यांच्याबरोबर सतत असत. नवीन चित्रपट, नाटकं, त्यांतील त्यांचं काम, या गोष्टींची चर्चा चाले. रोज वर्तमानपत्रं वाचली जात. त्यांतील निरनिराळ्या बातम्यांवर सखोल चर्चा होई. हे सर्व लेखी अर्थातच. 'तुला काय वाटतं, मायावतीचं काय होईल?' असे प्रश्न ते लिहून विचारत. एकदा मी त्यांना विचारलं की, "तुमच्याभोवती हे सर्व तरूण कलावंत असतात. असं का? कुठल्याच रुग्णाभोवती मला एवढी तरूण गर्दी दिसत नाही." तर ते मला म्हणाले की, "तुझ्या ICUमध्ये जिकडे बघावं तिकडे आजारी आणि म्हातारी माणसं आहेत. सगळं कहर आहे ते.. म्हणून या तरुणांनाच मला भेटावंसं वाटतं." म्हणजे या आजारातून बाहेर पडण्याची त्यांची उमेद शाबूत होती. आणि हाच विरोधाभास होता. एकीकडे पराकोटीच्या नैराश्याने भरलेली वाक्यं तर दुसरीकडे ही जगण्याची उमेद. तेंडुलकर आपल्याला कळताहेत असं वाटेपर्यंत त्यांचा mood बदललेला असे, आणि मी धाडकन जमिनीवर येई. तेंडुलकर नक्की कसे आहेत, हे समजण्याइतकी आपली पात्रता नाही, असं मग मी स्वतःला बजावत असे. मी एकदा त्यांना विचारलं की, "तुम्ही तुमचे moods असे सारखे का बदलता?" तर त्यांनी लिहून दिलं, "अरे, moods आपले नसतात. ते घाटातल्या ढगांसारखे असतात. त्यांच्या नियमांनी येतात आणि त्यांच्या नियमांनीच जातात." त्याच काळात त्यांची झोपेची तक्रार सुरू झाली. मी त्यांना एकदा 'काल नीट झोपलात का?', असं विचारलं. तर त्यांनी लिहिलं, "सती गेल्यासारखा मी स्वतःला झोपेच्या आधीन करतो." अशी अनेक साधी, सोपी पण कुठेतरी आत जाऊन भिडणारी वाक्यं ते लिहीत. तेंडुलकरांच्या एरवीच्या लिखाणात असतात तशीच हीही वाक्यं होती. पण त्यांच्या साध्या संभाषणात, कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ICUमध्ये असताना ही वाक्यं येत, आणि आम्ही थक्क होत असू.

त्यांच्या या लिखित संभाषणात क्रिकेट, राजकारण हे विषय तर असायचेच. 'टिव्हीवर पाकिस्तानची काय भिक्कारडी बॉलिंग सुरू आहे. दहा हजार रन केल्याशिवाय आपला बॅट्समन परतच यायला नको', अशा कॉमेंट्स सुरू असायच्या. मी एकदा अहमदाबादला गेलो होतो. ICUशी संबंधित एका विषयावर भाषण देण्यासाठी. परत आल्यावर त्यांनी विचारलं, "माझा मित्र नरेंद्र मोदी तुला भेटला का?" मी म्हटलं, "नाही. मी जरा वेगळ्या भागात गेलो होतो. पण तुमची इच्छा असेल तर त्यांना त्या भागात आणूया आपण." एकदा ते उठून उभे राहिले आणि म्हणाले, "बघ, मी आत्ता ऐंशी वर्षांच्या नरेंद्र मोदीसारखा दिसतो. आमची दाढी सारखीच आहे." मध्येच कधीतरी माझ्यावर खूप चिडायचे. सोनाली, अमृताला माहिती आहे हे. कोणी भेटायला आलं की लिहून द्यायचे, 'हा हरामखोर मला कधीही घरी पाठवणार नाही.'

