जलाशयांची रेलचेल असलेल्या लोणावळ्याच्या आसपास मुक्कामी डोंगरयात्रा करणार्यांना पर्वणी असलेले किल्ले आहेत, त्यापैकी लोणावळ्याहून ३०-३५ किमी. वर असलेल्या घनगड- तेलबैलाची रांग कित्येक दिवसांपासून चिन्मय व माझ्या डोक्यात होती.
प्रचि १
प्रत्येक ३ दिवसांच्या जोडून आलेल्या सुट्टीसाठी ही रांग आमचा पहिला ऑप्शन असे व काहितरी कारणाने दरवेळी तो बारगळतही असे. शेवटी या वर्षी शुक्रवारी आलेल्या महाशिवरात्रीचा मुहूर्त साधून चिन्मयने ट्रेकचं सगळं प्लॅनिंग केलं. आमच्या वैनतेय संस्थेचा २ वर्षांपुर्वी घनगड-तेलबैला- कोरीगडचा ट्रेक झाला होता तेव्हाची बहुतेक मंडळी आमच्या ट्रेकच्या सवाष्णी घाट व सुधागडच्या extra premiumमुळे लाळ गाळू लागली.सरतेशेवटी ती मंडळी आमच्यानंतर १ दिवस उशीरा निघुन सुधागडावर आम्हाला गाठणार असं ठरलं. नकटीच्या लग्नाचं सतराशेवं मोठं विघ्नं म्हणजे या ट्रेकची बांधणी करणारा आमचा हिरोजी, 'चिन्मय' ट्रेकच्या २ दिवस आधी त्याच्या बँकेतील महत्वाच्या कामामुळे गळाला. पोटासाठी माणसाला तंगडतोड करावी लागते, पण इथे पोटासाठी तंगडतोडीला ब्रेक लागला होता. सरतेशेवटी नाशिकहून मी एकटा तर पुण्याहून दुर्गेश व सत्यजित असं त्रिकुट आणि लोणावळ्याला एकत्र येणे... ठरलं!
पहिला दिवस
मी कसार्याहून सकाळी ६.१०ची लोकल पकडून ७.३० ला ठाणे, तिथून ८.१० ची डेक्कन पकडून पावणेदहाला लोणावळ्यात पोहोचलोसुद्धा! ठाण्याला चिन्मय शोलेतल्या हात कापलेल्या ठाकुरसारखा चेहरा घेउन भेटायला आला होता. लोणावळा शहर म्हणजे अजब रसायन आहे. ५० रू. साठी १०-१५ किमी. पायपीट करून मध, खवा वगैरे आणणारे आदिवासी इथे आहेत तर दिवसाला ५ अंकी रक्कम उडवत फिरणारी मंडळीही आहेत. विरोधाभासाचं उत्तम उदाहरण म्हणजे दिवसाला रहाण्याचं तिसेक हजार रू. भाडं असलेल्या अँबी व्हॅलीपासून अवघ्या १२-१५ किमी वरील तुंगवाडीसाठी लोणावळ्याहुन दिवसाला फक्त एकच बस (संध्या. ४) आणि जवळपास तेवढ्याच अंतरावरील भांबर्ड्यासाठीही २ बसेस (दु साडेबारा व साडेचार).
दोन तास वाट पाहिल्यावर पुण्याची जोडगोळी आली. बसस्टँडच्या बाजूला असलेल्या जोशांच्या अन्नपुर्णामध्ये मस्तपैकी जेवलो. साडेबाराची भांबर्डे बस जवळपास भरली होती. पाउण वाजून गेला तरी बस हलण्याची चिन्हं दिसेनात तेव्हा तेलबैलाला जाणार्या ज्येष्ठ नागरिकांच्या तरूण चमुतील एका ज्येष्ठाने खास पुणेरी भाषेत कंडक्टरला सोलल्यावर गाडी हलली. कोरीगडाच्या पेठ शहापुरपर्यंत म्हणजे अँबी व्हॅलीपर्यंत रस्ता हेमामालिनीच्या गालासारखा असल्याने लागलेली डुलकी पुढे ओमपुरीच्या गालासारख्या सुरू झालेल्या खड्डेबाज रस्त्यामुळे भंगली. आंबवण्यानंतर बर्यापैकी जंगलझाडी सुरू होते ती थेट सालटर खिंड ओलांडून तेलबैला फाट्याला लागेपर्यंत. सालटरच्या बसस्टॉपच्या शेडमध्ये हागणदारीमुक्त गांव योजनेचा मजेदार स्लोगन दिसला.
