प्रश्न फक्त बलात्काराचा नाहीये...

Submitted by मी मुक्ता.. on 9 January, 2013 - 05:39

विशेष सूचना: "बलात्कार - एक लिंगनिरपेक्ष घटना" हे प्रमाण मानून दिल्ली घटनेच्या निमित्ताने आणि त्याही आधीपासून पडलेल्या काही प्रश्नांचा आणि विचारांचा हा सारांश आहे. यात कुठेही, कोणत्याही प्रकारे बलात्काराचे समर्थन केलेले नाही. तसेच मी व्यक्त केलेल्या मतांना कोणत्याही निष्कर्षांचा आधार नाही. मी sociology किंवा history ची अभ्यासक नाही त्यामुळे मी मांडलेली मतंही सिद्धतेच्या आधाराशिवायची आहेत. फक्त एक चिंतन असेच याचे स्वरुप आहे हे कृपया वाचकांनी व जाणकारांनी ध्यानात घ्यावे. या विषयांचा अभ्यास असणार्‍यांनी मी व्यक्त केलेल्या मतांमध्ये काही त्रूटी असल्यास त्यावर प्रकाश टाकावा.
------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------
बलात्कार... शब्द उच्चारला तरी त्याची तीव्रता अंगावर यावी इतका संवेदनशील विषय आणि त्याविषयीची चर्चाही तितक्याच तीव्रतेने चालू आहे. अनेक पैलूंचा विचार केला जातोय. मतं मांडली जातायेत. ताकतवान-दुर्बल, अन्याय करणारा-सहन करणारा, मत्सर-स्वाभिमान असे अनेकानेक मुद्दे आहेत जे बलात्कार करणार्‍याची मानसिकता स्पष्ट करतात. आणि मग हा मुद्दा फक्त स्त्री-पुरता मर्यादित न राहता सर्वव्यापी होतो. पण विचार करता करता मला अचानक जाणवलं की कदाचित प्रश्न बलात्काराचा नाहीये.. प्रश्न आहे बलात्काराकडे, बलात्काराच्या घटनेकडे बघण्याच्या मानसिकतेचा. एखाद्या माणसावर दरोडा पडला, त्याच्याजवळचा सगळा पैसा चोरीला गेला तर त्याच्याकडे बघण्याच्या आपल्या दृष्टीकोनात काय आणि कितपत फरक पडतो? एकूणच समाज त्याच्याकडे 'तश्या' नजरेने पहात नाही. "अर्रेरे..बिचारा.." किंवा "खूप वाईट झालं", ही भावना असतेच पण त्यापलीकडे त्याचं तो/ती असणं intact राहतं. त्यावर काही फरक पडत नाही. मग बलात्कारीत व्यक्तीच्या संदर्भात समाजाची नजर इतकी का बदलत असेल? माणसाच्या अब्रूची संकल्पना त्याच्या शरीराशी जोडण्याचा तर हा परिणाम नाही ना?
फार फार पूर्वीच्या किंवा आजही काही आदिवासी समूहांच्या जीवनशैली बघून ही गोष्ट तर नक्की होते की त्यांच्यात शरीराचा संबंध अब्रूशी लावला जात नाही. किंवा एका क्षणासाठी असं समजू की अब्रू ही कल्पनाच तेव्हा अस्तित्वात नव्हती. मग अब्रूची संकल्पना आली कोठून? सामूहीक मालकी जाऊन वस्तू/मालमत्ता वैसक्तिक मालकीच्या होऊ लागल्या तेव्हा कदाचित अब्रूची/मोठेपणाची कल्पना आली असेल, ती ही सर्वस्वी मटेरिअलिस्टिक (मराठी शब्द काय? ) .. म्हणजे ज्याच्याकडे जास्त गायी/ जमीन/ नाणी तो तालेवार वगैरे.. मग ज्यांच्याकडे हे कमी प्रमाणात आहे त्यांना असूया वाटणार. इतरांनी त्याच्याकडून लुबाडून न्यावं असं काहीतरी त्याच्याकडे आहे, त्यामुळे त्याने त्याच्या मलमत्तेचे रक्षण केले पाहिजे वगैरे.. मग निर्धनांचे काय? अशा कोणत्यातरी काळात अब्रूचा/ शीलाचा संबंध शरीराशी जोडला गेला असेल का? इतरांना लुबाडावसं वाटावं/ असूया वाटावी असं काहीतरी अगदी निर्धन, निष्कांचन व्यक्तीकडेही आहे ही भावना त्याच्या स्वाभिमानाला पोषक ठरावी असा काही उद्देश त्यामागे होता का? आणि मग समाज जसजसा प्रगत होत गेला तसतशी याच संकल्पनेच्या भोवती चारित्र्य, शील यांची गुंफण होत राहिली का? की माणूस मुळातच त्याच्या शरीराविषयी जास्त संवेदनशील असतो? की तो तसा बनलाय? एखाद्याने कोणाविरुद्ध काही गरळ ओकली, ,पुन्हा इथे सो कॉल्ड चारित्र्याच्या कल्पनेनुसार नाही, म्हणजे त्याची/तिची खूप लफडी आहेत अशी गरळ नाही. तो/ती वाईट, खोटारडा, भ्रष्टाचारी वगैरे आहे किंवा तत्सम..) आणि एखाद्याने कोणाच्यातरी थोबाडीत मारली तर नक्की कोणता अपमान तीव्र असतो? आणि का? असं म्हणतात की शरीराला झालेल्या जखमा बुजतात पण मनाला झालेल्या जखमा बुजत नाहीत. मग यातलं नक्की खरं काय? की हा पण व्यक्तिसापेक्ष भाग आहे? आणि हे जर व्यक्तिसापेक्ष असेल तर सगळ्याच्या सगळ्या समाजानी शारीरिक अत्याचार म्हणजेच खूप वाईट अशी भावना बाळगण्याचे कारण काय?
