नक्कीच 'स्पेशल' - स्पेशल छब्बीस - (Movie Review - Special 26)

Submitted by रसप on 8 February, 2013 - 09:02

Truth is stranger than fiction, but it is because Fiction is obliged to stick to possibilities; Truth isn't.
- Mark Twain

अश्या खरोखर अनेक गोष्टी असतील, ज्या आपल्याला माहित तर नाहीतच, पण आपण 'असं काही असू शकेल' असाही विचार केलेला नसेल. जसं पाण्याच्या वर दिसणारं हिमनगाचं टोक, छोटंच असलं, तरी ते पाण्याखाली किती असेल, हे आपल्याला कळत नाही, तसंच सत्याचं दर्शनी रूप असावं. 'अ वेनस्डे' मध्ये 'नीरज पांडे' नी अशीच एक कथा मांडली होती, जिच्या सत्यतेचा पुरावा कुठेच नाही. ती कहाणी, कल्पनाविष्कार असेल पण, तसे खरोखरही कशावरून घडले नसेल ? त्याचप्रमाणे 'स्पेशल छब्बीस' मधूनही पांडे अशीच एक कथा मांडतात, जी कदाचित खरीही असू शकते. किंबहुना, चित्रपटाच्या सुरुवातीस 'Base on true incidents' असे दाखविलेही जाते. पण, असे नुसते सांगणे, श्रेय नामावलीच्या वेळेस वृत्तपत्रांतील बातम्या दाखवणे ई. दिखाव्यांतून कुठलीही कहाणी 'खरी' वाटत नसते, ते प्रेक्षकापर्यंत 'पोहोचवायला' लागते. ती पोहोचली तर, अतर्क्यसुद्धा खरे वाटते आणि नाही पोहोचवता आल्यास एखादी साधी सरळ प्रेमकहाणीही भंकस वाटते. पांडे 'स्पेशल छब्बीस'ची कहाणी 'पोहोचवतात', ती खरी वाटते आणि इथेच चित्रपट यशस्वी ठरतो.

चित्रपटाच्या जाहिरातींतून, त्याची कहाणी बहुतांशी कळलेलीच आहे. म्हणजे, मला तरी ती आधी माहीतच होती, पण औपचारिकता म्हणून थोडासा आढावा..

१९८७ चा काळ. अजय (अक्षय कुमार), शर्माजी (अनुपम खेर), इक़्बाल (किशोर कदम) आणि जोगिंदर (राजेश शर्मा) ही चौकडी नकली सी.बी. आय./ इन्कम टॅक्स ऑफिसर्स बनून, नकली धाडी घालून लोकांना लुटत असते. ह्यांचे टार्गेट्स असतात राजकीय नेते, मोठे उद्योजक, दलाल आणि इतर काळा पैसावाले. अश्या अनेक जणांचा काळा पैसा लुटूनही त्यांच्या विरोधात पोलिसात एकही तक्रार नसते कारण लुटलेला पैसा बेकायदेशीर असतो आणि ह्याचाच फायदा घेऊन ही टोळी देशातील अनेक लहान-मोठ्या शहरांत आपली कांडं करत असते. दिल्लीतील एका राजकीय नेत्याच्या घरावरील धाडीत हे चौघे जण इन्स्पेक्टर रणवीर सिंग (जिमी शेरगिल) व त्याची सहकारी शांती (दिव्या दत्ता) ह्यांना समाविष्ट करतात, अर्थातच 'सी.बी.आय. ची रेड आहे, तुमची मदत हवी आहे' अशी खोटी बतावणी करून. आपण आपले कर्तव्य बजावत आहोत, ह्या गैरसमजात राहून रणवीर सिंग त्यांना मदत करतो आणि सर्व माल लुटून, ते त्याच्या डोळ्यांदेखत पसारही होतात. ह्यानंतर मात्र खरी सी. बी. आय. ह्या प्रकरणाची दखल घेते आणि वसीम खान (मनोज वाजपेयी) रणवीर सिंगच्या मदतीने छाननीस सुरुवात करतो. ह्यानंतर काय आणि कसं होतं त्यासाठी चित्रपटच पाहायला हवा. तेव्हाच 'स्पेशल छब्बीस' म्हणजे काय हेही समजून येईल.

