"अहो या लायनीत फार पैसाय"
"मग व्हा चांभार"
"नाही नाही खरं सांगतोय... भांडवल नाही काही नाही... झाडाखाली बसायचं... येईल त्याची चप्पल शिवून द्यायची.. दहा दहा रुपये घेतात... दिवसाचे चारपाचशे कुठे गेले नाहीत..."
"चला... मी निघतो.."
"हां ठीके.. या उद्या"
केळकरला आणि कर्वेला हात करून मी अॅक्टिव्हा ऑन केली आणि गर्दीतून वाट काढत गर्दीलाच शिव्या मोजत निघालो. मनात केळकरचे विचार होते. मध्यंतरी तीनचाकी टेंपो घ्यायला निघाला होता केळकर. त्याला वाटले की टेंपोला भरपूर भाडे मिळते. वर पुन्हा फिरता येते ते वेगळेच. पण त्याला टेंपो परवडत नव्हता. मग टेंपोचालक बनून पाहिले त्याने. दोन दिवस टेंपोत बसून नाक्यावर इतर टेंपोवाल्यांबरोबर चकाट्या पिटत राहिला. 'लाईन' समजून घेतली. पण गिर्हाईक आले नाही. दोन गिर्हाईके आली त्यांनी वेगळ्याच टेंपोवाल्यांशी बोलणे केले. आता त्यांना कसे म्हणायचे की मी घेतो तुमचे भाडे? भांडणे होतील ना? मग केळकर बसून राहिला. टेंपोच्या मालकाला रोजचे चारशे द्यायचे ठरवलेले होते. दोन दिवसात मिळून केळकरने सहाशे दिले पदरचे. मालकाने तिसर्या दिवशी टेंपो काढून घेतला. जगात सबूरी आणि प्रामाणिकपणा नाही हा अनुभव सांगायला रिकामा झालेला केळकर कर्वेच्या दुकानात आपला दुपारपासून नेहमीसारखा उभा! मी बिडी मारायला गेलो तर तिथे केळकर! म्हंटलं काय हो केळकर? म्हणे टेंपो परवडत नाही. मी म्हणालो अठ्ठेचाळीस तासांपूर्वी तर म्हणत होतात 'या लायनीत फार पैसा आहे'? तर म्हणे 'अहो आहे ना? पण भाडं मिळायला तर पाहिजे?'
मग बिडी संपेपर्यंत केळकरने लेक्चर दिले.
"काये माहितीय का? आपण है न आपण? आपण वेगळे आहोत. आपलं काय म्हणणं होतं मालकाला? की मी टेंपो घेऊन नाक्यावर उभा राहतो. गिर्हाईक आलं ना? तर आपण सोडणार नाही. फुल्ल ट्रिपा मारीन मी. लागलं तर रात्रीही ट्रिप मारीन. पण गिर्हाईक नाही आलं ना? तर आपण रोजचे चारशे नाही देणार. आता खिशातले घालून कुठे धंदा असतोय होय? काय कर्वे? आं? घरातले पैसे घालून टेंपोत बसून राहू काय? तर त्याचं काय म्हणणं? म्हणे तुझं अन माझं ठरलेलंय. रोजचे चारशे दिले पाहिजेत. मी एक दिवस दिले. दुसर्या दिवशी दोनशेच होते ते दिले. सकाळी येऊन टेंपो घेऊन गेला. म्हंटलं घे बाबा. टेंपो तुझा आहे. मी कस्काय नाही म्हणणार? है की नै? नै पटतंय का तुम्हाला?"
"खरंय तुमचं" - मी एक वलय सोडायचा अयशस्वी प्रयत्न करत मान डोलावत म्हणालो.
"मग आता काय?" - कर्वेने चिमटा काढला केळकरला.
"आता काय? आपल्याला काही कमी नाही. नुसतं बसायचं कशाला म्हणून म्हंटलं टेंपो चालवू. हातपाय धडधाकट आहेत ना कटककर, तोवरच करून घ्यायचं काम! नंतर पोरांच्या जीवावर मस्त जगायचं. हे बघा, हे बघितलं का? आपल्या गळ्यात कायम असते ही माळ! घरी गेलो ना घरी? की काही नाही. हिला म्हणतो चहा कर. ही चहा करते. क्काय? चहा घ्यायचा. जरा टीव्ही पाहायचा. ते काहीतरी असतं भावजी वगैरे! सोसायट्यांमधून खेळ घेतात आणि जिंकलेल्या बाईला है ना? पातळ देतात पातळ! पैठणी! आणि हारलेल्या बाईलाही एक नाणं मिळतं सोन्याचं! काय? ते बघायचं. आणि ही माळ हातात घ्यायची. आणि दारात बसून तीन हजार जप करायचा. किती? तीन हजार. माळेच्या साठ फेर्या झाल्या ना? की तीन हजार जप होतो. मन शुद्ध आणि हार्ट शुद्ध! काय दिवसभरात चुकीचं वागलो असू, बोललो असू, पाहिलेलं असो, सगळं वॉश! फायनल क्लीअर मारायचा त्यावर. काय? स्वामींच्या नावात ताकद है! एकदा नाव घेतलं ना? पण मनापासून घ्यायचं हां? एकदा जरी घेतलं ना नांव? तरी स्वामी डायरेक्ट पापं धुतात. आता आपण तसं काय करतच नाही खरं तर! पण हातून काही चुकून झालेलं असलं ना? तेही धुतलं जातं. माळ नेहमी असते गळ्यात आपल्या. आहे का? बघितली का?"
