PIFF 2013

Submitted by Adm on 2 January, 2013 - 03:18

यंदाच्या वर्षीचे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (PIFF) १० ते १७ जानेवरी दरम्यान होणार आहे. नावनोंदणी (तिकिटविक्री) सध्या सुरु आहे. यंदा पहिल्यांदाच PIFF ला जाणार असल्याने एकंदरीत खूप उत्सुकता आहे.

अधिक माहिती http://puneinternationalfilmfestival.com/index.html ह्या वेबसाईट वर मिळेल.

बाकीही काही मायबोलीकर PIFFला जाणार आहेत.
तर हा धागा PIFF बद्दल, बघायच्या चित्रपटांबद्दल, पाहिलेल्या चित्रपटांबद्दल चर्चा करण्यासाठी.

कुठले चित्रपट बघावे ह्याबद्दल जाणकारांनी इथे नक्की लिहा.. आमच्या सारख्यांना ते उपयोगी पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रच्याकने.. काल पाहिलेले चारही एकसे बढकर एक होते !! दोन जर्मन, एक सर्बियन आणि एक नॉर्वेजियन..
'द परेड' नावाचा सर्बियन चित्रपट समलिंगी बाफवाल्यांना आवर्जून दाखवला पाहिजे ! विनोदी ढंगात एक से एक लगावले आहेत.. !
होम फॉर अ विकेंड.. जर्मन फॅमिली ड्रामा...सगळ्यांचे सुरेख अभिनय आणि दिग्दर्शन..
बार्बरा.. परत दुसर्‍या महायुध्दोत्तर काळातला.. सुंदर मांडणी.. पूर्व जर्मनीतला सेट सेप सुरेख होता..
The Orheim Company.. परत एकदा फॅमिली ड्रामा.. सगळ्यांचा अतिशय नैसर्गिक अभिनय.. आणि नॉर्वेमधली मनोहारी लँडस्केप्स.. ह्यातले कुठलेही कोणाचे पहायचे राहिले असतील आणि परत शो असतील तर नक्की पहा..

The Orheim Company.. हा चित्रपट भारतीय वातावरणात अतिशय चपखल बसेल नाही..दारूडा बाप..सोशिक आई...बंडखोर मुलगा...सगळे काही इतके परफेक्ट घेतले आहे की बास...

८० मिलीयन पण मस्त आहे....

मी हवे होते पुण्यात Sad खूप वाईट वाटतंय Sad
<<जे कुठले सिनेमा बघाल त्याविषयी मायबोलीवर अवश्य लिहा लोक्स>> नंदिनी +१

आशुचॅम्प.. अगदी !!
सगळे काही इतके परफेक्ट घेतले आहे की बास... >>> हो.. खूप संयतपणे हाताळला त्यांनी विषय..

मी काल 38 witnesses पण पाहिला.. भारी आहे !

मला एक प्रश्न पडलाय - असे एका दिवसात चार-चार, पाच-पाच सिनेमे पाहिले, तर at the end of the day डोक्यात सगळी भेळ होत नाही का? खासकरून परदेशी सिनेमे आणि अनोळखी कलाकार असतील तर?
माझ्या डोक्यात असं सगळं मिक्स-अप होईल असंच वाटतं मला नेहमी...

उद्या सकाळी ९ वाजता मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेला 'इनव्हेस्टमेण्ट' हा चित्रपट सिटीप्राइड कोथरुड इथे 'मराठी सिनेमा टुडे' या विभागात दाखवणार आहेत.
चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ यावेळी उपस्थित असतील.
सर्वांना हार्दिक आमंत्रण Happy

नाही होत लले, माझं रेकॉर्ड ७ सिनेमांचं आहे. Happy एकदा ट्राय मारून बघ
क्सा, थोडंतरी लिही ना पाहिलेल्या सिनेमांबद्दल. नुस्ती वेळापत्रकं टाकू नकोस. पराग बघ, २-३ ओळीत का होईना लिहितोय.

एकदा मामिला चल. अनुभव घे. >>> खरंच! डोक्यात भेळ होण्याचा जर माझा गैरसमज असेल, तर तो लवकरात लवकर दूर करायलाच हवा. नीरजा, हौ अबौट अ डे अ‍ॅट नेक्स्ट मामि? Wink

नक्कीच जाऊया गं.
पण केवळ अ डे?
जमव की सगळा फेस्टिवल. मामि सप्टे किंवा ऑक्टो मधे असतो.