" सालटर ते आंबवणे पेरला आहे लसूण. संडास नाही बांधला तर राहिन मी रूसून..!"
तेलबैलाच्या जुळ्या भिंताडांचं प्रथमदर्शन भेदक आहे. तेलबैला फाट्यापासून तेलबैला गांव चारेक किमी. तर भांबर्डे सरळ तेवढ्याच अंतरावर. भांबर्ड्यात उतरल्यावर समोर नवरा- नवरी- करवलीचे सुळके दिसतात.
प्रचि २
उजवीकडे दुसर्या टोकाला ठेंगुटका घनगड सुटावल्यामुळे ओळखता येतो.भांबर्ड्यातून येकोले वस्ती गाठायला अर्धा तास लागतो. घनगडाच्या शेजारील उंच डोंगराचे नांव कुणाही गांवकर्याला सांगता आले नाही किंवा नांव माहित असलेला आम्हांला भेटला नाही- येकोल्यातलं हनुमानाचं उघडं मंदिर मुक्कामयोग्य आहे.येकोल्यातून दाट झाडीत लपलेल्या गारजाई मंदिरात पोहोचायला २० मि. लागतात. गाभार्याच्या डाव्या भिंतीवर देवनागरी शिलालेख आहे. "श्री गारजाई माहाराजाची व किले घनगडची". हा महाराज कोण? .. माहित नाही. मंदिरासमोर दिपमाळ आहे. तिच्या पायथ्याला काही शिल्पे आहेत. बरोबर पुरेसे पाणी असेल तर हे मंदिर ७-८ जणांसाठी बरं आहे.
प्रचि ३
मंदिरातून घनगडावरील जोडगुहेत पोहोचायला विसेक मिनिटे लागतात. वाटेत ढासळलेलं प्रवेशद्वार लागतं. डावीकडच्या गुहेत थोडी सपाटी असल्याने तिथे सॅक्स ठेवल्या. उजवीकडे एक मोठा शंभरेक फुटी उंच शिलाखंड कड्याला रेलून उभा असलेला दिसतो.
प्रचि ४
त्या मधल्या जागेत देवी वाघजाईचं स्थान आहे. मूर्ती सुबक आहे. आणखी थोडं पुढे सध्या पिणेबल पाणी असलेलं गडावरील एकमेव टाकं गाठून तळाला गेलेलं पाणी भरुन घेतलं. गुहांच्या डावीकडे माथ्यावर जायची वाट आहे. इथे १५ फुटांचा पॅच आहे. सोपा आहे पण सेफ्टीसाठी ५० फुटी दोर जवळ हवा. माथ्यावर टाकी, दोन बुरुज, जोत्यांचे अवशेष आहेत. तेलबैला, सुधागड व वरून दिसणारा एकुणच परिसर फोटोजेनिक।
प्रचि ५
पेशवेकाळांत सदाशिवभाउंचा तोतया कनोजी ब्राह्मणाला घनगडावर कैदेत ठेवल्याचा उल्लेख सापडतो.खिचडीची तयारी करायचे असल्याने सुर्यास्त शो रद्द करून झटपट उतरलो. रात्री खिचडी, पापड, बायकोने दिलेले अप्पे+चटणी वगैरे हादडून झोपलो. दोनेक उंदीर सारखे डोकावत होते. कदाचीत त्यांची बेडरूम आम्ही बळकावल्यामुळे त्यांची घालमेल झाली असावी. आम्हीही सावध होवून खाण्याचे पदार्थ सॅकमधून काढुन सुरक्षित टांगून ठेवले, नाहीतर वासाने उंदीर सॅक कुरतडतात..!