अमुक कहाणी अमुक काळातच का घडावी, असे प्रश्न मुद्दाम विशिष्ट कालखंड दाखवल्यावर पडतातच. ही कहाणी ८० च्या दशकात का घडावी ? कारण सरळ आहे. आजच्या, 'मोबाईल' जमान्यात, इतक्या राजरोसपणे टोप्या घालणं पटलंच नसतं. तसेच, लुटलेला पैसा काळा होता हे उघड होईल म्हणून आजचे धनदांडगे मूग गिळून गप्प बसणे शक्य वाटत नाही. करोडोंचे घोटाळे उघड करूनही उजळ माथ्याने फिरण्याचे धार्ष्ट्य असलेल्या निर्ढावलेल्या लोकांचा व त्यांना फिरू देणाऱ्या व्यवस्थेचा हा काळ आहे. म्हणून ८० चे दशक योजले असावे.

Special-26-large.jpg

'नीरज पांडे' हे नाव वाचल्यावर 'अ वेनस्डे' आठवणारच आणि त्याच्या प्रत्येक चित्रपटाची वेनस्डेशी तुलना होणारच. तशी इथेही होईलच. वेनस्डे खूप जलद चित्रपट होता. स्पेशल छब्बीस तसा नाही. अर्थात, दोन्हीच्या कहाणीत फरक असल्याने अशीच गती अपेक्षितही होती. पण तरी, काही भाग अनावश्यक वाटले. अजयची प्रेमिका 'प्रिया' (काजल अगरवाल) हे पात्र कहाणीस काहीही हातभार लावत नाही. पण काजल अगरवालच्या चेहऱ्यात तजेला व गोडवा असल्याने आणि ती संयतपणे वावरल्याने तिचा त्रास अजिबातच होत नाही. एम. एम. करीम कडून अजून मधुर संगीत आपण ऐकलेलं असल्याने, जरा निराशाच पदरी येते. हिमेश रेशमियाचं गीत हा ह्या चित्रपटातील एकमेव अत्याचार आहे, पण तोही 'एकमेव'च असल्याने आपण तितपत सूट देऊ शकतोच ! (Having said this, 'धर पकड' ही गाणं छान आहे, पण ते सिनेमा संपल्यावर आहे.)

स्टार कास्ट उत्तम आहे. प्रत्येक भूमिकेसाठी केलेली निवड एकदम चपखल वाटते. अक्षय कुमार चौकडीचा मास्टर माइण्ड शोभतो आणि निडर, धूर्त 'अजय' तो व्यवस्थित साकारतो. शर्माजीच्या भूमिकेत अनुपम खेर फिट्ट. प्रत्येक मोहीम संपल्यानंतरचा घाबराघुबरा शर्मा 'खोसला'ची आठवण करून देतो. एकदम परफेक्ट. राजेश शर्मा आणि दिव्या दत्ता ह्यांना मर्यादित वाव आहे पण तेही आपापल्या भूमिकेस न्याय देतात. किशोर कदमला अश्या महत्वाच्या भूमिकेत पाहून माझा मराठी उर अभिमानाने फुलला. त्याला अजून 'मोठ्या' भूमिका मिळतील, अशी आशा वाटते. जिमी शेरगिल मला नेहमीच एक 'अंडर रेटेड' अभिनेता वाटला आहे. त्याच्यातला अभिनेता फक्त सपोर्टिंग रोलकरण्यापेक्षा जास्त ताकदीचा आहे, हे त्याचा प्रत्येक सपोर्टिंग रोल बघितल्यावर जाणवतं, इथेही जाणवलं. मनोज वाजपेयी परत एकदा त्याची 'उंची' दाखवून देतो. एक उत्कृष्ट कलाकार, मेहनतीच्या व त्याच्या गुणांच्या जोरावर तरू शकतो, त्यासाठी चिकना चेहरा, दणकट देहयष्टी आवश्यक नसते. हे त्याचा, सडपातळ सी.बी.आय. ऑफिसर जाणवून देतो.

चित्रपटात, कच्चा दुवा विशेष जाणवत नाही. वर लिहिल्याप्रमाणे काही अनावश्यक भाग, पात्रं आणि संगीत नको होतं, पण सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय, चांगली पटकथा व सूचक दिग्दर्शन ह्या कच्च्या दुव्यास झाकतं.

जरासे(च) प्रेडिक्टेबल कथानक असले तरीही, 'स्पेशल छब्बीस' नक्कीच 'स्पेशल' आहे आणि त्यामुळे त्यासाठी स्पेशली वेळ काढावा व पैसा खर्च करावा. दोन्हीही वसूल होईलच, माझे तरी झाले !

