श्रावणाशी कोळंबीची घातलेली 'अब्रह्मण्यम' सांगड पाहून काही भुवया वक्र होणार याची कल्पना आहे. पण एकदा कलासाधना म्हटली की प्रसंगी तळहातावर शीर घेऊन लढायची तयारी ठेवावी म्हणतात. प्रस्तुत लेख पाककलेवर (उर्फ खादाडीवर) असल्याने थोडीफार साधना यातही अन्तर्भूत आहे. तिला स्मरूनच धीराने पुढे लिहितो.
पावसाळ्यातला कोकणपरिसर आणि हिरवाई यांचे अद्भुत अद्वैत आहे. एप्रिल-मेच्या रखरखीत, घामट उन्हाळ्यानंतर मोसमी पावसाच्या सरी जेव्हा कोकणाला साद घालतात तेव्हा एखाद्या नवपरिणीतेच्या आवेगाने भुई पावसाला प्रतिसाद देते. चार पाच दिवसापूर्वीची उजाड लाल जमीन ती हीच का असा प्रश्न पडावा, इतक्या वेगाने सृष्टीचे रूप पालटते. समुद्र उधाणास येतो आणि त्याच्या लाटांची गाज ऐकत झाडे कात टाकतात.
गेली पंधरा वर्षे नोकरीनिमित्त बाहेर असल्याने कोकणातल्या पावसाची झिंग अनुभवता आलेली नाही. भणाण वार्यात किनार्यावरून फिरत भिजण्याचे सुख लाभलेले नाही. त्यामुळेच की काय हिरवाई भेटली की हमखास सड्यावरून दिसणारे मालवण नजरेसमोर येते. कालावल खाडीच्या विशाल पात्राला दुतर्फा पहारा देणारी झाडे दिसतात, तारकर्ली-देवबागचा (एकेकाळचा) स्वच्छ किनारा हळी घालतो आणि कुठल्या इन्द्राच्या ऐश्वर्यासाठी हे सगळे सोडून आपण हजारो मैल दूर येऊन वसलो आहोत असा बोचरा सवाल थैमान घालू लागतो.
आज ही आठवण होण्याचे कारण म्हणजे 'हिरवा मसाला'. जर व्यवस्थित जमून आला तर याच्याही रंगात कोकणची सुस्नात हिरवाई आणि अधून मधून पडणार्या श्रावणातील उन्हाच्या रंगाचे गारूड उतरते.
कोळंबी-मासे-खेकडे सिद्ध करताना अपरिहार्यपणे मला 'कोकणाच्या विशेषतः समुद्राच्या हाका' येतात. तोच नॉस्टाल्जिया मा.बो. वर लेख लिहून आणखी लांबवावा या विचारात आज खालील 'डिश' सादर करत आह्रे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"हिरव्या मसाल्यातील कोळंबी पुलाव"
साहित्य : (दोन जणांसाठी)
कोळंबी मध्यम ८-१०
तांदूळ एक वाटी
तमालपत्र, लवंग, काळे वेलदोडे, वेलची, दालचिनी, मिरी दाणे
अर्धा मोठा कांदा - उभे काप
हिरवी चटणी:
दोन मोठ्या हिरव्या मिरच्या, एक वाटी कोथिंबीर, ५-६ लसूण पाकळ्या, आले १ इंच, लिंबाचा रस एक टीस्पून, पुदिना १०-१२ पाने अथवा आवडीनुसार, चिमूटभर हळद.
बाकी मीठ, एक टी स्पून तूप, दोन टे.स्पून तेल वगैरे
कृती:
चटणी करून घ्यावी. कोळंबीला मीठ, किंचित हळद आणि ही हिरवी चटणी लावून मुरवत ठेवावी.
उकळत्या पाण्यात खडे मसाले, थोडे तूप, किंचित मीठ घालून मोकळा भात शिजवून घ्यावा. शिजला की पाणी काढून टाकावे आणि थोडावेळ पसरून ठेवावा.
तेलात कांदा परतून घ्यावा. रंग बदलला की मुरलेली कोळंबी सगळ्या मसाल्यासकट घालावी. चांगली परतून एक वाफ द्यावी.
कोळंबी शिजली की भात घालावा. भाताचा गोळा होणार नाही - शित मोडणार नाही याची काळजी घेऊन हळू परतावा. मसाला भाताला चांगला लागला पाहिजे. पुन्हा एक वाफ काढावी म्हणजे हा पुलाव तयार होईल.
तशी ह्या पुलावाच्या बरोबर ग्रेव्ही किंवा करीची गरज नाही पण मत्स्याहाराची जोडीदारीण सोलकढी असेल तर (नारळाच्या) दुधात साखरच पडेल.
स्रोत : वर्टीकर आजींचा यू-ट्युब व्ही डी ओ
वा मस्तच .. असा पुलाव चिकनचा
वा मस्तच ..
असा पुलाव चिकनचा केला तर बरा होईल का? किंवा मग पनीर , टोफू?
साहित्याच्या फोटोत हळदीच्या बाजोला काही मसाला सदृश दिसत आहे ते काय आहे? हा मसाला (?) साहित्यात लिहीलेला नाही ..
पनीर ह्या मसाल्यात मॅरिनेट
पनीर ह्या मसाल्यात मॅरिनेट करुनही मस्त लागेल तसंच चिकनही. सोलकढी भारी दिसतेय एकदम.
(हिरवी प्लेट जागूकडची का? )
छान या मसाल्यात घोळवलेले
छान
या मसाल्यात घोळवलेले पनीर पण छान लागेल. फिश (व्हाईट्/फ्लेशी - बारॅमंडी वगैरे) पण चांगले लागेल बहुतेक.
हळदीच्या बाजोला काही मसाला सदृश दिसत आहे ते काय आहे? हा मसाला (?) साहित्यात लिहीलेला नाही .. <<< +१....
सायो
तोंपासू... साहित्याच्या फोटोत
तोंपासू...
साहित्याच्या फोटोत हळदीच्या बाजोला काही मसाला सदृश दिसत आहे ते काय आहे? हा मसाला (?) साहित्यात लिहीलेला नाही ..>>> Secret ingredient तर नाही ना?
आमच्या शेजारच्या काकू तर कधीच संपूर्ण पाककृती सांगायच्या नाहीत...कधी कधी तर सरळ 'माझी सिक्रेट रेसिपी आहे' असे सांगायच्या
वॉव्,साधी,सोप्पी,माईल्ड
वॉव्,साधी,सोप्पी,माईल्ड मसाल्याची रेसिपी दिसतेय्...तोंपासु
चविष्ट प्रकार !
चविष्ट प्रकार !
प्रतिसादकांचे आभार. तो
प्रतिसादकांचे आभार.
तो सीक्रेट पदार्थ वगैरे काही नाही, हिरवा मसाला थोडा चटपटीत व्हावा म्हणून थोडी मिरपूड घालावीशी वाटली, ऑप्शनल असल्याने उल्लेख राहून गेला त्याबद्दल क्षमस्व!
बाकी हिरवा मसाला फिश, पनीर, टोफु बरोबर चांगलाच लागेल, असे वाटते.