हट्ट!!!

Submitted by मुग्धमानसी on 21 January, 2013 - 07:21

’ती’ आजही नेहमीसारखीच बसली होती खुर्चीत... खिडकीच्या बाहेर डोळे लावून.

थंडीतली उबदार दुपार होती. खिडकीबाहेर अंथरलेला रस्ता थोडासा सुतावल्यासारखा निवांत उन खात पहूडला होता. हा रस्ता एरवीही तसा निवांतच असायचा. हे घरच तसं आडवाटेला. शांत, निवांत परिसर. येणारे जाणारे या ’एरिया’चं कौतुक करायचे. पण शांततेतलाही गोंगाट ज्यांना ऐकू येतो... त्यांनी कुठे जावं?

खिडकीतुन येणारा कोवळ्या उन्हाचा छोटासा कवडसा थेट तिच्या हातांवर विसावला होता. थोड्या वेळापुर्वी हा तिच्या खांद्यावर होता... तिथुन सरकत तो तिच्या छातीवर पहूडला तेंव्हा एखाद्या गोल्ड मेडलसारखा दिसत होता. तिथुनही घसरला आणि पोटावर आला... आणि आता हातांवर थबकला आहे! अनिमिष नेत्रांनी ती कितीतरी वेळ त्या उन्हाचा तो प्रवास निरखत होती. एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्या कवडश्याचं अप्रूप वाटून घेत होती. ’हा एवढासा कवडसा... हाही कुठेतरी जायचं म्हणून प्रवास करतो आहे... हलतो आहे. त्या समोरच्या रस्त्यावरचेही सगळे कुठेना कुठे जाताहेत. पण मला मात्र... कुठेही जायचं नाही! कसलीही घाई नाही!’

’हं....’ एक उसासा सोडून तिने हळुच हातांची ओंजळ उघडली. तो कवडसा आता तिच्या ओंजळीत होता... उन्हाळ्यात वाड्यामागच्या डोंगरउतारावर अश्शी पिवळीधमक फुलं उमलायची. धावत धावत डोंगरमाथा गाठला की धापा टाकत वळून त्या पिवळ्या फुलांची चादर लपेटलेल्या उताराकडे पाहत राहणं कित्ती मजेशीर वाटायचं! ओबडधोबड डोंगरउतारावर ती पिवळी फ़ुलं... अगदी अश्शीच दिसायची... या सुरकुतलेल्या बेढब हातांवर उन सांडावं तशी! ’बरीच वर्ष झाली नाही आता.... त्यावेळी एका धावेत डोंगरमाथा चढून जायचो! हल्ली घराचे जिनेही चढणं-उतरणं होत नाही... गुढगे फार दुखतात.... आपला जुना वाडाच बरा होता. एवढा मोठ्ठा वाडा... घरातल्या घरात फिरलं तरी पाय मोकळे व्हायचे. आता त्याच जागी एका कोनाड्यात दाटीवाटीनं उभं हे घर... घरात यायचं तर जिने, घराबाहेर जायचं तर जिने... उंच मनोर्‍यात राक्षसानं लपवून ठेवलेली राजकन्या आहोत जणू आपण!!’ ती स्वतःशीच खुद्कन हसली!

"काय झालं?"
तीनं चमकून वर पाहीलं. गीता खुर्चीपाशी उभी होती. हातात जेवणाचं ताट घेउन.
"कुठं काय?"
"नाही... एकट्याच हसत होतात. काहीतरी आठवलं वाटतं..."
"आता दुसरं काय करणार गीते? नवं काही घडणं संपलं की जुनंच नव्यानं आठवत रहायचं... काय?"
"जेऊन घ्या.... नंतर औषधं घ्यायचीत."
तीनं ताट हातात घेतलं. गीता जायला वळली...
"गीता... तु जेवलीस?"
जायला वळलेली गीता जागच्या जागी थबकली. आज पाच वर्ष झाली... गीता या घरात राहून ’ती’चं सर्वकाही करत होती. तीचं पथ्यपाणी... औषधं... आणि त्याहीपेक्षा तीचे लहरी मूडस् सांभाळत होती! ’आजवर या बाईचा संताप सुद्धा अनेकदा पाहीला आहे... पण... आजवर कधी हिनं अशी माझी चौकशी केली नव्हती! खरंतर... खरंतर कुणीच केली नव्हती!’
"मी?.... अं... नाही.... जेवते..." काय होतंय आपल्याला हे न कळुन गीता क्षणार्धात खोलीबाहेर पळाली...