त्यांनी एकदा लिहिलं, 'जगणं जसं आहे, ते नाकारणं हे एक स्वप्नरंजन आहे. आणि जगण्यात आपल्यासाठी जागा करून जगणं हे मात्र वास्तव आहे.' वस्तुस्थितीचा इतकं अचूक भान ऐंशीव्या वर्षी या माणसाला कसं, हा प्रश्न असं काही वाचलं की मला पडायचा. त्यांची सहनशक्ती दांडगी होती. तसाच त्यांचा आजारही खूप strong होता. त्यामुळे कधी ते बरे होत, श्वसनाचं यंत्र काढलं जाई. तर कधी तो आजार खूप बळावत असे. पण अशा आजारातही कधीकधी त्यांची विनोदबुद्धी जागृत होई. तोंडात लाळ यायला लागल्यावर 'लाळ घेता का लाळ' अशा कविता लिहून दाखवायचे. कधी स्वतःची व्यंगचित्रं काढायचे. त्यात गळ्यात नळी, नाकात नळी, कानाभोवती नळी असं काढलेलं असायचं. मग मला खूण करून 'ही नळी काढ, ती नळी काढ', असं सांगायचे.

औषधांमुळे त्यांना बद्धकोष्ठाचा त्रास सुरू झाला. वयामुळे होणारा त्रास होताच. एनिमाची गरज निर्माण झाली. मग हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला एनिमाशी मैत्री करणं आवश्यक आहे. त्यांनी लिहून दाखवलं, 'तुझी खूप आठवण येते.. एकदम एक शब्द आठवत नाही.. खूप डोकं खाजवलं, आणि आठवलं.. ए.. निमा !!!' या त्यांच्या अशा संभाषणाच्या जोरावरच आम्ही ते दिवस काढत होतो. हे असं सारं चालू असताना स्वतःचा बडेजाव, डामडौल, आक्रस्ताळेपणा हा कधीही नव्हता. कारण ते तेंडुलकरांच्या पिंडातच नव्हतं. '६ नंबरच्या खोलीत असलेला विजय नावाचा मायस्थेनियाचा रुग्ण' यापलीकडे तिथे आपली वेगळी आयडेंटिटी असावी यासाठी त्यांनी अजिबात प्रयत्न केले नाहीत. अर्थात त्यांची मित्रमंडळी आणि कुटुंबीय यांचाही त्यात वाटा आहेच. पण वेगळे काही हट्ट करावे, असं त्यांना कधीही वाटलं नाही.

हळूहळू ते सुधारले. बाहेर वेटिंग रूममध्ये जाऊन बसायचे. रस्त्यावरची गंमत बघायचे. व्हरांड्यात हिंडायचे. एकदा तर जिनाही चाढले, उतरले. मग एक प्रसंग असा आला की, निलेश कुलकर्णी, म्हणजे अशोकचा मुलगा, याच्या लग्नाचा स्वागत समारंभ होता. तेंडुलकर बरेच दिवस त्यांच्या खोलीत कोंडल्यासारखे झाले होते. रुग्णालयाच्या बाहेर पडले नव्हते. त्यांचा त्या बंदिस्त वातावरणात जीव गुदमरतो, हे तर दिसतच होतं. त्यांना अधूनमधून येणार्‍या नैराश्याचा इलाज हा मानसोपचारत्ज्ज्ञ किंवा गोळ्या हा नसून मोकळं आयुष्य हा आहे, हे माझं ठाम मत होतं. त्यामुळे इतरांच्या विरोधाला न जुमानता मी ठरवलं की त्यांना त्या समारंभाला घेऊन जायचं. खरं तर यात धोका होता, पण मी तो घेतला. त्यांच्या घशात, नाकात अजूनही नळ्या होत्या. त्यामुळे आवश्यक ती आयुधं, औषधं, डॉक्टर्स, अ‍ॅम्ब्युलन्स असं सगळं आम्ही बरोबर घेतलं होतं. तेंडुलकरांनीही खूप छान साथ दिली. अतिशय उत्साहात होते ते. जाण्यापूर्वी पापियाँमधून ब्युटिशिअन आणून त्यांनी दाढी, कटिंगही करून घेतली. खूप छान वेळ गेला त्यांचा त्या समारंभात. तेंडुलकर बरे होऊन घरी जाणार, याची मग मला खात्रीच पटली.

