ऑफिसमध्ये कधी मेडीकल इन्श्युरन्ससंबंधी बोलणं झालं किंवा मित्रांशी बोलताना मी नेहमीच अभिमानानं सांगायचो की, कव्हरेज किंवा कोण डॉक्टर्स इन्शुरन्स ग्रूपमध्ये आहेत याचा मला फारसा फरक पडत नाही, गेल्या १३ वर्षांत एकदाही (कधीतरी सर्दी-खोकला सोडल्यास) डॉक्टरकडे जावं लागलं नाही, त्यामुळे फॅमिली डॉक्टरही कोणी नाही. दरवर्षी करू करू म्हणून ठरवत वार्षिक मेडिकल चेकअपही करत नव्हतो, हा मुद्दा मात्र सफाईनं टाळत असे.
या 'इगो'ला धक्का बसला ऑक्टोबर २०१२मध्ये. सुप्रिया भारतात असताना तिनं (एकदाची) ब्लड टेस्ट केली तर त्यात ग्लुकोज लेव्हल प्रचंड वाढलेली दिसली. त्याबरोबर तिनं मलाही तातडीनं चाचणी करायची ऑर्डरच दिली म्हणा. ती टेस्ट केल्यावर लक्षात आलं की, माझीही ब्लड ग्लुको़ज लेव्हल खूपच वाढलेली होती (Type 2 diabetes), आणि ती बराच काळ वाढलेली होती (HbA1C). अर्थात याला बरीच कारणं होती जी माहीत असूनही नजरेआड केली जात होती. आईवडिलांना डायबेटीस आहे, पण ते एक छोटं कारण झालं. बैठी जीवनशैली, व्यायाम करायचा आळस, कामाच्या स्वरूपामुळे तणाव, अनियमित झोप, अनियंत्रित आहार किंवा कधीकधी तो वेळेअभावी टाळणं, यां सर्व गोष्टी शरीराला अनारोग्याकडे हळूहळू ढकलत होत्याच.
नेमकं काय झालंय हे कळल्यावर सर्वात आधी आम्ही दोघे माझ्या ऑफीसमधल्या एका पंजाबी मित्राला भेटलो. तोही आमच्याच वयोगटातला आणि दोन वर्षांपूर्वी त्यालाही डायबेटीस (glucose - 400, HbA1C - 11.6) असल्याचं समजलं होतं. त्यानं स्वत: गेली दोन वर्षं फक्त आहार नियंत्रित करून ग्लुकोज लेव्हल ८०-११०ला आणली आहे. त्यानं बर्याच गोष्टी समजावून सांगितल्या. खाली दिलेली दोन पुस्तकं त्यानं वाचायला सुचवली. मुख्य म्हणजे डायबेटीक असलेल्यांना कार्ब्स किती हानीकारक असतात, हे त्यानं सांगितलं. मी भारतात देत असलेला डाएट प्लॅन पाहिला, तर त्यात बरेच कार्ब्स दिसतात. त्यावर मग गोळ्यांचा स्ट्राँग डोस दिलेला दिसतो. तसंच जगभर नॉनफॅटबद्दल सर्व तज्ज्ञ सांगत असतात, पण त्यातल्या कार्ब्जबद्दल फारं कोणी बोलत नाही. दुधाचंच उदाहरण देतो. एक कप नॉनफॅट दुधात एक कप होल मिल्कपेक्षा जास्त कार्ब्ज असतात. तीच गत दह्याची. तसेच बर्याचश्या नॉनफॅट पदार्थांमध्ये खूप प्रमाणार साखर, कार्ब्स असतात. इथे एका मराठी डॉक्टरांशी कन्सल्ट केलं. त्या आम्हांला म्हणाल्या की, आपण आधी तीन महिने आहार (कर्बोदकं कमी करणं) आणि जीवनशैलीत बदल करून पाहूया. त्यांना स्वतः आवश्यकतेशिवाय भारंभार औषधं देणं पटत नाही.