मला कायम छळणारा अजून एक प्रश्न म्हणजे आदिम काळात, अगदी खुली संबंधव्यवस्था असतानाही बलात्कार होतच असतील की. मागून जे मिळत नाही ते बळजबरीने घेणे हा देखिल माणसाच्या वृत्तीचाच भाग आहे. त्यात ताकदवान पक्ष विजयी होतही असेल.. मग आपल्यावर हल्ला करुन कोणी जबरदस्तीने आपण केलेली शिकार पळवून नेली आणि कोणी शारीरिक अत्याचार केला या दोन्ही घटना थोड्या फार फरकाने सारख्याच असतील का? आणि तसं असेल तर आता आपण आपल्या शरीराला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व देतोय का?
हे कोणत्याही प्रकारे बलात्काराचे समर्थन नाहीये. आपल्याला कोणाचा, कोणत्याही कारणामुळे, कितीही राग आला तरी त्याचा खून करु नये हे जसं सर्वमान्य आहे तसंच आपल्याला कोणीही, कोणत्याही कारणासाठी, कितीही हवंसं वाटलं तरी त्याचा बलात्कार करु नये हेही सर्वमान्य असलंच पाहिजे. पण सर्वमान्य संकल्पना असूनही, शिक्षा असूनही खून व्हायचे थांबत नाहीत. त्याच प्रकारे बलात्काराच्या घटनाही थांबवणे अवघड आहे. अर्थात कायदा आणि सुव्यवस्था असल्यावर खूनाच्या घटना जशा प्रमाणात राहू शकतात तेच याही बाबतीत होऊ शकतं. पण खरा प्रश्न आहे तो विकृतींचा. सामूहीक बलात्कार, अ‍ॅसिड अ‍ॅटॅक, बलात्कार आणि खून, बालकांवरील, वृद्धांवरील अत्याचार या आणि अशा अगदी टिपिकल, माणसांमध्येच असणार्‍या विकृती आहेत. यांना हाताळण्याचा, रोखण्याचा प्रश्न आहे. "माणूस- निसर्गाची निर्मिती - एक प्राणी" आणि "माणूस - एक संस्कृती/ civilization या दोन्ही बाजू तोलण्याचा हा प्रश्न आहे.
न्यायदानाच्या दृष्टीने पाहिलं तर मला वाटतं, एखाद्याने रागाच्या भरात केलेल्या खूनाची तुलना वासनेच्या भरात केलेल्या बलात्काराशी करता यईल तर हेतूपूर्वक घडवलेल्या जातीय दंगली, दहशतवाद यांची तुलना सामूहीक बलात्कार किंवा अ‍ॅसिड अ‍ॅटॅक यांच्याशी करता येईल.
मला जाणिव आहे की या विचारांमध्ये उत्तर असं कशाचंच नाही. नुसतेच प्रश्न आहेत. पण मला हे प्रश्न अजून फारसे कुठे चर्चिलेले दिसले नाहीत म्हणून हा खटाटोप. प्रश्न फक्त पूर्वापार चालत आलेल्या घटनांचा किंवा त्या संघर्षाचा नाही तर त्याकडे बघण्याच्या बदलत आलेल्या संदर्भांचादेखिल आहे असं मला वाटतं..
---------------------------------------------------------------------------------------------------------
लेख वाचून तरीही काही मुद्दे अस्पष्ट असतील (or if they are sounding wrong) तर, मला हे नमूद करावसं वाटतंय की मला खालील मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे..
१. अब्रूचा संबंध शरीराशी कधीपासून व का लावला गेला?
२. बलात्कारीत व्यक्तीला शारीरिक जखमा भरल्यानंतरही त्या घटनेतून बाहेर यायला इतर अपघातांच्या तुलनेत जास्त वेळ लागतो याचं कारण काय? life could naver be the same असं होतं का? आणि होत असेल तर का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनुष्याला जेव्हा अक्कल आली, बुद्धी जागृत झाली, शहाणापण आलं, शरीर झाकण्याची "गरज" निर्माण झाली तेव्हाच बहुधा शरीराला अब्रू चिकटली असावी. मनुष्य इवॉल्व झाला किंबहुना होतोच आहे... त्यात शरीर नावाच्या जगण्याच्या सर्वोत्कृष्ट माध्यमाला महत्व प्राप्त होणं स्वाभाविक आहेच.