खरंतर इफीला मिळून जायला हवे. गोव्याला रहायचे आणि फिल्म्स पहायच्या. पण तिथे डेलिगेट रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही फिल्म ईंडस्ट्रीमधले व्यावसायिक तरी असायला लागता किंवा मग फिल्म अभ्यासक, विद्यार्थी तरी नाहीतर पत्रकार तरी. तस्मात ते राहूद्या.

माझे आतापर्यंत बघून झालेले-

संहिता (भावे-सुकथनकर)
कुर्मावतार (गिरीश कासारवल्ली)
कुमा (ऑस्ट्रिया)
इनहेरिटर्स ऑफ द अर्थ (टी.व्ही.चंद्रन)
स्टॉप्ड अ‍ॅट द ट्रॅकहॉल्ट (जर्मनी)
व्हाईट लायन्स (सर्बिया)
द लास्ट स्टेप (इराण)
भावनी भवाई (केतन मेहता)
लकी रेड सीड्स (अंजली मेनन)
सिसिलिया (अमेरिका)
माय फादर्स बाईक (पोलंड)
सिक्रेट सनशाईन (दक्षिण कोरिया)
ब्यारी (सुवीरन)

संहिता-
एका 'स्क्रिप्ट'ची कहानी. भावे-सुकथनकरांचं अंतरंग ढवळून टाकणारी कलाकृती. मिलिंद सोमण तर मस्तच, पण देविका दफ्तरदार.. फॅब्युलस! हा रोल फक्त तिच्यासाठी होता.

कुर्मावतार-
गांधीवाद आणी वैयक्तिक आयुष्य.. कशी सांगड घालायची? एखादाच महात्मा निपजतो, ज्याला ते सारं काही जमतं. आपण फाटकी माणसं.. छोटेमोठे आनंद आणि स्वार्थ कसेबसे पुरे करण्यात आपलं सारं आयुष्य खर्ची पडतं. करायचं कसं मग त्या गांधीवादाचं नि आदर्शांचं?.. गिरीश कासारवल्लींचा अप्रतिम जॉब!

कुमा-
वर कुठेतरी परागने लिहिलंय. वेगळा, सुंदर विषय. त्या मुलीने फारच भारी काम केलंय.

इनहेरिटर्स ऑफ द अर्थ-
पृथ्वीचे वारसदार कोण? माया-मोह-स्वार्थाच्या पलीकडले लाखो प्राणी की यात बरबटलेला आणि जगात सर्वात हुशार असलेला मनुष्यप्राणी? फारच सुंदर टेकिंग. 'देवराई'ची आठवण झाली.

व्हाईट लायन्स-
भारत असो, की अमेरिका. सर्बिया असो की जपान. समाजातल्या सगळ्या थरांना सामावून घेणारी, त्यांना सुखी करणारी राज्यव्यवस्था कोणती असेल? समाजवाद.. भांडवलवाद.. लोकशाही.. हुकुमशाही.. कोणती? जागोजागी फस्सकन हसवणारी निर्मळ कॉमेडी. लझार रिस्तोव्हस्की या मुख्य अभिनेत्यानेच दिग्दर्शन केलंय. सुंदर!

द लास्ट स्टेप-
इराणी प्रेमकथा. वेगळं वातावरण, वेगळं टेकिंग. केवळ अप्रतिम!

भावनी भवाई-
नसरुद्दीन शहा, मोहन गोखले, स्मिता पाटील यांचा गुजराती सिनेमा. अस्पृश्यता, ढोंगीपणा यावर विनोदाच्या अंगाने केलेलं घणाघाती भाष्य.