गेले तीन महिने खाली दिलेले आहारातील बदल केलेच, पण त्याचबरोबर रोज जे काही खात होतो ते नोंदवून (वजन आणि serving sizeसकट) ठेवत होतो. ग्लुकोज मीटर आणून दिवसातून ४/५ वेळा (fasting, after breakfast/lunch/dinner) ग्लुकोज लेव्हल तपासून नोंदवत होतो. हे सुरुवातीला करणं गरजेचं आहे कारण आपण काय खाल्यावर ग्लुकोज लेव्हल किती होते याचं गणित समजायला लागतं. त्याप्रमाणे आहारात बदल करता येतो. पुढेपुढे आपली लेव्हल किती असेल, हे मोजायच्या आधी केलेला अंदाज बरोबर येत जातो. तसेच मी एकावेळी एक variable बदलले (आहार, औषधे, व्यायाम). त्यामुळे नेमका कश्यामुळे ग्लुकोज लेव्हल किती येते हे नीट नोंदता आलं. एकदम सगळं घेऊन्/करून ग्लुकोज लेव्हल खाली आणण्यापेक्षा, हे आता आयुष्यभर करायचे असल्याने मला प्रत्येक बदलातला फरक जाणून घेण्यात जास्त उत्सुकता आहे.
ग्लुकोज लेव्हल वाढण्याचं अजून एक अत्यंत महत्वाचं कारण आहे तणाव (stress). नशिबानं माझा स्वभाव असा आहे की मी शक्यतो कुठल्याही गोष्टीचा अतिरिक्त तणाव घेत नाही. पण ज्यांना तणाव येत असेल त्यांनी त्यावर नियंत्रण मिळवणं अत्यावश्यक आहे.
गेल्या ३ महिन्यांत आहारात केलेले बदल -
१. रीफाईनड कार्ब्ज (भात आणि भाताचे प्रकार/ पोळी/ बटाटा/ पास्ता/ पिझा/ टॉर्टीया/ टॅको/ ब्रेड) पूर्णपणे बंद केले.
२. कुठल्याही प्रकारची साखरयुक्त पेये (सोडा/एनर्जी ड्रींक्स) पूर्णपणे बंद. फक्त पाणी/हर्बल टी/ सेल्झर / कॉफी ब्लॅक किंवा दूध घालून (साखरेशिवाय)/ दूध (होल मिल्क)/ ताक / unsweetened Almond Milk (ह्यात कार्ब्स खूप कमी आणि भरपूर प्रथिने असतात) पितो. आणि कृपया ती शुगर सब्स्टीट्युट्स वापरू नका.
३. बियरमध्ये देखील बरेच कार्ब्ज असतात. पूर्णपणे बंद.
४. गोड पदार्थ / कुकीज् / बिस्कीट्स बंद. रेस्टॉरंटमध्ये बरोबरच्यानं डेजर्ट घेतलं तर चवीपुरता एक चमचा खातो.
५. डाळी / कडधान्यं (छोले/वाटाणे/हरभरे) यांतून प्रथिनं मिळत असली तरी त्यात कर्बोदकेही खूप असतात. त्यामुळे फक्त पाव किंवा अर्धी वाटी डाळ / उसळ, तीही १५ दिवसांत एकदा.
६. बर्गर / सँडविच घेतलं तर no bread / with lettuce पर्याय निवडतो.
७. आहारात चिज/सॅलड/ हिरव्या भाज्या/अंडी/ ग्रीलड चिकन्/मासे यांचं प्रमाण वाढवलं आहे. त्यामुळे आवश्यक प्रोटीन्स/ फॅट्स मिळतात.(शाकाहारी पर्याय - पनीर/तोफू/अॅव्हाकाडो)
८. स्नॅक्स - अक्रोड / बदाम / भाजलेले एडमामे / स्ट्रिंग चिज
९. ज्युस बंद केला आहे. बेरीज, अॅपल, मोसंबी वगैरे फळं मोजक्या प्रमाणात खातो.