आपण काहीतरी गडबड केली बहुदा एवढंच तीला जाणवलं. एरवी श्री आणि मंगल आपापल्या कामाला सकाळीच निघून गेले की दिवसभर घरात ती आणि ही गीता दोघीच असायच्या. पण कामापुरत्या एखाददुसर्‍या वाक्याव्यतीरिक्त त्यांचं काही बोलणंच होत नसे! गीताचं नाव सोडलं तर तिच्याबद्दल तीला काहिही ठाऊक नव्हतं. आणि नावही कसं कळलं?.... मंगल तीला सारखी हाका मारते.. त्यावरून! ’मी राजकन्या.... अन् ही गीता माझी दासी!’ ती पुन्हा खुद्कन हसली.

जेवण होईतो तीच्या तळपायांपर्यंत पोचलेला उन्हाचा कवडसा तीची दुपारची वामकुक्षी आटपेतो गायबच झाला होता. आता जरा गारवा वाढत होता. झोपेतनं जाग येतानाच अंगावर तीला उबदार काहितरी जाणवलं. शाल... गीता पांघरून गेली होती बहूदा! तीनं ती शाल हातांत घेतली...! निळाशार रंग... स्वच्छ निरभ्र आकाशासारखा. त्यावर नाजूक लाल फुलांचा सुंदर कशिदा... कडेनं हिरवीचुटूक वेल. पाहणार्‍यालाही तीच्या अंगावर ती ताज्यातवान्या रंगाची सुंदर शाल बघून विरोधाभास चट्कन जाणवला असता. जूनाट पलंगावरच्या मळखावू चादरीवर पसरलेल्या तिच्या सुरकुतलेल्या जीर्ण देहावर ती शाल म्हणजे असं वाटत होतं जणू मळभ दाटलेल्या आकाशात पोपटांच्या थव्याने भरारी घ्यावी. अगदीच विसंगत... तरीही सुंदर! खरंतर या खोलीतल्या सगळ्यात जुन्या गोष्टींमध्ये तिच्या पाठोपाठ त्या शालीचाच क्रमांक लागत होता. पण काळाच्या ओघात या शालीने मात्र तीचं तारुण्य जपून ठेवलं! न ठेवायला काय झालं? कित्येक वर्ष ट्रंकमध्ये पडूनच तर होती नुसती... ’यांनी कधीतरी मसूरी का कुठुनतरी माझ्यासाठी आणलेली ही शाल! यांची पहिली भेट... आणि शेवटची सुद्धा. यांच्या आग्रहामुळे एक-दोनदा अंगावर पांघरली असेन... पण एवढं सुंदर आणि मौल्यवान काही अंगावर मिरवण्याची सवयच नव्हती ना... खराब झाली तर? कुणी चोरली तर? मी काही वापरली नाही... आणि हे गेल्यानंतर... कूणी तसा आग्रहही केलाच नाही! त्या दिवशी मंगलला सापडली म्हणून... नाहीतर मी विसरलेच होते या शालीबद्द्ल! मंगलला आवडलीये ही शाल. तीलाच देउन टाकावी. आपल्याला काय शोभते का आता ही?’

उठून तिनं शाल निर्वीकारपणे घडी घालायला घेतली. तिच्या कपाळी एकेकाळी कुंकू होतं. ते हरवल्याला आता काळ लोटला... त्या कुंकवाच्या मालकाचा चेहराही आता घरात भिंतीवर फोटो आहे म्हणून लक्षात आहे! नाहीतर त्या चेहर्‍याचं तिच्या आयुष्यात येणं आणि निघुन जाणं म्हणजे एका स्वप्नासारखं वाटायचं तिला कधीकधी. ते स्वप्नं छान होतं तसं. पण आता त्या स्वप्नात रमायचं तीने कधीच सोडलं होतं. हेतुपूर्वक! आता या शालीच्या निमित्ताने पुन्हा त्या सगळ्या मेहनतीवर पाणी नको. वयोमानाने आधीच हळवं होतं म्हणे मन... नकोच नसत्या आठवणींची उठाठेव... इथं कुणाला वेळ आहे आपली आसवं वगैरे पुसायला? लवकरात लवकर... आज संध्याकाळीच... मंगल ऑफिसमधुन आली की तीला ही शाल देउन टाकायची. कातर-बितर होणं... आजकाल झेपत नाही!

