देखण्या घुबडाची निर्मम हत्या

Submitted by नरेंद्र गोळे on 12 March, 2013 - 01:10

१८ डिसेंबर २०१२ रोजी सकाळचाच सुमार होता. एकदमच कावळ्यांची काव काव ऐकू येऊ लागली. खिडकीतून पाहतो तर शेजारच्या सोसायटीत स्टिल्टमध्ये एक देखणे घुबड बसलेले. भोवती सात आठ कावळे, काव काव करत त्याची पिसे ओढत होते.

ह्या फोटो नंतर मी अनेक फोटो काढले. त्रस्त झालेले घुबड जागा बदलत उंच उडून जाण्याचा प्रयत्न करत होते. कावळे त्याची पिसे ओढत होते. अखेरीस मी व्हिडीओ शुटिंगच सुरू केले.

मी असाही विचार केला की, निर्मम हत्या पाहत असता, शुटिंग कसले करायचे दळभद्र्यासारखे! त्यापेक्षा त्याला वाचवायला काय हरकत आहे? मग तोही प्रयास केला. पण आपला हस्तक्षेप केवळ त्याला दूर दूर नेऊन सोडतो आहे असे समजून आल्यावर, आणि दूरवरच्या सोसायट्यांत त्याचा पाठलाग करणेही शक्य नसल्याने, घरातूनच कॅमेर्‍याचे साहाय्याने जिथवर शक्य होते तिथवर वेध घेतला. हस्तक्षेप शक्य होत नव्हता.

मला हेही नीटसे कळेना की कावळे त्यावर इतका कडाडून हल्ला का करत आहेत? रात्री कदाचित जेव्हा कावळ्यांना अंधारामुळे काही दिसत नाही, तेव्हा हा त्यांची अंडी खात असू शकेल.

काय असेल ते असो. मात्र जेव्हा ते घुबड गंभीररीत्या जखमी होऊन, कॅमेर्‍याच्या नजरेबाहेर पडले तेव्हा, त्यातील क्रूरतेपोटी मला शुटिंग सुरू ठेवणे शक्यच राहिलेले नव्हते.

जीवो जीवस्य जीवनम्‌ ! हा तर जीवनाचा नियमच आहे. सुंदर दिसणारे देखणे घुबड, कावळ्यांकरता कदाचित क्रूर शत्रूही ठरत असेल. मात्र कावळ्यांच्या क्रूर हल्ल्यात ते ठार झाले हेही तर सत्यच होते.

मला प्रश्न पडला की, सत्य नेहमीच मनोहर असते का? चांगले असते का?

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला प्रश्न पडला की, सत्य नेहमीच मनोहर असते का? चांगले असते का? >>>
आपण घुबड बनून का विचार करताय, कावळा बनून विचार करून पहा. Light 1

गंभीर मोड ऑन - सत्य हे सत्यच असते, त्याला विशेषणे लावू नये.

Sad

>>> जीवो जीवस्य जीवनम्‌ ! <<<<
हे जितके खरे, तितकेच "बळी तो कान पिळी" हे देखिल खरे.
अनैसर्गिक सन्ख्यात्मक वाढ घातक असू शकते. पशुपक्षीप्राण्यांची वा मानवांची देखिल!
झुन्ड वा कम्पु बनवुन सत्ता राबविणे हा ही एक स्थायी भावच!
दिलपे मत लो!
हो, अन वर हर्पेननी सान्गितलय, तस सत्याला विशेषण लावू नयेत.

घुबड खरेच देखणे आहे.
निसर्गात ढवळाढवळ कधीच करु नये. व्यावसायिक छायाचित्रकार नेहमी हेच धोरण ठेवतात. त्यांचे कायदेकानून आपल्या आकलनाबाहेरचे असतात.

मी असाही विचार केला की, निर्मम हत्या पाहत असता, शुटिंग कसले करायचे दळभद्र्यासारखे! त्यापेक्षा त्याला वाचवायला काय हरकत आहे? मग तोही प्रयास केला.

कर्मगतीच्या आड येवु नये , उगाच आपली गुंतागुंत होते अन सुख दु:खची लेबलं मनाला चिकटतात .....आपण अलिप्त् राहुन साक्षी स्वरुपाने पहात रहावे Happy

एवं त्वयि नान्यथोस्ति , न कर्म लिप्यते नरे ||

तुम्ही फायर ब्रिगेड किंवा अ‍ॅनिमल हेल्प लाइन ला फोन करू शकला असतात. कर्म गती वगैरे कर्म न केल्यावर म्हणायचे उगीच. नाही पटले.

