ऑफिसमध्ये कधी मेडीकल इन्श्युरन्ससंबंधी बोलणं झालं किंवा मित्रांशी बोलताना मी नेहमीच अभिमानानं सांगायचो की, कव्हरेज किंवा कोण डॉक्टर्स इन्शुरन्स ग्रूपमध्ये आहेत याचा मला फारसा फरक पडत नाही, गेल्या १३ वर्षांत एकदाही (कधीतरी सर्दी-खोकला सोडल्यास) डॉक्टरकडे जावं लागलं नाही, त्यामुळे फॅमिली डॉक्टरही कोणी नाही. दरवर्षी करू करू म्हणून ठरवत वार्षिक मेडिकल चेकअपही करत नव्हतो, हा मुद्दा मात्र सफाईनं टाळत असे.
या 'इगो'ला धक्का बसला ऑक्टोबर २०१२मध्ये. सुप्रिया भारतात असताना तिनं (एकदाची) ब्लड टेस्ट केली तर त्यात ग्लुकोज लेव्हल प्रचंड वाढलेली दिसली. त्याबरोबर तिनं मलाही तातडीनं चाचणी करायची ऑर्डरच दिली म्हणा. ती टेस्ट केल्यावर लक्षात आलं की, माझीही ब्लड ग्लुको़ज लेव्हल खूपच वाढलेली होती (Type 2 diabetes), आणि ती बराच काळ वाढलेली होती (HbA1C). अर्थात याला बरीच कारणं होती जी माहीत असूनही नजरेआड केली जात होती. आईवडिलांना डायबेटीस आहे, पण ते एक छोटं कारण झालं. बैठी जीवनशैली, व्यायाम करायचा आळस, कामाच्या स्वरूपामुळे तणाव, अनियमित झोप, अनियंत्रित आहार किंवा कधीकधी तो वेळेअभावी टाळणं, यां सर्व गोष्टी शरीराला अनारोग्याकडे हळूहळू ढकलत होत्याच.
नेमकं काय झालंय हे कळल्यावर सर्वात आधी आम्ही दोघे माझ्या ऑफीसमधल्या एका पंजाबी मित्राला भेटलो. तोही आमच्याच वयोगटातला आणि दोन वर्षांपूर्वी त्यालाही डायबेटीस (glucose - 400, HbA1C - 11.6) असल्याचं समजलं होतं. त्यानं स्वत: गेली दोन वर्षं फक्त आहार नियंत्रित करून ग्लुकोज लेव्हल ८०-११०ला आणली आहे. त्यानं बर्याच गोष्टी समजावून सांगितल्या. खाली दिलेली दोन पुस्तकं त्यानं वाचायला सुचवली. मुख्य म्हणजे डायबेटीक असलेल्यांना कार्ब्स किती हानीकारक असतात, हे त्यानं सांगितलं. मी भारतात देत असलेला डाएट प्लॅन पाहिला, तर त्यात बरेच कार्ब्स दिसतात. त्यावर मग गोळ्यांचा स्ट्राँग डोस दिलेला दिसतो. तसंच जगभर नॉनफॅटबद्दल सर्व तज्ज्ञ सांगत असतात, पण त्यातल्या कार्ब्जबद्दल फारं कोणी बोलत नाही. दुधाचंच उदाहरण देतो. एक कप नॉनफॅट दुधात एक कप होल मिल्कपेक्षा जास्त कार्ब्ज असतात. तीच गत दह्याची. तसेच बर्याचश्या नॉनफॅट पदार्थांमध्ये खूप प्रमाणार साखर, कार्ब्स असतात. इथे एका मराठी डॉक्टरांशी कन्सल्ट केलं. त्या आम्हांला म्हणाल्या की, आपण आधी तीन महिने आहार (कर्बोदकं कमी करणं) आणि जीवनशैलीत बदल करून पाहूया. त्यांना स्वतः आवश्यकतेशिवाय भारंभार औषधं देणं पटत नाही.