रेटिंग - ४.०
http://www.ranjeetparadkar.com/2013/02/movie-review-special-26.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनोज वाजपेयीची बायको आणि तिचा दुपट्टा हा चीप प्रकार >> मिल्या, १९८७ चा काळ + मनोज वाजपेयीचं आणीबाणीच्या प्रसंगातही अत्यंत बारीक सारीक गोष्टींतही अष्टावधानी असल्याचं दाखवणं दिग्दर्शकाला आवश्यक वाटणं + सिनेम्याला अधुनमधून नर्मविनोदी अंगाने दिलेली फोडणी- या काँबिनेशनचा विचार करून बघ. एखादे वेळेस जस्टिफाईड वाटेल. त्याचं ते तसं ते अष्टावधानी असल्याचं दाखवणं (जे नंतर ज्वेलरवरच्या धाडीच्या वेळेस पुन्हा पुन्हा दिसतं) प्रेक्षकांच्या मनावर ठसवणं- हे शेवटाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे.

वेन्सडेशी अर्थातच तुलना होणार नाही. तो अत्यंत गंभीर आणि दाहक होता. याची अख्खी ट्रीटमेंटच वेगळी आहे. विषयही वेगळा आहे. सिनेमा परफेक्टली 'जमून' आला आहे, असं मला वाटलं.

२०१०, २०११ (आणि अर्धा २०१२ही) या काळात अक्षयकुमारने अत्यंत वाईट पद्धतीने पाट्या टाकून त्याच्या चाहत्यांनाही इरिटेट करून सोडलं होतं. तो संपला की काय, असंही वाटू लागलं होतं. तर ते तसं नाही, हे लख्खपणे दाखवणारा सिनेमा. तो तर आहेच, पण इतर सर्वांनीही किती छान काम केलंय. मनोज वाजपेयी तर सर्वांत जबरदस्त. त्याचं (असलेलं / दाखवलेलं) लुकडेपण + फेशियल एक्स्प्रेशन्स हे काँबिनेशन खूप परिणामकारक झालं आहे. अशा लुकड्या कॅरेक्टर्सचा ट्रेंड 'वासेपूर'ने सुरू केला असावा.

काजलबद्दल काय बोलणार? हिंदी सिनेमा आहे अहो. हिरोइनच नाही, हे अजून पचनी पडत नाही ना.

अरे पोस्टरवरून खरं सांगायचं तर, बरेच वर्षं रीळात अडकलेला एखादा सिनेमा 'मिळाला अखेरचा तारणहार' असं म्हणत रिलीज होतो तसाच वाटत होता........ त्यात नावही तसंच..... पोस्टरही जुनाट.....

म्हणून फिरकलो नाही.... अक्षय हल्ली वैताग आणतो हे दुसरं कारण होतं......

पण एका मागून एक चांगले रिपोर्ट्स ऐकायला मिळतायत या चित्रपटाबद्दल......

लगता है डोकावना पडेगा थिएटर मे.... Happy

टू दी बेस्ट ऑफ माय मेमरी, त्रिभुवनदास भिमजी जवेरी ज्वेलर्सवर हा दरोडा पडला होता. ताजमधे तरुणांच सिलेक्शन झालं होतं. ही केस आजही अनसोल्व्ड मिस्ट्री आहे कारण या दरोड्याचा मास्टरमाईंड कधीच सापडला नाही. Happy

माझी मेमरी तपासण्यासाठी केलेला शोध - Happy

The robbery at Tribhovandas Bhimji Zaveri still remains one of the most sensational unsolved cases in the history of the Mumbai police.

The incident dates back to March 19, 1987, when 28 so-called probationary CBI officers entered the jewellery shop around 2.15 pm. The mastermind strode straight to owner Pratapbhai Zevari, introduced himself as Research & Analysis Wing (R&AW) officer Mon Singh, and produced a search warrant.

He ordered that the close-circuit camera be shut and that the jeweller surrender his licensed revolver. No telephone calls were allowed as the recruits took samples of ornaments for investigation.

The jeweller was told that the CBI was investigating the quality of gold sold in such shops. One probationer was asked to put up a board at the entrance stating that a raid was on.

The jeweller accompanied Singh and the others as they picked up assorted jewellery before sealing it in packets. Money was also collected from the cash counter and stashed into briefcases.

Forty-five minutes later, Singh asked two men to keep the briefcases in a waiting bus. The rest of the officers were asked to guard the shop as Singh left to 'supervise' another raid.

