मध्यंतर

Submitted by नंदिनी on 5 February, 2013 - 06:02

अंगात आल्यासारखा जय नुसता या रूममधून त्या रूममधे नाचत होता. त्याची घरभर चाललेली धावपळ बघत इशा शांत बसून होती. त्याच्या एकंदर गडबडीमधे तो नक्की काय म्हणत होता तेही तिला समजत नव्हतं. नुसतं "आता अचानक कसं काय" आणि "देवा परमेश्वरा" एवढंच तिला ऐकू येत होतं.

शेवटी पाचेक मिनिटांनी तो तिच्याजवळ आला.

"हे बघ, तू उठ आणि ताबडतोब शिवानीकडे निघून जा. जाताना घरातलं तुझं सगळं अगदी सगळंच्या सगळं सामान घे. इथे तू राहत असल्याचं काहीही दिसता कामा नये. अगदी ताबडतोब जा. कपडे घेऊन जा, तुझी पुस्तकं घेऊन जा, ते हे.. घरातली भांडी घेऊन जा, तुझ्या त्या गाण्यांची सीड्याबीड्या काय आहेत ते घेऊन जा. जाताना तुझ्या त्या ढीगभर चपला घेऊन जा. पुस्तकं नेऊ नकोस. ती काय जेंडर स्पेसिफिक नाहीत. भांडीपण राहू देत. पण सीड्या लपवून ठेव." जय अखंड बोलत होता.

"अरे काय बडबडतो आहेस? किती बडबडतो आहेस? तुझे आईवडिल तर येणार आहेत ना? मग इतका पॅनिक काय होतोस?"

"मी पॅनिक होतोय? मी पॅनिक होतोय? अगं माझे बाबा म्हणजे... जाऊ दे, समजवत बसण्याइतका वेळ नाही. ते उद्या सकाळी येतायत. त्याच्या आत मला काहीतरी केलं पाहिजे... " जय अक्षरश: घामेघूम झाला होता.

"गप्प बस इथे दोन मिनिटं. मी कॉफी करून आणते. मग आपण बघू काय काय करायचं ते"

जय तिच्या बाजूला बसला.

"इशा, आय अ‍ॅम सॉरी, म्हणजे तुला हे खूप ऑड वाटेल किंवा आवडणार नाही. पण माझे आईवडिल येत आहेत या नुसत्या फोन कॉलने सुद्धा माझा बीपी वाढतोय. कसं सांगू तुला? आईचं एवढं काही नाही.. पण बाबांना जर समजलं की आपण असेच एकत्र राहतोय वगैरे तर ते मला कच्चा कापून खातील आणि... "

"पण तुझे बाबा नॉन व्हेज खात नाहीत ना?" इशा मधेच म्हणाली.

"तू प्लीज आत्ता फालतू विनोद करू नकोस. मध्यंतरी गावी गेलो होतो, तेव्हा तुझ्याविषयी सांगायचं फार मनात होतं. मनाची सगळी तयारी पण केली होती. पण बाबांनी मी गेल्या गेल्या माझे कपडे, माझे केस, माझा मोबाईल आणि काय काय धरून जी माझी तासायला सुरूवात केली ती अगदी मी ट्रेनमधे बसेपर्यंत चालू होती. मी नाही बोलू शकलो. आईला सांगेन असं वाटलं होतं... नाही जमलं.. मी एकदम घाबरू आहे ना?"

इशा नुसतीच हसली आणि "चल कॉफी बनवते." म्हणून उठली.

इशाने कॉफी बनवून आणेपर्यंत जय डोळे मिटून नुसता शांत बसला होता. खरंतर त्याचं डोकं नुसतं गरगरत होतं. अर्ध्या एक तासापूर्वी त्याच्या गावावरून काकीचा फोन आला होता. आईबाबा त्याच्याकडे यायला निघालेत म्हणून. पहाटे आईबाबा घरी येणार याचा क्षणभरच आनंद झाला. पुढच्याच क्षणी त्याचं हृदय बंदच पडलं. इशा आपल्यासोबत इथेच राहते हे जाऊ दे, इशा आणि आपलं प्रेम -बाबांच्या भाषेत लफडं आहे हेही जाऊदेत, पण आपण ऑफिसमधल्या मुलींशी बोलतदेखील नाही असे आपले आईवडिल समजतात हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा तो हडबडलाच. आपण अचानक लगेच इशाला निघून जा म्हणून सांगितलं हे त्याला आठवून एकदम कसंतरी वाटलं. आधी तिला व्यवस्थित सगळं सांगून मग शिवानीकडे चारेक दिवस जायला सांगायला हवं होतं.. चारेक दिवस? आईबाबा किती दिवस राहणार आहेत हेच त्याला अजून माहिती नव्हतं.

इशा कॉफीचे मग घेऊन आली तरी तो विचारांच्या तंद्रीतच होता.

इशाने त्याच्या हातात कॉफी दिली आणि स्वत:ची कॉफी बाजूला ठेवून दिली. टीपॉयवरचा एक पेपर आणि पेन उचलला.

"ओके. आता शांतपणे लिस्ट बनवू या. मग त्यानुसार काय करायचं ते ठरवून कामं करू या. शिवानीला फोन करेन मी. तिच्याकडे रहायची सोय झाली नाही तर बाईजींना विचारेन. त्यांच्याकडे पेइंग गेस्ट म्हणून जाईन थोडे दिवस."

जय तिच्याकडे बघतच राहिला.

"इशा, तुला माझा राग नाही आला?"

"कशाबद्दल?"

"हे मी अचानक तुला जा म्हणून सांगतोय वगैरे. इट्स नॉट करेक्ट. तू रागावलीस तरी चालेल मला" जय अगदी हळू आवाजात म्हणाला.

"अरे माझा शानूशोनुल्या, कशाला रागवू मी? तू तुझ्या आईवडलांना काहीही सांगितलं नाहीस ते माहित आहे मला. आणि तू तुझ्या वडलांची जेवढी तारीफ केली आहेस ते ऐकून मला त्यांच्यासमोर उभं राहणं पण एक शिक्षा वाटेल. त्यातून तुझी आई म्हणे गणिताची टीचर होती. नको रे बाबा. त्यापेक्षा मी गेलेलीच बरी. शिवाय तू आज ना उद्या त्यांना आपल्याबद्दल सांगणार आहेस ना? सांगणार आहेस ना?" इशाच्या शेवटच्या वाक्याला शंभर तलवारींची धार होती.