गेले तीन महिने खाली दिलेले आहारातील बदल केलेच, पण त्याचबरोबर रोज जे काही खात होतो ते नोंदवून (वजन आणि serving sizeसकट) ठेवत होतो. ग्लुकोज मीटर आणून दिवसातून ४/५ वेळा (fasting, after breakfast/lunch/dinner) ग्लुकोज लेव्हल तपासून नोंदवत होतो. हे सुरुवातीला करणं गरजेचं आहे कारण आपण काय खाल्यावर ग्लुकोज लेव्हल किती होते याचं गणित समजायला लागतं. त्याप्रमाणे आहारात बदल करता येतो. पुढेपुढे आपली लेव्हल किती असेल, हे मोजायच्या आधी केलेला अंदाज बरोबर येत जातो. तसेच मी एकावेळी एक variable बदलले (आहार, औषधे, व्यायाम). त्यामुळे नेमका कश्यामुळे ग्लुकोज लेव्हल किती येते हे नीट नोंदता आलं. एकदम सगळं घेऊन्/करून ग्लुकोज लेव्हल खाली आणण्यापेक्षा, हे आता आयुष्यभर करायचे असल्याने मला प्रत्येक बदलातला फरक जाणून घेण्यात जास्त उत्सुकता आहे.
ग्लुकोज लेव्हल वाढण्याचं अजून एक अत्यंत महत्वाचं कारण आहे तणाव (stress). नशिबानं माझा स्वभाव असा आहे की मी शक्यतो कुठल्याही गोष्टीचा अतिरिक्त तणाव घेत नाही. पण ज्यांना तणाव येत असेल त्यांनी त्यावर नियंत्रण मिळवणं अत्यावश्यक आहे.
गेल्या ३ महिन्यांत आहारात केलेले बदल -
१. रीफाईनड कार्ब्ज (भात आणि भाताचे प्रकार/ पोळी/ बटाटा/ पास्ता/ पिझा/ टॉर्टीया/ टॅको/ ब्रेड) पूर्णपणे बंद केले.
२. कुठल्याही प्रकारची साखरयुक्त पेये (सोडा/एनर्जी ड्रींक्स) पूर्णपणे बंद. फक्त पाणी/हर्बल टी/ सेल्झर / कॉफी ब्लॅक किंवा दूध घालून (साखरेशिवाय)/ दूध (होल मिल्क)/ ताक / unsweetened Almond Milk (ह्यात कार्ब्स खूप कमी आणि भरपूर प्रथिने असतात) पितो. आणि कृपया ती शुगर सब्स्टीट्युट्स वापरू नका.
३. बियरमध्ये देखील बरेच कार्ब्ज असतात. पूर्णपणे बंद.
४. गोड पदार्थ / कुकीज् / बिस्कीट्स बंद. रेस्टॉरंटमध्ये बरोबरच्यानं डेजर्ट घेतलं तर चवीपुरता एक चमचा खातो.
५. डाळी / कडधान्यं (छोले/वाटाणे/हरभरे) यांतून प्रथिनं मिळत असली तरी त्यात कर्बोदकेही खूप असतात. त्यामुळे फक्त पाव किंवा अर्धी वाटी डाळ / उसळ, तीही १५ दिवसांत एकदा.
६. बर्गर / सँडविच घेतलं तर no bread / with lettuce पर्याय निवडतो.
७. आहारात चिज/सॅलड/ हिरव्या भाज्या/अंडी/ ग्रीलड चिकन्/मासे यांचं प्रमाण वाढवलं आहे. त्यामुळे आवश्यक प्रोटीन्स/ फॅट्स मिळतात.(शाकाहारी पर्याय - पनीर/तोफू/अॅव्हाकाडो)
८. स्नॅक्स - अक्रोड / बदाम / भाजलेले एडमामे / स्ट्रिंग चिज
९. ज्युस बंद केला आहे. बेरीज, अॅपल, मोसंबी वगैरे फळं मोजक्या प्रमाणात खातो.
१०. तेल, घरचं साजूक तूप प्रमाणात वापरतो.
गेल्या ३ महिन्यात झालेले बदल - (फक्त आहारातील बदलांमुळे)
HbA1C
ऑक्टोबर २०१२ - ११.१
जानेवारी २०१३ - ७.२
Triglycerides
ऑक्टोबर २०१२ - 289
जानेवारी २०१३ - 157
Cholesterol
ऑक्टोबर २०१२ - High
जानेवारी २०१३ - Normal
वजन १५ पाउंड (७ किलो) कमी झालं.
