Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हाय अस्मिता. ही लिंक बघ -
हाय अस्मिता. ही लिंक बघ - http://www.maayboli.com/user/42115/guestbook.
(तुला माहित असेल-नसेल, म्हणून इथे लिहिलं.)
अकूपार वाचून संपवलं. तत्वमसि
अकूपार वाचून संपवलं. तत्वमसि ह्या ध्रुव भटांचं वाचलेलं पहिलं पुस्तक, अर्थात अनुवाद. आणि आता अकूपार. तत्वमसि नर्मदा आणि तिच्या परिसरात राहणारे आदिवासी, तेथील लोक, जनजीवन ह्यावर आधारित होतं आणि अकूपार गीरच्या भूमीला केंद्रस्थानी ठेवून लिहीलेली कादंबरी आहे. गीर, तिच्या परिसरात राहणारे स्थानिक, गीर व तेथील सिंहांविषयी त्यांच्या मनात असलेला आदर, प्रेम ह्या सर्वांना एकत्र गुंफत अतिशय सुरेख असं कथानक पुस्तकात आहे. जरुर वाचा.
सद्ध्या सरवा हे व्यंकटेश माडगुळकरांचं पुस्तक वाचते आहे, त्यातला अरण्यवाचन हा लेख अतिशय सुरेख आहे. तसंच खेड्यातून शहराकडे हा ही लेख. त्यात लेखकाच्या शहरातल्या घरी, त्यांच्या शेतावर काम करायला जायचं म्हणून, काही वेळासाठी आलेलं आदिवासी जोडपं शहारातला कलकलाट सहन न होऊन जंगलाच्या ओढीने रडायला लागतं, हा भाग वाचताना खरंच भरुन आलं. अजून पुढे वाचते आहे पुस्तक.
ह्यानंतर डोंगरी ते दुबई हे झैदींच पुस्तक वाचायला घेईन. ह्याआधी त्यांचं भारतातल्या स्त्री माफियांबद्दलच पुस्तक वाचलं होतं आणि त्यांची लिहिण्याची शैली मला खूप आवडली होती.
जॉर्ज बर्नार्ड शॉ चे
जॉर्ज बर्नार्ड शॉ चे 'पिग्मेलियन' नाटक वाचले.. 'माय फेयर लेडी' तर कायमच आवडता चित्रपट आहे..नाटकही तेवढेच सुंदर..
अबोली, आर्म्स अॅण्ड द मॅन पण
अबोली, आर्म्स अॅण्ड द मॅन पण वाचून बघ शॉ चं. मस्त आहे
'पिग्मॅलियन' जास्त छान आहे
'पिग्मॅलियन' जास्त छान आहे ना?
हो नक्की वरदा..
हो नक्की वरदा..
रैना,'पिग्मेइलियन' चा नक्की उच्चार देवनागरीत लिहिणं कठीण जातंय मला..
डोंगरी ते दुबई वाचून झालं,
डोंगरी ते दुबई वाचून झालं, मला मूळ झैदींचं पुस्तक मिळालं नाही, तेह्वा अनुवादित घेतलं होतं. अनुवाद व्यवस्थित जमला नसेल तर पुस्तक कंटाळवाणं होऊ शकतं, पण इथे अनुवाद व्यवस्थित जमला आहे. खूप माहिती समजली पुस्तकामुळे. गुन्हेगारीचं जग, जे सर्वसामान्य लोकांपुढे कधीच येत नाही, ते बर्याच प्रमाणात उलगडून दाखवलं आहे.
अंतर्यामी सूर गवसला.. हे दत्ता मारुलकरांचं पुस्तक वाचलं काल. श्रीनिवास खळे ह्यांच्यावर चरित्रात्मक असं हे अतिशय सुरेख असं पुस्तक आहे. श्रीनिवास खळे ह्यांची व्यक्ती म्हणून फार उत्तम ओळख ह्या पुस्तकाद्वारे करुन दिली आहे. त्यांची कामाची पद्धती, कामविषयीची निष्ठा हे वाचून फार कौतुक वाटतं. एकदा तरी वाचावं असं.
आता अरण्येर अधिकार वाचायला घेतलंय.
मागच्या महिन्यात वाचलेले
मागच्या महिन्यात वाचलेले पुस्तकं:
वळीव - शंकर पटील
कुणा एकाची भ्रमणगाथा - गो. नि. दांडेकर
हिरवे रावे - जि. ए. कुलकर्णि
आपण सारे अर्जुन - व. पु. काळे
काळे पाणि - वीर सावरकर
अंतर्यामी सूर गवसला.. >>>>
अंतर्यामी सूर गवसला.. >>>> खरंच छान आहे हे पुस्तक.