लकी रेड सीड्स-
आतापर्यंत बघितलेला सर्वात हृदयस्पर्शी सिनेमा. केरळमधल्या एका जुन्या मोठ्या घरातल्या ज्येष्ठ पुरूषाचं निधन होतं. त्यानंतर त्याच्या अर्धा डझन अपत्यांचं, जावई-सूना यांचं वागणं एका लहानग्याच्या नजरेतून. मृत्युपत्र वाचलं जाण्यासाठी १६ दिवस थांबून राहिलेले सारे, ते वाचून होताच सर्वांना ते घर अचानक शापित वाटू लागतं आणि सारे काढता पाय घेतात. या दिवसांत जमलेलं सार्‍या लहानग्यांचं मैत्र एका क्षणात तुटल्यागत होतं. या सगळ्या कहाणीच्या केंद्रस्थानी आहे त्या भल्यामोठ्या घरातल्या कधीच न संपणार्‍या कामाचा रमरगाडा उपसणारी १२ वर्षांची मुलगी. अत्यंत भावनोत्कट चित्र. अशा वेळी खूप दिवसांचं राहून गेलेलं रडू येतं आणि मग मस्त छान मोकळं वाटतं. Happy शिवाय आपल्याला अजूनही रडता येतं याचा अभिमान वाटतो, ते निराळंच. Happy

माय फादर्स बाईक-
एका पोलिश कुटुंबात घडणरी गोष्ट. ७५व्या वर्षी आज्जीबाई 'पळून' जातात आणि मग त्यांना शोधायला आणि परत आणायला वरात निघते आजोबा, मुलगा आणि नातू- यांची! 'ज्या वयात थडग्यासाठी जागा शोधायची असते त्या वयात आईने पळून' जावं म्हणाजे भलतंच!' असा सतत कावत-संतापत फिरणारा मुलगा, त्याचा अतरंगी बाप आणि शाळेत जाणारा सप्तरंगी मुलगा. कुठेही मेलोड्रामा तर नाहीच, पण सतत हसवत राहणारा, आणि शेवटी आजोबा-मुलगा-मातू यांच्यातले अव्यक्त बंध हलकेच उलगडून दाखवणारा अतिसुंदर सिनेमा! प्रत्येक फ्रेम फ्रेश, सुंदर आणि चैतन्याने सळसळणारी!

PIFF संपला!

माझी उरलेली यादी..

लिव अँड इंगमार (धीरज अकोलकर- नॉर्वे, युके)
सन्स ऑफ नॉर्वे (नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फ्रान्स)
बीस्ट (डेन्मार्क)
कलर ऑफ द स्काय (बिजू- भारत)
पुणे ५२ (अरभाट निर्मिती)
आऊटरेज बियाँड (जपान)
कवी होनाजी बाळा (व्ही.शांताराम)

मनातल्या मनात बक्षीस समारंभ आयोजित करून पाहिला. एकेकाचा विचार करता करता बघितल्यापैकी निम्म्याहून अधिक सिनेमे मी मी करत पुढे सरसावले. मग उदार राजा बनून सार्‍यांना बक्षीस देऊन टाकलं. Happy

थँक्यू PIFF!

यंदा पाहिलेले सिनेमे -

१. एपिलॉग - हायुता अ‍ॅण्ड बेर्ल
२. Silence
3. White Lions
4. संहिता
5. Of love and other demons
6. The delay
7. Rose
8. Home for the weekend
9. The Parade
10. Barbara
11. 80 Million
12. The Orheim Company
13. Night across the Street
14. Hella W
15. Frozen Silence (हा अर्धवट बघितला, कारण शेजारी पुणे ५२ सुरू होता)
16. Araf
17. material
18. Stopped on Trackhalt
19. The fifth season of the year
20. Androman, blood and coal
21. इन्व्हेस्टमेंट
22. चित्रांगदा
23. Rust and Bone
24. Clip
25. बंधन
26. My father's bike

गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी चित्रपट बघता आले. Sad
तरी ग्रिप्स थिएटरचे संस्थापक फॉकर लुज्डविग, रसुल पोकुट्टी यांच्याशी बोलता आलं, रसुल पोकुट्टींचं व्याख्यान ऐकता आलं, समर नखातेसरांकडून, 'अराफ'च्या दिग्दर्शिकेकडून चित्रपटांबद्दल समजून घेता आलं, ही फार मोठी जमेची बाजू.

वा.. बरेच पाहिलेस की Happy
बार्बरा आणि रोज दोन्ही चित्रपटांना बक्षिसं मिळाली ! मला दोन्ही पहाता आले ते बरं झालं.. दोन्हींना खचाखच गर्दी होती.. पायर्‍यांवर बसले होते लोक !
अराफ बद्दल दोन्ही प्रकारची मतं ऐकली.