इथे तू म्हणालीस शरीरवरची जखम भरली तरी...
शरीरावरची जखम भरणं ही नैसर्गीक क्रिया झाली, त्याच जखमेचे व्रण मात्र मनावर पडून राहतात....
"जबरदस्ती- इच्छेविरुद्द्ध केल्या गेलेली क्रिया" ह्या गोष्टीचा अर्थ समजला तेव्हा शरीराला अब्रू चिकटली आणि म्हणूनच शरीरावर झालेला बलात्कार भरुन आला तरी मन सावरत नसावं लवकर

वस्तू/मालमत्ता वैसक्तिक मालकीच्या होऊ लागल्या तेव्हा कदाचित अब्रूची/मोठेपणाची कल्पना आली असेल,>>>
प्रश्न स्त्रीला आपली मालमत्ता समजणार्‍यांचा आलाच कुठे मुक्ता... तिला तिच्या स्वत्त्वाची त्याही पेक्षा गरजांची जाणिव झाल्यानेच बलात्कार हिडीस वाटतो.

चांगलं लिहिलयं.
मनुष्याला जेव्हा अक्कल आली, बुद्धी जागृत झाली, शहाणापण आलं, शरीर झाकण्याची "गरज" निर्माण झाली तेव्हाच बहुधा शरीराला अब्रू चिकटली असावी. >>> बागेश्री +१

बागेश्री,
प्रश्न स्त्रीला आपली मालमत्ता समजणार्‍यांचा आलाच कुठे मुक्ता..>> नाही नाही.. मला असं मुळीच म्हणायचं नाहीये... तसं वाटत असेल तर सॉरी.. Sad मी अब्रू/मोठेपणा या संकल्पनेच्या उगमाची चर्चा केली आहे...

विशेष सूचनेपासून शेवटपर्यंत वाचले. तुम्हाला धन्यवाद यासाठी की काय म्हणायचे / विचारायचे / चर्चायचे आहे हे दोन मुद्यात शेवटी परत लिहिलेत कारण नेमके काय म्हणायचे / विचारायचे / चर्चायचे आहे ते आधीचे वाचून नीट लक्षात येत नव्हते किंवा अनेक मुद्दे मिसळले गेल्यासारखे वाटत होते.