तिला काय म्हणायचं आहे ते जयला पुरेपूर समजलं.

"हो. यावेळेला आईबाबा गावाला जायच्या आधी मी त्यांना स्पष्ट सांगेन. पण त्याआधी आपण रजिस्टर लग्न करून घेऊ या. म्हणजे त्यांना काहीच बोलता येणार नाही" आता जयला काय म्हणायचं आहे ते इशाला पुरेपूर समजलं.

दोघंही गालातल्या गालात हसली.

"कॉफी घे. गार होतेय" तो म्हणाला.

इशाने नंतर अर्धातास बसून पूर्ण लिस्ट लिहून काढली. त्यानुसार मग लगेच तिने आणि जयने कामाला सुरूवात केली. इशाने तिचे सगळे कपडे उपसले, शिवानीकडे जाताना जेवढे गरजेचे होते तेवढे पॅक करून घेतले. उरलेल्याचा एक गठ्ठा बांधून ठेवला.

"अगदीच वर्स्ट केस सीनारोय मधे आईला हा गठ्ठा सापडलाच तर "आधीच्या भाडेकरूचा आहे" असं सांग" इशाने त्याला सांगितलं. तिच्या पर्सेस, चपला, सँडल्स, बूट, ज्वेलरी असा सगळा ढीग बाहेर जमा झाल्यावर तोच म्हणाला.

"सीरीयसली इशा, मीच चार दिवस कुठेतरी जाऊन राहतो, आईबाबांना तिकडचाच पत्ता देतो. या घरामधे आईला माझ्या सामानापेक्षा आधीच्या भाडेकरूचंच सामान जास्त दिसेल."

"काही काळजी करू नकोस. मी शिवानीकडे एवढं काही नेणार नाही. गेस्ट बेडरूममधला वॉर्डरोब पूर्ण रिकामा कर. त्यामधे नाहीतरी असंच सटरफटर भरून ठेवलंय, ते रिकामं कर आणि तिथे हे सामान ठेव. त्या वॉर्डरोबची चावी मी घेऊन जाईन. विचारलंच तर घरमालकाचं काही सामान आहे असं सांग"

"ही आयडीया भारी आहे. तुझे कपडे पण तिथेच ठेव. ते आधीच्या भाडेकरूपेक्षा ही लाईन मस्त आहे"

इशाने शिवानीला फोन करून प्रॉब्लेम सांगितलाच होता. शिवानी तर उलट खुशच झाली. ती संध्याकाळी काम आटोपून घरी जाताना इशाला पिकप करेल असं सांगून मोकळी झाली.

जयने फ्रीजमधले चिकन अंडी आणि अजून कसलेतरी रेड डॉटवाले सॉस वगैरे सामान काढून काढून बाजूला ठेवलं. एवढं सगळं फेकायचं कुठे म्हणून ते सगळं शिवानीकडे न्यायचं ठरलं. मग बीअरच्या बाटल्या, वाईनची एक बॉटल, ग्लासेस आणि इतर सर्व "बारकामाची टूल्स" हे सगळं काढून लपवण्यात आलं.

इशाने तिच्या कामाचे कागद घरभर पडले होते, ते उचलून एका फाईलमधे लावून घेतले.

"चला, किमान या निमित्ताने घर तरी आवरून झालं. नाहीतर लेकाच्या घरात एवढा पसारा बघून बाबांनी आधी हातात पोकळ बांबू घेतला असता" जय म्हणाला.

इशाला जय त्याच्या वडलांना किती घाबरतो हे चांगलंच माहित होतं. जयचे वडिल म्हणजे अठराव्या शतकामधली एखादी व्यक्ती असावी तितके पुराणमतवादी होते. त्यांना बर्‍याच गोष्टी सहन व्हायच्या नाहीत, टीव्ही, मोबाईल, चित्रपट इतकंच काय पण जयने अभ्यासाव्यतिरीक्त कशातही लक्ष घातलेलं त्यांना खपायचं नाही. त्यांच्या दृष्टीने शाळा-कॉलेज्-घर हेच जयचे विश्व असायला हवं होतं. जय पहिल्यांदा मुंबईला नोकरीसाठी आला तेव्हा अगदी हट्टाने त्यांनी जयला एकट्याला फ्लॅट भाड्याने घेऊन दिला होता. इतर वाईट मित्रांची संगत त्याला लागू नये म्हणून. जयच्या पगारामधे त्याला या फ्लॅटचं भाडं परवडत पण नव्हतं. पण त्याचे वडिल त्याला दर महिन्याला भाड्याचे पैसे पाठवत असत. सुरूवातीला दोन तीन महिने जय एकटा राहिला. पण ऑफिसमधे मित्र मैत्रीणी भेटत गेले. मग हळूहळू त्याचा हा फ्लॅट बर्‍याचदा ऑफिसनंतर पार्टी करण्याचं ठिकाण बनत गेला.

वर्षभरामधे त्याची ओळख इशाबरोबर झाली. त्याच्या ऑफिसमधे असणार्‍या शिवानीची ही रूममेट. कुठल्यातरी एजन्सीमधे क्रीएटीव्ह मधे कामाला होती. दोघांची ओळख झाली, प्रेम जमलं, दोघंही एकत्र रहायला लागले. तिच्या घरच्यांना जयबद्दल पूर्ण कल्पना होती. तिनेच सान्गून टाकलं होतं. यामधे तिला कधीच काहीच चूक वाटलं नाही. जयला पण काहीच चूक वाटत नव्हतं पण आईवडलांना सांगण्याची हिंमत मात्र येत नव्हती. अर्थात कधी ना कधी सांगणार होताच, पण त्यात आज या सरप्राईझ विझिटमुळे मात्र एकदम गोंधळला होता.

इशाने सगळ्या घरामधे फिरून पुन्हा एकदा चेक केलं. तोपर्यंत जयने कॉफी आणि नूडल्स बनवून आणल्या.

"हे बघ, घाबरू नकोस. शांत रहा. आता दोन तीन वर्षांनी तुझे आईवडिल येत आहेत, कदाचित जास्त दिवस राहतील..."

जय काहीतरी बोलणार त्याआधीच इशा म्हणाली.