खिडकिबाहेर आता कातरवेळ येऊ घातली होती! रस्त्यावरची वर्दळ थोडी वाढली होती. आडवाटेचा आसरा घेऊन काही प्रेमी जीव आयुष्यभराच्या आणाभाका घ्यायला एकमेकांना चोरुन बिलगत होती. एरवी या जोडप्यांकडे पाहताना उगाचच तळतळाट व्हायचा तीचा. गीता चहा द्यायला आली की तीचं सुरू व्हायचं... ’मेल्यांना लाजा वाटत नाहीत! आई-बापानी ओवाळून टाकल्यासारखं बसलेत इथे येऊन! एकेकाची थोबाडं रंगवून हात पाय बांधून घरी धाडलं पाहीजे मेल्यांना...’ गीताही कर्तव्य असल्यासारखी निमुट सगळं ऐकून घ्यायची. कधी कधी ’जाऊ द्या नं..’ वगैरे म्हणायची. गीताला राग का येत नाही असे वाटुन तीला आणखीनच राग यायचा.

पण आज काहीतरी वेगळं होतं खास! आज तिला चिडावंसं वाटतच नव्हतं मुळी... गीता येऊन चहा ठेऊन गेली तरी ती गप्पच! तीचं लक्षच नव्हतं म्हणून... नाहीतर गीताच्या चेहर्‍यावरचे प्रश्न तीलाही सहज दिसतील असे ठसठशीत होते!

शाल घडी करुन ठेवताना त्या शालीच्या एका कोपर्‍यात बांधलेली गाठ स्पष्ट जाणवली होती तीला... आणि... आणि अचानक पोटात हजारो फुलपाखरं भिरभिरल्याची अनुभुतीसुद्धा काही कारण नसताना येत होती. ’कुठे काय? काहीच नाही झालं... काहीच जाणवलं नाही आपल्याला... काहीच होत नाहीये... नेहमीसारखंच आहे सगळं... ’ स्वतःशीच घोकत घोकत अस्वस्थ झाली ती! सैरभैर की काय म्हणतात तसं... ते हेच असतं काय? ’नको नको... नको ते पुन्हा...’

"गीता... ए गीता... कुठे मेलीस?’
गीता आली पळत - "काय झालं आजी? काय हवंय?"
"मला चहा दे!"
"अहो ठेवलाय तिथं कधीचा..."
"अं... हो का? मग मला सांगायचं नाही का... आता थंड झाला असेल तो. गरम करुन आण."
"पण... तुम्हाला थंडच लागतो ना चहा... बरं मी आणते गरम करुन."
गीता कप उचलून जायला वळली...
"कुठे चाललीस?"
"अहो चहा गरम करायचाय ना?"
"नको... मला फार गरम चहा नाही येत घेता. तुला माहीतीये ना?"
"...."
"बस नं जरा इथं अशी..." - तीच्या आवाजात अचानक उतरलेली सौम्यता जाणवून गीता किंचित गांगरली. मग तिथंच तीच्या पुढे फरशीवर पाय पोटाशी घेऊन अवघडून बसली.
बराच वेळ शांतता भरून राहीली. ’इथं असं किती वेळ बसायचंय? उठुन गेलो तर... रागवेल म्हातारी.’ - गीता अस्वस्थ झाली.

"मंगल कधी येणारे गं?" - तीच्या त्या वाक्यानं गीताची तंद्री भंगली. मान वर करून तीनं तिच्याकडे पाहीलं आणि काहीतरी वेगळंच जाणवलं तिला. नेमकं काय बरं........?
"त्या.... येतील तासा-दीड तासात. नेहमीसारख्याच."
"आणि श्री?"
"त्यांना रोजच ऊशीर होतो ना... येतील रात्री."
- रोजचं माहीत असलेलंच आज आजी पुन्हा नव्यानं का विचारताहेत? - गीताला समजेना. आजींचं आज नक्की काहीतरी विस्कटलंय. नक्की काय बरं.....?
"अर्णव... फोन आला होता का गं त्याचा इतक्यात?"
अर्णव.. तीचा एकुलता एक नातू. गेलं वर्षभर परदेशी होता... शिक्षणासाठी. आज यांनी मला का बरं त्याच्याबद्दल विचारावं? ताईंना विचारतात या अधुनमधुन कधीतरी... पण मला... मला ठाऊक असायचं काय कारण? आजींना आज काय होतंय......?
"काल रात्री आला होता बहूतेक. ताई बोलत होत्या."
"बरंय ना गं सगळं?"
"असेल... म्हणजे तसं काही विशेष नसावं"
"माझ्याबद्द्ल काही विचारत होता का गं?"
"...."
"हं.... चुकलंच माझं.... हे मंगलला विचारायला हवं. तुला काय माहीत असणार?"
पुन्हा काही काळ शांतता! अस्वस्थ... बेचैन... ही शांतता सुद्धा किती गोंगाट करते! गप्प बसता येत नाही? ती उगाचच चिडचिडली. ...सैरभैर... असंच का?
"मी जाऊ?" - गीता.
"जा... मला काहीतरी छानसं खायला आणून दे."
’हेही अजबच! ताईंना आल्यावर सांगायला हवं.’ - विचार करत गीता खोलीबाहेर निघून गेली.