"केळकर, मुलगा कितवीलाय तुमचा?"
"यंदा सातवीला.... त्याला आपण सांगीतलेलंय.. शिकायचं तेवढं शीक.. काय? हे वय शिकण्याचंय.. काय? शेवटी काय आहे? नावापुढे डिग्री लागली ना कर्वे? की माणूस पायजेल ती नोकरी मिळवतो.. आमच्या वडिलांनी आमचं शिक्षण दहावीलाच थांबवलं.. घरची जबाबदारी.. पण मागे हटलो नाही आपण... आपण है न आपण.. काय? नाही म्हणत नाही कशाला.. काय म्हणाल ते करीन.. फक्त इमानदारी पायजेल.. नेमकी इमानदारीच नाही जगात.. काय? पोराला सांगितलंय.. वह्या पुस्तकं दप्तर कंपास... काय लागेल ते मिळेल.. नाही आपण नाही करणार तर कोण करणार हो?... आता सहावीला अडुसष्ट टक्के मिळवले की? भरपूर झाले... काय?"
"मराठी मीडियम का?"
"हा मं? आपण इंग्लिश बिंग्लिशला नाही घालणार.. आधीच सांगितलं बायकोला.. एक तर ती आपली भाषा नाही... उद्या मोठं होऊन आपलंच पोरगं काय बोलतंय ते आपल्यालाच नाही कळायचं नाहीतर.. है की नै? आणि मराठी भाषेची अस्मिताय ना? ती आपल्याला टिकवायला हवी... आपण नाही टिकवली तर ती टिकणार कशी?"
मी कर्वेच्या दुकानावर जायला लागलो तेव्हापासून केळकरला ओळखतो. आधी माझ्याकडे दुर्लक्ष करायचा. पण कर्वेशी अखंड बडबडत असायचा. मी त्याची बडबड ऐकून घेत बिडी मारत उभा राहायचो आणि निघून जायचो. हळूहळू केळकरची सवयच लागली मला. त्याची काही काही वाक्ये ऐकून आणि आठवून मधेच हसायचो. 'आपण है न आपण' आणि 'अहो या लायनीत फार पैसा आहे' ही दोन वाक्ये एकदम पेटंट! केळकर काहीही करत नसणार हे मला अंदाजाने समजत होतं. पण रोज कर्वेच्या दुकानावर बसून राहणे म्हणजे चेष्टा नव्हती. जगायला काहीतरी तर करतच असणार की तो? किंवा घरचे बरेच बरे तरी असावे. केव्हाही बघा कर्वेच्या दुकाबाहेर केळकर आपला खुर्चीवर बसलेला. मग एकदा गेलो तर कर्वेच नव्हता, दुकान उघडे आणि केळकर तिथेच. म्हंटलं कुठे गेले कर्वे? म्हणे कॅश भरायला बँकेत गेलेत. म्हंटलं सिगारेट? म्हणे मी देतो की? त्याने दिली. मी त्याला पैसे दिले ते त्याने गल्ल्यात टाकले आणि बसून राहिला. त्या दिवशी तो कर्वे नसल्याने आणि माझी फार ओळख नसल्याने गप्पच होता. पण मला केळकर गप्प असण्याची सवय नव्हती. मी काहीतरी किल्ली मारायची म्हणून म्हणालो.
"रस्ते इतके बेक्कार झालेत ना? माणसं मरायची राहिलीयत आता"
बसली किल्ली!