१०. तेल, घरचं साजूक तूप प्रमाणात वापरतो.
गेल्या ३ महिन्यात झालेले बदल - (फक्त आहारातील बदलांमुळे)
HbA1C
ऑक्टोबर २०१२ - ११.१
जानेवारी २०१३ - ७.२
Triglycerides
ऑक्टोबर २०१२ - 289
जानेवारी २०१३ - 157
Cholesterol
ऑक्टोबर २०१२ - High
जानेवारी २०१३ - Normal
वजन १५ पाउंड (७ किलो) कमी झालं.
ट्राउजर/जीन्स ३ साईझने कमी
टीशर्टस् / शर्टस् मिडीयम साईज व्यवस्थित होऊ लागले.
कायम हलकं आणि ताजंतवानं वाटतं.
अजून बरीच सुधारणा व्हायची आहे. नियमित व्यायाम करत राहायचं आहे. अर्थात ही आहारशैली सांभाळताना कधी कधी चीडचीड होते विशेषतः जेव्हा भारतीय उपाहारगृहात गेल्यावर एकही कर्बोदकरहीत पदार्थ सापडत नाही पण ती चीड्चीड तात्पुरती असते. कारण ही स्थिती आता कायमची असणार आहे, त्यामुळे याच रस्त्यावर वाटचाल करत राहायची आहे. यासंदर्भात एक आवडलेलं वाक्यः This is not 100 mtrs.dash, this is marathon. हे बदल सुप्रिया आणि मी दोघांनीही केले आहेत. तिची quarterly चाचणी अजून व्हायची असल्याने नंबर दिलेले नाहीत पण तीची ग्लुकोज लेव्हल रोजच्या तपासणीत कमी झालेली आढळते आहे. वजनही कमी झालेले आहे.
गेल्या आणि आताच्या चाचण्यांमध्ये पूर्ण पॅनेलबरोबर, मायक्रोअल्बुमीन/ c-peptide टेस्ट केली होती. आताचा रिपोर्ट पाहून डॉक्टर म्हणाल्यात की, चांगलीच सुधारणा आहे, हे चालू ठेवा. बरोबर त्यांनी सकाळी आणि रात्री जेवणाआधी फक्त अर्धी metformin घ्यायला सांगितली आहे.
आपल्यापैकी बर्याच जणांची जीवनशैली बैठी असते, आपल्या भारतीय आहारात कर्बोदके खूप प्रमाणात असतात. भारताला आता ’डायबेटीसची जागतिक राजधानी’ असं नको असलेलं विशेषण मिळतंय. ’बॉर्डरलाईन डायबेटीस’ या गोंडस नावाखाली बरेचजण दुर्लक्ष करून अपथ्यकारक खात असतात. कृपया असं करू नका. तुम्ही उंबरठा ओलांडलेला आहे. तातडीनं उपाययोजना केलीत तर ग्लुकोज लेव्हल आटोक्यात ठेवता येईल. कुठल्याही crash/extreme डाएटने काहीही साध्य होत नाही. परीपूर्ण / योग्य,नियंत्रीत प्रमाणात / नियमीत आहार घ्या.
ज्यांना शक्य असेल त्यांनी खालील गोष्टी जरूर करा -
१. आहारातील कर्बोदके (मुख्यतः refined carbs) तपासा. शक्य असल्यास टाळा. शक्य नसल्यास (शाकाहारी/अॅलर्जी असल्यास) नियंत्रणात खा. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी हे जरूर करून पाहावं. फक्त नियमितपणा पाहिजे. कुठल्याही गोष्टी एक आठवडा / महिना करून संपत नाही. तेवढ्यापुरता फायदा दिसेल, पण नंतर परत ये रे माझ्या मागल्या.
२. वर्षातून एकदातरी HbA1C चाचणी करून पाहा. एक दिवसाच्या फास्टींग / जेवणानंतरच्या चाचणीने लक्षात येईलच असे नाही.
३. खाली दिलेलं पहिलं पुस्तक तरी जरूर वाचा.