ग्रॅण्ड्माज बुक ओफ स्टोरिज
ग्रॅण्ड्माज बुक ओफ स्टोरिज वाचते आहे...गोड...
अजित हरिसिंघानींचं 'One life
अजित हरिसिंघानींचं 'One life to ride' वाचतोय. कितीही वेळा वाचलं तरी कंटाळवाणं न वाटणारं पुस्तक.
लेखकाने रॉयल एनफील्ड वरुन केलेल्या पुणे ते जम्मू प्रवासाबद्दल आहे. याचाच मराठी अनुवाद 'बाईकवरचं बिर्हाड' या नावाने आलेला आहे.
हे वाचलं का
हे वाचलं का ?
http://www.loksatta.com/vruthanta-news/250-books-in-one-cd-75344/
अडीचशे पुस्तके फक्त एका सीडीमध्ये!
प्रतिनिधी, मुंबई
Published: Wednesday, March 6, 2013
प्रवासात विरंगुळा म्हणून आपण आपल्याजवळ वाचण्यासाठी एखाद-दोन पुस्तके ठेवतो. ती पुस्तके वाचून झाली की काय असा प्रश्न पडतो. कारण जास्त पुस्तके जवळ ठेवायची म्हटली तरी त्याच्या ओझ्यामुळे ते शक्य होत नाही. आपल्या घरातही आपण पुस्तकांसाठी शोकेस/कपाट करतो. पुस्तके विकत घेतल्यानंतर त्यांची संख्याही वाढत जाते आणि इतकी पुस्तके ठेवण्यासाठी मग नवी सोय करावी लागते. पण एक-दोन, वीस-पंचवीस नव्हे तर विविध विषयांवरील अडीचशे पुस्तके आपल्याला एकत्र मिळाली आणि त्याचे ओझेही फार नसेल तर?..
हो, हे शक्य केले आहे 'ई साहित्य प्रतिष्ठान'ने. गेल्या काही वर्षांपासून विविध विषयांवरील मराठी पुस्तके ई-बुक स्वरूपात प्रकाशित करून ती आपला ई-मेल आयडी कळवला तर अनेकांना मोफत पाठविण्याचे काम ई-साहित्य प्रतिष्ठान करत आहे. महाराष्ट्रातील विविध गड-किल्ले यांची माहिती देणारी दहा पुस्तके आत्तापर्यंत प्रतिष्ठानने प्रकाशित केली आहेत. ई-साहित्य प्रतिष्ठानतर्फे दर आठवडय़ाला एक ई-बुक प्रकाशित केले जाते. अशा पुस्तकांची संख्या सुमारे पावणेतीनशे झाली आहे.
काही वर्षांपूर्वी आम्ही प्रकाशित केलेल्या 'बालभारतीतील कविता' या ई-पुस्तकाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आपल्या आठवणींच्या कप्प्यात असलेल्या शालेय अभ्यासक्रमातील अनेक उत्तमोत्तम कवितांचे संकलन या पुस्तकात केले होते. आता येत्या १० मार्च रोजी प्रसिद्ध लेखक विक्रम भागवत यांची 'धांडोळा' ही कादंबरी पहिल्यांदा ई-बुक स्वरूपात प्रकाशित होत आहे. भागवत यांनी यापूर्वी 'अफलातून', 'एक शून्य रडते आहे', आदी नाटके तसेच 'चाळ नावाची वाचाळ वस्ती', 'एक शून्य शून्य' आदी मालिकांचे लेखन केले आहे. आम्ही आत्तापर्यंत जी ई-पुस्तके प्रकाशित केली त्यात महाराष्ट्राच्या इतिहासापासून ते कवितांपर्यंत, ज्ञानेश्वरीपासून ते कादंबरीपर्यंत आणि विनोदापासून ते तरुणांच्या साहित्यापर्यंत विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे. चित्रकला, पाककला, अर्थशास्त्र, कामजीवन आदी विषयही प्रतिष्ठाने हाताळले आहेत. प्रकाशित झालेली ही पुस्तके वाचक पुढे पुढे पसरवत असतात. ही सर्व पुस्तके दीड लाख वाचकांपर्यंत पोहोचली असल्याचे प्रतिष्ठानचे सुनील सामंत यांनी सांगितले.
ई-साहित्य प्रतिष्ठानची आत्तापर्यंत प्रकाशित झालेली अडीचशे पुस्तके आता एका सीडीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून ती अवघ्या दीडशे रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी maneanand7@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा.
