|| प्लुटोपुराण ||

Submitted by kaushiknagarkar on 6 March, 2013 - 00:57

|| प्लुटोपुराण ||

सोलर सिस्टिम मधून हाकललारे शेवटी त्याला.

अरे वा. कोणाला?

प्लुटोला रे.

हो का? कुठून हाकलला म्हणलास?

सोलर सिस्टिममधून.

अस काय? एकदम हाकलला म्हणजे काहितरी स्कॅन्डल असणार..

हो स्कॅन्डलच म्हणायचं.

मग काय स्टॉक झोपला असेल. अाधीतरी सांगायचं. शॉर्ट केला असता. 'सोलर सिस्टिम्स' म्हणजे अल्टरनेटिव्ह एनर्जी काय रे? सध्या अल्टरनेटिव्ह एनर्जी एकदम हॉट अाहे म्हणतात. काय घेऊन ठेवायचे का एक हजार दोन हजार शेअर्स? नक्की वर जाईल.

अरे काय हजार दोन हजार घेतोयस? मी खऱ्याखुऱ्या सोलर सिस्टिम बद्दल बोलतोय. सो ल र. सि स्टि म. सूर्यमाला.

ठीक अाहे. नका सांगू. करा लेको पैशे. गुपचूप गुपचूप. अाम्ही मरतो असेच. अरे काय बरोबर घेउन जाणार अाहात का, डबोलं?

अरे अाता कसं सांगू बुवा तुला. मी अापल्या सूर्य अाणि ग्रहांबद्दल बोलत होतो. म्हणजे सूर्य, बुध, गुरू वगैरे .. शेअर्सबद्दल नव्हतो मी बोलत. जाउदे तो विषय.

अस्सं अस्सं. मग कोणालातरी हाकललं म्हणून काय म्हणत होतास?

अाता जाउदे म्हटल ना?

जाउदे कसं? अॉं! स्पष्ट सांग ना काय ते.

अरे स्पष्ट बोलायला भितो काय कुणाच्या बा.. चहा सांग अाधी.

इकडे एक दोन चहा अाणारे लौकर ह्या दुर्वास ऋषींसाठी. हं चल अाता सांग बर नीट.

मी म्हणालो प्लुटोला ग्रहमंडळातून काढून टाकला. प्लुटो हा ग्रह नाही असं ठरवलंय खगोलतज्ञांनी. अाता अाठच ग्रह राहिले सूर्यमालेत.

काय सांगतोस काय? प्लुटो नाही अाता? अरेरे फार वाईट झालं रे. अाता माझं कसं होणार?

जाणार अाहे कुठे? प्लुटो अाहे तिथेच अाहे. फक्त अाता तो ग्रह समजला जात नाही इतकच. अाणि तुला एकदम इतकं हताश व्हायला काय झालं?

हताश होऊ नको तर काय करू? अामचं सालं नशिबच भुक्कड. गेल्या महिन्यात तर सासरी जाऊन अालो ना?

मग त्याचा इथे काय संबंध?

संबंध नाही कसा? चांगले पन्नास हजार खर्चून हि नवग्रहांची अंगठी बनवून अाणली. लाभतीय म्हणाले गुरूजी. अंगठी घेताना सासऱ्यांना बरोबर नेलं होतं, अनुभवी म्हणून. तर त्यांनीच पैसे दिले. म्हटलं खरच लाभतीय असं दिसतं. लगेच प्रचिती अाली. अाता त्यातला एक खडा काढून टाकावा लागणार. प्लुटोचा खडा कोणता असतो रे?

अो महाराज! धन्य अाहे तुमची. ते अंगठीतले नवग्रह वेगळे अाणि अाकाशातले वेगळे. म्हणजे सगळे नाही पण बरेच.

हॅट, कायतरीच काय?

खरच सांगतोय मित्रा. सांग बरं अाकाशातले नवग्रह कोणते ते?

नऊ कुठले? अाता अाठच की.

कळलं रे. सांग तर खरं.

म्हणजे बघ बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनी, नेपच्यून, प्लुटो अाणि अजून एक अाहे. युरेका असं काहीतरी नाव अाहे.

युरेनस. गुरू, शनी मग युरेनस, नंतर नेपच्यून अाणि सर्वात शेवटचा प्लुटो. पण हे अाठच झाले की.

खरच की. अाणि त्यातलासुध्दा प्लुटो जाणार म्हणतोस, म्हणजे मग सातच रहातात.

पृथ्वी विसरतोयस तू माणसा.

हो पृथ्वी. पृथ्वी. ब्लू प्लॅनेट.

बरं अाता अंगठीतले नवग्रह कोणते?

हे बघ. हा पिवळा खडा अाहे तो गुरूचा, पुष्कराज. लाल माणिक अाहे तो मंगळाचा. नील अाहे शनीचा. अाणि हे इतर अाहेत ते राहिलेल्या ग्रहांचे. बरोबर ना?

