चिक्की

Submitted by तृप्ती आवटी on 17 January, 2013 - 21:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी तीळ किंवा दाण्याचा कूट, १ वाटी गूळ, १ टे स्पून साजूक तूप

क्रमवार पाककृती: 

तीळ मंद आचेवर रंग न बदलू देता भाजून घ्यावेत. एका पसरट ताटात गार करायला ठेवावेत. दाण्याची चिक्की करायची असल्यास भाजलेल्या दाण्यातले १०-१२ दाणे सालं काढून अर्धे करुन घ्यावेत. उरलेल्याचा जरा भरड कूट करावा.

teeL4.jpg

एका थाळ्याला आणि वाटीच्या तळाला (बाहेरुन) तूपाचा हात लावून ठेवावे. कढईत अथवा जरा खोलगट पॅनमध्ये तूप गरम करावे. त्यात गूळ घालावा. आंच एकदम मंद ठेवावी. गूळ किसलेला नसल्यास कढईतच खडे जरा मऊ करुन फोडावेत. गुळाचा पाक होऊन फसफसायला लागेल. पाक सतत ढवळत रहावा.

teeL3.jpg

एका वाटीत गार पाणी घेऊन त्यात थेंबभर पाक घालावा. पाक लगेच कडक होउन छान खुटखुटीत झाला तर तयार झाला समजायचा (हो, खाऊन बघावा). पाक-चाचणी फेल गेल्यास आणखी थोडा वेळ फसफसु द्यावा. पाक झाल्यावर आंच बंद करावी. आता पाकात भाजलेले तीळ अथवा दाण्याचा कूट घालून भराभरा हलवावे आणि लगेच मिश्रण थाळ्यात घ्यावे. वाटीच्या तळाने सरसर पसरवावे. आपल्या (खाण्याच्या/देण्याच्या) कुवतीप्रमाणे जाडी ठेवावी. गरज पडल्यास थोडा तुपाचा हात लावून एक सारखे करुन घ्यावे. वड्या पाडायच्या असतील त्याप्रमाणे सुरीने थोड्या खाचा करुन घ्याव्यात म्हणजे नंतर वड्या तुटत नाहीत.

teeL11.jpg

पाचेक मिनिटात वड्या बर्‍यापैकी गार होउन निघायला लागतात. थाळ्याला चिकटल्याच तर थाळा अगदी पाच सेकंद गरम करावा. चिक्की तय्यार!

603151_594775723871687_892435503_n_0.jpg

वाढणी/प्रमाण: 
नक्की आठवत नाही पण साधारण २०-२५ पातळ वड्या होतात
अधिक टिपा: 

मी पॉलिश्ड तीळ वापरलेत पण अशा चिक्कीसाठी साधे- गावराण हावरी- तीळ घ्यावेत. मस्त खमंग लागतात ते तीळ.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते वेगळं कशाला सांगायला हवं. शूम्पीला फार वाईट वाटु नये म्हणून सांगितलं भुगा नाही तर दगड करणारे पण लोक आहेत जगात. Proud

मस्त आहे हा प्रकार. आणि अगदी व्यवस्थित पणे कृती दिली आहेस. मस्त.
मला पाक प्रकाराची जाम भीती वाटते. Sad

तीळ-दाणे कूटाच्या ठिसूळ वड्या पण आवडतात मला. त्याची रेसिपी आहे का इथे? त्यावर सुके किसलेले खोबरे घालून काय मस्त दिसतात त्या वड्या.

धनश्री, अशीच कृती, फक्त पाकाला उकळी नाही आणायची (सिंडीच्या भाषेत फसफसवायचा नाही). गूळ गरम करतांना अगदी किंचित पाणी घालायचं आणि गूळ विरघळला की तीळ आणि दाण्यांचं कूट घालायचं. साधारण तिळाच्या निम्मं दाण्याचं कूट आणि तिळाइतकाच गूळ (मापी प्रमाण. वजनी नव्हे.).

सिंडे, काल रात्री भीत भीत चिक्की केली. रात्री ११ ला केली म्हणजे सगळं फसलं असतं तर तसच टाकून मुकाट झोपायला जाइन हा विचार करून तो मुहुर्त धरला होता Happy
पण अहो भाग्यम, मस्त कुर्कुरीत, खुसखुशीत वड्या झाल्या पण मला फक्त त्या गोळ्याला नीट थापता न आल्याने वड्यांचे आकार सुबक नाही जमले पण चव मोर दॅन कॉम्पेन्सेट्स फॉर इट.
आता स्वानुभवाने सांगते पाक न जमायला काय झालं जमतोच तो Happy

सिंडे, काल आम्ही तुझी कृती वाचून केलेल्या, शुगोलांच्या हातच्या तीळगूळ वड्या खाल्या! अर्थात छान झाल्या होत्या! Happy

>>>साक्षीदार हजर हो

हजर आहे. वादी क्र. ४९४४ यांनी ४०३४८ येथे सादर केलेल्या पुराव्यातील फोटो क्रमांक ३ व ४ मधील ऐवज व प्रस्तुत साक्षीदार क्रमांक १७९ यांच्या पोटात पंधरा जानेवारीच्या सुमारास सद्गती लाभलेला ऐवज हा एकच - म्हणजे 'सुबक, चविष्ट व खुसखुशीत तीळगुळ वड्या' आहे हे मान्य आहे. उपरोल्लेखित वादीस हे चिक्की कौशल्य बालपणापासून अवगत आहे असेही आमचे विशेष सूत्रांकडून समजते. Happy

मी आज करणार आहे रात्री , नाईट मारून. Happy
नॅचरल तीळ म्हणुन पॅक मिळालाय . तपकिरी रंगाचे आहेत. ते वापरेन.
मी आज पर्यंत नेहमी , शेंगदाणे आणि तीळ कुट वापरून केल्या आहेत. बघू या कशा जमतात ते.