सुप्रियानं तिच्या एका मित्राला (तो non diabetic आहे) २ महिन्यांपूर्वी हा केलेला बदल सांगितला. त्याला कुतूहल वाटलं आणि त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी ही आहारशैली स्वीकारली. गेल्याच आठवड्यात तो मित्र त्याच्या दहा पाउंड कमी झालेल्या वजनाबद्दल कौतुकाने सांगत होता
वरचा आहारातला बदल वाचून बर्याच जणांना वाटेल की, अरे, मग खायचं काय? किंवा यांतल्या काही गोष्टी खाल्या नाहीत तर कसं होणार? आमच्या आणि मित्रांच्या अनुभवावरून नक्की सांगेन की काही गोष्टी आपण फक्त सवयीनं खात असतो, ज्यांची शरीराला खरच आवश्यकता नसते. आरोग्य/फीटनेसच्या दृष्टीनं प्रचंड फायदे होतात. आणि ग्रोसरीमध्ये नवीन पदार्थ शोधताना / किचनमध्ये नवीन प्रयोग करताना मजा येते.
उपयुक्त अॅप्सः
Diabetes tracker with blood glucose/carb log by mynetdiary - हे खूपच उपयुक्त अॅप आहे. आपले गोल यांत नोंदवून ठेवता येतात. तसेच रोजचे ग्लुकोज रीडींग, जेवण (with nutrition breakdown), औषधं, व्यायाम, पाणी यांच्याही नोंदी ठेवता येतात. त्यावरून मग वेगवेगळे ग्राफ्स, अॅनालीसीस पाहता येतात.
CalorieKing आणि GoMeals - ह्या दोन अॅप्समध्ये विविध पदार्थांचे न्युट्रीशन्स शोधता येतात. बर्याच रेस्टॉरंट्सचे पदार्थ देखील पाहता येतात.
References:
1. Good Calories, Bad Calories: Fats, Carbs, and the Controversial Science of Diet and Health - Gary Taubes
2. Dr. Bernstein's Diabetes Solution: The Complete Guide to Achieving Normal Blood Sugars - Dr. Richard K. Bernstein
तळटीप: माहीती जरूर वाचा पण आहारशैलीतील बदल तुमच्या डॉ.च्या सल्ल्याने करा.
दुधाचंच उदाहरण देतो. एक कप
दुधाचंच उदाहरण देतो. एक कप नॉनफॅट दुधात एक कप होल मिल्कपेक्षा जास्त कार्ब्ज असतात.
हे चुकीचे आहे.
संदर्भासाठी हे दुवे बघा.
http://reedir.arsnet.usda.gov/codesearchwebapp/(gyobyresnhajo5mbx4f03pnw)/measures.aspx?id=11111000
http://reedir.arsnet.usda.gov/codesearchwebapp/(g3akle55seuobkeqfrckd045)/measures.aspx?id=11111170
फरक हा फक्त फॅट किती आहे याचा असतो.
अभिनंदन! रुनी+१ मंजूडी+१
अभिनंदन!
रुनी+१
मंजूडी+१
अभिनंदन आणि शुभेच्छा! आहारात
अभिनंदन आणि शुभेच्छा!
आहारात एव्हढे ड्रास्टीक बदल केल्याने चीडचीड्/राग वाढत असल्यास कसं कन्ट्रोल करावा हेही कोणाला माहित असल्यास जाणून घ्यायला आवडेल ..
अभिनंदन समीर - सुप्रिया
अभिनंदन समीर - सुप्रिया !
सुप्रिया व्हेजिटेरिअन आहे, तिनी ग्रिल्ड फिश ऐवजी काय पर्याय निवडालाय वाचायला आवडेल.
सॅलड/कोशींबीर, १ वाटी दही, ग्रीलड चिकन्/मासा (पोर्शन) हे जेवण मला पुरेसे होते
<<<< अजुन एक शंका इथे, फिश आणि दही चालत का एकत्रं खाल्लेल ?