डिसेंबरच्या अखेरीस त्यांची tracheostomyची नळी काढली. ते बोलायला लागले. त्यांना व्यवस्थित खाता येऊ लागलं आणि ते घरी गेले. त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली त्या दिवशी सोनाली, अमृता, अमोल पालेकर यांनी रुग्णालयातील सर्वांसाठी एक कार्यक्रम केला होता. त्यावेळी मी तेंडुलकरांना विनंती केली होती की त्यांनी ICUमधील त्यांच्या अनुभवांवर लिहावं. परदेशात ICUमध्ये आलेले विविध अनुभव यांवर बरंच लिखाण झालं आहे. मात्र आपल्याकडील रुग्णांनी असं काहीच लिहिलेलं नाही. तेव्हा तेंडुलकरांनी ते लिहावं, अशी माझी इच्छा होती.

त्यानंतर तेंडुलकर काही काळ पुण्यात राहिले. जानेवारी - फेब्रुवारी २००८ हा त्यांचा आजारपणातील सर्वांत चांगला काळ असावा. ते हिंडूफिरू लागले होते. ताकद वाढली होती. पुस्तकावर परत काम सुरु केलं होतं. या काळात त्यांनी जे ईमेल, messages लिहिले ते त्यांच्यात सुधारणा होत आहे, हे सांगत होते. एक ईमेल मला त्यांनी लिहिला होता, 'Just to have an assurance that you are there.' खाली 'तें' अशी सही होती. नंतर काही दिवसांनी एक ईमेल आला. मी आणि आरती तेव्हा आमच्या मुलीकडे अमेरिकेला गेलो होतो. 'My dear Shirish, This is just to say that my mind is most of the times with you and I see you enjoying your vacation away from the daily responsibilities of the hospital. You have a partner who knows the joys of living and how to pursue them. Everything is fine here. Love, Baba'

तब्येत अजून थोडी सुधारल्यावर तेंडुलकर मुंबईला गेले. मात्र काही दिवसांतच आजाराने परत उचल खाल्ली. काही औषधांचे side effects झाले. अशक्तपणा परत वाढला. वयोमानामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झालीच होती. आणि मग बर्‍याच विचारांती त्यांनी सगळे औषधोपचार बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अतिशय धाडसी होता. पण तो नैराश्याच्या भरात घेतलेला नसून अतिशय विचारपूर्वक व संयमाने घेतला होता. तेंडुलकर कधीच कुठल्याही ठरलेल्या वाटेवरून गेले नाहीत. आताही त्यांची वाट त्यांनीच शोधली.

तेंडुलकर सुरुवातीला जेव्हा फक्त तपासणीसाठी मुंबईहून माझ्याकडे यायचे, तेव्हा त्यांना आयुष्याच्या अखेरच्या क्षणांबद्दल खूप कुतूहल होतं. कधीतरी मला ते कुतूहल morbid वाटे. वाटायचं, हे सारखं त्याच विषयावर का बोलताहेत? या अखेरच्या क्षणांबद्दल, ज्याला आम्ही वैद्यकीय भाषेत end of life म्हणतो, ICU तज्ज्ञांमध्ये गेली काही वर्षं बरीच चर्चा सुरू आहे. चर्चा कशाबद्दल? तर, रुग्णांनी आपल्या अखेरच्या क्षणांबद्दलचे वैद्यकीय निर्णय स्वतःच घ्यावेत का? त्यात त्यांची शारीरिक व मानसिक स्थिती कितपत महत्त्वाची आहे? त्यांच्या नातेवाईकांची भूमिका कितपत महत्त्वाची आहे? वैद्यकीय तज्ज्ञांची भूमिका काय असावी? या निर्णयांमागे विविध धर्म व संस्कृतींचा पगडा असू शकतो का? अशा अनेक प्रश्नांवर चर्चा सुरू आहेत, आणि अनेक लोक अनेक भूमिका मांडत आहेत. पण प्रश्नांची उत्तरं मात्र अजून सापडलेली नाहीत. खरं तर हा एक फार मोठा सामाजिक प्रश्न आहे, आणि त्याला अनेक कंगोरे आहेत. अनेक बाजू आहेत. आर्थिक, सामाजिक, धार्मिक, नैतिक बाबींखेरीज कायदेशीर व वैद्यकीय बाबीही या प्रश्नांचं उत्तर शोधताना लक्षात घ्यायला हव्यात.

