गाडी बुला रही है... १
पुलंच्या शंकर्याला जसा पाण्यात आख्खा बुचकळून काढला तरी समोर हॉटेल दिसल्यावर त्याला तहान लागते तसे रेल्वेगाड्यांच्या बाबतीत माझे होते.
पूर्वीच्या चित्रपटांत सुद्धा आगगाडी असली की मला जरा जास्त आकर्षण वाटायचे. शोले, शक्ती वगैरे मधे सुरुवातीला आणि शेवटी गाडीचे दृश्य आहे. किशोरचे 'गाडी बुला रही है' हे माझे एकदम आवडते. कूली जेव्हा लागला तेव्हा अमिताभ चा चित्रपट याबरोबरच रेल्वेचे वातावरण हे ही त्यात विशेष होते. तसेच 'द बर्निंग ट्रेन' चे.
माझे एक नातेवाईक शिवाजीनगर स्टेशन जवळ राहतात, लहानपणी त्यांच्याकडे जाऊन मी संध्याकाळी प्लॅटफ़ॉर्म वर जाऊन बसत असे. मुम्बईहून पुण्याकडे संध्याकाळी बर्याच गाड्या येतात, केवळ त्या बघण्यासाठी. तिथे बसून मुंबईच्या दिशेने M अक्षराच्या मधल्या भागासारखा आकार दिसू लागला की गाडी आली हे कळायचे, कारण तेव्हा ती इन्जिने त्या एकाच प्रकारची होती. त्यांचे ४-५ वेगवेगळे प्रकार होते हे पुढे कळले. मग एक हैदराबाद का मद्रास ला जाणारी गाडी, त्यानंतर जनता एक्सप्रेस जी पुढे डबल डेकर सिंहगड झाली ती आणि आणखी एक कोणतीतरी लांबची गाडी जायची. पण सगळ्यात उत्सुकता मात्र दख्खन च्या राणीची. तेव्हा फक्त तिच्या डब्यांतच ट्यूब लाईट असल्याने आणि त्या ठराविक निळ्यापिवळ्या रंगामुळे लगेच ओळखता येत असे. पण तिचा खरा दिमाख ती शिवाजीनगरला सकाळी न थांबता मधल्या रूळावरून वेगात धडधडत जाताना बघायचा. संध्याकाळी ती तिथे थांबते व जवळजवळ अर्धी रिकामी होते.
माझा काका पूर्वी कर्जत ला आणि तेही स्टेशन च्या अगदी जवळ राहात असल्याने पुण्याकडे जाणार्या गाड्यांना मागे १ किंवा २ इन्जिने लावतात ते अगदी जवळून बघायला मिळायचे. त्यासाठी पुण्याकडे व पुढे जाणार्या सर्व गाड्यांना कर्जत ला थांबावेच लागते. मधे शताब्दी वगैरे असताना तिला बहुधा खोटा स्टॉप होता: म्हणजे गाडी थांबायची पण मधल्या रूळावर. म्हणजे वेळ जाणारच पण लोकांना प्लट्फ़ॉर्म वर उतरता येणार नाही अशी रेल्वे ची अफलातून पद्धत. मी शताब्दीने कधी गेलो नाही आणि आता तिची इंटर सिटी झालेली आहे, तिनेही. पण पुणेकरांना 'मुंबईत' आल्याची पहिली खूण म्हणजे कर्जत ला दिसणारी लोकल. आता तर ती खोपोली पर्यंत झाल्याने कधीकधी घाटातूनच दिसते.