ठीक अाहे. थोडं बरोबर अाणि थोडं चूक. उदाहरणार्थ, माणिक (Ruby) हा सूर्याचा (रवी) खडा, मंगळाचा नव्हे. मंगळाचा खडा अाहे पोवळे (Coral). गुरूचा पुष्कराज (Yellow Sapphire) अाणि शनीचा नील (Blue Sapphire) हे दोन्ही तू बरोबर सांगितलस. अाता अंगठीतले इतर खडे अाहेत ते म्हणजे; पाचू (Emerald) बुधाचा, मोती (Pearl) चंद्राचा, हिरा (Diamond) शुक्राचा, गोमेद (Hessonite) राहूचा अाणि वैडुर्य (Cat's Eye) हा केतुचा. असे हे अंगठीतले नवरत्नांचे खडे.

वा! किती सुयोग्य अाणि कलात्मक जोड्या लावल्या अाहेत ना? बघ ना मंगळ अाणि रवी दोघेहि लाल, पण रवी तेजस्वी असल्याने माणिकाची योजना झाली असावी. गुरु पिवळसर दिसतो, चंद्र शांत अाणि शुक्र तेजस्वी म्हणून पुष्कराज, मोती आणि हिरा ही संगती पण योग्यच वाटते. मात्र बुध, शनी आणि राहू-केतु बद्दल काहो सांगता येत नाही.

खरं अाहे. मला वाटतं की ही नवग्रहांची संकल्पना अापल्याकडे दक्षिणेतून अाली असावी. दाक्षिणात्य, विशेषत: तमिळ लोकांमधे राहूकालाच खूप महत्व असतं. पाचू, गोमेद अाणि वैडुर्य हि तिन्ही रत्ने भारतात सापदतात. पण विशेष म्हणजे गोमेद (ग़र्नेत म्हणनही अोळखला जातो) अाणि वैडुर्य हे तमिळनाडु अाणि श्रीलंकेमध्येच सापडतात. गोमेदचा रंग दालचिनीसारखा तर वैडुर्य हे मांजराच्या दोळ्यासारखे खरोखरच दिसते. अं ह, अंगठीतलं नाही दिसणार, ते बरच मोठं अाणि चांगल्याप्रतीच असाव लागतं त्यासाठी.

पण चंद्र हा तर ग्रह नाही ना?

हो ना. चंद्र नाही तसाच सूर्यही नाही, पण तरी ते अंगठीमधे अाहेत. बुध, शुक्र, मंगळ, गुरू अाणि शनी हे पाच ग्रह अाकाशातही अाहेत अाणि अंगठीतही. राहु-केतू फक्त अंगठीतच अाणि पृथ्वी हा ग्रह अाहे पण नवग्रहात तिचा समावेश नाही. म्हणजे अापण जे नवग्रह मानतो त्यातले फक्त पाच ग्रह प्रत्यक्षात अाकाशात दिसू शकतात.

युरेनस, नेपच्यून, प्लुटोच तर अजून नावही घेतलं नाही अापण. मला कोणीतरी सांगितल्याच अाठवतयं कि राहु-केतू म्हणजे युरेनस आाणि नेपच्यून.

छे. छे. राहु-केतू हे ग्रह नाहीतच. प्रत्यक्षात राहु अाणि केतू हे दोन बिंदू अाहेत चंद्र सूर्याच्या कक्षेवरचे. पृथ्वीवरून पाहताना सूर्याचा जो मार्ग दिसतो त्याला अायनिक वृत्त म्हणतात. या अायनिक वृत्ताला चंद्राचा मार्ग दोन टिकाणी छेदून जातो. त्या दोन छेदबिंदूंना राहु अाणि केतू अशी नावे दिली अाहेत अापल्या ज्योतिषशास्त्रात.

पण याच दोन बिन्दूंच एवढं महत्व का ?

कारण आपापल्या मार्गावरून जाताना जर चन्द्र आणि सूर्य या टिकाणी एकाच वेळी आले तर ...

अरे बापरे ! त्यांची टक्कर . हाहा:कार ?!

टक्कर कशी होईल? चंद्र पृथ्वीपासून अगदी जवळ आहे आणि सूर्य कितीतरी दूर.

हो हो. खरच की. सुटलो बुवा.

सुटतोस कसा? ग्रहण लागेल त्याचा काय?

ग्रहण कसं लागेल?

मग पृथ्वीवरून पहाताना चंद्र सूर्य एका रेषेत आले तर काय होईल?

चंद्र सूर्याला झाकून टाकेल.

त्याला काय म्हणतात?

सूर्यग्रहण. कळलं, पण ही अंगठी आहे ना, त्यामुळे ग्रहणाचा काही प्रॉब्लेम नाही. होऊ दे ग्रहण.

तुला नसेल, पण आपल्या पूर्वजांना होता. ध्यानीमनी नसताना भरदिवसा अंधारून येतं. सूर्य अचानक दिसेनासा होतो. तो परत पूर्ववत होईल का? की त्याला कोणी गिळून टाकला? अशा अनेक शंका कुशंका त्यांना त्रास देत असणार. चंद्र सूर्य एका रेषेत आल्यामुळे ग्रहण होतं हा खगोलशास्त्रीय शोध त्यांनी राहू केतूच्या रूपाने मांडला.

