नक्कीच 'स्पेशल' - स्पेशल छब्बीस - (Movie Review - Special 26)

Submitted by रसप on 8 February, 2013 - 09:02

Truth is stranger than fiction, but it is because Fiction is obliged to stick to possibilities; Truth isn't.
- Mark Twain

अश्या खरोखर अनेक गोष्टी असतील, ज्या आपल्याला माहित तर नाहीतच, पण आपण 'असं काही असू शकेल' असाही विचार केलेला नसेल. जसं पाण्याच्या वर दिसणारं हिमनगाचं टोक, छोटंच असलं, तरी ते पाण्याखाली किती असेल, हे आपल्याला कळत नाही, तसंच सत्याचं दर्शनी रूप असावं. 'अ वेनस्डे' मध्ये 'नीरज पांडे' नी अशीच एक कथा मांडली होती, जिच्या सत्यतेचा पुरावा कुठेच नाही. ती कहाणी, कल्पनाविष्कार असेल पण, तसे खरोखरही कशावरून घडले नसेल ? त्याचप्रमाणे 'स्पेशल छब्बीस' मधूनही पांडे अशीच एक कथा मांडतात, जी कदाचित खरीही असू शकते. किंबहुना, चित्रपटाच्या सुरुवातीस 'Base on true incidents' असे दाखविलेही जाते. पण, असे नुसते सांगणे, श्रेय नामावलीच्या वेळेस वृत्तपत्रांतील बातम्या दाखवणे ई. दिखाव्यांतून कुठलीही कहाणी 'खरी' वाटत नसते, ते प्रेक्षकापर्यंत 'पोहोचवायला' लागते. ती पोहोचली तर, अतर्क्यसुद्धा खरे वाटते आणि नाही पोहोचवता आल्यास एखादी साधी सरळ प्रेमकहाणीही भंकस वाटते. पांडे 'स्पेशल छब्बीस'ची कहाणी 'पोहोचवतात', ती खरी वाटते आणि इथेच चित्रपट यशस्वी ठरतो.

चित्रपटाच्या जाहिरातींतून, त्याची कहाणी बहुतांशी कळलेलीच आहे. म्हणजे, मला तरी ती आधी माहीतच होती, पण औपचारिकता म्हणून थोडासा आढावा..

१९८७ चा काळ. अजय (अक्षय कुमार), शर्माजी (अनुपम खेर), इक़्बाल (किशोर कदम) आणि जोगिंदर (राजेश शर्मा) ही चौकडी नकली सी.बी. आय./ इन्कम टॅक्स ऑफिसर्स बनून, नकली धाडी घालून लोकांना लुटत असते. ह्यांचे टार्गेट्स असतात राजकीय नेते, मोठे उद्योजक, दलाल आणि इतर काळा पैसावाले. अश्या अनेक जणांचा काळा पैसा लुटूनही त्यांच्या विरोधात पोलिसात एकही तक्रार नसते कारण लुटलेला पैसा बेकायदेशीर असतो आणि ह्याचाच फायदा घेऊन ही टोळी देशातील अनेक लहान-मोठ्या शहरांत आपली कांडं करत असते. दिल्लीतील एका राजकीय नेत्याच्या घरावरील धाडीत हे चौघे जण इन्स्पेक्टर रणवीर सिंग (जिमी शेरगिल) व त्याची सहकारी शांती (दिव्या दत्ता) ह्यांना समाविष्ट करतात, अर्थातच 'सी.बी.आय. ची रेड आहे, तुमची मदत हवी आहे' अशी खोटी बतावणी करून. आपण आपले कर्तव्य बजावत आहोत, ह्या गैरसमजात राहून रणवीर सिंग त्यांना मदत करतो आणि सर्व माल लुटून, ते त्याच्या डोळ्यांदेखत पसारही होतात. ह्यानंतर मात्र खरी सी. बी. आय. ह्या प्रकरणाची दखल घेते आणि वसीम खान (मनोज वाजपेयी) रणवीर सिंगच्या मदतीने छाननीस सुरुवात करतो. ह्यानंतर काय आणि कसं होतं त्यासाठी चित्रपटच पाहायला हवा. तेव्हाच 'स्पेशल छब्बीस' म्हणजे काय हेही समजून येईल.