अवि सांगायचा - जास्त वाईट वाटायला लागलं... उदास वगैर वाटू लागलं की मस्त चमचमीत हादडावं. चविष्ट काहीतरी पोटात जाताना त्याबरोबर मनातले वाईट विचार गिळणं सोपं जातं. - एकदम खादाड होता अवि! आईनं लाडवांसाठी बेसन भाजायला घेतलं की घरातल्या कुणालाही वास यायच्या आधी शेजारच्या घरी त्याच्यापर्यंत कसा काय पोचायचा कोण जाणे. कित्येक वर्षांचा भुकेला असल्याप्रमाणे धावत यायचा. आई रागानं म्हणायची - ’मेल्याच्या आईनं शिकारी कुत्र्याला जन्म दिलाय. घरी खायला मिळत नाही का रे? बापाला सांगायला पाहीजे... भस्म्या झालाय तुमच्या लेकाला. वैद्याला दाखवा... नाहीतर अन्नधान्य संपेल जगातलं... भूकबळी जातील...’ एकीकडे असं बडबडत आई त्याच्या हातात दोन लाडू ठेवायची मात्र नेहमी.’

अवि... अविनाश सत्यजित प्रभुणेकर... अर्धशतकापेक्षा जास्त काळ लोटला त्याला भेटून. आज अचानक मनाच्या दरवाजावर त्यानं ठोठावण्याचं कारण? आणि मी तरी त्याला प्रवेश न देण्याचं कारण? तो बधणार थोडीच आहे? आलाच की नकळत... आत...

त्या शालीच्या कोपर्‍यात गाठ बांधुन जपून ठेवल्यात त्याच्याच... आमच्याच आठवणी! अक्षता... त्याच्या लग्नाच्या.

एवढ्या नकोशा होत्या त्या आठवणी... तर इतकी वर्ष का सांभाळल्या? मी कुठे सांभाळल्या? ही शाल तरी मी कुठे मुद्दाम जपली? काळाने जपून सांभाळून ठेवलं हे सगळं. असं कधीतरी अचानक समोर आणून मला ढवळून टाकण्यासाठी!

अविच्या लग्नाला मी गेले होते. चार वर्षांच्या श्रीला घेऊन. अंगावर ही शाल पांघरुन. जायचंच होतं मला त्या लग्नाला... त्याला दाखवायला... कि मीही सुखात आहे... त्याच्याशिवाय! त्याच्या लग्नाची मंगलाष्टकं चालू असतानाच हातातल्या अक्षता शालीच्या कोपर्‍याला बांधून श्रीला घेऊन अक्षरशः फरफटत तिथुन बाहेर पडले होते मी. न जेवता. काहीतरी असह्य झालं होतं मला. नक्की काय ते आठवत नाही. पण अविचा चेहरा आठवतो... माझ्यावर खिळलेले त्याचे डोळे... पांढराफटक चेहरा. त्याक्षणी तो चेहरा तिथं थांबून वाचायची हिंमत नव्हती माझ्यात! आज... पुलाखालून एवढं पाणी गेल्यानंतरही... तो चेहरा अजूनही डोळ्यांसमोर तस्साच आहे! अन् माझ्या अंगावरचा काटाही! - ते शेवटचं. त्यानंतर आजवर मी त्याला पाहीलं नाही.

त्यानंतर वर्षभरातच हे गेले. उण्यापुर्या ५-६ वर्षांचा संसार उधळून... लहानग्या लेकराला माझ्या एकटीच्या पदरात टाकून... त्यांच्या घरच्यांच्या तोफखान्याच्या तोंडी मला आयती सोपवून...! आयती फुकटची मोलकरीण मिळाली म्हणून जावांनी मला ठेवून घेतलं आणि समाजात मोठेपणा घेतला. माझं मात्र माहेर त्यानंतर कायमचं तुटलं. त्यानंतर माहेरी गेले दोनदाच! बाबा गेले तेंव्हा... अन् आई गेली तेंव्हा! अविचा तर कधी विषयही निघाला नाही. आणि आज... आज अचानक तो आठवात येऊ पाहतोय... तर मी का पळतेय त्याच्यापासून? इतकी वर्ष झाली... उभा जन्म एकट्याने काढला. वैधव्याचा शिक्का लागला माथी तेंव्हा अवघी पंचविशी उलटलेली वयाची! त्यांच्या जागी मी गेले असते तर यांनी केलं असतं दुसरं लग्न लगेच. निदान सगळ्या समाजाने समजावलं असतं... विनवलं असतं... बिंबवलं असतं त्यांच्या मनावर की स्वतःची, मुलांची काळजी म्हणून तरी दुसरं लग्न करा....