"मरायची? मरायची राहिलीयत? अहो मरतायत. परवाच चौकात एक मोटरसायकल खड्यात गेली. आता हेल्मेट होतं. पण त्याचा उपयोग काय? सहा हाडं मोडली अंगातली. मानेला लागलं. हॉस्पीटलमध्ये नेला तर डॉक्टर म्हणाले डेड झालेलीय बॉडी. आता बॉडीच डेड म्हंटल्यावर काय? मला तर काय करावं तेच समजेना. डॉक्टर म्हणले पोलिस बोलवा. मी पळून येणार होतो. काम ना धाम आपल्यामागे लचांड लागायचं. आपण है ना आपण? उगाच फंदात नाही पडत. एक आपला माणूस जखमीय म्हणून त्याला नेला एवढाच. तर पोलिस बोलवा म्हणाले. मी गेलो चौकीवर. म्हणालो दोन पोलिस लागतायत, एक बॉडी डेड झालेलीय. पोलिस आला. पंचनामा सुरू केला. आपण म्हंटलं आपण ही बॉडी डायरेक्ट पडलेलीच पाहिली. आधी हा माणूस कोण होता जिवंत असताना ते काही माहीत नाही आपल्याला. बरोबर है ना? आपल्याला काय माहीत तो कोण होता जिवंत असताना? बॉडी डेड झाल्यावर आपण त्याला ओळखायला लागलेलोय. पटलं पोलिसाला. एवढंस तोंड करून बसला. त्याची काय अपेक्षा माहितीय का? की मला काहीतरी माहीत असेल अन मलाच अडकवता येईल. पण आपण है ना आपण? असं उगाच अडकायचो नाहीत. परवाच एक म्हातारी पडली खड्यात. आता काढायला गेलो तिला! तर काय म्हणते माहितीय का? मला हात लावायचा नाही. ह्यांना बोलवा. आतूनच बोलतीय. आता आईच्या वयाची आपल्या. काय सांगायचं या लोकांना? म्हणालो मावशी खड्यातून बाहेर या, आम्ही काढतो दोघं तिघं! तर खड्यात बसून राहिली ओरडत. आता हिचा नवरा कुठे असतो कोणाला माहीत? तिनेच रडत रडत पत्ता सांगितला आणि मग त्याला बोलावला. तो म्हातारा येऊन काय म्हणतो माहितीय का आम्हालाच? म्हणे काढायचं नाही होय? मी म्हणालो अहो हात नाही लावू देत या आजी. तर म्हातारी आतून म्हणते आजी म्हणू नकोस. काय जमाना आलाय. कटिंग घेणार का? ओ ढमाले दोन कटिंग घ्या."
केळकरने शेजारच्या टपरीतील माणसाला आज्ञा केली. एका पोर्याने दोन कप आणून दिले. मी पैसे काढायला लागलो तर केळकरने गल्यातून पैसे देऊ केले. मी म्हणालो..
"कर्वे नसताना कशाला घेताय तिथले? मी देतो ना?"
पुन्हा किल्ली बसली.
"एक तासाचे ना एक तासाचे? पंधरा रुपये देतात कर्वे मला.. त्यातले घेत होतो मी.. एक तास दुकान सांभाळलं ना? तर पंधरा रुपये.. आपण है ना आपण? काम केले तरच हात लावतो गल्ल्याला. आता कर्वे असते ना? तरी काही बोलले नसते. काय? आपलं असं आहे. अहो या लायनीत फार पैसा आहे. कर्वेंना पंधरा वर्षापूर्वी हा गाळाय ना? सव्वा लाखाला बसला. आज काय रेट चाललाय? सहा हजार रुपये स्क्वेअर फूट? पस्तीस लाख होतील या गाळ्याचे. पण काढायचा नाही. रेट काय? वाढतच जाणार. पण पुन्हा असलं दुकान या भागात थाटता येणार आहे का? फार पैसा आहे"
"तुम्ही काय करता हो केळकर?"
केळकरच्या चेहर्यावर अक्षरशः क्षणार्धात लाखो भाव चमकून गेले. विचित्रच वाटला त्याचा चेहरा मला. पण क्षणभरच. पुढच्याच क्षणी तो तडफदारपणे म्हणाला.
"आपण कायम धंदाच केला. नोकरी नाही. आपण है ना आपण? आपण साहेबाबरोबर नाही काम करू शकत. काय असेल ते आपलं स्वतःचं पायजेल. मग चार पैसे आहेत ना? कमी मिळाले तरी चालतील. काय? पण आपलं पाहिजे स्वतःचं जे काय असेल ते"
केळकर काय करतो ते अॅक्च्युअली मला समजलेच नाही. पण इतके समजले की बहुतेक तो काहीही करत नसावा. त्यामुळेच त्याला काँप्लेक्स आलेला असणार. आणि स्पष्टपणे 'मी बेकार आहे' हे सांगण्याचे या असल्या लोकांमध्ये धाडस नसते, त्यामुळे ते स्वतःच्या कर्तृत्वशून्यतेला उद्योगपती असल्याची खोटी व स्वप्नील झालर लावून जगासमोर स्वतःला सादर करतात. केळकर त्यातलाच असणार. मंद हासत मी निघून गेलो. दुसर्या दिवशी कर्वेंनाच विचारले मी तिथे केळकर नसताना.
"ते केळकर अॅक्च्युअली करतात काय हो?"
"काहीही करत नाही. एक काम जमत नाही त्याला. दिवसातून सहा कटिंग माझ्या पैशाने पितो आणि चार बिड्या ओढतो आणि घरी निघून जातो. नुसती तोंडाची वाफ तेवढी दवडता येते."
"जुनं गिर्हाईक दिसतंय तुमचं"
"गिर्हाईक कसलं आलंय? गेल्या दोन महिन्यात एक पैसा दिलेला नाही त्याने, ना चहाचा ना सिगारेटचा"
"मग तुम्हाला कसं काय चालतं हे?"