अमुक कहाणी अमुक काळातच का घडावी, असे प्रश्न मुद्दाम विशिष्ट कालखंड दाखवल्यावर पडतातच. ही कहाणी ८० च्या दशकात का घडावी ? कारण सरळ आहे. आजच्या, 'मोबाईल' जमान्यात, इतक्या राजरोसपणे टोप्या घालणं पटलंच नसतं. तसेच, लुटलेला पैसा काळा होता हे उघड होईल म्हणून आजचे धनदांडगे मूग गिळून गप्प बसणे शक्य वाटत नाही. करोडोंचे घोटाळे उघड करूनही उजळ माथ्याने फिरण्याचे धार्ष्ट्य असलेल्या निर्ढावलेल्या लोकांचा व त्यांना फिरू देणाऱ्या व्यवस्थेचा हा काळ आहे. म्हणून ८० चे दशक योजले असावे.

Special-26-large.jpg

'नीरज पांडे' हे नाव वाचल्यावर 'अ वेनस्डे' आठवणारच आणि त्याच्या प्रत्येक चित्रपटाची वेनस्डेशी तुलना होणारच. तशी इथेही होईलच. वेनस्डे खूप जलद चित्रपट होता. स्पेशल छब्बीस तसा नाही. अर्थात, दोन्हीच्या कहाणीत फरक असल्याने अशीच गती अपेक्षितही होती. पण तरी, काही भाग अनावश्यक वाटले. अजयची प्रेमिका 'प्रिया' (काजल अगरवाल) हे पात्र कहाणीस काहीही हातभार लावत नाही. पण काजल अगरवालच्या चेहऱ्यात तजेला व गोडवा असल्याने आणि ती संयतपणे वावरल्याने तिचा त्रास अजिबातच होत नाही. एम. एम. करीम कडून अजून मधुर संगीत आपण ऐकलेलं असल्याने, जरा निराशाच पदरी येते. हिमेश रेशमियाचं गीत हा ह्या चित्रपटातील एकमेव अत्याचार आहे, पण तोही 'एकमेव'च असल्याने आपण तितपत सूट देऊ शकतोच ! (Having said this, 'धर पकड' ही गाणं छान आहे, पण ते सिनेमा संपल्यावर आहे.)

स्टार कास्ट उत्तम आहे. प्रत्येक भूमिकेसाठी केलेली निवड एकदम चपखल वाटते. अक्षय कुमार चौकडीचा मास्टर माइण्ड शोभतो आणि निडर, धूर्त 'अजय' तो व्यवस्थित साकारतो. शर्माजीच्या भूमिकेत अनुपम खेर फिट्ट. प्रत्येक मोहीम संपल्यानंतरचा घाबराघुबरा शर्मा 'खोसला'ची आठवण करून देतो. एकदम परफेक्ट. राजेश शर्मा आणि दिव्या दत्ता ह्यांना मर्यादित वाव आहे पण तेही आपापल्या भूमिकेस न्याय देतात. किशोर कदमला अश्या महत्वाच्या भूमिकेत पाहून माझा मराठी उर अभिमानाने फुलला. त्याला अजून 'मोठ्या' भूमिका मिळतील, अशी आशा वाटते. जिमी शेरगिल मला नेहमीच एक 'अंडर रेटेड' अभिनेता वाटला आहे. त्याच्यातला अभिनेता फक्त सपोर्टिंग रोलकरण्यापेक्षा जास्त ताकदीचा आहे, हे त्याचा प्रत्येक सपोर्टिंग रोल बघितल्यावर जाणवतं, इथेही जाणवलं. मनोज वाजपेयी परत एकदा त्याची 'उंची' दाखवून देतो. एक उत्कृष्ट कलाकार, मेहनतीच्या व त्याच्या गुणांच्या जोरावर तरू शकतो, त्यासाठी चिकना चेहरा, दणकट देहयष्टी आवश्यक नसते. हे त्याचा, सडपातळ सी.बी.आय. ऑफिसर जाणवून देतो.