दुसरा दिवस
पहाटे गजर झाल्यावर तिघेही उठलो, पण एकुणच अंधार पहाता पुन्हा लवंडलो. सकाळी ८ वा. भांबर्ड्यातून थेट तेलबैला गांवात जायला बस आहे. थोडं रेंगाळतच आवरल्यामुळे ती चुकली. येकोल्यातून भांबर्डयाला न जाता शेताडीतून वाट तुडवत मोठा ओढा ओलांडून रस्त्याला लागलो. या ओढ्यात मार्चपर्यंत पिण्याचं पाणी असतं. तेलबैला फाट्यापासून गांवापर्यंतचा ३ किमी. चा डांबरी रस्ता चांगला आहे. तेलबैला गांवाचं location भन्नाट आहे. इथल्या जुळ्या भिँतीँचा निसर्गाविष्कार जगांत कुठेही नाही.
प्रचि ६
डाव्या भिंतीवर पायर्या, गुहा वगैरे किल्ल्याचे अवशेष आहेत. गांवात जास्त वेळ न काढता चिंधू लक्ष्मण मेणेमामांना बरोबर घेतलं व तेलबैलाच्या गांवात उतरलेल्या सोंडेवर स्वार होऊन उजव्या भिंतीस उजवीकडे ठेवत अर्ध्या तासांत मधल्या खिंडीत पोचते झालो. खिंडीत डाव्या भिँतीच्या पायथ्याला भैरवाचा तांदळा, गार पाण्याचं टाकं आहे.
प्रचि ७
माथा गाठायचा प्रस्तरारोहण मार्ग बोल्ट्स ठोकलेले दिसत असल्याने ओळखू येत होता. खिंडीतून सुधागड माथा दिसत होता. आता मामा हाताशी असल्याने आमच्या मनांत ठाणाळे लेणी पहाण्याची कातील योजना चालू झाली. आधी ठरल्याप्रमाणे आम्ही सवाष्णी घाटाने उतरणार होतो. या मार्गे ही लेणी वळसा व वेळ घेतात असं ऐकलेलं, पण वाघजाई घाटाने उतरलं तर बरं असं बर्याच जाणकारांकडून ऐकल्यामुळे आम्ही वाघजाईची वाट निश्चित केली. एव्हाना साडेअकरा वाजले होते. तेलबैला उतरल्यावर साधारण अर्धा तास घाटधारेवर यायला लागतो.
प्रचि ८
उतरायला सुरुवात केल्यावर लगेच वाघजाई देवीचं देऊळ लागलं. देवळांत ७-८ मुर्त्या ओळीने मांडून ठेवल्या आहेत. त्यांतली वाघजाई नेमकी कुठली याचा विचार करायला सवड व डोके दोन्हीची वानवा असल्याने नमस्कार करून पुढची वाट धरली. ऊन्हाने आसमंताचा पुर्ण ताबा घेतलेला.. पाणी अजून तरी मुबलक होते. मध्येच मामाने जाहीर केलं की लेण्यांकडे उतरणारी वाट बहुतेक बुजली आहे व आपल्याला पुढे जाऊन वळसा मारून उतरतच लेणी गांठावी लागणार आहेत. ह्या वळशाच्या ढोरवाटेने आमच्या तोंडाला चांगलाच फेस आणला. सकाळी उठल्यापासून पोटांत पाण्याशिवाय का sssही नव्हतं! लेण्यांत पोहोचेपर्यंत पावणेतीन वाजलेले.
प्रचि ९
या हीनयान लेण्यांचा खोदकाल भाजे लेण्यांच्याही आधीचा म्हणजे इ.स्.पू. २ र्या शतकांतला आहे. इथे प्रथमच मौर्यकालीन (अशोक) चांदीची नाणी सापडली आहेत. या लेण्यांचा नव्याने शोध मिशनरी जे. अॅबट यांना जाने. १८९० मध्ये लागला. क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनीही काही काळ या लेण्यांचा आश्रय घेतला होता.