पण मला मात्र कुणी कधी तसा आग्रह केला नाही. का? मला गरजा नाहीत? मला भूक नाही? प्रेमाची, सहवासाची, आपुलकीची.... शरिराची.....??? पुरुषाने मुलांच्या संगोपनाच्या नावाखाली दुसरा घरोबा केलेला चालतो... नव्हे केलाच पाहिजे असा समाजाचा आग्रह असतो! मग एखाद्या बाईनं दुसरा घरोबा केला... तर तोही त्याच कारणास्तव असू शकतो हे मात्र याच समाजाच्या पचनी का पडू नये? मुलांना फ़क्त आईची गरज असते? वडिलांची नाही?

बापरे...!!! हे काय होतंय मला? - ती गडबडली. भावनांचं इतकं स्पष्ट प्रकटिकरण आजवर तिनं स्वतःच्या मनाशी सुद्धा केलं नव्हतं! नवरा गेल्यानंतरही कधी चुकून मनात अविचा विचार आला तरी अपराधी वाटायचं तिला. संस्कारांचं, परंपरांचं, घरंदाज घराण्याच्या इभ्रतीचं... फारच जड ओझं होतं तिच्या मानेवर कायम. त्यामुळे मान कायम खाली झुकलेलीच असायची! पण आज... आयुष्याचा सूर्य मावळतीकडे झुकताना तरी का सोडू नये हे स्वतःला चुकवणं? आयुष्यभर असा एकही माणूस भेटला नाही ज्याच्याशी मी मोकळेपणे बोलू शकले असते... पण किमान मी... मी तरी होते ना माझ्यापाशी? मी स्वतःशीही का नाही कधी मोकळेपणाने गप्पा मारल्या? मनाचे काय काय हट्ट होते... श्रीला गाडीवर कुल्फी घेउन देताना स्वतःलाही एखादी घेउन खावी वाटायची. संध्याकाळी चक्कर टाकत कधी एकटंच डोंगरावर फिरुन यावं वाटायचं. जावांच्या मैत्रिणी जमून हास्यविनोदात रमून जायच्या... त्यांच्यात सामिल होऊन खास आपल्या पोतडीतले विनोद सांगून हसवावंसं वाटायचं... खळाळून एकदा हसावंसं वाटायचं. आपल्या कविता कुणालातरी वाचून दाखवाव्याश्या वाटायच्या.... अविचा पत्ता शोधून काढून एकदा अचानक जाऊन त्याला भेटावसं वाटायचं.... आयुष्यभर एकही हट्ट पुरवला नाही आपण मनाचा. आणि आता हे मन सैरभैर होऊ पाहतंय... तर अजूनही का बांधून ठेवायचं याला? का सोडू नये मुक्त एकदाच? मनातल्या मनात हा व्यभिचार करायला... आता या वयात... काय हरकत आहे?

अविशी लग्न करायचं होतं मला....!!!.... हुश्श!!! स्वतःशी मान्य केल्यावर आता कसं हलकं आणि शांत वाटतंय! पण अजूनही ’प्रेम’ हा शब्द काही येत नाही... ओठी जाऊदेत... निदान विचारांत तरी...??? फाजिल संस्कारांचा हा किती खोल पगडा!

तीला एकदम मोकळं वाटलं. आपले विचार खरंच कुणाला ऐकू जात नाहीत. आपण अविला मनातल्या मनात आठवलं तर कुणाला कळणार नाही. .... तिला उगाचंच दिलासा मिळाला. आता ती मोकळेपणाने ते दिवस.. तो सहवास आठवणार होती! ते अविला चोरुन भेटणं... मी नेहमी एकाच खिडकीपाशी अभ्यासाला बसायचे. आईला सांगायचे उजेड छान येतो म्हणे तिथून. पण खरंतर तिथून शेजारच्या घराच्या अंगणात ओसरीवर नेमका तेंव्हाच अभ्यासाला बसलेला अवि दिसायचा. मग नेत्रपल्लवी... इशारे... खाणाखुणा... कधीकधी चिठ्ठयांची अदलाबदल सुध्दा! खिडकीतुन येणारा लख्ख उजेड मग परिक्षेत दिसायचाच!