कुवतीनुसार उत्तरे द्यायचा प्रयत्नः

१. अब्रूचा संबंध शरीराशी कधीपासून व का लावला गेला?<<<

शारीरिक दौर्बल्य असणे व प्रजननातील जवळपास ९९.९९% जबाबदारी स्त्रीकडे असणे यातून स्त्रीला गुलाम, सेविका, भोग्यवस्तू, मनोरंजनाचे साधन, शोषण करण्यास सोपी व पात्र आणि पुरुषावर अवलंबून असणारी, असे सर्व काही मानणे हे पूर्वापारच सुरू झाले. आकडेवारी, दाखले, लिंक्स वगैरे देणे हा माझाही हेतू नाही जसा तुमच्या लेखातही तो नाही. पण कोणत्यातरी क्षणी पुरुषसमुहाला स्त्रीसमुहातील प्रत्येक स्त्री-घटक हा दुर्बल व पुनरुत्पादनाची बहुतांश जबाबदारी उचलणारा असल्याचे लक्षात आल्याआल्या स्त्री घटकाला वरील सर्व (जसे गुलाम, भोग्यवस्तू इत्यादी) प्रकारे 'वापरण्यास' सुरुवात झालेली असणार. यातून, तुम्हीच वर कोठेतरी म्हंटल्याप्रमाणे, जवळ स्त्री / स्त्रिया बाळगणे व त्यांचा फक्त स्वतःचसाठी 'वापर' व्हावा ही अभिलाषा बाळगणे या भावना निर्माण झालेल्या असणार, थोडक्यात एक संपत्ती किंवा सुबत्तेचे चिन्ह बनले असणार जणू ते! आपल्याजवळची चैनीची वस्तू दुसर्‍याने जबरीने अथवा चोरून वापरणे कोणालाच भावत नाही त्याचप्रमाणे स्त्री अशी दुसर्‍या कोणीही वापरू नये यासाठी प्रयत्न झालेले असणार. त्यातून नियम निर्माण झालेले असणार. त्यातील कित्येक नियम हे स्त्रीच्या स्वतःच्याच वर्तनाशी संबंधित असणार आणि त्यातून अब्रू (एकाकडची चैनीची वस्तू दुसर्‍याने बळजबरीने किंवा चोरून वापरली) लुटली जाणे ही संज्ञा व तिचे शरीराशी निगडीत होणे हे निर्माण झालेले असणार.

==================

२. बलात्कारीत व्यक्तीला शारीरिक जखमा भरल्यानंतरही त्या घटनेतून बाहेर यायला इतर अपघातांच्या तुलनेत जास्त वेळ लागतो याचं कारण काय? life could naver be the same असं होतं का? आणि होत असेल तर का?<<<

याचेही उत्तर जवळपास पहिल्याच उत्तरात असावे. अब्रू शरीराशी संलग्न ठरल्यामुळे हजारो पिढ्यांनी समाजमनावर बसवलेले त्या संदर्भातले वैचारीक थर त्या स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा उदार, मानवतावादी न ठेवता संकुचित, प्रभावित व टीकात्मक ठेवणार व त्यामुळे बलात्कारीत व्यक्तीला त्यातून बाहेर पडणे जवळपास दुरापास्त किंवा एक भली मोठी किचकट व त्रासदायक प्रक्रिया वाटणार!

-'बेफिकीर'!

मुक्ता, हा लेख वाचलास का?

बाकी तुझ्या प्रश्नांबद्दल :
माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार माणसाने एका जागी राहून शेती करायला सुरुवात केली त्यानंतरच कुटुंब, त्याची सामायिक मालमत्ता, वारसाहक्क आणि पर्यायाने सदस्यसंख्या वाढवण्यासाठी आणि ती आपल्याच कुटुंबाशी संलग्न ठेवण्यासाठी स्त्रीवर मालकीहक्क या सगळ्या संकल्पना आल्या.
स्त्रीला कोणाकडूनही अपत्यप्राप्ती होऊ शकते हे समजलं तेव्हापासून तिच्या लैंगिकतेची सांगड तिच्याच नाही तर घराण्याच्याही अब्रूशी घातली गेली. इतकी की पुरुषांत आपसांत झालेल्या वादालढायांचं एक प्रकट रूप एकमेकाच्या स्त्रीचा (निदान शाब्दिकतरी - त्यातूनच आईबहिणीवरून शिव्या!) विनयभंग करणं हे झालं.