पटलं

म्हणजे नुसत्या डोळ्यांनी दिसणारे पाच ग्रह हे दोन्हीकडे आढळतात यात नवल नाही. युरेनस नुसत्या डोळ्यांनी डिसू शकतो म्हणतात, पण त्यासाठी नजर फारच तीक्ष्ण हवी. अाणि तीसुध्दा एकाची नव्हे, अनेकांची. नाहीतर त्याला वेडा ठरवतील की. प्रत्यक्षात पाहू शकणारे फारच थोडे लोक असणार. कारण कोणत्याच प्राचीन संस्क्ृतीला, भारतीय, चिनी, बॅबिलोनियन, ईजिप्शियन, ग्रीक, रोमन, माया, ईंका; कोणालाच युरेनसाची माहिती नसावी असं दिसतं

मग युरेनस सापडला तरी कसा?

सन १७८१ मध्ये सर विल्यम हर्षल नावाच्या खगोल शास्त्रज्ञाने स्वत: बनविलेल्या दुर्बिणीतून एक नवाच गोल पाहिला. हा धूमकेतू असणार अशी त्याची खात्री झाली. परंतु काही काळाने लक्षात आले की याचे वागणे धूमकेतुसारखे नाही. धूमकेतु कापसाच्या पुंजक्यासारखा ढगळ असतो. याला छान गोल तबकडीसारखा आकार होता. धूमकेतु सूर्याकडे येतो आणि त्याला शेपूट फुटते, जसाजसा तो जवळ येतो तशी त्याची तेजस्विता वाढत जाते आणि शेपूट लांब होत जाते. हा गोल असे काहिच लक्षण दाखवेना. अखेर अगदी विल्यम हर्षलला देखील मान्य करावे लागले की हे शेंडेनक्षत्र नसून सूर्यामालेचे शेंडेफळ आहे. त्याकाळात धूमकेतु शोधायची निरिक्षकांमध्ये चढाअोढ होती, त्यामुळे त्याची फार निराशा झाली. धूमकेतु असता तर 'हर्षल' याच नावाने ओळखला गेला असता; परंतु हे बाळ ग्रहकुळातील असल्यामुळे युरेनस असे नामकरण झाले. आपल्या पंचांगात अजूनही 'हर्षल' हेच नाव वापरात आहे.

म्हणजे चुकून सापडला म्हणायचा.

चुकून सापडला असं म्हणणे तितकासं बरोबर नाही. अनेक वर्षांचे अथक परिश्रम, विल्यम आणि त्याची बहीण कॅरोलाइन यांची अविश्रांत मेहेनत, विल्यमने बनविलेली अफलातून दुर्बिण आणि इतर अनेक वेधयंत्रे, अफाट थंडीत रात्ररात्र बसून केलेली काटेकोर निरीक्षणे या सार्‍यांचा परिपाक म्हणजे युरेनासाचा शोध. हा चुकून लागला असं कसं म्हणता येईल?

मग नेपच्यूनही असाच सापडला का?

नेपच्यूनचा शोध म्हणजे आयझाक न्यूटन झिंदाबाद!

आता न्यूटनला इथे कोठे आणतोस बुवा? तो तर केंव्हाच वर गेला होता ना?

वा! मान लिया भाई. तुम्हारेको ईतना तो पता है की जाब नेपच्यून सापड्या तब न्यूटन वहां होईच नही सकता था. लेकीन बेटे, तू तो ए जानता है की आदमी उपर जाता है फीरभी अपने करतूत पीछे छोड जाता है.

न्यूटनके करतूत? याने गुरूत्वाकर्षण के कायदे कानून?

जी हां जनाब

ए तू हिंदी फाडू नको रे बाबा.

सॉरी. झालं असं की युरेनस आपल्या कक्षेमध्ये फारच हळूहळू पुढे सरकत होता. आतापर्यंत सर्वात शेवटचा ग्रह होता शनि. त्याला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला २९ वर्षे लागतात. युरेनसाला लागतात ८४ वर्षे. म्हणजे कोणी एकजण त्याच्या एका आवर्तनाची निरीक्षणे करू शकेल अशी शक्यताच नाही. पण तरीही बरीच निरीक्षणे केली गेली होती. त्यावरून गणित मांडून त्याची कक्षा ठरविली गेली. गुरू, शनि, आदी ग्रहांसाठी अशी गणिते मांडून त्यांच्या कक्षा आधीच ठरविल्या गेल्या होत्या. आणि त्याप्रमाणे कोणत्या वेळी गुरू किंवा शनि कोठे सापडेल ते अचूकपणे सांगता येत होते. पण हा गडी युरेनस काही न्यूटनला जुमानेना. तो भलतीकडेच सापडायचा. न्यूटनच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्ना होता. जॉन अॅडम्स आणि जॉं जोसेफ लेव्हेरिए या दोन गणितज्ञांनी अनेक वर्षे खर्च करून निष्कर्ष काढला की युरेनसाला कोणीतरी खेचत असणार. कोणीतरी म्हणजे एखादा अज्ञात ग्रह. त्यांनी त्या ग्रहाची कक्षा काया असेल, त्याचे वस्तुमान काय असेल हे ही संगितले. म्हणजे थोडक्यात केवळ कागदावर आकडेमोड करून, एकदाही दुर्बिणीच्या नळीत डोळा ना घालता त्यांनी संगितले अमुकवेळी इथे इथे पहा. सापडेल. आणि सापडला. अर्थात अडचणी आल्या मधे, नाही असं नाही. जॉन अॅडम्स ब्रिटिश अाणि लेव्हेरिए हा फ्रेंच होता. त्यांची एकमेकांशी अोळख तर सोडाच एकमेकांची माहितीसुध्दा नव्हती त्यांना. जॉनने त्याचे भाकित लेव्हेरिएच्या एक वर्ष आाधी केले होते पण वरिष्ठांची परवानगी नसल्याने प्रसिध्द केले नाही. लेव्हेरीएला एक शास्त्रज्ञ म्हणून नाव असलं तरी फ्रेंच सरकारची परवानगी मिळू शकली दुर्बिण वापरण्यासाठी. अखेर त्याच्या अोळखीच्या एका जर्मन खगोलशास्त्रज्ञाने कशीतरी शोध घेण्यासाठी परवानआगी मिळवून एकदाची दुर्बिण आकाशाकडे रोखल्यावर मात्र काही तासातच नवा ग्रह सापडला. न्यूटनच्या नियमांचा हा मोठाच विजय होता.