धीरज अकोलकरचा 'लिव अ‍ॅन्ड इन्गमार' कसा आहे?

मिफ आणि पिफची सिनेलिस्ट खूपच वेगळी दिसते आहे.

संपला ना PIFF? आता पाहिलेल्या सिनेमांबद्दल सविस्तर लिहा.
आमच्यासाठी आत्ता, नुसतेच स्वयंपाकघरातून एक-एक, छान-छान वास आलेत. Wink

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉइन्ट येथे आजपासून म्हणजे १९ जानेवारी पासून यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरु होत आहे. त्यात पिफ मधले सिनेमे दाखवले जातील,जे मिफ मधे नव्हते. हा महोत्सव २३ जानेवारी २०१३ पर्यंत चालेल.

सिक्रेट सनशाईन (दक्षिण कोरिया)

देव दयाळू आहे असं सारेच धर्म शिकवतात. दया क्षमा शांती- हाच सुखी आयुष्य जगण्याचा मंत्र- वगैरे. म्हणजे क्षमा करता येणं, हाही दैवी गुण- नाही का? आपल्या अपराध्यांना क्षमा करता आली, तर त्यातून त्या अपराध्याने गुन्हा करून उद्ध्वस्त केलेलं आपलं आयुष्य सुरळित होईल का? किमान 'आता मी क्षमा केलीय. आता शांत वाटतं आहे. देव मझ्याकडे आता कौतुकाच्या नजरेने बघत असेल' अशा (खर्‍या/खोट्या) भावनेतून मानसिक स्थैर्य मिळालं तर ते हवंच आहे ना. पण मग ते चिरंतन आहे का?
एका महिलेचा मुलगा पळवला जातो, आणि मारलाही जातो. पैसे तर गेलेच, पण सर्वस्व असलेला मुलगाही गेला म्हटल्यावर आयुष्याचं जगायचं प्रयोजन कुठून शोधणार? काही मैत्रिणी तिला देवाचा रस्ता दाखवतात. प्रार्थना, प्रवचने, भाषणे, भजने यातून आपलं मन हळूहळू स्थिर होतं आहे, हे तिला जाणवतं. त्यापुढची पायरी म्हणजे क्षमाशील होणं. मग ती ठरवते, आणि तुरूंगात जाऊन आपल्या लेकाच्या मारेकर्‍याला भेटून 'मी तुला क्षमा केली आहे' असं सांगते.
तो कैदी सारं ऐकून घेतल्यावर म्हणतो 'देव दयाळू आहे, यात शंकाच नाही. तुम्ही इथं येण्याची व्यवस्थाही त्यानेच केली असणार. इथं आल्यावर काही मित्रांकडून मी शिकलो- पश्चात्ताप व्यक्त करून तुम्ही मनापासून रडलात, तर देव तुम्हाला क्षमा करतो. तुम्ही स्वच्छ, पवित्र होता. तुम्हाला इथं बघून त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. थँक्यू!'
सावरत आलेली ती पुन्हा दुभंगते. क्षमा आधीच केलीय? तीही देवाने? मग मी क्षमा करणारी कोण? मला 'क्षमाशील व्हा!' असं देव तरी का म्हणतोय? माझ्या वेदनेला दु:खाला तरी काही अर्थ आहे की नाही? आता पुढे मी काय करायचं?
पुढे काय होतं हे प्रत्यक्ष बघणंच उत्तम. आपल्या अनेक विश्वासांना छेद देणारा हा विषय तोल सांभाळत, अत्यंत संयतपणे आणि तरीही अत्यंत कठोरपणे पडद्यावर मांडणार्‍या दिग्दर्शकाचं कौतुक वाटलं.

ब्यारी (सुवीरन)

कर्नाटक किनार्‍यावरच्या एका गावातल्या मुस्लिम कुटुंबात घडणारी कथा. 'तलाक'चं भयकारक वास्तव. वरवर अभंग वाटणार्‍या विवाहव्यवस्थतले छुपे दुभंग. पुरूषसत्ताक पद्धतीला कुठचाही धर्म आडकाठी कसा करू शकला नाही- याचं विदारक चित्र!