------

अवांतर :
>> मटेरिअलिस्टिक (मराठी शब्द काय?)
ऐहिक? भौतिक?

प्रकृती आणि विकृती ही एकाच spectrum ची दोन टोकं आहेत. स्वतःकडे जे नाही, आणि दुसर्याकडे जे आहे, ते हवेसे वाटणे, मिळवण्यासाठी प्रयत्न करणे ही सहज प्रकृती आहे. पण ते चोरुन, ओरबाडून, बळजबरीने मिळवणे ही विकृती आहे.

स्त्रीला एक व्यक्ती मानण्या-आधी, एक वस्तू, मालकी-हक्काची आणि उपभोग्य वस्तू मानण्यात ह्या विकृती चं मूळ आहे, असं मला वाटतं. त्यातून, मानवी संघर्षाच्या इतिहासात, ह्या "वस्तू" वर ताबा मिळवण्याच्या तथाकथित moral victory च्या संकल्पनेचा जन्म झाला असावा.

हिन्दूस्तान / भारता च्या हजार वर्षाच्या गुलामगिरी च्या इतिहासात ह्या बळजबरी ला अब्रू ची चार पुटं जास्तं चढली असावीत आणि victim लाच, culprit मानण्याला सुरुवात झाली असावी.

अशा घटनांमधे, पिडीत व्यक्तीला जो सामाजिक त्रास होतो, त्यामुळे, त्या आघातातून आणि धक्क्यातून बाहेर पडणं ही आणखीन त्रासदायक आणि वेदनादायक प्रक्रिया होत असावी.

मला खालील मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे..
१. अब्रूचा संबंध शरीराशी कधीपासून व का लावला गेला?
२. बलात्कारीत व्यक्तीला शारीरिक जखमा भरल्यानंतरही त्या घटनेतून बाहेर यायला इतर अपघातांच्या तुलनेत जास्त वेळ लागतो याचं कारण काय? life could naver be the same असं होतं का? आणि होत असेल तर का?
***
दोन वेगळ्या प्रकारची चिंतनं आहेत. या दोघांना एकत्र गुंफण्याचा प्रयत्न करतो आहे. बरेच कॉण्ट्राव्हर्शियल होऊ शकते.
***
१.
अब्रूचा संबंध कधी आला ते ठाऊक नाही. पण बलात्कार, हा प्रकार जर युद्धाच्या संदर्भात (युद्ध हा मुळातच -in itself- एक मोठा बलात्कार आहे, तो वेगळा विषय) पाहिला, तर ज्या क्षणी स्त्री ही 'संपत्ती' म्हटली गेली त्याच क्षणी संपत्ती 'लुटण्याचे' प्रतिक म्हणून जिंकली म्हणून म्हणजेच 'संमतीविरुद्ध/विना' ती संपत्ती भोगणे म्हणून बलात्कार केले जाऊ लागले असावेत.

फार फार वर्षांपूर्वी मानवी लोकसंख्या अतीशयच कमी होती व छोट्या छोट्या टोळी समुदायांत रहाणार्‍या गटांतील युद्धानंतर हे असे होणे जेनेटिक पूल मिक्सिंगला हातभार लावणारेही ठरत असावे. पण हे मी अतीशय प्रिमिटिव्ह, आदीम काळाबद्दल विचार करतो आहे. हे काहीसे प्राण्यांत -जसे हरिणांच्या कळपात- होणार्‍या 'सत्तापालटानंतर कळपातील माद्यांची निष्ठा बदलते त्याच्याशीही साधर्म्य दाखविणारे असू शकते.