ही सारी चर्चा जाणून घेण्याची तेंडुलकरांना इच्छा होती. अशोककडे रात्री चालणार्‍या चर्चांत हा विषय निघायचाच, आणि त्यांना माझ्याकडून सखोल माहिती हवी असायची. युरपमधल्या एका विज्ञानपत्रिकेत या विषयावरील माझा एक लेख प्रकाशित होणार होता. त्यांनी मला ईमेल करून तो लेख कधी प्रकाशित होणार याची चौकशी केली, आणि त्या लेखाची एक प्रत त्यांना पाठवायला सांगितली. मी चक्रावलो. कारण तो वैद्यकीय विषयाशी संबंधित असा लेख होता. आयुष्याची अखेर आणि विविध धर्मांतील समजुती असा त्या लेखाचा विषय होता. मी त्यांना मग तो लेख पाठवला. अर्थात हे ते माझ्या रुग्णालयात अ‍ॅडमिट होण्यापूर्वीचं.

तर औषधोपचार थांबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला, तेव्हा सर्व बाजूंनी त्यांनी नीट अभ्यास केला होता. त्यामुळे हा निर्णय अविचाराने घेतला आहे, किंवा त्राग्यापोटी घेतला आहे, अथवा क्षणिक आहे, असं कोणी म्हणणं अशक्य होतं. ८ मार्च, २००८, या दिवशी त्यांनी मला एक ईमेल लिहिला. त्यांनी लिहिलं होतं - My dearest Doctor, So far I have obeyed you. Now it is my turn. Try to understand me this time. It is a decision not taken in haste. It is well-thought. I cannot proceed beyond this. My capacity has run out. My thought may be wrong, but it is genuine. Please, for God's sake, spare me. Give me a peaceful death. And soon. Love, Vijay.

अगोदरच्या काही ईमेल्समध्ये 'तें', 'बाबा' आणि आता या ईमेलमध्ये 'विजय'. त्या त्या वेळच्या भूमिकांप्रमाणे, अवस्थांप्रमाणे होत गेलेले हे बदल. शेवटच्या ईमेलमध्ये आहे ती स्वतःच्या भूमिकेशी, विचारांशी ठाम अशी एक व्यक्ती. अतिशय विचारपूर्वक घेतलेली, अतिशय ठाम, पारदर्शक अशी ही भूमिका. तेंडुलकरांचा ईमेल वाचल्यानंतर आणि त्यांची एकूण तब्येत बघितल्यानंतर त्यांच्या निर्णयाविरुद्ध जाणं मला शक्य नव्हतं.

हळूहळू त्यांची तब्येत ढासळली. त्यांना परत पुण्याला आणलं. ते फारसं बोलत नव्हते. हालचाली अतिशय मंद होत्या. त्यांना न आवडणारी उपमा द्यायची म्हणजे ते जणू समाधिस्थच झाले होते. आमची लढाई परत सुरू झाली. औषधं बदलली, कृत्रिम श्वसनयंत्रणा सुरू केली. आणि माझ्या लक्षात आलं की आपण अशा टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत, की जिथे औषधांचा खरंच उपयोग होईल की नाही, याचा विचार करायला हवा. हा टप्पा ओळखणं हे डॉक्टरचं कसब असतं. या टप्प्याच्या अलीकडे औषधोपचार थांबवणं हा रुग्णावर अन्याय असतो, तसंच त्यापलीकडे औषधोपचार सुरू ठेवणं हाही रुग्णावर व त्याच्या नातेवाईकांवर अन्याय असतो.

तेंडुलकरांची सतत ढासळती प्रकृती, औषधांचा शून्य उपयोग आणि औषधोपचार न घेण्याची त्यांची इच्छा हे ध्यानात घेऊन मी सर्व उपचार थांबवण्याचा अतिशय कठोर पण माझ्या मते सकारात्मक असा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबीयांशी, मित्रपरिवाराशीही चर्चा केली, आणि शेवटी त्यांना शांत मरण येऊ देण्यात आम्ही सारे सहभागी झालो.

आयुष्याच्या या अखेरच्या टप्प्यावरसुद्धा तेंडुलकरांचे विचार चाकोरीपेक्षा खूप वरचढ, अतिशय परिपक्व व धाडसी होते. त्यांना पटला तो निर्णय त्यांनी अतिशय विचारपूर्वक घेतला. सर्वांनी असाच निर्णय घ्यावा, असं मी म्हणणार नाही. तेंडुलकरांनाही अर्थातच हे आवडलं नसतं. शिवाय त्यांनी घेतलेला निर्णय घेण्याची क्षमता सर्वांत नसते. समाजही त्याचा कितपत स्वीकार करेल, याची एक डॉक्टर म्हणून मला शंका आहे.