ट्राउजर/जीन्स ३ साईझने कमी
टीशर्टस् / शर्टस् मिडीयम साईज व्यवस्थित होऊ लागले.
कायम हलकं आणि ताजंतवानं वाटतं.
अजून बरीच सुधारणा व्हायची आहे. नियमित व्यायाम करत राहायचं आहे. अर्थात ही आहारशैली सांभाळताना कधी कधी चीडचीड होते विशेषतः जेव्हा भारतीय उपाहारगृहात गेल्यावर एकही कर्बोदकरहीत पदार्थ सापडत नाही पण ती चीड्चीड तात्पुरती असते. कारण ही स्थिती आता कायमची असणार आहे, त्यामुळे याच रस्त्यावर वाटचाल करत राहायची आहे. यासंदर्भात एक आवडलेलं वाक्यः This is not 100 mtrs.dash, this is marathon. हे बदल सुप्रिया आणि मी दोघांनीही केले आहेत. तिची quarterly चाचणी अजून व्हायची असल्याने नंबर दिलेले नाहीत पण तीची ग्लुकोज लेव्हल रोजच्या तपासणीत कमी झालेली आढळते आहे. वजनही कमी झालेले आहे.
गेल्या आणि आताच्या चाचण्यांमध्ये पूर्ण पॅनेलबरोबर, मायक्रोअल्बुमीन/ c-peptide टेस्ट केली होती. आताचा रिपोर्ट पाहून डॉक्टर म्हणाल्यात की, चांगलीच सुधारणा आहे, हे चालू ठेवा. बरोबर त्यांनी सकाळी आणि रात्री जेवणाआधी फक्त अर्धी metformin घ्यायला सांगितली आहे.
आपल्यापैकी बर्याच जणांची जीवनशैली बैठी असते, आपल्या भारतीय आहारात कर्बोदके खूप प्रमाणात असतात. भारताला आता ’डायबेटीसची जागतिक राजधानी’ असं नको असलेलं विशेषण मिळतंय. ’बॉर्डरलाईन डायबेटीस’ या गोंडस नावाखाली बरेचजण दुर्लक्ष करून अपथ्यकारक खात असतात. कृपया असं करू नका. तुम्ही उंबरठा ओलांडलेला आहे. तातडीनं उपाययोजना केलीत तर ग्लुकोज लेव्हल आटोक्यात ठेवता येईल. कुठल्याही crash/extreme डाएटने काहीही साध्य होत नाही. परीपूर्ण / योग्य,नियंत्रीत प्रमाणात / नियमीत आहार घ्या.
ज्यांना शक्य असेल त्यांनी खालील गोष्टी जरूर करा -
१. आहारातील कर्बोदके (मुख्यतः refined carbs) तपासा. शक्य असल्यास टाळा. शक्य नसल्यास (शाकाहारी/अॅलर्जी असल्यास) नियंत्रणात खा. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी हे जरूर करून पाहावं. फक्त नियमितपणा पाहिजे. कुठल्याही गोष्टी एक आठवडा / महिना करून संपत नाही. तेवढ्यापुरता फायदा दिसेल, पण नंतर परत ये रे माझ्या मागल्या.
२. वर्षातून एकदातरी HbA1C चाचणी करून पाहा. एक दिवसाच्या फास्टींग / जेवणानंतरच्या चाचणीने लक्षात येईलच असे नाही.
३. खाली दिलेलं पहिलं पुस्तक तरी जरूर वाचा.
सुप्रियानं तिच्या एका मित्राला (तो non diabetic आहे) २ महिन्यांपूर्वी हा केलेला बदल सांगितला. त्याला कुतूहल वाटलं आणि त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी ही आहारशैली स्वीकारली. गेल्याच आठवड्यात तो मित्र त्याच्या दहा पाउंड कमी झालेल्या वजनाबद्दल कौतुकाने सांगत होता
वरचा आहारातला बदल वाचून बर्याच जणांना वाटेल की, अरे, मग खायचं काय? किंवा यांतल्या काही गोष्टी खाल्या नाहीत तर कसं होणार? आमच्या आणि मित्रांच्या अनुभवावरून नक्की सांगेन की काही गोष्टी आपण फक्त सवयीनं खात असतो, ज्यांची शरीराला खरच आवश्यकता नसते. आरोग्य/फीटनेसच्या दृष्टीनं प्रचंड फायदे होतात. आणि ग्रोसरीमध्ये नवीन पदार्थ शोधताना / किचनमध्ये नवीन प्रयोग करताना मजा येते.