"राहू देत त्यांना जितके दिवस रहायचं असेल तितकं. मुलगा आहेस तू. हक्क असणारच त्यांना. मी शिवानीकडे कंफर्टेबल आहे. आधी तिथेच तर राहत होते. शिवाय याच सिटीमधे माझ्या आईचं आणि माझ्या वडलांचं अशी दोन दोन घरं आहेत मला. " इशा अगदी सहज म्हणाली.

इशाच्या आईवडलांचा घटस्फोट आणि त्या दोघांनी केलेली दुसरी लग्नं हा इशासाठी कित्येकदा विनोदाचा विषय असला तरी जयला त्यामागची दाहकता कित्येकदा जाणवली होती.

"हे बघ, मी यावेळेला आईबाबांना तुझ्याविषयी सांगणार. ते काहीही म्हणूदेत. पण मला हे असं लपवून ठेवल्यासारखं नको. मी तुला घरी बोलवेन. तूपण तुझ्या आईवडलांना सांगून ठेव. आपण आता लग्नाचंच काय ते ठरवून टाकू"

"जय.. प्लीज. हे बघ, तुला तुझ्या आईबाबांना जे काय सांगायचंय ते सांग. मी ममीडॅडला ऑलरेडी मी तुझ्यासोबत असल्याचं सांगितलं आहे. पण माझ्या लग्नाशी त्यांचा कसलाच संबंध नाही. आपलं बर्‍याचदा यावर बोलून झालंय. आता पुन्हा तोच विषय नको"

इशा उठून आत निघून गेली. आईवडलांना इशाबद्दल सांगावं तर ते लगेच लग्नाचा विषय काढणार. लग्नाचा विषय म्हटले की तिच्या आईवडलांचा विषय येणार. बाबांना "ही या असल्या घरातली" मुलगी नकोच असणार. त्यांची तत्त्वे म्हणजे पुढे काही बोलायचेच नाही. त्यांना सुसंस्कृत वगैरे घरातली मुलगी हवी. पण त्याने इशाला त्याच्या आयुष्यामधे स्थान देतानाच ठरवून टाकलं होतं- याबाबतीत बाबांचं ऐकायचं नाही. त्याला इशा कायम त्याच्यासोबत हवी होती. त्यासाठी कुणाच्याही परवानगीची अथवा परमीटची गरज नव्हती. पुन्हा एकदा जयचं डोकं गरगरायला लागलं. आता सध्या याचा विचार नको, असं स्वतःलाच समजावत तो बेडरूममधे आला.

इशा तिची बॅग पुन्हा एकदा चेक करून बघत होती. सहा वाजता शिवानी येणार होती.

"आय विल मिस यु" जयने इशाला मिठी मारत म्हटलं.

"जास्त लांब जात नाहीये मी. वाशीलाच जातेय. तेपण कायमची नव्हे." इशा हसत म्हणाली.

"इशा, मस्करी करू नकोस. मी माझ्या बाबांना घाबरतो वगैरे ठिक, पण म्हणून तुला कधीही अंतर देणार नाही. आय प्रॉमिस."

"माहित आहे मला. आणि मी पण तुला सोडून कुठेही जाणार नाही. बरं हे रोम्यांटिक बोलणं राहू देत. नंतर जाऊन एक किलो बटाटे घेऊन ये आठवणीने"

"मला ना तुझं हेच आवडत नाही. मी इतकं छान तुला प्रॉमिस वगैरे करतोय. ते सोडून तुला कांदेबटाटे काय आठवतात. हाऊ अनरोमॅंटिक"

"आपल्या दोघांमधे तू एकटा रोमँटिक आहेस ना ते ठिक आहे. उगाच जास्त इमोशनल ड्रामा होत नाहीत. बरं सर्वात महत्त्वाचं सांगायचंच राहिलं...."

"काही सांगू नकोस. बटाट्यासोबत मिरची कोथिंबीर कढीपत्ता सगळं घेऊन येइन" तो अगदी मनापासून चिडला.

"अरे... चिडतोस काय?" इशा हसली. "आपलं यंदाच्या व्हॅलेंटाईनडेचं तू कुठेतरी बूकिंग केलं होतंस ना? ते कॅन्सल करून घे आताच."

जय एकदम चमकला.

"ते तुझ्यासाठी सरप्राईझ होतं. तुला कसं माहित?"

"मघाशी घर आवरताना मला तुझ्या कपाटामधे हे मिळालं."

इशाने त्याच्या हातामधे एक छोटा प्लास्टिकचा डबा दिला. जयने गेल्या कित्येक दिवसांपासून तो तिच्यापासून लपवून ठेवला होता. त्या डब्यामधे त्याने दोन महिने आधीच बूक केलेल्या एका रीझॉर्टच्या पावत्या आणि एका छोट्याशा डबीमधे अंगठी होती.

"घाबरू नकोस. मी फक्त एक पावती नुसती वाचली. काय आहे ते समजल्यावर लगेच ठेवून दिलं. तो ज्वेलरी बॉक्स मात्र उघडून बघितला नाही मी."

"का?"

"सरप्राईझ आहे ना म्हणून. पण त्या इवल्याशा बॉक्समधे काय असेल याचा अंदाज आहे मला, वॅलंटाईन डेला देशील का मला?"

तो काहीतरी बोलणार एवढ्यात दारावरची बेल टणाटणा वाजायला लागली. शिवानी आली होती.

इशाने जयच्या ओठावर ओठ टेकवले आणि बॅग उचलून ती हॉलमधे निघून गेली.
=====================================================
शिवानी आली तीच मुळी बडबडत. तिला तर उत्साहाचं भरतं आलं होतं. गेले कित्येक दिवस तिने इशाच्या मागे एकातरी वीकेंडला ये असा लकडा लावलाच होता. तिघांनी मिळून सगळं सामान कारमधे चढवलं. आजचा आयता प्रोग्राम ठरलेला बघून ती एकदम सातव्या आसमानात वगैरे आहे असं म्हणत होती.

इशाची आणि तिची बडबड अखंड चालू होती. दोघींचं काय काय बोलणं चाललं होतं. जय नुस्ता शांत उभा होता. "उद्या पहाटे लवकर उठ. स्टेशनवर जायचंय ना? मी साडेचारला रीमाईंडर कॉल देते" इशा म्हणाली. "ओके" इतकंच तो म्हणाला.