चित्रपटात, कच्चा दुवा विशेष जाणवत नाही. वर लिहिल्याप्रमाणे काही अनावश्यक भाग, पात्रं आणि संगीत नको होतं, पण सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय, चांगली पटकथा व सूचक दिग्दर्शन ह्या कच्च्या दुव्यास झाकतं.

जरासे(च) प्रेडिक्टेबल कथानक असले तरीही, 'स्पेशल छब्बीस' नक्कीच 'स्पेशल' आहे आणि त्यामुळे त्यासाठी स्पेशली वेळ काढावा व पैसा खर्च करावा. दोन्हीही वसूल होईलच, माझे तरी झाले !

रेटिंग - ४.०
http://www.ranjeetparadkar.com/2013/02/movie-review-special-26.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उद्या बघायचा निर्णय झाला तर नक्कीच यातल्या उणिवांवर लिहायला आवडेल....अर्थातच ओढुनताणुन नाहीच Happy
.
.
काहीच मिळाले नाही तर चांगल्यावर लिहिणार Happy

पाहण्याचा विचार आहे माझा.>>
.
.
पैसे तुमचे.......
डोळे तुमचे
समज तुमची
.
.

करुन घ्या मनस्ताप ........ Happy

नाही नाही अतिउत्तम आहे
सई सुस्साट दिसली आहे
अंकुश आणि संजय धम्माल करतात
.
.विलक्षण कथा आणि वेग.........जबरदस्त Happy

हो उपहासानेच लिहिले...........
.
.
कृपया डिव्हीडीवर आला तरी ती विकत घेउन पाहु नका

ह......

छान परीक्षण.

त्या काळात मिडीया आजच्याएवढा आक्रमक नसल्याने, मला या बातमीची फारशी आठवण नाही. पण विलक्षण घटना होती, असे वाटतेय आता. बघायलाच हवा.