पुणे स्टेशनला ही सर्वच गाड्या थांबतात. एकतर मोठे शहर आहे म्हणून, दक्षिणेकडे दोन मार्ग फुटणारे (एक मिरज कोल्हापूर कडे व दुसरा दौंड सोलापूर कडे) जंक्शन म्हणून, पण बहुधा त्याहीपेक्षा तिथे विजेची इन्जिने बदलून डिझेल व पूर्वी कोळशाची इन्जिने लावत यासाठी. आता कोळशाची दिसत नाहीत पण पूर्वी नुसते त्या फलाटांवर उभे राहिले तरी उगाचच मुंम्बईचा भाग जास्त शहरी व विरुद्ध बाजूचा भाग जरा वेगळा वाटायचा. मुंम्बईच्या बाजूला 'विद्युत इन्जन शेड' आहे व 'डेक्कन' व नंतर आलेली पण तितकीच लाडकी बनलेली 'इंद्रायणी' सारख्या निळ्यापांढर्या गाड्या तिकडे दिसायच्या. नंतर मुंबई सारखी लोकल आल्यावर तीही दिसे. याउलट दौंड च्या बाजूला डिझेल शेड व डिझेल आणि कोळशाची इन्जिने दिसायची. आणि गाड्याही सर्व एकाच तपकिरी रंगाच्या असत.
अपूर्ण...
खूप छान मालिका. आज एकच भाग
खूप छान मालिका. आज एकच भाग वाचला आहे. मला पण डेक्कन क्वीनचे वेड आले. लहान पणी एकदा फर्स्ट मधून प्रवास करविला होता त्या ट्रेन ने. व ब्रेड ऑमलेट ब्रेक फास्ट तसेच कॅडबरी नटिन्स घेऊन दिल्या गेल्या होत्या. त्या खात खात बोगदे मोजणे वॉज वन ऑफ द बेस्ट मोमेन्टस इन माय लाइफ.
मला ही गाड्या बघायला फार आवड्ते. फिल्स मी विथ सम अननोन एनर्जी दॅट आय डोंट हॅव एनिमोअर. कंटेंट टु जस्ट सी द फ्लो
कुणास ठाऊक का पण मला ट्रेन
कुणास ठाऊक का पण मला ट्रेन प्रवास नाहीच आवडत
>>कुणास ठाऊक का पण मला ट्रेन
>>कुणास ठाऊक का पण मला ट्रेन प्रवास नाहीच आवडत
बाप्रे असे कोणी असेलसे कधी वाटले नव्हते
सुंदर माहिती, गेल्याच
सुंदर माहिती, गेल्याच महिन्यात डेक्कन क्वीन च्या Engine मधून प्रवास करण्याचा दुर्मिळ योग आला. अफाट आणि अचाट अनुभव.
फारेंडा, मस्त लेख. सुपरफास्ट
फारेंडा,
मस्त लेख. सुपरफास्ट पुरा करा.
कोळश्याच्या इंजिनाचा सुगंध. अहाहा.
अजूनही रेल्वे दिसली तरी कुणीतरी म्हणतय अस वाटत, "ते बघ, झुकझुक गाडी".
फारेंड.. आज एकदम डाऊन द मेमरी
फारेंड.. आज एकदम डाऊन द मेमरी लेन????मस्त माहिती!!
लहानपणी आगगाडीने प्रवास केलाय त्याचं चित्रं आलं डोळ्यासमोर.. आता सगळं ,'भूलीबिसरी यादें' या खात्यात जमा झालंय
लहानपणी आम्ही स्टेशनवर नुसत्या येणार्या जाणार्या गाड्याही पाहायला जायचो. स्टेशनच्या, (चक्क!!!) अति स्वच्छ असलेल्या रेस्टॉरेंटमधे सुर्रेख साऊथ इंडियन, नॉर्थ इंडिअन जेवण मिळत असे.वडिलांचे एक परममित्र खुद्द स्टेशन मास्टर होते त्यामुळे रेल्वे कॉलनीतला त्यांचा विशाल बंगला , बॅकराऊंड मधे स्टेश्नमधून सतत येणारा इंजिनांचा धसफुस आवाज ,गाड्यांचा धडधडाट भयंकर आवडीचा असे. त्यावेळी कर्कश्श शिट्याही कर्णमधूर वाटायच्या. स्टेशनच्या इतक्या जवळ राहता येतं म्हणून त्या काकांच्या मुलांचा हेवासुद्धा वाटायचा
फारेंडच्या रंगीबेरंगी पानावर
फारेंडच्या रंगीबेरंगी पानावर पूर्ण मालिका आहे. खूप छान लिहिले आहे.