आता याच युद्धात पुन्हा एकदा हरलेले पुरुष जर सत्ता हस्तगत करण्यात यशस्वी ठरलेत, तर त्या 'बलात्कारित' स्त्रीला तुझ्या अब्रूचे भांडे फुटले असे सांगून हिणविण्यात कदाचित आनंद मानत असावेत. यात नवी संपत्ती, अर्थातच आता जिंकले त्यांच्या स्त्रियांना 'लुटण्यात' यांना आनंद येतच असेल, हे युद्धाची मानसिकता पाहून म्हणतो.

इथे अब्रू व शरिर-संबंधाचा संबंध थोडा स्पष्ट होईल असे वाटते.

२.
प्रश्न येतो तो आजच्या व युद्ध परिस्थिती नसताना होणार्‍या बलात्काराचा. हे अत्यंत अनैसर्गिक आहे असेच माझे म्हणणे आहे. ते का होतात यात मानसिक असंतुलन व विकृती या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच कारणमीमांसा मला तरी सुचत नाही. पण, दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर एका प्रश्नाने देऊ पहातो आहे.

"याबद्दलच्या मनावरील जखमा भरण्यास जास्त वेळ का लागतो?" हा तो प्रश्न.

मला वाटते, तुम्हाला कौमार्यभंग या अर्थाने 'अब्रू' बद्दल करण्यात आलेले सोशल कंडिशनिंग व त्यामुळे येणारी अपराधीपणाची भावना (गिल्ट-कॉन्शस) असे काहिसे उत्तर अपेक्षित आहे.

तर प्रश्नाच्या उत्तराचा प्रश्न हा आहे - सगळ्यांनाच : कधी तुम्हाला (आई/बाप/शिक्षक इ. सोडून) कुणा तिर्‍हाईताने खणखणीत कानाखाली काढली आहे काय? घरात चोरी झाली आहे का?

तुमच्या शरीराला झालेल्या इजेपेक्षा तुमच्या मनाला त्यावेळी झालेली अपमानाची जखम फार मोठी असते. तुमच्या पर्सनल स्पेसवरील आक्रमणाची जखम. 'माझ्या' शरीराला कुणी इजा पोहोचवू शकतो व त्याविरुद्ध मी काहीच करू शकत नाही, ही भावना अतीशय दु:खद असते, व त्यातून सावरायला भरपूर वेळ लागतो. अर्थात, वर म्हटलेले सोशल कण्डिशनिंगही तितकेच जबाबदार आहे.

***

बलात्कारितेच्या समुपदेशनाच्या वेळी काहीवेळा, तिच्याकुटुंबिय/पती यांनी (खरेच) तिची समजुत घालण्याचा प्रयत्न केला, की नुसत्या शरीरास जखमा झाल्या आहेत, त्या विसर, आम्ही तुझा स्वीकार जखमांसह करण्यास तयार आहोत, त्या जखमा दुरुस्त करण्यास आम्हाला मदत कर. तर याचा उलट अर्थ काढून - जणू my husband/family is trying to sell my body- पुनः डिप्रेशनमधे जाणार्‍या स्त्रियाही आहेत, अन यासाठी सर्वस्वी योनिशुचितेच्या कल्पना व तदानुषंगिक सोशल कण्डिशनिंग जबाबदार आहे असे माझे मत आहे.

***

(माझे दोन शब्द आपण शांतपणाने ऐकून घेतलेत त्याबद्दल धन्यवाद. इतके बोलून मी माझे दोन शब्द संपवतो)

>> तुमच्या शरीराला झालेल्या इजेपेक्षा तुमच्या मनाला त्यावेळी झालेली अपमानाची जखम फार मोठी असते. तुमच्या पर्सनल स्पेसवरील आक्रमणाची जखम. 'माझ्या' शरीराला कुणी इजा पोहोचवू शकतो व त्याविरुद्ध मी काहीच करू शकत नाही, ही भावना अतीशय दु:खद असते, व त्यातून सावरायला भरपूर वेळ लागतो

इब्लिस, you said it!!