बबबबब... ही किती सालची गोष्ट?

२३ सप्टेंबर १८४६ या दिवशीई योहान गॉल नावाच्या शास्त्रज्ञाने नेपच्यून सर्वप्रथम पाहिला. म्हणजे सुमारे १६० वर्षांपूर्वी.

इंटरेस्टिंग … युरेनसचा शोध लागल्यापासून त्याची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्याअाधीच नेपच्यूनचाही शोध लागलेला होता म्हणायचा. मग युरेनसने न्यूटनच्या नियमापुढे नांगी टाकली तर शेवटी.

अं … बऱ्याच अंशी. पण तरीही युरेनसची कक्षा अाणि त्याचा भ्रमणवेग याचा पूर्णपणे हिशोब लागत नव्हताच.

ए मराठीत बोल ना.

म्हणजे अजूनही युरेनस गणिती अाकडेमोडीनुसार जिथे असायला हवा तिथे सापडत नव्हता.

म्हणजे अजून एक ग्रह?

अाणखी काय नाहीतर? यावेळी शोध घ्यायचं मनावर घेतलं, पर्सिवल लोवेल नावाच्या अमेरिकन खगोलतज्ञाने. लक्षात घे अमेरीकन शास्त्रज्ञाने.

त्यात काय लक्षात घ्यायचं?

इतकचं कि अाता खगोलशास्त्रातील संशोधनाचं पुढारीपण हळुहळू पण निश्र्चितपणे अमेरिकेकडे येत चाललं होतं. त्यापूर्वीची शंभर दोनशे वर्ष ब्रिटन अाणि फ्रान्समधे चढाअोढ होती. त्या महासत्ता उतरणीला लागल्या होत्या अाणि त्याचबरोबर अमेरिकेचा सुवर्णकाळ उदयास येत होता याचा हा एक बारिकसा दाखला.

इंटरेस्टींग. याबद्दल अजून कधीतरी सांगना नंतर.

समजलो. अात्ता प्लुटोबद्दल सांग असचना? सांगतो. तर हा पर्सिवल लोवेल म्हणजे एक विक्षिप्त वल्ली होता. बड्याघरचा होता. लोवेलने अॅरिझोनामध्ये फ्लॅगस्टाफ नावाच्या गावी एक खाजगी वेधशाळा उभारली होती. त्याने या प्लॅनेट 'एक्स्'चा शोध जारीने सुरू केला. परंतु १९१६ साली त्याचा मृत्यू होइपर्यंत त्यात त्याला यश अाले नाही. पुढे १९२९ सालापर्यंत शोध बंदच पडला होता. १९२९ साली वेधशाळेचे कार्य पुन्हा सुरू झाले अाणि योगायोगाने क्लाइड टॉमबॉ नावाच्या एका शेतकऱ्याच्या पोराने वेधशाळेत नोकरी धरली. शालेय शिक्षण जेमतेम पुरे झालेले; पण त्याने स्वत: एक टेलेस्कोप (दुर्बिण) बनविला होता. त्यातून वेध घेउन त्याने मंगळाची चित्रे काढली होती. त्या अाधारावर त्याला ही नोकरी मिळाली. काम अतीशय कठीण अाणि कंटाळवाणे होते. (नाहीतरी कोणीतरी अाधीच नसते का केले?) रोज रात्री कडाक्याच्या थंडीत अाकाशाच्या वेगवेगळ्या भागाची छायाचित्रे काढायची. एकेका चित्रासाठी अनेक तासांची तपश्र्चर्या. मग दिवसा त्या छायाचित्रांच्या प्रती काढून प्रत्येक चित्र मायक्रोस्कोप खाली घालून प्रत्येक तारा हलला अाहे की नाही ते पहायचे.

अरे. रात्री टेलेस्कोपमधे डोळा घालायचा, दिवसा मायक्रोस्कोपमधे. मग झोपायच केंव्हा? हे असं रोज?