मिल्क प्रॉडक्ट्स आणि फिश एकत्रं खायचं नाही असं बर्याच जणांनी सांगितल्याचं आठवतय, का फक्त मिथ आहे ?
मधुमेह आटोक्यात आणल्याबद्दल
मधुमेह आटोक्यात आणल्याबद्दल अभिनंदन. पण नेहमी काळजी घे रे बाबा!
मिल्क प्रॉडक्ट्स आणि फिश
मिल्क प्रॉडक्ट्स आणि फिश एकत्रं खायचं नाही असं बर्याच जणांनी सांगितल्याचं आठवतय, का फक्त मिथ आहे ? >>> ह्यावर चिनूक्सने लिंक दिली होती मध्ये. परत देता येईल का ?
भारतात Isabagol Husk ह्या
भारतात Isabagol Husk ह्या नावानी मिळतं. इथे होल फूड्स मधून मी आणतो सायो. ऑनलाईन पण ऑर्डर करता येते.
<< बुवा,
होल फुड्स मधे काय प्राइस आहे ?
सगळ्या देशी स्टोअर मधे पण मिळतं, (सत इसबगोल psyllum husk) price approx $5 for 200 gm.
साती यांचेशी सहमत. वैसे भी
साती यांचेशी सहमत.
वैसे भी डायबेटीस कण्ट्रोल अपनी गल्ली मे नही आवत है
इथे नेहमीच्या भारतीय
इथे नेहमीच्या भारतीय पदार्थांमधल्या कार्ब्सची प्रमाणे दिली आहेत. त्याप्रमाणे आपला आहार ठरवायला मदत होऊ शकते.
समीर, सुप्रिया, मनापासून
समीर, सुप्रिया, मनापासून अभिनंदन. आणि पुढील प्रवासास अनेक शुभेच्छा.
माझ्या घरी देखील नवरा मधुमेही आहे आणि तो सुद्धा प्रचंड काळजी घेऊन, डाएट कंट्रोल, व्यायाम इ. इ. करून यामधे यशस्वी होत आहे. एकदा मधुमेह आटोक्यात आला तरी तो पुढे तसाच आटोक्यात ठेवणे फार कठीण असते. पण तुम्ही योग्य मार्गावर आहात.
हा असाच प्रवास मी जवळून माझ्या घरी पाहत आहे आणि मी सुद्धा थोड्याफार प्रमाणात फॉलो करते (मी मूळातच गोडखाऊ आहे तिथच गाडं अडतं पण आता स्वतःला चांगलं वळण लावलंच पाहिजे).
रिफांईड कार्ब्स बद्दल शतशः अनुमोदन.
साती, तुमच्या कडून अधिक विस्तृत माहितीची अपेक्षा आहे.
ब्लडशुगर डाएट वगैरेनी कंट्रोल
ब्लडशुगर डाएट वगैरेनी कंट्रोल होत नसते,कार्ब कट केले तर लिवरमधे स्टोअर केलेले ग्लायकोजेन रक्तात उतरते व परत ग्लुकोज काउंट जास्त येतो. एकदा मधुमेह झाला की शुगर वरखाली होतच राहते. औषधे खच्चुन खावीत व बाकीचे देवावर सोडावे एवढाच उपाय असतो.
ब्लडशुगर डाएट वगैरेनी कंट्रोल
ब्लडशुगर डाएट वगैरेनी कंट्रोल होत नसते,कार्ब कट केले तर लिवरमधे स्टोअर केलेले ग्लायकोजेन रक्तात उतरते व परत ग्लुकोज काउंट जास्त येतो. एकदा मधुमेह झाला की शुगर वरखाली होतच राहते. औषधे खच्चुन खावीत व बाकीचे देवावर सोडावे एवढाच उपाय असतो.
भोपळा१
कृपया चुकीची माहिती देऊ नका.
नियमित व्यायाम आणि योग्य आहार यामुळे मधुमेह आटोक्यात राहू शकतो.