सध्या सगळीकडे दुश्काळाच्या
सध्या सगळीकडे दुश्काळाच्या बातम्या आहेत. त्या वाचून जोह्ड ची आठ्वण झाली आणि वाचल परत. सुंदर पुस्तक.
सर्वांना वर्ल्ड बूक डेच्या
सर्वांना वर्ल्ड बूक डेच्या शुभेच्छा!!!
काल कविता महाजन यांचे ब्र
काल कविता महाजन यांचे ब्र वाचले आणि इतक्या उशीराने वाचल्याबद्दल थोडी लाजही वाटली.
बायकोने तिच्या लायब्ररीतुन आणलेले म्हणून सहज वाचायला सुरुवात केली आणि मग हातातून सोडवेना. जसेजसे पुढे वाचत गेलो तसे सटपटायला झाले. स्वत:च्या नवरेपणाकडे, पुरुष असण्याकडे एका त्रयस्थ नजरेने पहावेसे वाटले आणि जाणवले की किती वेळेस आपण कळत नकळत आपल्या बायकोला गृहीत धरतो. प्रचंड ओशाळल्यासारखे झाले आणि अगदीच राहवेना तेव्हा बायकोला बाजूला घेऊन म्हणालो...
"बये, इतक्या वर्षाच्या संसारात तुला अनेकदा मी कळत नकळत गृहीत धरले..कुठेतरी नवरेपणाचा हक्क गाजवला..कुठेतरी तुला डावलले त्याबद्दल मनापासून सॉरी...यापुढे असे होणार नाही याचा नक्कीच प्रयत्न करीन...."
त्यावर तीने छानसे स्माईल दिले आणि म्हणाली "पोचलं..."
आशुचँप, मस्त! ब्र खरंच भारी
आशुचँप, मस्त!
ब्र खरंच भारी आहे.
are bapare, malahi te bra
are bapare, malahi te bra wachale pahije ata. Majya baikoni ananya adhi mich anato. Thaks ashu
माझे कालच द रोलर कोस्टर राइड
माझे कालच द रोलर कोस्टर राइड हे पुस्तक वाचुन झाले.
खुपच छान पुस्तक आहे.
'The Oath of Vayuputras'
'The Oath of Vayuputras' वाचुन झाले.
त्यातलं १ वाक्य आवडलं, "weak people never admit that they are responsible for their own state. They always blame either circumstances or others.”
कालच गो.नि दांडेकरांचे शितू
कालच गो.नि दांडेकरांचे शितू वचल खुप छान पुस्तक आहे. वाचुन मनामध्ये अनेक तरंग उमटले. शितू,व विसु य़ांचे भावविश्व दाडंेकरानी खुप छान रेखाटले आहे.शितु या पुस्तकामधील एक उतारा मी ई.7वी ला होतो तेव्हा होता.तो मला खुप भावला होता.
एसएल भैरप्पा यांच्या दाटू या
एसएल भैरप्पा यांच्या दाटू या कादंबरीचा उमा कुलकर्णी यांनी जा ओलांडूनी या नावाने केलेला अनुवाद वाचला....
अशीही भैरप्पांची शैली काही वेगळी..साध्या साध्या घटनांपासून सुरु होत आपल्याला अंर्तमुख करायला लावणार्या विचारधारेपर्यांत अशी सहज भरारी घेणारी.
विषय आता जुना झाला असला तरी १९७५ मध्ये त्यांना या कादंबरीसाठी साहीत्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, त्या आधीचा काळ घेतला आहे..
त्या काळात जातीभेदाची जाणीव आत्तापेक्षा खूपच गडद आणि तीव्र होती आणि हीच ठसठसती वेदना भैरप्पांच्या लेखणीतून उतरते.
नुसते पहायला गेले तर कर्नाटकच्या एका खेडेगावात घडणारी ही कहाणी पण त्याला अक्षरश शेकडो कंगोरे आहेत. आणि त्या प्रत्येक कंगोर्याचा अर्थ हा ज्याच्यात्याने लावायचा आहे. सुरुवातीला काहीच समजत नाही, पण कथानक जसे जसे पुढे सरकत जाते तसे थोडे फार लक्षात यायला लागते. अर्थात शेवट मला तरी फार ओढून ताणून आणल्यासारखा वाटला...किंवा मग मला त्यातून काय सुचवायचे आहे हे झेपले नाही.
काही व्यक्ती या प्रतिके बनून येतात पण सगळ्याच व्यक्तिरेखा त्या दृष्टीकोनातून पहायच्या झाल्या तर मग आणखी गोंधळ उडतो..