सांगतोय काय तर मग? अाणि अॅरिझोनामधल्या थंडीची तर तू कल्पनाही करू शकणार नाहीस. इथे मुंबईत थंडीने हुडहुडी भरते तुला. हे अस जवळजवळ एक वर्षभर चालू होतं

मग?

अखेर १९३० च्या फेब्रुवारीमधे त्याला प्लॅनेट एक्स सापडला. पर्सिवल लोवेलचे भाकीत खरे ठरले.

वा वा. जोरदार टाळ्या. प्लॅनेट 'एक्स' म्हणजेज प्लुटो तर. अाणि अाता तो 'एक्स' प्लॅनेट म्हणयचा. नाही का?

वाहवा. बहोत खुब. बहोत खुब.

पण का? प्लुटोला ग्रह म्हणायचे नाही असा अाग्रह का?

एकेकाच नशीब असतं बघ. नवा ग्रह सापडला खरा, पण अपुऱ्या दिवसाच्या मुलासारखं त्याचं वजन, वस्तुमान अगदीच कमी होतं. युरेनस अाणि नेपच्यूनसारख्या भीमकाय ग्रहांना खेचण्यासाठी प्लॅनेट एक्सचे वस्तुमान पृथ्वीच्या अनेकपट असणे अावश्यक होते. पण प्लुटोचे वस्तुमान अगदीच किरकोळ निघाले. एक लक्षात घे की हा पठ्ठ्या सापडला तो महामुष्किलीने. त्यावेळचे तंत्रज्ञान, उपकरणांची अचूकता यावर अाधारीत त्याची कक्षा, वेग, वस्तुमान वगैरेचे अंदाज होते. जसजसे नवनवे तंत्रज्ञान उपलब्ध होत गेले, उपकरणांची अचूकता वाढत गेली तसतसे प्लुटोचे वस्तुमान अाणि अाकार कमीकमी होत गेला. सध्या प्लुटोचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या १/२००० इतके समजले जाते. यातच अाणखी भर म्हणजे १९८९ साली जेव्हा व्हॉयेजर या यानाने नेपच्यूनची पुनर्मोजणी केली तेव्हा असे लक्षात आाले की नेपच्यून अाणि युरेनसमध्ये पूर्णपणे गुरुत्वाकर्षणाचे संतुलन (balance) अाहे. नेपच्यूनच्या वस्तुमानाच्या अंदाजातच चूक होती अाणि त्यामुळे युरेनसच्या कक्षेचा मेळ जुळत नव्हता. म्हणजे ज्या कारणासाठी प्लॅनेट एक्स चा शोध सुरू झाला ते कारणच मुळी अस्तित्वात नव्हते. चुकून सापडला म्हणायचा तो प्लुटो.

चुकून का असेना, पण अाता सापडलाना? फिरतोयना तो इतर ग्रहांप्रमाणे सूर्याभोवती? लहान असला तर असू देत ना. बुध तरी कुठे फार मोठा अाहे? कशाला काढता रे त्याला?

सूर्याभोवती फिरतो हे खरय, पण अॅस्टेरॉइडस् सुध्दा फिरतात. आापण ज्याना अशनी म्हणतो. मंगळ अाणि गुरू यांच्यामधे एक पट्टा (Asteroid belt) अाहे त्यात हजारो छोट्यामोठ्या अॅस्टेरॉइडस् अाहेत. त्यापैकी काही, सीरस सारख्या, शेकडो किलोमीटर लांबीरुंदीच्या अाहेत. व्यास (diameter) म्हटलो नाही कारण ह्या ग्रहांसारख्या गोल नसतात. तर या अॅस्टेरॉइडस् ना ग्रह मानत नाहीत. त्यांना नवीन संज्ञा अाहे मायनर प्लॅनेटस्, किरकोळ ग्रह. ग्रहांच्या कक्षा अगदी वर्तुळाकार (perfect circle) नसल्या तरी अती लंबवर्तुळाकार (elliptical) नसतात. तसच ग्रहांच्या कक्षा एकात एक (concentric) असतात, एकमेकांना त्या छेदून जात नाहीत. प्लुटो हे दोन्ही संकेत पाळत नाही. त्याची कक्षा लंबवर्तुळाकार आाहे. इतकच नाही तर त्याच्या २४० वर्षाच्या प्रदक्षिणाकाळापैकी वीस वर्षे त्याची कक्षा नेपच्यूनच्या कक्षेच्या आातून जाते.*

मग त्यांची टक्कर होण्याची शक्यता?