After waiting for an hour, the 28 men realised something was amiss. The jeweller immediately called the D B Marg police. The only thing the police learnt was that Mon Singh had booked a room at the The Taj Mahal Palace & Tower on March 17.

Meanwhile, Singh got off the bus at The Taj, asked the bell boy to call a taxi, and put the bags inside the vehicle. The taxi headed towards Vile Parle where he was last seen. The booty roughly came up to Rs 35 lakh.

A background check revealed that Singh had inserted a classified advertisement in a leading daily on March 17.

He was seeking replies for the post of 'Security and Intelligence officers.'

Candidates who answered were asked to report to room 415 at The Taj, where he was believed to have been staying. He hired an office at Mittal Towers in Nariman Point when The Taj refused to grant permission to interview candidates. Singh selected 28 candidates and asked them to report near Gateway of India around noon the following day. A bus was hired which headed towards Chowpatty. All candidates were handed identity cards with fake government Ashoka insignia.

Minutes before entering the jewellery shop, they were briefed about the 'mock raid'. Almost 23 years after the daring daylight robbery, the Mumbai police are still clueless about the mysterious conman who knew too well how the intelligence agency functioned.

हायला मस्तच स्टोरी आहे की.
स्पॉयलर दे रे सुरुवातीला.>>>>>>>>>> चित्रपटात पण असंच दाखवलय का?

स्पॉयलर दे रे सुरुवातीला.>>>>>>>>>> अवघडे. चित्रपटाची कथा सांगितली तर त्याला स्पॉयलर म्हणतात. कथा ज्या घटनेवर बेतलेली आहे ती जगभर बोभाटा झालेली बातमी आहे हो Proud

रसप आता बघतेच हा सिनेमा Happy

मला पण आवडला चित्रपण. फक्त त्यात काजल च कॅरॅक्टर आणि गाणी नसली असती तर अजुन मजा आली असती.

बाकी मस्त परीक्षण.

साजिरा, मी अजून सिनेमा पाहीलेलाच नाही. उमेशची पोस्ट वाचून तो किस्सा आठवला आणि लिहीला. Happy

उद्याचा `संत वॅलेंटाईन डे' हाच सिनेमा बघून साजरा करायचा विचार आहे म्हणून खास परीक्षण वाचायला इथे डोकावलो... पैसा डुबणारा नाही याची खात्री पटली... Happy

सांगायलाही लाज वाटते मात्र गेल्या वर्षी याच मुहुर्तावर इम्रान हाशमी की खान (दोघेही मेले सारखेच) आणि बेब्बो कपूरचा `एक मै और एक तू' पाहिला होता... Sad

पाहिला आज स्पेशल छब्बीस.
चांगला वाटला.
बुद्धीजीवी लोकांसाठी तरी अधूनमधून असे सिनेमे निघत राहायला हवेत.
छोटेसेच कथाबीज, बोले तो वन लाईन स्टोरी, मात्र कुठेही न रेंगाळवता छान खुलवली.
सिनेमातील गाणी खास नसली तरी बॅकग्राऊंड म्युजिक आवडली. इतर तांत्रिक बाबीत ही सिनेमा सरस वाटला.
काही दृष्यात अक्षयकुमारकडे पाहून अन सोबतीला ऐंशीच्या दशकाला साजेसे पार्श्वसंगीत ऐकून मला उगाचच अमिताभच्या डॉनची आठवण येत होती.
कोणाला बघायचे असल्यास एकच सांगेन की पैसा वसूल फिल्म आहे.

अवांतर - अनुपम खेरचाच एक अशीच भुमिका असलेला "सी कंपनी" सिनेमा आठवला ज्यात असेच गॅंगस्टरभाई असल्याची खोटी बतावणी करून खंडणी उकळन्याचा प्रकार दाखवला होता. तो चित्रपट काय बोलतात ते मासेस साठी बनवला होता. सोबतीला तुषार कपूर वगैरे होता, फार कमी लोकांना आवडणारा मिथुनदा होता, म्हणून लुडकला. मात्र मला तो देखील आवडला होता.

अमिताभच्या डॉनची आठवण येत होती.>>>>>>>>>>>>>> खर्रच्च की क्वाय???? पुर्ण परीक्षण वाचलं. प्रतिसाद वाचले पण ह्या एका ओळीसाठी आता चित्रपट बघावा लागणार मला. Happy

रहस्यभेद चेतावणी : खालील मजकूर वाचल्यास रहस्यभेद होईल याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

.
.
.
.
.
.