एकदंरीत एकदा वाचून बाजूला ठेवून विसरून जाण्याचा हा प्रकार नाही एवढे मात्र निश्चित
एकदंरीत एकदा वाचून बाजूला
एकदंरीत एकदा वाचून बाजूला ठेवून विसरून जाण्याचा हा प्रकार नाही एवढे मात्र निश्चित >>> हा निकष आवडला.
आशु, अभिनंदन!
आशु, अभिनंदन!
मेघना पेठेंची नतिचरामी
मेघना पेठेंची नतिचरामी वाचली
आधी ब्र, मग जा ओलांडूनी आता पाठोपाठ ही..त्यामुळे डोके भंजाळल्यासारखे झाले आहे.
नतिचरामीबद्दल बोलायचे झाले तर पहिल्यांदा अजिबात म्हणजे अजिबात झेपली नाही..बाईंना नक्की काय म्हणायचे आहे आणि कथानकापेक्षा त्या विचारांच्या गर्तेत का गुंगल्या आहेत हे काय उमगेना. त्यातून वाचताना डोळ्यावर पुरुषत्वाचा चष्मा होताच त्यामुळे बाईंना एकंदरीत अनिर्बंध स्वातंत्र्य हवे असून त्यांच्या सर्व आशाआकांक्षा पुर्या करणारा म्हणून एक जण हवा आहे असा काहीसा सूर उमटला..
पण जसा जसा त्याबद्दल जास्त विचार करू लागलो (पर्यायच नव्हता..काही वाक्ये काही परिच्छेद पिच्छाच सोडत नव्हते) तसे जाणवत गेले की खरोखर आपल्याला जसे वाटते आहे तसे आहे का...
बाईंच्या कितीतरी अपेक्षा अतिसामान्य आहेत. एकसारख्या दिसणार्या मगमधून चहा पिणे, मुळात चहा एकत्र पिणे, वाढदिवसाला मिक्सर न देता काहीही दुसरी छानशी वस्तू देणे, घरकामात थोडी का होईना मदत करणे...मला वाटतं घरोघरी यापेक्षा वेगळे चित्र नसेल. पण नवरे मंडळीकडून तरी या अपेक्षा गुलबकावलीचे फुल आणल्यासारख्या भासवल्या जातात.
आणि त्यानंतरच तो १२ वर्षांनतर सोडून जातो त्यावेळी मात्र पोटात तुटल्यासारखे होते हे जाणवून की नक्की त्यांनी काय गमावले ते.
मला तरी या पुस्तकात एवढेच भावले आणि बाकी शिवराळ भाषा, समागमाचे तपशीलवार वर्णन, धोब्यांवर इतकी पाने हे सगळे नसते तरी नक्कीच चालू शकले असते.
आशूचँप, मी हे पुस्तक
आशूचँप, मी हे पुस्तक वाचल्यानंतर माझा अगदी हाच अनुभव आणि निष्कर्ष होता.
हे पुस्तक वाचल्यानंतर माझा
हे पुस्तक वाचल्यानंतर माझा अगदी हाच अनुभव आणि निष्कर्ष होता.>> +१.
जुन्या माबोवर नातिचरामि वर चांगली चर्चा झाली होती.
'टिंकर टेलर सोल्जर स्पाय' ही
'टिंकर टेलर सोल्जर स्पाय' ही जॉन ले कारे लिखित प्रीति छत्रे अनुवादित कादंबरी वाचून संपवली.
रशिया, अमेरिका आणि ब्रिटन या देशांमध्ये एकमेकांच्या गुप्तहेर जाळ्यांमध्ये 'डबल एजंट' पेरून आतल्या बातम्या काढणे आणि त्यायोगे आपल्या देशाविरुद्ध होणारे कट उधळून लावणे- या पार्श्वभूमीची ही कादंबरी आहे. कोणत्याही देशाची गुप्तहेर संघटना म्हणजे एक महाप्रचंड जाळं असते. अनेक माणसं, अनेक वरिष्ठ, प्रचंड ऑफिस स्टाफ, मंत्री असे हजारो लोक त्यात गुंतलेले असतात. काहीच लोक मात्र 'क्रीम' असतात, ज्यांना सगळी माहिती असते, आणि कट रचणे, उधळणे, एजंट पेरणे, संपर्क जाल विणणे वगैरे ही 'कोअर टीम' ठरवते. या कोअर टीममध्येच कोणीतरी एक डबल एजंट आहे असं समजलं तर????