काही वर्षांपूर्वी प्रेम चोप्रा एका अशाच छान मालिकेचे सूत्रसंचालन करायचा. सेम स्टोरी. लोकांना हातोहात गंडवण्याचा व्यवसाय व त्यातली सदर लोकांची कमाल.त्यात एक एपिसोड असाच होता. सी बी आय साठी तरूण उमेदवार हवेत अशी वर्तमानपत्रात जाहिरात येते. मग त्या तरूणांच्या मुलाखती घेउन त्यांना ताबडतोब जॉईन करून त्यांना तुम्ही सी बी आय मधे आलात आत लगेच तुमची टेस्ट आहे म्हणून त्यांच्या मदतीने दोघे मास्टरमाईंड एका मोठ्या ज्वेलरी शॉपवर धाड टाकतात व रेड आणि जप्तीच्या नावाखाली सगळे डोळ्यांदेखत लुटून नेतात. हा चित्रपट बघतांना दूरदर्शनवरच्या त्या मालिकेची आठवण झाली. नीरजचा चित्रपट म्हटला की कलाकरांच्या अभिनयाची अत्युच्च क्षमता बघायला मिळते. अनुपम खेर लाजवाब. अक्षयकुमारला नीरजने मस्त 'माणसाळलेय.' त्यामुळे त्याचा अभिनय चांगला व चित्रपटला योग्य झालाय. मनोजचे तर क्या कहने! भूमिका जगणे कशाला म्हणतात ते त्याला पाहून समजतं. तेव्हढे ते भंकस गाणे व नाच नको होता.इतक्या सुंदर चित्रपटाच्या बॉक्स ऑफीस यशासाठी नीरजला अशा फालतू गोष्टीची गरज नव्हती. काजलचीही गरज नव्हती. ८० च्या काळातील वातावरणनिर्मिती तर अफलातून. नीरजची स्पेशॅलिटी. अ वेन्सडे मधेही बारीकसारीक गोष्टींसह खरेखुरे पोलीसी वातावरण उभे केले होते( तेव्हढे ते मुख्यमंत्री व त्यांचे खाजगी सचिव हाय अ‍ॅलर्ट लेव्हलला स्वतः पोलीस आयुक्तांच्या भेटीला येतात हा अतर्क्य प्रसंग सोडला तर) जिमी शेरगील ताकदीचा अभिनेता आहे. किशोर कदम...जबरदस्त अभिनय.जय मराठी! एकूणच चित्रपट मस्त आहे.
एकंदरीत मस्ट वाच.
(अशाच एका बेटावर...चित्रपट बघायचा प्रश्नच नाही. मूळ चित्रपट बघा.पैसे वाचतील.आणि जोकर मराठी अभिनेत्यांना बघायचा त्रास वाचेल.सई ताम्हणकरला (व केवळ तिच्या बिकिनी अवतारासाठी हा चित्रपट बघणा-यांना) अत्यंत तातडीने मानसोपचारतज्ञाची गरज आहे. तेथे बिकिनी घालून नाही गेले तरी चालेल. पैसे मिळतात म्हणून काहीही केले तरी त्याला अभिनय म्हणतात हा तिचा गैरसमज व त्यामुळे स्वतःला अभिनेत्री नाही तर अश्लील अभिनेत्री म्हणतात हा खरा समज गावभर लागलेल्या तिच्या नागड्या पोस्टर्सवरून तिच्या डोक्यात कुणीतरी घालायला हवा. उत्कर्षाला सीमा असू शकते; अधःपतनाला नसावीच. आता पुढल्या तिच्या चित्रपटात याचे उदाहरण समोर येईलच. ( हे आकाशातल्या बापा, तिच्या नव-याला क्षमा कर!)

अतिशय सुरेख चित्रपट. आवडला मला. एकूण वातावरण मस्त उभं केलंय. सरकारी बाबु छान वठलेत.

काही दिग्दर्शकीय चुका सापडल्यात. उदा. इंग्रजीतील जाहिरात वाचता न येणारा, चुकीचे इंग्रजी उच्चार करणारा शर्मा क्लास घेताना मात्र अस्खलित इंग्रजी बोलतो. OK, guys! म्हणतो. हा शब्द १९८७ मध्ये फारसा कोणाला माहितही नव्हता. शिवाय एक सामान्य पोलिस schedule चा उच्चार स्केड्युल करतो. अशा ठळक चुका टाळता यायला हव्या होत्या.

मामी,

'स्केड्युल' मला पण खटकलं, पण 'ओके' वाटलं.

'ओके गाईज..' आणि अनुपम खेरचं बोलणं हा मुद्दा मान्यच.

मी पण पाहीला आणि मलाही आवडला. शेवट छानच. जिमी आवडला. अक्षय मस्तच .. त्याने गायलेलं गाणंही छान पण जास्तवेळ वाजवलं असतं तर लक्षात राहिलं असतं. मनोज वाजपेयी नेहमीप्रमाणेच फार आवडला (शांती मधे सुनिल असल्यापासूनच आवडतो ) अनुपम खेरचे एक घाबरट व एक काॅन्फिडंट रूपही आवडले.
पैसा वसूल सिनेमा.