तुमच्या शरीराला झालेल्या इजेपेक्षा तुमच्या मनाला त्यावेळी झालेली अपमानाची जखम फार मोठी असते. तुमच्या पर्सनल स्पेसवरील आक्रमणाची जखम. 'माझ्या' शरीराला कुणी इजा पोहोचवू शकतो व त्याविरुद्ध मी काहीच करू शकत नाही, ही भावना अतीशय दु:खद असते, व त्यातून सावरायला भरपूर वेळ लागतो >>

दॅटस इट ! आणि म्हणूनच बलात्काराचा संबंध इज्जतशी (अब्रू) लावला गेला नाही तरी, ती जखम खोलवरच राहते. सोशल कंडिशनिंगचा ह्या जखमेशी संबंध तसा कमी असतो कारण हे मनातल्या मनातील द्वंद्व आहे. वरून चांगली दिसणारी बलात्कारीत व्यक्ती आतून पोखरली जात असते.

अब्रूशी संबंध लावू नका (कोमार्यभंग किंवा बळजबरी) असे म्हणले जात असले आणि टंकायला सोपे असले तरी प्रत्यक्षात ते सहन करणे फार अवघड आहे. एकवेळ शरीरावरचे अत्याचार भरून येतील पण मनावरचे येणारच नाहीत.

तुमच्या शरीराला झालेल्या इजेपेक्षा तुमच्या मनाला त्यावेळी झालेली अपमानाची जखम फार मोठी असते. तुमच्या पर्सनल स्पेसवरील आक्रमणाची जखम. 'माझ्या' शरीराला कुणी इजा पोहोचवू शकतो व त्याविरुद्ध मी काहीच करू शकत नाही, ही भावना अतीशय दु:खद असते, व त्यातून सावरायला भरपूर वेळ लागतो. >> perfect इब्लिस !

बलात्कार, अब्रू, त्या अनुषंगाने येनारे social conditioning हे मुख्यत्वे करून social acceptance शी संबंधित आहे.

इब्लिस + १
<कधी तुम्हाला (आई/बाप/शिक्षक इ. सोडून) कुणा तिर्‍हाईताने खणखणीत कानाखाली काढली आहे काय?> हो रक्त येण्याइतकी खणखणीत. त्याबाबतीत मी भाग्यवान आहे.

<अन यासाठी सर्वस्वी योनिशुचितेच्या कल्पना व तदानुषंगिक सोशल कण्डिशनिंग जबाबदार आहे असे माझे मत आहे.> "सर्वस्वी" हे सोडून हेही मत पटते. योनि/लिंग शुचिता या संकल्पनांचा अतिरेक म्हणजेच एक प्रकारची सद्गुण-विकृती. यासाठी आपण प्रयत्नपूर्वक आपल्या स्वतःवर/मुलांवर संस्कार/विवेक शिकवू शकतो.

बेफ़िकीर - एक मत खटकले. माझे मत. - स्त्री ही समाज/गट्/पुरुष यांची गरज होती आणि राहील. चैन नव्हे. (पुरुष सुद्धा एक गरजच.)

बलात्कार हा पॉवर दाखवण्यासाठीच केलेला गुन्हा व एक विकृती आहे हेच दर्शवितात.
तरी बरेच प्रश्ण पडले...(हि चर्चा संबधित आहे म्हणून विचारते).

आदीमानव म्हणूया, काळात मनुष्य कपडेच घालत न्हवता. त्यावेळी स्त्रीकडे कसे पाहिले जात होते? मग त्या काळात बलात्कार होत न्हवते का?मनुष्य कपडे घालायला लागल्यापासून त्याची (पुरुषाची) वृती स्त्री कडे बघण्याची बदलली का?

दुसरे म्हणजे, महाभारत , रामायण सारख्या चित्रात/सिरियल तर काहींनी केलेल्या अनुवादात/पुस्तकात तर बरेच फॅन्सी कपडे घालताना दाखवलेत द्रौपदीचे वगैरे.. ते खरोखर तसेच होते का नुसती कल्पना? हा एक वेगळा विषय आहे, पण काही पुस्तकातून द्रौपदीचे असे वर्णन केलेय आणी वाचलेले आठवतेय की द्रौपदीची फिगर (?) पाहून सर्व पांडवाना ती प्राप्त व्हावी म्हणून लालसा निर्माण झाली होती वगैरे.... (म्हणजे स्त्री कडे भोग वस्तू म्हणून तेव्हा पासून बघायचे?)