जयला घर एकदम रिकामं रिकामं वाटायला लागलं. घरात आल्यावर मात्र त्याला एकदम फिल्मी स्टाईलने धावत जाऊन इशाला घरी घेऊन यावं असं वाटायला लागलं. समजलं असतं आईवडलांना आपण एकत्र राहतो तर काय बिघडलं असतं? तसंही आपलं कुठलं वागणं त्यांना पसंद पडतं? मुळात बाबांना आपण इथे राहून नोकरी करणंसुद्धा आवडत नाही. गावाकडे चार दुकानं आहेत ती कोण बघणार? कायम तर त्यांचं ऐकत आलोच आहोत ना... विचार करता करता जयने टीव्ही लावला.

तासाभराने त्याला एसेमेस आला. कुण्या ईश्वर नावाच्या माणसाचा. अशा कुठल्याही माणसाला तो ओळखत नव्हता. मेसेज वाचला तेव्हा त्याला हसू आवरेना. ईशाने तिचा नंबर ईश्वर नावाने सेव्ह करून ठेवला होता त्याच्या मोबाईलमधे. ती व्यवस्थित वाशीला पोचली होती. तिचा फोन आल्यावर आईवडलांना काही वाटू नये म्हणून तिने नाव बदललं होतं की काय कुणास ठाऊक! एकूणात त्याला इशाच्या या नाव बदलण्याची गंमत वाटली. लगेच त्याने तिला "ईश्वरेच्छा बलियसी" असा मेसेज पाठवून दिला. त्यावर तिचं "बरी आहे" हे अचाट उत्तर आल्यावर एकटाच हसत बसला.

आठ वाजता तयार होऊन तो बाहेर पडला. जवळच्याच एका स्टॉलवर जाऊन पाणीपुरी वगैरे खाल्ली. उद्या आईबाबा आले की बाहेर खायचं बंद. आई घरामधेच काही करून वाढेल. बाबांना तर अजूनही बाहेरचं काहीही विकत आणलेलं चालत नाही. त्यांच्या सोवळ्यावरून त्याला लगेच आठवण झाली. जानवं घरात कुठेतरी असावं. ते यायच्या आत घालून घ्यायला हवं, नाहीतर परत त्यांची बडबड ऐकून घ्यावी लागेल. त्यांच्या भितीने आपण त्यांच्या मनासारखं वागतो की त्यांची ती कटकट नको म्हणून असा प्रश्न त्याला केव्हाचाच पडला होता. घरी येऊन त्याने पहाटेचा अलार्म लावला आणि झोपला; झोप मात्र काही आली नाही.

इशा आणि शिवानी वाटेभर बडबडतच होत्या. शिवानीने चार दिवसांचा प्रोग्राम ठरवला होता, कुठले पिक्चर बघायचे, कुठे शॉपिंगला जायचं हे ठरवत दोघी तिच्या घरी कधी आल्या ते समजलंच नाही. इशाने तिचं सगळं सामान गेस्ट बेडरूममधे नेऊन ठेवलं.

"मी तेव्हाच तुला सांगत होते. सगळं सामान नेऊ नकोस. थोडंफार इकडे ठेव." शिवानी इशाला म्हणाली.

"हो. कारण तेव्हा तुला माझं आणि जयचं टिकणार नाही याची पूर्ण खात्री होती. अवघ्या चार आठवड्याच्या ओळखीवर जमलेलं प्रेम ना आमचं" इशा फ्रीझमधे आणलेलं सामान ठेवत म्हणाली.

"ह्म्म.. अजून लक्षात आहे तुझ्या? मी तेव्हा उगाच चिडून बोलले होते ते?"

"लक्षात रहायला तेवढी पण वर्षे नाही झालीत. बरं ते राहू देत. काहीतरी खाऊन घेऊ या. या जयच्या नाचकामांत आज नीट जेवणच नाही झालं."

"नाचकाम?" शिवानीने हसत विचारलं.

"नाहीतर काय? अगं एक साधा फोन आला, उद्या आईबाबा येत आहेत, तर हा घरभर नुस्ता सैरावैरा फिरतोय. उगाच मलापण टेन्शन. आईपेक्षा जास्त भिती बाबांची त्याला. त्याच्या बाबांविषयी जेवढं मी ऐकलंय त्यावरून मी तरी त्यांच्या समोर कधीही जाऊ शकणार नाही... जय तर फोनवर पण बाबा बोलताहेत म्हटलं की गडबडतो... "

"एवढं काय आहे घाबरण्यासारखं?"

"माहित नाही. पण लहानपणी त्याने वडलांचा भरपूर मार वगैरे खाल्लाय म्हणे... "

कितीतरी वेळ दोघी गप्पा मारत राहिल्या. बोलता बोलता दोघींनी जेवून घेतलं.

जेवणानंतर दोघी बाल्कनीमधे बसून होत्या. इशाची इथे राहत असताना ही आवडती जागा.

"एक विचारू इशा?" शिवानी म्हणाली.

"असं का परक्यासारखं? बिन्धास्त विचार की"

"तुला जयने असं घर सोडून जा म्हटल्याचं तुला वाईट नाही वाटलं. आय मीन, मला काहीच प्रॉब्लेम नाही तू इथे आलीस म्हणून पण तुझ्याजागी मी असते तर कदाचित मला ते खूप इन्सल्टिंग वाटलं असतं."

"शिवानी, अगदी खरं सांगू? मला जास्त वाईट नाही वाटलं. आफ्टर ऑल, तो फ्लॅट जयचा आहे. माझा नाही." इशाने खांदे उडवत उत्तर दिलं.

"तुला कधीच असं वाटत नाही, ते घर तुझं घर असावं म्हणून? म्हणजे, तू आणि जय लग्न कधी करणार आहात?"

"लवकरच. आणि ठरलं की सर्वात आधी तुला सांगेन. पण त्याला आधी त्याच्या घरी सांगता यायला हवं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच आहे. "

"आय थिंक जय इज जस्ट बीइंग स्टुपिड. तो बिनधास्त आमच्या सर्वांच्या समोर तुझ्याबरोबर फिरू शकतो. राहू शकतो, तुझ्या ऑफिसमधे, त्याच्या ऑफिसमधे सर्वांना हे माहित आहे. मग आईवडलांना सांगताना का घाबरतो?"