विनायक एंजिन मधून कसे काय जमविले? वृत्तांत लिहा ना.
पहिला लेख मस्त .. >> इन्जन
पहिला लेख मस्त ..
>> इन्जन शेड
बाकी सगळ्याबरोबरच रेल्वे रिलेटेड् गोष्टींवर लिहीलेल्या हिंदी इंग्रजीची कायम मजा वाटत आलेली आहे ..
खूप सुंदर लेख, मलापण लहानपणी
खूप सुंदर लेख, मलापण लहानपणी गाडी बघितल्यावर ' गाडी बुला रही है' हे गाणं आठवायचं.
अरे, हे वाचलंच नव्हतं..आता
अरे, हे वाचलंच नव्हतं..आता सगळे भाग वाचतो.
आवडला लेख !
आवडला लेख !
कुणास ठाऊक का पण मला ट्रेन
कुणास ठाऊक का पण मला ट्रेन प्रवास नाहीच आवडत अरेरे
मलाही नाही आवडत . त्यातल्या त्यात प्रथमवर्गाचा तर अजिबात नाही आवडत.एकतर सगळे बन्द. बाहेरचे काहीही दिसत नाही.प्रवासाचा फील येत नाही. अगदी डोळे बांधून न्यावे आणि नव्या ठिकाणी डोळे सोदावेत असे वाटते.
रेल्वे प्रवास ना आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रचन्ड अस्वच्छता आणि रेल्वे परिसरातद्शिरल्या शिरल्या सुरू होणारा तो टिपिकल घाणेरडा वास...::राग:
मस्तच रे. सांग चेडवा दिसता
मस्तच रे. सांग चेडवा दिसता कसो खंड्याळ्याचो घाट ऐकल्यापासुन ट्रेनप्रवास भारी.
कांद्या... चेड्वा भारी कि
कांद्या... चेड्वा भारी कि रेल्वे प्रवास रे?????
थॅन्क्स लोकहो. त्यातल्या
थॅन्क्स लोकहो.
त्यातल्या त्यात प्रथमवर्गाचा तर अजिबात नाही आवडत.एकतर सगळे बन्द. >>> रॉहु एसी स्लीपर/चेअर कार म्हणायचे आहे का? प्रथम वर्ग खिडक्यांच्या बाबतीत वेगळा नसायचा. मला आताच्या एसीपेक्षा तो जुना फर्स्ट क्लास खूप आवडायचा. त्यातून बाहेरच्या जगाशी फटकून प्रवास केल्यासारखे होत नाही. पण रेल्वेने बहुतांश बंद केला आहे फर्स्ट क्लास (त्याऐवजी एसी डबे आलेत). कोणत्या गाडीला आता आहे की नाही माहीत नाही.
एसी टू टायर तर आहेच फर्स्ट
एसी टू टायर तर आहेच फर्स्ट एसी पण आहे काही गाड्याना. तीच ती बन्द खोली....
छान लेख. रेल्वे प्रवास मस्त
छान लेख. रेल्वे प्रवास मस्त होता. आणि फर्स्ट क्लास तर खरंच छान होता. आपली वेगळी खोली असल्यासारखं वाटायचं. एसी पेक्शा तो आवडायचा. आता फारच कमी गाडयांना आहे पहिला वर्ग पूर्वीचा.
आहेत फर्स्ट एसीचे कुपे अजून
आहेत फर्स्ट एसीचे कुपे अजून बर्याच गाड्यांना. सोबत २-३ लहान मुलं असतिल तर त्यांना मजा येते त्या कुपेंमध्ये प्रवास करताना.. स्पेशली राजधानीमधल्या.) एकदा मुद्दाम घरातल्या सगळ्या पोरासोरांची आणि सोबत १-२ मोठ्यांची फर्स्टची तिकिटं काढून आम्ही बाकी सगळे दुसर्या एसी डब्ब्यातून आलो होतो. पोरांनी खूप एंजॉय केला होता तो प्रवास.
फारएंड, सगळी सिरीज छान आहे ही.