दुसरे म्हणजे, महाभारत , रामायण सारख्या चित्रात/सिरियल तर काहींनी केलेल्या अनुवादात/पुस्तकात तर बरेच फॅन्सी कपडे घालताना दाखवलेत द्रौपदीचे वगैरे.>> हे सगळे आजच्या काळात आपले त्या काळात असलेल्या गोष्टींचे इनटरप्रीटेशन. मुळात रामायण महाभारताच काळ आपण आत्ता ३०००-५००० म्हणतो. युटूब वर द्वारका सापडली आणि त्याच्यात मिळालेल्या गोष्टींचे वयोमान १२००० टे ३२००० वर्षांपर्यंत मागे जाते अशी एक क्लीप आहे. अजून ते सगळ्यांनाच मान्य झाले नाहीये पण समजा झाले तर काय? त्यामुळे हा मुद्दा बाद ठरवा.

बाकी आपल्याकडे ह्या असल्या कृत्ये करणाऱ्यानवर कोणी संशोधन केले आहे का?त्यांनी हे कृत्य का केले ह्याचे कोणी विश्लेषण केले आहे का? कारण इथे आपण आपल्याला काय वाटते ते लिहितो आहोत पण मुळात त्यांचा मानसिक अभ्यास करून काही निष्कर्ष निघाल्याचे आईकीवत आहे काय? त्याचे काही संदर्भ कोणाला माहिती आहेत काय? विशेषतः डॉक्टर लोकांना?

कितीही चर्चाचर्विचण केले तरी जोपर्यंत आहेत त्या कायदयांची जोपर्यंत कडक अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ह्यात काही फारसा फरक पडणार नाही. शिक्षा नुसती कडक असून एखाद दुसऱ्या आरोपाला फाशी वगैरे देवून काहीही फायदा नाही जोपर्यंत सतत शिक्षा होत नाही तोपर्यंत जरब बसणार नाही आणि जरब बसत नाही तोपर्यंत मानसिक विचार बदलणार नाहीत. ह्या सगळ्याला वेळ लागणार आहे पण सध्या सगळेच सर्व गोष्टींना उतावीळ झाले आहेत आणि ते समजण्यासारखे आहे. पण मुळात शिक्षा होणे महत्वाचे.

<< की माणूस मुळातच त्याच्या शरीराविषयी जास्त संवेदनशील असतो? >> मला वाटतं या प्रश्नातच कुठेतरी या सर्वाचं उत्तर दडलेलं असावं. धनदौलत, वाडीवतन हें सारं असूनही माणसाची खरी अस्मिता व सुरक्षिततेची भावना स्वतःच्या शरीराशीच घनिष्टपणे जोडलेली असावी. शरीरावरच अचानक घाला झाला, मग तो लैंगिक नसला तरीही [ उदा. असाध्य/ दुर्धर आजार], तर माणसाच्या सुरक्षिततेच्या भावनेलाच सुरूंग लागत असावा व त्या मानसिक धक्क्यातून सांवरणं खरोखरच कठीण असावं. स्त्री ही तौलनिक दृष्ट्या सर्वसाधारणपणे दुर्बल असल्याने त्याबाबतीतली तिची सुरक्षततेची भावना खूपच अधिक दृढतेने शारिरीक विचाराशी जोडलेली असावी. त्यामुळे पुरुषाने पुरुषावर केलेल्या शारिरीक हल्ल्यापेक्षां किंवा लैंगिक बलात्कारापेक्षां [हें फार अशक्य कोटीतलं नाही, हे सांगणे नलगे ], स्त्रीच्या बाबतीत याची भयानकता कितीतरी पटीनी अधिक असणारच. त्यांतच, बलात्काराच्या बाबतींत सामाजिक कलंक इत्यादी इतर घटक त्यातून सांवरण हेंहीं स्त्रीयांसाठी अधिकच कठीण करत असतातच.

[ << मी sociology किंवा history ची अभ्यासक नाही त्यामुळे मी मांडलेली मतंही सिद्धतेच्या आधाराशिवायची आहेत >> हें मलाही अर्थातच लागू आहेच ]