"कारण, त्याच्या वडलांचा त्याला धाक वाटतो. दॅट्स वन थिंग शिवानी वी विल नेव्हर अंडरस्टँड. तुझ्या वडलांनी आणि माझ्या वडलांनी, कधी आपल्याला धाक लावलाच नाही. मी कॉलेजमधे होते ना, तेव्हा बरोबरच्या सगळ्याजणी अगदी बॉय्जसुद्धा रात्री उशीर झाला की घाबरायचे. बाबा ओरडतील. आपल्या नशीबात नव्हतंच ते. माझे डॅड ऑलरेडी माझी जबाबदारी केव्हाच सोडून बसले होते. "

"आणि माझे डॅड अल्कोहोलिक. त्यामुळे घरात कोण आहे कोण नाही याचा त्यांना पत्ताच नसायचा. पण इशा, सीरीयसली तुला कोणीतरी असं धाक लावणार हवं होतं? जयच्या वडलांसारखं?"

"ओह नो! जयचे वडील म्हणजे एकदम एक्स्ट्रीम केस. कदाचित त्यामुळेच जय असा एकदम फंडू झाला असावा. म्हणजे दिसतो एकदम स्कॉलर प्रॉपर आणी व्यवस्थित. प्रत्यक्षामधे एक नंबरचा बदमाष."

"पण समजा, त्याच्या आईवडलांनी तुमच्या लग्नाला ग्रीन सिग्नल दिला नाही आणि त्याने तुला सोडून दिलंतर?"

"नाही सोडणार. त्याची पूर्ण खात्री आहे मला,"

शिवानीने आश्चर्याने इशाकडे पाहिलं.

"इतकी खात्री कशावरून?"

"अशीच. ती खात्री असल्याशिवाय का मी त्याच्याबरोबर राहतेय? तुला माहितीये का.... " बोलता बोलता इशा थांबली.

"का? काय झालं?"

"सांगितलं असतं तुला. पण राहू देत. जयला वाईट वाटेल.. "

"काय म्हणतेस काही कळेना मला"

"कारण, झोप आलीये. चल उद्या पहाटे लवकर उठायचंय."

"का? स्टेशनवर जाणारेस सासूसासर्‍यांच्या स्वागताला?"

"डोंट बी रीडीक्युलस. जिमला नाही जायचं का?"

"तू इथून गेल्यापासून मी अगदी कधीतरी जाते."

"ते दिसतंच आहे. वजन काय आहे आता तुझ?"

बोलत बोलत दोघी उठल्याच. इशाने झोपायच्या आधी जयला "गूड नाईट" असा मेसेज पाठवून दिला. त्याचं पण लगेच मिस यु असं उत्तर आलं. म्हणजे तोही झोपला नव्हताच.

सकाळी अलार्म व्हायच्या आधीच जयला जाग आली. सगळं आवरून गाडीला किक मारतच होता, तेव्हा इशाचा फोन आला. ट्रेन पहाटे साडेपाचला पोचणार होती. पहाटेचं अजिबात नसणारं ट्राफिक आणि अगदी शांत वारा यामुळे आजची मुंबई वेगळीच वाटत होती. यावेळेला आपल्यासोबत इशा हवी होती, हे त्याला प्रकर्षाने जाणवून गेलं. इशा रोज याच सुमाराला जिमला जाण्यासाठी उठत असते, आपण मात्र गाढ झोपेमधे असतो, उद्यापासून इशासोबतच उठूया असे काहीबाही विचार त्याच्या मनामधे बागडत होते. स्टेशनवर पोचला तेव्हा मात्र मुंबईची नेहमीची दगदग सुरू झालेली दिसली. बाईक पार्किंगमधे लावून तो प्लॅटफॉर्मकडे निघाला, सुदैवाने ट्रेन वेळेवर आली.

आईबाबांना बघताच लगेच त्याने पुढे जाऊन त्यांची बॅग वगैरे घेतली.

"कशाला? मुंबईपर्यंत आणलीच ना आम्ही? इथून पुढे तरी तू कशाला उचलतोस?" बाबा नेहमीच्या सुरात खेकसले.

जय काहीच बोलला नाही. गुमान बॅग घेऊन टॅक्सी स्टॅंडकडे निघाला.

"अहो, आल्याआल्या काय ओरडता? एकतर एवढं पहाटेचं आलाय तो." आई कशीबशी म्हणाली.

"तू गप गं. मला नको शिकवूस" बाबा वसकलेच.

जयला त्याच्या आईचं कायम कौतुक वाटायचं. आपली आई आपल्या वडलांचा एकही शब्द खाली पडू न देता कशीकाय वागू शकते याचं कौतुक. हल्ली हल्ली मात्र त्याला कौतुकापेक्षा जास्त राग यायचा. वर्षभरापूर्वी पाहिलं त्यापेक्षा आता ती अजून म्हातारी दिसत होती. बाबा मागच्या वर्षी रीटायर झाले तेव्हाच तिने पण व्हॉलंटरी रीटायरमेंट घेऊन टाकली. घेतली म्हणण्यापेक्षा बाबांनी तिला घ्यायला लावली.

त्याने टॅक्सीवाल्याला पत्ता नीट सांगितला. आईच्या हातामधे फ्लॅटची चावी देऊन ठेवली. आई आत बसली. बाबा मात्र "आणि तू कुठे जाणार आता?" म्हणत उभे राहिले.

"मी कुठेही जात नाहीये. बाईक घेऊन तुमच्या पाठोपाठ येतोय. इन केस जर टॅक्सी आधी पोचली तर म्हणून चावी देऊन ठेवली आहे."

"छान. आईवडलांना हे असं धाडायचं होतं तर स्टेशनवर तरी का आलास? आम्हाला काय आमची टॅक्सी पकडून येता येत नव्हतं?" बाबांचं बोलणं चालूच होतं.

आई काहीही बोलली नाही. जयने टॅक्सीवाल्याच्या हातात शंभरची नोट ठेवली आणि "सावकाश ये" असं सांगून बाईककडे निघाला.

बाईक चालू करायच्या आधी त्याने इशाला मेसेज करून आईबाबा सुखरूप पोचल्याचं सांगितलं. इशाचं उत्तर बेस्ट ऑफ लक असं आल्यावर त्याने लगेच "येस, आय नीड लक" म्हणून उत्तर पाठवलं.

बाबांचं एकंदर आल्यावरचं वागणं पाहता त्यांना इकडे आलेलंच आवडलं नव्हतं हे त्याच्या लक्षात आलं होतं. तरी अगदी अचानक ते दोघं इकडे का आलेत आणि कशासाठी या प्रश्नांनी त्याला सतवायला सुरूवात केली.