"अहो बसून असतो इथे? मग मी सांगतो काही बारकी कामं! हे पैसे बँकेत भरून ये, ही एवढी भाजी आण, ही इस्त्री रिपेअर करून आण वगैरे! कामं करतो, काही वेळा गल्ला वगैरे सांभाळतो, म्हणून मी आपला चहा बिडी वर ठेवतो त्याला. तसा प्रामाणिक आहे. मी अनेकदा मुद्दाम पैसे मोजून ठेवलेले आहेत गल्ल्यात. आणि त्याला गल्ला सांभाळायला लावून तासभर फिरून आलो. एक पैसा इकडचा तिकडे नाही. मग विश्वास बसला."
"बडबड केवढी करतात पण!"
"ते काय विचारू नका. तोंड म्हणजे गीतांजली एक्स्प्रेस"
"दुपारचं जेवण कुठे करतात मग?"
"का? घरनं डबा आणतो की? दोन पोळ्या इथेच बसून खातो. त्यातलीही मला एक खा म्हणतो. मी म्हणतो बाबा तूच खा. माझं रग्गड आहे. आता या काम नसलेल्या माणसाकडचं आपण जेवायचं आणि त्याला उपाशी ठेवायचं हे बरं नाही वाटत."
"पण कधीपासून येतात इथे?"
"हे चार सहा महिने झालेत आत्ताशीक... आधी कुठेतरी मुंबईत की ठाण्यात होता म्हणे!"
"आणि राहायला कुठे?"
"हे मागे सुतार दवाखान्यापाशी चाळ आहे ना? तिथे कुठेतरी..."
"त्यांच्या मिसेस काम करत असतील नक्कीच"
"कसलं काय? एकदा मी विचारलं तर म्हणाला... आपण है ना आपण? बायकोला फुलासारखं ठेवतो.. तिला काम नाही पडू देत अजिबात"
त्या 'आपण है ना आपण' वर आम्ही दोघेही हासलो. पण बायकोला फुलासारखं जपणार म्हणणारा नवरा मला जरा वेगळाही वाटला. अनेक नवरे बायकोची कटकट करताना पाहायला मिळतात, अनेक नवरे बायकोला हक्काची काम करणारी मानणारे पाहायला मिळतात. केळकर मात्र चारचौघांमध्ये असे म्हणत होता की बायकोला फुलासारखं जपणार. मला माझ्या आतमध्ये कुठेतरी फार बरं वाटलं. बेकार असला तरी निदान विचार खूप चांगले आहेत बिचार्याचे! बायकोवर प्रेम आहे. काम मिळाले की अगदी सुखात ठेवेल तिला! पण आत्ता ती नक्की काहीतरी करत असणार हे मला समजलेले होते मनातच! त्याशिवाय हा नुसता कसा बसेल?
केळकर हळूहळू रोजच्या जगण्याचा एक लहानसा भाग बनायला लागला होता. आता बिडी मारायला जायचे म्हणजे केळकरची बडबड ऐकायला मिळणार असेही एक समीकरण झालेले होते. काहीही संबंध नसताना मी, कर्वे आणि केळकर असे एक त्रिकुट तयार व्हायला लागलेले होते. दुकानात दुसरे गिर्हाईक आले की मी पटकन बाजूला व्हायचो चार पावले. उगाच गिर्हाईकाला आपल्या सिगारेटचा त्रास नको. पण केळकर ढिम्मपणे तिथेच बसून राहायचा. इतकेच नाही तर बडबडतही राहायचा.
तर त्या दिवशी मी सकाळी दुकानावर गेलो आणि बघतो तर केळकर एका झाडाखाली एका चांभाराशेजारी चक्क रस्त्यावर मांडी घालून बसलेला आणि चांभाराशी त्याच्याकडच्या अवजारांवर चर्चा करत आहे. मी कर्वेंना नजरेनेच विचारले तर कर्वे म्हणाले..
"आपण है ना आपण? कामाला लाजत नाही.. चांभाराच्या लायनीत फार पैसाय.. त्यामुळे आपण ते काम शिकून घेणार... मागे हटायचं नाही... सगळं यायला पाहिजे.. चार दिवसात आपली वेगळी टपरी टाकतो बघा चांभारगिरीची"
कर्वेंनी केळकरची केलेली नक्कल पाहून मी हासलो. मला पाहून केळकर तिथे आला. हल्ली मीही त्याला चहा पाजू लागलो होतो. पण यामुळे कर्वेंकडचे सहा कटिंग कमी झालेले नव्हते. त्यांचे सहा आणि माझे दोन असे आठ कटिंग रिचवत होता आता केळकर! अधेमधे मी त्याला एखादी बिडीही ऑफर करायचो. मग मात्र एकदम तल्लीन होऊन समाधी लागल्यासारखा सिगारेट ओढत बसायचा. त्या दिवशी मला पाहून दुकानात आला आणि म्हणाला..
"माणसाने है ना? कपिलदेव व्हायला पाहिजे कपिलदेव.. गावसकर झाला की माणूस संपलाच... जिव्नात सारखी बॅटिंग नसते हो? बॉलिंग करावी लागली तर बॉलिंग करता यायला पायजेल.. फिल्डिंग तर फिल्डिंग.. कॅप्टनशीप तर कॅप्टनशीप.. कपिलदेव व्हायला पायजेल माणसाने.. काय कर्वे?"