कृपया जर पुर्ण माहीती नसेल तर
कृपया जर पुर्ण माहीती नसेल तर अर्धवट चुकीची माहीती देऊ नका , एखाद्याच्या जीवाशी खेळ होईल.
समीर, तुमचा पूर्ण लेख जरासा
समीर,
तुमचा पूर्ण लेख जरासा एकांगी वाटला कारण तुम्ही फक्त आहारात काय बदल केलेत हेच फक्त सांगितलं आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित व्यायाम हाही अतिशय आवश्यक आहे याबद्दल तुमच्या लेखात काहीच नाही.
मी पण याच सगळ्या चक्रातून १० वर्षापूर्वी गेलेलो आहे त्यामुळे सांगावेसे वाटले.
डिज्जे, साधारण १० डॉ ला मिळतो
डिज्जे, साधारण १० डॉ ला मिळतो १२ आऊन्सचा डबा होल फूड्स मध्ये.
त्रिशंकू, >>मधुमेहावर
त्रिशंकू,
>>मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित व्यायाम हाही अतिशय आवश्यक आहे
अगदी बरोबर आहे. मी हे लेखात स्पष्ट करायला पाहिजे की मी माझ्यापुरतं एकावेळी एक variable बदललं. पहिले ३ महिने आहारशैलीत बदल. आता metformin त्यात वाढवली आहे. त्यातनं रीडींग्स काय येतायत हे पाहिल्यानंतर व्यायाम वाढवेन. सध्याही अधूनमधून करत असतो.
बुवा, तुम्ही पावडर आणलीत की
बुवा, तुम्ही पावडर आणलीत की गोळ्या? पावडर दुधातून वगैरे का?
गोळ्या नाही. पावडरच. दुधात
गोळ्या नाही. पावडरच. दुधात मिसळणं शक्य नाहीये हस्क पावडर तरी. पाण्यातूनच. बाकी मिसळायला मिसळेल दुधात पण पिणं जरा अवघड आहे. चव, टेक्शचर आजिबात आवडत नाही बर्याच लोकांना.
बापरे!! मग गोळ्या बर्या की.
बापरे!! मग गोळ्या बर्या की.
पहिले ३ महिने आहारशैलीत बदल.
पहिले ३ महिने आहारशैलीत बदल. आता metformin त्यात वाढवली आहे. >>> समीर, म्हणजे HbA1C ११.१ असताना तुम्ही ३ महीने औषधाशिवाय होतात? माय गॉड! डॉक्टरकडून आलेल्या बुकात ६ किंवा त्यापेक्षा जास्त HbA1C रीडींगला थेरपी सांगितली आहे. "प्रोटीन डाएट फॉर डायबीटीस क्युअर" असं काही नवं संशोधन आहे का? मी हे सीरीयसली विचारतेय. कारण मी पण बॉर्डरलाईन डायबीटीक आहे. (गेले ३ वर्ष प्रयत्नपूर्वक ही बॉर्डरलाइन पकडून आहे.)
ऑक्टोबर २०१२ - ११.१ >>
ऑक्टोबर २०१२ - ११.१ >> बापरे!
टाईप २ डायबेटिस संदर्भातः
सगळे जण डायबेटिस झाल्यावर काय ह्या बद्दल बोलतात. प्रिडायबेटिक कंडिशन, इन्शुलिन रेझिस्टन्स, लक्षणे वगैरे बद्दल कुणीच लिहिताना दिसत नाही.
रक्तातली साखर नॉर्मल दिसत असली तरी तुम्ही बॉर्डरच्या खूप जवळ असू शकता, शरीराचं ऑलरेडी न भरून येण्यासारखं नुकसान व्हायला लागलेलं असू शकतं. पण ह्यावर आपले डॉक्टर्सही (माबोवरचे नव्हे, तुमचे स्वतःचे :)) - कधीच एज्युकेट करताना दिसत नाहीत.
रक्तात साखर निघणे ही पुढची पायरी आहे, डायबेटिस मुळे वजन कमी होणे ही त्याहून पुढची.