तर असे हे तेंडुलकर. जगण्याचा व मृत्यूचासुद्धा ते एक वेगळाच अर्थ लावून गेले. एकदा त्यांनी आमच्या रुग्णालयाच्या मासिकात लिहिलं होत, 'आपण आयुष्याला एकीकडे पिटाळलं, तर ते दुसरीकडेच पळतं. बहुधा आपल्याच मागे पळतं.' मला असं वाटतं की, तेंडुलकरांचं आयुष्य सतत त्यांच्या मागे पळत होतं. कारण तेंडुलकर, अनेक अर्थांनी, आयुष्याच्या आणि मृत्यूच्या खूप खूप पुढे होते.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिन्मय, आभार.

हे शेवटचे जर्जर दिवस, त्यांतल्या शारीरिक यातना वाचून वाईट वाटलं. Sad
पण तरीही तेव्हाही तळपत राहणारी प्रखर बुद्धी, अखेरपर्यंत चालू असलेलं rational thinking, स्वतःच्या दुर्दैवी अवस्थेवरही व्यंगचित्र काढू शकणार्‍या 'तें'ची विनोदबुद्धी यांना कोटी सलाम.

आजारी असतानाच्या विनोदबुद्धी, मनस्थितिबद्दलचे ठीक आहे पण त्यान्च्या आजाराबद्दल जरा अनावश्यक डिटेल्स आले असे वाटते.

>>> रुग्णांनी आपल्या अखेरच्या क्षणांबद्दलचे वैद्यकीय निर्णय स्वतःच घ्यावेत का? त्यात त्यांची शारीरिक व मानसिक स्थिती कितपत महत्त्वाची आहे? त्यांच्या नातेवाईकांची भूमिका कितपत महत्त्वाची आहे? वैद्यकीय तज्ज्ञांची भूमिका काय असावी? या निर्णयांमागे विविध धर्म व संस्कृतींचा पगडा असू शकतो का? अशा अनेक प्रश्नांवर चर्चा सुरू आहेत, आणि अनेक लोक अनेक भूमिका मांडत आहेत. पण प्रश्नांची उत्तरं मात्र अजून सापडलेली नाहीत. खरं तर हा एक फार मोठा सामाजिक प्रश्न आहे, आणि त्याला अनेक कंगोरे आहेत. अनेक बाजू आहेत. आर्थिक, सामाजिक, धार्मिक, नैतिक बाबींखेरीज कायदेशीर व वैद्यकीय बाबीही या प्रश्नांचं उत्तर शोधताना लक्षात घ्यायला हव्यात.

अवघड प्रश्न आहेत खरे.

हे सगळे लेख 'तें'च्या स्मरणार्थ लिहिले गेले असले तरी नुसते स्मरणरंजनात्मक नाहीत हे विशेष. असे लेख/मनोगतं जमवल्या/निवडल्याबद्दल चिनूक्सचे विशेष आभार.

I cannot proceed beyond this. My capacity has run out. My thought may be wrong, but it is genuine. >> महान. जिवनाच्या शेवटच्या टप्प्याकडे इतक्या वस्तूनिष्ट (की अलिप्त) भावनेने पाहणारा हा माणूस वेगळाच. निश्चीतच त्यांना ह्यावर खूप विचार करावा लागला असणार.

>>It is a decision not taken in haste. It is well-thought. I cannot proceed beyond this. My capacity has run out.
कुठे थांबायचे हे कळायला आणि त्याहून जास्त , तिथे थांबायला खूपच धैर्य लागतं.
ते तेंडुलकरांना निश्चीतच उमगलं होतं असं यावरून जाणवतं.

स्वातीला हज्जार अनुमोदक.

चिनूक्स, धन्यवाद!!