प्रचि १०
लक्ष्मीच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत, त्या अर्थाने जुने 'श्रीस्थान'. पांडवलेण्यांच्या शिलालेखांतील सिरीटन म्हणजे श्रीस्थान म्हणजे ठाणाळे असा एक तर्क आहे. १९५४ मध्ये राष्ट्रीय पुरातत्व वास्तू म्हणून संरक्षित. एकुण २३ विहार आहेत. २ ब्राह्मी शिलालेख आहेत.
प्रचि ११
कमानींवरील विविध प्राण्यांची शिल्पे अप्रतिम आहेत. पैकी मोठे नागशिल्प पहाण्याजोगे आहे.
प्रचि १२
अनेक स्मारकस्तूप असलेली एक गुंफा आहे. लेणी पाहील्यावर झटपट मॅगी करायचं ठरवलं तर मामाने आणखी एक बॉम्ब टाकला.' आता पाणी खाली बेहरामपाडयाशिवाय कुठेही नाही. असलं तर खालच्या ओढ्याला!'. तिघांचीही तपासणी घेतली तर मोजून २ लि. पाणी होते. पैकी दिड लि. मध्ये मॅगी केली. गरम आहुती पोटात जातांच डोळ्यांच्या झापडांनी हट्ट सुरु केला. त्यांना न जुमानता अर्ध्या लि. पाण्याचे रेशनिंग करायचे ठरवून निघालो. १०० पावलांवरील ओढयामध्ये बारीक धार असलेलं पाणी दिसताच आम्हांला झालेला आनंद कसा असेल हे केवळ ही स्थिती भोगलेलेच अनुभवू शकतील. बाटल्या फुल्ल करून निघालो. जंगलातली वाट असली तरी कोकणातला उष्मा गोंजारुन हैराण करत होता!
प्रचि १३
साधारण पाउण तास चालल्यावर वरच्या बाजूला आवाज ऐकु आले, तेवढ्यात मामा म्हणाला, हा सवाष्णीचा घाट. आवाजही दुसर्या दिवशी निघालेल्या आमच्या मंडळींचे होते. आमच्या दुर्गेशने सरळ लोळण घेतली व आता त्यांच्याबरोबरच पुढे जायचं जाहीर केलं. पाउण तासात वरची मंडळी झटपट खाली आली. पाच वाजलेले. ते १४ व आम्ही ३ अशा १७ जणांना सुधागडमाथ्यावर नेण्याची जबाबदारी मामांनी घेतली व खाली गांवात न जाता एका आडवळणाच्या वाटेने आम्ही निघालो.
प्रचि १४
सुधागडाच्या पायथ्याला भोज्ज्या करेपर्यंत अंधारलं. मावळतीकडे सरसगड उंचावलेला दिसत होता.
प्रचि १५
कासारपेठ मारुती व तानाजी टाकं मागे टाकेपर्यंत पूर्ण अंधार झालेला होता आणि आम्ही, त्या शिलाखंडांच्या राशींवरुन धडपडत, एकमेकांना सावरत महादरवाजात आलो. त्या मिट्ट अंधारातही सुधागडाच्या त्या महादरवाजाचं भव्य वैभव जाणवत होतं. गार वार्याने माथा आल्याची जाणीव दिली. गडदेवता भोराईच्या देवळांत दुसरा ग्रुप असल्याने आम्ही आणखी थोडं पुढे पंतसचिवांच्या वाड्याकडे गेलो. चौसोपी वाड्यातल्या सारवलेल्या ओसरीवर सॅक ठेवतांनाच सगळा थकवा पळुन गेला होता. वाडा मोडकळीला आलेला असला तरी गतवैभवाची जाणीव होत होती.