ह्याव्यतिरिक्त अमांनी लिहिल्याप्रमाणे किडनी, डोळे आणि इतर सेल्सवर irreversible परिणाम झालेला असू शकतो.
------------
डायेट करता:
पांढर्या भाताऐवजी हातसडीचा तांदूळ, गव्हाचा रवा (रिफाईन्ड नव्हे, तर दलिया - किंवा जाड दळलेला रवा), पोळी भाजी सोडण्याऐवजी गोड (डायरेक्ट साखर), मैदा, कुकीज, केक्स वगैरे सारखे पदार्थ सोडणे - असे सोपे सोपे उपाय डायबेटिस होण्यापूर्वी करता येऊ शकतात की.
>> समीर, म्हणजे HbA1C ११.१
>> समीर, म्हणजे HbA1C ११.१ असताना तुम्ही ३ महीने औषधाशिवाय होतात? माय गॉ>><<
मला हेच वाचून जरा आश्चर्य वाटले.
साखर जरी ९८- ११० (उपाशी पोटी , फास्टींग) दिसली तरी रोजचे डॉक्टर्स हे HA1C चेक करायला सांगत नाहीत असेही दिसून आलेय कित्येक मित्रांबाबतीत. हि टेस्ट का करत नाहीत रोजच्या बेसिक मध्ये किंवा सांगत नाहीत?
"रोजच्या आहारात निदान ४०
"रोजच्या आहारात निदान ४० ग्रॅम फायबर्स हवेत अशी भारताच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रीशनची शिफारस आहे.
आहारातील फायबरचे दोन प्रकार आहेत.--
१). न विरघळणारे फायबर्स- हे मुख्यतः गव्हाच्या कोंड्यात असतात. यांच्यामुळे शौच नरम होते. बध्दकोष्ठाचा त्रास जातो.
२). विरघळणारे फायबर्स - हे शरीरातील कोलेस्टोरॉल कमी करण्यास मदत करतात, तसेच जेवल्यावर रक्तात वाढणारी साखरेची पातळी मर्यादित करतात. हे मुख्यतः पॉलीश न केलेले तांदूळ, सालीसकट डाळी व बीन्स यात आणि थोड्या कमी प्रमाणात गाजर, रताळी, फळे व भाज्या यात असतात. मेथीच्या दाण्यात भरपूर असतात.
फायबरहीन पदार्थ - मैदा, साखर, दूध, फॅटस, बेकरी प्रॉडक्टस, मिठाया, अंडी, मांस, मासे.
हे फायबरहीन पदार्थ खाणे म्हणजे शरीराला अनैसर्गिक आहाराचा ताण निर्माण करुन आधुनिक सभ्यतेचे रोग निर्माण करणं आहे."
वरील माहिती डॉ. अभय बंग यांच्या 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' या पुस्तकातुन, जशी च्या तशी, उतरवलेली आहे. (पान ५२-५३) बहुतेक सर्वांनी वाचलेली असेलच. समीर, तुम्ही तर नक्कीच! ( ह्या लेखाच्या नावाची प्रेरणा तिथुनच मिळाली असावी असं वाटतं.) तसं असेल तर मग वरील माहिती फारशी उपयोगी वाट्ली नाही का? नसेल तर, का ते सांगणार का प्लीज? हे पुस्तक आणि डॉ. बंगांनी फॉलो केलेलं डॉ. डीन ऑर्निश यांचे "रिव्हर्सींग हार्ट डिसीज" हे पुस्तक मधुमेही, कोलेस्टोरॉल पीडीत व हृदयरोगी यांच्याकरिता मस्ट रीड आहे. अर्थातच हेमावैम.
बॉस कमीत कमी अर्धा तास चालणे
बॉस कमीत कमी अर्धा तास चालणे चालू करा. व्यायाम गरजेचा आहे. अगदी ऑफिसच्या तिथे गाडी दूर पार्क करून चालत गेलात तरीसुद्धा ठीक. मधुमेहा वर झक्कींची एक पोस्ट खूप चांगली आहे. ह्याच भागात कुठेतरी आहे.