उपयुक्त अॅप्सः
Diabetes tracker with blood glucose/carb log by mynetdiary - हे खूपच उपयुक्त अॅप आहे. आपले गोल यांत नोंदवून ठेवता येतात. तसेच रोजचे ग्लुकोज रीडींग, जेवण (with nutrition breakdown), औषधं, व्यायाम, पाणी यांच्याही नोंदी ठेवता येतात. त्यावरून मग वेगवेगळे ग्राफ्स, अॅनालीसीस पाहता येतात.
CalorieKing आणि GoMeals - ह्या दोन अॅप्समध्ये विविध पदार्थांचे न्युट्रीशन्स शोधता येतात. बर्याच रेस्टॉरंट्सचे पदार्थ देखील पाहता येतात.
References:
1. Good Calories, Bad Calories: Fats, Carbs, and the Controversial Science of Diet and Health - Gary Taubes
2. Dr. Bernstein's Diabetes Solution: The Complete Guide to Achieving Normal Blood Sugars - Dr. Richard K. Bernstein
तळटीप: माहीती जरूर वाचा पण आहारशैलीतील बदल तुमच्या डॉ.च्या सल्ल्याने करा.
ग्लुकोज लेव्हल आटोक्यात
ग्लुकोज लेव्हल आटोक्यात आणल्याबद्दल अभिनंदन. कीप इट अप.
लेख वाचून तू काय खात नाहीस हे कळले पण मग बंद केलेल्या पदार्थांना नक्की काय पर्याय शोधलेस ते कळले नाही.
सुदैवाने आतापर्यंत तरी अॅन्युअल चेकअप मध्ये कधी माझी शुगर वाढलेली आली नाही. पुढेही असेच होईल याची खात्री नाही तेव्हा जागरुक असलेले कधीही चांगले.
चांगली माहीती , विश यु गुड
चांगली माहीती , विश यु गुड हेल्थ !
ह्या लेखाने माझे पण डोळे थोडेतरी उघडले म्हणायला हरकत नाही , माझा नियमीत व्यायाम असतो , पण ग्लुकोज लेवल अजुन चेक केलेली नाही. आता बघायला हवी.
चांगली माहिती. मलाही रुनी
चांगली माहिती. मलाही रुनी म्हणतेय त्याबद्दल वाचायला आवडेल.
चांगली माहीती , विश यु गुड
चांगली माहीती , विश यु गुड हेल्थ ! >>> +१००...
ग्लुकोज लेव्हल आटोक्यात
ग्लुकोज लेव्हल आटोक्यात आणल्याबद्दल अभिनंदन !
मी गेले काही महिने Triglycerides कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. मला दुपारी चहाबरोबर नियमीत स्नॅक्स खायची सवय होती ती आता बंद केली आहे. त्याने खूप फायदा झाला (विशेषतः बिस्कीटे). १५-२० दिवसातून एकदा थोडी खातो. आणि सगळ्या प्रकारची साखरयुक्त पेये (सोडा/एनर्जी ड्रींक्स) बंद केली आहेत.
अभिनंदन समीर, काय खातोस तेही
अभिनंदन समीर,
काय खातोस तेही लिही ना. काटेकोर यादी वा वेळापत्रक बनवले असशील तर तेही लिही.
मला या वर्षात वजन, कोलेस्टरॉल, रक्तदाब कमी करायचा आहे. ( अस मी मागच्या वर्षी पण म्हटल होत.)
अभिनंदन समीर. रक्तशर्करा
अभिनंदन समीर. रक्तशर्करा आटोक्यात आणल्याबद्दल.
रुनी +. प्लीज काय खाताय तेही लिहा.
अभिनंदन समीर ! कीप इट अप !
अभिनंदन समीर ! कीप इट अप ! रूनी म्ह्णते त्या प्रमाणे पर्याय जाणून घ्यायला आवडेल.