प्रचि १६
सकाळी पावणेसात ते रात्री ९ अशा बेभान तंगडतोडीने आमचाही पायांवरचा विश्वास दुणावला होता. त्यांच्या मागणीप्रमाणे आमच्या राहुल वस्ताद व भाउसाहेबांनी बनवलेला गरम गरम कांदा-बटाटा रस्सा व भात ओरपला. शेकलेल्या पोटाने चढलेल्या गुंगीला शरण जात झोपी गेलो....
तीसरा दिवस
गडावरच वस्ती करुन रहाणारी पाच्छापुरातली २-३ घरे आहेत. मामाने त्यांच्याकडून तांब्याभर धारोष्ण दुध आणलं. झटपट चहा-भिस्कुटं खाऊन गडफेरीला निघालो. सुधागड डोंबिवलीच्या ट्रेकक्षितिज ग्रुपने दत्तक घेतलाय. ओसरीवरच किल्ल्याची माहिती व नकाशा असलेले २ फ्लेक्स आहेत. वाडयाशेजारीच एक खोल चौकोनी विहिर व महादेव मंदिर आहे.
प्रचि १७
वाडयापासून श्रीभोराईदेवीमंदिरापर्यंत पाखाडी बांधलेली आहे. भोरच्या पंतसचिवांची ही कुलदेवता आहे.
प्रचि १८
मंदिराच्या भवताली अनेक समाध्या दिसतात. नवरात्रांत गडावर उत्सव असतो. सभामंडपात वाघाची मूर्ती व जुनी मोठी घंटा आहे. समोर हत्तीने पाठीवर तोलून धरल्याची रचना असलेली दिपमाळ आहे. बाकी गडावर अनेक थडगी, अंबारखाना, २ तलाव व अनेक पडीक अवशेष दिसतात. एका तलावात भरलेलं कुमुद फुलांचे संमेलन.
प्रचि १९
गडाची रचना इ.स्.पू. २र्या शतकांतच झाली असावी कारण परिसरातली ठाणाळे व खडसांबळ्याची लेणी त्याच काळांतली आहेत.१४३६ मध्ये बहमनी सुलतानांनी गड जिंकल्याचा उल्लेख. १७ व्या शतकाच्या मध्यांत मराठी राज्यांत दाखल झाल्यावर जुने भोरपगड नांव बदलून सुधागड ठेवण्यांत आले. सुधागडाचा महादरवाजा थेट रायगडाची आठवण करुन देतो.
प्रचि २०
मंदिरातले गुरव पाच्छापुरांतले होते. त्यांनी ठाकुरवाडीतून पालीला जायला सकाळी ११ नंतर दिडची बस असल्याचे सांगितले. गडफेरीमुळे ११ ची बस चुकणारच होती. ठाकुरवाडीच्या वाटेने उतरायला लागल्यावर सुरुवातीलाच गार पाण्याचे टाके आहे.
प्रचि २१
इथे बुरुजाचे अवशेष दिसतात. ठाकुरवाडीच्या वाटेवर हल्ली लोखंडी शिडी लावल्यामुळे पाउणएक तासांत गांवात उतरलो.
प्रचि २२
प्रचि २३
वाडीतून दोनेक किमी.वर पाच्छापूर आहे. गांवात आल्यावर समजले, इथून ८ किमी.वर पाली फाटयावर एका मोरीच्या बांधकामामुळे सर्व वाहतुक बंद झाली आहे. ११ वा. आलेली बस शेवटची होती व त्या ड्रायव्हरनेच गांवात ही बातमी सांगीतली होती. कोकणातल्या झापडवणार्या उन्हामुळे आधीच वैतागलेल्या मंडळींच्या परीक्षेचा हा क्षण होता, पण आमच्या भाउसाहेबांनी एका मोटरसायकलस्वाराला धरून फाट्यावर जाउन काम चालू असलेल्या ठेकेदाराचाच डंपर भाड्याने ठरवून आणल्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात (की डंपरमध्ये) पडला.
प्रचि २४
फाट्यावरून भिरा- पाली बस पकडून पाली, मग बस नसल्याने व्हॅनने नागोठणे, पॅसेंजरने दिवा, मग डोंबिवलीत जेवण. मग ठाण्यातून तुफान स्पीड्च्या अमरावती एक्स्प्रेसने २ तास ५ मि. त नासिकरोड.