मी पण असा एक प्रसंग पाहिला आहे. तेव्हा तर ५०-६० कावळे आरामात असतील. असचं एक मोठं पांढरं घुबड होतं. घुबडाला उंच उडता येत नाही का?
पण आपण कावळ्यांच्या मधे गेलो तर ते आपल्याच मागे लागतात असाही अनुभव आहे.

ओह्ह्ह. असं आहे का दिनेशदा! म्हणजे वटवाघळासारखेच की.
म्हणुनच मी जेव्हा असा प्रसंग पाहिला तेव्हा ते घुबड नुसते इकडून तिकडे उड्या मारतय असं वाटत होतं.

पूर्वी एकदा असचं कावळे कशाचा तरी मागे लागले होते आमच्या घराजवळ. तेव्हा उत्सुकता म्हणून माझी बहिण बघायला गेली होती तर ते तिच्याच मागे लागले होते बरेच दिवस. ती जरा घराबाहेर दिसली की एखादा कावळा डोक्यावर चोच मारून जायचा!

तर ते तिच्याच मागे लागले होते बरेच दिवस. ती जरा घराबाहेर दिसली की एखादा कावळा डोक्यावर चोच मारून जायचा!
>>
अरे बाप्रे Sad

सूर्य प्रकाशात घुबड अगदी नीट बघू शकत किंबहून शिकार पण करु शकतं.

प्रखर सूर्यप्रकाशात घुबडाची बूभूळं बारीक होत नाहित जशी आपली होतात.. म्हणून जास्तीचा प्रकाश थांबवण्यासाठी घुबड नीम्याहून अधिक पापण्या बंद करतो.... आणि आपल्याला वाटतं की ते दिवसा झोपतात.

कदाचीत पंखाला जखम झाली असेल, त्यामूळे उडता येत नसेल. पण खूपच सूंदर होत घुबड...वाचायला हव होत अस राहून राहून वाटतय.

शहरात घुबडांची संख्या कमी होत चालली आहे याच एक कारण वाढती कावळ्याची पैदास हे देखिल आहे.

नक्कीच त्याला वाचवायला काहीतरी करायला पाहिजे होत.

काही वर्षांपुर्वी ठाण्यात एका मारुतीच्या मंदिरात गेलो असताना असच एका लहान पक्ष्याच्या पिल्लाला (जन्मुन काही दिवस झाले असावेत) बरेच कावळे टोचुन त्रास देत असताना बघीतल. म्हणुन मी कावळ्यांना हकलुन त्या पिल्लाला एका आडोशाला लपवुन ठेवल जेणेकरुन कावळे त्याला त्रास देणार नाहीत. त्या पिल्लाला घरी नेलतर त्याचे आई-बाबा त्याला शोधतील आणि मंदिरात वर्दळ असल्याने ते सुरक्षित राहील म्हणुनही मी असा विचार केला. पण काही तासांनी परतल्यावार बघतोतर ते पिल्लु मेलेल होत. बहुतेक त्या कावळ्यांनी त्याला शोधुन पुन्हा टोचुन टोचुन मारल होत.

ते बघुन मला एवढ वाईट वाटल की अजुनही ते आठवल की जाम पश्चाताप होउन अपराध्यासारख वाटत राहत. जणुकाही नकळत मीसुद्धा त्या पिल्लाला मारायला मदत केली अस वाटत राहत सारख.

बहुधा शिबी राजाची गोष्ट आम्ही विसरलो असू अस वाटतय. हा शिबी राजा तोच ना ज्याने पक्षाच्या बदल्यात मांडीचे मांस दिले? आता अगदी मांडीचे मांस नको द्यायला पण अशा प्रसंगात आपण काहीच केले नाही/करु शकलो नाही याची रुखरुख मात्र आयुष्यभर सोबत करते हे ही खरेच. नेमके काय करावे ते सुचत नाही, जे सुचते ते जनलज्जेस्तव व निरनिराळ्या कायदेकानूंच्या भितीपोटी अंमलात येत नाही, नि नीट विचार करू लागेस्तोवर जे घडायचे ते नजरेसमोर घडून जाते.

मी ही बर्‍याचदा जर डुकराच्या पिल्लामगे कुत्री लागली तर ती पिल्ले वाचावी म्हणुन कित्येक वेळा त्यांना हाकलुन देण्याचा प्रयत्न केला आहे. हा पण कुत्र्यांनाही भुक असतेच.. पण ती जर रक्ताला चटावली तर डुकराचा ही फडशा पाडतात.