कौतुक यांनी वर्णिलेला प्रसंग माझ्याही लक्षात आहे. हा चित्रपट पाहिल्यावर वाटलं की खर्‍या प्रसंगीही असंच काहीसं झालं असावं. कल्पना अशी केली की मनोज वाजपेयी शेवटी 'चुल्लूभर पानी मिलेगा?' या प्रश्नाऐवजी वेगळाच हुकूम सोडला की : 'अब हमे इज्जत बचानेके वास्ते नकली रेड मारनी पडेगी.'

खर्‍या प्रसंगी दोनतीन नकली लोक उभे करून दुकानावर धाड मारल्याचं दाखवलं असावं. सोनाराला गप्प बसवणं अवघड नव्हतं. त्याचा खरा माल चोरला गेला होताच. दुकानातला खोटा माल चोरल्याने काही फरक पडला नसता. मोन सिंगाचा तोतया उभी करायची अडचण आली असती पण त्या बाबतीत स्पेशल २८ ना गप्प बसवणंही सहज शक्य होतं.

सीबीआयच्या नावाने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन मोन सिंग चक्क मुलाखती घेतो आणि कुणालाही संशय येत नाही. हेच नेमकं संशयास्पद नाही काय?

हा आपला माझा एक तर्क. अधिक चर्चा झाल्यास उत्तम. Happy

-गा.पै.

साजिर्‍याला अनुमोदन. झक्कास सिनेमा नि मनोज वाजपेयी तर सर्वांत जबरदस्त. तो शेवटी एक चुल्लूभर पानी मिलेगा हे विचारतो ते कसले बेरिंग ठेवून विचारतो.

पाहिला! आवडला, ८० चे दशक मस्त दाखवलय, सगळ्या.न्चिच काम अतिशय सुरेख झालियेत, मनोज वाजपेयी जबरी दाखवलाय.. शेवटाचा अ.न्दाज एक दोन ठिकाणि येतो पण तरी उत्सुक्तता टिकुन राहते.
(गाणी आणि काजल अग्रवाल उगाच आहेत)

सीबीआयच्या नावाने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन मोन सिंग चक्क मुलाखती घेतो आणि कुणालाही संशय येत नाही. हेच नेमकं संशयास्पद नाही काय?>>>>>>>>>>>
.
.
सीबीआय च्या नावाने जाहीरात नव्हती...सिक्युरीटी गार्डस साठी होती. (बहुदा) :अओ:..ताज मधे मुलाखत असताना त्यांनी सीबीआय चा बोर्ड बाहेर लावलेला...

आजच पाहिला आणि आवडला. माझ्या दृष्टीने ९९ % चित्रपटात संवाद आपोआप मनात येतात किंवा शेवट मध्यंतरालाच समजतो असे इथे घडत नाही.

शेवटी रणवीर सिंग अजयला सामिल होतो की काय हे समजायला काही सीन हवे होते असे वाटते.

क्लायमॅक्स खुपच उंचावर घेऊन जातो.

पारखुन चित्रपट पहाणार्‍यांनी अवश्य पहावा आणि मराठी चित्रपट निर्मात्यांनी/ कथा -पटकथा लेखकांनी सुध्दा दखल घ्यावी.

आजकालच्या हिंदी चित्रपटात ( कटाक्षाने ) एक तरी मराठी कुटुंब आणि मराठी संवाद दाखवण्याचा ट्रेंड आलाय की काय ?

रहस्यभेद चेतावणी : खालील संदेश वाचल्यास रहस्यभेद होऊ शकतो याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

उदयन..,

>> सीबीआय च्या नावाने जाहीरात नव्हती...सिक्युरीटी गार्डस साठी होती. (बहुदा)

असं जरी असलं तरी माझ्या थियरीवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. असली माल दुकानातून गोदामात पोहोचला आहे एव्हढी बातमी लागल्याशी कारण.

आ.न.,
-गा.पै.