तृप्ती, एक प्रश्न... इं.ग्रो. मधला गूळ आणून तुम्ही ही चिक्की करता का? (जो चिक्कीचा नसतो असं बर्ञाच मैत्रीणिंनी सांगून झालंय) माझ्या मुलाला चिक्की इन जनरलच फार्र्फार आवडते पण कधी घरी केली नाही.

आभार्स इन अ‍ॅडव्हान्स.

वेका, गेल्या वेळी तरी इंडियन ग्रॉसरीतून आणलेल्या गुळाचीच केली होती. चांगली झाली चिक्की. गुळाची लहानी ढेप आणली असेल तर सुरीने नीट तासून/चिरून घे गूळ.

मी यंदा एका 'मैत्रिणी'ने आणलेल्या ऑर्गॅनिक गूळ पावडरीची चिक्की केली तर फसलाच प्रयत्न.

वॉव, मस्त रंग आलाय चिक्कीचा..
पाक करायचा म्हटलं कि मलाही केमिस्ट्री चे फसलेले प्रयोग आठवून, तितकंच धडधडायला होतं Wink

पण आता ट्राय करून बघायलाच हवंय...

आमच्याकडे आई कुरियरने पाठवते ऑरगॅनिक गूळ पण माझ्याच्याने तो गूळ असा चिक्कीसाठी वापरायला जीव नाही होणार. Wink
अपुन इं.ग्रो. वाली ढेप को ट्राय मारेगा...:)

इथे ऑर्गेनिक गुळ मिळाला कुठे ? >> आमच्या इथे मिळतोय इं ग्रो मधे. २४ मंत्रा आणि अजून एक ऑर्गॅनिक कंपनी अश्या दोन्हीचाही मिळतोय, मी बघून नाव सांगते, गूळ पावडर आहे, मस्त डार्क कलर आहे.

गुळाची चिक्की, तिळगुळाचे लाडु हे सगळे अगदी आवडते पदार्थ आहेत...... चिक्की कधी केली नाही, आता करुन बघणार.

गुळ असा शेंदरी का दिसतोय??

मवा धन्यवाद !
तृप्ती मऊ झाली असेल ना चिक्की .. आम्ही बिना चिक्कीच्या गूळाची करतो चिक्की नेहमी.
मुंबईत रसायन विरहीत गुळ मिळतो त्याचा रंग पण काहीसा असाच दिसतो.

तृप्ती मस्तच रेसिपी आणि फोटो एकदम जबरी आलाय.
वड्या थापताना मी एक युगत करते ती इथे सांगाविशी वाटतेय.

केक किंवा बिस्किटं भाजायला बटर पेपर मिळतो. तो ट्रेमधे ठेवून त्यावर पसरायचं मिश्रण. ह्याचा उपयोग एक की, अगदी पक्क्या पाकाच्या वड्या चिकटत नाहीत. आणि गरम असताना खाचा पाडलेल्या वड्या थोड्या थंड झाल्या की तो कागद उचलून तोडता (वेगळ्या करता) येतात. ती थाळी गरम करणं वगैरे लागत नाही. आणि शिवाय थाळीला चाकूचे चरेही पडत नाहीत.

रॉहु, छान पातळ लाटली तर दाढेला क्याप असलेले पण खाऊ शकतील. खुसखुशीत होते ही चिकी.

दाद, बटरपेपरची कल्पना आवडली.

साधना, इथे छोटी ढेप मिळते ती अगदी पिवळ्या रंगाची असते. त्या गुळाचा पाक + पिवळसर प्रकाश असं मिळून केशरी दिसतोय बहुतेक Happy

केशर, तुपात केला पाक तर खुटखुटीत होते चिकी, मऊ नाही पडत.

दादनं इथे लिहिलेली बटरपेपर वापरायची टिप भारी आहे. गरम-गरम मिश्रण बटर पेपर वर पसरवताना पेपर उचलला जातो ते थोडं ट्रिकी आहे पण गार झालेल्या वड्या अगदी सहज निघून येतात. धन्यवाद दाद.

IMG_7834.JPG

अतिशय सोपी कृती , आजच करून बघितल्या . एकदम मस्त झाल्या . मी ओट्यावर तूप लावून लाटण्याने लाटल्या , त्यामुळे वाया गेल्या नाहीत . एकदम पातळ लाटता आल्या . फोटो काढला आहे , पण प्रतीसादात कसा द्यायचा माहित नाही. नंतर देते.

Thank you very much Trupti for this Receipy. I made this chikki twice yesterday and day before. It was too good. There is no words to say. I was so happy when I saw the chikki turned good like we are purchasing from outside market. It gives me happiness and confidence too. Thanks once again to all my Mybolikars friends.IMG20180115201408.jpgIMG20180116222506.jpg

Pages