तो फ्लॅटवर पोचला आणी पाचेक मिनीटांत टॅक्सी पण आली. आईबाबांच्या बॅग वगैरे घेऊन गेल्यावर त्याने आईला सांगितलं. "तुम्ही दोघं अंघोळ वगैरे आटोपून घ्या. मी ब्रेकफास्ट बनवतो"

"तू बनवणार?" आईने कौतुकानं विचारलं. घरी असताना आईने त्याला एक काम कधी करायला लावलं नव्हतं. पण बाहेर रहायला लागल्यावर आता सगळीच सवय झाली होती.

"रोज बनवतोच ना?" तो सहज म्हणाला.

आईने त्याच्या केसांतून हात फिरवला. "म्हणूनच आज मी बनवते. तुला आज ऑफिसपण असेल ना? घरात कुठं काय आहे ते फक्त मला दाखवून दे एकदा, मग मी बघते सगळं"

"नको. तू थांब, रात्रभरचा प्रवास.त्यात परत या माणसाच्या बडबडीचा त्रास.." म्हणत म्हणत त्याने पोहे करायला घेतले.

"जय.." आई उगाचच ओरडल्यासारखं म्हणाली पण लगेच हसली.

"आरे देव कुठे आहेत तुझ्या या घरात?" बाबांच्या या प्रश्नाने तो गडबडला.

"तिकडे गेस्ट बेडरूममधे आहेत."

"छान, उत्तम!! देवाची खोली म्हणता येत नाही. गेस्ट बेडरूम म्हणे. देव काय पाहुणे आलेत कीकाय तुमच्याकडे" म्हणत बाबा पूजेसाठी निघून गेले.

"पाहुणेच तर आहेत. काल तुम्ही यायचा फोन आला तेव्हा गाठोड्यातून बाहेर काढलेत. चांगले बांधून ठेवले होते." जय मनातल्या मनात म्हणाला.

एवढ्यात त्याचा फोन वाजला. हा फोन इशाचाच असणार याची त्याला पूर्ण खात्री होती. पण नंबर बघितला तर शिवानीचा होता. असंच तिने सहज मला चिडवायला फोन केला असेल, असं त्याला वाटलं. त्याने फोन कट केला. लगेच दुसर्‍या सेकंदाला फोन परत वाजायला सुरूवात झाली.

"काय रे? पूजा तरी धड करू देत ना. आल्या आल्या काय ती ट्यावम्याव कटकट" बाबा ओरडलेच.

जयने फोन सायलेंटवर ठेवून दिला. पण तरीही शिवानीचा कॉल सतत येत राहिला. आईने पण विचारलं.
"काय? कुणाचा फोन आहे?"

शेवटी वैतागून त्याने फोन उचलला. पलिकडून लगेच शिवानीच्या रडण्याचा आवाज आला.

"जय... ताबडतोब इकडे ये.. एमजीएम हॉस्पिटलला..."

तिचा आवाज आणि बोलणं जय उभ्याउभ्या जणू कोसळत होता.

=========================================

"काय रे? काय झालं?" आईने बाहेर येऊन जयला विचारलं. हातात फोन घेऊन तो नुसता उभा होता.

आईचा आवाज ऐकून बाबा पूजा अर्धवट सोडून बाहेर आले.

"अरे, कुण्या मसण्याचा फोन आहे? काही बोलशील?" बाबा बाहेर येऊन ओरडलेच. जयला काय बोलायचं ते सुचत नव्हतं.

"आहो, जरा थांबा. काय झालंय ते समजू दे. काय रे जय?" आईने विचारलं तसा जय भानावर आला.

"आई, इशाचा अ‍ॅक्सिडंट झालाय. मी... जातो हॉस्पिटलमधे" जय कसाबसा म्हणाला.

"कोण ईशा?" आईने विचारलं. जयला काय बोलायचं ते सुचत नव्हतं, बाबा हॉलच्या दरवाज्याला उभे होते. आईला काय सांगावं आणि कसं? शिवानीच्या फोननुसार इशाला फारसं लागलं नव्हतं. फक्त हाताला फ्रॅक्चर होतं. पण तरी त्याला आत्ता या क्षणाला इशा कशी असेल एवढंच सुचत होतं. डोक्यामधे इशाकडे जायचं एवढंच भिरभिरत होतं. त्याच्या घरापासून वाशीला जायला किमान दीड तास लागला असता, शिवाय आता ट्राफिकचा अगदी पीक टाईम. आईला कदाचित परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं असावं, किचनमधून ती एक ग्लास पाणी घेऊन आली.

"बस इथे. शांत हो. काय झालंय नीट सांग. कुणाचा अ‍पघात झालाय? कुठे आणि किती लागलंय? कुठल्या हॉस्पिटलमधे आहे? सीरीयस आहे का?" आईने बोलता बोलता जयला हाताने धरून सोफ्यावर बसवलं.

"आई, इशा म्हणून माझी एक मैत्रीण आहे. मैत्रीण म्हणजे.. म्हणजे.. "

"समजलं. तुमच्या भाषेत काय म्हणतात माहित नाही आमच्याकडे होणारी बायको म्हणतात" आई म्हणाली. बाबा मधेच काहीतरी म्हणायच्या तयारीत होते पण आईने त्यांना लगेच "थांबा दोन मिनिटं, मग बोला तुम्ही" असं ऐकवलं. "काय झालंय इशाला?"

आईच्या त्या समजूतदार आणि मधाळ आवाजाने जयच्या डोळ्यात पाणीच आलं. "आई, सॉरी. मी आधी सांगायला हवं होतं तुम्हाला.." तो म्हणाला.

"आता माफ्या मागताय. शेणं खात होतात तेव्हा नाही सुचलं वाटतं हे?" मधे बाबा कडाडलेच.

"हे बघा, आता काही बोलू नका. आधी त्या मुलीला किती लागलंय ते बघू. मग पुढचं बोलू"

"काही पुढचं बोलायची गरज नाही. हे असले धंदे करायला पाठवलं होतं याला मुंबईमधे? तेव्हा नको म्हणून कोकलत होतो. पण नाही, यवढा माझा लेक इंजीनीअर झाला, तो काय दुकानं चालवत बसेल का? म्हणून पाठवलास ना तूच इकडे? झालं आता तुझ्या मनासारखं? कोण कुठली मुलगी याने पसंद केली म्हणे. आणि आता आपण पुढचं बोलू या... घराणं, कुळाचार, जातपात, पत्रिका वगैरे काही बघायचंच नाही का? हिंदू तरी आहे का ती मुलगी? का आता घर बाटवायचंच? एवढे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं सोवळं नेऊन गंगार्पण करायचं आम्ही?"

