श्रीरंगा

Submitted by समीर चव्हाण on 24 January, 2013 - 12:52

रात पा-याची, वा-याचा दंगा
गंध श्वासाशी घालतो पिंगा
कडेशेवट राधा-हृदय हे
वाट पाहते ये ना श्रीरंगा

नीज लोचनी दाटली छद्मी
आत मोहन-भेटीची उर्मी
कुठे उरले आता माझी मी
वाट पाहते ये ना श्रीरंगा

राधा-मन हे सारखे गावे
शाममय हे तनही व्हावे
शाम-चांदणे एकदा प्यावे
वाट पाहते ये ना श्रीरंगा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिलिंद आणि अनिलः
धन्यवाद.

अनिल आपण अचूक अर्थ घेतलात.

समीर

छान कविता.
"शाममय हे तनही व्हावे
शाम-चांदणे एकदा प्यावे" >>> हे विशेष.

---------------------------------------------------
"कुठे उरली आता माझी मी"
या ओळीत उरले असे असावयास हवे असे वाटले.
चुभूद्याघ्या.

नीज लोचनी दाटली छद्मी
आत मोहन-भेटीची उर्मी
कुठे उरली आता माझी मी
वाट पाहते ये ना श्रीरंगा

>> अहाहा समीर, एक अद्भुत वातावरण निर्मिती केलीस...!

अगदी दिवसा ही कविता वाचली आहे जरी, तरी आपले अर्धोन्मिलीत नैन गवा़क्षाकडे लावून वाट पाहणारं राधा मन डोळ्यांसमोर आलंच!!

वाट पाहण्यातली हवीहवीशी हूरहूर आणि जीवलगाच्या दर्शनाची अधीरता ह्या संगमातून होणारी सूक्ष्म यातना... "वाट पाहते ये ना श्रीरंगा" वाक्यातून जाणवली ...सारं पोहोचतंय!"सुंदर" इतकाच शब्द ह्या गीताला..

शाममय हे तनही व्हावे>> व्वा!

सुंदर...

वैभव, शाम, भारतीजी
धन्यवाद.

भारतीजी:
तो तेवढा 'छद्मी' शब्द खटकला

स्वाभाविक आहे.
मूळ रचनेत छद्मी ऐवजी जुल्मी हा शब्द योजला होता.
जुल्मीचा वापर रिवायती वाटल्याने टाळावासा वाटला.
छद्मी चा रूढ अर्थ कपटी हा असला तरी एक अप्रचलित अर्थ खोडकर/मतलबी एक चांगली छटा घेऊन येते असे वाटले.
आपल्या मनमोकळ्या प्रतिसादासाठी मनापासून आभार.

मूळ रचनेत अजून एक बदल केलाय. सख्या शेवटी ऐवजी कडेशेवट घेतलाय.
कडेशेवट म्हणजे काही नाही म्हटले तरी किंवा सरतेशेवटी.

समीर

भारती, आणि मला छद्मीच आवडला..
म्हणजे त्या शब्दामुळेच गीत जास्त आवडलं असं म्हणतेय...
आपली मतं वैयक्तीक आहेत अर्थातच, पण मत मांडावसं वाटलं!

प्राण डोळ्यांशी येऊन श्रीरंगाची वाट पहाणार्‍या राधेला नेमक्या तेव्हाच, अगदी कट केल्यासारखं नीजेने गाठणं, हा छद्मीपणाच ना.. अधीरतेमुळे, प्रत्येक भासाला सखाच असावा ह्या आशेने चौफेर धुंडाळणार्‍या राधेला जणू आशेवर तग धरण्याचे श्रम पडलेत, त्या श्रमाने आलेली ग्लानी, सखा दिसायचाय, डोळा नकोय आत्ताच लागायला असे आतून वाटत असताही, नीजेने चालवलेली छद्मी कुरघोडी Happy