शिबी राजाने जे केले ते आपण करु शकणार नाही आणि म्हणुनच निसर्गात जे चाललेय त्यात ढवळाढवळ करु नये हे उत्तम. आधीच आपण निसर्गाची व्यवस्थित वाट लावलेली आहे.

एकदा आमच्या घरासमोर अनंताच्या झाडावर बुलबुलने घरटे केले होते. आम्हालापण 'बुलबुलचे बाळंतपण' बघायला मिळणार म्हणून खुप आनंद झाला.
एक दिवस खुप सारे कावळे तिथे गोळा होऊन काव काव करत होते आणि बुलबुल जोडपे अवतीभवती उडत होते. जवळ जाऊन पाहिले तर कावळ्यांनी घरटे मोडुन टाकले होते आणि २-३ अंडी खाली पडली होती. खुप वाईट वाटले. कावळ्यांना हाकलुन दिले पण आता काही उपयोग नव्हता.

हे कावळे कबुतरांच्या घरटी, अंडी यांना का काही इजा नाही पोचवत? कारण कबुतरांची घरटी अगदी साधी आणि सहज दिसतील अशी असतात.

कावळे घुबडावर हल्ला करु शकतात? मला वाटायचे घुबड पॉवरबाज आहे कावळ्यांपुढे.
जर दिवसा दिसतं(घुबडाला) मग असे ते कावळ्यांसमोर भक्ष होवून का बसले होते हा प्रश्ण पडला.. उडत का न्हवते दूर... मूळात कावळ्यांच्या तावडीत सापडलेच कसे... (किती ते प्रश्ण).. Happy

गोळे सर

देखण्या घुबडाची निर्मम हत्या

निर्मम हा हिंदी शब्द आहे. त्या ऐवजी मराठीतला निर्घृण हा शब्द वापरावा.

धन्यवाद...

तुम्ही फायर ब्रिगेड किंवा अ‍ॅनिमल हेल्प लाइन ला फोन करू शकला असतात.>>
+१०० अनुमोदन.

फोटो व व्हिडीओ काढण्यापेक्षा त्याचा जीव वाचवला असतात तर उगाच हळहळ करायची वेळ आली नसती.

फायर ब्रिगेड किंवा अ‍ॅनिमल / बर्ड रेस्क्यू करणार्‍यांना बोलवायला हवे होते......

घुबडाला दिवसा दिसत नाही त्यामुळे ते आपला बचाव करू शकले नाही...... ते रात्री कावळ्यांना त्रास देते वगैरे काही खरे नाही...... हे घुबड नागरी वसाहतीत दिसते..... मुळातच माणसांनी संक्रांत आणलीये त्यांच्या निवासस्थानांवर आणि त्यात असे बळी जातात Sad

विस्मया, हर्पेन, प्राजक्ता, लिम्बुटिब्म्बू, दिनेशदा, गिरिजा, अश्विनीमामी, माधवी, रिया, तन्मय, बंडुपंत, इंद्रधनुष्य, बंडोपंत, साधना, जो-एस, गमभन, झंपी, ठो, इब्लिस, कांदापोहे, आणि भुंगा; सगळ्यांना प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद!

हर्पेन, लिम्बुटिब्म्बू,
सत्य हे सत्यच असते, त्याला विशेषणे लावू नये. >>> सत्य वचन!

दिनेशदा,
घुबड खरेच देखणे आहे. >>> आहे खरेच!

गिरिजा,
कर्मगतीच्या आड येवु नये , उगाच आपली गुंतागुंत होते अन सुख दु:खची लेबलं मनाला चिकटतात .....आपण अलिप्त् राहुन साक्षी स्वरुपाने पहात रहावे >>>> ठीक आहे.