खरोखर जे वेगळे जीवन ते जगले त्या जगण्याशी ते ठाम राहिले. स्वतःच्या कलाकृतीबरोबर ते ठाम राहिले आणि शेवटपर्यंत तो ठामपणा त्यानी टिकवून ठेवला हे विशेष.
--------------
नंदिनी
--------------

व्वा! चिनूक्स, धन्यवाद!!
खरोखर तेंडुललरांवरचे हे लेख खुपच सुंदर आहेत.

चिनुक्सा- आभार, आभार, आभार !
तेंडुलकरांचा निर्णय त्यांच्यापुरता योग्यच वाटतो. असा आपल्यालाही कधी वेळ येईल तेव्हा घेता यावा अशी फार इच्छा आहे.
डॉक्टरांचे विचार फार आवडले. स्वच्छ आणि पारदर्शी.
लिहू की नको या विचारात ही लेखमालिका सुरु झाल्यापासून आहे. मागे म्हणल्याप्रमाणे स्वतःची लायकी बाजूला ठेवून, आणि पुरेशा अभ्यासाशिवाय थोडे विचार मांडते आहे.

तेंडूलकरांचे "यश" ( दुसरा नेमका शब्द सापडेपर्यंत हा चालवून घ्या ) हे लेखणीइतकेच, व्यक्तिगत आयुष्यात शब्दांची किंमत चुकवण्याचे धैर्य असण्यात आहे असं वाटतं. Courage of Convictions. त्यांनी आपल्या शब्दांसाठी जो लढा दिला तो शब्दांइतकाच किंवा त्यापेक्षाही सामर्थ्यवान होता. त्यामूळेच ते अनेकांच्या स्फुर्तीस्थानी आहेत. त्यांची नाटके साहित्यात समाविष्ट होवोत किंवा न होवोत, एक जिवंत चळवळ त्यांनी उभी केली, झेलली, पेलली, फुलवली, जोपासली. अलंकारिक आभूषणांनी युक्त आणि कधी शुद्ध तुपातील गोडमिट्टपणा, अशा तिथेच रुतून बसलेल्या भाषेला आणि विचारांना वास्तवदर्शी पातळीवर आणलं. एका पिढीला गदागदा हलवून जागं केलं.
कधी विचार पोचवायला त्यांनी साहित्यनिष्ठा आणि नियम थोडे बाजूला ठेवले असतीलही, आणि किंचीत भडकपणाचा अकारण मोह धरला असेलही कदाचीत, तरीही..
जीवनमरणाच्या सीमारेषेवर त्यांचा बुद्धिप्रामाण्यवाद अक्षय आणि अभंग राहिला हे वाचून संतोष वाटला.

<<<त्यांनी एकदा लिहिलं, 'जगणं जसं आहे, ते नाकारणं हे एक स्वप्नरंजन आहे. आणि जगण्यात आपल्यासाठी जागा करून जगणं हे मात्र वास्तव आहे.>>>>>

अप्रतिम.
कधी कळायच मला हे. ?

सुन्दर लेखाबद्दल धन्यवाद.

चिनूक्स, सुन्दर लेखाबद्दल धन्यवाद.... ह्याला सुंदर तरि कसे म्हणावे? नक्कि काय म्हणावे तो शब्द सापडत नाहिये Sad एकुण 'तें' आणि त्यांची झुंज आणि तितकाच गंभीर तेजस्वी त्यांचा निर्णय, अतिशय विचार करायला लावणारे. तसंच डॉ. शिरीष प्रयाग ह्यांनी जसं शब्दबद्ध केलंय तेही किती आतुन. एक डॉक्टर आणि एक संवेदनाशिल माणुस ह्यांची गुंफण सहज सुंदर.
तुलना म्हणुन नव्हे पण माझी आठवण जागी झाली पुन्हा. आईच्या अखेरीस तिनं आम्हाला विनंती केली उपचार थांबवण्याविषयी. डॉक्टरांशी बोलुन आम्ही बहिणीनी उपचार थांबवायचे ठरवलं. वाट बघणं किती भयानक असतं अशा वेळी, पण आई अखेरपर्यंत हसतमुख होती, तिचा अखेरचा फोटो पाहुन कुणाला विश्वास बसणार नाही की अडीच महिने तिच्या मुखात पाण्याचा थेंबही नव्हता. किशोरच्या 'एक लडकी भिगी भागी सी...' वर तरिही मान डोलावणारी ६५ वर्षाची तरुण आई मी पाह्यलीय........