बाबांच्या या अद्वातद्वा बोलण्याने जय आधीच संतापत चालला होता, त्यात शेवटी त्यांचं वाक्य ऐकून तो अजूनच भडकला.

"बाबा, तुम्ही प्लीज शांत व्हा. मी तुम्हाला आधी यातलं काही सांगितलं नव्हतं कारण, तुमचा असा आरडाओरडा आणि तमाशा होणार माहित होतं."

"मी तमाशा करतोय? तू हे जे चालवलं आहेस ना त्याला तमाशा म्हणतात, समजलं?"

जयने बाबांकडे एकवार नुसतं बघितलं. बाबांच्या डोळ्यांतून नुसता अंगार धुमसत होता. बाबांच्या त्या अवताराकडे बघून जयला पुन्हा लहानपण आठवायला लागलं. लहानपणी बाबा इतके चिडले की जय सरळ गल्लीतल्या कुणाच्याही घरी जाऊन लपायचा. बाबांचा राग जरा शांत झाला की आई त्याला शोधून घेऊन जायची. त्याला आता बोलण्यासारखं बरंच काही सुचत होतं पण बोलून उपयोग होणार नाही याची खात्री होतीच.

"सामान घे तुझं आणि गावाकडे चल." बाबा आता आईवर ओरडले.

"बाबा, तुम्ही जरा एक तासभर गप्प रहाल का? इथे माझं जिच्यावर प्रेम आहे अशा मुलीचा अपघात झालाय. तुम्हाला जे काय ओरडायचं आहे, बोलायचं आहे ते नंतर बोला. आत्ता या क्षणाला मला तिच्याकडे गेलं पाहिजे. मी त्याच मुलीबरोबर लग्न करणार आहे हे मात्र कायम लक्षात ठेवा, आई, मी जाऊन येतो."

"चल, मी पण येते तुझ्यासोबत." आई लगेच म्हणाली.

"नको, आई. प्रवासाने दमली आहेस. आराम कर. मी येतोच" म्हणत जय बाहेर पडला. आता आपल्यामागे घरामधे बाबा आईवर तुफान आरडाओरडा करणार आणि खूप चिडले तर आईवर हातपण उचलणार हे लक्षात आल्यावर तो लिफ्टच्या दरवाज्यामधूनच परत आला.

"हे बघा बाबा, हे आपलं गाव नव्हे. जास्त जोरात बोलू नका. आजूबाजूला कुणी तक्रार केली तर गोत्यात याल. आवाज जरा हळूच ठेवा" दरवाज्यातूनच त्याने अतिशय शांतपणे सांगितलं. बाबा काही बोलायच्या आत तो परत मागे फिरला.

बिल्डिंगच्या बाहेर येऊन बाईक चालू केली तेवढ्यात पुन्हा एकदा शिवानीचा फोन आला.

"काय?" त्याने धडधडत्या आवाजात विचारलं.

"मी बोलतेय." इशाचा आवाज आला.

"कशी आहेस? बरं वाटतय ना? मी तिकडेच येतोय. बाईक स्टार्ट करतोय आता." तो म्हणाला. इशाचा आवाज ऐकल्यावर त्याला खरंतर खूप बरं वाटलं.

"मी ठिक आहे. पण लवकर ये." एवढं म्हणून तिने फोन ठेवला.

जयने तसंच लगेच बॉसला फोन करून आज येणार नसल्याचं कळवलं.

जय वाशीच्या रस्त्याला लागला, तशा त्याच्या मनामधे विचारांनी पण वेग घेतला. इतके दिवस आईबाबांपासून लपवून ठेवलेली गोष्ट त्याने आज अगदी सहजारीत्या सांगून टाकली होती, अर्थात त्याने अजून इशा आणि मी एकत्रच राहतोय हे सांगितलं नव्हतं. आता सांगितलं असतं तरी त्याला काही वाटलं नसतं. आज सकाळी शिवानीचा फोन आल्यापासून आणि आईला त्याने इशाबद्दल सांगितल्यापासून त्याला एक वेगळीच मोकळीक वाटत होती. कित्येक दिवसाच्या बंद घराच्या खिडक्या उघडल्यासारखी.

बाबांच्या याच ओरडण्याची त्याला इतके दिवस भिती होती आणि आज बाबा त्याच्यासमोर ओरडत असताना त्याला तसूभरही भिती वाटली नव्हती. "आपण का यांचं ऐकून घेतोय?" हाच प्रश्न त्याच्या मनामधे रूंजी घालत होता.

काल इशाला आपण "जा" म्हणून सांगितलं, आणि ती एका शब्दानेही नाराजी व्यक्त न करता गेली. वास्तविक, ती आपल्यापेक्षा जास्त व्यक्तीस्वातंत्र्याबद्दल वगैरे बोलणारी. पण तरीही इथे तिने आपल्या इच्छेला मान दिला, तिच्याजागी आपण असतो तर असं केलं असतं का? नक्कीच नसतं केलं, पण त्याचबरोबर आपल्या जागी इशा असती तर तिने आपल्याला सहजागत्या "आईबाबी असेपर्यंत तू दुसरीकडे रहा" हे देखील सांगितलं नसतं. उलट, आपण ज्या दिवशी एकमेकांसोबत रहायचा निर्णय घेतला त्याच दिवशी तिने तिच्या घरी सांगितलं होतं.

आपण एवढे संस्कारी घरामधून वाढलो, खोटं बोलायचं नाही हे अगदी मार खाऊन खाऊन शिकलो. पण तरी आपणच इतके दांभिक कसे काय झालो? धर्म पाळत नाही वगैरे ठिक, आपला कधी जास्त विश्वास नव्हताच, पण आईवडलांपासून लपवणे कशासाठी??