"बरोबर आहे" - कर्वेंनी कपिलदेवला दुजोरा दिला.
"आता आपण है ना आपण कटककर? चांभारकाम शिकतोय.. लाज नाही आपल्याला.. लाज बाळगली ना लाज? की गेलाच माणूस कामातून.. तुम्हाला काय सांगायचं म्हणा.. तुम्ही तर लेखके.. "
"छे हो.. कसला लेखक बिखक.. "
केळकरने कर्वेकडे असलेली माझी काही पुस्तके चाळलेली होती.
"काल काय झालं माहितीय का कर्वे?"
केळकरने कर्वेला विचारले. कर्वेने भुवया उडवत 'काय' असे खुणेने विचारले.
"समोरच्या कार्यालयात है ना? नवरदेव आला काय नवरदेव? घोड्यावर बसेपर्यंत सगळं ठीक होतं. तोवर काही नाही. तो घोड्यावर बसला. आणि तो बसला म्हंटल्यावर चार छक्के गर्दीतून बाहेर आले आणि त्याच्यापाशी गेले. म्हणजे बघा. आधी गर्दीत चार छक्के नाचत होते याचा पत्ताच नाही कोणाला. ते कसली वाट बघत होते? तर नवरदेव घोड्यावर बसण्याची. का? तर नवरदेव कोण हेच त्यांना माहीत नव्हते. काय? कारण सगळेच भारी कपड्यात ना? लग्नच होतं ना ते? मग सगळेच भारी कपड्यात. त्यामुळे काय झालं? की त्यांना हेच कळत नव्हतं की नवरदेव कोणता? अन तो नवरदेव जसा घोड्यावर बसला.. हे गर्दीतून नाचणं थांबवून बाहेर आले आणि तिथे गेले. मी तिथेच उभा होतो. आपण है ना आपण? सगळं नुसतं पाहत असतो. आपल्याला बाकी काही घेणेदेणे नसते. नुसतं आपलं पाहायचं. पाहायला काय बापाचं जातंय आपल्या? काय? तर ऐका ना? चार छक्के बरं का चार? नवरदेवापाशी गेले आणि त्याला काय म्हणाले? म्हणाले तू आम्हाला एक हजार रुपये दे.. किती?.. एक हजार! एक हजार रुपये दे म्हणाले... नाहीतर म्हणाले हे लग्न तू केलंस की तुझं वाट्टोळं होणार... आम्हाला काही नाही म्हणाले.. तुझं वाट्टोळं होणार.. आता तो काय म्हणतोय?.. की अहो माझ्याकडे पैसे नाहीयेत आत्ता... तर ह्यांनी काय केलं? बरं का कटककर?.. ह्यांनी त्याच्यावरून काहीतरी असं ओवाळलं... हे बघा.. हे असं.. ओवाळलं आणि म्हणाले... आम्हाला तू एक हजार रुपये दे... नाहीतर हे लग्न तू केलंस ना? की तुझं वाट्टोळं होणार.. शाप दिला त्यांनी त्याला शाप.. आणि ऐका ना? वाट्टोळं होणार म्हणाले आणि पुन्हा तिथेच घोड्याभोवती नाचू लागले.. आता आहे का? म्हणजे आधी नाचत होते.. जस्सा नवरदेव घोड्यावर बसला.. त्याच्याकडे धावले आणि पैसे मागीतले आणि म्हणाले आम्हाला तू एक हजार रुपये दे नाहीतर तुझं आता वाट्टोळं होणार.. आणि पुन्हा नाचायला लागले..."
"पण मग झालं काय?"
मी आणि कर्वे फार हासत होतो.
पुन्हा क्षणभर केळकरच्या चेहर्यावर लाखो विचित्र भाव चमकून गेले. पण क्षणभरच! पुन्हा तडफदारपणे तो म्हणाला..
"पुढचं नाही बघितलं मी.. म्हंटलं आपण कशाला तिथे उभं राहायचं? नाही का? आपण है ना आपण? फार जवळ जात नाही कोणाच्या! पण याही लायनीत फार पैसा आहे बरं कर्वे?"
मी तर जोरजोरातच हासलो. कर्वेंनी विचारलं.
"विचार काय आहे केळकर?"
"नाही नाही... सांगितलं आपलं एक.. पण म्हणजे आहे का? आधी गर्दीत चार छक्के नाचतायत याचा कोणाला पत्ताच नाही"
त्या दिवशी हसतच मी घरी आलो.
त्या दिवसापासून केळकर हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला. हा माणूस दुसर्यांना हासवूही शकतो याची मला कल्पनाच नव्हती. किस्सा सांगतानाचे त्याचे हावभाव भारीच जिवंत होते.
एक दिवस असाच केळकर पायाला बँडेज बांधून आला. रक्ताचे डाग वगैरे! आम्ही उडालोच. मी विचारले.