'लिव अ‍ॅन्ड इन्गमार' हा liv ullmann आणि ingmar bergman यांच्या (प्रेम)कहाणीवर बेतलेला चित्रपट. फ्लॅशबॅकचं तंत्र, स्वतः लिवचं नॅरेशन- यातून उलगडत जाणारी ही ५ दशकांची कहाणी प्रेमातल्या, रिलेशनशिपमधल्या अनेक अवस्था समर्थपणे पडद्यावर मांडते. या ५० वर्षांत सारं काही घडतं. आकर्षण, प्रेम, अस्वस्थता, मग सहजीवन, मग अतिसवयीतून येणारं निर्ढावलेपण आणि दुर्लक्ष आणि बेफिकिरी, मग दुरावलेपण आणि एकटेपण, मग त्यातून येणारा द्वेष आणि राग, कुणीतरी 'सोडून' दिल्याची वेदना आणि दु:ख, पुन्हा एकत्र येणं, मध्यमवयात पुन्हा जुळलेलं अनोखं मैत्र.. खूप काही. त्या-त्या वेळच्या अत्यंत इंटेन्स भावनांबद्दल आता तिर्‍हाईताची गोष्ट त्रयस्थपणे सांगत असल्यागत लिव कधी हसते, तर कधी रडतेही. त्यावेळच्या दु:खाबद्दल बोलताना कधी खळखळून हसते आणि त्या वेळच्या छोट्या छोट्या आनंदांनंतर आलेलं हसू आता भूतकाळात जमा झालं, म्हणून खंतही करते. ही जागतिक स्तरावरच्या सेलिब्रिटीजची कहाणी. पण सामान्य माणसाच्या जीवनातही हेच नाही का सगळं खरोखर घडत?

'जगातली सर्वात मोठी दु:खाची गोष्ट काय आहे माहिती आहे? कुणीतरी तुम्हाला 'सोडून दिल्याची' भावना!' असं लिव आपल्याला सांगते तेव्हा तिच्या सुंदर चेहर्‍यावरच्या सुरकुत्यांच्या जाळ्यात एकवटलेल्या अनेक दृश्य-अदृश्य भावना आपल्याला ओळखीच्या वाटतात, आपल्याच वाटतात.

मला आवडला 'लिव अ‍ॅन्ड इन्गमार'.

बीस्ट (डेन्मार्क)

याचा उल्लेख केलाच पाहिजे. प्रेमभावनेचा अतिरेक होतो तेव्हा काय होतं? पझेसिव्ह असणं हे विकृतीकडे झुकायला लागतं तेव्हा? एखाद्यावरच्या अलोट प्रेमाची पराकाष्ठा होऊन तो प्रवास हिंसेकडे होताना बघून आपण चकित होतो. त्या हिंसेमध्ये पुढे विकृती मिसळते, तेव्हा आपण हादरतोच. त्या विकृतीत शेवटी 'प्रेम आणि माये'चेच धागे पाहून आपला बसल्या जागी शक्तीपात होतो. हातापायांतलं बळ गेल्यागत वाटतं.
वेगळा विषय आणि अत्यंत अंगावर येणारा सिनेमा. मला आवडला.

कलर ऑफ द स्काय (बिजू-भारत)

'माय फादर्स बाईक' ने जी प्रसन्न 'व्हिजुअल ट्रीट' दिली तिची तुलना या चित्रपटाने दिलेल्या अनुभवाशी करता येईल. समुद्र आणि आकाश, किनार्‍यापलीकडचं एक बेट, त्यावरचं एक जुनं प्रशस्त आणि सुंदर बंगलावजा घर- या सार्‍यांच्या अत्यंत सुंदर फ्रेम्सनी जी मोहिनी केली ती आयुष्यभर लक्षात राहील. अत्यंत कमी संवाद ठेऊन सारं काही 'बघायला' भाग पडलं आहे दिग्दर्शकाने. 'कथा' ही शेवटी दुय्यमच ठरते, आणि सिनेम्याने पडद्यावर दाखवलेले 'रंग' लक्षात राहतात. 'मस्ट वॉच' असा सिनेमा.

Pages