अजून एक. तुमचं HBA1C 11.1 होतं. रिलेटिवली हा आकडा खूप जास्त आहे. त्यामूळे तुम्हाला काही लक्षात येण्यासारखी symptoms आली नाहीत का?
अभिनंदन चांगली माहिती
अभिनंदन
चांगली माहिती दिलीये.
अभिनंदन समीर! नुसते खाणे
अभिनंदन समीर! नुसते खाणे कंट्रोल करून बराच फरक पडलेला दिसतो.
माहिती चांगली आहे. घरामधे
माहिती चांगली आहे. घरामधे आईच्या घराण्यात डायबेटीसची हिस्ट्री असल्याने (आणि वडलांच्या घराण्यात आजोबांच्या पिढीचे सगळे शुगर फॅक्टरीत कामाला!!!) आत्तापासून काळजी घेणे चालू केले आहे.
आहारामधे केलेल्या बदलांबद्दल अधिक वाचायला आवडेल तसेच व्यायामामधे नक्की कशाचा समावेश केला तेही जाणून घ्यायला आवडेल.
अभिनंदन चांगली माहिती दिली
अभिनंदन
चांगली माहिती दिली त्याबद्दल आभार.
चांगली माहीती , विश यु गुड
चांगली माहीती , विश यु गुड हेल्थ ! >>> +१००
आपण सुरवातीपासुनच कंट्रोल
आपण सुरवातीपासुनच कंट्रोल ठेवत आहात हे एक उत्तम.
लेख आवडला. माहितीयुक्त लेख
लेख आवडला. माहितीयुक्त लेख आहे. बायकोला वाचायला देतो. माझे चेकिंग नुकतेच होऊन गेले आहे.
अनेक गोष्टी माहीतच नव्हत्या.
धन्यवाद
उत्तम लेख. अतिशय माहितीपूर्ण
उत्तम लेख. अतिशय माहितीपूर्ण आहे. मलाही आहारात काय समाविष्ट केलं ते वाचायला आवडेल. कारण तुम्हीच म्हंटलय तसं हे सगळं नाही तर खावं काय हा प्रश्न पडलाय. मला वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होइल.
शुगर कंट्रोल बद्दल अभिनंदन!
हे सगळं नाही तर खावं काय हा
हे सगळं नाही तर खावं काय हा प्रश्न पडलाय. मला वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होइल. >> +१
समीर. अत्यंत चुकीच्या
समीर. अत्यंत चुकीच्या पद्धतीने आहारात बदल केले आहेत. कोणताही शहाणा डॉक्टर हे कधी अप्रॉव करणार नाही. (ग्रॉसली अर्थात. काही बदल योग्यच आहेत.) तुमचा डाएट अॅटकीन पद्धतीचा आहे . या प्रकारच्या आहाराने किती लोकांनी किटोसिस होऊन आयुष्य गमावलेय याचा डाटा नेटवर मिळेलच.
आणि आत्ता कार्ब्ज तसेच फॅट पूर्ण बंद केल्याचे परिणाम काही वर्षांनी आर्थ्रायटिस आणि एंडोक्राइन सिस्टिमवर इफेक्ट झाल्यावर कळतील.
माझ्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेऊ शकता कारण मी सर्टिफाईड आणि पाच वर्षांहून जास्त अनुभव असणारी डायबेटॉलॉजिस्ट आहे.
तळटीपेबद्दल धन्यवाद!
अर्रर्रर्र!! पुढल्यावेळी
अर्रर्रर्र!! पुढल्यावेळी ट्रिपवेळी आम्हाला टेम्प्टेशनमधे नेणार की नाही??
अभिनंदन! स्फुर्तीदायक लेख आहे.
साती, 'अत्यंत चुकीच्या पद्धतीने आहारात बदल केले आहेत' असे लिहिण्यापेक्षा काय बदल योग्य आहेत/ आहार कसा असायला हवा हे लिहिलेस तर बरे होईल. समीरबरोबर बाकीही वाचकांना मार्गदर्शन मिळू शकेल.
मंजुडी +१ , साती खरचं लिही
मंजुडी +१ , साती खरचं लिही आदर्श आहाराविषयी.
मंजूडी , सध्या एवढंच!