फार सुंदर. डॉक्टरांनी काही वाक्यांमध्ये इतकी अचूक नस पकडली आहे की बस्स !
स्वत:च्याच शेवटच्या क्षणांबद्दल इतके अस्सल कुतूहल !! rationality, वस्तुनिष्ठता इतकी रोमारोमात कशी भिनते ? ती भिनल्यावर आयुष्याकडे बघण्याची इतकी तटस्थ वृत्ती येत असेल तर जीवाच्या आकांताने ती रोमारोमात भिनवून घेणे आवश्यक आहे.
>>> एकदा त्यांनी आमच्या रुग्णालयाच्या मासिकात लिहिलं होत, 'आपण आयुष्याला एकीकडे पिटाळलं, तर ते दुसरीकडेच पळतं. बहुधा आपल्याच मागे पळतं.' >>>
हे जातिवंत झळाळतं सौंदर्य !
मला असं वाटतं की, तेंडुलकरांचं आयुष्य सतत त्यांच्या मागे पळत होतं. कारण तेंडुलकर, अनेक अर्थांनी, आयुष्याच्या आणि मृत्यूच्या खूप खूप पुढे होते. >>> आमेन.

    ***
    May contain traces of nuts.

    चिनुक्स, हे इथे लिहील्याबद्दल तुझे आभार Happy

    एकूण मजकुरावर बराच विचार करतोय!
    अनेक आठवणी जाग्या होताहेत, अस्वस्थ करताहेत
    मनाचा एक कोपरा कुठेतरी, त्या त्या भुमिकेत स्वतःला घेऊन जातोय
    ही किन्वा अजुन कशी, पण वेळ, ही, आपल्यावर येणारच याची खात्री होतिये
    मन, की मेन्दू? विचार करतोच आहे!
    जाणवतय, की विचार थाम्बतील असे वाटत नाही!
    अन ज्याक्षणी विचार थाम्बतील, तोच क्षण शेवटचा!
    तो गोड व्हावा! फॉर गॉड्'स सेक! Happy

    Very Touching! Sad
    औषधं बंद करा -हे सांगायला खरंच फार साहस आणि धैर्य लागतं..
    एका डॉक्टरच्या नजरेमधून आहे हे म्हणून जास्त भावलं..

    हा लेख वाचून अस्वस्थ व्हायला होतय.

    या अशा माणसाच्या शेवटच्या काळास साक्षीदार असणे हे सुदैव म्हणावे की प्राक्तन...
    जे काय असेल ते.. डॉक्टरांनी त्यांचे विचार छानच मांडले आहेत.

    अन तें बद्दल तर काय बोलावे?! Happy

    --
    माझे पहिले रंगीबेरंगी पान. Happy
    http://www.maayboli.com/blog/5883

    हे उपलब्ध करुन् दिल्याबद्दल धन्यवाद...

    *****&&&*****
    Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

    चिनूक्स तुझे आभार हा लेख इथे दिलास म्हणून. डॉक्टर प्रयागांनी खूपच व्यवस्थित मांडणी केली आहे. तें चे अखेरचे दिवस अगदी जवळून अनुभवता आले लेख वाचताना.

    चिनूक्स धन्यवाद.
    'आपण आयुष्याला एकीकडे पिटाळलं, तर ते दुसरीकडेच पळतं. बहुधा आपल्याच मागे पळतं.' मला असं वाटतं की, तेंडुलकरांचं आयुष्य सतत त्यांच्या मागे पळत होतं. कारण तेंडुलकर, अनेक अर्थांनी, आयुष्याच्या आणि मृत्यूच्या खूप खूप पुढे होते. >> खरोखर.

    तें स्वतःचे विचार जगले.

    चिनुक्स धन्यवाद. बस्स.
    .........................................................................................................................
    आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
    कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

    चिनुक्स ... !
    .....................................!!
    <<<'जगणं जसं आहे, ते नाकारणं हे एक स्वप्नरंजन आहे. आणि जगण्यात आपल्यासाठी जागा करून जगणं हे मात्र वास्तव आहे<<<
    "तें" ना सलाम !!!

    दिनेशदा आणि पिएसजी ला मोदक.
    टचिंग!

    चिनुक्स, तुमचे खुप खुप आभार. फारच छान लिखाण.

    Back to top