असली माल दुकानातून गोदामात पोहोचला आहे एव्हढी बातमी लागल्याशी कारण >>>>>>>>> तो योजने नुसारच पोहचवला...या करिताच तर जिमी शेरगील सामिल झाला Happy

माझा वेळ फुकट गेला. सिंगल स्क्रिन थेटरात पाहिल्याने पैसा फुकट गेला असं म्हणणार नाही. एरवी दुसर्‍या कोणाचा हा चित्रपट असता तर मी वेळ फुकट गेला असं म्हटलं नसतं, पण 'अ वेनस्डे' बनवणार्‍या 'नीरज पांडे'चा हा चित्रपट आहे म्हटल्यावर असं म्हणणं भाग पडलं. जिम्मी शेरगिल सीबीआयकडे मदत मागायला येतो त्यावेळी त्याची फाईल पोलिस डिपार्टमेंटकडून मागवून घ्यावी असं मनोज बाजपेयी, त्याचे वरीष्ठ, त्याचे कनिष्ठ यांच्यापैकी एकालाही वाटत नाही हे बघून मोठाच धक्का बसला.

किशोर कदमने असल्या बंडल, लो प्रोफाईल भूमिका करू नयेत. त्याने स्वतःचा आब राखून भूमिका स्वीकाराव्यात.

चित्रपट बरा आहे , शेवटापर्यंत रहस्य टिकुन राहते, १९८७ चे वातवरण उभे करताना घेतलेली मेहनत (वेगवेगळी शहरे १९८७ चीच वाटतात), अक्षय, अनुपम खेरचे , जींमी शेरगील आणि मनोज बाजपेयीची कॅरॅक्टर्स चांगली जमलीत, प्रेमाचा अँगल अनावश्यक, किशोर कदमला वाया घालवलेय.
काही गोष्टी खटकतात उदा, फोन टॅपिंग, ते १९८७ ला अ‍ॅनॉलॉग एक्स्चेंज मधे सुद्धा एक्स्चेंज मधुन / सेंट्रली करता येत होते , ते माऊथ्पीस मधे काहीतरी टाकल्याचे दाखवाय्ची गरज नव्हती

पोलिटीशीअन ला चुना लावल्यानंतर कमीशनर/ जीमी शेरगील बरोबरचा सिन नंतर फार कन्व्हीन्सींग वाटत नाही, कमिशनर खोटा म्हणावे तर पोलीटिशीअन्ला त्याच्या एरिआचा कमिशनर माहित नाहि हे पटत नाही, तो जर खरा असेल तर जिमी शेरगील च्या पोलिसठाण्याशी संपर्क करुन कमित कमी बदली तरी करुन घेईल ज्यात भांडेफोड झाली असती.

पोलिटीशीअन ला चुना लावल्यानंतर कमीशनर/ जीमी शेरगील बरोबरचा सिन नंतर फार कन्व्हीन्सींग वाटत नाही, कमिशनर खोटा म्हणावे तर पोलीटिशीअन्ला त्याच्या एरिआचा कमिशनर माहित नाहि हे पटत नाही, तो जर खरा असेल तर जिमी शेरगील च्या पोलिसठाण्याशी संपर्क करुन कमित कमी बदली तरी करुन घेईल ज्यात भांडेफोड झाली असती.
>>
अगदी अगदी!
मलाही हेच खटकलं!
जर तो कमिशनर खोटा म्हणावं तर पॉलिटिशिअनला कमिशनर माहित नाही हे पटत नाही
खरा म्हणावं तर त्याला जीमी शेरगिल खोटा आहे हे माहित नाही हे पटत नाही
बर तो पॉलिटिशिअन नंतर जीमी सस्पेण्ड झाला की नाही याची एकदाही चौकशी करत नाही हे ही पटत नाही.
अर्थात कोणताही सिनेमा परिपक्व नसतो. पण या चुका टाळता येण्यासारख्या होत्या.

गापिअंच्या सगळ्या पोस्टींना अनुमोदन

तो सीन खरंतर नकोच होता.
>>
अग पण पुढे त्यांनी अस दाखवलं ना की त्याला सस्पेण्ड करतात म्हणून तो चिडून जाऊन त्याचा बदला घेण्यासाठी मनोज वाजपेयीला जाऊन भेटतो तो. त्यामुळे कदाचित तो सिन हवा होता पण तिथेच घोळ झाला

छान जमलाय चित्रपट .... काही चुका कानाडोळा करायच्या

पुर्ण कुटुंबाने एकत्र बघण्यासारखा चित्रपट आहे हेच खुप झाले, पैसे वसुल होतात हे नक्की Happy

चित्रपट ठीकठाकच वाटला. मुळ कच्चा दुवा म्हणजे एकदा पोलिसाना हे चार लोक कोण आहेत हे कळल्यावर शेवटपर्यंत त्या सगळ्याना "टेल" का केले जात नाही हे थोडे पचले नाही. असो..

Pages