मंजूडी , सध्या एवढंच!
अर्धवट माहिती देण्याचा काय
अर्धवट माहिती देण्याचा काय उपयोग साती?
साती +१ << अजून एक. तुमचं
साती +१
<< अजून एक. तुमचं HBA1C 11.1 होतं. रिलेटिवली हा आकडा खूप जास्त आहे. त्यामूळे तुम्हाला काही लक्षात येण्यासारखी symptoms आली नाहीत का?>> शुगोल, माझ्याही मनात आधी हेच आलं.
शैलजा +१. साती, खरंच मनावर घे
शैलजा +१.
साती, खरंच मनावर घे आणि लिही बघू.
मीसुद्धा प्रिडायबेटिक आहे. जेस्टेशनल डायबिटीस होता, फॅमिली हिस्टरी आहे त्यामुळे ३-४ वर्षांत मी डायबिटीसपर्यंत पोहोचेन.
शैलजा , मी माहिती नाही
शैलजा , मी माहिती नाही प्रतिसाद देत्येय. माहिती एखादा लेख वैगेरे लिहून व्यवस्थित एकदाच देईन.
साती, खरच तुम्ही यावर लिहा.
साती, खरच तुम्ही यावर लिहा.
माहिती indicative आहे. वाचून
माहिती indicative आहे. वाचून माझ्या मनातही हे विचार आले होते, पण आपण डॉक्टर नाही. कशाला लिहा.. हा विचार करुन लिहायचे टाळले.
लिही मग लवकर साती, आणि त्यात
लिही मग लवकर साती, आणि त्यात श्रुतीच्या प्रतिसादाच्या अनुषंगानेही माहिती लिही म्हणजे समजा साखर वगैरे व्यवस्थित असली तरीही वजनाचा प्रॉब्लेम असला, तर काय खावे वगैरे म्हणजे एक जनरल प्लान जो बहुतांशी सगळ्यांना वापरता येईल.
अगदी थोडक्यात सांगायचं तर या
अगदी थोडक्यात सांगायचं तर या वयातला डायबेटिस तीन कारणांनी होऊ शकतो.
१. इन्स्युलिन पुरेषा प्रमाणात तयार होत नाहीये.
२. बॉडी साईज आणि इनटेक वाढल्याने इन्स्युलिन बॉडीला वापरता येत नाहीये
३. इन्स्युलिनचे रिसेप्टर्स इन्सूलिनला दाद देत नाहीयेत.
वरिल एकाच किंवा तिघांच्या कमी अधिक प्रमाणातील मिसळीमुळे या वयात डायबेटिस होतो.
आता यातल्या दुसर्या कारणावर आहार कमी करण्याने इलाज होऊ शकेल बाकी दोन कारणांकरता आहाराबरोबरच इतरही मेजर्स घ्यावे लागतील. उदा. बाहेरून इन्स्युलिन घेणे, इन्स्युलिनचे सिक्रीशन वाढवणारी औषधे घेणे हे पहिल्या कारणासाठी तर रिसेप्टर्सना स्टिम्युलेट करणारे ड्रग्ज तिसर्या कारणासाठी.
त्यामुळे डॉक्टरकडे जाऊन योग्य निदान करून त्याप्रमाणे आहरात आणि औषधांत बदल करणे इष्ट.
माहिती indicative आहे.>>>
माहिती indicative आहे.>>> रैना, हे पटतंय. पण ज्या उद्देशाने बदल केले आहेत, त्याचे पॉझिटिव्ह रीझल्टस् तर मिळालेत ना? शिवाय समीरने <<आताचा रिपोर्ट पाहून डॉक्टर म्हणाल्यात की, चांगलीच सुधारणा आहे, हे चालू ठेवा>> हेही लिहिलं आहे, म्हणजे त्यांनी आहारपद्धतीत केलेले बदल डॉक्टरांच्या नजरेखालून गेले आहेत ना? मग हे <<अत्यंत चुकीच्या पद्धतीने आहारात बदल केले आहेत. कोणताही शहाणा डॉक्टर हे कधी अप्रॉव करणार नाही. (ग्रॉसली अर्थात. काही बदल योग्यच आहेत.>> अश्या पद्धतीने कशाला लिहायला पाहिजे?
Pages