"काय हो?"
"काही नाही मी अन मुलगा खेळत होतो क्रिकेट.. दगडी बॉल... आहे का आता? ग्राऊंड नाही काही नाही... पण दगडी बॉल.... बसला बॉल नडगीवर जोरात.. रक्त वाहायला लागलं.. मग आईने बांधून दिली जखम.. "
"आईने म्हणजे? वहिनींनी का?"
"नाही नाही माझी आई.... ही नव्हतीच घरी.. ही आत्ता आली.. ही आली... मग आई बाहेर पडली... मग आई बाहेर पडल्यावर मीही बाहेर पडलो... मग मी इकडे आलो.. "
"दुखतंय का? काही लावलंत का?"
"मग? हळद लावली ना? हळद आहे ना हळद? ती फार औषधी असते.. हळद असते ना? तुम्ही जखमेवर है ना? हळद लावली ना चिमूटभर? की टोटल क्लीअर... निर्जंतुकच होते जखम.. हळद फार औषधी असते.. मग त्यामुळे आईने हळद लावली.. आपण है ना? पहिल्यापासूने आपलं... कधी चुकून काही झालं ना?... पहिली हळद लावायची.. "
"पण दगडी बॉल घेऊन कशाला खेळता घरात?"
"माझा मुलगाय ना मुलगा? त्याला टेनिसचा बॉल आवडतच नाही.. टेनिसचा बॉल असतो ना आपला? काय? तो चालतच नाही त्याला"
केळकरसारख्या सज्जन आणि बेकार माणसाला जखम झालेली पाहून आणि त्याला लंगडताना पाहून आम्हाला दोघांना मनात फार वाईट वाटले. आम्ही दोघांनीही विचारले त्याला, औषधासाठी काही पैसे वगैरे हवेत का? अगदी पहिल्यांदाच केळकरने आमच्या दोघांकडे क्षणभर बघितले. त्या क्षणभरात त्याच्या चेहर्यावर तसेच विचित्र लाखो भाव चमकून गेले. पण क्षणभरातच आश्चर्यकारकरीत्या मान खाली घालून होकारार्थी हालवत पुटपुटला..
"एक दहा वीस रुपये देऊन ठेवा... बाहेर उशीर झाला तर वडापाव खाऊन घेईन... आज ही बाहेर गेली होती ना? त्यामुळे मग डब्बा नाही आणता आला... नाहीतर है ना? रोज आपला डब्बा असतो बरं का? ह्या कर्वेंना माहितीय... काय हो कर्वे? आणि है ना? डब्यात उगाच सटरफटर काही आणत नाही आपण... आपण है ना आपण? डब्यात म्हणजे पोळी भाजीच.. गहू है ना गहू... तो अंगात गेल्याशिवाय ताकदच नाही येत... गहू पायजेलच"
आमच्याकडून पन्नास रुपये घेऊन केळकर बसून राहिला. मग थोड्या वेळाने उठला आणि समोरच्या प्रिया व्हेज मध्ये काहीतरी खाऊन आला. येताना दोन वडापाव घेऊन आला. मला म्हणाला 'घ्या कटककर'! पुढे म्हणाला 'आपण है ना आपण? उधारी नाही ठेवत अजिबात कोणाचीच'!
आम्ही आमच्याच पैशातून त्याने दाखवलेल्या दानशूरतेतील प्रत्येकी एक वडापाव खाऊन टाकला. मला फार वाईट वाटले. या माणसाला काम आणि नियमीत पगार मिळाला तर हा किती चांगला वागेल असे वाटले. पण शिक्षण नाही, नोकरी नाही. कसा जगतो काय माहीत!
एक दिवस घाईघाईतच आला आणि म्हणाला..
"मी जरा गडबडीत आहे आज... सगळी तयारी करायचीय.. उद्या सकाळी या बरं दोघे घरी?"
"कसली हो गडबड? काय आहे उद्या?"
"पूजा आहे... सत्यनारायण..."
"का? नोकरी मिळावी म्हणून का?"
"नाही नाही?... आपण है ना आपण? नोकरी कधी केलीच नाही.. आपण कायम धंदा केला.. बायकोचा भाऊ आला होता काल... म्हणाला एखादी पूजा करा.. चांगलं असतं घरात देवाधर्माचं काही झालेलं.. मग म्हंटलं सत्यनारायण करूयात... "
"अरे वा? आणि गुरुजी मिळाले का?"
"ह्यॅ ह्यॅ.. आपण नाही गुरुजी बिरुजी बोलवत... आपण है ना आपण... आपणच पूजा वाचतो.. अहो मराठीत असते ती.. सरळ वाचायची पोथी आपली.. लागतो कशाला गुरुजी? आणि जानवं आहेच गळ्यात.. "
"गुरुजीच नाही?"
"कशाला हवा गुरुजी? आपल्याला येते ना वाचता पोथी?"
गुरुजींना द्यावे लागणारे पैसे केळकर वाचवू पाहात आहे हे आमच्या लक्षात आले. कर्वेंनी विचारले.