अश्विनीमामी, भुंगा,
तुम्ही फायर ब्रिगेड किंवा अ‍ॅनिमल हेल्प लाइन ला फोन करू शकला असतात. कर्म गती वगैरे कर्म न केल्यावर म्हणायचे उगीच. नाही पटले. >>>> हा सगळा खेळ संपण्यास केवळ काही मिनिटेच लागली. हस्तक्षेप म्हणजे, घुबडाला वाचवण्याकरता कावळ्यांना हाकलायला जावे तर घुबडच जागा बदलत असे. त्यामुळे तो प्रश्न मिटला. फायर ब्रिगेडला किंवा कोणत्याही हेल्पलाईनला, अगदी अवधान राखून मी फोनही केला असता तरी, ते लोक आल्यावर रिकाम्या जागेखेरीज त्यांना काहीही दाखवता आले नसते आणि मी वेडा ठरलो असतो. शिवाय त्या बोलावलेल्या लोकांना हजार उत्तरे द्यावी लागली असती. माझा त्यानंतरचा तासभर तरी त्यात व्यर्थ गेला असता. त्या लोकांचा वेळ, साधने आणि पैशाचा अपव्यय झाला असता तो निराळा. तेव्हा तुम्हाला पटो न पटो, मला मी वागलो तेच योग्य वाटते आहे! लोकहो, आपण काय म्हणता?

माधवी,
घुबडाला उंच उडता येत नाही का? >>> रात्री येत असावे. दिवसा त्याचे डोळे दिपत असावेत!
पण आपण कावळ्यांच्या मधे गेलो तर ते आपल्याच मागे लागतात असाही अनुभव आहे. >>>> असा अनुभव आल्याचे मीही पाहिले आहे.

विस्मया,
पण घुबडाला दिवसा तरी उडता येते का ? >>>> हो. मात्र डोळे दिपून गेल्याने दिसत नसावे.
इतक्या देखण्या पक्षाला उगाचच अशुभ का समजले जाते कळत नाही. >>>> खरे तर शुभ समजावे. हॅरी पॉटरमध्ये त्यांची भूमिका चांगलीच महत्त्वाची असते.

तन्मय,
कदाचीत पंखाला जखम झाली असेल, त्यामूळे उडता येत नसेल. पण खूपच सूंदर होत घुबड...वाचायला हव होत अस राहून राहून वाटतय. >>>> मी पूर्णतः सहमत आहे!

बंडुपंत,
नक्कीच त्याला वाचवायला काहीतरी करायला पाहिजे होत. >>> काय?

लिम्बुटिब्म्बू,
बहुधा शिबी राजाची गोष्ट आम्ही विसरलो असू अस वाटतय. हा शिबी राजा तोच ना ज्याने पक्षाच्या बदल्यात मांडीचे मांस दिले? आता अगदी मांडीचे मांस नको द्यायला पण अशा प्रसंगात आपण काहीच केले नाही/करु शकलो नाही याची रुखरुख मात्र आयुष्यभर सोबत करते हे ही खरेच. >>>> अशी घटना जेव्हा माणसांसोबत घडते तेव्हा तुमच्या सूचनेचा अवश्य विचार/ आचार करावासा वाटतो आहे!

बंडोपंत,
पण कुत्र्यांनाही भूक असतेच. >>> म्हणूनच तर जीवो जीवस्य जीवनम्‌ म्हटले आहे! मात्र कावळ्यांचा केवळ तेवढाच, त्याला खाण्याचा, हेतू होता असे मला वाटत नाही.

साधना,
आधीच आपण निसर्गाची व्यवस्थित वाट लावलेली आहे. >>> खरे आहे.

जो,
झुन्ड वा कम्पु बनवुन सत्ता राबविणे हा ही एक स्थायी भावच!>> हो. आहे खरे तसेच. मात्र पशुपक्ष्यांबाबत बोलत असता आपण सगळेच जास्त प्रामाणीक आणि मुद्द्याला धरून बोलत असतो.

गमभन,
खुप वाईट वाटले. कावळ्यांना हाकलुन दिले पण आता काही उपयोग नव्हता. >>> दुर्दैव खरेच!
हे कावळे कबुतरांच्या घरटी, अंडी यांना का काही इजा नाही पोचवत? कारण कबुतरांची घरटी अगदी साधी आणि सहज दिसतील अशी असतात. >>>> मलाही हाच प्रश्न पडला आहे!

झंपी,
मलाही तेच प्रश्न पडले आहेत.

ठो,
तुमची माहिती खरी नाही. निर्मम हा शब्द पूर्णतः मराठी आहे. आपटे ह्यांचा शब्दरत्नाकर पाहा.

कांदापोहे,
फोटो व व्हिडीओ काढण्यापेक्षा त्याचा जीव वाचवला असतात तर उगाच हळहळ करायची वेळ आली नसती. >>> मला मुळीच हळहळ वाटत नाही आहे. मात्र अशी घटना कधी पाहिलेली नसल्याने विस्मय वाटला इतकेच.

गिरिजा,
एक निरागस प्रश्न : घुबड भुंग्यांना खातं का हो ? >>> कल्पना नाही!

Pages