प्रचि २५
( हा लेख गिरीमित्र संमेलन २०१३ च्या स्मरणिकेतही समाविष्ट केला गेला आहे.)
मस्तच !!! (कसं काय नजरेतुन
मस्तच !!! (कसं काय नजरेतुन सुटले :()
वर्णन छान आणि पिकासावरचे फोटोही मस्तच!!!!!
फोटो मस्त आणि वर्णनही.
फोटो मस्त आणि वर्णनही.
फोटो आता लेखात टाकले आहेत.
फोटो आता लेखात टाकले आहेत.
फोटो आणि वर्णन दोन्ही मस्त!!!
फोटो आणि वर्णन दोन्ही मस्त!!!
वा! सुरेख. पदभ्रमण आणि वर्णन
वा! सुरेख. पदभ्रमण आणि वर्णन दोन्हीही आवडले.
मस्तच प्रचि १९ मधली फुलं
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रचि १९ मधली फुलं नेफाडी की नफाडी असं अंधुकसं आठवतय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुधागड आणि त्या येरीयात दमट हवामानाने वाटच लागते बॉ..
मस्त वर्णन.
मस्त वर्णन.
भारी, भारी, भारी .......
भारी, भारी, भारी .......
मस्त ट्रेकलेख आणि सुंदर प्रचि
मस्त ट्रेकलेख आणि सुंदर प्रचि
तो ४ था प्रचितला कातळ छाती दडपवणाराच.
लय भारी लिव्हलय अन फोटुसुद्धा
लय भारी लिव्हलय अन फोटुसुद्धा चाबुक ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम झक्कास !!
एकदम झक्कास !!
मस्त !!
मस्त !!
मस्तच वर्णन छान आणि फोटोही
मस्तच
वर्णन छान आणि फोटोही मस्तच एकदम झक्कास !
श्री. गोळेकाका,
श्री. गोळेकाका, प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण या लेखातील एक प्रचि http://srujanashodha.blogspot.in/2013/02/blog-post.html#links इथे अनुमती घेऊन लावले. खुप उशीरा तुम्ही दिलेला तो धागा पाहिला आणि चकित झालो. असलं काही डोक्यात नसतांना सहजपणे काढलेल्या त्या प्र.चित्राला तुम्ही एक वेगळीच ओळख दिलीत त्याबद्दल आभार. खरं सांगतो त्या चित्रात दिसणारं झाड मी तुमच्या धाग्यातल्या ओळी वाचल्यावर पाहिलं!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अहा! आता लेख अगदी पूर्ण झाला!
अहा! आता लेख अगदी पूर्ण झाला!
जुन्या आठवणी ताङया झाल्या.
जुन्या आठवणी ताङया झाल्या. लेख व फोटो अप्रतिमच आहेत. मी मित्रंबरोबर 1998-99 साली मित्रंबरोबर (3) कोरीगड, घनगड तेथून खाली कोकणात उतरलो होतो. पालीच्या गणपतीचे दर्शन सुधागडावर गेलो होतो. उन्हेरेच्या गरम पाण्याच्या कुंडावर रात्री मुक्काम सुद्धा केला होता.
माफी असावी परवानगीशिवाय फोटो टाकत आहे. तैलबैल्याची सावलीचा फोटो जोडला आहे.
सुंदर वृत्तांत आणि प्रचि
सुंदर वृत्तांत आणि प्रचि![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
[भाग १]हेमन्त तुमचा हा लेख
[भाग १]हेमन्त तुमचा हा लेख वाचला फोटो आणि वर्णन फारच आवडले .
[भाग १]हेमन्त तुमचा हा लेख
[भाग १]हेमन्त तुमचा हा लेख वाचला फोटो आणि वर्णन फारच आवडले .
[भाग १]हेमन्त तुमचा हा लेख
[भाग १]हेमन्त तुमचा हा लेख वाचला फोटो आणि वर्णन फारच आवडले .