नाही. कारण बाकी सर्व ग्रहांच्या कक्षा एका पातळीत असताना प्लुटोची कक्षा मात्र वेगळ्या पातळीत आाहे. ग्रहांना उपग्रह असतात, असू शकतात. नवल म्हणजे इतका बारका असूनही प्लुटोलाही उपग्रह नुकताच सापडला अाहे. त्याच नाव 'शॅरन'. पण इथेही विचित्रपणा अाहेच. प्लुटोचा व्यासाने ग्रहांमध्ये सर्वात लहान अाहेच पण सात उपग्रहांपेक्षा, त्याच चंद्रही अालाच, देखील तो लहान अाहे. इतर ग्रहांच्या अाणि त्यांच्या उपग्रहांच्या व्यासामधे प्रचंड फरक असतो. प्लुटो अाणि शॅरनच्या व्यासात फारसा फरक नाही. शिवाय दोघांमधे अंतरही अगदीच कमी अाहे. थोडक्यात इथे ग्रह उपग्रह असा प्रकार नसून हि एक जोडगोळी अाहे. अाणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्लुटो अाता एकटा राहिला नाही. १९९२ सालापासून साधारणपणे प्लुटोच्याच अाकारमानाच्या बऱ्याच जोडगोळ्या सापडल्या अाहेत. अाणि अाणखी सापडत अाहेत. या सर्वांना ग्रह म्हणायचं तर ग्रह नऊ, दहा न रहाता शेकडो, कदाचित हजारो होतील. म्हणजे पंचाईत.

पण फक्त प्लुटोला ठेवायचरे. कशाला काढायचं उगाच?

फारच बुवा तुझं प्लुटोवर प्रेम. अाता त्यांनी एक नवीनच वर्ग निर्माण केला अाहे. ड्वार्फ प्लॅनेटस, खुजा ग्रह. प्लुटो हा या वर्गातला पहिला मानकरी अाहे. म्हणजे ग्रहांमधला शेवटचा टिल्लू होता त्याऐवजी अाता सर्वात बलदंड (सध्यातरी) खुजा ग्रह म्हणून अोळखला जाईल तो अाता.

असं का, मग चालेल.

तर अशी ही प्लुटोच्या हकालपट्टीची कहाणी. सुरस अाणि चमत्कारीक. अजून काय? बोल.

अजून काय? बरं वाटलं ही कहाणी ऐकून. पण एक गोष्ट राहिलीच की. 'सोलर सिस्टीम्सचा' टिकर सिंबॉल …

सांगतो हं, सांगतो. त्याअाधी जरा त्या भिंतीवर डोकं आपटून येतो अाणि मग सांगतो. चालेल ना?

।। इति श्री प्लुटोपुराणम् संपूर्णम् ।।

* प्लुटोविषयी (किंवा एकूणच कोणत्याही वैज्ञानिक प्रश्नाविषयी) अधिक माहितीसाठी पाहा: http://en.wikipedia.org/wiki/Pluto
या वेबसाईटवर प्लुटो कसा सापडला हे दाखवणारे एक छायाचित्र, तसेच त्याची कक्षा कशी विचित्र अाहे हे दाखवणारी दोन चलत् चित्रे अाहेत, ती अवश्य पाहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा लेख पण (मागच्या लेखासारखाच) एकदम मस्त. प्लुटोला ग्रहमालेतून नक्की कटाप का केलं ते आत्ता कळले. Happy

अजूनही लेख येत राहूदेत.

kaushiknagarkar,

लेख चांगला खुलवलाय. तांत्रिक बाबींची माहिती संवादाद्वारे योग्य रीतीने पोहोचतेय! Happy मलाही एकदोन गोष्टीं आठवल्या म्हणून सांगाव्याश्या वाटल्या. कृपया गोड मानून घ्याव्या. Happy

१.
>> कोणालाच युरेनसाची माहिती नसावी असं दिसतं

महर्षी व्यासांना युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो यांची माहिती होती. त्यांनी त्यांना अनुक्रमे श्वेत, श्याम आणि तीव्र अशी नावे दिली होती.

२.
>> इतर ग्रहांच्या अाणि त्यांच्या उपग्रहांच्या व्यासामधे प्रचंड फरक असतो. प्लुटो अाणि शॅरनच्या
>> व्यासात फारसा फरक नाही. शिवाय दोघांमधे अंतरही अगदीच कमी अाहे. थोडक्यात इथे ग्रह उपग्रह
>> असा प्रकार नसून हि एक जोडगोळी अाहे.

यावरून चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह मानवा की नाही या वादाची आठवण झाली. उपग्रह म्हणून चंद्र पृथ्वीच्या मानाने प्रचंड आहे. त्यामुळे पृथ्वी-चंद्र हे जोडग्रह मानावेत असाही एक मतप्रवाह आढळून येतो. दोन खगोलीय वस्तू ग्रहोपग्रह मानाव्यात की जोडग्रह यासंबंधी तीन निकष आहेत.

नि१. सहोदरसंबंध : दोन ग्रहवस्तू एकाच कच्च्या मालातून बनल्या तर त्यांना जोडग्रह मानावे. चंद्र आणि पृथ्वी वेगवेगळ्या मसाल्यातून निर्माण झालेले असल्याने ते जोडग्रह नाहीत. मात्र पृथ्वीभोवती फिरणारे किरकोळ खडक जर पृथ्वीसारख्याच मसाल्यातून उत्पन्न झालेले असले तर त्यांना पृथ्वीचे जोडग्रह म्हणणे फारच अतिशयोक्त वाटते. विशेषत: त्यांचे आकार इतके छोटे आहेत की ते उपग्रह म्हणूनच वर्णिले जाण्यायोग्य आहेत.