सुटसुटीत आणि मनाला पटेल असा..!! उगाच मनात प्रश्न येत नाहीत.. हे असे का ..ते तसेच का.. (आणायचे तर आणु शकतात . Wink ... उदा. सिनेमा हॉल १९८७ चा आहे पण त्याच्या खुर्च्या मात्र २०१२ सालच्या आधुनिक आहेत )
.
सिनेमाची कथा आहे २ ओळीचीच परंतु पटकथा सशक्त बांधली गेली आहे.. सुरुवातीला टिव्हीवर २६ जानेवारी १९८७ ची परेड दाखवुन वातावरण निर्माण केले गेले.. प्रत्येक बाबतीत १९८७ साल उभे करण्याचा प्रयत्न केला गेला आहे..
रस्तावरच्या गाड्या देखील.....प्रिमिअर..पद्मिनी..मारुती ८०० . फियाट.. अ‍ॅम्बॅसेटर ..याच दाख्वल्या आहेत..
.
काजल ला का घेतले आहे ? का ते उपकथानक जोडले ते कळत नाही.. बहुदा अक्षय ला नायक दाखवण्यासाठी एक नायिका हवी म्हणुन असेल..;)....
.
त्या जोगिंदर ला पुर्ण सिनेमात एकही डायलॉग नाही आहे (बहुदा)..तरी ही तो ...लक्षात राहतो..
हेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे... चौघे ही नायक आहेत...
मनोज वाजपेयी प्रचंड ताकदीचा अभिनेता आहे... त्याच्या वाट्याला अजुन सिन्स असायला हवे होते...
जिमी शेरगील...उतावळा इन्स्पेक्टर छान उभा केला आहे..
.
शेवटी "स्पेशल २६" हे नाव का आहे आणि ते स्पेशल २६ कोण आहे....जबरदस्त कलाटणी देउन उत्तर दिले आहे...

पाहिला आवडला
काजल, अनुपमखेरच्या मुलीच्या लग्नाचा प्रसंग उगाचच!

मला एक प्रश्न पडलाय. पण तो इथे विचारला तर रहस्यभेद होईल

काही आठवड्यांनी सिनेमा सिनेमागृहातून गेल्यावर बाफ वर काढेन तोच प्रश्न विचारण्याकरिता!

बाकी पहावाच असा सिनेमा
रणजित परिक्षणासाठी हजार मोदक!

हा सिनेमा बघितला. आवडला. मस्त आहे. सगळ्यांची कामे चांगली झाली आहेत. काही चूका आहेत पण तिकडे कानाडोळा केला तर सिनेमा संपूर्ण वेळ एकदम entertaining आहे. मनोज बाजपेयी, अनुपम खेर यांनी एकदम मस्त काम केले आहेत. बाकींच्यानीही चांगले काम केलय.
ती हिरोइन आणि त्यांची प्रेमकहानी आणि गाणी मात्र अगदीच अनावश्यक वाटली. त्यामुळे चांगल्या सिनेमाचा मध्ये मध्ये फ्लो जातो, विनाकारण १५-२० मिनीटे वाया गेली असे सतत वाटत रहाते सिनेमा बघतांना.
वेन्सडे बनवणार्‍या दिग्दर्शकाकडून हे असे बळेच नाच गाणे सिनेमात टाकणे अजिबातच अपेक्षित नव्हते.

काल पाहणार होते हा सिनेमा, पण जमले नाही. आता जमेल तेव्हा नक्की जाणार.
वेनस्डे पण आवडला होता मला.

असो..
सामान्य पोलिस schedule चा उच्चार स्केड्युल करतो. >> मी पण सामान्यच आहे पण मी ही शेड्यूल नाही स्केड्यूल म्हणते. यूएस आणि यूके अ‍ॅक्सेन्ट चा फरक आहे तो इतकंच. ही चूक नाही वाटत मला. Happy

मस्त सिनेमा. अनपेक्षित शेवट. कहीतरी धक्कादायक घडणार म्हणून सगळ्यावर संशय घेऊन झाले. Happy

काजल नसती तरी नक्कीच चालली असती पण ती निदान खरोखरच Girl Next Door दाखवली हे काही कमी नाही.