"मी दक्षिणा देऊ का गुरुजींची?"
"नाही नाही? आपण पूजा वाचतो ना? तुम्ही फक्त या... आठ साडे आठला या सकाळी"
द्यानीमनी नसताना अचानक केळकरच्या घराशी आमचा संबंध येणार होता. आता हे चांगले की वाईट हे समजेना. कारण आमचा परिचय काय? तर त्या बेकार माणसाबरोबर रिकामटेकड्या गप्पा मारणारे आणि त्याला बिड्या पाजणारे दोघे! पण आम्ही जायचे ठरवले. असेही ठरवले की जाताना मुलासाठी पेढे आणि घरासाठी काही खाद्यपदार्थ वगैरे घेऊन जाऊ. तेवढीच मदत! पत्ता नीट विचारून ठेवला.
मी आणि कर्वे कुतुहलानेच केळकरच्या घरी सकाळी साडे आठला पोचलो दुसर्या दिवशी! तर केळकरची म्हातारी आई एकटीच पोथी वाचत होती. केळकर गायबच. वहिनी आणि मुलगाही दिसले नाहीत. घराची अवस्था अगदीच बिकट होती. पण त्या जुनाट, गंजलेल्या वस्तू पूर्वी कधीतरी वैभवशाली घराचे प्रतीक म्हणून नांदलेल्या असणार हे स्वच्छ दिसत होते. चांगलं तीन खोल्यांच घर दिसत होतं! पण अवकळा आलेली होती. म्हातार्या आईने आम्हाला पाहून विचारले.
"कोण हवंय?"
"केळकर इथेच ना? आज पूजा आहे म्हणाले"
दोन तीन क्षण आमच्याकडे स्थिर नजरेने पाहून म्हातारीने पोथी मिटली आणि चष्मा काढून म्हणाली..
"राजशेखर सकाळीच बाहेर गेलाय... कसली पूजा?"
केळकरचे नांव इतके चांगले असेल याची कल्पनाच नव्हती...
"सत्यनारायण ठेवला आहे म्हणाले.."
म्हातारी निराशेने काळवंडली... म्हणाली...
"नाही आहे पूजा... जा आपण"
आम्ही एकमेकांकडे पाहिले. केळकर खोटे का बोलला समजेना! कुतुहल तर होते, पण म्हातारीला मनस्ताप होईल असे वाटत होते. शेवटी हिय्या केला आणि विचारले..
"रद्द झाली का पूजा?"
म्हातारी बघत राहिली. मग म्हणाली..
"बसा इथे"
आम्ही तसेच धुळीतच कुठेतरी थोडेसे झटकून बसलो.. म्हातारी म्हणाली...
"तुम्हाला माहीत आहे की नाही ते मला माहीत नाही.. तुम्ही कोण आहात हेही मला माहीत नाही.. पण... राजशेखर वेडा आहे हे माहीत आहे का तुम्हाला?... आधी चांगला होता... एका मुलीवर प्रेम बसले होते... तिचेही होते त्याच्यावर... बरीच वर्षे झाली.. पण तिच्या वडिलांनी राजला धमकी दिली.. माझ्या मुलीशी लग्न करायचा प्रयत्न केलास तर तुझे वाट्टोळे करेन.. तिचे दुसरीकडे लग्न झाले.. राज तेव्हा टेंपो चालवायचा... पण गिर्हाईकच मिळायचे नाही.. एकच गिर्हाईक मिळाले तेच मुळी त्या मुलीच्या लग्नाचे सामान कार्यालयात न्या म्हणणारे.. मग टेंपो सोडून दिला त्याने.. तो जुना टेंपोचा सांगाडा मागे पडलाय बघा.. राजशेखर वेडा झाला.. त्याने लग्न केले नाही... कुठे नोकरीही करण्याइतका शहाणा राहिला नाही... मी त्याला खूप रागावते... मग म्हणतो की मी हवे तर चांभारकाम शिकून घेतो... कधी म्हणतो मी गुरुजी होतो आणि दुसर्यांची लग्ने लावतो.. आता काय करू मी? ... जुन्याच पैशांवर आमचे चालले आहे.. खूप बोलते त्याला... मग नुसताच रडतो... परवा तर मला त्याचा इतका राग आला.. नुसते बसायचे म्हणजे काय? मी खूप रागावले आणि दिला एक काठीचा तडाखा त्याच्या उजव्या नडगीवर आणि काढला घरातून उपाशीच बाहेर त्याला... जाताना हळद घेऊन गेला घरातली.. काय केले काय जाणे हळदीचे .. आता तुम्हाला आज पूजा आहे म्हणून इथे बोलावून ठेवलंय... आणि मला म्हणाला की दोन मित्रांचे पन्नास रुपये द्यायचे राहिले आहेत... ते म्हणे मला दोन तीनदा चांभारकाम करून मिळालेले आहेत.. ते त्यांचे पैसे त्यांना देऊन येतो... म्हणून सकाळीच बाहेर गेलाय... आता उगवेल एकदम संध्याकाळी... तुम्ही जरा त्याला सांगा ना थोडं?... बरं... तुम्ही चहा घ्याल का थोडा? बिनदुधाचा?"