जयच्या मनामधे प्रश्नांचे वादळ भिरभिरतच होतं. त्याचबरोबर एक अत्यंत वाईट शंकेचा किडा सुद्धा. समजा, जर आज इशाचा अपघात झाला नसता आणि असं आईवडलांना अचानक सांगावं लागलं नसतं तर.... कदाचित बाबांनी "या घरात इशासारखी मुलगी नको" हे सांगितलं असतं तर आपण इशाला जितक्या सहजतेने काल घरातून जा म्हटलं तितक्याच सहजतेने आयुष्यामधूनही निघून जा म्हटलं असतं का? काल संध्याकाळी इशा गेल्यापासून हा प्रश्न त्याला सतावत होता. आत्ता या क्षणाला त्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.

मघाशी शिवानीचा फोन आला तेव्हा "आमचा अ‍ॅक्सिडंट झालाय आत्ता" आणि "घाबरू नकोस, इशाला जास्त लागलेलं नाही" या दोन वाक्यांमधे त्याने अक्षरश: ब्रह्मांड पाहिलं होतं. आपल्या आयुष्यामधे इशा अजिबातच नाही अशी एखादी शक्यता त्याने आजवर कधी विचारात घेतलीच नव्हती. शिवानीच्या त्या फोनने ती शक्यता त्याच्यासमोर उभी राहिली होती. मी इशाशिवाय जगू शकत नाही हे वाक्य तसं बघायला गेलं तर अगदीच घासून गुळगुळीत झालेलं. पण ज्या जगामधे इशाच नाही असं जग असेल तर जगणं शक्य आहे का? हाच प्रश्न त्याला मघापासून पडला होता. अवघ्या अर्ध्या सेकंदामधे त्याचं विश्व ढवळून निघालं होतं.

नाही. मी इशाला माझ्या आयुष्यातून घालवू शकत नाही. कारण इशाच माझं आयुष्य आहे. आईवडील, समाज असल्या सर्व गोष्टीपेक्षाही त्याच्यासाठी इशा महत्त्वाची होती. कालच्या त्यांच्या नात्यामधे अचानक आलेल्या या एका मध्यंतरामुळे त्याला इशाचाच नव्हे, तर स्वत:चादेखील एक वेगळाच पैलू सापडला होता. आता त्याला त्याचं आणि इशाचं भविष्य एकदम स्वच्छ आणि स्पष्ट दिसत होतं.

हॉस्पिटलमधे पोचला तेव्हा स्काळचे साडेदहा वाजून गेले होते, इशा आणि शिवानी दोघी लॉबीमधे बसून होत्या. जय तिला बघताच धावत तिच्याकडे गेला. इशाचा हात प्लास्टरमधे होता, आणि बाकी इकडंतिकडं खरचटलं होतं. शिवानीला पायाला भरपूर लागलं होतं पण सुदैवाने अजून जास्त लागलं नव्हतं.

"काय रे? चांगला मुहूर्त शोधला ना अ‍ॅक्सिडंटचा?" शिवानी हसत म्हणाली.

जय काहीच बोलला नाही. इशा मात्र "सॉरी" म्हणाली.

"सॉरी कशाला?" त्याने तिच्या केसांतून हात फिरवला.

"आज तुझे आईबाबा आले, आणि लगेच तुला इकडे यावं लागलं.. काय सांगितलंस त्यांना?"

जय नुस्ताच हसला.

"खोटं काहीही सांगितलं नाही. खरंतेच सांगितलं." तो म्हणाला.

इशाने डोळे अगदी विस्फारून पाहिलं. "आणि मग?"

"चल घरी, आईला भेटायचंअय तुला."

"बाबा?"

"त्यांना पण मी सांगितलंय, तुझ्याशीच लग्न करणार, त्यांना मान्य नसेल तर त्यांचा प्रॉब्लेम. आपल्याला काय?"

"आय डोंट बीलीव्ह दिस" इशा जवळ जवळ ओरडलीच.

शिवानी बाजूला उभं राहून हे ऐकत होती. "वॉव जय, काँग्रॅट्स" ती म्हणाली.

"काँग्रॅट्स वगैरे काही आत्ताच नको." जय तिला म्हणाला

इशाच्या डोळ्यात आपसूक पाणी आलं होतं. तिचा हात हातात घेऊन जय म्हणाला,

"इशा, चल घरी जाऊया"

(समाप्त).

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म.. इतक्या लवकर संपली म्हणजे जरा नवल तर वाटतंय..:)
पण शेवट आवडला.. गोष्टीचे शीर्षक पण अगदी योग्य आहे.

आता मिशन 'सूड' ना? Proud

आवडली.
वाचली पूर्ण...
थोडी लवकर संपल्यासारखी वाटली....
पुढची कथा कुठली ?? ( मोरपिसं नवीन भाग येणार का या महिन्यात ??)

थोडी लवकर संपल्यासारखी वाटली....
>> पुढच्यावेळेला अजून थोड्या गॅपने टाकेन भाग Happy

आता मोरपिसे भाग १३. मग जमलं तर सूड, नाहीतर एक (नविन पण) लिहून संपूर्ण झालेली कथा. Happy

पुढच्यावेळेला अजून थोड्या गॅपने टाकेन भाग >>>>>>>

न s s s s s s ही.........
लवकर म्हणजे ३ च भागात संपवली म्हणून् लिहलय ...

<<आता मोरपिसे भाग १३. मग जमलं तर सूड, नाहीतर एक (नविन पण) लिहून संपूर्ण झालेली कथा. >>>
काही ही चालेले..
रोज काही तरी लिहत जा ..तुझ्या हातचं रोज काही वाचायला मिळालं कि मी खुष Happy Happy

छान शेवट.
फक्त ते 'तिचा आवाज आणि बोलणं जय उभ्याउभ्या जणू कोसळत होता.' जरा जास्त वाटलं. फ्रॅक्चर झाल्याचं ऐकल्यावर कुणी 'कोसळत' नाही न? असो.

बाकी बिनूशी <का ही ही चालेल.. रोज काही तरी लिहत जा ..तुझ्या हातचं रोज काही वाचायला मिळालं कि मी खुष Happy > १००% सहमत.

जरा शेवट लवकर झाल्यासारखे वाटले. बाकि मस्त.+ लवकर म्हणजे ३ च भागात संपवली म्हणून् लिहलय ...>>> अनुमोदन!!!

मस्त चालली होती Happy
श्या...मला अजून २ तरी भाग हवे होते Sad आणि यापुढचा सिनही जाणुन घ्यायचा होता.

नंदिनी, तुझ्या कथांमध्ये अडकूनच पडल्यागत होतं Happy

Pages