हे ह्या कादंबरीचं सूत्र. मग त्या एजंटचा शोध कसा घेतला, ही गोष्ट.
वर म्हणलं तसं, गुप्तहेर संघटनेची रचनाच इतकी गुंतागुंतीची असते आणि त्यात इतके लोक गुंतलेले असतात, त्यांचे छुपे इरादे, त्यांच्या आपल्या ऑफिसरच्या पायाशी वाहिलेल्या निष्ठा वगैरे शेकडो धागेदोरे. ह्या सगळ्याचे अत्यंत तपशीलवार वर्णन कादंबरीत आहे. त्यामुळे कादंबरी अतिशय संथपणे पुढे सरकते. पात्र खूप आहेत. प्रत्येकाचे वर्णन, मनातले विचार, उघड बोलणं, परिस्थितीचे वर्णन, मध्येच येणारे फ्लॅशबॅक असा प्रचंड ऐवज कादंबरीत आहे. तीनशे पानांच्या कादंबरीत दोनशेव्या पानापासून साधारण आपल्याला (मला) कळायला लागतं की नक्की काय चालू आहे ते!
अनुवाद मात्र उत्तम जमलेला आहे. सहसा अनुवादात असणार्या व्याकरणाच्या, प्रत्ययांच्या ढोबळ चुका अजिबात नाहीत. मध्ये मध्ये म्हणी, गाणी वगैरेही आपली चपखल मराठी घातली आहेत. त्याबद्दल ललिताला १०० पैकी १०० मार्क.
मात्र कादंबरीचा स्कोपच विशाल असल्यामुळे आणि तिचा वेग खूपच कमी असल्यामुळे कादंबरी नेटाने वाचावी लागली मला. एरवी जे 'थ्रिलर' वाचले आहेत, त्याच्यापुढे ही गोगलगायच. अर्थात एखाद्याला हळूहळू सगळे तुकडे नंतर एकत्र कसे बसतात हे वाचायलाही आवडत असेल. पण त्यासाठी कादंबरीचं लगोलग पुनर्वाचन करावे लागेल. मी तर केवळ ललिताने अनुवाद केलेला आहे म्हणून कादंबरी पूर्ण वाचली.
ललिता: तू तुझे काम चोखच केले आहेस. तू ह्या क्षेत्रात अव्वल कामगिरी करशील यात शंकाच नाही! पण मला मूळ कादंबरीच भावली नाही. नथिंग पर्सनल तुला शुभेच्छा.
कमल देसाईंच 'काळा सुर्य' व
कमल देसाईंच 'काळा सुर्य' व 'हॅट घालणारी बाई' या कादंबर्या वाचल्या.
प्रचंड आवडल्या. अत्यंत माफक शब्दांत प्रचंड व्यापकता.
या भन्नाट लेखिकेबद्दल जरासुध्दा माहीती नव्हती याचं फार वाईट वाटले.
(नेमाड्यांच्या काही स्पेशल शब्दांचा उगम याआधीच झाला असल्याचे पाहून आश्चर्य वाटले.)
डॉन ब्राऊन चे एंजल्स अँड
डॉन ब्राऊन चे एंजल्स अँड डेमन्स वाचा. चित्रपटापेक्षा जास्त छान वाटेल.
पौर्णिमा, धन्यवाद तुझी पोस्ट
पौर्णिमा, धन्यवाद तुझी पोस्ट आज वाचली.
कादंबरी संथगतीची आहे हे अगदी खरंय. नेटानं वाचल्याबद्दल तुला एक डेअरी-मिल्क...
पुस्तकाची जाहिरात जरी 'थ्रिलर' अशी केली जात असली, (नेटवर मूळ पुस्तकाबद्दलही असंच म्हटलं गेलेलं आहे.), तरी मी स्वत: त्याला 'आंतरराष्ट्रीय राजकारणावर आधारित एक समर्थ फिक्शन' असंच म्हणेन. त्यात आंतरराष्ट्रीय राजकारणाचे इतके बारीक-सारीक पदर आहेत, की केवळ त्याच्या व्याप्तीनंच मला थक्क व्हायला झालं होतं.
तसंच, सर्वसामान्य गुप्तहेरांचं आयुष्य कसं असतं, जेम्स बॉण्डपट किंवा तत्सम अन्य हॉलिवूडपट आपल्या डोळ्यांत किती धूळफेक करतात हे पुस्तक वाचल्यावर उमगतं.
मंजू, तू कुठवर आलीस? (पान क्र, २०० ला पार केलंस की अजून अलिकडेच आहेस? ;))
Pages