...... केळकर!!!
तोंड झाकून त्या दिवशी प्रथमच रडलो असेन मी!
==============================================
-'बेफिकीर'!
वा... नवीन लेख.., कथेचा एकदम
वा... नवीन लेख.., कथेचा एकदम अनपेक्षित शेवट.... आवडली कथा
रुमाल टाकला ...
रुमाल टाकला ...
अरेरे .. पहिल्यांदा फक्त
अरेरे .. पहिल्यांदा फक्त निरूपद्रवी वाटला..
चांगली रंगवली आहे व्यक्तीरेखा.
छानच.. बेफिजी मी आपला खुप
छानच.. बेफिजी मी आपला खुप मोठा पंखा आहे.
(No subject)
सुपर्ब..... बोका कुठे हरवला
सुपर्ब.....
बोका कुठे हरवला आहे.
आय मिस हिम सो मच...............!
खुप छान आहे कथा .
खुप छान आहे कथा .
छान. सदाशिवपेठेत रहात होतो,
छान. सदाशिवपेठेत रहात होतो, त्यावेळी ' वाटाणा ' म्हणुन वेडा होता त्याची आठवण झाली.
पटली....भावली...मनाला
पटली....भावली...मनाला भिडली......कुठेतरी असे खुप केळ्कर पाहिलेत असं वाटतं.........हा प्रेम नावाचा किडा..किती लोकांचं आयुश्यं बिघडवलं असेल्.......अशुद्ध लेखना बद्दल Sorry...
छान लिहीलयं. खरे सांगायचे
छान लिहीलयं. खरे सांगायचे डोळ्यासमोर अगदी गोडबोलेंचे दुकान वगैरे आले, बुधवार पेठेतले. आणी असे वाटले असाच कुणीतरी माणुस तिथे बाहेर बसला असेल. काही व्यक्तीरेखा खरच जिवंत करता तुम्ही.
नाना>>१ किती छान लिहिता हो
नाना>>१
किती छान लिहिता हो तुम्ही
सगळं कसं डोळ्यासमोर उभे राहाते
keep it up bhushan
मस्तच, जीवाला चटका लावून गेला
मस्तच, जीवाला चटका लावून गेला केळकर
(No subject)
अप्रतिम .....शेवट तर छान
अप्रतिम .....शेवट तर
छान लिहिलंय सर्व डोळ्यासमोर उभं राहिलं .
छान कथा. जिवंत व्यक्तीचित्रण.
छान कथा. जिवंत व्यक्तीचित्रण. खरंच जीवाला चटका लागला.
जिवंत व्यक्तीचित्रण. >>> +१
जिवंत व्यक्तीचित्रण. >>> +१
जिवंत व्यक्तीचित्रण. >>> +१
जिवंत व्यक्तीचित्रण. >>> +१
जिवंत व्यक्तीचित्रण. >>> +२
जिवंत व्यक्तीचित्रण. >>> +२
डोळे भरुन आले......
डोळे भरुन आले......
चटका लाउन गेली ही
चटका लाउन गेली ही व्यक्तिरेखा. पण काही माणसांना दु:ख्खाला कवटाळुन बसायला का आवडते कोण जाणे? इथे अर्थाथच मानसिक आजार आहे. सुरेख चित्रण.
पण काही माणसांना दु:ख्खाला
पण काही माणसांना दु:ख्खाला कवटाळुन बसायला का आवडते कोण जाणे?>>>>>>>निलिमा एक आगन्तुक टिपण्णी....ते प्रेमात पडलेल्या आणि हारलेल्या एखाद्याला विचारून पहा....
आवडली कथा.
आवडली कथा.
आई गं.. का हो असा शेवट केला?
आई गं.. का हो असा शेवट केला?
छान लिहिलय. नेह्मी पेक्षा
छान लिहिलय.
नेह्मी पेक्षा वेगळी कथा आहे
खराखुरा आहे का हा केळकर?????
खराखुरा आहे का हा केळकर?????
मी पुण्यात आलो तर भेटवाल का बेफीजी ..........
chan hoti katha.Mastch dole
chan hoti katha.Mastch dole bharun aale.
-'बेफिकीर' Ashya bhari katha 2-3 divsani lihit ja.
शेवट वाचून वाईट वाटलं बेफि
शेवट वाचून वाईट वाटलं
बेफि एकदम वेगळी कथा दिलीत
व्वा बेफि छान व्यक्तीचित्रण,
व्वा बेफि छान व्यक्तीचित्रण, व्यक्ती वल्लीची आठवण झाली.
साधारण अंदाज येत होता वाचताना, पण शेवट असा नसेल तर बरे, असे वाटत होते मनात.
आवडली..
आवडली..
केवळ शब्दातून एवढे जिवंत
केवळ शब्दातून एवढे जिवंत व्यक्तिचित्रण रेखाटायचे - मानलं बॉस .....
Pages