एक दोन गोष्टी खटकल्या पण त्या माफ Happy

एकदम मस्त सिनेमा. शनिवारी पाहिला... झकास परिक्षण... अक्षय ने फार संयत अभिनय केला आहे. काजल अगरवाल ला घेतले आहे कारण अक्षय ला हे गुन्हे करायला काहीतरी कारण हवं ना !!! शर्माजींची पोरांची पलटण आणि त्यांच्या वरच्या जबाबदार्‍या... हे ही आहेच कारण ह्या चोर्‍यांचं.... बाकी किशोर कदम च्या वाट्याला छोटा रोल आहे.. पण सतत वावर आहे... हे ही नसे थोडके... तसच वासिम खानच्या रोल मधे मनोज वाजपेयीने धमाल आणली आहे... तो खुपच बारीक झाला आहे... पण त्याचा उअपयोग त्याचा काटकपणा दाखवायला केला आहे... नर्म विनोदी संवाद एकदम मस्त.... अनेक ठीकाणी विनोदाची पाखरण सिनेमाला मस्त बनवते... बाकी वेगाचं म्हणाल तर आम्ही तिघेही (मी, नवरा, मुलगी) कुठेही एकही मिनीट सिनेमा पासुन दूर गेलो नाही...

बाकी चूका काढायला वाव आहे..पण ही गोष्ट खरी आहे म्हणतात... आर्थात हा गुन्हा जेंव्हा झाला तेंव्हा मी शाळेत असणार... पण त्या वेळेस अशा बातम्या पेपर मधे आल्या होत्या हे माझ्या सासर्‍यांना आठवत आहे. ३० लाखाला एक चोर अश्या प्रकारे ज्वेलर ला गंडा घालुन पळाला होता जो आज पर्यंत मिळालेला नाही...१९८७ सालचे ३० लाख म्हणजे आजचे ८-१० कोटी झाले. त्या मुळे ही चोरी खुप गाजली होती म्हणतात....

एकंदर कुठेतरी जाउन काही तरी पहण्या पेक्षा हा सिनेमा पहाणे उत्तम....

मी पण सामान्यच आहे पण मी ही शेड्यूल नाही स्केड्यूल म्हणते. यूएस आणि यूके अ‍ॅक्सेन्ट चा फरक आहे तो इतकंच>>>

दक्षे, १९८७ साली जेंव्हा अमेरिकनांचं आजच्या सारखं आपल्या वर सांस्कृतिक आक्रमण झालं नव्हत, त्या वेळेस "स्केड्युल" " गाइज" हे शब्द फारसे प्रचलित नव्हते. आणि ते इकडे सामन्य पोलिसाच्या तोंडी दाखवले आहेत. आय.टी. हा प्रकार आजच्या सारखा बोकाळला नव्हता... त्या मुळे सर्व सामान्य लोक हे शब्द वापरत नसत...

आइला इकडे चित्रपट एकजात सगळ्यांना आवडला आहे पण मला तितकासा आवडला नाही म्हणजे एकदा बघायला ठिक आहे... टीपी आहे पण 'वेन्सडे' इतका भारी नाहीये...

शेवटी फारच ढोबळ चुका झाल्या आहेत असे वाटले... आत्ता चर्चा करता येणार नाही रहस्य फुटेल...

तसेच काजल बाबत सगळ्यांशी सहमत... तसेच मनोज वाजपेयीची बायको आणि तिचा दुपट्टा हा चीप प्रकार उगाच्च. काही सूचक अर्थ असावा तर तसेही त्यात काही वाटले नाही... पहिला भाग फारच धीमा आहे...

पटकथेवर अजून काम करायला हवे होते...

बाकी त्या काळातले वातावरण छान निर्मिले आहे आणि अनुपम खेर दा जवाब नही.. भुमिकेच्या दोन्ही छटा छान उलगडल्या आहेत

Pages