नि२. वस्तुकेंद्र (Centre of Mass) : जर दोन वस्तूंच्या वस्तुमानाचे केंद्र (Centre of Mass) मोठ्या वस्तूच्या बाहेर असले तर त्या दोन वस्तू जोडग्रह मानाव्यात. प्लुटो आणि शारन यांचे वस्तुकेंद्र प्लुटोच्या बाहेर आहे. त्यामुळे ते जोडगोळी धरावयास हरकत नाही. पृथ्वी आणि चंद्राचे वस्तुकेंद्र पृथ्वीच्या पोटात आहे. त्यामुळे ही जोडी ग्रहोपग्रह मानायला हरकत नाही. मात्र गुरूग्रह आणि सूर्याचे वस्तुकेंद्र सूर्याच्या बाहेर आहे. त्यामुळे सूर्य नि गुरू हे जोडग्रह होतात. या प्रसंगी हाही निकष फसतो.

नि३. रस्सीखेच (Tug of War) : या निकषात छोट्या वस्तूवरील सूर्याच्या आणि मोठ्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण बलांची तुलना केली जाते. सूर्यमालेतल्या बहुतेक उपग्रहांवर त्यांच्या स्वामी ग्रहांची खेच सूर्यापेक्षा जास्त आहे. मात्र याला चंद्र अपवाद आहे. पृथ्वीची चंद्रावर गुरुत्वीय खेच सूर्याच्या केवळ ४६% आहे. त्यामुळे चंद्र पृथ्वीला बांधला गेला नसून सूर्याला बांधला गेला आहे असे अनुमान निघते. अर्थात, पृथ्वी-चंद्र हे जोडग्रह ठरतात. मात्र अशीच परिस्थिती नेपच्यूनच्या दोन किरकोळ उपग्रहांबाबतही आहे. सूर्याची त्यांच्यावर खेच नेपच्यूनपेक्षा जास्त आहे. मात्र ते नेपच्यूनपेक्षा अतिशय छोटे असल्याने त्यांना नेपच्यूनचे जोडग्रह म्हणणे जिवावर येते.

सारांश : जोडग्रह आणि ग्रहोपग्रह यांच्यात सुस्पष्ट भेद दर्शवणारी कुठलीही एक परिपूर्ण व्याख्या या घडीला अस्तित्वात नाही. या माहितीचा स्रोत अर्थात विकीपादाचार्य आहेत. Happy : http://en.wikipedia.org/wiki/Double_planet

लांबलचक संदेश वाचल्याबद्दल धन्यवाद! Happy

आ.न.,
-गा.पै.

गा. पै.

तुम्ही फारच छान आणि माहितीपूर्ण लिहिलं आहे. माझा मराठी टंकलेखनाचा वेग हा प्रकाशाला लाजवेल असा आहे म्ह्णून पुढचे उत्तर इंग्रजीत लिहीतो. राग नसावा.

1) This is new to me. I can certainly believe Vyass Maharshi knew about Urenus. Urenas is visible to the naked eye; but skies have to be really dark and eyes really good. It seems inhabitants of the Tahiti islands could regularly spot Urenus. And even before Hershel, Urenus was spotted through telescope. Thus the point I made was, it was not enough for someone to randaomly spot it because they needed to know what they were looking at and make others convince themselves too. Hershel was the first to do so, at least the first one to be recognized as having done so. For that he had to spend years night after night making observations, keeping records and making sense out of the data to develop an orbit.

Now about Neptune and Pluto I find it a bit difficult to digest; but I would love to learn more before jumping to conclusions either way. Can you point to references?

2) This is a great discussion. Thanks for taking the trouble to bring it to this forum. About 2.2 it is the reason why moon always shows one side to the Earth. In fact since the tidal forces exerted by moon result in slowing down earths rotation ever so slightly over eons Earth will slow down enough to also present the same side to moon all the time. Any true 'Jod-Goli' is like a pair of girls playing 'fugadi'. While spinning around each other they are always facing each other.

thanks for stimulating conversation.

कौशिक

गामा पैलवान,

तुम्ही लिंक दिलेली आहे हे पुन्हा एकदा वाचताना ध्यानात आले. त्या वेबसाइटवर जाऊन वाचून पाहिले. त्यांच्या गणिताच्या अचूकतेबाबत मी काही सांगू शकत नाही. सर्वसाधारणपणे अशा गुंतागुंतीच्या आकडेमोडीत निदान दोन निरनिराळ्या मार्गाने येऊन तोच अंतीम निष्कर्ष येतो हे पडताळून पाहावे लागते. इथे तसे दिसले नाही. नसेलच असे मला म्ह्णायचे नाही.

त्यांनी काढलेले दुसरे दोन निष्कर्ष मात्र विवादास्पद वाटतात. श्वेत या शब्दाचा अर्थ ग्रिनीश व्हाइट असा मला दोन ऑनलाइन शब्दकोशात सापडला नाही. तसेच श्याम चा अर्थ ब्लूइश व्हाइट हे ही मला कुठे सापडले नाही.
यांचं म्हणणं बरोबर असावं अशी मनोमन इच्छा असली तरी त्याचा अर्थ फारतर इतका होउ शकतो की व्यासांना माहित होतं पण पुढे ते हरवून गेलं. नाहीतर गुरू, आणि शनीबरोबर श्वेत आणि श्याम सुध्दा आपल्या पारंपारीक ज्योतिषशास्त्राचा भाग होउन गेले असते असं मला वाटतं.