ती एकदम खळाळून हसली! एवढ्या मोठयाने की गीता सुद्धा पुन्हा एकदा डोकावून गेली. आजी हसताहेत? चक्क? आणि तेही एकट्याच? हे छान आहे खरंतर... पण मला काळजी का वाटतेय? ताईंना फोन करून लवकर बोलवावं का आज? पण नको... तसं काही नसेल तर... आणि नसावंच काही विशेष! म्हातारं माणूस आहे... आठवंत असेल काहीबाही! गीता परत कामात गढून गेली.
मात्र अस्वस्थतेची लागण तिच्याही मनाला झालीच होती नकळत!

वाड्यामागच्या अंधारात अविनं चुंबन घेतलेलं आपलं एकदा! - या आठवणीसरशी मात्र ती अशी काही कावरीबावरी झाली जणू आत्ताच ती सोळा वर्षांची होती आणि .....

छे बाई! पुरे आता!

गीता तेवढ्यात गरमागरम उप्पीटाची बशी घेऊन तिच्या खोलीत आली. तिला बघून तिला उगाचंच हायसं वाटलं.

"काय आणंलंस?"
"गरमागरम उप्पीट आणलंय आजी."
"उप्पीट? तुला काहीतरी चमचमीत आणायला सांगितलं होतं ना?"
"तुम्ही ’छानसं’ म्हणाला होतात... आणि हे छान आहे. वरुन साजुक तुप सोडलंय... खोबरं पेरलंय... आवडेल तुम्हाला!"
"........" ती रुसली! पुर्वी जाम इच्छा व्हायची चमचमित खायची. ऐपत होती... ताकद होती... पण असं करुन वाढणारं कुणी नव्हतं. आणि आपणही कधी तोंड उघडून इच्छा प्रदर्शित केल्या नाहीत. संकोच म्हणा... त्याग म्हणा....... त्याग? या त्यागाची सुद्धा नशा असते! घरासाठी त्याग, मुलांसाठी त्याग, गरज नसताना... कारण नसताना... उगाचंच त्याग! इतका त्याग झाला की आपल्याच लोकांना त्याची किंमत कळण्याऐवजी अजीर्ण झालं असावं. नंतर नंतर तर गृहीतच धरले जायचो आपण. घरात काही चांगलं-चुंगलं केलं तर आपल्यासाठी मुद्दाम काढून ठेवायचे कष्टं कुणी घ्यायचे नाही. नंतर कळायचं... संपलं? जीव हळहळायचा... पण वर वर मात्र ’असू दे असू दे’ म्हणायचो.
फुरंगटलेल्या आजीला पाहून गीताला गंमत वाटली. तिच्या हातात बशी देत ती आग्रहाने म्हणाली...
"चमचमीत म्हणजे तिखट म्हणत असाल तर डॉक्टरांनी अजिबात तिखट खायचं नाही म्हणून सांगितलंय ना तुम्हाला? माझं ऐका गरम उप्पीट खाऊन घ्या. हवंतर सोबत एक लोणच्याची फोड देते. पण ताईंना सांगू नका बरं का? चालेल?"
बशी हातात घेत ती म्हणाली "चालेल!"
हसत गीता बाहेर जाऊन लोणच्याची छोटीशी फोड तिच्यासाठी घेऊन आली. बशीतलं उप्पीट तसंच होतं.
"हे काय? खायला सुरुवात नाही केली?"
"खाते मी. पण गीता... एक ऐकशील माझं?"
"काय?"
"मला... मला आज जरा बाहेर चक्कर टाकाविशी वाटतेय... इथेच... कोपर्‍यावरच्या देवळापर्यंत. आहे ना ते देऊळ अजून तिथेच?"
अहो आश्चर्यम्!!! गेले कित्येक महिने ती घराबाहेर पडली सुद्धा नव्हती. मंगल कित्येकदा सांगायची.. ’आई जरा बाहेर पडा, फिरून या... बरं वाटेल तुम्हाला.’ श्री सुद्धा मागे लागायचा. पण ती मात्र बाहेरच्या जगाचा धसका घेतल्याप्रमाणे त्या चार भिंतींना सोडायची नाही! अर्णव होता तेंव्हा कधी कधी त्याच्यासोबत देवळापर्यंत जायची ती. ती देवळात थांबायची आणि देवळामागच्या पटांगणात अर्णव मित्रांसोबत क्रिकेट खेळायचा. त्यामुळे आज अचानक ती स्वतःहूनच बाहेर जायचं म्हणू लागली तेंव्हा गीताला आनंदून जावं की गोंधळून ते कळेना!
"तुम्ही बाहेर येणार? छान आहे की! शंकराच्या देवळापाशी येऊ जाऊन. अनायासे सोमवार आहे आज... माझेही दर्शन होईल. तुम्ही खाऊन घ्या... मीही आवरून घेते. ताईंना फोन करुन कळवते. मग निघू...."
"गीता...."
"हं...........???"
"मी एकटीच जाणार आहे देवळापर्यंत!"
-----