'माझा साक्षात्कारी हृदयरोग'
'माझा साक्षात्कारी हृदयरोग' >> +१ खूपच चांगले पुस्तक आहे..
1. Good Calories, Bad Calories: Fats, Carbs, and the Controversial Science of Diet and Health - Gary Taubes हे पण बघीन.. अजून याच लेखकाचे पुस्तक मिळाले... Why We Get Fat: And What to Do About It त्याचे Reviews पण चांगले आहेत..
लोकहो मला वाटते समीरचा लेख
लोकहो मला वाटते समीरचा लेख लिहायचा उद्देश जे दुर्लक्ष त्याच्या कडून झाले ते इतरांच्या बाबतीमधे होउ नये हे होते. त्याने डॉक्टरशी केलेले प्रत्येक consultation, त्याचा रोजचा आहार वगैरे माहिती तुटपुंज्या स्वरुपात दिलेली आहे ह्याच्या अर्थ
१) त्याने इतर काहि केले नसेल
२) त्याने केले तसेच करायला हवे असे तो सुचवत आहे
असा घेण्यापेक्षा
"आपल्यापैकी बर्याच जणांची जीवनशैली बैठी असते, आपल्या भारतीय आहारात कर्बोदके खूप प्रमाणात असतात. भारताला आता ’डायबेटीसची जागतिक राजधानी’ असं नको असलेलं विशेषण मिळतंय. ’प्रिडायबेटीक’ या गोंडस नावाखाली बरेचजण दुर्लक्ष करून अपथ्यकारक खात असतात. कृपया असं करू नका. तुम्ही उंबरठा ओलांडलेला आहे. तातडीनं उपाययोजना केलीत तर ग्लुकोज लेव्हल आटोक्यात ठेवता येईल. कुठल्याही crash/extreme डाएटने काहीही साध्य होत नाही. परीपूर्ण / योग्य,नियंत्रीत प्रमाणात / नियमीत आहार घ्या."
असा घेतला तर सयुक्तिक ठरेल.
मला सुद्धा समीरचा लेख "वेळीच
मला सुद्धा समीरचा लेख "वेळीच जागे व्हावे" या अर्थाने घ्यावा असा वाटतो. बाकी त्याने काय प्रयत्न केले, कसे केले, व्यायाम किती, डाएट काय वगैरे गोष्टी प्रत्येकाने प्रत्येकाच्या डॉ च्या सल्ल्याने आणि जीवनशैलीप्रमाणे करावे. पण नियमित तपासण्या करणे आणि त्यांच्या रिझल्टकडे डोळेझाक न करणे अगदी आवश्यक आहे.
वर लेखात त्याने उल्लेख केल्याप्रमाणे "मी नॉर्मलच आहे" या इगोला जबरी धक्का बसलेले अनेक तरूण लोक मी आसपास पाहत आहे. तेव्हा एक प्रेरणा म्हणून या लेखाकडे पाहा.
असामी, धनश्री + १०
असामी, धनश्री + १०
समीर, शुगर सब्स्टीट्युट्स
समीर, शुगर सब्स्टीट्युट्स बद्दल अधिक लिहू शकाल का?
आम्ही स्प्लेंडा वापरतो. चवीत फारसा फरक नाही पडत. आणि डॉ च्या सल्ल्यानुसार फार हानीकारक पण नाहीये.
समीर, तुम्ही मधुमेहावर छान
समीर, तुम्ही मधुमेहावर छान नियंत्रण आणून, अनुभव इथे शेअर केला म्हणून धन्यवाद. त्यामुळे आता सर्वांनाच काळजी घेण्याचा साक्षात्कार होईल!
त्या निमित्ताने इथे या विषयावर चर्चा होऊन उपयुक्त माहिती मिळत आहे.
तुम्हा दोघांचे अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा.
Pages