कौशिक

kaushiknagarkar,

व्यासांनी जे तीन ग्रह नोंदवले ते आजच्या युरेनस, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांशी जुळतात. ही गणिते प.वि.वर्तक यांनी केली आहेत. यावरून व्यासांना ते माहीत असावेत असं वाटतं. श्वेत व श्याम हे रंग केवळ पुकारनावं (लेबल्स) आहेत.

आकडेमोडीच्या दृष्टीने बघता युरेनससाठी वर्तकांनी तीन निरीक्षणे घेतली आहेत. ऑक्टोबर १९७९, ऑक्टोबर १८८३ आणि १९३०. ही निरीक्षणे घेऊन केलेली बाह्यप्रक्षेपित (extrapolated) भाकितं एकमेकांशी ५ अंशांत (३६० अंश हा पाया) जुळतात. नेपच्यूनचीही १८७९, १९४८ आणि १९७९ अशी तीन निरीक्षणे घेतली आहेत. यांची भाकितं एकमेकांशी ६ अंशांत जुळतात.

प्रस्तुत दुव्यावर प्लुटोची गणिते दिसत नाहीत. मात्र त्या स्थळावर इतरत्र सापडावीत.

बाकी, हे तिन्ही ग्रह फलज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नसावेत. ज्योतिषशास्त्र (astronomy) आणि फलज्योतिषशास्र (astrology) यात फरक आहे.

हे माझं वैयक्तिक मत.

आ.न.,
-गा.पै.

मस्त लिहिले आहे!

आपल्या पुर्वजांना युरेनस पलीकडील ग्रह माहीत असणे अशक्य (परग्रहवासीयांशी त्यांचे संधान असेल तर शक्य आहे).

गुरु-सुर्याचा वस्तुमध्य सुर्याच्या त्रिज्येइतकाच सुर्यापासुन दूर आहे (म्हणजे सुर्याच्या बाहेर आहे असे नाही):
http://astro.unl.edu/naap/esp/centerofmass.html

केवळ दोन वस्तुंमधील गुरुत्वीय कॅल्क्युलेशन्स सोपे असतात, स्थीरता कोणत्या स्थितीत असेल हे सांगणे सहज शक्य असते (स्थीरता म्हणजे अढळपद नाही, तर ते एकमेकांवर आपटणार नाहीत येवढेच). त्याचाही इतिहास मनोरंजक आहे. मागच्या महिन्यापर्यंत तिनच प्रकार माहीत होते या स्थीरतेचे, पण दोन सर्बीयन गणितज्ञांनी अशा अनेक 'फॅमिलीज' आपल्याला आता अवगत करून दिल्या आहेत: http://news.sciencemag.org/sciencenow/2013/03/physicists-discover-a-whop...

अंगठ्यांबाबत चांगला बॅलन्स साधला आहे.

> अाणि अॅरिझोनामधल्या थंडीची तर तू कल्पनाही करू शकणार नाहीस.
सध्या मात्र वातावरण एकदम मस्त आहे (एक दिवसाचा पाहुणा).

खूपच मनोरंजक अाणि अद्भुत अशी माहीती. हा विषयच असा आहे, कितीही पदर उलगडले तरी अजून असतातच. अगदी दु:शासन झाल्यासारखं वाटतं. Happy

aschig, तीनवस्तूकुटुंबांच्या दुव्यावरील लेख खूपच रोचक आहे. Happy धन्यवाद! अश्या वस्तू बघायला मिळाल्या का? किंवा मिळतील का? आपल्या वा अन्य आकाशगंगेत?
आ.न.,
-गा.पै.

गा.पै., आपल्याला दूरवर असलेल्या आयसोलेटेड सिस्टीम्स सापडणे सोपे नाही. सध्या ग्रहांच्या बाबतीत थोडेफार होते आहे (केपलरने शोधलेल्या). खाली दोन दुवे दिले आहेत. त्यातील काही या 'नव्या' स्थीर-प्रनालींप्रमाणे असतील का याची फार काही कल्पना नाही. स्वतःची सिस्टीम बनवण्याबद्दलचा एक मस्त खेळ (ऑनलईन) पण होता पण आत्ता दुवा सापडला नाही.

http://www.newscientist.com/article/dn20160-two-planets-found-sharing-on...

http://science.nasa.gov/science-news/science-at-nasa/2012/12sep_weirdpla...

http://www.independent.co.uk/news/science/truth-turns-out-to-be-far-stra...

aschig, हो आठवतो तो खेळ मला. Happy त्याचा दुवा तुम्हीच दिला होता बहुतेक. तसं असेल तर प्रशासकांना विचारता येईल. तुमच्या पोष्टी एकत्र करायच्या आणि त्यातले जालनिर्देश (यूआरेल) शोधायचे.
आ.न.,
-गा.पै.

Pages