"ताई... आजी... आजी देवळात गेल्यात. एकट्याच! मी खुप सांगितलं त्यांना की मी येते सोबत. पण अगदी लहान मुलासारख्या हट्ट करत होत्या. डोळ्यांत पाणीही आलं त्यांच्या. त्यांचं ओरडणं, खेकसणं, शिव्या देणं परवडलं हो... पण डोळ्यात पाणी? अशावेळी काय करावं कुणीच कधी शिकवलेलं नाही! मला नाही हो पाहवलं. शेवटी मी जाऊ दिलं त्यांना. त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडावं... त्यांच्या नकळत असं ठरवलं... तर दाराला बाहेरून कडी घातलीये बहूदा त्यांनी. मला भीती वाटतीये... त्यांची खूप काळजी वाटतीये. तुम्ही लवकर या ताई... आज सकाळपासून वेगळ्याच वाटत होत्या आजी... तुम्ही लवकर या..." - रडत रडत गीता मंगलशी फोनवर बोलत होती. मंगलच्या प्रश्नांना उत्तरं देत होती.
-----

ती घरात पोचली तेंव्हा मंगल आणि श्री दोघेही काळवंडलेल्या चेहर्‍याने घरात येरझारा घालत होते. ’फार उशीर झाला का आपल्याला?’ - खोड्या करून घरी परतलेल्या लहान मुलासारखा तीचा चेहरा झाला होता. गीता खाली मान घालुन कोपर्‍यात उभी होती. ती आलेली तरिही सर्वात पहिल्यांदा गीतालाच समजलं...
"आजी....."
आता मंगल आणि श्री दोघांनीही तिच्याकडे पाहीलं. श्री खेकसला - "आई... अगं कुठे गेलेलीस तु? असं न सांगता? कुणाला सोबत न घेता? आख्ख्या रस्त्यावर... पुढच्या आळीत... देवळात... सगळीकडे फिरून आलो मी. होतीस कुठे इतक्या वेळ? गीतासोबत नव्हतं जायचं तर मंगल येतेच ना संध्याकाळी? तिच्यासोबत जायचं होतंस! वय काय तुझं? अशी लहान मुलासारखं हट्ट वगैरे काय करतेस? ऑफिसमधुन आल्यावर साधं पाणी सुद्धा नाही घेतलेलं आम्ही दोघांनी..."

गीताने तोवर तीला हाताला धरून घरात आणलं होतं. "पाणी आणते" - म्हणून ती आत गेली.
"गीता... या दोघांसाठी पण आण गं पाणी..."
"हो..." आत जाता जाता गीताने हळूच डोळे टिपले. तिच्या आजीशी असलेल्या नात्याचा एक नवाच पैलू आज तिला कळला होता.

आता मंगल तिच्या शेजारी येऊन बसली.
"कुठे गेला होतात आई?"
"मला नका गं आता काही विचारू. आलेय ना मी आता? लहान होते तेंव्हा चार भावंड होती पाठीवर... त्यांचे हट्ट पुरवले. मोठी झाले तर बाबा म्हणाले लग्न कर... त्यांनी निवडलेल्या मुलाशी... मी बाबांचाही हट्ट पुरवला. मला काय हवंय ते सांगायचा प्रयत्नही न करता... नंतर हा श्री झाला... त्याचे हट्ट पुरवण्यात जन्म गेला! सगळ्यांसाठी तो बापाविना अनाथ पोर होता ना! पण मी कोण होते? बापाविना... आईविना... नवर्‍याविना...? नंतर तु आलीस घरात. नव्या संसाराचे तुझेही हट्ट पुरवले. जमतील तेवढे. मग अर्णव... त्याचे बालहट्ट... तेही पुरवले. आज इतक्या वर्षांनी वाटलं स्वतःसुद्धा एखादा हट्ट करावा... पुरवून घ्यावा... स्वत: स्वतःचा एखादा हट्ट पुरवावा... म्हणून बाहेर गेले. तुम्हाला त्रास झाला. माफ करा. पण लेकरांनो... माझा सुर्यास्त आता जवळ आला रे! मावळण्याआधी एकदा मनासारखं तेजाळून घ्यावं... हलकंसं का होईना... म्हणून गेले होते... मीच माझ्या आयुष्यावर केलेले असंख्य अन्याय थोडेतरी निस्तरावेत म्हणून गेले होते... मला माफ करा..."
तिच्या डोळ्यात पाण्यानं दाटी केली होती.
...... गावी मळ्यातली झरी पावसाळ्यात अशीच काठोकाठ भरायची. झरीच्या कडेनं बाबांनी खणलेले पाट खळाळून वाहात मिरीच्या बागेत पाणी पोचवायचे. त्या झरीच्या काठी... अविसोबत... त्याच्या हाती हात देऊन...

"श्री श्री... अरे डॉक्टरांना फोन कर लवकर... आईंना भरपूर ताप भरलाय!" तिचा हात हाती घेऊन मंगल ओरडत होती. "गीता... गीता..."

मुर्छित झालेल्या तिला तिच्या पलंगावर आडवं करताना तिच्या ओटीतुन काहीतरी खाली पडलं. गीतानं चट्कन् उचलुन ते लपवलं. कागद... ओल्या भेळेचा वास... गीताला भडभडून आलं. "तुला काहीतरी चमचमीत आणायला सांगितलं होतं ना?" कुणीतरी आपल्याला आत्ताच्या आत्ता मारून टाकावं असं वाटलं गीताला...! "परमेश्वरा... या माऊलीला बरं कर! माझ्या हातानं भेळ खाऊ घालीन हिला..."
-----

"हॅलो... जोगळेकरांचं घर का?"
"हो. कोण पाहीजे आपल्याला?
"कुसूम... आहेत का?"
"कुसूम? नाही हो... असं कुणी नाही राहात इथे..."
"थांबा थांबा... अहो... ठेऊ नका फोन... कुसूम त्यांच्या माहेरचं नाव. कुसूम कुलकर्णी. नंतरचं नाव ठाऊक नाही हो मला. तुमच्या घरी आजी आहेत का? साधारण ७५ वर्षे वयाच्या...?"
"अं.... हो... माझी आजी! तिचं माहेरचं नाव विचारून सांगतो. एक सेकंद थांबा..."
.......
"हॅलो...."
"हं..."
"हो... कुसूम म्हणजे सरीता जोगळेकर... माझी आजी! तिच्याकडे काय काम होतं तुमचं?"
"अरे वा वा वा! अहो माझ्या वडिलांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा आहे येत्या २६ तारखेला. त्या निमित्ताने त्यांच्या सगळ्या जुन्या सग्यासोयर्‍यांना निमंत्रण देऊन त्यांना सरप्राईज् द्यायचा विचार आहे आमचा. तुमच्या आजीबद्द्ल फार ऐकायचो मी लहानणापासून त्यांच्याकडून. मोठया मेहनतीने तुमचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक शोधून काढला. तुमच्या आजी आल्या तर फार फार आनंद होईल माझ्या बाबांना! कृपा करुन एवढं कराच. अगदी अगत्याचं निमंत्रण आहे तुमच्या संपुर्ण कुटूंबाला..."
"अहो... जरा ऐका माझं... तुमच्या उत्साहाचा हिरमोड नाही करायचा मला... पण... आजी नाही येऊ शकणार!"
"का? तब्येत वगैरे?"
"आजी वारली! दोनच दिवस झाले..."
"...."
"हॅलो..."
"वाईट झालं हो... मला फोन करायला उशिर झाला. दोन दिवसांपुर्वी फोन केला असता... तर मला खात्री आहे... २६ तारखेपर्यंत तरी त्या नक्की जगल्या असत्या!"
"हं... खरं असेल तुमचं. पण आता ती नाही... हे खरं आहे."
"असो... निराश झालो खरा! तरिही तुम्हाला निमंत्रण देणार होतो... पण अशा मनःस्थितीत तुम्हालातरी समारंभासाठी कसे बोलवावे? आणि तसेही... मी माझ्या बाबांना ही बातमी देऊ शकेन असे वाटत नाही..."
"..."
"तुम्ही कोण?"
"मी अर्णव श्रीलेश जोगळेकर. सरीता जोगळेकर यांचा नातू. आपण?"
"मी अनिरुद्ध अविनाश प्रभुणेकर. असो. सांभाळा स्वतःला... ठेवतो फोन."
------------

मुग्धमानसी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजीनीं एकदा अवी आजोबांना भेटायला हवं होतं.
प्रामाणिक ईच्छा...............>>>++१११
सुरेख रीतीने भावना व्यक्त झाल्यात

सुरेख, सुरेख, सुरेखच......
सुंदर लेखनशैली.......

आवडली कथा. आजींच कॅरॅक्टर छान उभ केलय.

मुर्छित झालेल्या तिला तिच्या पलंगावर आडवं करताना तिच्या ओटीतुन काहीतरी खाली पडलं. गीतानं चट्कन् उचलुन ते लपवलं. कागद... ओल्या भेळेचा वास...<< डोळ्यात टचकन पाणी आलं Sad

man bharun aale........
apratim likhan.........

Pages